भूतदया

संतांच्या भूतदया या वर खूप उदाहरणे देता येतील. जे लोक जीवनात त्रस्त आहेत त्यांचे दुःख, संत महात्मे आपल्या संकल्पाने दूर करतात. केवळ मनोमन संतांची आठवण, केल्यामुळे, त्यांना मनोमन प्रार्थना केल्यामुळे दुःख दूर होऊन मनेप्सित कामना पूर्ण होतात. प्रारब्ध बदलण्याचे सामर्थ्य संतात असते.

संतशिरोमणी भगवान दत्तात्रेयांचे चतुर्थावतार सकलमतस्थापक श्री माणिक प्रभूमहाराज यांच्या जीवन चरित्रात अशी अनेक उदाहरणे सापडतील की जेणेकरून अनेकांचे प्रारब्ध बदलून त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत.

प्रभू बालपणी बसवकल्याण क्षेत्री असतांना त्यांचा मित्र गोविंदा गवळी याला त्याच्या दारात जाऊन खेळण्यासाठी बोलावले. प्रभूंच्या मुखातून ‘गोविंदा, अरे गोविंदा’ म्हणताच घरातून मोठ्याने ओक्साबोक्सी रडण्याचा आवाज ऐकू आला.  गोविंदा मरण पावला होता आणि ती गरीब माणसे त्याच्या भोवती बसून शोक करत होती.

माणिक प्रभूंनी विचारले तेव्हा गोविंदाच्या आईने गोविंदा मृत झाल्याचे सांगितले. त्या माऊलीची माणिक प्रभूवर खूप श्रद्धा होती किंबहुना पूर्ण समर्पण होते. प्रभूंनी तिच्या अंतरगातील भाव, श्रद्धा, समर्पण पाहून आणि एका मातेच्या अंतःकरणात होणा-या पुत्रशोकाचे दुःख जाणून लीला केली आणि म्हणाले ‘अहो, असं काय बोलत आहात. गोविंदा मेला नाही, तो झोपला आहे, तुम्ही त्याला हाक मारा, तो उठेल.’ इतर  सगळ्या लोकांना विश्वास वाटला नाही, पण गोविंदाच्या आईचा माणिक प्रभूंच्या वचनावर पूर्ण विश्वास होता. तिने गोविंदास हाक मारली आणि खरोखरच झोपेतून जागे झाल्याप्रमाणे गोविंदा उठला. सगळ्यांना खूप आनंद झाला.

तात्पर्य, संतावर विश्वास, श्रद्धा असली की त्यांच्या भूतदया या जन्मजात गुणामुळे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. संत दयावंत असतात.

तो पहा प्रभुवर झाला

 

श्रीजींच्या अवतारकार्यातील काही प्रसंग कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ तो पहा विठ्ठल आला ‘ या पदाच्या चालीत रचना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रसंग विस्तृतपणे मांडता यावेत म्हणून ३ चरणांचे कडवे वापरले आहे.

तो पहा प्रभुवर झाला ‘सिद्ध’ तारण्याला।
शब्द पाळण्या पुन्हा तो लक्ष्मीपोटी आला।।धृ.।।

साळुची बुडाली चांदी, पित्याचिया कानी येई।
देवुनिया निज सितपात्र, म्हणे यासी फेकुनि देई।
लुटूलुटू जावुनि विहिरी त्यजी वाडग्याला।।१।।

निजानंदी जाण्याआधी, प्रभू हणमंता वदती।
इथेचि रहा तुं पाहण्या, आमुच्या राजाची कीर्ति।
बालरूप घेऊनि प्रभु हा पीठासीन झाला।।२।।

दूजाभाव नाहीं चित्ता, नित्य नित्य दावित समता।
देखुनि घुडूचि निष्ठा, कार्यभार दिधला हातां।
सकलमताचार्य बिद्राला खरा गौरविला।।३।।

अत्रतत्र प्रभुची सत्ता, त्रिकाळीं अबाधित ऐशी।
स्वप्नी येवुनि दर्शन ते, दिले अष्टमीचे दिवशी।
सिद्धकानीं उपदेशियले ज्ञानशांकरीला।।४।।

अनावृष्टिच्या दुष्काळी, धीर देत ग्रामजनांसी।
प्रभूनामसंकीर्तन हे, राहू दे अखंड मुखासी।
प्रभूकृपाघन आकाशा दाटुनिया आला।।५।।

बालगोप प्रभुनगरींचे, त्यांसी ज्ञाननवनित देण्या।
कृष्णरूप घेऊनि स्थापी, शारदांबिकेच्या सदना।
छात्रधर्म राखुनि भूषवी नाम माणिकाला।।६।।

ज्ञानरूप अमृतभरित, सिद्धचरित्राचा उदधि।
मुक्तकंठ प्यावा तुम्हीं, दवडु नका हीरक संधि।
नित्य जनक सन्निध असतां भीति हो कशाला।।७।।

जय जय प्रभु सिद्धराज

जय जय प्रभु सिद्धराज।
जय गुरुवर योगिराज।।धृ।।

करूणामय तव कटाक्ष
भक्त रक्षणार्थ दक्ष
कामधेनु कल्पवृक्ष
पुरविसी सद्भक्त काज।।1।।

खेळ-क्रिडा बहु आवडी
शिक्षणाची अतीव गोडी
नगरजनां लावूनि ओढी
स्थापिसी जणू रामराज।।2।।

अवतरी मार्तंड पुनरपि
शंकर-सुपुत्र रूपी
चित्त केंद्रित प्रभु स्वरूपी
म्हणूनी शिरी शोभे ताज।। 3।।

मन रमते नित्य माणिकनगरात

गुंतलो जरी प्रपंचाच्या मायाजाळात ।
गुंगलो जागरहाटीच्या कोलाहलात ।
गुरफटलो जरी मायेच्या व्यवहारात ।
मन मात्र रमते नित्य माणिकनगरात ॥१॥

पाहता श्रीमाणिकनगराची भव्य कमान ।
होई लागोलाग माझे, मन तेथेच उन्मन ।
कमानीतूनच शिरतो श्रीप्रभुच्या अंतरंगात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥२॥

पाहता श्रीप्रभुमंदिराचे भव्य सिंहद्वार ।
चूर चूर होई, आत्माभिमानाचा अहंकार ।
शरणागतीची भावना मग प्रकटे हृदयात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥२॥

पाहता श्रीमाणिकप्रभुंची समाधी ।
विटून जाई ह्या नश्वर देहाची उपाधी ।
प्रकटे प्रभु समोर द्वंद्वातीत रूपात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥३॥

पाहता समोरच श्रीदत्तप्रभुंची गादी ।
अद्वैत सिद्धांताची खळखळणारी नदी ।
सकलमत संप्रदाय प्रकटे सप्ताहभजनांत ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥४॥

पाहता गोल घुमटाकार, अद्भुत प्रभुमंदिर ।
सुवर्ण कलश जरी, पाया त्याचा मनोहर ।
घोर तपाची अनुभूती येई प्रत्येक दगडात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥५॥

पाहता प्रदक्षिणेत सर्वेश्वर, अखंडेश्वर ।
हृदयात निनादे शिवतत्वाचा जागर ।
श्रीदत्ततत्व प्रकटे सदाबहार औदुंबरात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥६॥

पाहता पुढे दत्ताची संगमरवरी मूर्ती ।
भिक्षान्न अवधूताची जाज्वल्य स्फूर्ती ।
भरोसाची प्रभुनिष्ठा, व्यक्त स्मारकात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥७॥

पाहता वाकून समाधिस्त मनोहर योगी ।
तळघरात जो चिरंतन आत्मसौख्य भोगी ।
ब्रह्मचर्य व्रताची ध्वजा घेऊन हातात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥८॥

पाहता प्रभु अभिमंत्रीत सटक्यांचे कक्ष ।
स्वातंत्र्यसंग्रामाची असे तेजोमय साक्ष ।
देशभक्तीचे रक्त मग दौडे नसानसांत ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥९॥

पाहता हात जोडलेला मुख्यप्राण मारूती ।
करे प्रकट दास्यत्वभावाची सगुण स्थिती ।
चैतन्याची अनुभूती येई प्रत्येक प्रदक्षिणेत ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥१०॥

स्थापत्यकलेचा उत्कृष्ट आविष्कार मुक्तीमंटप ।
वसे ज्यात शंकरासहित मार्तंड सदगुरू भूप ।
श्रीसिद्धराजाची समाधीही त्याच परीसरात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥११॥

श्रीव्यंकम्मामातेचे मंदिरही भव्य विराट ।
श्रीदत्तात्रेयांच्या मधुमतीशक्तीचा जो घट ।
शक्त्यानुभूती देई क्षणैक विसावता ओसरीत ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥ १२॥

बाजूलाच वायुपुत्राचे मंदिर अतिपुरातन ।
तैसाचि अश्वत्थाखाली कालाग्निरूद्र हनुमान ।
सदा दक्ष माणिकक्षेत्र अभिमान रक्षणात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥ १३॥

गुरूगंगा विरजेचा जेथे होई संगम ।
पुष्करणी तीर्थ तेथे बांधिले अनुपम ।
सकल तीर्थांचे पुण्य, स्नान करीता त्यात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥ १४॥

गावाबाहेर महबूब सुभानींचा दर्गा ।
मुक्त प्रवेश तेथे समस्त जातीवर्गा ।
हिंदूमुसलमानांना बांधिले एकाच धाग्यात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥ १५॥

सायंकाळी भजन ऐकता प्रभुमंदिरात ।
पडता जय गुरू माणिकचा कल्लोळ कानांत ।
चैतन्य बनून वाहे श्रीप्रभु नसानसांत ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥ १६॥

भक्तकार्य कल्पद्रुम

‘‘भक्तकार्य कल्पद्रुम गुरु सार्वभौम…’’ हे शब्द कानी पडताच, किंवा ते मनातल्या मनात अथवा मुखाने म्हणू लागताच, एक अनामिक समाधान अनुभवास येते. प्रभुची मूर्ती डोळ्यासमोर उभी रहाते, आणि मनोमन हात जोडले जाऊन प्रभु पुढे आपण नतमस्तक होतो.

जेव्हां पासून समजायला लागले, तेव्हां पासून ‘‘देव बाप्पाला जयजय कर’’ असे कोणी सांगितले, की हात जोडून मुखाने भक्तकार्यच सुरु व्हायचे. मग तो कोणताही देव बाप्पा असो! हे संस्कार अर्थातच आई-बाबा व आजी-आजोबांचे. आज सुद्धा कोणत्याही विग्रहासमोर उभी राहिले, तरी सहज जो मंत्र म्हटला जातो, तो एकच – श्री प्रभूंचा महामंत्र!

घरातून बाहेर पडण्याआधी प्रभूंचे तीर्थ घेऊन भक्तकार्य म्हणावयाचे हा तर संपूर्ण घरासाठी आजोबांनी नियमच केला होता. आणि परीक्षेसाठी निघताना तर झोळीची भाकरी सुद्धा मिळत असे, व त्याच बरोबर कटाक्षाने आजोबा सूचना करीत की पेपर बघण्याआधी भक्तकार्य म्हण, आणि मगच पेपर सुरु कर. ती सवय सुद्धा आजतागायत तशीच आहे – कुठल्याही छोट्या-मोठ्या कसोटीच्या आधी कळत-नकळत भक्तकार्य सुरु होतेच.

कोणी आजारी असेल, कोणाला कुठे दुखत खुपत असेल, तरी भक्तकार्य महणजे रामबाण उपाय अशी घरी अगदी पक्की धारणा होती. ‘‘आमच्या प्रभूंचा महामंत्र हा रामबाण उपाय आहे’’ असे म्हणून आजोबांनी संप्रदायाबाहेरील सुद्धा किती तरी  लोकांना भक्तकार्याचा परिचय करून दिला होता.

सात वर्षांच्या नातवंडांना सुद्धा झोप लागत नसेल तर त्यांची आजी (माझी आई) सांगते की डोळे मिटून पडून रहा, आणि भक्तकार्य म्हणत रहा, शांत झोप लागेल. संध्याकाळी देवापुढे दिवा लावला की ‘‘शुभंकरोति’’ च्या ही आधी भक्तकार्यच ओठांवर येते. गणेशोत्सव असो वा नवरात्रोत्सव, नित्य आरतीच्या सुरुवातीला भक्तकार्य. मुले जेवायला बसली की आधी भक्तकार्य म्हणतात, आणि मग ‘‘वदनी कवळ घेता’’.

एकुण सार काय, तर भक्तकार्य हे मनास शांती, समाधान तर देतेच, पण त्यासोबत एक विलक्षण ऊर्जा, एक विलक्षण चेतना सुद्धा देते. किती ही आणीबाणीचा प्रसंग असो, त्याला सामोरे जाण्याचे बळ देते. प्रभुशी असलेल्या आपल्या नित्य संबंधाची आठवण करून देते. प्रभुकृपेच्या सतत होत असलेल्या वर्षावाची जाणीव करून देते, आणि त्या वर्षावात चिंब भिजून जाण्याची पात्रता सुद्धा देते.

महाराज प्रवचनात एकदा म्हणाले होते, की त्रयोदश अक्षरी जे मंत्र आहेत, ते तारक मंत्र असतात, उदा. ‘‘श्री राम जय राम जय जय राम’’. आणि आपल्या भक्तकार्या मधे तर परमपूज्य नृसिंहतात्या महाराजांनी तेरा विशेषणांनी प्रभूंचा गौरव केला आहे. म्हणूनच हा त्रयोदश शब्दांचा महामंत्र भक्तांसाठी तारकमंत्र आहे. महाराज असे ही म्हणाले होते की नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ह्यातील प्रत्येक विशेषणाचा निर्देश हा एकाच तत्त्वाकडे आहे, आणि ते तत्त्व म्हणजे – ती एक अखंड परमात्म सत्ता. ते प्रवचन ऐकल्या पासून भक्तकार्याच्या उच्चारणाला एक वेगळा, व्यापक दृष्टिकोण मिळाला आहे. आता प्रत्येक विशेषण उच्चारताना त्या परमात्म्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न होतो, हे फक्त आणि फक्त सद्गुरु श्री ज्ञानराज प्रभु महाराजांच्या अखंड कृपेचे फळ आहे.

शेवटी ‘‘सकलमत स्थापित श्री सद्गुरु माणिकप्रभु महाराज की जय’’ हा पुकारा करताना तर खूप मिश्र भाव मनात येतात. आपल्या सारख्या भक्तांवरील नितांत प्रेमापोटी त्या भक्तवत्सल प्रभुने सकलमत संप्रदाय स्थापन केला, आणि ह्या भवसागरातून तरुन जाण्याची गुरुकिल्लीच आपल्याला भेट केली हे आपले किती मोठे भाग्य – असा कृतज्ञतापूर्ण भाव तर असतोच असतो, पण त्याच बरोबर सकलमताचा हा संस्थापक, संपूर्ण प्राणिमात्राचा हा त्राता – आपल्या अत्यंत निकटतम आहे, आपला सद्गुरू आहे, आपला आहे असा एक प्रेमपूर्ण अभिमान सुद्धा मनात डोकावतो, तसेच प्रभूंच्या जयजयकाराचा हा निनाद सगळ्या विश्वात दुमदुमत राहो अशी प्रामाणिक कळकळ होऊन मन प्रभुलाच प्रार्थना करते की ‘‘जी भक्त प्रतिज्ञा तीच श्री गुरु आज्ञा’’ ह्या श्री मार्तंड प्रभूंच्या उक्ति प्रमाणे आम्हा भक्तांची ही इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न होवो, व प्रभूंच्याच असीम कृपेने त्या प्रयत्नांना सुयश लाभो.

अशा ह्या श्री प्रभूंच्या परम पवित्र, परम मंगल, परमपददायक महामंत्राची महती यथायोग्य वर्णन करण्याची तर माझी योग्यताच नाही. पण त्याविषयी असलेले प्रेम, आस्था, आदर व अभिमान एका छोट्याशा काव्यात गुंफण्याचा एक अतिशय छोटासा प्रयत्न केला आहे. हे एका बालकाचे बोबडे बोल आहेत, असे म्हणून प्रभु हासत हासत, अगदी प्रेमळपणे, हे काव्य स्वीकारील, ह्या विश्वासासह ही रचना त्यांच्या चरणकमली अर्पण करते.

भक्तकार्य कल्पद्रुम श्रीप्रभुचा हा महामंत्र ।
तेच आमुचे ध्यान-जप, तेच आमुचे श्लोक, स्तोत्र ।।

भक्तकार्य कल्पद्रुम श्रीप्रभुचे हे ब्रीदवाक्य ।
श्रुति-स्मृति ते आम्हासि, तेचि आम्हासि महावाक्य ।।

भक्तकार्य कल्पद्रुम श्रीप्रभुची ही ब्रीदावली ।
प्रातःप्रार्थना तीच आमुची ‘‘शुभंकरोति’’ सांजवेळी ।।

भक्तकार्य कल्पद्रुम श्रीप्रभुचा हा जयजयघोष ।
त्याने लाभतसे मानसी स्थैर्य-धैर्य शांती-संतोष ।।

भक्तकार्य कल्पद्रुम श्रीप्रभुचा हा जयजयकार ।
शब्द त्रयोदश मंत्रोच्चार, भवडोही आम्हा तारणहार ।।

प्रचिती श्रद्धेची

केल्याने होत आहे रे ! आधी केलेची पाहिजे !! श्री समर्थांच्या या म्हणी प्रमाणे श्री महाराजांनी यंदाचा जयंती उत्सव दणक्यात करून दाखवला.

गेल्या उन्हाळ्यात कोरोनाने सर्वत्र कहर मांडला असताना,व पुढे तिसऱ्या लाटेची जबरदस्त दहशत बसलेली असतानाहि, पावसाळ्यात कोरोनाच्या विळख्यातून थोडीशी उसंत दिसून येताच श्रावणात निर्णय घेवून, १२ ते १८ डिसेंबर पर्यंत श्री सिद्धराज प्रभू मंदिरातील समाधीचे सर्वांना स्पर्श दर्शन ते दरबार पर्यंतचे यथा संकल्प सर्व कार्यक्रम अत्यंत भव्य आणि दिव्य असे संपन्न झाले. या सर्व कार्यक्रमात कोरोनाचे प्रचंड दडपण असतानाहि सर्व प्रांतातून भक्तांची अभूतपूर्व उपस्थिती जाणवली. श्रीप्रभु जन्मोत्सवाची द्विशताब्दी किंवा श्री मार्तंड प्रभूंचा १५०वा जन्मोत्सव किंवा मोठे यज्ञयाग या सारखे विशेष प्रासंगिक कार्यक्रम नसतानाहि, आता पर्यंतच्या जयंती उत्सवा पेक्षा अलोट गर्दी यंदा ओसंडून वाहत होती. जणू काही ‘विरजा व गुरुगंगा’ या बहिणींनी माणिकनगराला आपल्या रौद्र रूपाने भरभरून वाहत अक्षरशः धुवून काढले. त्यांनाही मागे टाकत आम्हीच का मागं राहू असे म्हणत सकलमती भक्तांची मांदियाळी माणिकनगरला लोटली.

शासनाच्या आदेशाप्रमाणे, जत्रेत दुकानं व हॉटेल्स लागली नव्हती. पण छोटे व्यापारी, हात गाडी व फेरीवाले,यांचा उत्साह इतका दांडगा होता की चला वाहत्या गंगेत आपणहि थोडेसे हात धुऊन घेवू असे म्हणत, दरबारला शेवटच्या दिवशी हार, फुले, पेढे, बत्ताशे, बांगड्या, लहान मुलांची खेळणी वगैरेची फुटकळ दुकाने कुणाचे निमंत्रण वा सूचना नसतानाहि, दुडूदुडू धावत येत तातपुरता आसरा करून घेत एक दिवसासाठी का होईना उभी राहिलीच. जणू गुळाच्या आशेला मुंगळ्यांची रांग किंव्हा ढगाळ पावसाळी कीटकांप्रमाणे अचानक जमा झाले. ही प्रभूंची काय लीला म्हणावी? अर्थात या लीलेतूनच श्रीउत्सव लीलया पार पडला. जसे घोंगावणाऱ्या महापुरातून श्रीदेवी व्यंकम्माला श्रीप्रभूनी अलगद उचलले. कोणालाही कसलाही त्रास किंव्हा कोरोनाची बाधा झाली नाही. या सर्वाला कारण एकच श्रीजींची श्रीप्रभूंवर अतूट श्रद्धा, विश्वास.

“स्वरूप प्रकाश आनंद चैतन्य। शिष्यगुरू मी तू पण। सर्वरूपे हा श्री प्रभू जाण।” या श्री मार्तंडप्रभूंच्या वचनाची प्रचिती येते. कोणतेही काम करण्याची हिम्मत व त्यामागचे सुनियोजन (Perfect) नियोजन ही तर श्रीजींची खासियत आहे. कोणतेही  Event Management चे कोर्स न केलेले कार्यकर्ते व कोणतीहि Professional Agency या कामात नसतांहि केवळ प्रभू भक्तांची फौज घेवून श्रीजींनी हा उत्सव परिपूर्णतेने पार पाडला. यालाच म्हणतात “योजकः तत्र दुर्लभः”

श्री सिद्धराज प्रभूंचे समाधी मंदिर निर्माणाधीन असल्यामुळे श्रीसमाधीची नित्य पूजा गेल्या काही वर्षांपासून चालू नव्हती,ती विधिवत सुरु व्हावी या एकाच भावनेने नाना धडपडी करून आवश्यक तेवढे बांधकाम होताच. (बाकीचे नंतर यथावकाश होत राहील असा विचार करून) अगदी स्पर्श दर्शन ते दरबार पर्यंतचे सर्व कार्यक्रम व्यवस्थित संपन्न झाले.मंदिराची वास्तूपूजा व भक्तांसाठी स्पर्श दर्शन हा अनोखा कार्यक्रम पूर्ण इतमामाने साजरा झाला. या स्पर्श र्दशनाच्या कार्यक्रमात प्रत्येक दर्शनार्थी भक्तांना श्री समाधीवर अभिषेकासाठी शुद्ध पाण्याने भरलेले कलश व बेलपत्री मंदिरात देण्यात आली. यात जातपात-स्त्री-पुरुष-आबाल वृद्ध असा कोणताही भेद नव्हता. श्री मार्तंडप्रभूंनी म्हटल्या प्रमाणे – “घेति पत्र पुष्प फल जल गंध मणी-मोती। आणि नटून म्हणती आता व्हावू चला।। शीघ्र चला अति शीघ्र चला।। हा निर्विकल्प सविकल्पी आला।।”

हे सर्व कार्यक्रम असंख्यांच्या उपस्थितीत आणि ज्यादा वेळ चालत राहिले हे विशेष, आणि लोकांनीहि कोरोनाची भिती न बाळगता,कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत,उत्सहात सहभाग घेतला. बत्ताशे उडवणे, नारळ फोडणे,वगैरे प्रकारांना फाटा देत, या वेळी लोकांनीहि चांगले सहकार्य केले. प्रत्येक कार्यक्रम पूर्व परंपरेला धरून, न कंटाळता, घाई न करता, कितीही वेळ लागला तरीही तितक्याच अगत्याने संपन्न झाले. श्रीजींची ही श्रद्धा व सबुरी आमच्यात कधी परावर्तित होईल ते श्रीप्रभूच जाणे. वाटत होते की कोरोना पासून भक्तांचे रक्षण करण्यासाठी श्रीप्रभूंचा सटकाच इथे उभा आहे. नाही तर आमच्या सारख्या अर्धवट भक्तांना वाटत होते कि  एवढ्या मोठ्या महामारीत हा उत्सव एवढया मुक्तपणे घेणे ही जोखिमच आहे.

श्री.आनंदराज प्रभूंची शांत वृत्ती व कृतज्ञता दरबार मध्ये त्यांच्या निवेदनात दिसून आली. तर श्री चैतन्यराज प्रभूंची अखंड सेवा व कार्यातील सातत्य, नेमनिष्ठा हे देखील प्रकर्षाने जाणवली. श्री चारुदत्त व श्री चंद्रहास प्रभू यांचे सोबत गावातील तरुण मंडळी उत्सवा अगोदर व नंतरही मंदिर परिसर स्वच्छ करण्याची सेवा करीत होती. तसेच श्री कौस्तुभ, श्री चिद्घन व श्री चिज्ज्वल यांनीही आपापल्या परीने तांत्रिक बाबी सांभाळत खारीचा वाटा उचलला. तसे श्री प्रभूंच्या घरच्या सर्वच मंडळींचा असाच सहभाग यात दिसला. हे पाहून इतर सकलमती भक्तांच्या मनात अशी श्रद्धा येणारच की. म्हणतात ना ‘Charity begins at home.’ एकंदरीत श्री सिद्धराज प्रभू म्हणतात त्या प्रमाणे ‘प्रभू जवळी असतां। मग चिंता मज का’? श्रीजींच्या प्रमाणे अतुट श्रद्धा आमच्याहि मनात जडो ही प्रभू चरणी प्रार्थना.