by Devidas Keshavrao Deshmukh | Jan 4, 2024 | Uncategorized
संत श्रेष्ठ सद्गुरू श्री माणिक प्रभू महाराजांच्या जन्माचे यंदा हे २०६ वे वर्ष होय. श्री प्रभूंनी मत-पंथ- विविध धर्मियांच्या गल्बल्यातून ताक घुसळून घुसळून जसे लोणी काढतात तसे “सकलमत संप्रदायाची“ स्थापना केली. ‘द्वैत बुद्धी ही दूर करा,सकल मताचा पंथ धरा’ असा प्रचार करीत सर्व मतधर्म तत्वांचा आदर करीत त्याचा सुवर्ण मध्य साधत सकलमत पंथाची मुहूर्त मेढ रोवली.श्री गुरु नानकदेवजिंनी अशाच विचारांनी शीख धर्माची स्थापना केली आज तो सर्व मान्य झाला आहे.
‘एकं सद्विप्रा बहुधा वदंती’ असा संदेश देत सृष्टीमध्ये चालकत्वाची भूमिका पार पाढणारी एकच शक्ती आहे. वरपांगी तिची अनेक रूपे दिसतात पण ती शक्ती सर्वत्र एकच आहे. ज्या प्रमाणे अनेक अंधळ्यानी हत्तीच्या निरनिराळ्या अंगाना स्पर्श करून हत्तीचे रूप वर्णन अनेक प्रकारे केले. व आमुक एक प्रकार म्हणजेच हत्ती असे प्रतिपादिले. पण डोळस पणे नीट पाहून ज्ञान मिळविले कि त्याचे स्वरूप कळते ती शक्ती म्हणजे एकच आहे ह्याचे ज्ञान होते हे सद्गुरुनी पटवून दिले. ज्ञान व भक्तीच्या संगमानेच ती स्थिती प्राप्त होवू शकते व अंती मोक्षाप्रत जाता येते असे प्रतिपादिले.
त्या साठी गुरूपदेश व तोही अधिकारी व्यक्तीच्या-गुरूच्या मुखातून मिळविलेले ज्ञानच उपयोगाचे आहे. ऐऱ्या-गैर्यांचा उपदेश काही उपयोगाचा नाही. विशेषत्वाने जिवंत गुरूच्या मुखातून मिळालेले ज्ञान जास्त उपयोगाचे असते. कारण त्या अधिकारी गुरूचे आचरण व ज्ञान हे आपण प्रत्यक्ष बघू शकतो त्याचा सरळ-थेट परिणाम आपल्यात मुरतो. वर्तमान पिठाधिपती श्री ज्ञानराज प्रभूंनी साधू व राज्याची गोष्ट सांगत हे पटवून दिले कि ‘राजा बोले दल हाले-मिया बोले दाढीही न हाले’ म्हणून गुरु करावा व तोही असा अधिकारी असावा जसा सकलमताचार्य श्री प्रभू.
त्यांच्या काळापासून सर्व गुरु पिठाधिपतींची परंपरा त्यांचे वागणे-चालणे-बोलणे हे आपल्या मन पटलावर कोरले जात आहे.त्यांची योग्यता व अधिकार तसाच परिपूर्ण आहे. त्यांचा उपदेश व त्यांचे प्रत्यक्ष वर्तन ह्यात एक वाक्यता दिसते. त्या सर्वांमध्ये दृढ निश्चय, निःसंगता, परोपकार, विश्वबंधुता, सर्वांचा आदर, न्याय प्रीयता, आद्य प्रभूंवरील अढळ श्रद्धा-भक्ती, सततचा व्यासंग, सततची कार्य प्रवणता, बंधू प्रेम व असे अनेक सद्गुण आजवर परंपरेने सर्व पिठाधिपतीत प्रत्ययास येतात. सर्वांच्या साहित्य लेखनातही सामजिक उद्धाराची व मानवी कल्याणाची तळमळ दिसून येते.
वर्तमान पिठाधिपती श्री ज्ञानराज प्रभूंचे तर वर्णन करावे तेवढे थोडेच आहे सततचा व्यासंग – धडपड-कार्यप्रवणता – नवनवोन्मेश शालिनी प्रमाणे नित्य नवा ध्यास व त्याची निर्मिती ही त्यांची ठळक वैशिष्ठ्य दिसून येतात. त्यांच्या कामातून प्रतीत होणारी भव्यता व दिव्यता सतत जाणवते. कोणतेही कार्य असो-निरनिराळ्या पिठाधिपतींची प्रती वार्षिक आराधना असो वा मोठे बांधकाम (अगदी झपाटल्या प्रमाणे कामाचा उरक ) असो किंवा एखादा राष्ट्रीय वा सामाजिक कार्यक्रम असो किंवा भक्तांसह यात्रा असो सारेच भव्य आणि दिव्य! कुठेच न्यूनता नाही. सर्वात मिळून मिसळून राहणे-कोण गुरु आणि कोण भक्त ओळखूच येणार नाही.जसे बर्फात गोठलेले पाणी वा बर्फाचे झालेले पाणी!
आमच्या सारख्या सामान्य जनात देव-धर्म-गुरु-ह्यांचे विषयी साशंकता व चंचलता सतत प्रतीत होते. काही लोकांचा प्रश्न असाही असतो कि देव श्रेष्ठ का गुरु श्रेष्ठ? पण दत्त संप्रदाय म्हणतो गुरु श्रेष्ठ, कारण देव देतो व नष्टही करतो, व दुष्ट-सुष्टांचा न्याय करतो, त्यांचे-त्यांचे वर्तनाप्रमाणे दान व दंडही करतो पण गुरु तर दान करतोच आणि दंड करणे ऐवजी दुष्टांना त्याची वृत्ती सुधारून त्याला सुष्ट बनवून सनमार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. कारण तो समोर असतो आपण त्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाहिलेले असते. देव केवळ कथा पुराणातूनच दिसतो. म्हणून गुरु श्रेष्ठ. व तोही सकलमताचार्य श्री सद्गुरू माणिक प्रभूंसारखाच सर्वश्रेष्ठ!
आमच्या सारख्या संसारिकांचे प्रत्यक्ष प्रमाणावरच लक्ष्य असते किंवा असे म्हणा हवे तर चमत्कार शिवाय नमस्कार नाही. काही नास्तिक, प्रारब्ध वैगैरे काहीच नसून प्रत्यक्ष नैसर्गिकरित्या बरे वाईट घडत असते असे म्हणतात व जरासे बरे वाईट झाले कि कसला देव नी कसला गुरु! अर्थात मनस्तापामुळे असेवाटणे साहजिक आहे, पण सततचे गुरु स्मरण, चिंतन, मनन, व चरित्र पठन या मुळे मुख्य प्रवाहात आपण पुन्हा परत येतो.
अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाले तर मंगळवार दि.२६/१२/२०२३ ला श्री माणिक प्रभू जयंती दिनी सायंकाळी ७.३० वा सगरोळीहून माणिक नगर साठी निघालो गाडीच्या ड्रायवर ने २ वेळा जिवावरचे अपघात केले होते. मनातून धाकधूक होतीच. आम्ही भालकी ते हुमानाबाद्च्या रस्त्यावर असताना अंदाजे रात्री १०.३० च्या सुमारास हाइवे वर एक वळण होते व त्या वळणावरच ट्रक उभा असलेला ड्रायवरला नीट दिसला नाही आणि गाडी ९० ते १०० च्या वेगात, अगदी जवळ येताच त्याच्या लक्षात आले. आणि त्याने प्रसंगावधान राखून झटकन गाडी उजवीकडे वळवून परत डावीकडे वळणावर घेतली. केवळ एका क्षणाच्या १०० व्या भागाच्या वेळेतच हे घडून गेले. गाडी पुन्हा डावीकडे सरळ करताना त्या वेगात सावरले गेले, नाही तर उजवीकडे-डावीकडे वळविण्याच्या प्रयत्नात गाडीने पलटी खाल्ली असती. श्री प्रभू कृपा म्हणूनच आम्ही बचावलो,नाहीतर आमचे काही खरे नव्हते.
असाच एक प्रकार नाशिकचे श्री.गोपाळराव कुलकर्णी यांचे बाबत वाचण्यात आला. नेमके ह्याच दिवशी जयंती करून २७ च्या पहाटे ते माणिकनगरहून नाशिकला परत जाण्यास निघाले बीडच्या थोडे पुढे जातास दुपारी ४.३० च्या सुमारास ह्यांच्या गाडी पुढील, म्हशी वाहतूक करणाऱ्या ट्रक-ड्रायवरने अचानक ब्रेक दाबल्यामुळे अचानक थांबला व ह्यांची गाडी त्या ट्रकवर जावून जोरात आदळली. त्या गाडीचे हेडलाईट व बॉनेट पासून स्टेरिंग समोरील काचे पर्यंत पूर्ण चकणाचूर झाली.पण काचेच्या आतून स्टेरिंग पुढे त्यांना माणिकनगरात प्रसादात मिळालेला मुख्य देवळातील एक लांबलचक होता. तो त्यांनी स्टेरिंग पुढील काचेच्या आतून मोकळ्या जागेत लांब असा मांडून ठेवला होता.त्या काचे पर्यंतच गाडीचा चुराडा झाला पण काचे पासून-हारापासून आत काहीच नुकसान झाले नाही किंवा साधे खरचटले देखील नाही.
‘तो हार म्हणजे श्री प्रभूंनी आखलेली लक्ष्मण रेषाच होती’.असे श्री गोपाळराव कुलकर्णी म्हणतात.श्री प्रभू जवळी असतां।मग चिंता मज कां।। ह्या पदाची प्रचिती येते.
by Devidas Keshavrao Deshmukh | Jul 24, 2023 | Uncategorized
दि.१८-जुलै-२०२३ सायंकाळ पासून ते २१ च्या दुपार पर्यंत (अधिक श्रावण शुद्ध ०१,शके १९४५ ते अधिक श्रावण शुद्ध ०३) परमपूज्य श्री डॉ.ज्ञानराज माणिकप्रभू महाराजांचा सगरोळी दौरा संपन्न झाला.
त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या बहूप्रतिक्षित असलेल्या वरून राजानेहि सर्व शक्तीनिशी आपल्या आगमनाने सर्व शेती-तळे,मळ्यात पाणीच पाणी भरून टाकले. आणि श्रीजींच्या आगमनात उल्हसित झालेल्या सर्व भक्तांचे तोंडचे पाणी पळाले पण श्री प्रभु कृपेची अशी किमया कि,”नेमकी भव्य शोभा यात्रा म्हणा-घरोघरीच्या दिवस भरातील पाद्यपूजा म्हणा-त्यावेळी नेमके पावसाने अशक्य वाटणारी उसंत घेतली.गूगल वरचे सारे अंदाज तेवढ्या वेळा पुर्ते फोल ठरविले.” जणू काही श्रीकृष्णाने सहज लीलल्या गोवर्धन पर्वत उचलून धरून कोसळणाऱ्या पावसापासून भक्तांचे रक्षण केले.या पुराण कथेचा पुनःप्रत्यय-प्रचीती आली ही प्रभूचीच कृपा म्हणावी.
दुसरे वैशिट्य म्हणजे-श्री.गंगाधर सावकार शक्करवार ह्यांनी प्रवचनोत्तर महाप्रसादाची व्यवस्था श्री माणिक प्रभु मंदिरा शेजारीच केली होती.अपेक्षे पेक्षा ज्यादा लोक प्रवचनाला जमले होते.शेवटी शेवटी शिजविलेले अन्न कमी पडेल कि काय अशी दाट-साधार काळजी वाटू लागली.भक्तांची रांग तर खूप मोठी होती,आता काय करावे हि चिंता संबंधित कार्यकर्त्यांना भेडसावू लागली.भाताचे मोठे पातेले रिकामे होत आले. नव्याने ज्यादा शिजवायला वेळही नव्हता.वेळ रात्री साडेआठ-नवूची होती.वरून पावसाची रिमझिम चालू झालेली.आता आहे तेवढे तरी वाढून टाकू असा विचार करत असताना इकडे लोक रांगेने येतच होते, तस तसे ते रिकामे होवू दिसणारे पातेले व त्यातील तळ गाठणारे अन्न-परातीत भरून नेवू देतच होते.शेवटी अश्यक्य वाटत असताना सर्वांनी मनसोक्त प्रसाद घेतला. हे कथन सर्व कार्यकर्त्यांनी जसेच्या तसे कथन केले.या वेळी अक्षरशः पांडवांच्या वनवासातील द्रौपतीच्या सत्व परीक्षेच्या वेळचे किंवा अलीकडच्या काळातील श्रीगुरु चरित्रातील श्री नरसिंह स्वामिंच्या कृपेने एका दरिद्री आयाचित वृतीच्या ब्राम्हणाच्या समाराधना प्रसंगाची किंवा श्री माणिक चरितामृतातील- भालकी वनातील माधूकरी मागून आणलेल्या अन्नाचे चार सहस्त्र लोकांना अन्न दानाच्या प्रसंगाची,किंवा दत्त जयंती उत्सवात अचानक वाढलेल्या भक्तांना वाढण्यासाठी तयार केलेल्या पुरणपोळ्या- पुरण-पुराणाच्या-कथेची आठवण होते. ही प्रभु कृपेची प्रचीती देते नाही तर काय?
त्या नंतर ठरलेल्या पाद्य पूजा हि व्यवस्थित झाल्या. श्रीजींची तबियत मध्येचे बिघडली.घरी बोलावून श्रीजींना पाद्य पूजा करणाऱ्यांची संख्या व हाती असेलेला मर्यादित वेळ व वरून पावसाचा लपंडाव यांचे व्यस्त प्रमाण होते.त्यातच बाहेर गावाहून ऐन वेळी आलेली दर्शनार्थ भक्त मंडळी- अधिकमासाचे वाण देणारे-ऐनवेळी अति उत्साही पाद्यपूजा करतो म्हणणारे हया सर्वांची विनंती व कोणाची नाराजी नको म्हणून सर्वाना सामवून घेणे याचे गणित सोडवणे अशक्य वाटत असताना अगदी लोण्यातून अलगदपणे केस काढावा-तसे सर्व सुरळीत,वेळेत,व व्यवस्थित झाले.श्री सद्गुरू साईबाबांनी म्हटल्या प्रमाणे “श्रद्धा व सबुरी “ याचा प्रत्यक्ष प्रत्यय आला ही देखील प्रभूचीच कृपा म्हणावी.
शेवटी दि.२१ ला सकाळी संस्थेत सर्व कार्यकर्त्यांना संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष या नात्याने मार्गदर्शन पर दिलेले आशीर्वचन म्हणजे सर्वांवर कळसच होता.संस्थेचे नाव-“संस्कृती संवर्धन मंडळ”-संस्थेचे मध्यवर्ती कार्यालयाचे नाव कर्मयोग –त्याचा खरा मतितार्थ,कार्यकर्त्यांनकडून होणारी त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी,श्री प्रभु कृपेचा अर्थ या सर्वांचा रोजच्या जीवनातील चालती बोलती उदाहरणे देत,श्रीजीनी आम्हाला पटवून दिले व आम्हाला ते पटलेही.अर्थात प्रत्यक्ष उदाहरण,शंका निरसनात टाळ्यांच्या कडकडाटासह श्रोत्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद हेच दर्शविते कि-श्री प्रभु कृपा म्हणजे काय चीज आहे. श्री प्रभूंच्या कृपेनेच ,या कामी ,सर्व गावकऱ्यांनी चांगले सहकार्य केले,तसेच संस्थेच्या विकास कामात वेग आला. संस्थेचे सर्व कार्यकर्तेही आपले घरचे काम समजूनच संस्थेत काम करतात ,ही खूप मोठी जमेची बाब आहे.
शेवटी शंका निरसनात श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलेली समर्पक-समयोचित-तत्काल (हजर जबाबी )व बिनतोड उत्तरे म्हणजे-CID हया जुन्या हिंदी सिनेमातील बडाही CID है.वो नीली छत्रीवाला | हर तालेकी चाबी रखे-हर चाबी का ताला !! हया गाण्याची आठवण झाल्या शिवाय राहत नाही.
दर वेळी गीता-वेदोपनिषदातील त्यांनी केलेली विधाने,उधृत केलेले श्लोक हे त्यांच्या विद्वतेची प्रचीती देतातच पण त्याच बरोबर वेदोपनिषदे-गीता ह्यातील श्लोक व श्री प्रभूंची शिकवण यातील साम्य व महत्व सहज सांगून जातात.जणू प्रभूंची तत्वे व गीता वेदोपनिषद हे एकच आहेत ज्या प्रमाणे वस्त्र व धागे दोरे वेगळे समजू शकत नाही किंवा बर्फातील पाणी व बर्फ वेगळे करता येत नाही किंवा सूर्य व प्रकाश वेगळा करता येत नाही.हे सूर्य प्रकाशा इतकेच स्वच्छ आहे.म्हणूनच म्हणतात गुरु साक्षात परब्रम्ह .
कर्मयोग संबंधात त्यांचे आशीर्वचन ऐकून मला बाबांची आठवण झाली.बाबा (आमचे वडील )एकदा असेच मला म्हणाले होते कि भरपूर शेत जमीन व भला मोठा वाडा परमेश्वराने आपणाला दिला आहे.तो चैनीत,आरामात बसून खाण्यासाठी नसून ज्या गावात,ज्या समाजात आपण राहतो त्याचे काही आपण देणे लागतो म्हणून त्यांची सदैव सेवा करत रहावी.
आणि अश्याच एका संकट प्रसंगी म्हणाले होते कि अंबामाय व श्री माणिकप्रभु ह्यांच्या शिवाय आपणाला कोण आहे.आमच्या कुटुंबावर अनेक सामाजिक,राजकीय ,कौटुंबिक संकटे आली, तरी पण श्री प्रभु कृपेनेच आम्ही तरलो,उभारलो आहोत,ह्याचीही प्रचीती वारंवार येते.पण काही वेळी आमचे मन भरकटत जाते.या सर्वांची जाणीव श्रीजींनी आम्हाला आपल्या आशीर्वचनातून करून दिली.त्यांची ती कृपा आमचे वर अशीच राहो,ती वृद्धींगत होवो हि श्री प्रभु चरणी प्रार्थना .
असा आहे श्री प्रभूंच्या कृपेचा पुनःप्रत्ययाचा आनंद….!!!
by Devidas Keshavrao Deshmukh | Nov 1, 2022 | Uncategorized
इजा – बीज – तिजा, काशी – रामेश्वर – पुरी झाल्या,
आता द्वारका झाली की चौकोन पूर्ण होणार !
सारे कांही सुनियोजित, व त्याची पुर्तता ही तीन्ही वेळा पूर्व नियोजना प्रमाणे यथासंग व व्यवस्थित झाली. आठ – नऊशे भक्तांच्या व्यवस्थेचे एव्हढे टेंशन असतांनाही समुद्रस्नान – श्राद्धविधी – आराधना –भजन – पूजनादि सर्व धार्मिक विधी यथासंग संपन्न करणे, हे श्रद्धा आणि संयमाचा परिपूर्ण संगम असणारे श्री ज्ञानराज प्रभूच करू जाणे. त्यांचा हा गूण थोडा जरी आम्हीं अंमलात आणला तरी जीवनात आम्ही खूप कांही मिळविले , असे होईल.
श्री सिद्धराज प्रभूंची पुण्यतिथी – आराधना – प्रवास व खानपान वगैरेंची व्यवस्था दरवेळी चढत्या क्रमाने उत्तमोत्तम झाली. पुरीला तर जणू कांही केवळ खवैये म्हणून उदर भरणम यासाठीच आम्ही गेलो होतो की काय अशी शंका येते.कुठे कांही गोंधळ – चोऱ्या – भांडण – गैर व्यवस्था – चिडचिड वगैरे कांही कांहीही नाही. यात आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती ही की “आम्ही श्रीजी बरोबर समुद्र स्नानाला गेले वेळी , श्रीजी तिथे येणे अगोदर थोडावेळ समुद्रात डुबक्या घेत होतो , तेंव्हा समुद्राच्या लाटा फारशा मोठ्या नव्हत्या , म्हणजे सुसह्य होत्या , पण जेंव्हा प्रत्यक्षात श्रीजी – श्री प्रभूंच्या पादुका हाती घेऊन, स्वतः स्नान करून ,पादुकांना समुद्र जलाने अभिषेक करीत होते-पादुकांसह समुद्रात डुबकी घेत होते तेंव्हा समुद्राच्या खूपच खूप मोठ्या लाटा उचंबळून येऊन श्रीजी व श्री पादुकाना आनंदतीशयाने जलाभिषेक करीत होत्या.
ओहोटीचे (पोर्णिमे नंतरचे ) दिवस असूनही जणूकाही समुद्रालाही प्रभू दर्शनाची ओढ लागून भरती आली होती. मित्रहो ! यात अतिशयोक्ती मुळीच नाही , श्रीजी पासून काही अंतरावर आधी निर्वेध पणे डुंबणारे आमच्या सारखे यावेळी 2-3 वेळा सरळ मागे ढकलल्या गेलो किंवा काहीजण चक्क आडवे पडलो ही वस्तुस्थिती आहे. जसें घुसळलेल्या ताकातून लोण्याचा गोळा अलगद काढावा तसे आरामात गेलो आणि सरळ परत आलो.
माणिक नगरला परत आल्यावर वेशीत असंख्य सुवासिनींनी “श्रीजीना” ओवाळले. स्थानिक नागरिकांकडून वेशीवरील नागरखान्यातून श्रीजी व त्यांचे सोबत सर्व भक्तांवर पुष्पवृष्टी होत होती , तर मीच का मागे राहू म्हणून “वरूणराजयानेही पावसाचा हलकासा शिडकावा केला”. हा कांही नुसताच योगा योग म्हणता येणार नाही तर “ही श्री प्रभूंच्या समाधानाची रोख पावतीच म्हणावी लागेल.”
आमचे वैयक्तिक खाजगी बाबतीत म्हणावे तर धूसर शक्यता असलेली 1-2 कामं त्याचवेळी पूर्णत्वास गेल्याची सुवार्ता तेंव्हाच कळाली. ही श्री प्रभूंचीच कृपा म्हणावी.
इतर सामाजिक -राष्ट्रीय विचारांच्या दृष्टीने विचार केला तर म्हणावे लागेल की ,स्वछता,नियमांचे पालन,निस्वार्थीपणा, धर्मा बाबत व्यापक दृष्टी याबाबत दक्षिण भारता पेक्षा उत्तर – पश्चिम व पूर्व भारत खूपच मागे आहे, असे दिसून येते. असो.
by Devidas Keshavrao Deshmukh | Apr 12, 2022 | Marathi
दिनांक 20 ते 26 मार्च 2022 पर्यंतच्या वेदांत सप्ताहातील ‘वेदांत शिक्षा वर्गात’ श्रीमद्भगवद्गीतेच्या 17 व्या अध्यायातील ‘श्रद्धात्रय विभाग योग’ या विषयाचे श्रीजींनी सविस्तर रित्या व अत्यंत तळमळीने विश्लेषण करीत – त्याला आपल्या ज्ञानाच्या छन्नी हातोड्याने विशेष पैलू पाडले. गंगेकाठ्च्या श्रीशंकर व माता पार्वतीच्या नाटकीय संवादातून व एका श्रद्धावान भक्तांच्या प्रवेशाचा दृष्टांत देत सात्विक अढळ श्रद्धा ही काय चीज असते हे दाखवून दिले. अर्थात आमच्या सारख्या जडत्वाच्या गाळात फसलेल्यांना तो विषय कितपत समजला हा प्रश्न अलाहिदा! श्रीजींच्या ज्ञान प्रबोधनातून आम्हाला जे काही आकलन झाले ते असे – मानवी जन्मातील दु:खाने होरपळलेले आपण म्हणतो की ‘‘नरहरीसी निजपद दे नको जन्म दूसरा’’ पण असेही काही लोकांना वाटते की – पंडित लोक म्हणतात त्याप्रमाणे – ‘प्रारब्धच बलवान असते, माणसाचा स्वभाव बदलत नाही,वगैरे वगैरे.’ ते जर खरे तर मग या जन्मातच जे काही नाना खटपटी लटपटी- भानगडी – खोटेनाटे करून आपण सुख मिळविण्याचा प्रयत्न करतो. तेच सत्य मानून अशाच पुढच्या जन्मीहि – हे तथाकथित सुंदर जग का नाही उपभोगू? किंवा पुढचा जन्म असो वा नसो किंवा कोणता का व कसा का असेना या जन्मी तरी मिळेल त्या मार्गाने पूर्ण सुख का नाही भोगू? उगाच पुढचा जन्म नको रे बाबा का म्हणू? किंवा या जन्मातच नाना वैकल्ये, नाना उपासना करून घेवून का ताप करू घेऊ? चार्वाक माताप्रमाणे ‘ऋणंकृत्वा घृतं पिबेत्’ व्हायचे ते होऊन जावू द्या असा विचार आमच्या सारखे लोक करतात.
यावर श्रीजी म्हणाले, प्रारब्ध बलवत्तर असल्याने याजन्मात नुसता भोग भोगून पुढील जन्म कोणता, कसा याची काय शाश्वती, असे वाटते ना? अशा वेळी पूर्ण श्रद्धेने व तेही सात्विक श्रद्धेने व सर्व कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने – उपासना केली तरच आत्मज्ञान होते. याजन्मी पुण्य कर्माचे – प्रारब्धाचे भोग भोगून एक नाही दोन नाही तीन नाही तर केंव्हा तरी कुठल्या तरी जन्मात प्रारब्धाचे देणे फिटल्यावर तरी आत्ताच्या जन्मातील सात्विक श्रद्धेने व ईश्वर अर्पण बुद्धीने पाच प्रकारच्या केलेल्या यज्ञ कर्माने – सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखालील आचरणाने पुढे केंव्हा तरी प्रारब्धाची साखळी तुटून जेंव्हा केवळ पुण्यच ‘बॅलेंसशीट’ मध्ये जमेच्या बाजूस शिल्लक राहते तेंव्हा तरी पुढची पुनरावृत्ती टळते व आपणास मोक्ष प्राप्त होतो – आपण ब्रम्हस्वरुपास प्राप्त होतो. व तसे होणे केवळ या दुर्लभ अशा मनुष्यजन्मातच शक्य आहे. महत्प्रयासाने व पुण्यकर्मानेच मनुष्य जन्म प्राप्त होतो. इतर प्राणी – वनस्पती व जीवजंतू यांच्या जन्मात पुण्यकर्म वा सात्विक कर्म करणे शक्य नाही. करण त्यांना सदसदविवेकबुद्धी नसते. फक्त मानवालाच ती आहे. म्हणून सात्विक – राजस – तामस यापैकी केवळ सात्विक श्रद्धेचा अंगीकार करीत केवळ सात्विक तप, ज्ञान, आहार व देव, मनुष्य, पित्र, आदि पाच प्रकारच्या यज्ञाच्या व्यवहाराने आपण सद्गुरूंच्या संगतीत दक्षतेने व चातुर्याने विचार करीत शास्त्रविधीनुसार आचरण ठेवले तर व मुख्यतः श्री माणिकप्रभू मानस पूजेत चौथ्या श्लोकाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे ‘‘यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं आराधनं ते प्रभो’’ आपण जे काही करू ते ईश्वरार्पण बुद्धीने केले तर नक्कीच पुढील पुनरावृत्ती टळून आपण मोक्षपदास प्राप्त होवू शकू.
श्रीमद्भगवद्गीतेतल्या बाराव्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकात श्रीकृष्णाने म्हटले आहेच की ‘‘मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते। श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः।।’’ जे आपले मन भगवंताच्या दृश्य सगुण रूपावर स्थिर करून श्रीपदी अढळ व सात्विक श्रद्धा ठेवतात ते निश्चितच श्री भगवंताच्या स्वरूपास प्राप्त होतात.
by Devidas Keshavrao Deshmukh | Jan 3, 2022 | Marathi
केल्याने होत आहे रे ! आधी केलेची पाहिजे !! श्री समर्थांच्या या म्हणी प्रमाणे श्री महाराजांनी यंदाचा जयंती उत्सव दणक्यात करून दाखवला.
गेल्या उन्हाळ्यात कोरोनाने सर्वत्र कहर मांडला असताना,व पुढे तिसऱ्या लाटेची जबरदस्त दहशत बसलेली असतानाहि, पावसाळ्यात कोरोनाच्या विळख्यातून थोडीशी उसंत दिसून येताच श्रावणात निर्णय घेवून, १२ ते १८ डिसेंबर पर्यंत श्री सिद्धराज प्रभू मंदिरातील समाधीचे सर्वांना स्पर्श दर्शन ते दरबार पर्यंतचे यथा संकल्प सर्व कार्यक्रम अत्यंत भव्य आणि दिव्य असे संपन्न झाले. या सर्व कार्यक्रमात कोरोनाचे प्रचंड दडपण असतानाहि सर्व प्रांतातून भक्तांची अभूतपूर्व उपस्थिती जाणवली. श्रीप्रभु जन्मोत्सवाची द्विशताब्दी किंवा श्री मार्तंड प्रभूंचा १५०वा जन्मोत्सव किंवा मोठे यज्ञयाग या सारखे विशेष प्रासंगिक कार्यक्रम नसतानाहि, आता पर्यंतच्या जयंती उत्सवा पेक्षा अलोट गर्दी यंदा ओसंडून वाहत होती. जणू काही ‘विरजा व गुरुगंगा’ या बहिणींनी माणिकनगराला आपल्या रौद्र रूपाने भरभरून वाहत अक्षरशः धुवून काढले. त्यांनाही मागे टाकत आम्हीच का मागं राहू असे म्हणत सकलमती भक्तांची मांदियाळी माणिकनगरला लोटली.
शासनाच्या आदेशाप्रमाणे, जत्रेत दुकानं व हॉटेल्स लागली नव्हती. पण छोटे व्यापारी, हात गाडी व फेरीवाले,यांचा उत्साह इतका दांडगा होता की चला वाहत्या गंगेत आपणहि थोडेसे हात धुऊन घेवू असे म्हणत, दरबारला शेवटच्या दिवशी हार, फुले, पेढे, बत्ताशे, बांगड्या, लहान मुलांची खेळणी वगैरेची फुटकळ दुकाने कुणाचे निमंत्रण वा सूचना नसतानाहि, दुडूदुडू धावत येत तातपुरता आसरा करून घेत एक दिवसासाठी का होईना उभी राहिलीच. जणू गुळाच्या आशेला मुंगळ्यांची रांग किंव्हा ढगाळ पावसाळी कीटकांप्रमाणे अचानक जमा झाले. ही प्रभूंची काय लीला म्हणावी? अर्थात या लीलेतूनच श्रीउत्सव लीलया पार पडला. जसे घोंगावणाऱ्या महापुरातून श्रीदेवी व्यंकम्माला श्रीप्रभूनी अलगद उचलले. कोणालाही कसलाही त्रास किंव्हा कोरोनाची बाधा झाली नाही. या सर्वाला कारण एकच श्रीजींची श्रीप्रभूंवर अतूट श्रद्धा, विश्वास.
“स्वरूप प्रकाश आनंद चैतन्य। शिष्यगुरू मी तू पण। सर्वरूपे हा श्री प्रभू जाण।” या श्री मार्तंडप्रभूंच्या वचनाची प्रचिती येते. कोणतेही काम करण्याची हिम्मत व त्यामागचे सुनियोजन (Perfect) नियोजन ही तर श्रीजींची खासियत आहे. कोणतेही Event Management चे कोर्स न केलेले कार्यकर्ते व कोणतीहि Professional Agency या कामात नसतांहि केवळ प्रभू भक्तांची फौज घेवून श्रीजींनी हा उत्सव परिपूर्णतेने पार पाडला. यालाच म्हणतात “योजकः तत्र दुर्लभः”
श्री सिद्धराज प्रभूंचे समाधी मंदिर निर्माणाधीन असल्यामुळे श्रीसमाधीची नित्य पूजा गेल्या काही वर्षांपासून चालू नव्हती,ती विधिवत सुरु व्हावी या एकाच भावनेने नाना धडपडी करून आवश्यक तेवढे बांधकाम होताच. (बाकीचे नंतर यथावकाश होत राहील असा विचार करून) अगदी स्पर्श दर्शन ते दरबार पर्यंतचे सर्व कार्यक्रम व्यवस्थित संपन्न झाले.मंदिराची वास्तूपूजा व भक्तांसाठी स्पर्श दर्शन हा अनोखा कार्यक्रम पूर्ण इतमामाने साजरा झाला. या स्पर्श र्दशनाच्या कार्यक्रमात प्रत्येक दर्शनार्थी भक्तांना श्री समाधीवर अभिषेकासाठी शुद्ध पाण्याने भरलेले कलश व बेलपत्री मंदिरात देण्यात आली. यात जातपात-स्त्री-पुरुष-आबाल वृद्ध असा कोणताही भेद नव्हता. श्री मार्तंडप्रभूंनी म्हटल्या प्रमाणे – “घेति पत्र पुष्प फल जल गंध मणी-मोती। आणि नटून म्हणती आता व्हावू चला।। शीघ्र चला अति शीघ्र चला।। हा निर्विकल्प सविकल्पी आला।।”
हे सर्व कार्यक्रम असंख्यांच्या उपस्थितीत आणि ज्यादा वेळ चालत राहिले हे विशेष, आणि लोकांनीहि कोरोनाची भिती न बाळगता,कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत,उत्सहात सहभाग घेतला. बत्ताशे उडवणे, नारळ फोडणे,वगैरे प्रकारांना फाटा देत, या वेळी लोकांनीहि चांगले सहकार्य केले. प्रत्येक कार्यक्रम पूर्व परंपरेला धरून, न कंटाळता, घाई न करता, कितीही वेळ लागला तरीही तितक्याच अगत्याने संपन्न झाले. श्रीजींची ही श्रद्धा व सबुरी आमच्यात कधी परावर्तित होईल ते श्रीप्रभूच जाणे. वाटत होते की कोरोना पासून भक्तांचे रक्षण करण्यासाठी श्रीप्रभूंचा सटकाच इथे उभा आहे. नाही तर आमच्या सारख्या अर्धवट भक्तांना वाटत होते कि एवढ्या मोठ्या महामारीत हा उत्सव एवढया मुक्तपणे घेणे ही जोखिमच आहे.
श्री.आनंदराज प्रभूंची शांत वृत्ती व कृतज्ञता दरबार मध्ये त्यांच्या निवेदनात दिसून आली. तर श्री चैतन्यराज प्रभूंची अखंड सेवा व कार्यातील सातत्य, नेमनिष्ठा हे देखील प्रकर्षाने जाणवली. श्री चारुदत्त व श्री चंद्रहास प्रभू यांचे सोबत गावातील तरुण मंडळी उत्सवा अगोदर व नंतरही मंदिर परिसर स्वच्छ करण्याची सेवा करीत होती. तसेच श्री कौस्तुभ, श्री चिद्घन व श्री चिज्ज्वल यांनीही आपापल्या परीने तांत्रिक बाबी सांभाळत खारीचा वाटा उचलला. तसे श्री प्रभूंच्या घरच्या सर्वच मंडळींचा असाच सहभाग यात दिसला. हे पाहून इतर सकलमती भक्तांच्या मनात अशी श्रद्धा येणारच की. म्हणतात ना ‘Charity begins at home.’ एकंदरीत श्री सिद्धराज प्रभू म्हणतात त्या प्रमाणे ‘प्रभू जवळी असतां। मग चिंता मज का’? श्रीजींच्या प्रमाणे अतुट श्रद्धा आमच्याहि मनात जडो ही प्रभू चरणी प्रार्थना.
Recent Comments