ताज पे साज

परम आदरणीय श्री ज्ञानराज महाराज लिखित येई चेतन सांबा हे पुस्तक प्राप्त झाले. या पुस्तकात महाराजांनी श्री मार्तंड माणिकप्रभूंनी रचलेल्या येई चेतन सांबा या पदाची सारगर्भित व्याख्या केली आहे. उपाशीपोटी जसे अधाशीपणाने अन्न सेवन केले जाते तद्वत लगबगीने पण काळजीपूर्वक या पुस्काची 15 पाने वाचली. मार्तंड माणिक प्रभूंनी लिहिलेल्या या पदाच्या अर्थाबद्दल नितांत उत्सुकता होती. गहन अर्थ ही सहजगत्या वाचकांच्या वा श्रोत्यांच्या गळी उतरवण्यात श्री ज्ञानराज महाराजांचा हातखंडा आहे. त्याचा लाभ घेऊन या पुस्तकाचे वाचन चालू होते. गुलाबजाम मध्ये पाक मुरतो तद्वत अंतरंगात अर्थ मुरवण्याचा माझा खटाटोप सुरू होता.

पान no. 11 वर महाराजश्री शिव शंकरालाच मन नियंत्रित करण्यास बोलावतात कारण  मन हे नियंत्रणासाठी अतिशय दुष्कर आहे असे लिहिले आहे. श्री ज्ञानराज महाराजांच्याही एका पदात प्रभू तुम्हारे पद कमल पर मन सदा एकाग्र हो मध्ये ते माणिक प्रभूंना प्रार्थना करतात की माझे मन एकाग्र होऊ दे. माणिकप्रभु उत्तरादाखल अप्रतिम मौक्तिक देतात. म्हणतात, मन स्थिर झाले तर ते मन कुठले? ते तर आत्मरुप झाले.

माझ्यासारख्या अति सामान्य स्त्री ची चटकन टाळी वाजली. म्हटले, ही तर पत्राची post script झाली. मार्तंड माणिक प्रभूंच्या येई चेतन सांबा या पदरुपी पत्राला अनुसरूनच अत्यंत विशेष असलेला ताज कलम म्हणजे श्री ज्ञानराज माणिक प्रभूंचे ‘प्रभू तुम्हारे पदकमल पर।’ मार्तंड माणिक प्रभूंचे लेखन ताज असेल तर ज्ञानराज महाराजांचे लेखन त्या मुगुटातील मध्यभागी शोभणारा दिव्य हिरा आहे. ज्यांनी हा ग्रंथ अजून पर्यंत वाचलेला नाही त्यांना सर्वांना मी हा ग्रंथ वाचण्याची विनंती करते. वेशेषेकरून वेदांतात आवड असणार्यांनी हा पुस्तक जर वाचला तर त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीला नक्कीच एक नवीन दृष्टिकोण लाभेल अशी माझी खात्री आहे.

येई चेतन सांबा – या पदाचा अर्थ इतका गहन आणि गूढ अहे, की महाराजांसारख्या सद्गुरूंकडून हा अर्थ समजून घेतल्या शिवाय आपल्या सारख्या सामान्य लोकांना काहीही समजाणार नाही. या पुस्तकाच्या रूपात महाराजांनी आम्हा सर्वांवर जी महत्कृपा केली आहे त्या साठी आम्ही त्यांचे ॠणी आहोत आणि महाराजांनी असेच आम्हाला आपल्या ॠणात ठेवावे अशी प्रार्थना.

प्रसाद

१५ ऑगस्ट २०२१ – ७५ वा भारतीय स्वातंत्र्य दिवस. सकाळी ध्वजारोहण केले व माणिकनगरला जाण्यासाठी निघालो – मी, राधा, सांन्वी. आम्ही सर्व गुरु चरणी नतमस्तक होण्याची संधी मिळणार ह्या विचाराने प्रसन्न होतो. वाटेत आम्ही प्राची, इशान व शान्वी यांना ठाणे येथून आमच्या बरोबर प्रवासात घेतले. सर्व आनंदी होतो. भजन, गाणी व गप्पा करता-करता माणिकनगरला कधी पोहोचलो  कळलेच नाही.

१६ ऑगस्ट २०२१.. श्रावण सोमवार.. दुर्गाष्टमी.. मार्तंड माणिक प्रभू मंदिरात श्री मार्तंड प्रभु गादीअष्टमी सोहळा व सोमवारच्या भजनाचा लाभ मिळाला. व त्यानंतर महाप्रसाद घेऊन तृप्त झालो. अविस्मरणीय अनुभव होता.. अलौकीक क्षण, आठवणीत गुंफून ठेवावे असे क्षण….

सायंकाळी चैतन्यलिंगाच्या पवित्र स्फटिक शिवलिंगावर रूद्री, श्री यंत्रावर श्रीसुक्त व अखंड जलाभिषेक श्री ज्ञानराज माणिक प्रभूंच्या हस्ते नियमबद्ध पार पडले. ह्या नंतर महाराजांनी दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास करणाऱ्यांना प्रसाद दिला.

१७ ऑगस्ट २०२१.. सकाळी ७:३० ला प्रभू मंदिरात दर्शनासाठी गेलो व लवकरच पुन्हा माणिकनगरी येण्याचा योग येऊ द्या, अशी प्रभूंच्या चरणीं प्रार्थना केली. मंदिराच्या आवारात गाडी उभी होती, मुंबईचा प्रवास तीर्थ घेऊन सुरू केला. वाटेत भजन, गाणी, गप्पा चालू होत्या.

आम्ही शिवाजी हॉस्पिटल, कळवा येथ पर्यंत पोहचलो होतो. वेळ रात्री ८:२० असावी. रहदारीची वेळ होती. गप्पांचा विषय होता “दत्त महाराज यांनी दिलेल्या प्रचीत्या…. लोकांना आलेले अनुभव”!! ट्रॅफिक असल्याने गाडीची वाटचाल हळू होती. वाट काढीत कळवा ब्रिजवर पोहोचलो.

अनुभव ऐकून अंगावर शहारे, डोळ्यात पाणी तरळत होते. आपल्या सारख्या सामान्य लोकांना सुद्धा दैनंदिन जीवनात प्रभु कृपेचे छोटे मोठे अनुभव येत असतात, असा संवाद चालू होता..

आणि.. ब्रिजच्या चढणी वर अचानक गाडी बंद पडली, वेळ रा ८:३०..

५०० कि.मी. हुन अधिक अंतर गाडी चालली होती. प्राथमिक अंदाजानुसार बॅटरी व सेल्फ सुरूवात होत नसल्याचे कारण पहायचे होते. मी गाडीतून खाली उतरलो. मागे खोळंबलेल्या गाड्यांना बाजूने जाण्यास खुणेनेच सांगितले. तेवढ्यात एक दुचाकी समोर येऊन थांबली. त्यावर दोन गृहस्थ होते. त्यांनी विचारपूस केली, व त्यांच्यापैकी एक गाडी मागे गेला. मागे खोळंबलेल्या गाड्यांना बाजूने जाण्यास सांगू लागला. तर दुस-या व्यक्तीने मला गाडीचे बॉनेट उघडण्यास सांगितले व गाडी तपासली. बॅटरी कनेक्टर सैल झाले होते ते तात्पुरते ठीक करून दिले. व आम्हाला सांगितले की तात्पुरते काम केले आहे, मात्र खूप लांबचा प्रवास करू नका, मेकॅनिकला दाखवा. वेळ रा ८:३५/४०.

त्यांच्या कुशलते मुळे अवघ्या पाच ते दहा मिनिटात गाडी सुरु झाली होती. त्यांची विचारपूस करून त्यांचे आभार मानणार इतक्यात वाहतूक पोलिस आले व मागे वाहतूक खोळंबली असल्यामुळे आम्हाला तेथून लवकर निघण्यास घाई करू लागले.  तसे ते दोघे सज्जन त्यांच्या दूचाकी वर बसून पटकन निघुन गेले.

गाडीत बसल्यावर घडल्या प्रकाराविषयी आम्ही चर्चा करीत होतो, आणि अगदी योग्य वेळी गाडी विषयी जाणकार व्यक्ती आपल्या मदतीस आली ही निव्वळ प्रभु कृपा असे मानून प्रभु चे आभार मानीत होतो.

मात्र आमची गाडी सुरु व्हायच्या आधीच ते दोघे गृहस्थ आपल्या दुचाकी वर बसून निघून गेले व त्यांची चौकशी करणे, त्यांना धन्यवाद देणे राहुन गेले, म्हणून थोडी खंत ही व्यक्त करीत होतो. इतक्यात अचानक ती दुचाकी पुन्हा कधी आमच्या गाडी शेजारी आली, ते आम्हाला कळलेच नाही. आमचे लक्ष गेले तेव्हा ते मागे बसलेले गृहस्थ (ज्यांनी बॅटरी कनेक्टर दुरुस्त केले होते) आम्हाला खुणवून गाडी थांबवायला सांगत होते. मी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. छत्री अडकल्यामुळे गाडीची डिक्की उघडी राहिली होती, ती बंद करण्यासाठी त्यांनी गाडी पुन्हा थांबवली होती. ह्या वेळी मात्र आम्ही त्यांना थांबवून त्यांचे मनापासून आभार मानले. व त्यांचे निदान नाव तरी कळावे म्हणून मी त्यांच्याशी संवाद करीत होतो. नाव सांगण्यास ते थोडी टाळाटाळ करू लागले, व स्मित हास्य करून नाव जाणून घेण्याची आवश्यकता नाही असे काहीतरी म्हणाले. मी मात्र त्यांना नाव सांगण्यास आग्रह करीत राहिलो. तेव्हा त्यांनी  काही क्षण विचार केला, आणि मिश्किलपणे मंद हास्य करीत म्हणाले “प्रसाद”!!! व मी अजून काही बोलायच्या आधी ते तेथून निघून गेले.

आम्ही सर्वांनी एकमेकांकडे पाहिले. आपल्या गप्पांचा विषय दत्त महाराज व लोकांना आलेले अनुभव… परतीचा प्रवास निर्विघ्न व सुखरूप होण्यासाठी महाराजांकडून प्रसाद घेऊनच माणिकनगरातून निघण्याची संप्रदायाची परापूर्वी पासून चालत आलेली प्रथा… त्याच प्रथेच्या महत्वाची, प्रभुकृपेची व श्रीजींच्या प्रसादाची प्रचीती आम्हाला आली हे निश्चित!!!

तिथून आम्ही थेट मेकॅनिक कडे गेलो. गाडीचे काम त्याने केले. व आम्ही आमच्या घरी सुखरूप पोहोचलो.

तू चुकु नको आत्मा रामा

नौबतखान्यात मध्यरात्रीची नौबत व शहनाई वाजत होती. श्री मार्तंड प्रभूंनी शहनाई वाजविणान्यास बोलावून घेतले व विचारले ‘‘तू कुठलं गाणं वाजवीत होतास ?’’ शहनाईवाला घाबरून गेला व म्हणाला – ‘‘महाराज, कालच तुळजापूरचे काही गोंधळी आले होते, त्यांच्या तोंडून मी ही धून ऐकली, मला आवडली, म्हणून मी वाजवली.’’ महाराज म्हणाले – ‘‘असतील तेथून त्या गोंधळ्यांस बोलावून घेऊन ये.’’

दुसऱ्या दिवशी रात्री तो गोंधळी महाराजांपुढे हजर करण्यात आला. महाराजांनी गोंधळ्यांस तेच पद म्हणण्याची आज्ञा केली ज्याची धुन शहनाईवाल्यांनी वाजवली होती, गोंधळी आनंदाने गाऊ लागला

आम्ही चुकलो जरि तरि काही । तू चुकू नकोस अंबाबाई ॥

पुन्हा पुन्हा हेच पद महाराजांनी गोंधळ्याकडून म्हणवून घेतलं व स्वतः कलमदान घेऊन काहीतरी लिहू लागले. शेवटी महाराज तृप्त झाले व गोंधळ्याला व शहनाईवाल्यास इनाम देऊन त्यांची रवानगी केली.

गोंधळी जाताच महाराजांनी संस्थानच्या भजनी मंडळातील प्रमुखांना बोलावलं व त्यांना नवीन स्वरचित पद शिकवलं. त्या पदाचे बोल होते

आम्ही चुकलो निजहित काम ।
तू चुकू नकोस आत्मारामा ।।

महाराजांची ज्ञानलालसा व स्वरलालसा इतकी तीव्र होती की मामुली समजले जाणारे गोंधळी वाजंत्रीवाले इत्यादी वर्गातील लोकांतही जे काही गुण प्रशंसनीय होते, त्यांचे त्यांनी सदैव कौतुक केले. व त्या लोकांच्या चालींवर सुद्धा गहन गंभीर वेदांतपर पदांची रचना केली.

आमचा राजा

२८ फेब्रुवारी १९४५ रोजी श्री शंकर माणिकप्रभु, प्रभु चरणी लीन झाले. महाप्रयाणाच्या वेळी हणमंतराव कारभारी व व्यंकटराव रेगुण्डवार हे दोघे महाराजांच्या जवळ होते. महाराजांना उदरव्यथेनी वेदना होत होत्या. तरी त्यांना विनोद सुचला. महाराज व्यंकटरावाला उद्देशून  म्हणाले ‘‘व्यंकट, येतोस काय रे माझ्या बरोबर?’’ हे शब्द ऐकताच व्यंकटराव ओशाळला. काय उत्तर द्यावे हेच त्याला समजेना. ‘‘महाराज, मुले लहान आहेत…’’ वगैरे सबबी तो सांगू लागला. त्याचे उत्तर ऐकून महाराजांना हसू आवरेना. ते पाहून हणमंतराव म्हणाला ‘‘महाराज, मी आपल्या बरोबर येण्यास तयार आहे. आपण मला घेऊन चला.’’ महाराजांची चर्या गंभीर झाली. काही तरी विचार करून ते म्हणाले, ‘‘तुला मी घेऊन गेलो असतो रे हणमंत, पण मुद्दाम येथे ठेवून जात आहे. माझ्या मनात बरीच कार्य करावयाची होती. ती पुरी झाली नाहीत. आता आमचा राजा ती कामगिरी पार पाडील. आमचा राजा (श्री सिद्धराज माणिक प्रभु ) काय काय करणार आहे ते पाहण्याकरता तुला ठेवून जात आहे.’’ आणि काही क्षणानंतर महाराज समाधिस्थ झाले.

सन १९८१ पर्यंत ही हकीगत कुणालाच ठाऊक नव्हती. १९८१ च्या डिसेंबर महिन्यात श्री सिद्धराज माणिक प्रभूना संस्थानची सूत्रे हाती घेऊन २५ वर्षे झाली आणि रजत जयंती महोत्सव साजरा झाला. त्या दिवशी हणमंतराव महाराजांच्या भेटीस आले. व डोळयांतून अश्रू ढाळीत त्यांनी ही हकीगत महाराजांना सांगितली. व म्हणाले ‘‘श्री शंकर महाराज त्या दिवशी जे काही बोलले त्याचा अर्थ मला आता समजला. आपली ही २५ वर्षांची कारकीर्द मी डोळ्यांनी पाहिली. त्यांच्या ‘राजांनी’ केलेलं सारं काही मी पाहिलं. आता मला निरोप द्या. मला श्री शंकर माणिक प्रभूच्या चरणी जाऊन त्यांच्या राजांनी केलेलं सारं काही त्यांना सांगायचं आहे.’’

प्रभु प्रसादाची महिमा

नियतीने घाला घातला पण प्रभूंच्या शक्ती पुढे तिला हरावं लागले. काळ आला होता पण प्रभुंनी वेळ येऊ दिला नाही. माझ्या जिवनात अनेक प्रसंग आले, अनेक संकटं आली पण त्या संकटातून मला प्रभुंनीच क्षणोक्षणी वाचवले. माझ्यावर माझे सद्गुरु म्हणजे – श्री सिद्धराज माणिक प्रभूंची खूप मोठी कृपा आहे, असं मला वाटतं.

शनिवार १९ जून दिवशी मी आपल्या परिवारासोबत  प्रभु दर्शनास माणिकनगरी गेलो होतो. दोन दिवस राहून म्हणजे सोमवारी २१ जून रोजी श्रीजींची (श्रीज्ञानराजप्रभूंची) आज्ञा व प्रसाद घेवून पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. माणिकनगराहुन १८ कि.मी  अंतरावर काळ वाट पहात होता. जणुकाही तो काळ आमच्या सर्वांचा ग्रास घेण्यासाठी ‘आ..’  करुन तोंड पसरूनच बसला होता.

मी गाडी चालवत होतो आणि माझ्या गाडीत माझी पत्नी, दोन नातवंडं, सून व समोरच्या सीटवर मुलगा होता. खटकचिंचोळी गावाच्या परिसरात सडके वर पुढे आयचर टेम्पो दिसला. दोन्ही गाड्या वेगात होत्या अपघात होऊ नये म्हणून मी गाडी डावीकडे घेतली आणि ब्रेक केला. तेवढ्यात steering अचानक वळली व ५ वेळेला पलटी खाऊन आमची कार रस्त्याच्या बाजूला १० फुट खोल खड्ड्यात जाऊन पडली. गाडीचे चाकं वरती व आम्ही खाली, भयंकर प्रसंग होता. काय झालं, हे आम्हाला कळत नव्हतं पण सर्वांच्या मुखात भक्तकार्याचा जप चालू होता. आमची गाडी सडकेवरून केव्हां सरकली आणि त्या खड्ड्यात केव्हां जाऊन कोसळली याचं आम्हाला काही ही भान नव्हतं. आम्ही खरेच जीवंत आहोत का हा विश्वासाही होत नव्हता. सर्वांनाच मोठा झटका बसला होता. हे सगळं होत अस्ताना प्रभूंच्या नावाचा जप आम्ही केव्हां सुरू केला हे ही आम्हाला कळलं नाही. श्रीगुरु माणिक। जय गुरु माणिक हे आपोआप तोंडातून निघत होतं. त्यामुळेच गाडी चे दरवाजे आपोआप उघडले, A.C चालु होता म्हणून door lock होते. पण प्रभूंचा चमत्कार पाहा – गाडीचे दरवाजे आपोआप उघडले. गाडी जिथे पडली होती तिथे एकही काटेरी झुडप नव्हते. सगळे क्षणात गाडीतून बाहेर निघालो.

माझा एक नातू माणिक (वय ५ वर्ष) पत्नीजवळ  होता ड्रायवर सीटच्या मागे, तर एक नातू विक्रम (वय ४ वर्ष ) समोरच्या सीटवर मुलाजवळ होता. प्रभूंच्या उद्दंड कृपेमुळे, कुणालाच काही झाले नाही. एवढ्या मोठ्या भीषण अपघातात जणू काही प्रभूंनी आम्हाला अलगद मांडीवर घेऊन आमचे रक्षण केले.

घटनास्थळी अचानक तीन माणसे आली आणि लगेच क्षणाचाही विलंब न होऊ देता सगळ्यांनी मदत केली. सगळ्यांच्या मदतीने कार ला सरळ करून रस्त्यावर आणलं आणि पुन्हा माणिकनगरच्या दिशेने निघालो. तोपर्यंत माणिकनगरात  ही वार्ता कळाली होती. सगळे परत माणिकनगरला पोहचलो. श्रीजींच्या आज्ञेनुसार सगळ्यांनी स्नान केले आणि परत मंदिरात प्रभूंच्या दर्शनास आलो.

माझ्या परिवारावरचा हा एक मोठा गंडांतर प्रभूंच्या कृपेमुळेच त्या दिवशी टळला. प्रभु चरित्राच्या २३व्या अध्यायात म्हटलेलं आहे ‘‘प्रारब्ध कितीही बलवत्तर। असले जरी खबरदार। तुझ्यापुढे केंवि तगणार। सामर्थ्य अपार तुज असता।।’’ या ओवीची खरी प्रचीती आम्हा सर्वांना त्या दिवशी प्रभूंनी करवून दिली. असं म्हणतात कि नशीबाची रेखा दगडावर कोरलेल्या रेखांसारखी असते, त्याला कोणीही बदलू शकत नाही. पण सद्गुरूंची कृपा झाल्यावर काहीही अशक्य नाही असा माझा अनुभव आहे. प्रभूंची कृपा शब्दांत वर्णता येत नाही. आज तर त्यांनी माझे तोंडच बंद केले. आमच्या मार्तंड माणिकप्रभू महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर ‘‘कृपा झालिया काळही त्या न ग्रासे।’’ हा सगळा प्रसंग पाहिल्यावर वाटतं कि, महाराजांचे हे शब्द किती खरे आहेत !

माणिकनगरला श्रीजींपुढे आल्याबरोबर ‘काय झालं रे अनिल?’ म्हणून श्रीजींनी पूर्ण वृत्तांत माझ्याकडून ऐकलं. पुढचा प्रवास सुखरूप व्हावा या साठी आम्ही जेव्हां श्रीजींना पुन्हा प्रसाद विचारलं तेव्हां ते म्हणाले ‘‘दिलो कि रे प्रसाद सकाळीच. त्या प्रसादामुळेच सगळे वाचले, आणखी दुसरा प्रसाद कशाला?’’ प्रसाद होता म्हणूनच सर्वजण वाचले – श्रीजींचे हे उद्गार ऐकताच अंगावर रोमांच उभे राहिले आणि ‘योगक्षेमं वहामि अहम्‌’ परमेश्वराच्या या वचनाचे स्मरण झाले. आम्ही भक्त कितीही गाफिल असलो तरी अमचा तो सद्गुरु सतत आमच्या योगक्षेमाची चिंता वाहत असतो यात मुळीच शंका नही.

‘रात्री इथेच मुक्काम करून सकाळी जा’ श्रीजींनी सांगितले त्यानुसार आम्ही सर्वजण त्या दिवशी राहून दुसरया दिवशी श्रीजींचे दर्शन व आज्ञा घेऊन परत घरी आलो.

प्रभुंच्या कृपेची व त्यांच्या आर्शीवादाची माझ्या जीवनात अनेकदा प्रचीती आली आहे.नव्हे नव्हे तर माझ जीवनच त्यांच्यामुळेच आहे. आमच्या श्वासत सुद्धा प्रभूच आहेत. ज्याप्रमाणे प्रभूंनी मला जवळ केलं त्याच प्रमाणे माझ्या पिढ्यानपिढ्या प्रभुचरणांच्या सेवेत रहावेत हीच माझी प्रार्थना आहे.

 

श्रीमाणिकप्रभु बाललीला

श्रीमाणिक प्रभु बाललीला -1

 

गोविंदा नामे गोपालक ।

बालसखा एक बालक ।

सवे घेऊनि माणिक ।

नित्य गुरे चारावया ॥१॥

 

परी नेमात खंड पडिला ।

तीन दिवस नाही आला ।

सखा माणिक शोधित त्याला ।

गोविंदागृही पातला ॥२॥

 

पाहो जाता गोविंदांगणी ।

सकल रडती आक्रंदोनी ।

माणिक मातेसी पुसोनि ।

व्यर्थ का विलापी ॥३॥

 

माता वदे स्फुंदोनी ।

काळ आला धावोनी ।

गोविंदासी नेले हिरावोनी ।

आज आपल्यातूनी ॥४॥

 

माणिक म्हणे विस्मय करोनि ।

जीवित परी, शोक वदनि ।

उठ गोविंदा, सप्रेमे वदोनि ।

जाऊ खेळावया ॥५॥

 

ऐकता प्रभुची मंजुळवाणी ।

गोविंदा उठे झडकरोनी ।

जागविला तया काळनिद्रेतुनी ।

अवघा आनंदसोहळा ॥६॥

 

गोविंदासी वनांत येण्या सांगून ।

प्रभुमाणिक सत्वर गेले निघून ।

तीन दिवस गुप्त राहून ।

नामानिराळे राहिले ॥७॥

 

गरजेपेक्षा अधिक स्वच्छंद ।

बाललीला जैसे मुकुंद ।

माणिक प्रभु आनंदकंद ।

सेविता परमानंद ॥८॥

 

श्रीमाणिकप्रभु बाललीला -2

 

एकदा एक निःसंतान माळीण ।

आंबे विकावया करी मार्गक्रमण ।

आंबे घ्या आंबे मुखी उच्चारण ।

चालतसे झरझर ॥१॥

 

प्रभु खेळत होते त्या समयास ।

पाहता आंबेवाल्या माळिणीस ।

आंबे देशील का खावयास ॥

विचारती लिलाविनोदे ॥२॥

 

पैशाशिवाय सर्व दुस्तर ।

अवघा व्यापार व्यवहार ।

फुकटचे कोण देणार ।

माळिण म्हणतसे ॥३॥

 

परी प्रभुलीला पहा अपार ।

मित्रांसी सहज वदे साचार ।

जरी माळिण संतान आतूर ।

आंबे देईन खावया ॥४॥

 

ऐकता प्रभुच्या बोलावरी ।

माळिण फिरे माघारी ।

ठेऊनिया समोर टोकरी ।

हवे तितुके घे ॥५॥

 

प्रभुंनी अकरा आंबे घेतले ।

तितकेच पुत्र पदरी घातले ।

अहा काय भाग्य उदेले ।

निःसंतान माळिणीचे ॥६॥

 

यथावकाश होता अकरा नंदन ।

माळिण करी प्रभुसी वंदन ।

तृप्ती पावले मज अंतःकरण ।

अधिक पुत्र नको आता ॥७॥

 

प्रभु वदे मग तियेसी ।

जैसे तुझ्या असेल मनासी ।

आम्ही मुक्त झालो वचनासी ।

मायामुक्त अवधूत ॥८॥

 

श्रीमाणिकप्रभु बाललीला -3

 

असेच एकदा वनांत हिंडता ।

पोपट एक मरून पडला होता ।

सवंगडी पोपटास पाहो जाता ।

शोकाकुल जाहले ॥१॥

 

सख्यांची म्लान वदने पाहता ।

बाल माणिक द्रवला चित्ता ।

मृत शुकास घेवोनि हाता ।

कुरवाळीत ममतेने ॥२॥

 

अरे राजा, काय झाले ?

पंखातील बळ कुठे गेले ।

प्रभु महाराज सहज वदले ।

करूणादृष्टी पाहता ॥३॥

 

दोन्ही हाती पकडोनी ।

दिले आकाशात उडवोनी ।

पंख फडफड करोनि ।

अवकाशी झेपावला ॥४॥

 

लीला इतकी सहज ।

नाही कोणास उमज ।

ज्याची जितकी गरज ।

प्रकटती तितकेच ॥५॥

 

सवंगड्यांसवे नित्य लीला ।

नाही त्याचा उदोउदो झाला ।

खेळून झालिया विसरती त्याला ।

निरागस बालके ॥६॥

 

श्रीमाणिकप्रभु बाललीला – 4

 

अरबांची फौज निजाम दरबारी ।

अप्पाराव होते त्याचे अधिकारी ।

अरब आप्पाराव म्हणती सारी ।

उच्चपदस्थ ब्राह्मण ॥१॥

 

पत्नी त्यांची भीमाबाई रूपवान ।

जैसी का सौंदर्याची खाण ।

परी पोटी नव्हते संतान ।

दुःख होई अपार ॥२॥

 

नाना उपाय केले थोर ।

व्रत उपवास जप घनघोर ।

पाळण्याचा हालेना काही दोर ।

व्यर्थ झाले सर्वही ॥३॥

 

ऐकली होती प्रभुंची कीर्ती ।

सत्य होई मुखे जे वदती ।

मागुनी पतीची अनुमती ।

पालखीत बैसतसे ॥४॥

 

काफिला चालला कल्याण नगरी ।

राहिली एक मैलाची दूरी ।

गंमत पाहे पालखी बाहेरी ।

आतमधून भीमाबाई ॥५॥

 

रस्त्याला लागून एक मैदान ।

खेळती मुले त्यात समरसून ।

अचानक एकाच्या छातीवर बसून ।

मारीते झाले तयासी ॥६॥

 

भीमाबाई पाठवी सेवकांसी ।

सोडवावे असहाय बालकासी ।

बालक सांगे सेवकांसी ।

अंतर्गत मामला आमुचा ॥७॥

 

परी असे मजसी सोडवणे ।

तरी आठ कवड्या देणे ।

भीमाबाई ऐके ते बोलणे ।

कोडे कवड्यांचे ॥८॥

 

कवड्यांऐवजी रूपयांचे दान ।

भीमाबाई देई झडकरून ।

नको आठ कवड्यांवाचून ।

अन्य आम्हा ॥९॥

 

कुठे शोधाव्या आता कवड्या ।

भीमाबाई पाहती होऊनी बापुड्या ।

पाणक्याच्या बटव्यात आठ तेवढ्या ।

मिळाल्या कवड्या ॥१०॥

 

कवड्या देऊनी सोडविले ।

जा तुला आठ पुत्र दिले ।

बालक ते सहज वदले ।

कनवाळू माणिक ॥११॥

 

साधारण घटना समजून ।

प्रस्थान केले मैदानातून ।

संध्याकाळी कल्याणास येऊन ।

लवाजमा पोहोचला ॥१२॥

 

प्रभुदर्शन घेतल्या वाचून ।

न करावे तरी भोजन ।

ऐसे मनोमनी योजून ।

भीमाबाई शोधतसे ॥१३॥

 

तीन दिवस घडे उपवास ।

नाही माणिकाचा काही तपास ।

चौथे दिवशी प्रभु उदयास ।

आले स्वगृही ॥१४॥

 

लोटली सत्वर दर्शनास ।

पारावार नुरे आश्चर्यास ।

कवड्यांनी सोडविले जयास ।

वेडाभाऊ हाच तो ॥१५॥

 

आठ पुत्र तुला दिधले ।

अजून मनी काय योजिले ।

मातेने चार घास भरविले ।

पसार झाले तत्काळ ॥१६॥

 

भीमाबाई संतोषली अपार ।

दानधर्म लुटविले भंडार ।

देऊनी वस्त्र उपहार ।

माणिकमाता संतोषवीली ॥१८॥

 

भीमाबाईस आठ अपत्य ।

झाली पाठोपाठ सत्य ।

आठवणीने येई नित्य ।

माणिकदर्शना ॥१९॥

 

सहज शब्द ब्रह्मवाक्य ।

हरीहरांचे जेथे ऐक्य ।

अवतार सुकुमार माणिक्य ।

सुखदायक सर्वांसी ॥२०॥

 

श्रीमाणिकप्रभु बाललीला -5

 

रंगबिरंगी दगडांची स्थापना ।

देवता म्हणूनि उपासना ।

नैवेद्य आरती आराधना ।

माणिकखेळ अनुपम ॥१॥

 

ग्रामस्थही वेगे धावती ।

करूनी पूजेची आयती ।

नवस आपले फेडीती ।

प्रसादाची रेलचेल ॥२॥

 

लपंडावाची पहा वेगळीच रीत ।

तिथल्या तिथे होती गुप्त ।

सखे हार मानोनी शरणागत ।

तेव्हाच प्रकटती ॥३॥

 

धोतर अथवा फेटा मागूनी ।

स्वतःस घेती वृक्षास बांधोनी ।

क्षणात जाती अलगद निसटोनी ।

धोतर फेटा तैसाची ॥४॥

 

धोतर सोडोनी कटीस बंधन ।

उरलेले दोन्ही बाजून देऊन ।

सख्यांस रस्सीखेच करण्या सांगून ।

जोर लावती सवंगडी ॥५॥

 

प्रभु क्षणार्धात मुक्त होती ।

धोतर राही मित्रांच्या हाती ।

फिरून तैसेच करून पाहती ।

बंधमुक्त वारंवार ॥६॥

 

सदा स्वच्छंदी जो आनंदकंद ।

कैसा राहील बंधनात बंद ।

जीवा लागता माणिकनामाचा छंद ।

बंधमुक्त होतसे ॥७॥

 

श्रीमाणिकप्रभु बाललीला – 6

 

पशू पक्ष्यांना पहावे दयेने ।

मित्रांसी सांगे अतीव मायेने ।

प्राणीमात्र विहरता निर्भयतेने ।

संतोषे माणिक ॥१॥

 

एकदा एक खोडकर कुमार ।

गाभण म्हशीवर होऊनी स्वार ।

काठीने मारत असे वारंवार ।

पळवतसे म्हशीला ॥२॥

 

प्रभु पाहता त्या बालकास ।

समजावीती, नको देऊ त्रास ।

तयार नाही काही ऐकण्यास ।

उन्मत्त बालक ॥३॥

 

कळवळा येता माणिकास ।

वदती स्वमुखे जोरकस ।

हात लाऊन बघ म्हशीस ।

मग कळेल ॥४॥

 

उन्मत्त बालक ईरेला पेटून ।

हात दोन्ही पाठीस टेकवून ।

म्हशीस अजून जोरात पळवून ।

खदखदा हसतसे ॥५॥

 

प्रभु हसून म्हणती  त्यास ।

म्हैस ही वाईट हमखास ।

न सोडी आता तुझ्या हातास ।

बैस सांभाळूनी ॥६॥

 

माणिक वचन जणू ब्रह्मवाक्य ।

हाताचे पाठीचे झाले ऐक्य ।

हात मोकळे होणे अशक्य ।

लटकतसे अधांतरी ॥७॥

 

म्हैस धावतसे बेफाम होऊन ।

बालक रडे धाय मोकलून ।

चुकलो, वाचवा वदे कळवळून ।

असाहय दीनपणे ॥८॥

 

प्रभुमाणिक तो दीनदयाघन ।

पकडे म्हशीस धाऊन ।

प्रेमभरे हात फिरवून ।

शांतविले म्हशीला ॥९॥

 

हे माई, याला माफ कर ।

पुन्हा नाही ऐसे करणार ।

सोडवी आता ह्याचे कर ।

प्रेमभरे वदतसे ॥१०॥

 

झाला क्षणात बालक बंधमुक्त ।

सवंगडी करीती आनंद व्यक्त ।

मायामुक्त परी वर्ते मायायुक्त ।

सगुणरूपी माणिक ॥११॥

 

श्रीमाणिकप्रभु बाललीला – 7

 

मेलगिरीभट नामक विप्र ।

प्रभुशेजारीच त्याचे घर ।

पुजीतसे नित्य सोमेश्वर ।

शिवभक्त विख्यात ॥१॥

 

मेलगिरी रूपाने काळा सावळा ।

समस्त म्हणती त्यास काळ्या ।

काळा परी शिवभक्त आगळा ।

शिवध्यानी सदोदित ॥२॥

 

एके दिवशी व्यग्र शिवपुजनी ।

अभिषेक आणि बिल्वार्चन करूनी ।

शिवपिंडीस एक ध्यान लावोनि ।

होतसे समाधिस्त ॥३॥

 

इतक्यात बाळंभट ब्राह्मण ।

प्रकटला शिवपुजे कारण ।

मेलगिरीस न पाहता ढुंकून ।

जलाभिषेक करीतसे ॥४॥

 

मेलगिरीची पूजा पावली भंग ।

बदलला आता भक्तीचा रंग ।

शिव्याशाप देण्यात होती दंग ।

कोलाहल माजला ॥५॥

 

ऐकोनी मंदिरातील कोलाहल ।

प्रभु धावले मंदिरासी तात्काळ ।

मेलगिरीस बोलावूनी जवळ ।

प्रेमभरे समजावीत ॥६॥

 

काळ्या, का रे व्यर्थ रागावतोस ।

पाषाणलिंगाचा भारीच तुज सोस ।

मेलगिरी वदे माणिक प्रभुस ।

पाषाणलिंगच मज सर्वस्व ॥७॥

 

माझ्यासारख्या परम अभाग्यास ।

ईश्वर न येई प्रत्यक्ष दर्शनास ।

प्रभु जाणूनी काळ्याच्या भावास ।

लीला दाविती ॥८॥

 

डोळे बंद करूनी काळयास ।

सांगितले लिंगासमोर बैसण्यास ।

होता काही क्षण समयास ।

डोळे उघडी बा ॥९॥

 

डोळे उघडताच दिव्य पाहीले ।

तेजस्वी सिद्ध पिंडीठायी बैसले ।

जटाधारी, अंगी भस्म चर्चिले ।

रूद्राक्षमाळा अंगभर ॥१०॥

 

कटी नेसले व्याघ्रांबर ।

वर्ण जैसा कर्पूरगौर ।

प्रत्यक्ष कैलासीचा शंकर ।

शिवपिंडीवर बैसला ॥११॥

 

पाहो जाता ऐसा चमत्कार ।

माणिक चैतन्य शक्तीचा आविष्कार ।

मस्तक ठेवता शिव चरणांवर ।

तात्काळ गुप्त जाहले ॥१२॥

 

शिवलिंग पुन्हा तैसेच असत ।

समोरी प्रभु महाराज हसत ।

माणिकासी घालोनि साष्टांग दंडवत ।

मेलगिरी पूजितसे ॥१३॥

 

लिलाविग्रही तो प्रभु माणिक ।

असे सर्व सुखासी कारणिक ।

काया वाचा आणि मानसिक ।

भजा श्रीगुरू माणिक ॥१४॥

 

श्रीमाणिकप्रभु बाललीला – 8

 

काळंभट अत्यंत गरीब ब्राह्मण ।

भिक्षेतूनच करी उदर भरण ।

मावशीकडे रोज पत्रावळी बनवून ।

तेथेचि राहतसे ॥१॥

 

एक दिवस विचित्र आला ।

खराब पानांचा गठ्ठा आला ।

काळंभटाने ठाम नकार दिला ।

पत्रावळी बनविण्यास ॥२॥

 

मावशी कोपली भयंकर ।

जैसा जमदग्निचा अवतार ।

घालवोनि काळंभटास घराबाहेर ।

दिधले तात्काळ ॥३॥

 

प्रतिवर्षी श्रावणांत ब्राह्मण भोजन  ।

काळंभट सोहळा करी समरसून ।

ह्यावर्षीही त्याची तयारी पाहून ।

मावशी जळतसे ॥४॥

 

सर्व गावक-यांचे कान फुंकून ।

वळविले त्यांना आपल्या बाजूनं ।

पत्रावळी न मिळती ऐसे योजून ।

मावशी कोंडी करीतसे ॥५॥

 

घोर परिस्थीतीने विवश काळंभट ।

पत्रावळी मिळविणेस करी खटपट ।

इतक्यात झाली माणिकप्रभु भेट ।

वृत्तांत सर्व निवेदिला ॥६॥

 

श्रीमाणिकप्रभु तोच दत्त दयाघन ।

करिती काळंभटाचे पूर्ण समाधान ।

प्रभुच करील संकट निवारण ।

अभयकर देतसे ॥७॥

 

ज्या दिवशी ब्राह्मणभोजन ।

सुर्योदयापूर्वी आले दोघेजण ।

डोकीवरूनी ठेविती उतरवून ।

भार केळीच्या पानांचा ॥८॥

 

भाऊ कुलकर्ण्यांच्या गावाहून ।

आलो रात्रींत चालून ।

पंगतीस लागतील म्हणून ।

श्रमिक सांगती ॥९॥

 

हर्षभरित त्यांसी नाव पुसता ।

भाव्या, माणक्या वदती उभयतां ।

भोजन करूनच जावे आता ।

फिरोनी आपुल्या स्थाना ॥१०॥

 

काळंभट ऐसे तयांसी वदले ।

ब्राह्मण गावांतील अपार जेवले ।

श्रमिक दोघेजण नाही दिसले ।

विफल सारे प्रयत्न ॥११॥

 

दुसरे दिवशी कुलकर्ण्यांच्या घरी ।

पोहोचली काळंभटाची स्वारी ।

धन्यवाद करीतसे वारंवारी ।

केळीच्या पानांसाठी ॥१२॥

 

कुलकर्णी होऊनि आश्चर्यचकित ।

नाही माझी केळीची बागाईत ।

भाव्या, माणक्यासी नाही जाणत ।

काळंभटासी सांगत ॥१३॥

 

काळंभट मनी करी विचार ।

म्हणे झाला काय प्रकार ।

मन आणि बुद्धीचा सारासार ।

ताळमेळ बसेना ॥१४॥

 

योगायोगे पुढे श्रीप्रभु भेटले ।

त्यांसी सर्व प्रकरण सांगीतले ।

गडगडाट करूनी प्रभु हासले ।

काळंभटासमोरी ॥१५॥

 

तुझ्यासाठी प्रभुस कष्ट जाहले ।

श्रमिक बनून भारे वाहीले ।

सत्व तुझे ऐसे राखिले ।

माझ्या दत्तप्रभुने ॥१६॥

 

काळंभट मनी उमजला ।

ही सर्व त्या प्रभुचीच लीला ।

माथा टेकवूनी माणिक चरणाला ।

धन्य धन्य जाहला ॥१७॥

 

जाणूनि श्रीमाणिक कृपेला ।

काळंभट माणिकाचाच झाला ।

प्रभुसमाधी पश्चातही सेवेला ।

खंड नाही पडला ॥१८॥

 

श्रावणांत रूद्राभिषेक, बिल्वार्चन ।

तैसेच होई ब्राह्मणभोजन ।

काळंभटाचे जे आचरण ।

अद्यापही चालतसे ॥१९॥

 

श्रीमाणिकप्रभु बाललीला – 9

 

हळीखेड नावाच्या एका गावात ।

अग्निहोत्री ब्राह्मण भालचंद्र दीक्षित ।

आचार संपन्न वेदशास्त्र पारंगत ।

ख्याती असे पंचक्रोशीत ॥१॥

 

मनोहर नाईक माणिकप्रभु पिता ।

भालचंद्र दीक्षितांशी होती मित्रता ।

मनोहर नाईक स्वर्गलोकी पावता ।

दीक्षित येती कल्याणास ॥२॥

 

बयादेवी माणिकप्रभुंची माता ।

दीक्षित येती सांत्वनाकरीता ।

तिन्ही मुलांसी अवलोकीता ।

माणिक तेजस्वी सर्वांत ॥३॥

 

मातेच्या जीवास लागला घोर ।

सांगे दीक्षिता माणिकाचा आचार ।

अभ्यास सोडून वनांत विहार ।

नित्य हा करीतसे ॥४॥

 

घराकडे नाही अजीबात ध्यान ।

सर्व वस्तू करीतसे दान ।

कधी भरजरी वस्त्रे परीधान ।

सर्वांगी भस्मलेपन कधी ॥५॥

 

मुलाच्या भविष्याने चिंतीत माता ।

शिक्षणाने सन्मार्गी लावावे आता ।

परतोनी हळीखेडी आपण जाता ।

न्यावे माणिकासी ॥६॥

 

माणिकासी घेऊनी हळीखेडी आले ।

दीक्षितांनी कुटूंबासह गावात सांगितले ।

करू द्यावे जैसे माणिकमना आले ।

अडवू नका कोणी ॥७॥

 

प्रभु जरी हळीखेडास आले ।

स्वच्छंदीपणात नाही अंतर पडले ।

माणिक लीलांसी सहर्ष स्वीकारले ।

दीक्षित पतीपत्नीने ॥८॥

 

एक दिवस नवलच घडले ।

प्रभुंनी यज्ञकुंडातच शौच उरकले ।

दीक्षित पत्नीचे अवसान गळाले ।

तक्रार केली पतीकडे ॥९॥

 

पत्नीच्या बोलावर दाखवूनी अविश्वास ।

दीक्षित सत्वर धावले यज्ञशाळेस ।

जाणूनि मनोमन प्रभुच्या बाललीलेस ।

साफसफाईस लागले ॥१०॥

 

दीक्षित हात घालीता यज्ञकुंडात ।

सुवर्णाचा गोळा आला हातात ।

तेजस्वी सूर्य जसा चकचकित ।

प्रभुकृपे तळपतसे ॥११॥

 

आपली गरीब परिस्थीती पाहून ।

ही प्रभुकृपा दीक्षित होते जाणून ।

प्रभुही दीक्षितांसी विद्यागुरू मानून ।

आदर करती जीवनभर ॥१२॥

 

प्रभुस्नेहाचा ऐसा धागा जुळला ।

दीक्षित परीवार प्रभुंचाच झाला ।

जो जो माणिका शरण गेला ।

तोही त्यांचाच जाहला ॥१३॥

 

श्रीमाणिकप्रभु बाललीला – 10

 

भाच्याच्या भविष्याचा करूनी विचार ।

नोकरीस लाविले जकात नाक्यावर ।

प्रभु केवळ मामांच्या ईच्छेखातर ।

जकात वसुलती ॥१॥

 

येथेही प्रभु स्वच्छंदीपणे रहाटती ।

जकात वसूली वाटून टाकती ।

गरीब भिक्षुक फकिरांसी खैरातप्राप्ती ।

अनायसेच घडतसे ॥२॥

 

दिडकीची नाही जकात वसूली ।

मामांच्या कपाळी आठी आली ।

राजीनामा करूनी मामाच्या हवाली ।

नोकरी सोडली ॥३॥

 

नृसिंहतात्या लहान भाऊ प्रभुंचे ।

सहा वर्ष वय होता त्यांचे ।

माता करीतसे विचार मुंजीचे ।

धर्मशास्त्रानुसार ॥४॥

 

घरची परीस्थिती अत्यंत बेताची ।

होईल व्यवस्था कशी पैशाची ।

मुंज तर होणे गरजेची ।

चिंताक्रांत समस्तजन ॥५॥

 

पाहूनी बयम्मा मातेस चिंतीत ।

गणपतीसमोर बसती ध्यानस्त ।

सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत ।

प्रभु समाधीस्त ॥६॥

 

सायंकाळी कोणी एक वैश्यवाणी ।

व्यंकप्पा नामे आला कल्याणी ।

सत्य झाली माणिकप्रभुंची वाणी ।

पुत्रप्राप्ती म्हणोनि ॥७॥

 

आला आपला नवस फेडावया ।

धनधान्य वस्त्रालंकार चरणी अर्पाया ।

त्यानेच साधिले मूंजीचे कार्या ।

अती हर्षोल्हासाने ॥८॥

 

कर्ता करविता तो गजानन ।

तात्याचे करीतसे उपनयन ।

त्यासी वारंवार शरण ।

माणिकप्रभु जातसे ॥९॥

 

श्रीप्रभु बाललीला अत्यंत रसाळ ।

जैसे ऊसाच्या रसाचे गु-हाळ ।

श्रवण करीता माणिक वेल्हाळ ।

हृदयी विराजे ॥१०॥

॥श्रीमाणिकप्रभु चरणार्पणमस्तु ॥