काल आमच्या एका गुरुबंधूसोबत सुखसंवाद चालू असताना आमच्या गुरुबंधूनी एक शंका उपस्थित केली की, आपण जी काही सेवा करतो, ती महाराजांना अवगत होत असेल काय? ती त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल काय?

याच अनुषंगाने श्री माणिकप्रभु चरित्रातील टर्रा हुसैनखांची कथा आठवली. श्रीप्रभु दरबारी देशभरातील बहुतेक गुणी लोक येत असत. त्यातल्या त्यात नामांकित गवई लोकांचा भरणा फारच असे. श्रीप्रभु गायनप्रेमी असून, त्या शास्त्राचे मार्मिक दर्दी आहेत, अशी प्रभुंची सर्वत्र ख्याती झाली होती. राजेरजवाड्यांकडून बिदागी मिळाली, तरी गुणाची पारख स्वतः राजेलोकांना तितक्यापुरतीच असल्यामुळे, खरे गुण प्रदर्शन त्यांच्याजवळ होत नसते. गुणी लोकांना गुणज्ञाची आवड असल्यामुळे लांब लांबहून गवई माणिकनगरात येत असत. अशाच प्रख्यात गवयांपैकी हुसैनखां नावाचा एक गवई प्रभुंचा लौकिक ऐकून माणिकनगरी आला. तो बहुतेक संस्थानात फिरून मान्यता मिळवून आला होता. त्याला आपल्या विद्येची आणि कर्तबगारीची अत्यंत घमेंड होती. राजदरबारात बहुमान होऊनही बिदागी कितीही मिळाली, तरी त्याचे समाधान होण्यासारखे नव्हते. आपले कसब ओळखणारा कोणी सापडत नाही, याचे त्याला दुःख वाटत होते. एकदा राजदरबारात त्याचे गाणे चालले असता, स्वतः राजाने त्याला शाबासकी दिली. पण त्याचा त्याला राग आला. “महाराज, काय समजून मला आपण वाहवा दिली?” असा रोकडा सवाल करून त्याने लगेच आपले गाणे संपविले. गाढवापुढे गाण्याकरताच आपण गाणे शिकलो, याचे त्याला वाईट वाटून, त्याने यानंतर कोणापुढे गावयाचे नाही असा निश्चय केला. उत्तम गवई पण, अशा फकीरी बाण्याने अधिकच उन्मत्त होऊन, विद्येचा चहाता कोणी मिळतो काय, या शोधात फिरत असतात प्रभुंचा लौकिक समजल्यावर तो माणिकनगरांत येऊन राहिला. येथील दरबारात त्याला अनेक गवई भेटले. सर्वांची हजेरी प्रभुपढे होऊन, त्यांना बिदागीही मिळाली. पण रोज भत्ता खाऊन, हा कित्येक दिवस पडून राहिला तरी, त्याची हजेरी लागण्याचा योग आला नाही.

माणिकनगरी राहिल्यावर प्रभुंना गाणे समजते असे त्याला दिसून आले, पण खात्री झाली नाही. स्वतः प्रभुंपुढे गायन झाल्याशिवाय आपली विद्या प्रभुंना कशी कळावी आणि प्रभुंना तरी कितपत यात गम्य आहे, हे आपल्यास कसे समजावे? बरेच दिवस अशा विचारात गेल्यावर प्रभुंपुढे आपले गायन झाले पाहिजे, असे त्याला वाटून, तसा योग घडवून आणण्याच्या खटपटीस तो लागला. प्रभुंकडे आज्ञा मिळवण्यास त्याला फारच प्रयास पडले. शेवटी एकदाचा योग आला. त्याचे गायन सुरू झाले. त्याचे गायन चालले असता प्रभुंनी त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. प्रभु आपले गाणे ऐकत नाही हे पाहून, त्यांनी ते लक्षपूर्वक ऐकावे अशा हेतूने, त्याने त्या दिवशी पराकाष्ठा केली. चोहीकडे गवई लोक भरले होते. सर्वांनी “वाहवा” दिली, पण प्रभुंनी त्याच्याकडे पाहिलेही नाही. ते दुसऱ्याशी बोलण्याच्या नादात होते. आपले कसब दाखवून प्रभुंचे मन आकर्षून घ्यावे, याची त्याला उत्कंठा लागली. अशा प्रकारच्या मानसिक झटापटीत सापडल्यामुळे, तो एके ठिकाणी अगदीच घसरला. त्याच्या मनाला ती चूक समजली. इतक्यात प्रभूंनीही “वाहवा खांसाहेब!” असे म्हटले. अंतरीची खूण पटली! इतर गवई लोकांच्या लक्षात हे मर्म आले नाही. पण खरा दर्दी हा प्रभु आहे, अशी त्याची खात्री होऊन त्या दिवशी त्याने पराकाष्ठेची बहार केली. प्रभुही अत्यंत खूष झाले. गवयाच्या नेत्रांतून आनंदाश्रू वाहू लागले. हुसैनखां गायन संपवून प्रभुंपुढे दंडवत घालून म्हणाला, “महाराज, आज माझ्या विद्येचे व जन्माचे सार्थक झाले! माझ्या विद्येच्या मस्तीमुळे, मी तर्र झालो होतो. याकरिता मला टर्रा हुसैनखां हे नाव मिळाले आहे. येथे माझी मस्ती पार जिरून गेली. पण इत:पर आपल्या चरणाशिवाय, या जगात इतर कोठेही गावयाचे नाही असा माझा दृढ निश्चय झाला आहे.”

या कथेतील हुसैनखांची प्रभुंचे लक्ष आपल्या गायनसेवेकडे वेधून घेण्याची झटापट व त्यात त्याची एका ठिकाणी झालेली घसरण, अत्यंत बोधप्रद आणि मननीय आहे. प्रभुंचे आपल्याकडे लक्ष नाही, असे जरी हुसैनखांला वाटत होते तरी, त्याची मानसिक द्वंद्वातून उद्भवलेली गायनातली छोटीशी घसरणही सर्वज्ञ प्रभुंनी नेमकेपणाने पकडली. आपणही अनेकदा करत असलेल्या अनेक सेवा, मग त्या तनमनधनाच्या असोत, शब्दरूप असोत, गंधरूप असोत, स्वररुप असोत किंवा आणखीन कोणत्याही असोत, निरपेक्ष भावनेनी केलेली आपली सेवा श्रीप्रभु जाणून असतो. आपल्याला त्याचे प्रदर्शन करणे गरजेचे नसते किंवा त्यांच्यापर्यंत माझी सेवा पोचली काय? त्यांना मी केलेली सेवा कळली असेल काय? अशा प्रकारचा किंतु बाळगणे ही गरजेचे नसते. अशा मानसिक झटापटीमध्ये आपण सेवेमधला निखळ आनंद गमावून बसतो आणि आपले सर्व लक्ष त्यांच्याकडून अपेक्षित कौतुकावर, शाबासकीवर लागून राहते.

कोणतीही सेवा ही समर्पण भावनेनेच करावयाची असते आणि निष्काम भावनेने केलेली सेवा एकदा आपण प्रभुंच्या चरणी अर्पण केली की ती त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतेच. सर्वज्ञ श्रीप्रभु सर्व काही जाणून असतो, भेद मात्र आपल्या बुद्धीत असतो! भक्तकार्यकल्पद्रुम गुरुसार्वभौम श्रीमाणिकप्रभुंचा जयजयकार असो…

[social_warfare]