ज्ञानराज प्रभूंची ज्ञानगंगा

संतांचं स्वभाव इतकं उदार आणि दयाळू असतं, की समोर आलेल्याला ते कधीच रिकामा पठवत नसतात. त्यांच्या कडून आपल्याला काही न काही अवश्य मिळतं. मग तो भक्त असो, शिष्य असो, याचक असो, विद्यार्थी असो किंवा जिज्ञासू असो. श्री सद्गुरु ज्ञानराज माणिकप्रभू महाराजांच्या समोर अनेकांना ही प्रचीती आली आहे. समोरच्या व्यक्तीची योग्यता आणि गरज़ेला पाहूण यथायोग्यरीत्या त्याचा समाधान व्हावा असं काही तरी त्याला देण्याचा महाराजांचा कटाक्ष असतो. आज आपण बघतो की कित्येक लोक महाराजांजवळ येतात आणि त्यांचे अमूल्य मार्गदर्शन मिळवून आपल्या जीवनाला सार्थक करण्यासाठी प्रेरित होतात. शेवटी, सद्गुरूंचे मुख्य कार्य हेच होय. गेल्या १५० वर्षांची परंपरा या संप्रदायाला लाभलेली आहे. या परंपरेचे सर्व आचार्यांनी आपपल्या विशिष्ट पद्धतीने ज्ञानदानाचे कार्य अत्यंत समर्थपणे केलेले आहे, हे सर्व विदित आहे परंतू श्रीमद्भगवद्गीतेचा आधार घेत प्रवचनाच्या माध्यमातून आम्हा सर्वांना या भवसागरातून तारण्याचे श्रेय श्री ज्ञानराज प्रभूंनाच आहे. ‘ज्ञानगंगेत’ भिजून संतृप्त होण्याचा भाग्य आमच्या सारख्या सामान्य माणसाला मिळत आहे, हे आपल्या पूर्व सुकृताचेच फळ होय. विराट रुपाच्या दर्शनाने अर्जुनाला जसा बोध झाला तसेच महाराजांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळवून कायेने, वाणीने आणि मनाने आम्ही सुद्धा सन्मार्गाकडे प्रवृत्त होवोत, श्री ज्ञानराज प्रभूंच्या चरणी हीच प्रार्थना.

झाले चित्र हे परिपूर्ण

श्रीजी एकदा म्हणाले होते की ‘‘माणिकनगर तुझ्या मनात आहे. आपण जिथे आहोत, तिथेच माणिकनगर अनुभवता आले पाहिजे.’’ तेव्हा पासून असा प्रयत्न करण्याचे मनोमन ठरवले.

गेल्या १-२ वर्षांत श्री संस्थाना तर्फे अनेक सामाजिक माध्यमां द्वारे अनेक छायाचित्रे, ध्वनिफीती, चित्रफीती, ई. प्रसारित होत असतात. त्यामुळे माणिकनगरच्या प्रत्येक कार्यक्रमाची छोटीशी का होईना, एक झलक तरी आम्हां भक्तांना मिळत असते. ह्या मुळे माणिकनगरशी आपण सतत जोडलेलो आहोत, ही भावना मनात रूजली गेली आहे. आणि श्रीजींनी सांगितल्या प्रमाणे माणिकनगर अनुभवणे अधिक सहज झाले आहे.

तसेच ह्या प्रसारणांमुळे आम्हाला वारंवार श्रीगुरु दर्शन घडते हे आमचे भाग्यच! छायाचित्र किंवा चित्रफीती द्वारे होणारे श्रीजींचे दर्शन खूप सुखावह असते. दैनंदिन जीवनाच्या धकाधकीत थकलेल्या आमच्या मनाला ते नेहमीच प्रफुल्लित करते. आणि अनेक व्यावहारिक व्यापांमधे अडकुन राहिलेले आमचे मन सद्गुरु प्रति भक्तिभावाने भरून जाते.

काही दिवसांपूर्वी श्रीजींचे असेच एक मनोहर छायाचित्र फोन वर झळकले. अतिशय मनोरम असे वातावरण, संध्याकाळची – बहुधा सुर्यास्ताच्या आसपासची – वेळ, मागे दिसत असलेले प्रभु मंदिराचे शिखर… आणि ह्या सगळ्या नयनरम्य देखाव्यामधे शांत प्रसन्न अशी श्रीजींची छबी. अत्यंत सुखद असा हा गुरु दर्शनाचा अनुभव काव्यात गुंफण्याचा एक छोटासा प्रयत्न, जो श्रीजींच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सप्रेम भेट करते.

ज्ञानराज गुरुमूर्ति देखिली डोळा
झाला सुखाचा सोहळा
सुंदर मनोहर प्रभु माझा सावळा
झाला सुखाचा सोहळा

धोतर सदरा शुभ्र वस्त्र परिधान
दिसले लोभस हे ध्यान
प्रतीचि दिशी असे वळविली मान
दिसले लोभस हे ध्यान

सव्य पदावरी धरीले चरण ते वाम
शरीर-स्थितीत संयम
घडी घातली हाताची भक्कम
शरीर-स्थितीत संयम

सरळ नासिका भव्य कपाळ प्रदेश
प्रभु-छवि बिंबली हृद्देश
श्वेत दाढी अन् श्वेत तयाचे केश
प्रभु-छवि बिंबली हृद्देश

क्षितिजावरती दूर ठरलीसे दृष्टि
ज्योतित प्रभु-तेजाने सृष्टि
रंग-छटा बहु दाही दिशांना वेष्टि
ज्योतित प्रभु-तेजाने सृष्टि

मागे श्री प्रभु मंदिर कळस सुवर्ण
झाले चित्र हे परिपूर्ण
तो प्रभु, हा प्रभु एक सगुण-निर्गुण
झाले चित्र हे परिपूर्ण

भेट माझ्या माणिकाची

भाग सहावा

आज सकाळी श्रीप्रभुमंदिरातील काकड आरती आटोपून दुपारी परतीचा प्रवास म्हणून सामान आवरून घेतले. माणिक विहारच्या प्रवेशद्वारावर असलेल्या प्रकाशदादाच्या टपरीवर चहा घेतला. आज महबूब सुबहानी दर्गा, माणिक पब्लिक स्कूल व सिद्धराज क्रिकेट ग्राऊंडचा फेरफटका मारायचे ठरविले होते. नाश्ता करून प्रभु दर्शन घेतले. आज श्रीप्रभु एकदम नखशिखांत नटला होता, इतका की त्याच्या वर्णनासाठी शब्द अपुरे पडावेत. रोजचा साज कसा असावा ही प्रेरणाही बहुतेक त्याचीच असावी. वस्त्रांची सुरेख पण तितकीच मनमोहक रंगसंगती, फुलांची सुबक मांडणी, शिरपेचातील सुवर्णफुल, गळाभर रूळणारी माळ श्रीप्रभुसमाधीची शोभा अजूनच वाढवते. विशेष प्रसंगी विशेषतः राजोपचार पूजेच्या वेळी प्रभुसजावटीचा थाट काही औरच असतो. असो.

श्रीप्रभूंचे गुणगान करीत श्रीव्यंकम्मा मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दर्गा, शाळा व क्रिकेट ग्राऊंड प्रभुमंदिरापासून जवळच सातशे मीटरवर आहे. चालत निघालो, वाटेत एका मोटरसायकलवाल्याला विचारले, त्याने थेट मेहबुब सुबहानी दर्ग्यावर सोडले. माणिकनगराच्या उत्तरेला हा दर्गा आहे. श्रीमाणिकप्रभूंना त्यांचे मुसलमान भक्त महबूब सुबहानीचा अवतार मानीत. आपल्या समाधीनंतर हिंदू मुसलमानांमध्ये तंटा होऊ नये म्हणून श्रीमाणिकप्रभूंनी आपल्या डोक्यावरील मंदिल देऊन या ठिकाणी स्वतःचीच तुरबत उभारली. मुसलमान लोक स्वतःच्या धर्मपरंपरेनुसार येथे उपासना करतात. परिसरात छान चिंचेचे झाड आहे. माझ्या मनातील इतर धर्मांतील जरी काही अनादर असलाच तर तो दूर होऊन तो आदरामध्ये परावर्तीत होवो, अशी मनोमन प्रार्थना करून नतमस्तक झालो.

रस्ता ओलांडल्यावर दर्ग्याच्या विरुद्ध बाजूलाच माणिक पब्लिक स्कूल आहे. श्री सिद्धराज माणिकप्रभूंचे शिक्षण ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूलमध्ये झाले होते. असे दर्जेदार शिक्षण माणिकनगर परीसरातील मुलांनाही मिळावे म्हणून श्रीसिद्धराज माणिकप्रभूंनी १९७२ साली हे इंग्रजी माध्यमाचे माणिक पब्लिक स्कूल चालू केले. मुख्य प्रवेशद्वारावरून जाऊ का बरे असा विचार मनात आला. पण परवानगीशिवाय शाळेत आत जाणे योग्य वाटले नाही. म्हणून मोर्चा थेट पुढे क्रिकेट ग्राऊंडकडे वळवला. शाळा व क्रिकेट ग्राऊंड अगदी जवळ आहे. मुख्य रस्त्यातून डाव्या बाजूला वळण घेतानाच शाळेचे संगीत शिक्षक श्री अजयजी सुगावकर समोरच दिसले. त्यांनी हाक मारून बोलावले. आज शाळेत बहुतेक परिक्षा होती, त्यामुळे ते गडबडीत होते. पण त्याही परिस्थितीत त्यांनी अत्यंत आत्मीयतेने संगीताची खोली उघडून दाखवली. शाळा आपण पाहू शकता हे ही सांगीतले. शाळेच्या प्रांगणात आलो. समोरच श्रीमाणिकप्रभूंचा मनोवेधक पुतळा होता. १९७२ पासून ही शाळा १००% निकाल देत आली आहे. माणिकनगराबाहेरील श्रीमाणिकप्रभुभक्तांपेकी खूप जणांनी आपल्या मुलांना ह्या शाळेत शिक्षणासाठी ठेवले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुमंगला जागीरदार ह्या श्रीज्ञानराजप्रभु महाराजांच्या भगिनी आहेत. अत्यंत प्रेमळ, मनमिळावू स्वभावाच्या मॅडमशी माझ्या मागील दोन दिवसांत परीचय झाला. शाळेचा परिसर भव्य आहे. पुढील वेळीस सवड काढून शाळेला भेट द्यायचे ठरवून सिद्धराज क्रिकेट मैदानाकडे आलो. श्रीआनंदराज प्रभूंना क्रिकेटची फार आवड आहे. हे क्रिकेट ग्राऊंड जणू त्यांच्याच ध्यासाची स्वप्नपूर्ती आहे. हिरवेगार, गोलाकार असे मैदान पाहून मन हरखून जायला होते. येथे जिल्हास्तरीय सामने चालू होते. आताशा येथे घडलेले काही खेळाडू कर्नाटक राज्याकडून खेळताहेत. एकदोन षटकांचा खेळ पाहून परतीच्या वाटेवर लागलो. येताना पुन्हा एक मोटरसायकलवाला भेटला, त्याने प्रभुमंदिरापाशी सोडले. रूमवर जाऊन  पुन्हा स्नान केले व सामानाची बांधाबांध करून पुन्हा श्रीप्रभुमंदिरात आलो. थोड्या वेळाने निघायचं म्हणून आतून गलबलायला झालं. प्रयत्न करूनही हुंदके थांबत नव्हते, शेवटी बांध फुटलाच. हलके होईस्तोवर अश्रूंना वाट मोकळी करून दिली. करुणाकर, भक्तवत्सल प्रभू आपल्या प्रेमभरित नजरेने माझ्याकडे पाहत होता.

श्रीमाणिकनगरातून निघताना भक्त श्रीजींना सांगून निघतात. श्रीजीही त्यांना प्रसाद देतात. पुढच्या वेळेस येईपर्यंत हा प्रसाद जवळ ठेवायचा असतो. श्रीमाणिकनगरी पुन्हा आल्यावर हा प्रसाद खायचा अथवा खराब झाल्यास विसर्जीत करायचा. जणू काही पुढच्या भेटीस येईस्तोवर श्रीप्रभूने घेतलेली भक्ताची जबाबदारीच होय. मी श्रीजींना भेटावयास त्यांच्या घरी गेलो. माझी संध्याकाळी चारची गाडी होती. आदल्या दिवशी श्रीचैतन्यराज प्रभूंनी किती वाजता आणि कसे निघायचे ह्याचे मार्गदर्शन केले होतेच.

श्रीजी माध्यान्ह पुजेसाठी अजून यायचे होते. थोड्यावेळाने श्री आनंदराजप्रभूंच्या सौभाग्यवती सौ ममतावहिनी आल्या, मला पाहताच म्हणाल्या, आपण माणिकनगरांत पहिल्यांदा आलेले दिसताहेत. त्यांना नमस्कार करून माझी ओळख करून दिली. ह्या श्रीचिद्घनप्रभूंच्या मातोश्री, त्यामुळे ओळख करून देताना फारसे कष्ट पडले नाही. श्रीजी कुटुंबियांचे प्रभुभक्तांवर किती लक्ष असते हेही ह्यातून दिसते. श्रीजी येताच माध्यान्हपूजा सुरू झाली. नुकताच प्रभुमंदिरात अश्रूंचा बांध मोकळा झालेला तरी येथेही मनाची विचित्र परिस्थिती झाली होती. डोळ्यांच्या कडा सतत ओलावत होत्या. गेल्या चारपाच दिवसांत मी येथे खूपच रूळलो होतो,  किंवा श्रीप्रभुचरित्रातून ज्याप्रकारे श्रीमाणिकप्रभु व त्यांच्या नंतरचे आचार्य उमगले कदाचित हा त्याचाच परिपाक असावा, येथून आज निघावेसेच वाटत नव्हते. मनातील द्वंद्व घनघोर होत चालले होते. समोर श्रीजी शिवलिंगावर पाण्याची संततधार धरत होते आणी मी डोळ्यांतून. पूजा आटोपल्यावर मूकपणे प्रसाद घेतला. श्रीजींना आज निघतोय हे सांगतानाही स्वर कातर झालेला. एकदा का सदगुरू माया करू लागला की त्याच्या मायेतून सहज अलिप्त होणं कठिण असतं. दुपारचा प्रसाद घ्यायला गेलो खरा पण घशाखाली फार काही उतरलं नाही. आत भावनेचा प्रचंड कोलाहल माजलेला. हात, ताट धुवून परत प्रभुमंदिरात आलो. कर्पूर आरती केली. श्रीप्रभूंच्या अपार मायेबद्दल, निर्व्याज्य प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व दर्शनासाठी पुन्हा लवकर बोलवण्याची विनंती केली. गाभाऱ्यात लोभसपणे विराजमान झालेल्या प्रभुला पाहून साष्टांग नमस्कार केला. श्रीभक्तकार्यकल्पद्रुम महामंत्राचा जयघोष करत जड अंतःकरणाने परतीच्या मार्गाला लागलो. मनात उपदेशरत्नमालेतील ओळी घोळत होत्या. चैतन्य देवा हीच प्रार्थना। एकचि तूं दिससी नाना.

श्रीमाणिकप्रभूंच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या ह्या पवित्र भूमीत आपणांस वारंवार किंवा किमान एकदा तरी येण्याची प्रेरणा मिळो ह्या श्रीप्रभुचरणांच्या नम्र विनंतीसह, श्रीगुरू माणिक, जय गुरू माणिक….

समाप्त.

भेट माझ्या माणिकाची

भाग पाचवा

आज रविवार, श्रीप्रभुसन्निध्यातला चौथा दिवस. आजही अगदी पहाटेच जाग आली, अगदी पावणेपाचलाच. एरव्ही घरी असताना प्रपंचात गढलेला माणूस थोडासा आळसावलेला असतो, पण ज्या स्थानांत चैतन्याची कारंजी थुईथुई नाचत असतात तेथे मनाबरोबर शरीरही ताजेतवाने असते. बाहेर येऊन श्रीप्रभुमंदिराच्या कळसाला पाहून नमस्कार केला. तयार होऊन पुन्हा काकड आरतीसाठी श्रीप्रभुमंदिरात पोहोचलो. आज आसमंतात सूर्य वेगवेगळे रंग भरत होता. प्रदक्षिणा झाल्यावर समोर पाहिले तर सूर्य नुकताच उगवत होता. महाद्वाराच्या कमानीतून लोभसपणे डोकावत होता. श्रीप्रभुमंदिर परीसरातून वेगवेगळ्या जागेतून मी सूर्याला महाद्वाराच्या तीन कमानीपैकी मधल्या कमानीत ठेवून फोटो काढण्याचा निष्फळ प्रयत्न केला, कितीतरी वेळ. जागा बदलल्या, मोबाईलचे कोन बदलले पण व्यर्थ. कदाचित मधल्या कमानीची,मुख्य जागा कोटिसूर्यांचे तेज असलेल्या, श्रीमाणिकप्रभुंची आहे, हेच जणू तो मला सुचवत होता. आजही पारिजातकाची ओंजळभर फुले आणून प्रभुमंदिरात दिली, अभिषेक संकल्प केला. श्रीप्रभुमंदिर गाभाऱ्यातील समया साफसफाईसाठी बाहेर आणल्या होत्या. एका माणसाला उचलायला जड होतील इतक्या मोठ्या त्या समया होत्या. मला ह्यात पितळेची छोटी फुले ठेवलेली दिसली. ह्याफुलांत वात लावतात. समई लावल्यावर वातीतून खाली ओघळणारे तेल ह्याने टाळता येते. छोट्या छोट्या गोष्टींतून खूप काही शिकता येते. मला ही संकल्पना खूप आवडली.  आज श्रीप्रभूंचा साजही अत्यंत आकर्षक होता. लाल रंगाच्या वस्त्रांवर हिरव्या रंगाची सोनेरी नक्षीदार शाल श्रीप्रभूंची शोभा वाढवत होती. मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील श्रीदत्तप्रभूंचे तैलचित्रही फारच सुंदर आहे.

आज सिद्धराजप्रभु आराधना होती. नाश्त्याला वेळ होता म्हणून व्यंकम्मा मंदिरात जाऊन आलो. आईच्या सान्निध्यात आज जरा जास्तच रंगाळलो. श्रीव्यंकम्मा मंदिराचे बांधकाम स्तिमित करत होते. कमानीचे दगड अत्यत सफाईने तासून बसवले आहेत. एकंदर शांत व प्रशस्त जागा शहराच्या कोलाहलापासून मला शांत करत होती. काल परमयोगिनी श्री व्यंकम्मा मातेचे चरित्र विकत घेतले, ते चाळत बसलो. घड्याळात लक्ष गेले, बापरे साडे नऊ झालेले. लगेच श्रीप्रभुमंदिर परीसरात आलो. श्रीजीमहाराज घराच्या व्हरांड्यात बसले होते. तेथे जाऊन त्यांना नमस्कार केला. सकाळी आणी संध्याकाळी श्रीजी थोडावेळ नित्य व्हरांड्यात बसतात, भक्तांना सहज उपलब्ध असतात. श्रीजींचं हे साधेपण मनास खूप भावलं. आज श्रीजी मुंबईच्या श्री शिरीषदादांशी काही महत्वाच्या विषयांवर बोलत होते. मला त्यांनी त्यांच्या ऑफीसात बसण्यास सांगीतले. आजवर कधीतरी झूम मिटींगमध्ये पाहिलेले श्रीजींचे ऑफीस प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. आत श्री माणिकप्रभु इत्यादींच्या तसविरीबरोबरच श्रीसिद्धराज माणिकप्रभूंचे भव्य तैलचित्र मन वेधून घेत होते. मी आत माझं नामस्मरण चालू ठेवल. श्रीसिद्धराज प्रभूंच्या डोळ्यांतून माया पाझरत होती आणि तीच माया हळूहळू माझ्या डोळ्यांच्या कडा ओल्या करत होती. श्रीमाणिकप्रभु व त्यांच्या नंतरच्या प्रत्येक उत्तराधिकाऱ्यानी स्वतःच घर उन्हात बांधून इतर जनांस आश्रय दिला, सावली दिली. सिद्धराजप्रभूंचे कार्य व लीला आठवून गद्‌गद व्हायला होत होते. तासाभराने श्रीजी ऑफीसात आले. माझ्याकडे कटाक्ष टाकून पहिला प्रश्न केला, ‘प्रणिल, आपने कुछ खाया?’ नेमका आजच माझा नाश्ता चुकला होता. प्रामाणिकपणे नाही म्हणालो, तसे मला घरात घेऊन गेले. सूनबाईंना मला आधी नाश्ता देण्यास सांगीतले. लगेचच चिवडा, सुशिला (हा कर्नाटकात कुरमुऱ्यांचा पोह्यासारखा बनविलेला पदार्थ) पेढे असा पोटभर नाश्ता मिळाला. वर गरमागरम चहा. व्यक्ती देण्याघेण्याने नव्हे तर आपल्या वागणूकीने, आचरणाने व प्रेमळ शब्दांनी मनात घर करते. श्रीजी आणि त्यांच्या परीवारातील सदस्यांशी जुळलेल्या स्नेहबंधाचे, अनेक प्रभुभक्तांच्या श्रीसंस्थानाशी जुळलेल्या नाळचे नेमके  हेच मर्म आहे. पदोपदी प्रेम अनुभवायास मिळते. एकचि सर्वांतरी हो आत्मा… ह्या पदाची श्रीमाणिकनगरात जागोजागी प्रचिती येते. माध्यान्हकाळी श्रीप्रभूंना माधुकरी भिक्षेचा नैवेद्य दाखवला जातो. श्रीमाणिकप्रभु स्वतः माधुकरी मागून भिक्षान्न स्वीकारत होते, चरित्रात असा उल्लेख आहे. श्रीप्रभुसंस्थानाने आजही ती परंपरा जपली आहे. आजही श्रीप्रभुनैवेद्यात भोवताली पंचपक्वान्ने जरी असली तरी मध्यभागी झोळीतले भिक्षान्नच असते. दुपारच्या प्रसादामध्ये झोळीतले ही भिक्षा भक्तांना वाटली जाते.

आज सायंकाळी मुक्तिमंटपात श्रीसिद्धराजप्रभूंची आराधना होती. भजनाची आजही रेलचेल होती. श्रीप्रभुसंस्थानाचे तृतीय आचार्य श्रीमार्तंड माणिकप्रभु व चतुर्थ आचार्य श्रीशंकर माणिकप्रभूंचे एकत्र देवालय म्हणजे मुक्तिमंटप. शुभ्र संगमरवरी दगडांनी बांधलेला हा मुक्तिमंटप हा शिल्पकलेचा नितांत सुंदर नमुना आहे. श्रीसिद्धराज प्रभूंच्या दैदीप्यमान कारकिर्दीत हा मुक्तिमंटप १९७० साली बांधला गेला. श्रीमार्तंड माणिकप्रभु आणि श्री शंकरमाणिकप्रभु ह्यांच्या समाध्या दोन बाजूस आहेत आणि मधोमध चैतन्यलिंग महादेवाची स्थापना केली आहे. आराधनेचा कार्यक्रम ह्या मुक्तिमंटपातच पार पडला. आजही सर्वांना तीर्थ मिळाले. वेदांतातील अद्वैत सिद्धांताच्या तिर्थक्षेत्री, भजनानंदात न्हाऊन गेल्यावर, श्रीजींच्या हातून मिळालेले तीर्थ प्राशन करताना, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ‘धन्य धन्य अति धन्य धन्य, आम्ही झालो पूर्णानंद’ असाच भाव होता.

सायंकाळी श्रीप्रभु पश्चिम क्षितीजावर मुक्तहस्ते रंग उधळत होता. गर्द जांभळ्या, काळ्या रंगाची ही मनस्वी उधळण पाहताना अगदी हरखून जायला होत होते. आजही श्रीजींच्या घरी भोजनाचे निमंत्रण सर्व भक्तांना होते. भारतीय बैठकीत, केळीच्या पानंवर भारतीय पद्धतीच्या भोजनाची मजा औरच आहे. कालच्या प्रमाणेच साग्रसंगीत भोजन होते. जेवल्यानंतरही शुद्ध घरगूती तुपाचा वास व स्निग्धता हातावर रेंगाळत होती. आज मुंबईच्या आयुर्वेदिक डॉक्टर जोशींचा परीवार पक्तींस साथसोबत करत होता.

जेवल्यानंतर श्रीप्रभुमंदिरात भजन होते. श्रीप्रभुमंदिरात जांभळ्या सतरंजीवर लाल गालीचा अंथरला होता. श्रीजींच्या बैठकीसाठी  पिवळ्या रंगाची गादी तयार केली होती. मशालीच्या उजेडात, श्रीजींचे सवाद्य आगमन झाले. आरती, भजन सुरू झाले. आज मल्हारी म्हाळसाकांताचे भजन होते. जसजसा भजनाला रंग चढत होता, तसतसा वाद्यांचा गजर अधिक तीव्र होत होता. श्रीआनंदराज प्रभु आपल्या दैवीसुरांत सुरेल भजने म्हणत होते, श्री अजयजी ताना घेत होते. भजन टीपेस पोहोचल्यावर श्रीजीं हातात झांज घेऊन भजनरंगी रंगले. अवघा आनंद सोहळा. स्वर्गसुख येथे अनुभवता येते. ही वेळ संपूच नये असे वाटत होते. ह्या भजनकल्लोळाने श्रीप्रभुही आनंदला होता. सकाळी बांधलेली फुलांची पूजा रात्री उशीरापर्यंतही तशीच टवटवीत असते हे गेले चारही दिवस पाहिले होते. चैतन्याच्या सहवासात ती फुलेही टवटवीत राहत असावीत. कुरमुरे खोबऱ्याचा प्रसाद वाटला गेला, शेजारती झाली. श्रीप्रभुमंदिराची द्वारे बंद झाली. जो तो आपापल्या विश्रामस्थानी परतला. उद्या परत निघायचे म्हणून आज प्रभुमंदिर परिसरातच शरदाचं चांदणं पीत पायऱ्यांवर रेंगाळत बसलो. क्रमशः …

भेट माझ्या माणिकाची

भाग तिसरा

पहाटे साडेपाचला पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. वीस  मिनिटांत स्नानादी कर्मे उरकून काकड आरतीकरीता श्रीप्रभुमंदिरात जाण्यास निघालो. छान प्रसन्न वातावरण होते. रस्त्यावर एखाद दुसऱ्या माणसांची ये जा होत होती. मोरांचा केकारव कानी पडत होता. श्रीप्रभुसमाधीचे कवाड उघडायच्या आत मला पोहोचायचे होते. तीनचार मिनिटांतच महाद्वाराशी येऊन पोहोचलो. श्रीप्रभुमंदिराचा मुख्य दरवाजा बंद होता. थोड्यावेळाने तो उघडला. आत गेलो. ब्रह्मवृंद आणि सेवेकरी हजर होतेच, सुवासिनीही आरतीचे ताट घेऊन आलेल्या. गाभाऱ्याचा दरवाजा उघडल्यावर श्रीप्रभुचे मनोभावे दर्शन घेतले. समाधीवरची कालची वस्त्रे उतरवून आज नवीन सजावटीसाठी श्रीप्रभु तयार होत होता. आज सकाळीच प्रदक्षिणा घातल्या. जलाभिषेकाचे जल उत्तरेकडील गोमुखातून बाहेर पडत होते. मनसोक्त तीर्थ प्राशन केले. प्रदक्षिणा झाल्यावर मुख्य गाभाऱ्यात श्रीप्रभुसमोर बसलो. थोड्या वेळाने पारिजातकाची फुले गोळा करून आणली. मंद वासाची नाजुक फुले प्रभुपूजेला कामास आली. मल्हारी गुरूजींकडून अभिषेकाचा संकल्प केला.  आज शुक्रवार असल्याने श्रीप्रभुची बालाजीरूपात पूजा बांधली होती. श्रीप्रभुसमाधीस मोरपिसी रंगाचा वस्त्रसाज होता. त्यावर गर्द हिरव्या रंगाची आणी सोनेरी नक्षीची शाल पांघरली होती. शेवंती, निशीगंध, कागडा, गुलाबाच्या जाडजूड हारांमध्ये जणू श्रीप्रभुसमाधीस सुशोभित करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. आपल्या अवतारकाळात सर्वांना समान लेखणाऱ्या श्रीप्रभुने शेवटी प्रत्येकास आनंदाने धारण केले. समाधीवर आज शेंदऱ्या झेंडूंच्या फुलांची नयनरम्य आरास होती. वर तुळशीचा एक तुरा डौलाने मिरवत होता. दोन्ही बाजूला बालाजीचं प्रतिक म्हणून शंख आणी चक्र ठेवली होती. समाधीसमोर गदा मांडली होती. श्रीप्रभुसमाधीचं हे लोभस रूप कितीतरीवेळ डोळ्यांत साठवीत राहिलो. आज श्रीप्रभुवर छोटीशी कविता लिहून हा शब्दरूप नैवैद्यच श्रीप्रभुला अर्पण केला. नंतर तासभर जप केला.

श्रीप्रभु संस्थानाने श्रीमाणिकनगराच्या परीसरातील इतर दर्शनीय स्थळांची माहिती माणिक दर्शन ॲपवर सुंदर रीतीने साठवली आहे. श्रीप्रभुंची पदे, ग्रंथ, आरत्या, उपासना, श्रीगुरूपरंपरा, संस्थानाची माहिती, दिनदर्शिका वैगरे एका जागी आपल्याला ह्या ॲपवर मिळते. गुगल प्लेवर हे ॲप निःशुल्क उपलब्ध आहे. आज श्रीमाणिकप्रभुंची परमशिष्या योगिनी व्यंकम्मा मातेच्या मंदिरात जाण्याचे ठरविले होते.  समोर चहा घेऊन मी श्रीव्यंकम्मा मातेच्या मंदिरात पोहोचलो. श्रीप्रभुमंदिरापासून अवघ्या पाचशे मीटरवर हे मंदिर आहे. नुकत्याच साजऱ्या झालेल्या नवरात्रीची साक्ष आंब्याच्या सुकलेल्या पानांचे तोरण देत होते. मंदिरात नीरव शांतता होती. माझ्याव्यतिरिक्त मंदिरात कोणीही नव्हते. गाभाऱ्याचा दरवाजा बंद होता. पुजारी पूजा करून गेले होते. आईस प्रेमाने हाक मारली. मुख्य दरवाज्या वरील जाळीतून देवीमातेस पाहिले. देवी नवरात्रीत येथे लगबग असते. श्रीदत्तांची मधुमती शक्ति हीच श्रीव्यंकम्मा देवी मातेच्या रूपात प्रकटली अशी येथे मान्यता आहे. मंदिराचे दगडी बांधकाम आहे. भव्य कमानी मन वेधून घेत होत्या. मंदिर परीसरात श्रीव्यंकम्मा मातेचा इतिहास लिहला आहे. श्रीदेवी व्यंकम्माची थोडावेळ आराधना करून पुन्हा प्रभुमंदिरात आलो. निर्माणाधीन असलेल्या श्रीसिद्धराज प्रभुंच्या समाधीचे काम श्रीप्रभुकुटुंबियांसमवेत पाहिले.  दुपारी श्रीजींच्या घरी जाऊन माध्यान्ह पूजा याचि देही याची डोळा पाहिली. श्रीजींच्या पूजेत एक विशिष्ट शिस्त आणि एकसमानता आहे. तासाभराचा हा सोहळा पाहणं अत्यंत आनंददायी अनुभव आहे. दुपारच्या भोजनानंतर आज थोड कंपनीचं महत्वाचं काम उरकलं. संध्याकाळी श्रीजींच्या घरी पुन्हा गेलो. दुसिऱ्या दिवशी, शनिवारी, श्री सिद्धराज माणिकप्रभुंची पुण्यतिथी होती व रविवारी श्रीप्रभुआराधना होती ह्याची माहिती मिळाली. मला हे दोन्ही कार्यक्रम नवीन होते. विशेष काही न बोलता आज शांत बसून होतो. संस्थानाच्या कार्यासंबंधित सर्व उहापोह चालू होता. श्रीजींबरोबर भक्तांच्या भेटीगाठी चालू होत्या.  श्रीजींच्या सान्निध्यात बसून सकारात्मक उर्जेचा अनुभव करणे हे ही खूप आश्वासक आहे. आपल्या विद्वत्ताप्रचुर विवेचनांनी, आपल्या शब्दातीत काव्यरचनांनी श्रीप्रभुसंस्थानाचा गौरव जगभर पसरविणाऱ्या त्या “ज्ञानमूर्तीला” अनिमिष नेत्रांनी पाहत होतो, ती छबी हृदयांत साठवत होतो. भजन, भोजन पार पडले. आज बालाजीचे भजन झाले. श्रीप्रभुस निजविल्यावर पुन्हा प्रभुमंदिर परीसरातील चांदणे पीत पायऱ्यांवर रेंगाळलो. चंद्राच्या प्रकाशात महाद्वार अधिकच लोभस वाटत होते. आज श्रीप्रभुला सोडून जावेसेच वाटत नव्हते. श्रीप्रभुचरित्रातील कितीतरी प्रसंग डोळ्यासमोर तरळले व श्रीप्रभूंच्या आठवणीने मन अजूनच प्रफुल्लित झाले. क्रमशः …

भेट माझ्या माणिकाची

भाग दुसरा

श्रीप्रभुमंदिर परीसरात प्रदक्षिणा घातल्यावर मंडपात येऊन बसलो. मन अंतर्बाह्य शांततेचा अनुभव करत होतं. थोड्यावेळाने ब्रह्मवृंदाने श्रीप्रभुसमाधीस मंगलस्नान संपवून सजविले. इतके दिवस श्रीप्रभुसमाधी सजावटीचे फोटो पाहिले होते पण आज ते प्रत्यक्ष सजवताना पाहण्याचा योग आला. श्रीप्रभुसमाधीस आज हिरव्या रंगाच्या नक्षीदार वस्त्रांचा साज होता. वरून सुंदर नक्षीदार गर्द हिरवी, सोनेरी काठाची रेशमी शाल नेसवली होती. टपोऱ्या मण्यांची सोनसाखळी व समाधीवर माणिक रत्न लावलेले सुवर्णफूल श्रीप्रभुसमाधीचे रूप अधिकच खुलवत होते. शेवंतीच्या व कागड्याच्या फुलांच्या लांबलचक माळा श्रीप्रभुसमाधीवर कुरळ्या केसांप्रमाणे रूळत होत्या. वरून पडणाऱ्या सोनेरी विद्युत प्रकाशझोतामुळे श्रीप्रभु अधिकच लोभस वाटत होता. श्रीप्रभुसमाधीच्या मागील खिडकीखाली असलेल्या जागेतली दत्ताची गादीही मन मोहून टाकीत होती. श्रीसकलमत संप्रदायाच्या संकल्पनेनुसार, मान्यतेनुसार, प्रत्येकाने आपापले आराध्य त्या गादीवर स्थानापन्न झालेले पाहावे व त्याप्रमाणे प्रार्थना करावी. म्हणूनच त्या गादीवर कोणत्याही दैवताचा फोटो नाही. श्रीप्रभुमंदिरात रोज सायंकाळी भजन असते. सोमवारी शंकर, मंगळवारी देवी, बुधवारी विठ्ठल, गुरूवारी दत्तप्रभु, शुक्रवारी बालाजी, शनीवारी मारुती व रविवारी मल्हारी मार्तांडाची पदे म्हटली जातात. श्रीसकलमत संप्रदायाचे हे परमविशेषच म्हणावे लागेल.

श्रीमाणिक प्रभूंची लागलेली गोडी व आतापर्यंतचा प्रवास झरझर डोळ्यांसमोर तरळून गेला. श्रीमाणिकप्रभूंचा हा सदगुरू अवतार इतका गोड होता की त्याचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. श्रीप्रभूंनी माझ्यावर गेल्या दीडवर्षात केलेली माया आठवून वारंवार अश्रुधारा वाहत होत्या. सेवेकरी माझ्याकडे पाहत होते. मलाच थोडे अवघडल्यासारखे झाले म्हणून मुख्य दरवाज्याबाहेर आलो. उजव्या बाजूला पारिजात फुलांचा सडा पडला होता. एक सेवेकरी श्रीज्ञानराजप्रभु महाराजांच्या (श्रीजींच्या) घरच्या पुजेसाठी फुले गोळा करत होता. त्यास थोडी फुले गोळा करून दिली. मनाचा आवेग आता थोडा ओसरला होता.  महाद्वाराच्या बाहेर रस्त्याजवळ मुंबईचे आणखी एक प्रभुभक्त श्री अरुण वाटवे काका सपत्निक भेटले. थोड्या वेळाने चिद्घनप्रभूंचा संदेश आला की आपण घरी श्रीजींना भेटावयास येवू शकता.  वेदांताचा, ज्ञानाचा प्रसार हिरीरीने करणाऱ्या एका वैभवसंपन्न ज्ञानपीठाच्या विद्यमान पीठाधिशाशी, श्रीमाणिकप्रभु संस्थानाच्या सध्याच्या आणि एकंदरीत सहाव्या श्रीगुरूपीठाधिशाशी समोरासमोर भेट व्हायची होती. मनावर एकदम दडपण आल्यासारखे वाटले. पण माझ्या श्रीप्रभूंवरील लेखनाने मी त्यांच्या परीवारात बहुतेकांना अवगत होतो. घरी जायच्या आधी श्रीजींचे गोधन पाहाण्याचे सौभाग्य मिळाले. गायींची वासरे स्तनपान करण्यात मग्न होती. तेथला सेवेकरीही प्रेमळ होता. त्याने आनंदाने गायींची माहिती दिली. चारा कुठून आणायचा, चरायला कुठे न्यायचे पासून बरेच काही.  श्रीजीच्या घरी गेलो. घर कसले मोठा वाडा किंवा हवेलीच म्हणा. दर्शनी भागात सुंदर कमानी, जागोजागी श्रीप्रभूंचे मनोहर फोटो, ओट्यावर दिव्यांसाठी लागलेल्या काचेच्या हंड्या. रोज इतक्या माणसांचा राबता असतानाही पक्ष्यांनी आपली घरटी त्या काचेच्या हंड्यांत बांधली होती, हे विशेष. साफसूफ असलेल्या त्या वाड्यात मात्र ती पक्षांची घरटी तशीच ठेवली होती. सर्व रूपे हा श्रीप्रभु जाण ह्या वाक्याचीच ती जणू प्रचीती देत होती. दयाळू प्रभुच्या अंगणात ती मुक पाखरे निर्भयपणे संसार करीत होती. अंगणातल्या वेलीवर टपोरी कृष्णकमळे उमलली होती. गेटसमोरील वृक्षावर शेंदऱ्या रंगाची अमर्याद फुले उमलली होती. श्रीप्रभुच्या ऐश्वर्यात, सौंदर्यात जणू तीही आपपल्या परीने भर घालीत होती. थोड्या वेळाने श्रीचिद्घन प्रभु आले व त्यांनी मला नाश्ता करावयास घरात बोलावले. नम्रपणे मी नाही सांगीतले तरी त्यांनी चहाची पेशकश केलीच.

श्रीजींची वाट पाहत असतानाच श्रीआनंदराज प्रभु तेथे आले. कुठेतरी बाहेर जायच्या गडबडीत होते. तरीही नजरानजर होताच त्यांनी मला आपणहून समोरूनच ओळखले. त्यांनी माझ्या प्रेमळ कौतुकानंतर आस्थेने चौकशी केली व परत भेटीच्या आश्वासनानंतर झरझर निघून गेले. घराच्या ओटीवर बसूनच समोर दिसणारा श्रीप्रभुमंदिराचा कळस न्याहाळीत बसलो होतो. श्रीजींच्या घरी दुपारी माध्यान्हपूजा होते. भक्तांना समोर बसून ती पाहता येते. यथावकाश श्रीजींच्या घरातल्या हॉलमध्ये बसलो. पूजेची यथासांग तयारी झाली होती. श्रीजींच्या आगमनाची आता आतुरता होती. ह्या हॉलमध्ये आधीच्या सर्व पीठाधिशांची भव्य चित्रे लावली आहेत. पण श्रीमाणिकप्रभूंची छबी विशेष लक्ष वेधून घेत होती जणू प्रभु अगदी समोर बसल्यासारखी. ह्याच हॉलमधून श्रीजींनी केलेली कितीतरी प्रवचने युट्युबवर पाहिली,ऐकली होती. थोड्यावेळाने श्रीजींचे आगमन झाले. शुभ्र धोतर, उपरणे, सर्वांगी भस्म अन् कपाळावार कुंकवाचा ठसठशीत टिळा. लोभस, राजबिंडे रूप. अगदी आधी जसे पाहिले होते तेच साक्षात् अनुभवत होतो. श्रीजींची षोडषोपचार पूजा यथासांग पार पडत होती. येथेही हुंदक्यावर हुंदके येत होते. सगळाच मायेचा उमाळा. तासाभराच्या पूजेनंतर ज्यांना त्या दिवशी माणिकनगरांतून जायचे होते त्यांस श्रीजींनी प्रसाद दिला. मीही नमस्कार केला. श्रीजींनी प्रथम भोजन करून घ्या अशी प्रेमळ सुचना केली व संध्याकाळी साडेसहाला भेटीसाठी या म्हणून सांगीतले. त्वरीत सिद्धराज भवनमध्ये भोजनासाठी दाखल झालो. येथे नित्य अन्नदान चालते. भंडारखान्यातून जाताना श्रीप्रभूंच्या फोटोसमोर असलेल्या श्रीअन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला नमस्कार केला व तिच्या मायेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. श्रीप्रभुभक्तांमध्ये समोरच्याला जय गुरू माणिक म्हणून नंतर पुढचे संबोधन करावयाची छान आणि कानास तितकीच गोड वाटणारी पद्धत आहे. जय गुरू माणिक संबोधनाने समोरच्या प्रती स्नेह आपसुकच वृद्धिंगत होतो. अविट गोडीचा गरमागरम प्रसाद घेऊन तृप्त झालो. भोजनउपरांत पुन्हा प्रभुमंदिरात जाऊन श्रीप्रभुंचे दर्शन घेतले. येथे कुणालाही मज्जाव नाही, कितीही वेळ बसा कुणी आपल्याला उठवत नाही, भजन, गायन, जप करा, कशालाही हरकत नाही.

दुपारची वामकुक्षी घेऊन संध्याकाळी सहा वाजता पुन्हा श्रीप्रभु मंदिरात आलो.  श्रीप्रभुसमाधी डोळ्यात साठविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होतो. असीम, अमर्याद, अनंत गुरूतत्व ह्या चिमुकल्या डोळ्यांत मावणार ते कसे? श्रीप्रभुचे सौंदर्य न्याहाळताना मला माझाच विसर पडत होता. साडेसहाला श्रीजींच्या घरी गेलो. गोरज मुहूर्तावर अनेक भक्तांच्या इच्छा पुरविणारी ही कामधेनू, श्रीजी, एका खूर्चीत बसले होते. अंगावरील कुर्ता आणी सफेद धोतर श्रीजींच्या साधेपणाची साक्ष देत होता. शब्दांत जरब आणि खणखणीतपणा. पण समोरच्याप्रती तितकेच निर्व्याज्य प्रेम प्रत्येक शब्दांतून उद्धृत होत होते. श्रीजींना वाकून नमस्कार केला व एका बाजूला जाऊन बसलो. संस्थानाची माणसे दिवसाच्या घडामोडी सांगत होती, भक्त आपापले प्रश्न विचारत होते, कोणी घरी परत जायची आज्ञा मागत होते. माझा नंबर येताच त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. येथे कसे वाटले ही विशेष विचारणाही हृदयाचा ठाव घेणारी होती. श्रीजींच्या संपूर्ण कुटूंबाचे त्यांच्या घरी येणाऱ्या भक्तांवर अगदी बारीक लक्ष असते. त्यांची व्यवस्था नीट लागलीय ना, त्यांना दोन्ही वेळचे भोजन मिळतेय ना, काही हवे नको वैगरे अगदी जातीने विचारले जाते. इतक्या आस्थेवाईकपणे प्रत्येक भक्ताची विचारपूस करणारे संस्थान अथवा मंदिर आजतागायत पाहिले नाही. तासभर श्रीजींच्या सान्निध्यात बसल्यावर भजनासाठी प्रभुमंदिरात आलो. सेवेकरी गिरी, माणिकगुरूजी व आसपासचे बरेच प्रभुभक्त भजनास जमले होते. कितीतरी लहान मुले वाद्ये घेऊन भजनासाठी उपस्थित होते. नवीन पीढीची ही आवड मनोमन सुखावून गेली. भजन चालू असताना श्री वाटवे काकांनी मला भोजन करून येण्यास सांगीतले. अगदी दहा मिनीटांत प्रसाद घेऊन पुन्हा प्रभुमंदिरात आलो. आजवर युट्युबवर ऐकलेलं सप्ताह भजन प्रत्यक्षात श्रीप्रभुसभोर बसून म्हणत होतो. तासाभराने हा सुखसोहळा संपला. शेजारतीनंतर नऊ वाजता श्रीप्रभुमंदिर बंद झाले.

मुख्य दरवाज्याबाहेर येऊन पायरीवर बसलो. दोनच दिवसांपूर्वी पौर्णिमा होती, त्यामुळे चंद्र आपली जवळजवळ पूर्ण कलेने शीतलता प्रदान करत होता. रात्रीच्या वेळी परिसरातील बकुळ वृक्ष अधिकच हिरवेगार वाटत होते. श्रीप्रभुची माया व चंद्राची शीतलता अनुभवत, रात्रीचे चांदणे पाहत तासभर रेंगाळलो. सकाळी सहाच्या काकड आरतीला यायचे असे मनाशी ठरवून खोलीवर आलो. आदल्या रात्रीचे जागरण होते पण दिवसभर जराही थकवा जाणवला नाही, श्रीप्रभुचैतन्य निःसंशय ह्या क्षेत्रात पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे ह्याची ती साक्ष होती. गुरूवारची लाडकविता लिहून, श्रीप्रभुप्रती कृतज्ञता व्यक्त करून श्रीप्रभुप्रेमाची दुलई ओढून स्वतःस निद्रादेवीच्या स्वाधीन केले.