by Prachi Karnik | Jul 30, 2026 | Uncategorized

आभाळासारखे
सद्गुरू माझे
प्रेम तयांचे
आभाळमाया
तापत्रयांचा
जाच मज कैसा
अखंड असता
कृपेची छाया
वात्सल्य त्यांचे
सागरा इतुके
सोडता न ये
धरिता हृदया
दयेचे उदधी
पाहती भक्ति
अन्य नच काही
लागे अर्पाया
सेवा जरी पूर्वी
नसे मज घडली
तरी करुणानिधी
मज स्वीकारीया
गत पुण्ये सारी
फळासि आली
तेव्हा लाभली
ही आभाळमाया
by Prachi Karnik | May 1, 2026 | Uncategorized

हे प्रभुनगरी
तुज बरोबरी
नाते माझे
ऋणानुबंधाचे
प्रभु चरणांनी
झाली पावनी
लाल माती ती
लावी वाटे लल्लाटी
प्राणांत साठली
दिव्य जी झाली
तुझी स्पंदने
प्रभुच्या अस्तित्वाने
तुझ्या ओढीने
बहुत गोडीने
प्रभुसी मागते
भेट घडो सांगते
तू माझी पंढरी
तुझीच वारी
नित्य घडावी
आयु सार्थकी यावी
by Prachi Karnik | Apr 1, 2026 | Uncategorized
नामस्मरणाचे महत्त्व सांगताना महाराज नेहमी रामायणातील सेतु बांधण्याच्या प्रसंगी घडलेल्या दोन घटना सांगतात.
त्या घटनांवर एक कविता लिहिली आहे. श्रीजी त्या प्रसंगांविषयी जे जे वर्णन करतात ते शक्य तितके समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. ही कविता श्री रामनवमीच्या पूर्वसंध्येला श्रीजींच्या चरणी सादर अर्पण

जय श्री राम जय जय श्री राम
तीरावर जयघोष चालला
जयघोषे पाषाणां सहजचि
सागरात वानरे टाकला
विशाल ऐशा तरिल्या शिळा
नामप्रतापे सागरजलवर
पाहत होते राम दृश्य हे
दूर बसुन एका खडकावर
इतकी प्रचंड वानर सेना
एकजुटीने बांधीत सेतू
इवलीशी ती खार भाबडी
वाटा उचलित रामा हेतू
मनात आले श्री रामाच्या
हातभार थोडा लावावा
झटती सारे अपुल्या कार्या
आपणही भारा उचलावा
ठरवुनि ऐसे उठले राघव
आले निश्चये सेतु स्थानी
उचलति फेकति महासागरी
दगड एक दोन्ही हातांनी
गुडगुडगुडुंब दगड डुंबला
चकित जाहले सारे क्षणभर
प्रयत्न आणिक करण्या पुढती
चटकन सरसावले रघूवर
दुसरा, तिसरा, कितीतरी ते
दगड बुडाले राम करांतुन
हताश होऊन माघारी प्रभु
खडकावरती बसले जाऊन
काही कळेना काय करावे
कोडे हे कोणास पुसावे
बुद्धिमतांमध्ये वरिष्ठ ऐशा
हनुमंताला असेल ठावे
बोलावुनि त्यां कथिती राघव
घडला प्रसंग, पुसती कारण
वदले हनूम “दगड फेकतां
म्हटले का “जय श्री राम” आपण?”
नाही? मग कैसे हो तरावे
दगड रामनामाविण एकही
आणि प्रभु ज्यां तुम्ही सोडिले
बुडती निश्चिती ते जलडोही
पलीकडे लंका तीरावर
रावणसेना होय घाबरी
मायावी हे वानर दिसती
सेतू बांधती समुद्रावरी
धीर राखण्या निज सेनेचा
लंकापती तो रावण आला
महाकाय दगडा उचलुनिया
पाण्यावरती सहज तारिला
रावणांस निक्षून विचारी
मंदोदरी ती राजमहालां
हे तुमचे सामर्थ्यच नोहे
चमत्कार हा कसा घडविलां
रावण सांगे गुपित पत्निला
टाकित असता जळांत पत्थर
मनात मी चालविला होता
रामनाम जयघोष निरंतर
रामनाम जयघोष निरंतर
by Prachi Karnik | Apr 1, 2026 | Uncategorized

गुढी उभारु प्रभु नामाची
“माणिक जय गुरु माणिक” याची
शरीर अपुले वेळू काठी
लेपवू सत्त्व गुणांची ऊटी
साडी रेशमी बांधू भक्तिची
गुढी उभारु प्रभु नामाची
मन-कलशाला करू पालथे
श्रीगुरु वचन सुतांचे वेढे
माळ शर्करा मधु भावाची
गुढी उभारू प्रभु नामाची
श्रद्धा-सुमने गुंफूनी माला
ध्यान लावू लिंबड्याचा पाला
करुनि अशी शुद्धी चित्ताची
गुढी उभारू प्रभु नामाची
गुढी उभारू प्रभु नामाची
“श्री माणिक जय माणिक” याची
“हर माणिक आणि हरी माणिक”
हे नाम आमुच्या सुखा कारणिक
भव तरण्या नसे आम्हा आणिक
केवळ “चिन्माणिक सन्माणिक”
by Prachi Karnik | Mar 4, 2026 | Uncategorized

अमृताहूनि बहुत ही गोड
तव भजनाचे सूर अजोड
मधाळ, मधूर, किती मनोहर
असेच कानी पडो निरंतर
आधिच प्रभुचे रसाळ काव्य
तव स्वरे होई अधिकच दिव्य
अलौकिक प्रभुच्या उपदेशी
वाढवी गोडी भक्त मानसी
प्रभुसि आळविता तव वाणी
भक्त नेत्री ये भरून पाणी
उत्कट, आर्त, भावपूर्ण स्वर
करिती भक्त-हृद-भाव उजागर
कंठ तव घेता आलाप ताना
दशदिशांत संचरे चेतना
छेडित जव लयबद्ध तराणे
वाटे गंधर्वे लाजिरवाणे
“माणिक” नाम विलंबित करता
प्रभुसि तन्मय गायने स्मरता
आतुर प्रभु, तव ऐकाया स्वर
निश्चलता त्यजुनी ये तत्पर
ही किमया जे करिती प्रचूर
ते अजोड तव भजनाचे सूर
मधाळ, मधूर, किती मनोहर
असेच कानी पडो निरंतर
असेच कानी पडो निरंतर
Recent Comments