साहेब, चहा आला, ह्या आवाजाने आज सकाळी जाग आली. अत्यंत कर्तव्यतत्पर सेवेकरी, चहा आल्यावर यात्री निवासातील प्रत्येक खोलीत जाऊन रोज वर्दी द्यायचा. झटपट तोंड धुवून चहा प्यायला हजर झालो. आज आणखी काही प्रभुभक्त आपापल्या घरी रवाना होणार होते. सर्वांशी आपुलकीने गप्पा मारल्या. काल पारायण संपले होते आणि श्रीजींच्या वेदांत प्रवचनांचीही सांगता झाली होती. त्यामुळे आज सकाळी काय करावे? हा प्रश्न अनाहुतपणे मनात डोकावला. कालच्या प्रवचनाला थोडेफार ओवीबद्ध केलं आणि मन संगमावर धावू लागलं.
गुरुगंगा आणि विरजा नदीचा संगम. श्री माणिकनगरातलं एक अत्यंत शांत, मन प्रसन्न करणारं ठिकाण. माणिक नगरातील वास्तव्यात मी अनेक तास येथे घालवले आहेत. झटपट स्नान उरकून मी संगमावर आलो. आज अनेक प्रकारचे पक्षी येथे उपस्थित होते. कडूलिंबाच्या झाडावरला मोर, कडूलिंबाच्याच झाडावर दंगामस्ती करणारे अनेक हरेवा, उगाचच इकडून तिकडून उडणारे बुलबुल, गुरु गंगेच्या पात्रात विहीरणारी बदके, वडाच्या झाडावर अत्यंत सावधपणे बसलेले, आणि माझ्या थोड्या हालचालीने ही दुसरीकडे जाऊन बसणारे पांढरे घुबड, संगमाजवळील पाणथळीच्या जागेत असलेला खंड्या, पाण्यात डुबकी मारून मासे टिपण्यात व्यस्त असणाऱ्या टिटव्या, ह्या सर्वांना पाहताना तासभर कधी निघून गेला कळलेच नाही. श्री तात्यामहाराज आणि श्री दादामहाराज ह्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. पुष्करणी तीर्थातील पाण्यात वडाचं सुंदर प्रतिबिंब पडलं होतं. हे तीर्थ अत्यंत शोभिवंत असून येथे पाण्यामध्ये पाय सोडून येथील नीरव शांततेचा अनुभव घेणं अतिशय सुखद असतं. पक्ष्यांची किलबिल मनास मोहून टाकत असते, मंद वाहणाऱा वारा वडाच्या पानांशी खेळत असतो आणि त्या मस्तीतच एखादं पान अलगद हेलकावे खात पुष्करणी तीर्थात येऊन विसावतं. निसर्गाच्या प्रत्येक कृतीत आनंद ओतप्रोत भरलेला आहे पण तो अनुभवायला आपल्याकडे सवड मात्र हवी. संगमावरून थेट श्री व्यंकम्मामातेच्या मंदिरात गेलो. सकाळी नीरव शांतता होती. सद्गुरु श्रीमाणिक प्रभुंची व्यंकम्मा ही एक निस्सीम शिष्या. आपले संपूर्ण आयुष्य श्री माणिक प्रभुंच्या चरणी अर्पण करून ब्रह्मपदास पोहोचली. श्री प्रभुचरित्रातील श्रीव्यंकम्मा मातेचे अनेक प्रसंग डोळ्यासमोर तरळले. ह्या स्थानाला श्रीमाणिकनगरचे शक्तीपीठही म्हणतात. श्री दत्तात्रेयांची मधुमती शामला शक्ती म्हणजेच श्रीदेवी व्यंकम्मा… लेकराने जसे आपल्या आईच्या कुशीत घुटमळत राहावे तसे मंदिरात घुटमळलो. ह्या मंदिराचे बांधकाम ही अतिशय सुबक आहे. येथेही माझे मन छान रमते. श्री व्यंकम्मा मातेच्या मंदिरातून निघून बाजूला असलेल्या श्री मारुतीरायाला भेटलो. श्री प्रभुमंदिरात येऊन श्रीप्रभु समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आणि नागाई (श्रीजींचे निवासस्थान) येथे श्रीजींची नित्यपूजा पाहण्यासाठी आलो.
आज श्री समर्थ रामदास स्वामींचे ११वे वंशज श्री भूषणमहाराज श्रीप्रभु दर्शनार्थ श्रीमाणिकनगरी आले होते. ह्या निमित्ताने सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थानाचा, श्री माणिकप्रभु संस्थानाशी अशी असलेला स्नेहसंबंध अनुभवायास मिळाला. श्रीजींच्या नित्य पूजेनंतर आज श्रीनृसिंह निलय येथे सत्संग व उद्बोधनाचा कार्यक्रम होईल असे सांगितले गेले. नित्य पूजेचा तीर्थप्रसाद घेऊन श्री नृसिंह निलयमध्ये जाऊन बसलो. परंपरेप्रमाणे भक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात श्रीजींचे व्यासपीठावर आगमन झाले. श्रीजींचा नातू चि. प्रज्ञानराज ह्याच्या उपनयन संस्काराच्यावेळी काही कारणास्तव उपस्थित न राहता आल्यामुळे, त्याला आशीर्वाद देण्यासाठी श्री भूषण महाराज आज खास वेळ काढून श्री माणिकनगरला आले होते. श्रीजींनी त्यांचे अत्यंत स्नेहपूर्वक स्वागत केले. तसेच श्री भूषण महाराजांनीही आपला श्री प्रभुपरिवाराप्रती असलेला स्नेह भेटवस्तू वगैरे देऊन व्यक्त केला. त्यानंतर श्री भूषण महाराजांनी आपले मनोगत अगदी मोजक्या शब्दांत पण अत्यंत संयतपणे व्यक्त केले. श्री भूषण महाराजांना ऐकणे ही कानाला एक मेजवानीच होती. योगायोग असा की श्री भूषण महाराजांच्या मनोगताचे सार हे श्रीजींनी प्रवचन सप्ताहात केलेल्या विवेचनाचेच सार होते. दोन्ही तत्त्वांत एकवाक्यता होती. “सर्व रूपे हा श्री प्रभु जाण” ह्या उक्तीची प्रचीती वारंवार मिळत होती. श्रीजींनी सुरुवातीलाच सांगितले होते की, मी श्री भूषण महाराजांचे स्वागत करणार नाही, कारण श्री समर्थ रामदासांची पूर्वज हे बिदर येथीलच होते त्यामुळे माणिक नगर हे त्यांचेच घर आहे. ही नवीन माहिती श्रीजींकडून ऐकायला मिळाली. श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या पदांतूनही दासबोधाची शिकवण डोकावत राहते किंवा शनिवारच्या सप्ताह भजनामध्ये ही रामदास स्वामींचे पद ऐकायला मिळते. दोन संस्थानात मधील असलेले सामंजस्य आणि स्नेहभाव पाहून मन कृतार्थतेचा अनुभव करत होतं.
काल माणिक क्विझमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धक म्हणून नाव दिलं होतं. महाप्रसादानंतर माणिक क्वीझमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांना आवश्यक त्या सूचना देण्यासाठी जमण्यास सांगण्यात आले होते. महाप्रसादानंतर सर्व स्पर्धक श्रीजींच्या घरी जमले होते. सात जोड्या मिळून एकंदरीत १४ जणांनी स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेचे स्वरूप काय, स्पर्धेचे नियम काय? कोणकोणत्या टप्प्यात स्पर्धार्धा कशी पार पडेल? ह्याचे सर्व स्पष्टीकरण श्री चैतन्यराज प्रभुंनी केले. साडेसहा वाजता स्पर्धा सुरु होणार होती. तोवर तीन तासांमध्ये काय वाचू आणि काय नको असे झाले होते. आज रात्री ह्या वेदांचा सप्ताहाचे आकर्षण असणारी दिंडीही होती. श्री माणिकनगरच्या सर्वच मंदिरांमध्ये, मुक्तीमंटपात, गावात व श्रीजींच्या निवासस्थानी दिंडीची जय्यत तयारी चालली होती. संपूर्ण रात्रभर चालणाऱ्या ह्या दिंडी करता थोडा आराम करावा की स्पर्धेची तयारी करावी ह्या संभ्रमात असतानाच श्री प्रभु समर्थ म्हणून स्पर्धेच्या तयारीला लागलो.
माणिक क्विझ… आपण श्री माणिक प्रभु व त्यांच्यानंतरचे पीठाचार्य, तसेच श्री माणिकप्रभु संस्थान आणि त्यांचे उपक्रम, कार्य ह्याबाबत किती जाणतो, ह्याबद्दलची खेळाखेळातून साकारलेली प्रश्नमंजुषा. संध्याकाळी साडेसहा वाजता श्री प्रभुमंदिराच्या पटांगणात माणिक क्विझला सुरुवात झाली. समोरचे पटांगण प्रभुभक्तांनी अगदी फुलून गेले होते. रवि, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि अशा सात टीम्स यात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे पूर्ण सूत्रसंचालन श्री चैतन्यराज प्रभुंनी केले. पहिल्या फेरीमध्ये चार भाग होते आणि त्यातून मिळालेल्या गुणांच्या आधारावर पहिल्या चार जोड्या अंतिम फेरीत प्रवेश करणार होत्या. पहिल्या फेरीत श्री प्रभुचरित्रामधील बारकाव्यांबद्दल प्रश्न होते. आपण श्रीप्रभुचरित्र केवळ वाचतो की अगदी समरसून वाचतो? त्यावर मनन चिंतन करतो का? आपण त्याचे पारायण करतो का? आणि पारायण करून श्री प्रभु आपल्याला किती समजले? ह्याचा एक सुंदर परिपाठ श्री माणिक क्विझ घालून देते. त्यानंतर श्रीप्रभुपदे, पीठाचार्यांचे दौरे, श्री प्रभुमंदिर परिसरातील वेगवेगळ्या चिन्हांचे चित्र आणि व्हिडीओ दाखवून त्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. श्री प्रभु संस्थानाचे कार्य ह्याबाबतीत आपल्याला किती माहिती आहे? आपण श्री संस्थानाशी किती आत्मीयतेने जोडले गेले आहोत? याचीसुद्धा जाणीव ह्या क्विझच्या माध्यमातून आपल्याला होत असते. प्रश्नमंजुषेदरम्यान प्रेक्षकांनाही प्रश्न विचारले जायचे किंवा स्पर्धकांना न देता आलेले प्रश्न प्रेक्षकांना विचारले जायचे. बरोबर उत्तर देणार याला चॉकलेट बक्षीस मिळाले. दोन फेऱ्यांमध्ये श्री माणिकप्रभु संस्थानच्या पिठाच्यार्यांच्या लीला आणि त्यांचे सामाजिक कार्य यांचे माहितीपर लघुपट दाखवले जायचे. स्पर्धकांना प्रत्येक फेरीमध्ये उत्तरासाठी त्यांना दहा सेकंदाचा वेळ दिला जायचा. एखाद्या स्पर्धकाला जर त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही तर तो प्रश्न दुसऱ्या स्पर्धक आकडे अग्रेषित केला जायचा. त्याचे अधिकचे गुण त्या त्या जोडीला मिळायचे. पहिल्या फेरीअखेर आमची जोडी चौथ्या क्रमांकावर होती. अंतिम फेरीसाठी ही पहिल्या फेरी प्रमाणेच प्रश्न विचारण्यात आले.
अंतिम फेरीत गुणांनुसार आमच्या शुक्र जोडीला द्वितीय पारितोषिक मिळाले. पारितोषिकातली माझ्या वाट्याची रक्कम एक रुपया प्रसादरुपी घेऊन बाकीची अन्नदानासाठी देऊनही टाकली. ज्ञान आणि खेळाचा सुंदर संगम ह्या माणिक क्विझमध्ये पाहायला मिळतो. गुरुगंगा आणि विरजेचा संगम, श्री माणिक प्रभू संस्थान म्हणजे ज्ञान आणि भक्तीचा संगम, माणिक क्विज म्हणजे ज्ञान आणि खेळाचा संगम, श्री प्रभुचा आणि आपला संगम, मन आणि बुद्धीचा संगम, आपल्या मनातील द्वैत भावनेचा संगम होऊन, ऐक्य भावनेची नदी सकलमत संप्रदायाच्या अंगीकराने खळखळ वाहू लागते आणि सर्व रूपांमध्ये श्रीप्रभुच दिसू लागतो. श्री माणिकप्रभु संस्थानाने खेळांना नेहमीच प्राधान्य दिलेले आहे व आजही देत आहेत. श्री माणिकप्रभु संस्थानचे पीठाचार्य वेळोवेळी आपल्याला स्वतः खेळांमध्ये रमलेले दिसतात. समाजात, मानवांत खेळभावना आणि अंगी खिलाडूवृत्ती जोपासण्याचे महत्वाचे कार्य श्री संस्थांकडून अविरतपणे जपले जाते. ह्या माणिक क्विझच्या निमित्ताने आपण श्रीप्रभुला किती जाणतो आणि आपल्याला आणखी अध्ययनाची किती आवश्यकता आहे? याची जाणीव ह्या क्विझच्या माध्यमातून झाली. सुमारे तीन सव्वातीन तास हा खेळ रंगला. त्यानंतर श्रीजी यांच्या घरी भक्त कार्य झाले. भक्तकार्यानंतर कोल खेळला गेला. श्री माणिकनगरच्या आबालवृद्धांसहित सर्वच लोक (विवाहानंतर सासरी गेलेल्या मुलीसुद्धा) आजच्या, दिंडीच्या दिवशीच्या कोलसाठी आवर्जून हजर असतात. पूर्वी हा खेळ आनंदमंटपात खेळला जायचा, पण वाढत्या संख्येमुळे श्री प्रभुमंदिर पटांगणात खेळला जाऊ लागला. कोलनंतर गोप व फुगडी इ. सुद्धा असते. श्री माणिकनगरचे अनुभवी व वृद्ध लोकसुद्धा या दिवशी कोल खेळतात. या दिवसाच्या कोलध्ये एक वेगळाच जोश अनुभवायास मिळतो. कोलनंतर ‘नम: पार्वतीपतये’ च्या जयघोषात समाप्ती झाली. मन आनंद सागराच्या लहरींवर उचंबळत होते. आणि आता प्रतीक्षा होती ती, ज्याचे वर्णन “नाही स्वर्गी वैकुंठी हे सुख” असे केले आहे ती दिंडी, सदेही अनुभवण्याची…
क्रमशः…
[social_warfare]
Recent Comments