भोजनशाळेतून दिंडी आता नगरप्रदक्षिणेसाठी निघाली. भोजनशाळेच्या पश्चिम दरवाजातून दिंडी माणिकनगर गावातून फिरून श्रीव्यंकम्मामाता मंदिरापर्यंत जाते आणि तेथे अल्पविराम घेऊन पुन्हा मुक्ती मंडपात येते. भोजन शाळेतून बाहेर पडल्यावर लगेचच मंदिरांच्या पुजाऱ्यांची घरे लागतात. प्रत्येक घरासमोर छान रांगोळ्या काढल्या होत्या. घरांच्या मुख्य दरवाजासमोर एक एक पाट ठेवला होता. त्याच्याभोवती फुले, रांगोळ्यांची सुंदर सजावट होती. दिंडीच्या मार्गातल्या जवळजवळ प्रत्येक घरी हीच परंपरा जपली आहे. त्या त्या घरासमोर श्रीजी ह्या पाटावर उभे राहतात आणि घरातली सौभाग्यवती श्रीजींचं औक्षण करते. घरातली पुरुष मंडळी श्रीजींना पुष्पहार घालतात, श्रीजीवर कुरमुरे उधळतात. स्वागताची एक वेगळी अशी ही परंपरा माणिकनगरात अनुभवायला मिळते. घरातले इतर सदस्यही नंतर श्रीजींना वंदन करुन त्यांचा आशीर्वाद घेतात. श्रीजीसुद्धा आशीर्वादपर सर्वांवर बुक्का उधळतात. हा सर्व स्वागतसोहळा सुरू असताना पुढे वाद्यांच्या कल्लोळात प्रभुपदे म्हटली जातात. भोजनशाळेपासून श्री शिवपंचायतन मंदिरापर्यंत “किति जनांसी भ्रम हा झाला, मी ब्रह्म न कळे जीवाला” हे सुश्राव्य पद कानी पडत होतं. श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या पदांची झेप अवकाशाला गवसणी घालणारी आहे. आपण ही पदे बऱ्याच वेळा ऐकतो. पण एका विशिष्ट स्थळी, एका विशिष्ट काळी त्याची परिणामकता अधिकच जाणवते. पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर “अहं ब्रह्मास्मि” ह्या महावाक्याची अनुभूती करून देणारे हे पद ऐकणं अत्यंत रोमांचकारी होतं.
दिंडी आता श्री शिवपंचायतन मंदिरासमोर आली होती. माणिकनगरची स्थापना झाली तेव्हा, श्री माणिकप्रभुचे थोरले बंधू श्री हनुमंतदादा यांनी श्री शिव पंचायतन मंदिर बांधून घेतले. या मंदिरात मधोमध शिवलिंग असून चार कोपऱ्यांत गणपती, देवी, विष्णू आणि सूर्यनारायणाच्या सुंदर कोरीव मूर्ती स्थापित आहेत. श्री शिव पंचायतन मंदिरासमोर “जयदेव जयदेव जय पार्वतिरमणा, हर पार्वती रमणा” ही शंकराची आरती झाली. उपस्थितांनी श्रीजींना औक्षण केलं. येथेही श्रीजींवर कुरमुरे उधळले गेले. आशीर्वाद पर बुक्का प्रत्येकावर पडत होता. अवचितपणे अधून मधून तो माझ्याही अंगावर पडत होता. बुक्क्याच्या त्या मंद दरवळीने मन प्रसन्नतेचा अनुभव करत होतं. श्री शिव पंचायतन मंदिराच्या आवारातून बाहेर पडताना श्रीजींच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज झळाळत होते. त्यानंतर “गजवदन चित्प्रभू लीला” हे श्री मार्तंड माणिकप्रभुंच स्तिमित करणारं पद म्हटलं गेलं.
श्री शिवपंचायतन मंदिरापासून दिंडी आता बाजाराकडे निघाली होती. ह्या मधल्या अंतरात “ऐका तुम्ही संत अनाथाच्या बोला, तुम्ही अवतरला जगकल्याणा” हे पद म्हटलं गेलं. वाटेत लागणाऱ्या घरांमधले सर्वजण श्रींजींच्या स्वागतासाठी उत्सुक होते. पहाटे साडेतीन पावणेचारच्या सुमारासही अवघ माणिकनगर जागं होतं आणि त्या सार्यांना आशीर्वाद देण्यासाठी हा, श्री माणिक प्रभु गादीचा पीठाधीश रात्रभर माणिकनगरच्या गल्लीबोळातून फिरत होता. खरोखर ती रात्र मंतरलेली होती. रात्रीच्या मिट्ट काळोखला घरोघरी उजळलेले दिवे तीरोहित करत होते. श्रद्धा आणि भक्ती आज पूर्ण कलेने माणिकनगरामध्ये प्रकाशमान होती. बाजारामध्ये पोहोचताच “संत शिरोमणी खरा परंतु तें नाही बा तें नाहीं” हे पद म्हटलं गेलं. त्यानंतर दिंडी पुढे श्री विठोबामंदिरासमोर आली. येथे “गोपी निन्न कंदा बाल मुकुंदा” हे कानडी पद म्हटले गेले. येथे माणिक नगरातली बरीच कुटुंबे श्रीजींच्या स्वागतासाठी एकत्र आली होती. कुरमुरे, बुक्क्याची उधळण चालू होती. प्रसाद रुपी मिळालेले श्रीफळ गावकरी जवळच असलेल्या ध्वजस्तंभाच्या जवळ जाऊन फोडून प्रसाद म्हणून खात होते. इतक्या पहाटे लहान मुलेही तितक्याच उत्साहाने श्रीजींचा आशीर्वाद घेत होती. दिंडीचे आपल्या घरी येणं हा प्रत्येक माणिकनगरवासीयांसाठी आनंदोत्सव होता आणि घरातील प्रत्येक जण ह्या आनंद सोहळ्यात उस्फूर्तपणे सहभागी झाला होता. श्रीजी आणि गावकरी यांच्यातील असलेले स्नेहबंध ह्यावेळी अनुभवता आले. श्रीजी प्रत्येकाची आस्थेवाईकपणे विचारपूस करत होते.
दिंडी आता श्री मारुती मंदिरासमोर आली होती. एव्हाना पहाटेचे पाच वाजत होते. सुरांचा आणि वाद्यांचा कल्लोळ त्याच जल्लोषात त्याच उत्साहात सुरू होता. चैतन्याची ही अभूतपूर्व अनुभूती होती. येथेही माणिकनगरवासियांचा श्रीजींच्या स्वागतासाठी ओघ सुरुच होता. श्री मारुती रायासमोर “जय देव जय देव जय जय हनुमंता” ही आरती म्हटली गेली. त्यानंतर “प्रसवली माता तुज वायुसुता”, “गुज बोलवेना बाई, सुख सांगवेना बाई, स्फूर्ती आवरेना”, “आता जाई रे शरण जरी धरिसी चरण” ही पदे म्हटली गेली. पिंपळाच्या झाडाखाली पहाटेच्या नीरव शांततेत या पदांची गोडी प्रचंड जाणवली. वाद्यांच्या या कल्लोळात पिंपळही आपल्या पानांची सळसळ करून जणू ह्या दिंडीमध्ये आपणही सहभागी असल्याची जाणीव करून देत होता. श्री माणिक प्रभुंच्या काळापासून ह्या मारुती मंदिराचे महत्त्व आहे. श्री मारुती मंदिरापासून दिंडी आता श्री व्यंकम्मा मातेच्या मंदिरापाशी आली होती. हे अंतर जेमतेम दहावीस पावलांचे असेल. ह्या वाटेवर “स्फुरद्रुपी श्री जगदंबे, सच्चिदानंद प्रतिबिंबे” चा जयघोष झाला. दिंडी आता श्री व्यंकम्मा मातेच्या मंदिराच्या आवारात आली होती. आज श्री देवी व्यंकम्मा अष्टभुजा रूपात सजली होती. देवीच्या काठी हातात शस्त्रे होती. महाप्रसादाचे भोग देवीला अर्पण करण्यात आले होते. देवीसमोर अनेक ओट्या भरल्या होत्या. दिंडीतून आपली लेकरं आपल्याला भेटायला आलेली पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. श्री व्यंकम्मामातेचे मनोभावे दर्शन घेतले. अनेक स्त्रियांनी देवीची ओटी भरली. देवीच्या समोरील मंडपात, आजूबाजूच्या ओसरींमध्ये गायक आणि वादक, गावकरी आणि दिंडीतील सहभागी मंडळी अल्पविराम घेत होती. श्री व्यंकम्मा माता मंदिरात पंधरा-वीस मिनिटांसाठी अल्पविश्रांती घेतली जाते. दिंडी मधील सहभागी सर्व जणांना चहा चिवडा आणि उपमा दिला गेला. भजनांचा झरा मात्र देवी मंदिरात अखंड वाहत होता. मंदिराच्या ओसरीत थोडावेळ बसलो. पहाटेच्या गार वातावरणात गरमागरम चहा आणि उपमा मनाला तजेला देऊन गेला. पंधरा-वीस मिनिटांच्या अल्पविरामानंतर “येई येई ग चित्कमले, चिन्मधु उन्मनी बाले”, “व्यंका नाम जगज्जननी, कुलभूषण ही अवतरली हो” ही देवीची पदे म्हटली गेली.त्यानंतर “जयदेवी जयदेवी जय जय रेणुके”, “जयदेवी जयदेवी जय निर्विकल्पे” आणि “व्यंके तुज मंगल हो, माणिकश्री मंगल हो” ह्या देवीच्या आरत्या म्हटल्या गेल्या. श्री व्यंकम्मा मातेच्या मंदिरातून दिंडी आता प्रदक्षिणामार्गे महाद्वारापर्यंत निघाली होती. दिंडीच्या स्वागतासाठी सूर्यनारायणही सज्ज होत होता. पूर्व क्षितिजावर केशरी रंगाची छटा दिसू लागली होती. पहाटेच्या सहाच्या सुमारास पक्ष्यांची किलबिल आजूबाजूच्या झाडांवरून ऐकू येत होती.
श्री व्यंकम्मा मातेच्या मंदिराच्या बाहेर पडल्यावर उजव्या हाताला वळल्यावर प्रदक्षिणामार्गे महाद्वारापर्यंत जाताना “भासे एकचि हे दो अंग” हे पद म्हटलं गेलं. उगवत्या सूर्याबरोबर दिंडीच्या पुढे असणाऱ्या गावातील मुलांच्या अंगात जणू नवचैतन्यच संचारलं होतं. रात्रभर दिंडीतील भजनानंदाची लयलूट केल्यावरसुद्धा कोणत्याही प्रकारची ग्लानी कोणाच्याही चेहर्यावर दिसत नव्हती. दिंडीच्या सुरुवातीचा उत्साह प्रत्येकात अजूनही तसाच कायम होता किंबहुना तो अधिकच दुणावला होता. श्रीप्रभुच्या चैतन्याची ही वेगळीच मिसाल होती. हा अनुभव अत्यंत स्फूर्तिदायक होता. पुढे महाद्वारापासून जुन्या वाड्यापर्यंत चालताना “ब्रह्म मूल जग ब्रम्ह ब्रम्ह जग अहं ब्रम्ह मतवाला है” आणि “गुरु वचना कानी घेऊया, जगी अखंड मुक्ताची राहू” तसेच “ऐका विनवणी तुम्ही संतभूप” ही पदे म्हटली गेली. झांज आणि ढोलकीचा आवाज अगदी टिपेला पोहोचला होता. पूर्वी असलेल्या जुन्या वाड्याच्या उत्तरद्वारात “जय देव जय देव दत्ता अवधूता” श्री दत्तात्रेयांची आरती म्हटली गेली. सूर्यनारायण आता क्षितिजावर आपले अस्तित्व दाखवू लागला होता. त्याचं ते केशरी बिंब निळाशार आकाशामध्ये अधिकच मोहक वाटत होते. दिंडी आता श्री सिद्धराज प्रभुंच्या समाधीसमोर आली होती. येथे “देव जय देव जय सिद्ध राजा” श्री सिद्धराज प्रभुंची व तद्नंतर “जय देव जय देव जय गुरु मार्तंडा” ही मार्तंड माणिक प्रभुंची आरती म्हणून झाली. श्री सिद्धराज प्रभु समाधी आणि मुक्तिमंटप ह्यामधील मोकळ्या जागेत दिंडी मधले सहभागी सर्व जण आले होते. येथे श्री सिद्धराज माणिक प्रभु विरचित “प्रभु मजकडे कां ना पाही रे” हे पद म्हटलं गेलं. येथे भजनानंदात उस्फूर्त उड्या मारणाऱ्या प्रभुभक्तांचा जोश काही वेगळाच होता. घड्याळाचा काटा जसा पुढे सरकत होता, तशी दिंडीची ही नशा प्रत्येकास मदमस्त करत होती. त्यातच “येई चेतन सांबा मन हे आवरी, हृदयाकाशी उठती मी मी लहरी” हे मार्तंड माणिकप्रभुंचं अद्वितीय पद म्हटलं गेलं. ह्या पदाच्या शेवटी सकलमत प्रभु नांदे जिकडे तिकडे, अशी ओळ आहे. दिंडीमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक जण आता प्रभुमयच झालेला होता. मुक्तिमंटपासमोरील नवीन पायऱ्यांवरून उतरताना “मी पण गेल्या हा देह जावो वा चिर राहो” हे पद गायलं केलं. पुढे समोरील मातोश्री लक्ष्मीबाई उद्यानामध्ये “सुरत खूब अजब दरसायो, राजा चेतन हर घट अपनी” हे पद म्हटलं गेलं. एव्हाना सूर्य बराच वर आला होता. साधारण आठचा सुमार असावा. मंदिरात आलेले प्रभुभक्त श्रीजींचा आशीर्वाद घेण्यासाठी उद्यानात आले होते. श्रीजीही त्यांना अतिशय उत्साहात भेटत होते. नाना प्रकारच्या पुष्पमाळा श्रीजींना अर्पण केल्या जात होत्या. बुक्क्याची उधळणही अविरत सुरूच होती. सकाळच्या सुखद वातावरणात बुक्क्याचा तो सुगंध मनास अधिकच प्रसन्न करीत होता. माथ्यावर छत्र धरलेली श्रीजींची मूर्ती अतिशय लोभस वाटत होती आणि कित्येकदा अशाच प्रकारे नगरप्रदक्षिणेला निघालेले साईबाबा मला त्यांच्यात दिसत होते… बाबांची नगरप्रदक्षिणाही अशीच असावी, अशी अनुभूती मात्र मला दिंडीच्या निमित्ताने मिळत होती.
क्रमशः…
[social_warfare]
जय गुरु माणिक…
Jai guru manik Jai guru manik