आज पहाटे साडेपाचलाच जाग आली. जेमतेम पाच तासही झोप झाली नाही, पण तरीही मन प्रसन्नतेची अनुभूती करत होतं. आज पारायणाचा शेवटचा दिवस होता, श्रीजींच्या वेदांत सप्ताहातील प्रवचनाचाही शेवटचा दिवस होता. आज चहाच्या चर्चेदरम्यान जाणवले की, अनेक जणांना परतीचे वेध लागले होते. काहीजण आजच संध्याकाळी निघणार होते तर काहीजण उद्या सकाळी निघणार होते.‌ काही जणांचा बिदरला जायचा बेत ठरला होता. काहीजण दिंडीसाठीही थांबणार होते. गेल्या आठवड्याभरात अनेक प्रभुभक्तांशी जिव्हाळ्याचे नाते जोडले गेले होते. कोणीतरी चिवडा, चकल्या खायला बोलवत होते. काहीजण एकमेकांचे पत्ते, मोबाईल नंबर घेण्यात व्यस्त होते. पुढल्या वेळेस कुठे, कधी, कसे भेटावे? त्याचेही नियोजन चालू होते. आज मी सगळ्यांसाठी भरपूर वेळ दिला. स्नान उरकून माणिक विहारमध्ये नाश्ता उरकला आणि श्रीप्रभुमंदिराची वाट धरली. आज रस्त्यात साथीला वानरसेना होती.  निलगिरीच्या झाडांवर वटवाघळे विराम करत होती. गुरुगंगेच्या पात्रात अनेक बदके विहरत होती. टिटव्या पात्रातल्या झुडूपांमध्ये खाद्य शोधत होत्या. दूरवर आंब्याच्या झाडावर एक मोर बसला होता. एकंदरीत सृष्टीतला प्रत्येक जीव आपापल्या कामात व्यस्त होता. कालाग्नी रुद्र हनुमानाचे दर्शन घेऊन औदुंबराखाली पारायणासाठी पोहोचलो.

आज पारायणाला बसतानाच मन भरून आले होते. श्री राघवदास रामनामे विरचित श्री माणिक चरितामृत इतके रसाळ आणि गोड आहे की, चरित्रनायक श्री माणिकप्रभु कधी आपल्या हृदयाचा ठाव घेतात, ते आपल्यालाही कळत नाही. ह्या चरित्राच्या वाचनानंतरच मी श्री माणिकप्रभुंच्या अंतर्बाह्य प्रेमात पडलो.‌ श्री माणिकप्रभुंच्या लीलांचे वर्णन करताना ग्रंथकार आपल्याला केवळ त्या चमत्कारांमध्येच गुंतवून न ठेवता योग्य तो जीवन उपदेशही देतात. ह्या ग्रंथाच्या पारायणाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असे म्हटले आहे. त्यावर भाष्य करताना श्री ज्ञानराज माणिकप्रभु पोथीतील आपल्या प्रस्तावनेत म्हणतात की, मनोकामना पूर्ण होणे म्हणजे काय? मनोकामना पूर्ण करून घेण्यामागे मूळ उद्देश कोणता? मनांत कामनेचा उदय झाला म्हणजे चित्तचांचल्य होऊन एक प्रकारची उद्विग्नता निर्माण होते. मनोकामना पूर्ण झाल्यावर ती उद्विग्नता समाप्त होऊन, मन स्वस्थानी उपरम पावते. मनाचे स्वस्वरूपाशी तादात्म्य होताच, आनंदाची अनुभूती मिळते. आपल्याला असे वाटते की, इच्छित वस्तू मिळाल्यामुळे मला आनंद झाला, पण वस्तुस्थिती तशी नाही. कामनेचे शमन झाल्यामुळे आपणांस आनंद होत असतो, कामनेच्या पूर्तीमुळे नव्हे. कुठलीही कामना पूर्ण करण्यासाठी किती खटपटी लटपटी कराव्या लागतात हे सर्वांस विदित आहेच. म्हणून शहाण्यांनी कामना पूर्ण करण्याच्या भानगडीत न पडता, आपल्या सर्व कामनांचे शमन होऊन आपण निष्काम कसे होऊ याकडे लक्ष दिले पाहिजे.

श्री माणिक चरित्रामृत म्हणजे चैतन्याचा अखंड वाहणारा झरा किंवा थुई थुई उडणारे आनंदाचे कारंजेच. शिखाचे मुडूप, काशी यात्रेच्या ब्राह्मणाची कथा, फकीराचा लोभ तेलंगणाचा अय्या, बयाम्मामातेचा पोटशूळ अशा अनेक प्रभुलीला अनुभवताना श्रीप्रभुंच्या अवतार समाप्तीचे प्रकरण सुरू होते. दादा महाराज (थोरले बंधू), तात्या महाराज (कनिष्ठ बंधू), देवी बयाम्मा माता (श्री माणिक प्रभुंची आई) आणि देवी व्यंकम्मामाता (श्रीमाणिकप्रभुंची पट्टशिष्या) ह्यांचे निर्वाण अंतःकरण हेलावून टाकते. त्यानंतर श्री माणिकप्रभूंचे धीरोदत्तपणे संजीवन समाधी घेणे हे आपल्याला अंतर्बाह्य गलबलून टाकते. नकळत डोळ्यांतून येणारे अश्रू श्री माणिक चरितामृताची पाने भिजवून जातात. केवळ पारायण करताना आपली ही अवस्था होते, तर श्री माणिकप्रभु संजीवन समाधीच्या वेळेस भक्तांची काय अवस्था झाली असेल बरे? कल्पनेनेच अंगावर शहारा येतो. दत्तजयंती अगदी चार दिवसांवर असताना मोक्षदा एकादशीच्या दिवशीच श्रीप्रभु संजीवन समाधीत उतरले. श्रीप्रभुंचे जीवन समाधी प्रकरण ग्रंथकर्त्याने अत्यंत उत्कटतेने लिहिलेले आहे. ग्रंथ लिहिण्यापूर्वी ग्रंथकार श्री राम नामे हे श्रीप्रभु सांप्रदायिक नव्हते किंवा चरित्रलेखनापूर्वी ते कधी माणिक नगर असली आले नव्हते. सुरुवातीला श्री माणिक प्रभु कोण? कुठले? त्यांचे चरित्र काय? हे माहीत नसतानाही हा दिव्य ग्रंथ त्यांच्या लेखणीतून श्री प्रभू कृपेनेच लिहिला गेला ह्यापेक्षा आणखी मोठा चमत्कार काय असू शकतो? मला वाटते प्रत्येक दत्तभक्ताच्या संग्रही श्री माणिक चरितामृताची ही दिव्य पोथी अवश्य असावी. भावनेच्या लाटांवर स्वार होत असतानाच पारायणाची समाप्ती झाली. कोण्या एका भक्तांने अकरा रुपये आणखी एका भक्तांने एकविस रुपये दक्षिणा म्हणून पोथीवर ठेवले. आजही ते बत्तीस रुपये श्रीप्रभुचरित्रातच ठेवले आहेत. आजही चीकू, खडीसाखर आणि पेढे मिळाले. श्री प्रभुभक्त सद्भावनेने पोथीजवळ आणून ठेवतात. आजही तोच समाप्तीचा नैवेद्य म्हणून श्रीप्रभुला अर्पण केला. आरत्या म्हटल्या आणि हे महाचरित्र निर्विघ्नपणे सफळ संपूर्ण करून घेतल्याबद्दल प्रभुदयाघनाचे मनोमन आभार मानले. पारायण ठिकाणाची आवराआवर करून श्रीप्रभु मंदिरात दर्शनाला आलो.

मोरपिसी रंगाच्या नक्षीदार महावस्त्रावर नाजूक वेलबुट्टीची भगवी शाल आज श्रीप्रभुचे रूप अत्यंत खुलवत होती. तुळशीमाळा, बोरमाळा, वैजयंतीमाळा, मोहनमाळा, मोत्यांच्या माळा, नवरत्न माळा, रुद्राक्ष माळा,  सोन्याच्या माळा श्रीप्रभु गळाभर आनंदाने मिरवत होता.‌ निशिगंध आणि गुलाबाचा भरगच्च हार जणू हाती झारी घेऊन सुगंध शिंपडत होता. समाधीवरील जास्वंदीची फुले आणि पिवळ्या झेंडूच्या माळा आपल्या परीने त्या रंगसंगतीत अधिकच भर घालीत होत्या. प्रभु जात्याच सुंदर आणि प्रभुची सजावटही सुंदर…‌ ह्या नितांत सुंदर श्रीप्रभुदर्शनाने मन भरून आले आणि सहजच श्रीप्रभु चरणी लीन झालो. पुन्हा एकदा श्रीप्रभुचरणी कृतज्ञता व्यक्त करून, श्रीप्रभुसमाधीस प्रदक्षिणा घातल्या आणि यात्री निवासावर आलो. पारायणाचे व्यासपीठ, पोथी वगैरेची आवराआवर करून श्रीजींच्या घरी पूजेस आलो. श्रीजींच्या घरी नित्य पूजेचे तीर्थ घेऊन परत श्रीनृसिंह निलयमध्ये प्रवचनासाठी येऊन बसलो.

आज श्री मद्भगवद्गीतेच्या सतराव्या अध्यायाच्या समाप्तीचे प्रवचन होते. श्रीजींनी काल ॐ तत् सत् ची जुजबी ओळख करून दिल्यावर आज त्याच ॐ तत् सत् च्या व्यापक स्वरूपाला जाणण्यासाठी मन आतुर झाले होते. प्रथेप्रमाणे माध्यान्ह काळी भक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरामध्ये श्रीजींचे व्यासपीठावर आगमन झाले. आज श्रीजींनी २४ ते २८ ह्या पाच श्लोकांचा गूढार्थ समजावून दिला.

सुरुवातीलाच गीता म्हणजे गीत, गीता म्हणजे परमेश्वराने गायलेले गीत. गाण्यामध्ये मोठ्यात मोठ्या गोष्टीला कमीत कमी शब्दात बांधण्याची आणि ते हृदयात ठासवण्याची क्षमता आहे. श्रीमद्भगवत गीतेमध्ये माधुर्य आहे म्हणूनच ती हृदयात उतरते. गीतेमध्ये कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग सांगितला आहे. कर्मयोग आणि भक्तियोग समांतर आहे, असे समजतात. कर्मयोगाशिवाय भक्तीयोगाची पात्रता नाही आणि भक्तीयोगाच्या अनुष्ठानाशिवाय ज्ञानयोगाची प्राप्ती नाही. भक्तियोग साधकांस बांधून ठेवतो, प्रत्येकाने गीतेतून ज्ञानयोग  शिकायला हवा, ह्या ज्ञानयोगानेच मुक्ती प्राप्त होते.

श्रीजींनी पुढे ॐ चे व्यापक स्वरूप समजावताना ॐ म्हणजेच प्रणव, ॐ हेच सर्व मंत्रांचं आदिबीज आहे, चारही वेद हे ॐचेच अख्यान आहे. ॐ कालातीत आहे आणि परमात्माही ॐकारचआहे. जगत् म्हणजे ॐकार, परमात्मा म्हणजे ॐकार आणि म्हणूनच जगत् म्हणजेच परमात्मा. वेदांतातील ह्या संकल्पना जनसामान्यांना अधिकाधिक स्पष्ट व्हाव्यात म्हणून आई जशी आपल्या बाळाला हात धरून चालायला शिकवते, त्याचप्रमाणे श्रीजी सर्वांना आपल्या मधुर वाणीने, पुराण कथांमधील, व्यवहारातील अनेक गोष्टींचे दाखले देत, वेदांताच्या मार्गावर आपला हात धरून, आपल्या संकल्पना स्पष्ट करून, आपल्याला त्या मार्गावर प्रशस्त करतात. ॐला असलेल्या चार मात्रा, अ + उ ह्या गुणसंधीने झालेला ओ, अशी व्याकरणदृष्ट्या फोडही श्रीजी करून सांगतात. एका मुरलेल्या शिक्षकाचचं हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल. जगताचा अनुभव जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या अवस्थेतून जातो. तसेच अ हा नाभीतूध निघतो, ऊ हृदयातून निघतो आणि म हा जेव्हा दोन्ही ओठ बंद होतात तेव्हा उत्पन्न होतो.‌ ॐ उच्चारण्यावेळी आपल्याला जागृती (अ), स्वप्न (ऊ) आणि सुषुप्तीचा (मी) अनुभव येतो. ॐकार जपते वेळी दोन ॐकारा मधील जागेला (विरामाला) शांती म्हणतात आणि तीच परमात्म्याचे स्वरूप आहे. त्यात परमात्मा प्रकट होतो. तीच तुर्या अवस्था… श्रीजींच्या ज्ञानपूर्ण बाणांनी मनातील अज्ञान तीरोहित होत होते. हाच धागा पकडून श्रीजींनी कोल खेळाचे वर्णन केले. संध्याकाळच्या बालगोपाल क्रीडेमध्ये दोन गोपींबरोबर एक कृष्ण असतो. आणि हा कृष्ण म्हणजेच दोन ॐकारामधली असलेली शांती, ते मौन, तो परमात्मा, ती तुर्या अवस्था… तसेच ॐ हे त्रिमूर्तीचं प्रकटीकरण आहे. विष्णूचं प्रकटीकरण म्हणजे अ,  शिवाचं प्रकटीकरण म्हणजे उ आणि ब्रह्माचं प्रकटीकरण म्हणजे म. अर्थात् ॐ म्हणजेच श्री प्रभु दत्तात्रेय.

विषयाचे स्पष्टीकरण जनसामान्यात व्हावे आणि ते संपूर्णपणे व्हावे ह्याकडे श्रीजींचा पूर्ण कटाक्ष असतो. सर्वांना एका कागदावर वर्तुळ काढायला लावून त्यात आणखीन एक छोटे वर्तुळ काढायला सांगितले. छोटे वर्तुळ हे जगत आणि बाहेरच मोठं वर्तुळ हे परमात्मा. जग हे परमात्म्याचाच एक अंश आहे. परमात्मा अगदी व्यापक, विशाल, अनादी, अनंत आहे ही संकल्पना त्यांनी उपस्थित श्रोत्यांच्या मनावर कायमची बिंबवली. प्रवचनाच्या शेवटच्या टप्प्यावर गीतेचा प्रत्येक अध्याय हे कृष्णाचे उत्तम भाष्य कसे आहे हे समजावून सांगितले. श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला उपक्रम (start), नंतर सामंजस्य (connection) आणि शेवटी उपसंहार (conclusion) कसा आहे आणि श्रीकृष्णाला जगद्गुरु का म्हणतात हेही छानपणे समजावले. मोक्षाच्या प्राप्तीसाठी देहत्याग ही द्वैती लोकांची धारणा आहे, पण जिवंतपणीच मुक्तीचा अनुभव ज्याला “जीवनमुक्ती” म्हणतात ही सकलमत संप्रदायाची धारणा आहे, अद्वैती जनांचा सिद्धांत आहे. श्री माणिकप्रभुंनी सकलमत संप्रदायाची स्थापना करून आपण जीवन जगत असताना मोक्षाचा अनुभव प्राप्त करून देण्याची जडीबुटीच समस्त जगताला दिलेली आहे. जिवंतपणीच मुक्तीचा अनुभव हे सकलमत संप्रदायाचे हे परमविशेष आहे. श्रीजींचे आजचे प्रवचन संपूच नये असे प्रत्येकास वाटत होते. महाप्रसादाची वेळ झाली होती तरी उपस्थितांमध्ये थोडीही चुळबुळ जाणवली नाही. श्रीजींच्या प्रवचनानंतर उपस्थित जनसमुदायापैकी काहीजणांनी आपले मनोगत व्यक्त केले. मलाही संधी मिळाली, पण ते कधीतरी विस्ताराने लिहेन. पारायणासाठी जमलेल्या सर्व आस्तिक महाजनांना श्रीजींनी शाल आणि खारकांचा प्रसाद देऊन आशीर्वाद दिला.‌ श्रीजींच्या वेदांत सप्ताहातील सतराव्या अध्यायाच्या प्रवचनांचे व्हिडिओ आपल्याला Manik Prabhu ह्या YouTube चॅनेल वर पाहता येतील.

महाप्रसाद घेऊन यात्री निवासावर आलो. निघणाऱ्या सर्व भक्तांच्या गळाभेटी घेतल्या. गुरूमार्गावर जोडलेली नाती निखळ आनंद देऊन जातात. आज संध्याकाळी मुक्तीमंटपाच्या औदुंबराखाली लवकरच येऊन बसलो. श्रीजींचे प्रवचन आठवून ओवीबद्ध करण्याचा प्रयत्न केला. इतके दिवस अवकाळी पावसाचे वातावरण असल्यामुळे आकाश ढगाळ होते. पण आज आकाश अगदी स्वच्छ, निरभ्र होते. श्रीजींच्या प्रवचनामुळे जणूकाही आकाशातील अज्ञानरुपी मळभही दूर झाले होते. आज संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर विविध रंगांची उधळण पाहायला मिळत होती. श्रीप्रभु चैतन्याचा हा अविष्कर पाहणे ही एक नितांत सुंदर अनुभूती आहे. क्षितिजावरील रंगांच्या ह्या खेळाचा भरभरून आनंद औदुंबराखाली बसून लुटला. भक्तकार्यासाठी श्रीजी आज अतीव प्रसन्नतेने उपस्थित होते. बाहेरगावी जाणाऱ्या भक्तांसाठी खारकांचा प्रसाद दिला गेला.

भक्तकार्यानंतर श्रीप्रभुमंदिर पटांगणात बालगोपाल क्रीडेचा आनंद लुटण्यासाठी आलो. श्रीप्रभुमंदिर पटांगण भक्तजनांनी खचाखच भरले होते.‌ श्रीप्रभुपदांच्या आणि वाद्यांच्या तालावर प्रत्येकजण थिरकत होता. श्रीजींनी प्रवचनात सांगितल्याप्रमाणे दोन गोपींमधला कृष्ण आज प्रथमच कोलदरम्यान अनुभवला. बसल्याजागी  दोन ॐकारामधल्या शांतीतही तो अनुभवला. माझ्या ध्यानातला परमात्मा आणि माझ्यासमोर कोल खेळणारा दोन गोपींमधला परमात्मा एकच निखळ आनंद देत होता. सर्व रूपे श्रीप्रभु जाण… ही अद्वैताची अनुभूतीसुद्धा आज खेळादरम्यान अनुभवता आली आणि या दिव्य अनुभूतीमुळेच कोल खेळाचा आनंद आज अधिकच द्विगुणीत झाला.

संध्याकाळच्या महाप्रसादानंतर भजनासाठी श्रीप्रभु मंदिरात येऊन बसलो. आज शनिवार होता. आज जांभळ्या रंगाची गादी श्रीजींसाठी सजवून ठेवली होती. नेहमीप्रमाणे दिवट्यांच्या प्रकाशात, भक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात श्रीजींचे आगमन झाले. आज शनिवार असल्यामुळे भजनाआधी प्रथम आरती झाली. आरतीच्या वेळेस वाद्यांचा कल्लोळ रोम रोम पुलकित करत होता.‌ अवघा जनसमुदाय श्रीप्रभु रंगात रंगला होता. आरतीनंतर श्रीजी प्रवचनासाठी गादीवर स्थानापन्न झाले. आज प्रवचनासाठी “देई मला इतुके रघुराया, मती उपजो तुझिया गुण गाया…” हे माझे अत्यंत आवडीचे पद होते. श्री आनंदराज प्रभुंनी आपल्या दैवी स्वराने ह्या पदाची गोडी अजूनच द्विगुणित केली आहे. अत्यंत सरळ अर्थ असलेल्या पदाचा वेदांतातील गूढार्थ श्रीजींनी रामायणातील अनेक उदाहरणे देऊन समजावून सांगितला. तासाभराच्या प्रवचनानंतर नेहमीप्रमाणे तबला, पेटी, तंबोरा, सनई, यांच्याबरोबरच सुरांची देहभान हरपून टाकायला लावणारी जुगलबंदी अनुभवली. शनिवारच्या भजनामध्ये खूप पदे आहेत. दास्यभक्तीने ओतप्रोत भरलेली ही पदे मनाचा ठाव घेतात. भजनाच्या शेवटच्या टप्प्यावर “भज मना तू भज भज मना, वायुनंदना तू वानर रूपा…” हे पद जेव्हा म्हटलं गेलं, तेव्हा श्रीजींच्या हातातही झांज आले होते. ह्या भजनसंध्येची नशा काही वेगळीच असते, कदाचीत ती शब्दांत समर्पकपणे वर्णन करणे केवळ अशक्यच आहे, पण ज्यांनी ती नशा अनुभवलीय, तेच ह्याची गोडी जाणू शकतात. आजही भजनानंतर कुरमुरे खोबर्‍याचा प्रसाद वाटला गेला. रात्री भजन वाल्यांना श्रीजींनी शाल देऊन आशीर्वाद दिला. आज भजनाच्या वेळी गळ्यात वीणा अडकवलेला एक वारकरी अवचितपणे प्रकट होऊन एका हाती झेंडा व दुसर्‍या हाती चिपळ्या घेऊन श्रीप्रभु समाधीभोवती प्रदक्षिणा घालत होता. आणि शेवटच्या गजराच्या वेळी खूप वेळ घुमत होता. त्या नादब्रम्हामध्ये तो अगदी हरवून गेला होता. भजन रसाने त्या आत्म्याची पूर्ण तृप्ती होत होती. असो, श्रीजींच्या प्रस्थानाच्या वेळी “कमल वदनी हे अमृत भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा…” पदाच्या दिव्य लहरी एकापाठोपाठ एक आदळत होत्या‌, आणि साऱ्यांच्या नजरा कृतज्ञतेने घराकडे परतणार्‍या श्रीजीरुपी ज्ञानमार्तंडाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे खिळल्या होत्या.

क्रमशः…

[social_warfare]