दत्त तीर्थ धाम

दत्त तीर्थ धाम माणिक नगर
दैवताचे नाम माणिक प्रभू श्री

साक्षात चतुर्थ दत्त अवतार
कलयुगी भक्ता लाभले श्री दत्त

सकल मत एकची हे स्थान
सर्व धर्म भाव प्रभु चरणी लीन

प्रभु दरबारी येती साधू संत
साई स्वामी गोंदवलेकर हेची हो साक्ष

साधकासी मोक्ष संसारीस मार्ग
जगण्या आधार प्रभु सर्वा देत

चला चला माणिक नगरी प्रभु दर्शना
भक्त कार्या कल्पदृम भेटतील आम्हा

कान्हा म्हणे जना वंदा प्रभु चरणा
मोक्षासी पात्र होऊ चला आता

गुरु हाचि माय बाप

 

देह हा धारण
केला ज्या कारण
गुरु आता त्यास्तव केला पाहिजे

भगवंत प्राप्ती
हीच ती आसक्ती
होणे नसे शक्य गुरुवीण

गुरु हाचि माय बाप
गुरुच परब्रह्म
गुरु हे तत्व, व्यापले सर्वत्र

गुरूला नसे कोणते बंधन
देहा पलिकडले ते स्पंदनं
सेवेतून अनुभवावे परमानंदन

गुरुमुळेच पुढची वाट
मुमुक्षूस दिसे या जन्मात
धरिले एकदा का बोट गुरूंचे

ज्ञानियांचा राजा

वेदांताच्या असीम ज्ञानराशीतील प्रमेयांचे एक एक दालन उघडत असताना, श्रीजींचा परावलीचा, धीरगंभीर आवाजातील वंदे श्री प्रभु सद्गुरुं गुणनिधीं हा श्लोक कानावर आला की, एरवी इतस्ततः अखंड भूणभूण करत असलेला मनाच्या विचारांचा भुंगा, सद्गुरु चरणावर अलगद जाऊन विसावतो. भ्रमर जसा कमळाच्या मकरंदाने देहभान विसरून, कमळामध्ये रात्रभर बंदिस्त होऊन जातो, अगदी तसेच काहीसे श्रीजींचे प्रवचन ऐकताना होते. श्रीजी आपल्याला समजावून देत असलेल्या, स्वतःच्या विद्वत्ताप्रचूर संभाषणातून आपल्यासमोर ठेवत असलेल्या अद्वैत मकरंदाची गोडी ही अशीच अविट आहे.

ह्यावेळी ठाणे दौऱ्यातील प्रवचनांमध्ये पुन्हा एकदा श्रीजींनी श्रीमद्भगवद्गीतेचे सार उपस्थितांसमोर उलगडले. ह्या आधीच्या प्रवचनांमध्ये श्रीजींनी जरी हे विषय घेतले असले तरी, साधकाला अत्यावश्यक असणारी उजळणी ह्या प्रवचनाच्या निमित्ताने झाली. सद्गुरुंच्या मुखकमलांतून होणाऱ्या ह्या दिव्य वाणीच्या अमृतवर्षावात न्हाऊन निघताना होणाऱ्या उजळणीमुळे, तो तो विषय, जीवन जगण्यासाठी गरजेचे असलेले तत्वज्ञान, आपल्या मनावर चांगले ठसते. आणि जनसामान्यांच्या नित्याच्या व्यवहारातील उदाहरणांचा धागा पकडून, ते त्यांच्यासमोर सुलभतेने मांडण्याच्या श्रीजींच्या ठाई असलेल्या हातोटीमुळे, परिणामकही होते.

जीवनात ईश्वराची आवश्यकता का आहे? ईश्वराचे आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक स्वरूप, तो आपल्यातच आहे व तो कसा ओळखावा? जगावे आणि त्याचबरोबर मरावे कसे? कोणता आहार आणि कसा घ्यावा, इत्यादी प्रश्नांची उत्तरे शास्त्र आणि पुराणातील अनेक अनेक संदर्भ देऊन, श्रीजीं ह्या प्रवचन मालिकेच्या माध्यमातून जनमानसांवर सुसंस्कारच केले. मानवी जीवनाला समृद्ध करणारी, पण जनसामान्यांना माहीत नसलेली जीवन जगण्याची कलाच, जणू ह्या प्रवचन मालिकेच्या निमित्ताने श्रीजींनी समजावून सांगितली.

ही प्रवचने इतकी सरळ आणि सहज होती की, अगदी पाच-सहा वर्षाच्या मुलांनीही त्यात प्रत्येक दिवशी समरसून सहभाग घेतला आणि प्रवचनाच्या अनुषंगाने शेवटच्या दिवशी श्रीजींना प्रश्न विचारले. आणि अर्थातच श्रीजींनीही प्रसंगी बालक होऊन, त्यांचे सम्यक समाधान केले. यातच श्रीजींची प्रवचन समजावून सांगण्याची सहजता उद्धृत होते.

प्रकृती अस्वास्थ जरी असले तरी, समोर विराट जनसमुदाय असला की, श्रीजींना स्फुरण येते आणि चैतन्याचा हा अविष्कार आपल्याला त्यांच्या देहबोलीतून आणि अखंड पाझरणाऱ्या वाणीतून अनुभवता येतो. प्रवचनादरम्यान श्रीजींचे, त्या परमात्म्याशी असलेले तादात्म्य अनुभवता येते. प्रवचनानंतरही येणाऱ्या सर्व भाविकांना अत्यंत प्रसन्नतेने सामोरे जाणे, त्यांना हवा तसा अत्यंत आवश्यक असलेला, संपूर्ण आधार देणे आणि त्यातच आनंद मानणे हे सद्गुरूंच्या ठाई असलेले सद्गुणही ह्या प्रवचन मालिकेदरम्यान अनुभवता आले. अनेक सदभक्तांनी दिलेल्या दुर्मिळ प्रेमळ भेटवस्तूही सकलमत संप्रदायाचे तत्वज्ञान जनमानसांमध्ये रुजत असल्याचेच द्योतक होते.

संसाराच्या रहाटगाड्यांमध्ये अडकून पडलेल्या, विचार आणि विकारांच्या दावणीला बांधलेल्या आम्हा जनसामान्यांना सहजमुक्तीची वाट दाखविणाऱ्या, आमच्या मनावर तसे सुसंस्कार करून, आपल्या ज्ञानदानाने आमची झोळी भरभरून आम्हाला ज्ञानसंपन्न करणाऱ्या, आमच्या जीवनाची दशा बदलून त्याला सुयोग्य दिशा देणाऱ्या, ह्या ज्ञानियांच्या राजाप्रती कृतज्ञता आणि त्यांच्या परममंगल चरणी अनंत कोटी नमन!

श्रवणाची पर्वणी

सच्चिदानंद सद्गुरु श्री ज्ञानराज माणिक प्रभु यांची श्रीमद्भगवद्गीतेवरील चार प्रवचने ऐकण्याचे परम भाग्य मला लाभले. त्या श्रवणाच्या चिंतनातून ज्या विशेष विचारांची पकड माझ्या मनाने घेतली, त्यातील काही गोष्टी येथे उद्धृत करते. श्रीजींनी प्रथमतः हिंदूंचा धर्म हा सनातन आहे की ज्याला आदि नाही आणि अंत नाही, हे पटवून दिले. त्यामुळे माझा हिंदू धर्म कितीही आपत्ती आल्या, तरी नष्ट होणार नाही, असा ठाम विश्वास मनामध्ये ठसला.

श्रीजींची समजावून देण्याची पद्धती अप्रतिम आहे. श्रीमद्भगवद्गीतेचे आपल्या जीवनात महत्त्व काय, हे समजावून देताना, श्रीजींनी वॉशिंग मशीनचे उदाहरण देऊन सांगितले की, ते मशीन घेताना त्याच्याबरोबर एक मॅन्युअल येते. त्यात त्या मशीनची माहिती व ते व्यवस्थित रितीने कसे चालेल, याची माहिती दिलेली असते. तसेच या शरीररुपी यंत्राचे मॅन्युअल श्रीमद्भगवद्गीता आहे. शरीर ही भगवंताची करणी आहे, आणि गीता भगवंतांनी स्वतः सांगितलेली आहे.

जीवनात तरी ईश्वराची आवश्यकता का आहे? यावर भाष्य करताना पूज्य श्रीजींनी ईश्वराचे स्वरूप सच्चिदानंद सच्चिदानंद कसे आहे व त्याचे माणसांमध्ये कसे तादात्म्य असते, ते अगदी सोप्या भाषेत समजावले.

१. सत् – मी सदा सर्वदा असावे, ही प्रत्येक माणसाची इच्छा असते. हीच सत् (to be)ची इच्छा आणि सत् (अस्तित्व) हे ईश्वराचे स्वरूप आहे.

२. चित् – प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा (स्फुरण) आहे. ही जाणीव (संवित्) हे ईश्वराचे स्वरूप आहे.

३. सदा सर्वदा सुखी असावं, ही माणसाची इच्छा! ईश्वर हा सुखस्वरूप आहे.

इथे एक आश्वासन महाराजांनी दिले की, ज्यावेळी आपल्याला सुख होते, त्यावेळी तो ईश्वराचा साक्षात्कार समजावा. हे माणसाचे धैर्य, बल आणि उत्साह वाढवणारे महावाक्य आहे, असे मला वाटते.

तेव्हा ईश्वर आपल्यातच आहे, हे परमपूज्य श्रीजींनी निर्देशित केले. परमपूज्य श्रीजींनी ईश्वराची जीवनामधील गरज हा विषय एक वेगळ्या दृष्टिकोनातून समजावून दिला. ईश्वराचे रूप हे त्रिविध प्रकारचे (आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक) आहे. हा दृष्टिकोन माझ्यासाठी नवीनच होता. वरील त्रिविध प्रकार, त्रिविध तापांचे असतात हे माहीत होते. परंतु, ईश्वराचे स्वरूपही याच प्रकारचे आहे, हे विचारांना चालना देणारे ठरले.

१. वर सांगितल्याप्रमाणे सत् चित् आनंद हे त्याचे आध्यात्मिक स्वरूप आहे.

२. त्याचे आधिदैविक रूप विशद करताना, परमपूज्य श्रीजींनी गीतेच्या सातव्या अध्यायातील रसोऽहम् अप्सुकौंतेय या श्लोकावर भाष्य केले. पाण्याचे द्रवत्व, चंद्र सूर्यातील प्रभा, आकाशातील शब्द, पुरुषातील पुरुषत्व आणि स्त्री मधील स्त्रीत्व, ही सर्व माझीच रूपे आहेत. अग्निमधील उष्णता मी आहे आणि ती जर नसली तर अन्न कसे शिजेल? बुद्धिमतांची बुद्धी मी आहे. असे असल्याने, पुन्हा एकदा ईश्वर आपल्यातच आहे, हेच परमपूज्य श्रीजींनी सांगितले.

३. ईश्वराचे आधिभौतिक रुप – जसे जीवनात आधारासाठी सशक्त आणि सदैव मिळेल असा खांदा लागतो, जसे गंगेमधील साखळ्यांना धरून वाटेल तेवढ्या बुड्यात मारता येतात, साखळी सुटली तर वाहून जाण्याची भीती असते. तसेच जगामध्ये ईश्वराने सुव्यवस्था केली आहे. जसे वेळेवर सूर्योदय होणे, वेळेवर पाऊस येणे, आंब्याच्या झाडाला आंबाच लागणे, या सुव्यवस्थेचा नियंता ईश्वर आहे व सर्व जगत् ईश्वरांमध्येच ओवलेले आहे. जसे ‘सूत्रे मणिगणाइव’. इथे पुन्हा परमपूज्य श्रीजींनी, ईश्वर आपल्यातच आहे हेच दाखवून दिले आहे. म्हणूनच ईश्वराची नितांत गरज आहे, त्यासाठी सर्व संतांनी जे आवर्जून प्रतिपादिले तेच पूज्य श्रीजींनी सांगितले, भावाने नामस्मरण करावे.

परमपूज्य श्रीजींचे प्रवचन म्हणजे संतवचनांच्या श्रवणाची पर्वणीच होती. त्यातही परमपूज्य श्रीजींच्या विनोदबुद्धीमुळे तत्वज्ञानामधील कठीण प्रमेये हसत खेळत सामान्यांच्या गळी उतरविणे, ही किमया श्रीजीच करू जाणे. श्रीजींचे प्रवचन जागरूकतेने आणि प्रसन्नतेने सर्व श्रोत्यांनी अथपासून इती पर्यंत ऐकले परमपूज्य श्रीजींच्या पावन चरणी कोटी कोटी प्रणाम

पूर्ण गुरुकृपा फल हे

श्री माणिकप्रभु महाराजांचे भक्त असलेल्या आपण सर्वांनीच, आपल्या जीवनामध्ये कधी ना कधी श्रीप्रभुंच्या कृपेचा अनुभव घेतला असेलच. परंतु, आज मी जे काही आपणासमोर उलगडणार आहे, ती श्रीप्रभुची पूर्ण कृपा, भक्तावरील निर्व्याज प्रेम आणि मरणभयहारक शाश्वत संरक्षण कवचाची कथा आहे. माझी लहान चुलत बहीण, सौ. सुनिता खत्री आणि तीचे पती श्री. राज खत्री यांच्या जीवन संघर्षाची ही कथा, आपणा सर्वांचा श्रीप्रभुचरणी असलेला विश्वास अधिकच दृढ करेल, ह्यात तीळमात्रही शंका नाही. गेल्या वर्षभरात उभयतांना जे काही सोसावे लागले ते आपल्या कल्पनेपलीकडले आहे. एखाद्या सामान्य माणूस अशा विपरीत परिस्थितीत कोलमडून गेला असता. परंतु, श्री माणिकप्रभु महाराजांवरील अतीतर विश्वासामुळेच, ह्या दुर्धर प्रसंगावर मात करुन, फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा भरारी घेतली आहे.

सन २०२२च्या अखेरीस श्री. राज खत्री यांची तब्येत अचानक बिघडली. आधीच सडपातळ देहयष्टी असलेल्या श्री. राज यांचे २०२२च्या शेवटच्या दोन महिन्यांत वजन झपाट्याने कमी होत होते. त्यांना दर १५ दिवसांनी, उलट्यांचा प्रचंड त्रास होत होता. सुरुवातीला डॉक्टरांना अन्नातून विषबाधा झाली असल्याचा संशय आला आणि त्यानुसार त्यांच्यावर उपचार केले. उलट्यांच्या तिसऱ्या प्रकोपानंतर, डॉक्टरांनी श्री. राज यांना पोटाची आणि आतड्याची एन्डोस्कोपी करून घेण्याचा सल्ला दिला.

अशा परिस्थितीत, सौ. सुनीता खत्री आणि तिच्या भावंडांची प्रभुभक्ती कामी आली. कोणत्याही गंभीर वैद्यकीय प्रक्रियेसाठी जाण्यापूर्वी, आपल्या गुरूंना त्याबाबत कल्पना देण्याची त्यांची नेहमीची सवय होती. त्याप्रमाणे, सौ. सुनिताची मोठी बहीण, सौ. रेश्मा हिने श्री. ज्ञानराज माणिकप्रभु महाराजांना फोन करून एकंदर परिस्थितीची माहिती दिली. श्रीजींनीही त्यांना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे एंडोस्कोपी करून घेण्यास सांगितले आणि त्यांना श्रीप्रभुंचा प्रसाद पाठवला. श्री. राज खत्री यांनीही एन्डोस्कोपीसाठी आणि त्यानंतरच्या प्रत्येक चाचणीसाठी जाताना, हा प्रभुप्रसाद श्रद्धायुक्त विश्वासाने आपल्या बरोबर बाळगला.

एंडोस्कोपीच्या अहवालाने संपूर्ण कुटुंबाचा आनंदच जणू हिरावून घेतला गेला. श्री. खत्री यांना पोटाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यांनी लगेचच याबाबत श्रीजींनी पुन्हा संपर्क करताच, “ऑपरेशन करा लो” असे सहज उद्गार श्रीजींच्या मुखातून लागलीच बाहेर पडले. त्यानंतर अनेक घटनांची जणू मालिकाच सुरू झाली. त्यांनी सर्वप्रथम प्रख्यात कर्करोगतज्ज्ञ डॉ. अडवाणी यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबरच्या सल्लामसलतीमध्ये केमोथेरपी द्यायची की सर्जरी करायची हा कळीचा मुद्दा होता. श्रीजींचे शस्त्रक्रियेबाबतचे शब्द मनात घोळत असताना, श्री. खत्री शस्त्रक्रियेची मनोमन आशा बाळगून होते आणि अखेरीस डॉ. अडवाणी यांनीही शस्त्रक्रियेचीच शिफारस केली.

ही बातमी रेश्माने श्रीजींना सांगितल्यावर, त्यांनी तिला सांगितले की, “सुनीताला सांग काही काळजी करू नकोस, मी तिच्यासोबत आहे आणि तिच्यासाठी प्रार्थना करीन.” त्यांनी सौ. सुनिताला विश्वासाने श्रीप्रभुंच्या “भक्तकार्यकल्पद्रुम” ब्रीदावलीची एक माळ रोज जपायला सांगितली. त्यानंतर श्रीजींनी, “मी प्रसाद पाठवतो,” असे सांगितले. त्यावर रेश्माने श्रीजींना आपण प्रसाद आधीच पाठवल्याची आठवण करून दिली, तेव्हा श्रीजी म्हणाले, “तो प्रसाद प्राथमिक चाचणीसाठी होता, आताचा प्रसाद हा शस्त्रक्रियेसाठीचा आहे.”

श्री. राज खत्री हे सामान्यतः चिंताग्रस्त स्वभावाचे आहेत. जीवनामध्ये आजतागायत त्यांना कधी इस्पितळात दाखल करण्यात आले नव्हते आणि आता ते इतक्या मोठ्या शस्त्रक्रियेला प्रथमच सामोरे जात होते. परंतु, श्रीप्रभुंच्या कृपेने, शस्त्रक्रिया करणारे शल्यचिकित्सक, डॉ. कीर्ती भूषण, इतके विलक्षण होते की, त्यांनी लगेच श्री. खत्री यांना धीर दिला आणि काळजी करू नका, ते आता सुरक्षित हातात आहेत आणि आता ते जातीने त्यांना पाहणार आहेत, अशा आश्वासक शब्दांनी त्यांनी श्री. खत्रींचे समाधान केले. जवळ बाळगलेल्या, श्रीजींनी दिलेल्या प्रसादावरील विश्वासाने, श्री. राज यांना नवा आत्मविश्वास मिळाला होता आणि त्या पाठोपाठच्या डॉक्टरांच्या आश्वासक शब्दांनी त्यांना हायसे वाटले होते.

शल्यचिकित्सक, डॉ. कीर्ती भूषण यांनी कुटुंबाला माहिती दिली की, ही अडीच ते तीन तासांची शस्त्रक्रिया असेल, ज्यात श्री. खत्री यांच्या पोटातील गाठ काढली जाईल. पण जेव्हा शस्त्रक्रिया सुरू झाली, तेव्हा श्री. खत्री यांच्या पोटातील आतली बाजू पूर्णपणे खराब झाली असल्याचे पाहून डॉ. कीर्ती भूषण यांना खरोखरच धक्का बसला होता. शस्त्रक्रियेनंतर स्वत: डॉ. कीर्ती भूषण यांनी कबूल केले की, एक क्षण त्यांना काय करावे हेच कळत नव्हते. शस्त्रक्रियेआधी फक्त एक गाठ काढावी लागेल, असे त्यांनी गृहीत धरले होते. पण प्रत्यक्षात त्यांना आता पोटाचा एक मोठा भाग काढावा लागत होता. डॉ. कीर्ती भूषण म्हणाले की, त्यानंतर जणू देवानेच सर्व जबाबदारी घेतली आणि माझ्यामार्फत पुढचे ऑपरेशन करवून घेतले. जी शस्त्रक्रिया तीन तासात पार पाडायची अपेक्षा होती, ती पूर्ण व्हायला आता पाच तास लागले होते. अखेरीस, शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. घरच्यांनी जेव्हा श्रीजींना याबाबत माहिती दिली तेव्हा ते म्हणाले, “बहुत बडा संकट टल गया” (“खूप मोठे संकट टळले आहे”). सौ. सुनीता आणि तिचे पती श्री. राज यांचा श्रीप्रभुंवरील अतूट विश्वास आणि प्रभुंचेही त्यांच्यावरील प्रेम आणि आपल्या प्रिय भक्तांभोवतीच्या चैतन्यशक्तीमुळेच श्री. राज यांना मृत्यूच्या दाढेतून अक्षरशः ओढून आणले होते.

त्यानंतर श्री. खत्री यांना केमोथेरपीही देण्यात आली. केमोथेरपी घेतलेल्यांना त्याचे दुष्परिणाम माहित असतीलच. परंतु, पुन्हा एकदा, श्रीप्रभुकृपेने त्यांना केमोथेरपीचे कोणतेही सामान्य दुष्परिणाम जाणवले नाहीत. सुरुवातीला, त्यांच्या खाण्यावर परिणाम झाला होता, परंतु आज, शस्त्रक्रियेनंतर जवळजवळ एक वर्षानंतर, श्री. राज खत्री आपले सामान्य जीवन जगत आहेत. तीन महिन्यांपूर्वी, त्यांना कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अडवाणी यांनी श्री. राज आता कर्करोगमुक्त झाल्याचे सांगितले. हा एक अद्भुत चमत्कारच होता आणि श्री प्रभुच्या असीम कृपेने नुकत्याच पार पडलेल्या श्री दत्त जयंती सोहळ्यातही ते उत्साहाने सहभागी होऊ शकले.

एका कुटुंबाचा आपल्या गुरूवरचा पराकोटीचा विश्वास आणि श्रीगुरूंचा प्रसाद मिळाल्यावर, त्यांच्या स्वतःच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळेच, श्री. राज खत्री यांच्या नशीबात लिहिलेली दुष्टाक्षरे अखेरीस शुभाक्षरे झाली आणि त्यांना आपला देह श्रीप्रभुंच्या सेवेत अधिकाधिक झिजविण्यासाठी नवीन जीवनदान मिळाले.

श्रीप्रभुंची लीला अगाध आहे. भक्तकार्यकल्पद्रुम गुरुसार्वभौमाची आपल्या भक्तांवर मरणभयहर अशी कृपादृष्टी आहे. सदैव सर्वांचे मंगल चिंतीणाऱ्या, आपल्या कृपेचे संरक्षक कवच सदैव आपल्या भक्तांभोवती ठेवणाऱ्या आणि प्रत्यक्ष काळालाही परतवून लावणाऱ्या सकलमताचार्य श्री माणिकप्रभुंचा जयजयकार असो…

जय जय हो, सकलमता विजय हो !

श्रीप्रभु समाधीचा हार

“आम्हाला धरता येतं, पण सोडता येत नाही” आपल्या अवतारकाळात प्रत्यक्ष श्री माणिकप्रभु नेहमी म्हणत असलेल्या या अभयवचनाचा यथार्थ प्रत्यय मला व माझ्या सर्व कुटुंबाला अलिकडेच आला. परिवारासहित आम्ही सर्वजण दत्तजयंती उत्सवासाठी नाशिकहून माणिकनगर येथे आलो होतो. माणिकनगरी श्रीदत्त जयंती महोत्सवाचा मनसोक्त आनंद लुटून, शेवटच्या दिवशी श्रीप्रभु दरबारात श्रीजींच्या पवित्र करकमलांनी खारकांचा महाप्रसाद घेतला. त्यावेळी श्रीजींनी जानेवारीतील ठाणे येथे होणाऱ्या श्री माणिक ज्ञानयज्ञास उपस्थित राहण्यासंबंधी वचनही घेतले. दिनांक २८ डिसेंबरच्या पहाटे जवळपास चार वाजण्याच्या सुमारास प्रभुदर्शन व प्रसाद घेऊन कुटुंबासहित नाशिकला प्रस्थान ठेवले. आम्ही माणिकविहार भक्तनिवासातून बाहेर पडत असतानाच, आमचे नाशिकचे गुरुबंधू श्री. रमेश राघूजी यांच्याशी आमची भेट झाली. थोडे बोलणे होऊन त्यांचा निरोप घेतानाच, त्यांनी आम्हाला श्रीप्रभु समाधीवरील फुलांचा हार दिला. ते म्हणाले की, श्रीप्रभु समाधीचे दर्शन घेतल्यानंतर, त्यांना गुरुजींनी मोठा फुलांचा हार दिला आहे. फुलांचा हा हार मोठा असल्याने व त्यांच्याकडे स्वतःचे वाहन नसल्याचे कारण सांगून, त्यांनी तो प्रसादरुपी हार आम्हाला देऊन ते निघून गेले. श्रीप्रभु समाधीवरील फुलांचा हा हार खूप मोठा असल्याने, तो गाडीला पुढच्या बाजूने बाहेरून बांधूयात, अशा विचाराने मी तसा प्रयत्नही केला. पण इतका सुंदर हार बाहेरून खराब होईल म्हणून, श्रीप्रभु समाधीचा हार बाहेरुन न लावता, गाडीच्या आतील बाजूने काचेलगत डॅशबोर्डवर ठेवला व भक्तकार्यकल्पद्रुम ब्रीदावलीचा गजर करुन प्रवास सुरु केला. श्रीप्रभु समाधीवरील हार मिळाल्याचा आनंदात मन हरखून गेले होते. गाडीच्या चाकांप्रमाणेच, आजवर आमच्या कुटुंबावर श्रीप्रभु कृपावर्षावाच्या अनेक अनेक आठवणीही मनामध्येही गतीमान होत होत्या.

माणिकनगरवरुन उस्मानाबादला साडूंकडे सकाळी सात वाजता पोहोचलो. दुपारपर्यंत आराम करून, भोजन उरकून, दुपारी दोनच्या सुमारास पुढील प्रवास सुरु केला. बीड जाऊन, गेवराई गावाजवळ आल्यावर, आमच्या गाडीच्या पुढे मालवाहू गाडी चालली होती. त्या गाडीत बऱ्याच म्हशी होत्या. त्या गाडीमध्ये व आमच्या गाडीमध्ये सुरक्षित अंतरही होते. म्हणायला वाहनांची गतीही फारशी नव्हती. पण त्या गाडीच्या चालकाने अचानक रस्त्याच्या मधोमध गाडी असतांना ब्रेक दाबला व गाडी तिथल्या तिथे थांबवली. क्षणार्धात घडलेले हे इतके अनपेक्षित होते की, काही कळायच्या आतच माझी गाडी त्या समोरील गाडीवर जाऊन धडकली होती आणि धडाऽऽम् असा आवाज झाला. आपल्या गाडीचा अपघात झाला आहे, याची मला एव्हाना जाणीव झाली होती आणि क्षणभर थोडी भीती वाटली. माझ्या शेजारी माझी पत्नी, मागच्या सीटवर मुलगी बसली होती. मी पटकन गाडीमधून बाहेर आलो आणि बघतो तर गाडीचा पुढील बाजूने अक्षरशः चुराडा झाला होता. गाडीचे रेडीयेटर फुटले होते, बोनेटचा पत्रा पूर्णपणे गोळा झाला होता. तसेच गाडीच्या पुढील भागातील इंजिनच्या आजूबाजूचे बरेच भाग तुटलेले दिसत होते. एव्हाना पत्नी आणि मुलगीही बाहेर आली होती. मुलगी तर घडलेल्या पूर्ण प्रकाराबद्दल अनभिज्ञ होती. भेदरलेल्या आणि मनाच्या विषण्ण अवस्थेतही एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, अपघातामुळे गाडीचे जे नुकसान झाले आहे, ते फक्त तेथपर्यंतच होते, जेथपर्यंत श्री प्रभु समाधीवरील हार ठेवला होता. हाराच्या पाठीमागे गाडीला काहीही झाले नाही. गाडीची त्यावेळची स्थिती पहाता गाडीमध्ये बसलेल्या प्रवाशांना बराच मार लागला असावा, असे आजूबाजूला जमलेल्या लोकांना वाटत होते. पण प्रत्यक्षात श्रीप्रभुकृपेने आम्हाला कुणालाही अगदी खरचटलेसुद्धा नव्हते. मागील सीटवर बसलेल्या माझ्या मुलीला तर अपघात इतका मोठा झाला आहे, हे नीटसे कळलेही नव्हते.

सत्ता प्रभुची चाले मजवर, अघटित कैसे राहे पळभर…

वरील काव्यपंक्तीनुसार श्रीप्रभु महाराज सदैव आमच्या पाठीशी आहेत, याची प्रचिती पुन्हा एकदा आला होती. कदाचित हा प्रसंग आमच्या जीवावरही बेतला असता, पण श्रीप्रभुंचे आशीर्वाद आणि त्यांच्या कृपादृष्टीने आम्ही सर्व सुखरुप होतो. “श्रीप्रभु समाधीवरील मिळालेला तो हार म्हणजेच, श्रीप्रभुंनी काळासाठी आखलेली लक्ष्मणरेषाच होती,” असे अत्यंत कृतज्ञतेने येथे नमुद करावेसे वाटते.

अपघात झाल्यानंतर आजूबाजूला बरेच लोक जमा झाले होते, पोलीसही येऊन पुढील कार्यवाही करुन निघून गेले. मी, माझ्या पत्नी व मुलीबरोबर टोईंगच्या गाडीची वाट पाहत गाडीजवळच थांबलो होतो. त्याच वेळी एक वयस्कर बाबा तेथे आले आणि त्यांनी आम्हाला त्यावेळी अत्यंत आवश्यक असलेला, मानसिक धीर दिला. जणू काही कोणी वडीलधारी व्यक्तीच बोलत आहे असे वाटत होते. त्यांनी आपल्या झोपडीत येण्याचा आमच्याकडे आग्रह धरला. ते म्हणाले की, “मी मघापासून तुमच्याकडे बघत आहे. माझेकडे भाकरी आहे, ती तुम्ही सगळे जण मिळून खा. पण अशा आणीबाणीच्या परिस्थितीत खाणेपिणे काही आठवतच नाही. आम्ही त्यांना विनम्रतेने नाही म्हणालो. परंतु बाबांचा आग्रह जास्त पडला म्हणून, आम्ही शेवटी त्यांना चहा करण्यासाठी सांगितले. ते पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगत होते की, ” मी धनगर आहे, शाकाहारी आहे, माझी झोपडी लक्षात ठेवा.”

आजही ते वाक्य कानाभोवती रूंजी घालत आहे. मनाच्या भेदरलेल्या अवस्थेत भेटलेल्या बाबांचा किंवा त्यांच्या धीरोदात्त वाक्यांचा अर्थ त्यावेळी लक्षात आला नाही, पण आज सगळे स्थिरस्थावर झाल्यावर जाणवते आहे की श्रीप्रभु आपल्या भक्तांच्या सदैव कशाप्रकारे बरोबर असतात. ह्या सर्व प्रसंगातून सुखरुप वाचवल्याबद्दल मनोमन श्रीप्रभुप्रती कृतज्ञता व्यक्त करीत असतानाच, पत्नी देवघरात म्हणत असलेल्या श्रीसिद्धाराज प्रभुंच्या पंक्ती कानावर पडत होत्या…

“प्रभु जवळी असता असता,
मग चिंता मज का, मग भय मज का…”