दीवाना आपकु नही धुंडा ।।धृ।।
विद्या सीखी योग कमाया । भगवा सिर मुंडा ।।१।।
ग्यानी बन चित भोगकी आशा । साधु जग भोंडा ।।२।।
बंध मुगति नही, ब्रह्म तू साचा । क्यों रोता रंडा ।।३।।
आत्मभूमिबल मन फल फुली । शरीर जड कुंडा ।।४।।
त्यज विरोध मत, सकलमती हो । तब हो दिल थंडा ।।५।।
चिन्मार्तंड बचन जो भूला । खावे जम दंडा ।।६।।

‘बुडत हे जन देखवेना डोळा ।
म्हणोनि कळवळा येतो मज ।।’
असे अज्ञानी जनांना त्यांच्या जन्ममृत्यूच्या दृष्टचक्रातून सोडविण्यासाठी पोटतिडकीने कळवून सांगणारे संतच म्हणतात, ‘दीवाना आपकु नही धुंडा।।’ ‘अरे वेड्या, स्वतःला तू अजून ओळखलं नाहीस!’ परमपूज्य श्री मार्तंड माणिकप्रभु महाराज साधकाला माऊलीच्या मायेने समज देत आहेत.

महाराजश्री म्हणतात, ‘विद्या शिकला, शब्दज्ञान खूप मिळवलं, योगमार्गात प्रगती केली, संसाराचा त्याग करून, भगवे वस्त्र परिधान करून, मुंडण करून संन्यास दीक्षा घेतली, पण इतकं सगळं करून, तू स्वतःला ओळखलंस का?’ “दीवाना आपकु नही धुंडा।।”

पुढे महाराजश्री समजावत आहेत, ‘शास्त्रांचा अभ्यास करून खूप ज्ञान मिळवले, विद्वान झाला आणि तरी विषयांसंबंधी तुझी भोगवृत्ती तशीच राहिली, तर जगामध्ये तुझं हे साधुचं ढोंग होईल.’ कारण ज्ञानोबांनी सांगितलय, ‘वैराग्याविना ज्ञानासी तगणे नाही.” म्हणून प्रभुजी म्हणतात, ‘दीवाना आपकु नही धुंडा ।।’

पूज्य मच्छिंद्रनाथ, श्री गोरखनाथांना असाच उपदेश करतात. ते म्हणतात,
‘तो भी कच्चा बे कच्चा बे, नही गुरु का बच्चा ।।
वेदशास्त्रमें रहा न बाकी, पुरा ग्यान कमाया ।
शास्त्रविधीका मार्ग चलकर, तनका लकरा किया ।
तो भी कच्चा ।।१।।

कुंडलिनीको खुब चढावै, ब्रह्मरंध्रमें ले जावे ।
चलता है पानी के उपर, मुख बोले सो होवे ।
तो भी कच्चा ।।२।।

कहे मच्छिंदर सुन बे गोरख, तीनो उपर जाना ।
कृपा भयी जब सद्गुरुजीकी, आप आपको चीना ।
वही सच्चा बे सच्चा बे, वही गुरु का बच्चा ।।३।।’

साधक, ‘मी अज्ञानी आहे’, या अविद्येच्या बंधनातून सुटण्यासाठी उपासनेची जीवापाड धडपड करत आहे, ज्यायोगे मी मुक्त होईल. जन्म मरणाच्या बंधनातून मी कायमचा सुटेल, अशा विचाराने ज्ञान, भक्ती, कर्म, योग इत्यादी मार्गांचा अवलंब करीत मुक्तीसाठी प्रयत्नशील असतो. या मायेच्या बंधनाचे दुःख त्याला रडवत असते.

सद्गुरु अशा आर्त साधकाला समजावीत आहेत, ‘अरे, असा भित्र्यासारखा रडतोस काय? तुझ्या मूळ स्वरूपाला तू ओळखत नाहीस, म्हणून या बंध-मुक्तीच्या घोळात अडकला आहेस. ‘बंध मुगति नही, ब्रह्म तूं साचा ।।’ ब्रह्म हेच तुझे मूळ स्वरूप आहे.

महाराजश्री एवढेच सांगून थांबत नाहीत, तर स्वरूपाला शोधण्यासाठी काय आणि कसे करावे याचेही मार्गदर्शन करतात. ते सांगतात, ‘आत्मभूमिबल मन फल फुली । शरीर जड कुंडा ।।’
कुठलेही कार्य मनाच्या उपाधीशिवाय सिद्ध होत नाही. जसे संत तुकोबा म्हणतात,
‘मना करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।।’
मात्र मनाच्या या संकल्पाला आत्म्याचे अधिष्ठान हवे, तेव्हांच तर ते मन बाह्यविषयासक्तीपासून विरक्त होईल, वृत्ती अंतर्मुख होतील आणि आत्मस्वरूपापर्यंतची वाटचाल सुखकर होईल.

परमपूज्य प्रभुजींनी अतिशय मार्मिक शब्द इथे वापरले आहेत. ‘आत्मभूमिबल’ यान तीन गोष्टींचा उल्लेख इथे एवढ्यासाठी केला आहे की, एक तर ‘आत्मानुसंधान’ पाहिजे. दुसरे म्हणजे ‘वृत्तींचे दृढ अधिष्ठान म्हणून भूमी’. ती जशी स्थिर आणि अभेद्य असते, तशीच ती मनोवृत्तीही स्थिर हवी आणि तिसरे ‘बल.’ कारण स्वरूपज्ञानाचा प्रवास हा भवनदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असल्याने, तिथे उत्साह आणि बल दोन्ही गोष्टी अत्यावश्यक आहेत.

आत्मानुसंधान, स्थैर्य आणि बल या तीन गोष्टी जर मनाला जमल्या, तर ते मन स्वरूपसिद्धीच्या दिशेने प्रगती करू शकतं. प्रभुजींनी ‘मन फल फुली’ हा शब्दप्रयोग एवढ्यासाठी केला असावा की, झाडाला फुले फळे लागणे, हे त्याच्या पूर्णत्वाच्या आनंदाचे लक्षण आहे आणि मनुष्य देहामध्ये हा प्रवास फक्त मनच करू शकतं. एरवी शरीर जडच आहे. म्हणून तर संत दासगणू महाराज म्हणतात,
‘मना रे तुजपाशी रे तुजपाशी ।
ने मज वैकुंठासी ।।’

महाराजश्री अत्यंत कनवाळूपणे सांगतात, ‘अरे, तू सकलमती हो!’ म्हणजेच सकलमताचार्य सद्गुरूंना शरण जा! त्यांच्या बोधाविरुद्ध कुणी काही सांगत असेल, तर त्याचा त्याग कर. तरच तुझी अंतरीची तळमळ शांत होईल.

मात्र सद्गुरु मार्तंडप्रभुजी साधकाला एक सावधगिरीचा इशाराही देतात. ‘चिन्मार्तांड वचन जो भूला । खावे जम दंडा ।।

सद्गुरूंचा साधकाला बोध हाच असतो की, ‘तत्वमसि!,’ ‘अरे ब्रह्म तूं साचा।’ हा बोध पूर्ण श्रद्धेने अंतःकरणात रुजला की,
‘सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध: ।
चिदानंद रूपः शिवोऽमं शिवोऽम्।’
हे त्याच्या प्रत्ययाला येतं. ‘अहं ब्रह्मास्मि!’ या स्वरूपाचे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ उठतात.

मात्र सद्गुरु वाचनाकडे दुर्लक्ष केलंस किंवा ते विसरलास तर मात्र यमाचा दंडा खावा लागतो. ‘पुनरपी जननं, पुनरपि मरणं’ या चक्रात अगदी अगतिकपणे फिरत राहावं लागतं. म्हणून, ‘दीवाना आपकु नही धुंडा ।।’ वेड्या आपला शोध घे, स्वस्वरूपाचा शोध घे!

सद्गुरु माऊली साधकाला ‘वेड्या’ म्हणतेय खरी, पण हे ‘मातेच्या कोपी थोकले । स्नेह आथी।। (ज्ञानेश्वरी) असे आहे. महाराजश्रींच्या या काव्यात मातेच्या वात्सल्याचे मार्दव आहे, साधकाच्या हिताची तळमळ आहे, त्याला ज्ञानाचा मार्ग दाखविण्याची तगमग आहे. त्यांचे ‘वेड्या’ म्हणण्यामागे साधकाविषयीचा आत्यंतिक जिव्हाळा आहे.

अशा सद्गुरु सकलमताचार्य श्री सद्गुरु मार्तंड माणिकप्रभु यांचे पावन चरणी कोटी कोटी प्रणाम!

[social_warfare]