श्रवणाची पर्वणी

सच्चिदानंद सद्गुरु श्री ज्ञानराज माणिक प्रभु यांची श्रीमद्भगवद्गीतेवरील चार प्रवचने ऐकण्याचे परम भाग्य मला लाभले. त्या श्रवणाच्या चिंतनातून ज्या विशेष विचारांची पकड माझ्या मनाने घेतली, त्यातील काही गोष्टी येथे उद्धृत करते. श्रीजींनी प्रथमतः हिंदूंचा धर्म हा सनातन आहे की ज्याला आदि नाही आणि अंत नाही, हे पटवून दिले. त्यामुळे माझा हिंदू धर्म कितीही आपत्ती आल्या, तरी नष्ट होणार नाही, असा ठाम विश्वास मनामध्ये ठसला.

श्रीजींची समजावून देण्याची पद्धती अप्रतिम आहे. श्रीमद्भगवद्गीतेचे आपल्या जीवनात महत्त्व काय, हे समजावून देताना, श्रीजींनी वॉशिंग मशीनचे उदाहरण देऊन सांगितले की, ते मशीन घेताना त्याच्याबरोबर एक मॅन्युअल येते. त्यात त्या मशीनची माहिती व ते व्यवस्थित रितीने कसे चालेल, याची माहिती दिलेली असते. तसेच या शरीररुपी यंत्राचे मॅन्युअल श्रीमद्भगवद्गीता आहे. शरीर ही भगवंताची करणी आहे, आणि गीता भगवंतांनी स्वतः सांगितलेली आहे.

जीवनात तरी ईश्वराची आवश्यकता का आहे? यावर भाष्य करताना पूज्य श्रीजींनी ईश्वराचे स्वरूप सच्चिदानंद सच्चिदानंद कसे आहे व त्याचे माणसांमध्ये कसे तादात्म्य असते, ते अगदी सोप्या भाषेत समजावले.

१. सत् – मी सदा सर्वदा असावे, ही प्रत्येक माणसाची इच्छा असते. हीच सत् (to be)ची इच्छा आणि सत् (अस्तित्व) हे ईश्वराचे स्वरूप आहे.

२. चित् – प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा (स्फुरण) आहे. ही जाणीव (संवित्) हे ईश्वराचे स्वरूप आहे.

३. सदा सर्वदा सुखी असावं, ही माणसाची इच्छा! ईश्वर हा सुखस्वरूप आहे.

इथे एक आश्वासन महाराजांनी दिले की, ज्यावेळी आपल्याला सुख होते, त्यावेळी तो ईश्वराचा साक्षात्कार समजावा. हे माणसाचे धैर्य, बल आणि उत्साह वाढवणारे महावाक्य आहे, असे मला वाटते.

तेव्हा ईश्वर आपल्यातच आहे, हे परमपूज्य श्रीजींनी निर्देशित केले. परमपूज्य श्रीजींनी ईश्वराची जीवनामधील गरज हा विषय एक वेगळ्या दृष्टिकोनातून समजावून दिला. ईश्वराचे रूप हे त्रिविध प्रकारचे (आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक) आहे. हा दृष्टिकोन माझ्यासाठी नवीनच होता. वरील त्रिविध प्रकार, त्रिविध तापांचे असतात हे माहीत होते. परंतु, ईश्वराचे स्वरूपही याच प्रकारचे आहे, हे विचारांना चालना देणारे ठरले.

१. वर सांगितल्याप्रमाणे सत् चित् आनंद हे त्याचे आध्यात्मिक स्वरूप आहे.

२. त्याचे आधिदैविक रूप विशद करताना, परमपूज्य श्रीजींनी गीतेच्या सातव्या अध्यायातील रसोऽहम् अप्सुकौंतेय या श्लोकावर भाष्य केले. पाण्याचे द्रवत्व, चंद्र सूर्यातील प्रभा, आकाशातील शब्द, पुरुषातील पुरुषत्व आणि स्त्री मधील स्त्रीत्व, ही सर्व माझीच रूपे आहेत. अग्निमधील उष्णता मी आहे आणि ती जर नसली तर अन्न कसे शिजेल? बुद्धिमतांची बुद्धी मी आहे. असे असल्याने, पुन्हा एकदा ईश्वर आपल्यातच आहे, हेच परमपूज्य श्रीजींनी सांगितले.

३. ईश्वराचे आधिभौतिक रुप – जसे जीवनात आधारासाठी सशक्त आणि सदैव मिळेल असा खांदा लागतो, जसे गंगेमधील साखळ्यांना धरून वाटेल तेवढ्या बुड्यात मारता येतात, साखळी सुटली तर वाहून जाण्याची भीती असते. तसेच जगामध्ये ईश्वराने सुव्यवस्था केली आहे. जसे वेळेवर सूर्योदय होणे, वेळेवर पाऊस येणे, आंब्याच्या झाडाला आंबाच लागणे, या सुव्यवस्थेचा नियंता ईश्वर आहे व सर्व जगत् ईश्वरांमध्येच ओवलेले आहे. जसे ‘सूत्रे मणिगणाइव’. इथे पुन्हा परमपूज्य श्रीजींनी, ईश्वर आपल्यातच आहे हेच दाखवून दिले आहे. म्हणूनच ईश्वराची नितांत गरज आहे, त्यासाठी सर्व संतांनी जे आवर्जून प्रतिपादिले तेच पूज्य श्रीजींनी सांगितले, भावाने नामस्मरण करावे.

परमपूज्य श्रीजींचे प्रवचन म्हणजे संतवचनांच्या श्रवणाची पर्वणीच होती. त्यातही परमपूज्य श्रीजींच्या विनोदबुद्धीमुळे तत्वज्ञानामधील कठीण प्रमेये हसत खेळत सामान्यांच्या गळी उतरविणे, ही किमया श्रीजीच करू जाणे. श्रीजींचे प्रवचन जागरूकतेने आणि प्रसन्नतेने सर्व श्रोत्यांनी अथपासून इती पर्यंत ऐकले परमपूज्य श्रीजींच्या पावन चरणी कोटी कोटी प्रणाम

जब तलक मैं था

जब तलक मैं था, उसे मैं हर तरफ था खोजता ।
आज जब मैं हूं नहीं, तब वह मुझे है ढूंढता ।।धृ।।

दौड अपनी छोडकर मैं जब, अचानक रुक गया ।
भूलकर अपनी अकड जब, थक गया औ’ झुक गया ।
आ गया बांहें पसारे प्रभू स्वयं ही भागता ।।१।।

बिंदु गिरकर सिंधु में, अब सिंधु ही है हो गया ।
सिंधु बनकर बिंदु का, अस्तित्व ही है खो गया ।
सिंधु की जो है वही है, बिंदु की भी अस्मिता ।।२।।

वृत्ती की धारा पलट दी, वृत्ती राधा बन गई ।
मिट गया है ‘ज्ञान’ केवल मूर्ति प्रभु की रह गयी ।
कौन अब किस से कहे यह, धन्यता, यह पूर्णता ।।३।।

मनुष्यामध्ये कार्यामागचे कारण शोधून काढायची एक स्वाभाविक इच्छा असते. ईश्वरानेच त्याला सर्व भूतमात्रांपेक्षा वेगळी, श्रेष्ठ अशी ब्रम्हावलोकधिषण बुद्धी (ब्रम्हाला अवलोकन करण्याची बुद्धी ) दिलेली आहे, त्यामुळे सात्विक आणि कुशाग्र बुद्धीचे साधक, आपल्या जीवाचे मूळ स्वरूप, ते ईश्वरी तत्व, जाणण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.

अर्थात् ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न द्वैतातला असतो आणि त्याचे अधिष्ठान ‘मी’ असते. त्या ‘मी’चे समाधान होईपर्यंत, त्याचे अथक प्रयत्न चालूच असतात. मग ईश्वर दर्शनार्थ तीर्थयात्रेपासून, श्रवण, मनन, उपासनेपासून, थेट ध्यानधारणेपर्यंत अनेक प्रकारचे यत्न चालू राहतात. सद्गुरुंचं मार्गदर्शन घेतात, संत वचनांचा आधार घेतात, पण ध्येय दूरच राहतं. म्हणून श्री ज्ञानराज महाराज म्हणतात,

जब तलक मैं था, उसे मैं हर तरफ था खोजता ।

एक वेळ अशी येते की, साधकाची शक्ती संपून जाते, बुद्धीचे सामर्थ्य तोटके ठरते. तळमळ मात्र वाढत जाते. साधक अगतिक होतो. त्याचा अहंकार गळून पडतो. साधकाचा ‘मी’ पूर्णपणे शरणागत होतो. मनाची विलक्षण गतीही इथे अवरुद्ध होते. बुद्धीवृत्तीही शांत होतात. श्रीजींनी याचे सुंदर वर्णन काव्यबद्ध केले आहे.

दौड अपनी छोडकर मैं जब, अचानक रुक गया ।
भूलकर अपनी अकड जब, थक गया औ’ झुक गया ।

जेव्हा “मी’ पूर्ण शरणागत होतो, तेव्हाच आत्मारामाच्या तेजाने बुद्धी प्रकाशते आणि त्या आत्मबोधाने साधकाचे अंतःकरण आनंद, पवित्रता, निर्मलता, प्रसन्नता यांनी भरून जातं.

त्या शरणागतीची व्याख्या ज्ञानोबा माऊलींनी फार सुंदर शब्दांत केलेली आहे. माऊली म्हणतात,

आपुलेनि भेदेविण । जे जाणिजे एकपण ।
तया नाव शरण । मज येणे गा ।।

श्रीजी भक्तिमार्गातील अग्रणी असल्याने, त्यांनी ही प्रक्रिया अतिशय भावपूर्ण, उत्कट शब्दात वर्णिली आहे.

भूलकर अपनी अकड जब, थक गया औ’ झुक गया ।
आ गया बाहे पसारे प्रभू स्वयं ही भागता ।।

‘मी’ पूर्णपणे शरण गेला की त्याचे कर्तेपण पूर्णपणे विरून जाते. तेव्हा त्याला व्यापणारा आत्मप्रकाश इतका अचानक, तात्काळ आणि व्यापक स्वरूपाचा असल्याने, श्रीजी त्याचे वर्णन उत्कट भावाने करतात,

आ गया बांहें पसारे, प्रभु स्वयं ही भागता ।।

साधकदशेत उपासनेसाठी द्वैताचा स्वीकार करावाच लागतो पण, सिद्धावस्थेत अद्वैताचाच अनुभव यावा लागतो. जस ज्ञानेश्वर माऊली म्हणते,

द्वैत दशेचे आंगण । अद्वैत वोळगे आपण ।
भेदू तंव तंव दूण । अभेदासी ।।

या अद्वैत दशेचा दृष्टांत श्रीजींनी बिंदु आणि सिंधुच्या स्वरूपात दिला आहे.

बिंदु गिरकर सिंधु में, अब सिंधु ही है हो गया ।
सिंधु बनकर बिंदु का, अस्तित्व ही है खो गया ।

जलबिंदुचे आकारमान सागराच्या मानाने ते किती! पण बिंदु सागरात पडतो, तेव्हा सागरच होऊन जातो. त्याचं अस्तित्व वेगळेपणाने दाखवता येत नाही. म्हणून श्रीजी पुढे म्हणतात,

सिंधु की जो है वही है, बिंदु की भी अस्मिता ।।

भेदच नाही. जसं संत तुकोबा म्हणतात,

देव पाहायासी गेलो । देव होवोनिया ठेलो ।।

तसेच,

गोडपणी जैसा गुळ । तैसा देह झाला सकळ ।
आता भजू कोणेपरी, देव सबाह्य अंतरी ।।

श्रीजींनी समजावल्याप्रमाणे, आपली इंद्रिये बहिर्मुख असल्यामुळे, आपल्या वृत्तीला बाहेर विषयांकडे धावण्याची ओढ स्वभावतःच असते.

पराञ्चि खानि व्यतृणत् स्वयम्भूः,
तस्मात् पराङ् पश्यति नान्तरात्मन् । (कठोपनिषद)

त्यामुळे ते अंतरात्म्याला पाहू शकत नाही. बाहेरील विषय हे विषमय असल्याने, मग दुःखाची अनुभूती होते. सुखरूप आत्म्याच्या भेटीची उत्कट असेल तर,

अंतर्मुख वृत्ति करी, जरी बघणे असेल हरी ।

ईश्वर दर्शनाच्या ओढीने बाहेर धावणाऱ्या वृत्तींची धारा जर उलट दिशेने अंतर्मुख केली तर, त्याच वृत्ती राधा बनतात. ते ईश्वर प्रेमही मग ‘यथा वज्रगोपिकानाम्’ असे परम उत्कट बनते, जे ईश्वराला अतिप्रिय आहे. श्रीजी म्हणतात,

वृत्ती की धारा पलट दी, वृत्ती राधा बन गई ।
मिट गया है ‘ज्ञान’ केवल मूर्ति प्रभु की रह गयी ।

मग त्या जीव शिवाच्या मिलनामध्ये जीव, जो मूळतः ब्रह्मरुपच असतो, त्याचे जीवपण पार विरघळून जाते आणि एकटा एक सत् चित् घन आनंदरुप असा परमात्माच राहतो.

स्वामी वरदानंद भारती यांनी या राधाकृष्णाच्या मिलनाचे सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात,

श्रीहरिची जी चिन्मय छाया ।
मिठी देत तिज दृढ यदुराया ।
शुभ मीलन नच भेद कळावा ।
कवन राधिका कवण हरी वा ।।

हा तत्वज्ञानाबरोबर आलेला भक्तीचा गोडवा आहे. याप्रमाणे द्वैताला अधिष्ठान असलेला ‘मी’, अहंकार जर विसर्जित झाला तर, त्या भक्ताला आता ज्ञान मिळवायचे नसते. तो ज्ञानरुपच होतो, सुख मिळवायचे नसते तो सुखरुपच होतो. श्रीजींनी या स्थितीचे सुंदर वर्णन केले आहे.

मिट गया है ‘ज्ञान’ केवल मूर्ति प्रभु की रह गयी ।

या ज्ञानी भक्ताची स्थिती समजावण्यासाठी श्रीजींनी ईशावास्य उपनिषदातील श्रुति सांगितली आहे,

यस्मिन् सर्व भूतानि आत्मैवाभूत विजानतः ।
तत्र को मोहः कः शोकः एकत्वमनुपश्यतः ।।

आता सर्व भूतमात्रा आत्मवत् दिसू लागल्यावर त्या विद्वानाला मोह किंवा शोक कसा होणार ? ‘सर्वं खाल्विदं ब्रह्म’ ही पूर्णमद: पूर्णमिदं’ अशी पूर्णत्वाची स्थिती असताना, श्रीजी म्हणतात,

कौन अब किस से कहे यह, धन्यता, यह पूर्णता ।।

अपरोक्षानुभूतीचे हे प्रसादिक काव्य श्री ज्ञानराज प्रभुमहाराजांनी अत्यंत दयाळू होऊन, साधकांसाठी प्रकट केले आहे. त्यामुळे साधकांना योग्य मार्गाचा आराखडा मिळाला, हे खरेच.

या पंथावर पाऊले पुढे पडण्यासाठी भक्ती, निष्ठा, धृती, बल यांचा आशीर्वाद श्रीजींनी द्यावा, अशी विनम्र प्रार्थना त्यांच्या पवित्र चरणी करते.

वो दिखा रहे हैं जलवा

वो दिखा रहे हैं जलवा, चेहरा बदल बदल के।
मरकज़ हैं वो अकेले सारी चहल-पहल के ।।

देखी जो शक्ल उनकी, लगते है अपने जैसे।
मिलने उन्हे चला है, दिल ये उछल उछल के ।।१।।

उनको गले लगाकर, पहलू में तनक देखो ।
बेताब हो रहा है दिल ये मचल मचल के ।।

शीशे में अक़्स अपना देखा, वो दिख रहे हैं।
धुंधला रही हैं आँखें, आंसू निकले निकल के ।।३।।

जो पास आ गए हैं, वो दूर जा न पाऍं।
ऐ “ज्ञान” अब तुझे है, चलना सँभल सँभल के ।।४।।

सद्गुरु ज्ञानराज माणिकप्रभु यांनी या सुंदर गझलेमध्ये ज्ञानी भक्ताची अपरोक्षानुभूती वर्णिलेली आहे. या ज्ञानी भक्ताला, सर्व भूतांमध्ये एकच आत्मा दिसतो आहे. मात्र त्याची बाह्यरूपे वेगवेगळी आहेत. म्हणून परम पूज्य श्रीजी म्हणतात, “वो दिखा रहे है जलवा, चेहरा बदल बदलके ।”

त्या आत्मारामाचा हा प्रताप आहे की, सर्वत्र एकच एक असूनही, स्थूलदृष्टीला त्याची वेगवेगळी रुपे दिसतात. श्रीजींनी आपल्या आणखी एका काव्यामध्ये म्हटले आहे की, “निर्विकार कहलानेवाले, प्रभु का रूप बदलते देखा।”

कठोपनिषदात ‘रूपं रुपं प्रतिरूपो बभूव’ असे म्हटले आहे. एकरूप असूनही आत्मा विविधतेने कसा दिसतो याचे, अग्नी, वारा यांची उदाहरणे देऊन सांगितले आहे. जसे देवघरातील नंदादीप मंदपणे तेवून सारे पाप नाहीसे करतो, तोच कधीकधी शाप होऊन दावाग्निच्या रूपाने येतो. दिवाळीला पणत्यांमधून वातावरण तेजोमय करणारा अग्नी, कधी आगीचे महाभयंकर रूप घेऊन विध्वंस करतो. पण अग्नी एकच असतो.

“मरकज़ हैं वो अकेले सारी चहल-पहल के।”

सर्व ब्रह्मांडामध्ये ज्या घडामोडी होत आहेत, सृष्टीमध्ये ज्या क्रिया घडत आहेत, त्या सर्वांचा केंद्रबिंदू हाच आत्माराम आहे. स्वामी वरदानंद भारतींनी सुद्धा आत्मारामाचे वर्णन काहीसे असेच केले आहे.
भूतांचे नाना विशेष ।
तरी आत्मा एकरस ।
गणती नसे त्रिज्यांस ।
केंद्र त्याचे एक राही ।।

सृष्टीमधील सर्व क्रियाविधी आत्मसत्तेवर चालतात. त्यामुळे एकच एक आत्मा, हा सर्वांचे अधिष्ठान आहे, केंद्रबिंदू आहे.

“देखी है शक्ल उनकी लगते है अपने जैसे।”

साधनेच्या आणि तपाच्या बळावर जिद्दीने भक्त जेव्हा, बाह्य विषयांकडे धावणाऱ्या वृत्तींना माघारी वळवतो, अंतर्मुख करतो, तेथे त्याला आत्मस्वरूपाचे दर्शन होते. ज्ञानोबा माऊलींनी याचे फार सुरेख वर्णन केले आहे. माऊली म्हणतात,

परतुनी पाठीमोरे ठाके ।
आपणया आपणपे देखे ।
देखतया आपण या ओळखे ।
म्हणे तत्व हे, मी ।। (ज्ञानेश्वरी).

तोच भाव परम पूज्य श्रीजी येथे प्रदर्शित करत आहेत की,
“देखी है शक्ल उनकी, लगते है अपने जैसे।”

या आत्मज्ञानी भक्ताला “अहं ब्रह्मास्मि”ची अनुभूती आलेली आहे. ब्रह्मच सर्वत्र व्याप्त असल्याने, समोरील दर्शनही ब्रह्मस्वरूपच आहे, हीच पक्की धारणा असल्यामुळे, मी आणि तो यांचा काहीच भेद नाही. म्हणून तो भक्त म्हणतोय, “देखी है शक्ल उनकी लगते है अपने जैसे।”

आणि म्हणूनच आपुलकीच्या भावनेने, आपलेपणाने, “मिलने उसे चला है” पण कसा? तर, “ये दिल उछल उछलके।” अत्यंत आनंदाने, प्रेमभावना उचंबळून येऊन, त्याच्या भेटीला, मिलनाला हा समोरा जातो आहे. बऱ्याच कालावधीनंतर समोर आई दिसल्यावर, निरागस लहान मूल जसं आनंदाने उड्या मारीत तिच्याकडे धाव घेतो, तसा काहीसा भाव या काव्यपंक्तीमध्ये आहे.

उनको गले लगाकर, पहलू में तनक देखो ।

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर, आपली अतिशय जवळची प्रिय व्यक्ती आपल्याला भेटली तर, आपण अत्यानंदाने, उत्स्फूर्तपणे तिला गळा भेट देतो. तिच्या हृदयाचा ठाव घ्यायचा, तर तिच्या डोळ्यात पाहून खोलवर ठाव घ्यावा लागतो. तेव्हाच अंतरंगातला भाव जाणवतो. याच भावनेने भक्त आत्मस्वरूपाला न्याहाळू लागला की, मनबुद्धी या उपाधीवरून नियंत्रण सुटून जातं आणि त्या सच्चिदानंदाच्या आनंदलहरींमध्ये तो चिंब होतो. “आनंदाचे डोही, आनंद तरंग” अशीच त्याची स्थिती होते. म्हणून परम पूज्य श्रीजी म्हणतात,
“बेताब हो रहा है दिल ये मचल मचल के ।”

शीशे में अक़्स अपना देखा, वो दिख रहे हैं।
धुंधला रही हैं आँखें, आंसू निकले निकल के ।।३।।

आरशात मी स्वतःला बघायला गेलो तर, तिथेही मला आत्मारामच दिसतो आहे. माझे स्वस्वरूपच मला दिसते आहे. कारण आत्मसाक्षात्कार झालेल्या ज्ञान्याला सर्वत्र व्यापक आत्माच दिसणार! “नेह नानास्ति किंचन” दुसरे काही नाहीच. हा ज्ञानी असला, तरी भक्त आहे. त्यामुळे आपले स्वस्वरूप आरशात पाहून त्याचा ऊर भरून आला आहे. या प्रतीतीसाठी त्याने जीवनभर “स तु दीर्घकाल नैर्यंतर सत्कारा सेवितो” या मार्गाने अपार कष्ट सोसलेले असतात. त्यामुळे “तो पाही आपणासी आपण” अशी अवस्था अनुभवताना उत्कटतेमुळे डोळे अश्रूंनी डबडबले आहेत. त्यामुळे दृष्टी अंधुक झाली आहे.

या काव्यपंक्तीचे दुसऱ्या तऱ्हेनेही चिंतन करता येणे शक्य आहे.

“शीशे में अक़्स अपना देखा, वो दिख रहे हैं।”

आपली बुद्धीही आरशासारखी स्वच्छ आहे. त्यामध्ये आत्म्याचे प्रतिबिंब पडते, तोच चिदाभास किंवा जीव. जीवाचा सहज भाव बहिर्मुख आहे. मात्र तो जेव्हा साधनेच्या बळावर ध्यानाने वृत्ती अंतर्मुख करतो, तेव्हा त्या जीवाला स्वतःचे बिंबस्वरूप – आत्मस्वरूप आनंदमयात दिसते, तेव्हा “पाही आपणासी आपण । आणि म्हणे ते तत्व मी” ही प्रक्रिया होते. आपल्याच सच्चिदानंद स्वरूपाला पाहून, उचंबळलेल्या अष्टसात्विक भावामुळे, अश्रू वाहायला लागतात. त्यामुळे दृष्टी अंधुक झाली आहे. खरे तर दृष्टीला आता दुसरे काही पाहायचे नाहीच. आता फक्त अनुभूती!

आपल्याच स्वस्वरूपाची, सच्चिदानंदाची अपरोक्षानुभूती भक्ताने घेतलेली आहे. त्याचा अविट आनंद तो भोगतो आहे. ह्या अमूल्य, अतुल्य आनंदापुढे बाह्य विषयानंदाची आता काही गरज राहिलेली नाही, त्यामुळे त्या सच्चिदानंद स्वरूपापासून जराही दूर जाण्याची भक्ताची इच्छा नाही. म्हणूनच परमपूज्य श्रीजी म्हणतात,

“जो पास आ गये है, वो दूर जा न पाये ।”

भाव दाटून आलेले आहेत. अष्टसात्विक भाव उफाळून आल्यामुळे अश्रू आवरत नाहीत. भक्त ही जी ज्ञानमयता अनुभवतो आहे, पण त्यामधील एक किंतु भक्ताला साशंकित करतो आहे की, या उत्कट भक्तीचा परिणामस्वरूप म्हणून आपण जर “तोच” झालो तर या सच्चिदानंदाचा आनंद भोगता कसा येईल? कारण जिथे सापेक्षता नाही, तेथे जाणीव होतच नाही. त्या आनंदसागरावर वृत्तीचे आनंद तरंग येणारच नाहीत. तटस्थता येईल. संत तुकोबाही या तटस्थतेला नाकारतात आणि म्हणतात,

“जळो माझी ऐशी बुद्धी, जी घाली मज तुजमधी ।
ऐसे करी विठाबाई, तुझे पाय माझे डोई।।”

जीव सुखी होण्याऐवजी सुखरूप होईल, ज्ञानी होण्याऐवजी ज्ञानरूप होईल. म्हणूनच परम पूज्य श्रीजी अतिदक्षतेने आणि विचक्षण बुद्धीने म्हणतायेत,

“हे ‘ज्ञान’ अब तुझे है, चलना संभल संभल के।”

सद्गुरूंनी ही अवस्था प्रत्यक्ष अनुभवलेली आहे. त्यांच्या अनेक काव्यांमधून त्यांनी त्यांनी ती प्रकटही केली आहे. जसे,
“निर्विकार कहलाने वाले प्रभू का रूप बदलते देखा ।
असंगता अपनी तजकर नभको भू से मिलते देखा ।।

वरील गजलेमध्ये साधकाला, या स्थितीची ओढ लागावी, असा “जलवा” परम पूज्य श्रीजींच्या शब्दांमध्ये आहे. आशीर्वादाची अपेक्षा करीत त्यांच्या पवित्र मंगल चरणी मी शरण आहे

धांव गे बाई

धांव गे बाई धरिला कान्हा चोर ।।धृ।।
मारावे तरी खोडी सोडीना ।
जैसा वराडी भोर ।।१।।
किती सांगावे कांहीं ऐकेना ।
निशिदिन याचा घोर ।।२।।
माणिक म्हणे प्रभु दीन दिसे परी ।
जो सर्वांहूनि थोर ।।३।।

परमपूज्य सद्गुरु श्री माणिकप्रभु महाराजांनी वरील काव्यामधून ‘परम प्रेमरुपा’ अशा मधुराभक्तीचा गोडवा प्रदर्शित केला आहे. त्यांच्या कृपेची आकांक्षा मनी धरून, वरील काव्याचे विवरण करण्याचा प्रयत्न करते आहे.

‘धांव गे बाई धरिला कान्हा चोर’, सद्गुरु श्री माणिकप्रभु ह्यांच्या या काव्यातून त्यांनी, श्रीकृष्णावर आत्यंतिक प्रेम करणाऱ्या वत्सल गोपी आणि खट्याळ, हट्टी अशा बाळकृष्णाच्या जवळिकेचा सुंदर प्रसंग, ज्यात त्या गोपींच्या प्रेम भावनेच्या अनेक छटा रंगविल्या आहेत.

वाच्यार्थ – गोपींच्या खोड्या काढून, पळून जाणाऱ्या बाळकृष्णाला त्या गोपीने अतिखटपटी करुन पकडले आहे. पण कान्हा इतका चपळ आणि हुलकावे देणारा आहे हे माहित असल्याने, ती गोपी आपल्या इतर गोपींना मदतीसाठी धावत यायला सांगत आहे की ‘धांव गे बाई धरिला कान्हा चोर’. चोर एवढ्यासाठी म्हटले आहे की, हा गोपींच्या नकळत कधी घरात शिरुन दह्यादुधाची मडकी फोडायचा, फस्त करायचा आणि पळूनही जायचा. घरातल्या दुधाण्यांची गोष्ट सोडा पण त्यांची मनही चोरून‌ न्यायचा. ‘कर्षति इति कृष्णः’. गोपींची मनही कधी आकर्षून घ्यायचा हे त्यांचे त्यांनाच कळायचे नाही. म्हणूनच हवीहवीशी वाटणारी चोरी का होईना, पण चोरीच ना ती !

मग लटके का असेना, त्याच्यावर रागवायचं, चापटी मारायची, या त्यांच्या कृती त्यांचं कृष्णावरचं प्रेम, ममत्व, वात्सल्य हेच भाव दर्शवितात. पण एवढं करून कृष्णाच्या खोड्या काही संपतच नाहीत. जसा एखादा हेकट वराडी असावा, तो त्याला पाहिजे तेच करतो, तुमच्या सांगण्याला भीक घालत नाही, तसाच हा कान्हा करतो आहे. त्यामुळे रात्रंदिवस तो जीवाला घोर लावतो आणि दुसरा विषयच सुचू देत नाही.

आता मात्र गोपींनी त्याला धरले, पकडले. सद्गुरु श्री माणिक प्रभु म्हणतात, ‘आता गोपींना त्याचा कळवळा येतोय’. खट्याळ लेकराला बंदिस्त केल्यावर, गोपींच्या प्रेमळ नजरेला तो दीन दिसतो आहे, तरी ‘जो सर्वांहूनि थोर’ असा हा कान्हा! नारद भक्तिसूत्रात सांगितल्याप्रमाणे ‘तत्रापि न महात्मज्ञान विस्मृत्यपवाद:।’ म्हणजेच, कृष्ण हा बालवयात जरी असला, तरी त्याचे मोठेपण त्या कधी विसरल्या नाहीत.

असे हे, कृष्ण आणि गोपी यांच्या जवळिकेचा गोडवा अत्यंत रसाळ आणि भावपूर्ण शब्दांत वर्णन केलेलं मधुर काव्य आहे.

लक्ष्यार्थ – परमार्थमार्गीचा जो साधक आहे, विशेषतः भक्तिमार्गातला, त्याला ईश्वरभेटीची तळमळ तर असतेच. त्याच्या वृत्तींना अंतर्मुख करून, ध्यानमार्गाने त्याचे दर्शन घेण्यासाठी तो अपार कष्ट घेतो. वरील काव्यातील ही गोपी ही त्या अंतर्मुखवृत्तीचे रूपक आहे, असे मला वाटते. संत दासगणू महाराज म्हणतात, ‘अंतर्मुख वृत्ती करी, जरी बघणे असेल हरी।’ एखाद्या वेळी त्या वृत्तीला सच्चिदानंदाचा अनुभव येतो ही, पण ती वृत्ती तो आनंद कायमच धरुन ठेवीलच अशी खात्री नसते. शिवाय इतर विषयांच्या वृत्ती तर सतत येतच असतात. म्हणून ही ‘गोपी’वृत्ती त्या बाहेर जाणाऱ्या वृत्तींनाही अंतर्मुख होण्यासाठी हाक देत आहे आणि हळूहळू नाही तर धावत या, नाही तर हा केव्हा सुटून जाईल, सांगता यायचं नाही. लडिवाळपणे त्या कृष्णाला (आत्मारामाला) ती ‘चोर’ म्हणतेय. शेवटी सर्व वृत्ती या आत्म्याच्या स्फुरणामुळेच आलेल्या असतात. त्यामुळे अत्यंतिक जवळिकेच्या संबंधामुळे वृत्तींना या आत्मारामाची सहज ओढ असतेच. केवळ अविद्येमुळे त्या बाहेरील विषयांकडे ओढल्या जातात. तेव्हा कधीतरी त्याची अनुभूती आली तर ती पुन्हा सुटू जाऊ नये, म्हणून ती ‘गोपी’वृत्ती इतर सर्व वृत्तींना अंतर्मुख होऊन ‘एकवृत्ती’ होण्यासाठी साद घालते आहे. कारण एकवृत्तीचे बळ अधिक असते.

‘मारावे तरी खोडी सोडीना, जैसा वराडी भोर।’ लहान मुलाला आई मारते, ती दुष्टावा म्हणून मारते का? आईने सांगितलेले त्याने ऐकावे म्हणूनच ना! आणि लेकराला मारल्याचं वाईट पुन्हा तिलाच वाटतं. तसंच त्या सच्चिदानंदाचा ‘सदा संग’ राहावा म्हणून साधक जीवाच्या आटापिटीने प्रयत्न करीत असतो. रात्रंदिवस त्या आत्मारामाचा ध्यास त्याला लागून राहिलेला असतो. म्हणूनच ‘निशिदिनी याचा घोर’. संत तुकोबा म्हणतात,

‘हरि तू निष्ठूर निर्गुण, नाही माया बहु कठिण ।
नव्हे ते करिसी आन, कवणे नाही केले ते ।’

प्रभुजींनी ‘घोर’ हा शब्द फार मार्मिकपणे घातला आहे. कृष्णसंग ‘सदा’चा हवा, हा साधकाच्या तळमळीचा उच्चांक आहे. दुसरा विषय त्याच्या वृत्तींना नाही.

आता कृष्ण तर हाती सापडलाय. त्या सच्चिदानंदाचा कोण आनंद आहे. त्यामुळे आतापर्यंत जे आरोप त्याच्यावर केले होते, तो आता आपल्या भावाच्या बंधनात पडल्याने, त्याच्यावरच्या उत्कट प्रेमाने तो दीन झाल्यासारखं वाटू लागलाय. पण असं होऊनसुद्धा कृष्णाची थोरवी त्या कधीच विसरत नाहीत. ‘जो सर्वांहुनी थोर।’

अशा ‘जाणोनि नेणता’ झालेल्या भक्ताच्या वृत्तींचं वर्णन प्रभुजींनी ‘कामक्रोधाधिकं सर्वं तस्मिन्नेव करणियं’ (नारद भक्तिसुत्र) म्हणजे जे जे भाव असतील, मग काम असो, क्रोध असो, ते सर्व ‘त्याच्याच’साठी असतील, हे या श्रीकृष्ण आणि गोपीच्या भावपूर्ण प्रसंगातून अतिशय मार्मिकपणे सांगितले आहेत. प्रभुजींच्या या संपूर्ण काव्यातून भक्तीचा गोडवा मनाला प्रसन्नता देऊन जातो.

 

स्वर्णमृग पर लुब्ध होकर

परमपूज्य सद्गुरु श्री ज्ञानराज माणिक प्रभु महाराजांनी परमार्थ मार्गातील साधकांसाठी त्याच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांपैकी एका मोठ्या अडथळ्याचे, रामायणातल्या सुवर्णमृगाच्या प्रसंगाचे उदाहरण देऊन, त्याचे स्वरूपही सांगितले आहे आणि त्याला पार करून जाण्याचा बोधही फार मार्मिकपणे केला आहे.

स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई ।
मुग्ध होकर बुद्धि की सुविचार क्षमता खो गयी ।।धृ।।

है असंभव हेममृग यह राम भी थे जानते ।
जानकर भी हाथ में ले चाप-शर वे भागते ।
भंग तृष्णासंग से आनंदघनता हो गई ।
स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई ।।१।।

है प्रलोभन दे रहा मारीच आत्माराम को ।
ताकि रावण हर सके सुख शांति औ’ विश्राम को ।
स्वर्णमृग के मोह में मति की सुसमता खो गई ।
स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई ।।२।।

है विषय सब स्वर्णमृग सम सर्वदा यह जान तू ।
बुद्धि-सीता हो न मोहित, ध्यान रख यह ‘ज्ञान’ तू ।
ध्यान इतना रख समझ ले पार सरिता हो गई ।
स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई ।।३।।

श्रीरामांची अर्धांगिनी, सीता, ही अत्यंत पवित्र, शुद्ध चरित्राची पतीव्रता, अशी स्त्री जिचा उल्लेख ‘पंचकन्यां स्मरे नित्यमं’ मध्ये प्रथम क्रमांकाने येतो, ती सीतासुद्धा सुवर्णमृगाच्या वैषयिक दर्शनाने, त्याच्या प्राप्तीसाठी कशी वेडीपीशी होते, हा प्रसंग आहे.

‘स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई’ वनांत इतस्ततः मजेत विहार करणाऱ्या सुवर्णमृगाला पाहून सीता हरखून गेली. श्रीजींनी ‘लुब्ध’ हा शब्द बरोब्बर परिस्थितीला साजेसा घातलेला आहे. लुब्ध शब्दात हावरेपण आहे (Greedyness). ‘मला ते पाहिजे म्हणजे पाहिजेच’ हा भाव आहे. त्याचाच परिणाम असा झाला की ‘मुग्ध होकर बुद्धी की सुविचार क्षमता खो गई।’ सीता वेडीपिशी झाली. चांगलं काय, धोक्याचं काय, यामध्ये निर्णय घेण्याची बुद्धीची क्षमता त्यामुळे पांगळी झाली.

सद्गुरु श्री ज्ञानराज महाराजांनी अत्यंत दयाळू होऊन साधकांना अप्रत्यक्षपणे इशारा केला आहे की, जगातले बाह्य विषय संख्येने जरी पाचच (शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध) असले, तरी त्यांची आकर्षणशक्ती सीतेसारख्या भल्याभल्यांनाही मोहित करते. त्यांचीही मती भ्रष्ट करू शकते. यासाठी श्री समर्थ ही उपदेशितात,

‘मना कल्पना ते नको विषयांची ।
विकारे घडे हो जनी सर्वचीची ।’

म्हणून या प्रथम टप्प्यावरच साधकाने जागृत राहून मनाच्या संकल्पामागे न जातां, बुद्धीची निर्णय क्षमता जपली पाहिजे.
‘आली उर्मी साहे, तुका म्हणे थोडे आहे।’

याचे कारणही महाराजांनी पुढच्या ओळीत दिले आहे. ‘है असंभव हेममृग ये रामभी थे जानते।’ श्रीराम परमात्मा आहेत, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ असे आहेत. त्यामुळे सुवर्णमृग असंभव आहे किंबहुना हे मायाजाल आहे, हे श्रीरामांना माहीत होतेच. तरीही ‘जानकर भी हाथमे ले चाप शर वे भागते।’ अत्यंत विचक्षण बुद्धीने महाराजांनी त्या आत्मचैतन्याच्या स्वभावाकडे निर्देश केला आहे.

मूळ आत्मचैतन्य जरी रंगहीन असले, तरी त्या स्फुरणाला मनातील वासनेचा रंग चढला, की त्या विषयाची वृत्ती होते. मन इंद्रियांना जोडलेले असल्यामुळे, वासना जर उत्कट असेल तर त्या वृत्तीची उर्मी होऊन इंद्रियांकडे धाव घेते आणि इंद्रिय ते कर्म करतात. हा सर्व प्रकार घडण्यासाठी मूळ अधिष्ठान हे आत्मचैतन्याचेच असते. ते जर नसले, तर वरील प्रक्रियाच होत नाही.

म्हणूनच महाराज म्हणतात, सुवर्णमृग असंभव आहे हे जाणूनही श्रीराम धनुष्यबाण घेऊन धावले. भगवान श्रीराम हे एकबाणी, एकवचनी आहेत, हे माहीत असल्याने, माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी ते स्वतः गेलेत म्हटल्यावर, आता इच्छापूर्ती नक्की होणार या कल्पनेनेच ‘भंग तृष्णासंग से आनंदघनता हो गई।’. सुवर्णमृग मला हवा ही उत्कट आशातृष्णा आता श्रीराम भागविणार, या जाणिवेने सीता अतिहर्षित झाली.

खरे तर विवेकाने हिताचीच गोष्ट मनात ठसते पण मन जर विकारांच्या हातचे खेळणे बनले तर मात्र ‘प्रमाणांतरे बुद्धि सांडोनि जाते.’ सीतेचे नेमके तेच झाले. ‘अव्यवस्थित चित्तानां प्रसादोऽपी भयंकरः।’ (अर्थ – ज्यांच्या मनाचे वागणे अव्यवस्थित म्हणजे जसे असायला हवे तसे नसते, ते प्रसन्न झाले तरी त्याचा परिणाम भयंकर होऊ शकतो.)

‘है प्रलोभन दे रहा मारीच आत्माराम को।’ सुवर्ण मृगाचे रूप घेतलेला मारीच मामा, तो आपल्या मागे येत असलेल्या श्रीरामाला, थोडं माना वळवून, थोडं पुढे पुढे पळून, सीतेपासून दूर दूर नेऊ पाहतो. त्याचप्रमाणे मात्रास्पर्शाने वैषयिक बनलेली बुद्धिवृत्ती आपल्या मूळ विवेकी स्वरूपापासून दूर जाते. असं झालं तर त्याचा परिणाम काय होतो, हे श्री महाराज पुढच्या ओळीत सांगत आहेत. ‘ताकि रावण हर सके सुख शांती औ’ विश्राम को।’ मनाला वाटणारी आवड निवड प्रामाणिक नसते. इंद्रिय बाह्यांगाला भूलतात. त्यामुळे विषयाचा स्विकार किंवा धिक्कार हिताच्या दृष्टीने, नेमकेपणाने करता येत नाही. अशाप्रसंगी ग्राह्य-त्याज्य सार-असार अशा द्वंद्वांमध्ये नेमका हिताचा निर्णय घेण्याची विवेकशक्ती जर बावचळली तर भवसागराच्या महाभयंकर लाटा आपल्याला कधी गिळंकृत करतील, याचा नेम नसतो. म्हणून समर्थ म्हणतात, ‘मना कल्पना ते नको विषयांची।’ पुढे समर्थ म्हणतात, ‘महाघोर संसार शत्रू जीणावा.’ श्री महाराजांनी रावणाचा जो उल्लेख केला आहे, तो या संसार शत्रूलाच उद्देशून केला आहे, असे मला वाटते. वरकरणी सुखाचा मुखवटा घातलेला संसार, हेच दुःखाचे मूळ आहे, असे अनेक संतांनी सांगितलेले आहे. संत सद्गुरु दासगणू महाराज म्हणतात, ‘भूलू नको मना संसारा ।
ना येथ सुखाचा वारा ।।
दुःखाचे मूळ संसार ।
बा करिल बहुत बेजार ।।
लोभाचे करुनि मांजर ।
तुज फिरवील दारोदार ।।

श्री महाराजांनी या संसार शत्रूला रावणाचे रूप दिले आहे, जो सुख शांती आणि विश्राम हरण करतो. याचे कारणही श्री महाराजांनी पुढील पंक्तीत कथन केले आहे, ‘स्वर्णमृग के मोह में मति की सुसमता खो गई।’

लोभ, मोह या गोष्टी मनबुद्धीला क्षोभ देण्यास कारणीभूत होतात, त्यामुळे त्यांचे स्थैर्य ढळते, समत्व बुद्धीने विचार करण्याची क्षमता उणावते. गीतेमध्येही या समत्व बुद्धीचा संदर्भ साधकाला योग साधण्याच्या दृष्टीने अनेक ठिकाणी आला आहे. जसे ‘सर्वत्र समबुद्धय:’, ‘समबुद्धिर्विशिष्यते’, ‘समं पश्यन्हि सर्वत्र’ इत्यादि.

मोहामुळे बुद्धीचा हा जो महत्त्वाचा आणि सर्वात उच्च प्रतीचा गुण आहे, तो नष्ट होतो आणि साधकाला साधनेमध्ये आडकाठी होऊ शकते. म्हणूनच श्री महाराजांनी रामायणातील सुवर्णमृगाच्या प्रसंगाच्या आधारे साधकांना सावध राहण्याचा बोध केला आहे. ‘है विषय सब स्वर्णमृग सम सर्वदा यह जान तू।’ जगातील बाह्य विषय हे त्या सुवर्णमृगाप्रमाणे भ्रांती निर्माण करतात. विवेकी बुद्धी भ्रष्ट होते. म्हणूनच समर्थ म्हणतात, ‘अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, अती विषयी सर्वदा दैन्यवाणा।’ असे होऊ नये म्हणून, श्रीमहाराज बोध करताहेत, ‘बुद्धी सीता हो न मोहित, ध्यान रख यह ‘ज्ञान’ तू।’ या काव्यात बुद्धीला सीतेचे रूपक दिले आहे, तिला झालेल्या मोहाचा परिणाम किती भयंकर झाला, हे जाणून श्री महाराज अत्यंत कृपाळूपणे साधकाला आश्वासन देत आहेत की, अशी बुद्धी जर बाह्य विषयांना मोहित होऊ दिली नाहीस म्हणजेच, तुझे हवे-नको उणावले, तर मग ही भवनदी तू पार केलीसच असे समज.

साधकाचे हवे-नको उणावले की मनाची चंचलता उणावते. बुद्धीची विवेकशक्ती सबळ होते. वृत्ती बाहेर न धावता अंतर्मुख होऊ शकतात आणि अशा अंतर्मुख वृत्तीलाच परमात्म्याच्या दर्शनाची योग्यता प्राप्त होते. परमपूज्य सद्गुरु दासगणू महाराज म्हणतात, ‘अंतर्मुख वृत्ती करी । जरी बघणे असेल हरी।’

परमपूज्य श्री सद्गुरु ज्ञानराज महाराजांच्या चरणी शरण राहून वरील विवरण केले आहे. काही चुका झाल्या असल्यास मला क्षमा करून मार्गदर्शन करावे, ही प्रार्थना चरणी करते.