घडो माझी वारी

घडो माझी वारी प्रभु तुझ्या दारी
माणिकनगरी विठ्ठल माझा

तुळसीचा हार तुझा अलंकार
शोभलासे फार प्रभु गळा

चंद्रभागा आली संगमी पावली
वारीचीच झाली दिंडी येथे

मुखी प्रभु नाम हेची नित्य काम
बाकी सारा भ्रम देखादेखी

शब्दांचीच सेवा गोड मानी देवा
चरणासी ठेवा मनुबाळा

 

एकची सुख मज

एकची सुख मज होई अंतरी
जाता क्षणभर प्रभु मंदिरी || हेचि खरे सुख ||

निज स्वार्थाचे नको मागणे
व्हावे समरस प्रभु दर्शने
व्यंकम्मा सम भाव मनी धरी
जाता क्षणभर प्रभु मंदिरी || हेचि असे सुख ||

ज्ञान’ भक्तीचे वाजे चौघडे
सकलमताची ध्वजा फडफडे
भक्तांचे कल्याण करी हरी
जाता क्षणभर प्रभु मंदिरी || हेचि असे सुख ||

उठ प्रभुवरा 

उठ प्रभुवरा निशा ती सरली
तेजोमय ही प्रभा पसरली
भक्त राऊळी दाटी करती
दर्शन द्या मज हे कमलापती

नटला रे नटला प्रभु माझा
कृष्ण शोभला तो मथुरेचा
गोपगोपीका शोधी जयाला
माणिकनगरी तोची प्रगटला

नानाविध त्या सुमन माळा
बेल वाहिला गंगाधराला
धुप दिप पंचारती लावा
प्रभु चरणावर मस्तक ठेवा

 

बाळ माणिका

बाळ माणिका दुडु दुडु धावे
मात बयंमा मनी सुखावे

देव साधु गण शोधती ज्यासी
सवंगड्या सह खेळेे वनासी
भाव धरीता सहजची पावे

बाळ माणिका दुडु दुडु धावे
मात बयंमा मनी सुखावे

कुणास वाटे अंतरी धरीला
कुणी म्हणे मी नयनी देखिला
प्रगट होवुनी गुप्तची राहे

बाळ माणिका दुडु दुडु धावे
मात बयंमा मनी सुखावे

मला श्री माणिकप्रभु दिसले

नामामृत हे कानावर पडले
मला श्री माणिकप्रभु दिसले

दत्तगुरुंची अवघी माया
मानवरुपी धरली काया
बयादेवीच्या उदरा मधुनी देवच अवतरले

गुरुगंगा विरजेचा संगम
तेथ वसविले माणिक धाम
प्रभु स्पर्शाने या भुमीचे नंदनवन झाले

सगुण भक्तींने भजता प्रभुला
उचलून घेई प्रभु भक्ताला
चैतन्याचा जिथे सोहळा नित्य नवा चाले

मला श्री माणिकप्रभु दिसले
जय गुरू माणिक नामामृत हे कानावर पडले
मला श्री माणिकप्रभु दिसले