प्रभूंना करतो प्रणाम

 

माणिक प्रभूंना करीतो प्रणाम
तुमचे राहो मुखी नित्य नाम  ध्रु

अवतार घेऊन कलियुगी
भक्ता तारण्या आले जगी
हात धरून करी प्रभु पैलतीरी
माणिक प्रभूंना करतो प्रणाम १

प्रभु नांदे संगमावरी
दत्त स्थान हे भुमिवरी
श्रीदत्त भिक्षेची झोळी माणिक नगरी
माणिक प्रभुंना करतो प्रणाम २

रिद्धी सिद्धी असून दारी
प्रभु खाई भीक्षेची भाकरी
भक्ता प्रेमा पोटी जाई गरिबा घरी
माणिक प्रभूंना करतो प्रणाम ३

प्रभु भजनाची ओढ लागली
प्रभु मायेची छाया लाभली
कल्पवृक्ष लाभले आम्हा जीवनी
माणिक प्रभूंना करतो प्रणाम ४

कान्हा म्हणे या भक्त जना
प्रभु भक्तीचा मार्ग खरा
होऊनी जाऊया मुक्त प्रभु चरणी
माणिक प्रभूंना करतो प्रणाम ५

भक्तांची माऊली हो

प्रसन्न होवोनि दत्तगुरु अवतरले या भुवरी हो
माणिकप्रभु हे नाम घेवुनी जडमुढ जन तारीले हो
भक्तकार्य कल्पद्रुम ब्रीद हे बसले भक्ता मनी हो
घेऊन जवळी कृपा करी तु भक्तांची माऊली हो

सवंगड्या सम खेळ खेळता लिला अनंत केल्या हो
घेवोनि कवड्या भीमाबाईच्या अष्टपुत्र फळ दिधले हो
व्यंकम्माचा भाव मनीचा पाहुनी प्रभु मनी द्रवले हो
घेऊन जवळी कृपा करी तु भक्तांची माऊली हो

प्रभु फिरतीवर असती जिकडे तिकडे उत्सव घडती हो
भक्तही येती दर्शन घेती नवसे ही फेडती हो
पंथ सकलमत करुनी स्थापन भक्तां पावन करी हो
घेऊन जवळी कृपा करी तु भक्तांची माऊली हो

प्रभु आज्ञेने यज्ञ जाहला वेद घोष बहु झाले हो
गुढ्या पताका रांगोळ्या अन दारी तोरणे सजली हो
आम्हीच आम्हा धन्य मानतो प्रभुचरणी मन जडलो हो
घेऊन जवळी कृपा करी तु भक्तांची माऊली हो

घेऊन जवळी कृपा करी तु भक्तांची माऊली हो

 

दत्त तीर्थ धाम

दत्त तीर्थ धाम माणिक नगर
दैवताचे नाम माणिक प्रभू श्री

साक्षात चतुर्थ दत्त अवतार
कलयुगी भक्ता लाभले श्री दत्त

सकल मत एकची हे स्थान
सर्व धर्म भाव प्रभु चरणी लीन

प्रभु दरबारी येती साधू संत
साई स्वामी गोंदवलेकर हेची हो साक्ष

साधकासी मोक्ष संसारीस मार्ग
जगण्या आधार प्रभु सर्वा देत

चला चला माणिक नगरी प्रभु दर्शना
भक्त कार्या कल्पदृम भेटतील आम्हा

कान्हा म्हणे जना वंदा प्रभु चरणा
मोक्षासी पात्र होऊ चला आता

गुरु हाचि माय बाप

 

देह हा धारण
केला ज्या कारण
गुरु आता त्यास्तव केला पाहिजे

भगवंत प्राप्ती
हीच ती आसक्ती
होणे नसे शक्य गुरुवीण

गुरु हाचि माय बाप
गुरुच परब्रह्म
गुरु हे तत्व, व्यापले सर्वत्र

गुरूला नसे कोणते बंधन
देहा पलिकडले ते स्पंदनं
सेवेतून अनुभवावे परमानंदन

गुरुमुळेच पुढची वाट
मुमुक्षूस दिसे या जन्मात
धरिले एकदा का बोट गुरूंचे

ज्ञानियांचा राजा

वेदांताच्या असीम ज्ञानराशीतील प्रमेयांचे एक एक दालन उघडत असताना, श्रीजींचा परावलीचा, धीरगंभीर आवाजातील वंदे श्री प्रभु सद्गुरुं गुणनिधीं हा श्लोक कानावर आला की, एरवी इतस्ततः अखंड भूणभूण करत असलेला मनाच्या विचारांचा भुंगा, सद्गुरु चरणावर अलगद जाऊन विसावतो. भ्रमर जसा कमळाच्या मकरंदाने देहभान विसरून, कमळामध्ये रात्रभर बंदिस्त होऊन जातो, अगदी तसेच काहीसे श्रीजींचे प्रवचन ऐकताना होते. श्रीजी आपल्याला समजावून देत असलेल्या, स्वतःच्या विद्वत्ताप्रचूर संभाषणातून आपल्यासमोर ठेवत असलेल्या अद्वैत मकरंदाची गोडी ही अशीच अविट आहे.

ह्यावेळी ठाणे दौऱ्यातील प्रवचनांमध्ये पुन्हा एकदा श्रीजींनी श्रीमद्भगवद्गीतेचे सार उपस्थितांसमोर उलगडले. ह्या आधीच्या प्रवचनांमध्ये श्रीजींनी जरी हे विषय घेतले असले तरी, साधकाला अत्यावश्यक असणारी उजळणी ह्या प्रवचनाच्या निमित्ताने झाली. सद्गुरुंच्या मुखकमलांतून होणाऱ्या ह्या दिव्य वाणीच्या अमृतवर्षावात न्हाऊन निघताना होणाऱ्या उजळणीमुळे, तो तो विषय, जीवन जगण्यासाठी गरजेचे असलेले तत्वज्ञान, आपल्या मनावर चांगले ठसते. आणि जनसामान्यांच्या नित्याच्या व्यवहारातील उदाहरणांचा धागा पकडून, ते त्यांच्यासमोर सुलभतेने मांडण्याच्या श्रीजींच्या ठाई असलेल्या हातोटीमुळे, परिणामकही होते.

जीवनात ईश्वराची आवश्यकता का आहे? ईश्वराचे आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक स्वरूप, तो आपल्यातच आहे व तो कसा ओळखावा? जगावे आणि त्याचबरोबर मरावे कसे? कोणता आहार आणि कसा घ्यावा, इत्यादी प्रश्नांची उत्तरे शास्त्र आणि पुराणातील अनेक अनेक संदर्भ देऊन, श्रीजीं ह्या प्रवचन मालिकेच्या माध्यमातून जनमानसांवर सुसंस्कारच केले. मानवी जीवनाला समृद्ध करणारी, पण जनसामान्यांना माहीत नसलेली जीवन जगण्याची कलाच, जणू ह्या प्रवचन मालिकेच्या निमित्ताने श्रीजींनी समजावून सांगितली.

ही प्रवचने इतकी सरळ आणि सहज होती की, अगदी पाच-सहा वर्षाच्या मुलांनीही त्यात प्रत्येक दिवशी समरसून सहभाग घेतला आणि प्रवचनाच्या अनुषंगाने शेवटच्या दिवशी श्रीजींना प्रश्न विचारले. आणि अर्थातच श्रीजींनीही प्रसंगी बालक होऊन, त्यांचे सम्यक समाधान केले. यातच श्रीजींची प्रवचन समजावून सांगण्याची सहजता उद्धृत होते.

प्रकृती अस्वास्थ जरी असले तरी, समोर विराट जनसमुदाय असला की, श्रीजींना स्फुरण येते आणि चैतन्याचा हा अविष्कार आपल्याला त्यांच्या देहबोलीतून आणि अखंड पाझरणाऱ्या वाणीतून अनुभवता येतो. प्रवचनादरम्यान श्रीजींचे, त्या परमात्म्याशी असलेले तादात्म्य अनुभवता येते. प्रवचनानंतरही येणाऱ्या सर्व भाविकांना अत्यंत प्रसन्नतेने सामोरे जाणे, त्यांना हवा तसा अत्यंत आवश्यक असलेला, संपूर्ण आधार देणे आणि त्यातच आनंद मानणे हे सद्गुरूंच्या ठाई असलेले सद्गुणही ह्या प्रवचन मालिकेदरम्यान अनुभवता आले. अनेक सदभक्तांनी दिलेल्या दुर्मिळ प्रेमळ भेटवस्तूही सकलमत संप्रदायाचे तत्वज्ञान जनमानसांमध्ये रुजत असल्याचेच द्योतक होते.

संसाराच्या रहाटगाड्यांमध्ये अडकून पडलेल्या, विचार आणि विकारांच्या दावणीला बांधलेल्या आम्हा जनसामान्यांना सहजमुक्तीची वाट दाखविणाऱ्या, आमच्या मनावर तसे सुसंस्कार करून, आपल्या ज्ञानदानाने आमची झोळी भरभरून आम्हाला ज्ञानसंपन्न करणाऱ्या, आमच्या जीवनाची दशा बदलून त्याला सुयोग्य दिशा देणाऱ्या, ह्या ज्ञानियांच्या राजाप्रती कृतज्ञता आणि त्यांच्या परममंगल चरणी अनंत कोटी नमन!

श्रवणाची पर्वणी

सच्चिदानंद सद्गुरु श्री ज्ञानराज माणिक प्रभु यांची श्रीमद्भगवद्गीतेवरील चार प्रवचने ऐकण्याचे परम भाग्य मला लाभले. त्या श्रवणाच्या चिंतनातून ज्या विशेष विचारांची पकड माझ्या मनाने घेतली, त्यातील काही गोष्टी येथे उद्धृत करते. श्रीजींनी प्रथमतः हिंदूंचा धर्म हा सनातन आहे की ज्याला आदि नाही आणि अंत नाही, हे पटवून दिले. त्यामुळे माझा हिंदू धर्म कितीही आपत्ती आल्या, तरी नष्ट होणार नाही, असा ठाम विश्वास मनामध्ये ठसला.

श्रीजींची समजावून देण्याची पद्धती अप्रतिम आहे. श्रीमद्भगवद्गीतेचे आपल्या जीवनात महत्त्व काय, हे समजावून देताना, श्रीजींनी वॉशिंग मशीनचे उदाहरण देऊन सांगितले की, ते मशीन घेताना त्याच्याबरोबर एक मॅन्युअल येते. त्यात त्या मशीनची माहिती व ते व्यवस्थित रितीने कसे चालेल, याची माहिती दिलेली असते. तसेच या शरीररुपी यंत्राचे मॅन्युअल श्रीमद्भगवद्गीता आहे. शरीर ही भगवंताची करणी आहे, आणि गीता भगवंतांनी स्वतः सांगितलेली आहे.

जीवनात तरी ईश्वराची आवश्यकता का आहे? यावर भाष्य करताना पूज्य श्रीजींनी ईश्वराचे स्वरूप सच्चिदानंद सच्चिदानंद कसे आहे व त्याचे माणसांमध्ये कसे तादात्म्य असते, ते अगदी सोप्या भाषेत समजावले.

१. सत् – मी सदा सर्वदा असावे, ही प्रत्येक माणसाची इच्छा असते. हीच सत् (to be)ची इच्छा आणि सत् (अस्तित्व) हे ईश्वराचे स्वरूप आहे.

२. चित् – प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा (स्फुरण) आहे. ही जाणीव (संवित्) हे ईश्वराचे स्वरूप आहे.

३. सदा सर्वदा सुखी असावं, ही माणसाची इच्छा! ईश्वर हा सुखस्वरूप आहे.

इथे एक आश्वासन महाराजांनी दिले की, ज्यावेळी आपल्याला सुख होते, त्यावेळी तो ईश्वराचा साक्षात्कार समजावा. हे माणसाचे धैर्य, बल आणि उत्साह वाढवणारे महावाक्य आहे, असे मला वाटते.

तेव्हा ईश्वर आपल्यातच आहे, हे परमपूज्य श्रीजींनी निर्देशित केले. परमपूज्य श्रीजींनी ईश्वराची जीवनामधील गरज हा विषय एक वेगळ्या दृष्टिकोनातून समजावून दिला. ईश्वराचे रूप हे त्रिविध प्रकारचे (आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक) आहे. हा दृष्टिकोन माझ्यासाठी नवीनच होता. वरील त्रिविध प्रकार, त्रिविध तापांचे असतात हे माहीत होते. परंतु, ईश्वराचे स्वरूपही याच प्रकारचे आहे, हे विचारांना चालना देणारे ठरले.

१. वर सांगितल्याप्रमाणे सत् चित् आनंद हे त्याचे आध्यात्मिक स्वरूप आहे.

२. त्याचे आधिदैविक रूप विशद करताना, परमपूज्य श्रीजींनी गीतेच्या सातव्या अध्यायातील रसोऽहम् अप्सुकौंतेय या श्लोकावर भाष्य केले. पाण्याचे द्रवत्व, चंद्र सूर्यातील प्रभा, आकाशातील शब्द, पुरुषातील पुरुषत्व आणि स्त्री मधील स्त्रीत्व, ही सर्व माझीच रूपे आहेत. अग्निमधील उष्णता मी आहे आणि ती जर नसली तर अन्न कसे शिजेल? बुद्धिमतांची बुद्धी मी आहे. असे असल्याने, पुन्हा एकदा ईश्वर आपल्यातच आहे, हेच परमपूज्य श्रीजींनी सांगितले.

३. ईश्वराचे आधिभौतिक रुप – जसे जीवनात आधारासाठी सशक्त आणि सदैव मिळेल असा खांदा लागतो, जसे गंगेमधील साखळ्यांना धरून वाटेल तेवढ्या बुड्यात मारता येतात, साखळी सुटली तर वाहून जाण्याची भीती असते. तसेच जगामध्ये ईश्वराने सुव्यवस्था केली आहे. जसे वेळेवर सूर्योदय होणे, वेळेवर पाऊस येणे, आंब्याच्या झाडाला आंबाच लागणे, या सुव्यवस्थेचा नियंता ईश्वर आहे व सर्व जगत् ईश्वरांमध्येच ओवलेले आहे. जसे ‘सूत्रे मणिगणाइव’. इथे पुन्हा परमपूज्य श्रीजींनी, ईश्वर आपल्यातच आहे हेच दाखवून दिले आहे. म्हणूनच ईश्वराची नितांत गरज आहे, त्यासाठी सर्व संतांनी जे आवर्जून प्रतिपादिले तेच पूज्य श्रीजींनी सांगितले, भावाने नामस्मरण करावे.

परमपूज्य श्रीजींचे प्रवचन म्हणजे संतवचनांच्या श्रवणाची पर्वणीच होती. त्यातही परमपूज्य श्रीजींच्या विनोदबुद्धीमुळे तत्वज्ञानामधील कठीण प्रमेये हसत खेळत सामान्यांच्या गळी उतरविणे, ही किमया श्रीजीच करू जाणे. श्रीजींचे प्रवचन जागरूकतेने आणि प्रसन्नतेने सर्व श्रोत्यांनी अथपासून इती पर्यंत ऐकले परमपूज्य श्रीजींच्या पावन चरणी कोटी कोटी प्रणाम