भाग सहावा

आज सकाळी श्रीप्रभुमंदिरातील काकड आरती आटोपून दुपारी परतीचा प्रवास म्हणून सामान आवरून घेतले. माणिक विहारच्या प्रवेशद्वारावर असलेल्या प्रकाशदादाच्या टपरीवर चहा घेतला. आज महबूब सुबहानी दर्गा, माणिक पब्लिक स्कूल व सिद्धराज क्रिकेट ग्राऊंडचा फेरफटका मारायचे ठरविले होते. नाश्ता करून प्रभु दर्शन घेतले. आज श्रीप्रभु एकदम नखशिखांत नटला होता, इतका की त्याच्या वर्णनासाठी शब्द अपुरे पडावेत. रोजचा साज कसा असावा ही प्रेरणाही बहुतेक त्याचीच असावी. वस्त्रांची सुरेख पण तितकीच मनमोहक रंगसंगती, फुलांची सुबक मांडणी, शिरपेचातील सुवर्णफुल, गळाभर रूळणारी माळ श्रीप्रभुसमाधीची शोभा अजूनच वाढवते. विशेष प्रसंगी विशेषतः राजोपचार पूजेच्या वेळी प्रभुसजावटीचा थाट काही औरच असतो. असो.

श्रीप्रभूंचे गुणगान करीत श्रीव्यंकम्मा मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दर्गा, शाळा व क्रिकेट ग्राऊंड प्रभुमंदिरापासून जवळच सातशे मीटरवर आहे. चालत निघालो, वाटेत एका मोटरसायकलवाल्याला विचारले, त्याने थेट मेहबुब सुबहानी दर्ग्यावर सोडले. माणिकनगराच्या उत्तरेला हा दर्गा आहे. श्रीमाणिकप्रभूंना त्यांचे मुसलमान भक्त महबूब सुबहानीचा अवतार मानीत. आपल्या समाधीनंतर हिंदू मुसलमानांमध्ये तंटा होऊ नये म्हणून श्रीमाणिकप्रभूंनी आपल्या डोक्यावरील मंदिल देऊन या ठिकाणी स्वतःचीच तुरबत उभारली. मुसलमान लोक स्वतःच्या धर्मपरंपरेनुसार येथे उपासना करतात. परिसरात छान चिंचेचे झाड आहे. माझ्या मनातील इतर धर्मांतील जरी काही अनादर असलाच तर तो दूर होऊन तो आदरामध्ये परावर्तीत होवो, अशी मनोमन प्रार्थना करून नतमस्तक झालो.

रस्ता ओलांडल्यावर दर्ग्याच्या विरुद्ध बाजूलाच माणिक पब्लिक स्कूल आहे. श्री सिद्धराज माणिकप्रभूंचे शिक्षण ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूलमध्ये झाले होते. असे दर्जेदार शिक्षण माणिकनगर परीसरातील मुलांनाही मिळावे म्हणून श्रीसिद्धराज माणिकप्रभूंनी १९७२ साली हे इंग्रजी माध्यमाचे माणिक पब्लिक स्कूल चालू केले. मुख्य प्रवेशद्वारावरून जाऊ का बरे असा विचार मनात आला. पण परवानगीशिवाय शाळेत आत जाणे योग्य वाटले नाही. म्हणून मोर्चा थेट पुढे क्रिकेट ग्राऊंडकडे वळवला. शाळा व क्रिकेट ग्राऊंड अगदी जवळ आहे. मुख्य रस्त्यातून डाव्या बाजूला वळण घेतानाच शाळेचे संगीत शिक्षक श्री अजयजी सुगावकर समोरच दिसले. त्यांनी हाक मारून बोलावले. आज शाळेत बहुतेक परिक्षा होती, त्यामुळे ते गडबडीत होते. पण त्याही परिस्थितीत त्यांनी अत्यंत आत्मीयतेने संगीताची खोली उघडून दाखवली. शाळा आपण पाहू शकता हे ही सांगीतले. शाळेच्या प्रांगणात आलो. समोरच श्रीमाणिकप्रभूंचा मनोवेधक पुतळा होता. १९७२ पासून ही शाळा १००% निकाल देत आली आहे. माणिकनगराबाहेरील श्रीमाणिकप्रभुभक्तांपेकी खूप जणांनी आपल्या मुलांना ह्या शाळेत शिक्षणासाठी ठेवले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुमंगला जागीरदार ह्या श्रीज्ञानराजप्रभु महाराजांच्या भगिनी आहेत. अत्यंत प्रेमळ, मनमिळावू स्वभावाच्या मॅडमशी माझ्या मागील दोन दिवसांत परीचय झाला. शाळेचा परिसर भव्य आहे. पुढील वेळीस सवड काढून शाळेला भेट द्यायचे ठरवून सिद्धराज क्रिकेट मैदानाकडे आलो. श्रीआनंदराज प्रभूंना क्रिकेटची फार आवड आहे. हे क्रिकेट ग्राऊंड जणू त्यांच्याच ध्यासाची स्वप्नपूर्ती आहे. हिरवेगार, गोलाकार असे मैदान पाहून मन हरखून जायला होते. येथे जिल्हास्तरीय सामने चालू होते. आताशा येथे घडलेले काही खेळाडू कर्नाटक राज्याकडून खेळताहेत. एकदोन षटकांचा खेळ पाहून परतीच्या वाटेवर लागलो. येताना पुन्हा एक मोटरसायकलवाला भेटला, त्याने प्रभुमंदिरापाशी सोडले. रूमवर जाऊन  पुन्हा स्नान केले व सामानाची बांधाबांध करून पुन्हा श्रीप्रभुमंदिरात आलो. थोड्या वेळाने निघायचं म्हणून आतून गलबलायला झालं. प्रयत्न करूनही हुंदके थांबत नव्हते, शेवटी बांध फुटलाच. हलके होईस्तोवर अश्रूंना वाट मोकळी करून दिली. करुणाकर, भक्तवत्सल प्रभू आपल्या प्रेमभरित नजरेने माझ्याकडे पाहत होता.

श्रीमाणिकनगरातून निघताना भक्त श्रीजींना सांगून निघतात. श्रीजीही त्यांना प्रसाद देतात. पुढच्या वेळेस येईपर्यंत हा प्रसाद जवळ ठेवायचा असतो. श्रीमाणिकनगरी पुन्हा आल्यावर हा प्रसाद खायचा अथवा खराब झाल्यास विसर्जीत करायचा. जणू काही पुढच्या भेटीस येईस्तोवर श्रीप्रभूने घेतलेली भक्ताची जबाबदारीच होय. मी श्रीजींना भेटावयास त्यांच्या घरी गेलो. माझी संध्याकाळी चारची गाडी होती. आदल्या दिवशी श्रीचैतन्यराज प्रभूंनी किती वाजता आणि कसे निघायचे ह्याचे मार्गदर्शन केले होतेच.

श्रीजी माध्यान्ह पुजेसाठी अजून यायचे होते. थोड्यावेळाने श्री आनंदराजप्रभूंच्या सौभाग्यवती सौ ममतावहिनी आल्या, मला पाहताच म्हणाल्या, आपण माणिकनगरांत पहिल्यांदा आलेले दिसताहेत. त्यांना नमस्कार करून माझी ओळख करून दिली. ह्या श्रीचिद्घनप्रभूंच्या मातोश्री, त्यामुळे ओळख करून देताना फारसे कष्ट पडले नाही. श्रीजी कुटुंबियांचे प्रभुभक्तांवर किती लक्ष असते हेही ह्यातून दिसते. श्रीजी येताच माध्यान्हपूजा सुरू झाली. नुकताच प्रभुमंदिरात अश्रूंचा बांध मोकळा झालेला तरी येथेही मनाची विचित्र परिस्थिती झाली होती. डोळ्यांच्या कडा सतत ओलावत होत्या. गेल्या चारपाच दिवसांत मी येथे खूपच रूळलो होतो,  किंवा श्रीप्रभुचरित्रातून ज्याप्रकारे श्रीमाणिकप्रभु व त्यांच्या नंतरचे आचार्य उमगले कदाचित हा त्याचाच परिपाक असावा, येथून आज निघावेसेच वाटत नव्हते. मनातील द्वंद्व घनघोर होत चालले होते. समोर श्रीजी शिवलिंगावर पाण्याची संततधार धरत होते आणी मी डोळ्यांतून. पूजा आटोपल्यावर मूकपणे प्रसाद घेतला. श्रीजींना आज निघतोय हे सांगतानाही स्वर कातर झालेला. एकदा का सदगुरू माया करू लागला की त्याच्या मायेतून सहज अलिप्त होणं कठिण असतं. दुपारचा प्रसाद घ्यायला गेलो खरा पण घशाखाली फार काही उतरलं नाही. आत भावनेचा प्रचंड कोलाहल माजलेला. हात, ताट धुवून परत प्रभुमंदिरात आलो. कर्पूर आरती केली. श्रीप्रभूंच्या अपार मायेबद्दल, निर्व्याज्य प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व दर्शनासाठी पुन्हा लवकर बोलवण्याची विनंती केली. गाभाऱ्यात लोभसपणे विराजमान झालेल्या प्रभुला पाहून साष्टांग नमस्कार केला. श्रीभक्तकार्यकल्पद्रुम महामंत्राचा जयघोष करत जड अंतःकरणाने परतीच्या मार्गाला लागलो. मनात उपदेशरत्नमालेतील ओळी घोळत होत्या. चैतन्य देवा हीच प्रार्थना। एकचि तूं दिससी नाना.

श्रीमाणिकप्रभूंच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या ह्या पवित्र भूमीत आपणांस वारंवार किंवा किमान एकदा तरी येण्याची प्रेरणा मिळो ह्या श्रीप्रभुचरणांच्या नम्र विनंतीसह, श्रीगुरू माणिक, जय गुरू माणिक….

समाप्त.

[social_warfare]