भाग पाचवा

आज रविवार, श्रीप्रभुसन्निध्यातला चौथा दिवस. आजही अगदी पहाटेच जाग आली, अगदी पावणेपाचलाच. एरव्ही घरी असताना प्रपंचात गढलेला माणूस थोडासा आळसावलेला असतो, पण ज्या स्थानांत चैतन्याची कारंजी थुईथुई नाचत असतात तेथे मनाबरोबर शरीरही ताजेतवाने असते. बाहेर येऊन श्रीप्रभुमंदिराच्या कळसाला पाहून नमस्कार केला. तयार होऊन पुन्हा काकड आरतीसाठी श्रीप्रभुमंदिरात पोहोचलो. आज आसमंतात सूर्य वेगवेगळे रंग भरत होता. प्रदक्षिणा झाल्यावर समोर पाहिले तर सूर्य नुकताच उगवत होता. महाद्वाराच्या कमानीतून लोभसपणे डोकावत होता. श्रीप्रभुमंदिर परीसरातून वेगवेगळ्या जागेतून मी सूर्याला महाद्वाराच्या तीन कमानीपैकी मधल्या कमानीत ठेवून फोटो काढण्याचा निष्फळ प्रयत्न केला, कितीतरी वेळ. जागा बदलल्या, मोबाईलचे कोन बदलले पण व्यर्थ. कदाचित मधल्या कमानीची,मुख्य जागा कोटिसूर्यांचे तेज असलेल्या, श्रीमाणिकप्रभुंची आहे, हेच जणू तो मला सुचवत होता. आजही पारिजातकाची ओंजळभर फुले आणून प्रभुमंदिरात दिली, अभिषेक संकल्प केला. श्रीप्रभुमंदिर गाभाऱ्यातील समया साफसफाईसाठी बाहेर आणल्या होत्या. एका माणसाला उचलायला जड होतील इतक्या मोठ्या त्या समया होत्या. मला ह्यात पितळेची छोटी फुले ठेवलेली दिसली. ह्याफुलांत वात लावतात. समई लावल्यावर वातीतून खाली ओघळणारे तेल ह्याने टाळता येते. छोट्या छोट्या गोष्टींतून खूप काही शिकता येते. मला ही संकल्पना खूप आवडली.  आज श्रीप्रभूंचा साजही अत्यंत आकर्षक होता. लाल रंगाच्या वस्त्रांवर हिरव्या रंगाची सोनेरी नक्षीदार शाल श्रीप्रभूंची शोभा वाढवत होती. मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील श्रीदत्तप्रभूंचे तैलचित्रही फारच सुंदर आहे.

आज सिद्धराजप्रभु आराधना होती. नाश्त्याला वेळ होता म्हणून व्यंकम्मा मंदिरात जाऊन आलो. आईच्या सान्निध्यात आज जरा जास्तच रंगाळलो. श्रीव्यंकम्मा मंदिराचे बांधकाम स्तिमित करत होते. कमानीचे दगड अत्यत सफाईने तासून बसवले आहेत. एकंदर शांत व प्रशस्त जागा शहराच्या कोलाहलापासून मला शांत करत होती. काल परमयोगिनी श्री व्यंकम्मा मातेचे चरित्र विकत घेतले, ते चाळत बसलो. घड्याळात लक्ष गेले, बापरे साडे नऊ झालेले. लगेच श्रीप्रभुमंदिर परीसरात आलो. श्रीजीमहाराज घराच्या व्हरांड्यात बसले होते. तेथे जाऊन त्यांना नमस्कार केला. सकाळी आणी संध्याकाळी श्रीजी थोडावेळ नित्य व्हरांड्यात बसतात, भक्तांना सहज उपलब्ध असतात. श्रीजींचं हे साधेपण मनास खूप भावलं. आज श्रीजी मुंबईच्या श्री शिरीषदादांशी काही महत्वाच्या विषयांवर बोलत होते. मला त्यांनी त्यांच्या ऑफीसात बसण्यास सांगीतले. आजवर कधीतरी झूम मिटींगमध्ये पाहिलेले श्रीजींचे ऑफीस प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. आत श्री माणिकप्रभु इत्यादींच्या तसविरीबरोबरच श्रीसिद्धराज माणिकप्रभूंचे भव्य तैलचित्र मन वेधून घेत होते. मी आत माझं नामस्मरण चालू ठेवल. श्रीसिद्धराज प्रभूंच्या डोळ्यांतून माया पाझरत होती आणि तीच माया हळूहळू माझ्या डोळ्यांच्या कडा ओल्या करत होती. श्रीमाणिकप्रभु व त्यांच्या नंतरच्या प्रत्येक उत्तराधिकाऱ्यानी स्वतःच घर उन्हात बांधून इतर जनांस आश्रय दिला, सावली दिली. सिद्धराजप्रभूंचे कार्य व लीला आठवून गद्‌गद व्हायला होत होते. तासाभराने श्रीजी ऑफीसात आले. माझ्याकडे कटाक्ष टाकून पहिला प्रश्न केला, ‘प्रणिल, आपने कुछ खाया?’ नेमका आजच माझा नाश्ता चुकला होता. प्रामाणिकपणे नाही म्हणालो, तसे मला घरात घेऊन गेले. सूनबाईंना मला आधी नाश्ता देण्यास सांगीतले. लगेचच चिवडा, सुशिला (हा कर्नाटकात कुरमुऱ्यांचा पोह्यासारखा बनविलेला पदार्थ) पेढे असा पोटभर नाश्ता मिळाला. वर गरमागरम चहा. व्यक्ती देण्याघेण्याने नव्हे तर आपल्या वागणूकीने, आचरणाने व प्रेमळ शब्दांनी मनात घर करते. श्रीजी आणि त्यांच्या परीवारातील सदस्यांशी जुळलेल्या स्नेहबंधाचे, अनेक प्रभुभक्तांच्या श्रीसंस्थानाशी जुळलेल्या नाळचे नेमके  हेच मर्म आहे. पदोपदी प्रेम अनुभवायास मिळते. एकचि सर्वांतरी हो आत्मा… ह्या पदाची श्रीमाणिकनगरात जागोजागी प्रचिती येते. माध्यान्हकाळी श्रीप्रभूंना माधुकरी भिक्षेचा नैवेद्य दाखवला जातो. श्रीमाणिकप्रभु स्वतः माधुकरी मागून भिक्षान्न स्वीकारत होते, चरित्रात असा उल्लेख आहे. श्रीप्रभुसंस्थानाने आजही ती परंपरा जपली आहे. आजही श्रीप्रभुनैवेद्यात भोवताली पंचपक्वान्ने जरी असली तरी मध्यभागी झोळीतले भिक्षान्नच असते. दुपारच्या प्रसादामध्ये झोळीतले ही भिक्षा भक्तांना वाटली जाते.

आज सायंकाळी मुक्तिमंटपात श्रीसिद्धराजप्रभूंची आराधना होती. भजनाची आजही रेलचेल होती. श्रीप्रभुसंस्थानाचे तृतीय आचार्य श्रीमार्तंड माणिकप्रभु व चतुर्थ आचार्य श्रीशंकर माणिकप्रभूंचे एकत्र देवालय म्हणजे मुक्तिमंटप. शुभ्र संगमरवरी दगडांनी बांधलेला हा मुक्तिमंटप हा शिल्पकलेचा नितांत सुंदर नमुना आहे. श्रीसिद्धराज प्रभूंच्या दैदीप्यमान कारकिर्दीत हा मुक्तिमंटप १९७० साली बांधला गेला. श्रीमार्तंड माणिकप्रभु आणि श्री शंकरमाणिकप्रभु ह्यांच्या समाध्या दोन बाजूस आहेत आणि मधोमध चैतन्यलिंग महादेवाची स्थापना केली आहे. आराधनेचा कार्यक्रम ह्या मुक्तिमंटपातच पार पडला. आजही सर्वांना तीर्थ मिळाले. वेदांतातील अद्वैत सिद्धांताच्या तिर्थक्षेत्री, भजनानंदात न्हाऊन गेल्यावर, श्रीजींच्या हातून मिळालेले तीर्थ प्राशन करताना, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ‘धन्य धन्य अति धन्य धन्य, आम्ही झालो पूर्णानंद’ असाच भाव होता.

सायंकाळी श्रीप्रभु पश्चिम क्षितीजावर मुक्तहस्ते रंग उधळत होता. गर्द जांभळ्या, काळ्या रंगाची ही मनस्वी उधळण पाहताना अगदी हरखून जायला होत होते. आजही श्रीजींच्या घरी भोजनाचे निमंत्रण सर्व भक्तांना होते. भारतीय बैठकीत, केळीच्या पानंवर भारतीय पद्धतीच्या भोजनाची मजा औरच आहे. कालच्या प्रमाणेच साग्रसंगीत भोजन होते. जेवल्यानंतरही शुद्ध घरगूती तुपाचा वास व स्निग्धता हातावर रेंगाळत होती. आज मुंबईच्या आयुर्वेदिक डॉक्टर जोशींचा परीवार पक्तींस साथसोबत करत होता.

जेवल्यानंतर श्रीप्रभुमंदिरात भजन होते. श्रीप्रभुमंदिरात जांभळ्या सतरंजीवर लाल गालीचा अंथरला होता. श्रीजींच्या बैठकीसाठी  पिवळ्या रंगाची गादी तयार केली होती. मशालीच्या उजेडात, श्रीजींचे सवाद्य आगमन झाले. आरती, भजन सुरू झाले. आज मल्हारी म्हाळसाकांताचे भजन होते. जसजसा भजनाला रंग चढत होता, तसतसा वाद्यांचा गजर अधिक तीव्र होत होता. श्रीआनंदराज प्रभु आपल्या दैवीसुरांत सुरेल भजने म्हणत होते, श्री अजयजी ताना घेत होते. भजन टीपेस पोहोचल्यावर श्रीजीं हातात झांज घेऊन भजनरंगी रंगले. अवघा आनंद सोहळा. स्वर्गसुख येथे अनुभवता येते. ही वेळ संपूच नये असे वाटत होते. ह्या भजनकल्लोळाने श्रीप्रभुही आनंदला होता. सकाळी बांधलेली फुलांची पूजा रात्री उशीरापर्यंतही तशीच टवटवीत असते हे गेले चारही दिवस पाहिले होते. चैतन्याच्या सहवासात ती फुलेही टवटवीत राहत असावीत. कुरमुरे खोबऱ्याचा प्रसाद वाटला गेला, शेजारती झाली. श्रीप्रभुमंदिराची द्वारे बंद झाली. जो तो आपापल्या विश्रामस्थानी परतला. उद्या परत निघायचे म्हणून आज प्रभुमंदिर परिसरातच शरदाचं चांदणं पीत पायऱ्यांवर रेंगाळत बसलो. क्रमशः …

[social_warfare]