गुरुदक्षिणा

गुरुपौर्णिमा जरी गुरुला समर्पित असली, तरी गुरु हा अपेक्षारहित असल्याने त्याला शिष्याने आपल्या करिता त्या दिवशी काही विशेष करावे अशी आकांक्षा नसते. म्हणून ह्या दिवसाचे महत्त्व शिष्यालाच अधिक असते! किंबहुना ते असलेच पाहिजे! कारण हा दिवस आहे आपल्या गुरु प्रति आपले आदर, प्रेम आणि आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा. आपल्या गुरुचे आपल्यावर किती उपकार आहेत, किती ऋण आहे, ह्याची स्वतःलाच जाणीव करून देण्याचा. आपला हा आदरयुक्त प्रेमभाव आणि ही कृतज्ञतेची जाणीव गुरुदक्षिणेच्या माध्यमातून आपण गुरु पर्यंत पोहोचवावी ही परंपरागत रूढी.

परंतु ऋण असते ते व्यावहारिक गुरुंचे, सद्गुरुंची असते ती फक्त कृपा! अखंड, अविरत, अक्षय कृपा! आणि म्हणून सद्गुरुला गुरुदक्षिणा तरी काय देणार आपण?

आध्यात्मिक स्तरावर पाहता आपले असे काय आहे, जे आपण गुरुदक्षिणा म्हणून सद्गुरुला अर्पण करावे? “गुरुजीने मज बोलणे खुंटविले” ह्या पदामध्ये प्रभु स्वतः म्हणतात-

कोण मी पुसताची मजमाजी मजला।त्वरितचि भेटविले।।

आपली स्वतःची ओळखच  जिथे सद्गुरुशिवाय शक्य नाही, तिथे व्यवहारातील वस्तुंच्या गुरुदक्षिणेची वाच्यता तरी काय करावी?

व्यावहारिक पातळीवर सर्वस्व जरी सद्गुरुला अर्पण केले तरी कमीच आहे. त्यामुळे जे काही आहे ते सद्गुरुंचेच आहे अशा भावनेने तन- मन-धनाने जी शक्य होईल, ती गुरुसेवा करत रहावी. अर्थात तशी सेवा घडण्याकरिता देखिल पुन्हा सद्गुरुकृपाच हवी!

पण खरंच सद्गुरुला काहीच अपेक्षा नसते का शिष्याकडून? असते न, एवढीच अपेक्षा असते की त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा शिष्याने अवलंब करावा, त्यांची शिकवण मनात खूप खोलवर रुजवून, त्यांच्या तत्त्वांना शिष्याने आपले जीवन-सिद्धांत बनवावे.. आणि ही अपेक्षा सुद्धा कशाकरिता, तर शिष्याच्याच आध्यात्मिक उत्कर्षाकरिता! कारण असे केल्याशिवाय हा भवसागर पार करून जाणे अशक्य आहे. प्रभुंनी दुसऱ्या एका पदात समजावलेच आहे-

लाग लाग सख्या गुरु पायी।
तया वाचुनि तुज गती नाही रे।।

महाराज, आपल्या शिवाय आम्हाला अन्यत्र ठाव नाही, किंबहुना तशी गरजच नाही. आमच्या जीवनाची समृद्द्धता आणि सार्थकता दोन्ही आपल्या कृपेनेच संभवत आहे. आपण दिलेले धडे वारंवार गिरवणे हीच आपल्या चरणी अर्पण केलेली गुरुदक्षिणा.

प्रभु प्रेरणेने सुचलेली ही छोटीशी कविता सुद्धा आपल्या प्रवचनातील तीन मनोरंजक व उद्बोधक दृष्टान्तांमधुनच साकारली आहे. ती गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या चरणी सादर सप्रेम समर्पित करते

गुरु पाहिजे

एक छोटं शावक
मेंढरांसह वाढलं
चारा चरत, “में में” करत
मेंढरुच भासू लागलं
त्या घाबरल्या, अन् बावरल्या
मिथ्या अश्या मेंढराला
“अरे मेंढरु नाही, तू सिंह आहे”
हे दर्शविण्यास, हे पटविण्यास
गुरू पाहिजे

एक जुनाट तलवार
म्यानात पडून राहिली
अगणित कालापर्यंत
तिथेच अडून राहिली
त्या थिजलेल्या, अन् गंजलेल्या
मूल निर्मल तलवारीला
घासून-पुसून, निवांत बसून
गंज काढण्यास, शिकलगारसा
गुरू पाहिजे

एक अजब से तिढे
वाटणीस १९ घोडे
अर्धे, पाव, एक पंचमांश
कसे सुटावे कोडे
त्या एकोणीस मधे मिळविल्यास
२०वा घोडा, सुटे हा तिढा
सहज सोडवून, २०वा घेऊन
जाई परतून जो अलिप्त होऊन,
तो गुरू पाहिजे

दास्य भक्तीचे सर्वोत्तम उदाहरण

 

श्री ज्ञानराज माणिकप्रभु म्हणतात की हनुमान म्हणजे दास्य भक्तीचे सर्वोत्तम उदाहरण.
हनुमानाच्या मुखी सतत रामनाम असते, श्री रामाच्या सेवेत तो सर्वकाळ तत्पर असतो. त्याचे हृदय रामाच्या स्वरूपाने, रामभक्तीने ओतप्रोत भरले आहे.
हा नामजप, हा सेवाभाव, ही निष्काम भक्ति आपण काही अंशी जरी स्वतः मधे उतरवू शकलो, तर अध्यात्म मार्गावर आपली निश्चितच खूप प्रगती होईल.
नाम कुणाचे घ्यावे, तर आपल्या आराध्याचे. आणि श्री गुरु संप्रदाया मध्ये म्हटल्या प्रमाणे “जो स्थापी सकलमता, तीची गा अभिमानी देवता, गुरु उपासना कुल देवता, सर्वहि भक्ता श्री माणिक”. त्यामुळे चालता, बोलता, उठता, बसता, कोणतेही काम करत असताना, सर्वकाळ माणिक नामाचा जप आपण अंतरी चालू ठेवावा. असे नामस्मरण म्हणजे पथ्य, पण आपला भवरोग इतका बळावलेला आहे की गुरूमंत्र रूपी औषध सुद्धा नित्य नेमाने आपण घेत राहिले पाहिजे. ही शिकवण सुद्धा सद्गुरु ज्ञानराज महाराजांचीच.

आणि म्हणूनच भवजल डोहातून तारून नेणाऱ्या प्रभुच्या नाविक शक्तीची ओळख दाखविणाऱ्यां आपल्या सद्गुरुची मूर्ती आपण मनात तितकीच जपली पाहिजे, जितकी साक्षात श्री प्रभुची, जितकी हनुमानाने श्री रामाची.
हळू हळू मग “एकं सद्विप्रा बहुधा वदंति” ह्याची खात्री पटून आपल्याला गणपती, विष्णू, महेश आणि आपले प्रभु ह्यांच्यात काही भेदच नाही, ही अनुभूति होते. आणि हा विश्वास सुद्धा दृढ होतो की आपल्या सद्गुरूंच्या रूपाने साक्षात श्री प्रभूंचेच दर्शन ह्याची देही ह्याची डोळा आपल्याला होत आहे.

महाराज म्हणतात की सगूण भक्तिची ही पायरी ओलांडून आपण निर्गुण उपासनेच्या पायरीवर पोहोचायला हवे, जिथे “देवा भक्ता मुळी भेदचि नाही” हा प्रत्यय आपल्याला.
प्रभुंच्या कृपेने, आणि श्री महाराजांच्या शुभाशीर्वादाने आपल्याला सर्वांना हा प्रत्यय लवकरच होवो हीच प्रार्थना मारुती रायाच्या चरणी.

माणिक माणिक जप कर मूरख
ज्यों हनुमंत जपे राम नाम हैं
श्रीगुरु मंत्र तू जप ले मूरख
ज्यों हनुमंत जपे राम नाम हैं

श्री माणिक छवि हृदय बसा ले
ज्यों हनुमंत अंतर मो राम हैं
श्रीगुरु मूर्ति हृदय बसा ले
ज्यों हनुमंत अंतर मो राम हैं

जय माणिक जयघोष करे जा
ज्यों हनुमंत जयकारे राम हैं
श्रीगुरु गुन धुन नित गाये जा
ज्यों हनुमंत जयकारे राम हैं

हर माणिक औ’ हरी माणिक है
माणिक समझ हनुमंत के राम हैं
श्रीगुरु सगुणाकृति माणिक हैं
माणिक समझ हनुमंत के राम हैं

चिन्माणिक सन्माणिक तू बन जा
ज्यों अभिन्न हनुमंत – राम हैं
श्रीगुरु वाणी सदा स्मरत जा
के अभिन्न हनुमंत – राम हैं

जय जय प्रभु सिद्धराज

जय जय प्रभु सिद्धराज।
जय गुरुवर योगिराज।।धृ।।

करूणामय तव कटाक्ष
भक्त रक्षणार्थ दक्ष
कामधेनु कल्पवृक्ष
पुरविसी सद्भक्त काज।।1।।

खेळ-क्रिडा बहु आवडी
शिक्षणाची अतीव गोडी
नगरजनां लावूनि ओढी
स्थापिसी जणू रामराज।।2।।

अवतरी मार्तंड पुनरपि
शंकर-सुपुत्र रूपी
चित्त केंद्रित प्रभु स्वरूपी
म्हणूनी शिरी शोभे ताज।। 3।।

भक्तकार्य कल्पद्रुम

‘‘भक्तकार्य कल्पद्रुम गुरु सार्वभौम…’’ हे शब्द कानी पडताच, किंवा ते मनातल्या मनात अथवा मुखाने म्हणू लागताच, एक अनामिक समाधान अनुभवास येते. प्रभुची मूर्ती डोळ्यासमोर उभी रहाते, आणि मनोमन हात जोडले जाऊन प्रभु पुढे आपण नतमस्तक होतो.

जेव्हां पासून समजायला लागले, तेव्हां पासून ‘‘देव बाप्पाला जयजय कर’’ असे कोणी सांगितले, की हात जोडून मुखाने भक्तकार्यच सुरु व्हायचे. मग तो कोणताही देव बाप्पा असो! हे संस्कार अर्थातच आई-बाबा व आजी-आजोबांचे. आज सुद्धा कोणत्याही विग्रहासमोर उभी राहिले, तरी सहज जो मंत्र म्हटला जातो, तो एकच – श्री प्रभूंचा महामंत्र!

घरातून बाहेर पडण्याआधी प्रभूंचे तीर्थ घेऊन भक्तकार्य म्हणावयाचे हा तर संपूर्ण घरासाठी आजोबांनी नियमच केला होता. आणि परीक्षेसाठी निघताना तर झोळीची भाकरी सुद्धा मिळत असे, व त्याच बरोबर कटाक्षाने आजोबा सूचना करीत की पेपर बघण्याआधी भक्तकार्य म्हण, आणि मगच पेपर सुरु कर. ती सवय सुद्धा आजतागायत तशीच आहे – कुठल्याही छोट्या-मोठ्या कसोटीच्या आधी कळत-नकळत भक्तकार्य सुरु होतेच.

कोणी आजारी असेल, कोणाला कुठे दुखत खुपत असेल, तरी भक्तकार्य महणजे रामबाण उपाय अशी घरी अगदी पक्की धारणा होती. ‘‘आमच्या प्रभूंचा महामंत्र हा रामबाण उपाय आहे’’ असे म्हणून आजोबांनी संप्रदायाबाहेरील सुद्धा किती तरी  लोकांना भक्तकार्याचा परिचय करून दिला होता.

सात वर्षांच्या नातवंडांना सुद्धा झोप लागत नसेल तर त्यांची आजी (माझी आई) सांगते की डोळे मिटून पडून रहा, आणि भक्तकार्य म्हणत रहा, शांत झोप लागेल. संध्याकाळी देवापुढे दिवा लावला की ‘‘शुभंकरोति’’ च्या ही आधी भक्तकार्यच ओठांवर येते. गणेशोत्सव असो वा नवरात्रोत्सव, नित्य आरतीच्या सुरुवातीला भक्तकार्य. मुले जेवायला बसली की आधी भक्तकार्य म्हणतात, आणि मग ‘‘वदनी कवळ घेता’’.

एकुण सार काय, तर भक्तकार्य हे मनास शांती, समाधान तर देतेच, पण त्यासोबत एक विलक्षण ऊर्जा, एक विलक्षण चेतना सुद्धा देते. किती ही आणीबाणीचा प्रसंग असो, त्याला सामोरे जाण्याचे बळ देते. प्रभुशी असलेल्या आपल्या नित्य संबंधाची आठवण करून देते. प्रभुकृपेच्या सतत होत असलेल्या वर्षावाची जाणीव करून देते, आणि त्या वर्षावात चिंब भिजून जाण्याची पात्रता सुद्धा देते.

महाराज प्रवचनात एकदा म्हणाले होते, की त्रयोदश अक्षरी जे मंत्र आहेत, ते तारक मंत्र असतात, उदा. ‘‘श्री राम जय राम जय जय राम’’. आणि आपल्या भक्तकार्या मधे तर परमपूज्य नृसिंहतात्या महाराजांनी तेरा विशेषणांनी प्रभूंचा गौरव केला आहे. म्हणूनच हा त्रयोदश शब्दांचा महामंत्र भक्तांसाठी तारकमंत्र आहे. महाराज असे ही म्हणाले होते की नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ह्यातील प्रत्येक विशेषणाचा निर्देश हा एकाच तत्त्वाकडे आहे, आणि ते तत्त्व म्हणजे – ती एक अखंड परमात्म सत्ता. ते प्रवचन ऐकल्या पासून भक्तकार्याच्या उच्चारणाला एक वेगळा, व्यापक दृष्टिकोण मिळाला आहे. आता प्रत्येक विशेषण उच्चारताना त्या परमात्म्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न होतो, हे फक्त आणि फक्त सद्गुरु श्री ज्ञानराज प्रभु महाराजांच्या अखंड कृपेचे फळ आहे.

शेवटी ‘‘सकलमत स्थापित श्री सद्गुरु माणिकप्रभु महाराज की जय’’ हा पुकारा करताना तर खूप मिश्र भाव मनात येतात. आपल्या सारख्या भक्तांवरील नितांत प्रेमापोटी त्या भक्तवत्सल प्रभुने सकलमत संप्रदाय स्थापन केला, आणि ह्या भवसागरातून तरुन जाण्याची गुरुकिल्लीच आपल्याला भेट केली हे आपले किती मोठे भाग्य – असा कृतज्ञतापूर्ण भाव तर असतोच असतो, पण त्याच बरोबर सकलमताचा हा संस्थापक, संपूर्ण प्राणिमात्राचा हा त्राता – आपल्या अत्यंत निकटतम आहे, आपला सद्गुरू आहे, आपला आहे असा एक प्रेमपूर्ण अभिमान सुद्धा मनात डोकावतो, तसेच प्रभूंच्या जयजयकाराचा हा निनाद सगळ्या विश्वात दुमदुमत राहो अशी प्रामाणिक कळकळ होऊन मन प्रभुलाच प्रार्थना करते की ‘‘जी भक्त प्रतिज्ञा तीच श्री गुरु आज्ञा’’ ह्या श्री मार्तंड प्रभूंच्या उक्ति प्रमाणे आम्हा भक्तांची ही इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न होवो, व प्रभूंच्याच असीम कृपेने त्या प्रयत्नांना सुयश लाभो.

अशा ह्या श्री प्रभूंच्या परम पवित्र, परम मंगल, परमपददायक महामंत्राची महती यथायोग्य वर्णन करण्याची तर माझी योग्यताच नाही. पण त्याविषयी असलेले प्रेम, आस्था, आदर व अभिमान एका छोट्याशा काव्यात गुंफण्याचा एक अतिशय छोटासा प्रयत्न केला आहे. हे एका बालकाचे बोबडे बोल आहेत, असे म्हणून प्रभु हासत हासत, अगदी प्रेमळपणे, हे काव्य स्वीकारील, ह्या विश्वासासह ही रचना त्यांच्या चरणकमली अर्पण करते.

भक्तकार्य कल्पद्रुम श्रीप्रभुचा हा महामंत्र ।
तेच आमुचे ध्यान-जप, तेच आमुचे श्लोक, स्तोत्र ।।

भक्तकार्य कल्पद्रुम श्रीप्रभुचे हे ब्रीदवाक्य ।
श्रुति-स्मृति ते आम्हासि, तेचि आम्हासि महावाक्य ।।

भक्तकार्य कल्पद्रुम श्रीप्रभुची ही ब्रीदावली ।
प्रातःप्रार्थना तीच आमुची ‘‘शुभंकरोति’’ सांजवेळी ।।

भक्तकार्य कल्पद्रुम श्रीप्रभुचा हा जयजयघोष ।
त्याने लाभतसे मानसी स्थैर्य-धैर्य शांती-संतोष ।।

भक्तकार्य कल्पद्रुम श्रीप्रभुचा हा जयजयकार ।
शब्द त्रयोदश मंत्रोच्चार, भवडोही आम्हा तारणहार ।।

झाले चित्र हे परिपूर्ण

श्रीजी एकदा म्हणाले होते की ‘‘माणिकनगर तुझ्या मनात आहे. आपण जिथे आहोत, तिथेच माणिकनगर अनुभवता आले पाहिजे.’’ तेव्हा पासून असा प्रयत्न करण्याचे मनोमन ठरवले.

गेल्या १-२ वर्षांत श्री संस्थाना तर्फे अनेक सामाजिक माध्यमां द्वारे अनेक छायाचित्रे, ध्वनिफीती, चित्रफीती, ई. प्रसारित होत असतात. त्यामुळे माणिकनगरच्या प्रत्येक कार्यक्रमाची छोटीशी का होईना, एक झलक तरी आम्हां भक्तांना मिळत असते. ह्या मुळे माणिकनगरशी आपण सतत जोडलेलो आहोत, ही भावना मनात रूजली गेली आहे. आणि श्रीजींनी सांगितल्या प्रमाणे माणिकनगर अनुभवणे अधिक सहज झाले आहे.

तसेच ह्या प्रसारणांमुळे आम्हाला वारंवार श्रीगुरु दर्शन घडते हे आमचे भाग्यच! छायाचित्र किंवा चित्रफीती द्वारे होणारे श्रीजींचे दर्शन खूप सुखावह असते. दैनंदिन जीवनाच्या धकाधकीत थकलेल्या आमच्या मनाला ते नेहमीच प्रफुल्लित करते. आणि अनेक व्यावहारिक व्यापांमधे अडकुन राहिलेले आमचे मन सद्गुरु प्रति भक्तिभावाने भरून जाते.

काही दिवसांपूर्वी श्रीजींचे असेच एक मनोहर छायाचित्र फोन वर झळकले. अतिशय मनोरम असे वातावरण, संध्याकाळची – बहुधा सुर्यास्ताच्या आसपासची – वेळ, मागे दिसत असलेले प्रभु मंदिराचे शिखर… आणि ह्या सगळ्या नयनरम्य देखाव्यामधे शांत प्रसन्न अशी श्रीजींची छबी. अत्यंत सुखद असा हा गुरु दर्शनाचा अनुभव काव्यात गुंफण्याचा एक छोटासा प्रयत्न, जो श्रीजींच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सप्रेम भेट करते.

ज्ञानराज गुरुमूर्ति देखिली डोळा
झाला सुखाचा सोहळा
सुंदर मनोहर प्रभु माझा सावळा
झाला सुखाचा सोहळा

धोतर सदरा शुभ्र वस्त्र परिधान
दिसले लोभस हे ध्यान
प्रतीचि दिशी असे वळविली मान
दिसले लोभस हे ध्यान

सव्य पदावरी धरीले चरण ते वाम
शरीर-स्थितीत संयम
घडी घातली हाताची भक्कम
शरीर-स्थितीत संयम

सरळ नासिका भव्य कपाळ प्रदेश
प्रभु-छवि बिंबली हृद्देश
श्वेत दाढी अन् श्वेत तयाचे केश
प्रभु-छवि बिंबली हृद्देश

क्षितिजावरती दूर ठरलीसे दृष्टि
ज्योतित प्रभु-तेजाने सृष्टि
रंग-छटा बहु दाही दिशांना वेष्टि
ज्योतित प्रभु-तेजाने सृष्टि

मागे श्री प्रभु मंदिर कळस सुवर्ण
झाले चित्र हे परिपूर्ण
तो प्रभु, हा प्रभु एक सगुण-निर्गुण
झाले चित्र हे परिपूर्ण