गुरुपौर्णिमा जरी गुरुला समर्पित असली, तरी गुरु हा अपेक्षारहित असल्याने त्याला शिष्याने आपल्या करिता त्या दिवशी काही विशेष करावे अशी आकांक्षा नसते. म्हणून ह्या दिवसाचे महत्त्व शिष्यालाच अधिक असते! किंबहुना ते असलेच पाहिजे! कारण हा दिवस आहे आपल्या गुरु प्रति आपले आदर, प्रेम आणि आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा. आपल्या गुरुचे आपल्यावर किती उपकार आहेत, किती ऋण आहे, ह्याची स्वतःलाच जाणीव करून देण्याचा. आपला हा आदरयुक्त प्रेमभाव आणि ही कृतज्ञतेची जाणीव गुरुदक्षिणेच्या माध्यमातून आपण गुरु पर्यंत पोहोचवावी ही परंपरागत रूढी.

परंतु ऋण असते ते व्यावहारिक गुरुंचे, सद्गुरुंची असते ती फक्त कृपा! अखंड, अविरत, अक्षय कृपा! आणि म्हणून सद्गुरुला गुरुदक्षिणा तरी काय देणार आपण?

आध्यात्मिक स्तरावर पाहता आपले असे काय आहे, जे आपण गुरुदक्षिणा म्हणून सद्गुरुला अर्पण करावे? “गुरुजीने मज बोलणे खुंटविले” ह्या पदामध्ये प्रभु स्वतः म्हणतात-

कोण मी पुसताची मजमाजी मजला।त्वरितचि भेटविले।।

आपली स्वतःची ओळखच  जिथे सद्गुरुशिवाय शक्य नाही, तिथे व्यवहारातील वस्तुंच्या गुरुदक्षिणेची वाच्यता तरी काय करावी?

व्यावहारिक पातळीवर सर्वस्व जरी सद्गुरुला अर्पण केले तरी कमीच आहे. त्यामुळे जे काही आहे ते सद्गुरुंचेच आहे अशा भावनेने तन- मन-धनाने जी शक्य होईल, ती गुरुसेवा करत रहावी. अर्थात तशी सेवा घडण्याकरिता देखिल पुन्हा सद्गुरुकृपाच हवी!

पण खरंच सद्गुरुला काहीच अपेक्षा नसते का शिष्याकडून? असते न, एवढीच अपेक्षा असते की त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा शिष्याने अवलंब करावा, त्यांची शिकवण मनात खूप खोलवर रुजवून, त्यांच्या तत्त्वांना शिष्याने आपले जीवन-सिद्धांत बनवावे.. आणि ही अपेक्षा सुद्धा कशाकरिता, तर शिष्याच्याच आध्यात्मिक उत्कर्षाकरिता! कारण असे केल्याशिवाय हा भवसागर पार करून जाणे अशक्य आहे. प्रभुंनी दुसऱ्या एका पदात समजावलेच आहे-

लाग लाग सख्या गुरु पायी।
तया वाचुनि तुज गती नाही रे।।

महाराज, आपल्या शिवाय आम्हाला अन्यत्र ठाव नाही, किंबहुना तशी गरजच नाही. आमच्या जीवनाची समृद्द्धता आणि सार्थकता दोन्ही आपल्या कृपेनेच संभवत आहे. आपण दिलेले धडे वारंवार गिरवणे हीच आपल्या चरणी अर्पण केलेली गुरुदक्षिणा.

प्रभु प्रेरणेने सुचलेली ही छोटीशी कविता सुद्धा आपल्या प्रवचनातील तीन मनोरंजक व उद्बोधक दृष्टान्तांमधुनच साकारली आहे. ती गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या चरणी सादर सप्रेम समर्पित करते

गुरु पाहिजे

एक छोटं शावक
मेंढरांसह वाढलं
चारा चरत, “में में” करत
मेंढरुच भासू लागलं
त्या घाबरल्या, अन् बावरल्या
मिथ्या अश्या मेंढराला
“अरे मेंढरु नाही, तू सिंह आहे”
हे दर्शविण्यास, हे पटविण्यास
गुरू पाहिजे

एक जुनाट तलवार
म्यानात पडून राहिली
अगणित कालापर्यंत
तिथेच अडून राहिली
त्या थिजलेल्या, अन् गंजलेल्या
मूल निर्मल तलवारीला
घासून-पुसून, निवांत बसून
गंज काढण्यास, शिकलगारसा
गुरू पाहिजे

एक अजब से तिढे
वाटणीस १९ घोडे
अर्धे, पाव, एक पंचमांश
कसे सुटावे कोडे
त्या एकोणीस मधे मिळविल्यास
२०वा घोडा, सुटे हा तिढा
सहज सोडवून, २०वा घेऊन
जाई परतून जो अलिप्त होऊन,
तो गुरू पाहिजे

[social_warfare]