श्रीमाणिक ज्ञानयज्ञ सोहळा नाशिक


नाशिक ही प्रभु श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी म्हणजे ‘ रामनगरी ‘ .येथे आयोजित केलेला ‘श्री माणिक ज्ञानयज्ञ सोहळा.’ या सोहळ्याच्या निमित्ताने’ रामनगरी ही कधी माणिकनगरी झाली कळालेच नाही.
तीन दिवस चाललेला हा ‘ज्ञानयज्ञ’ नाशिककरांना अध्यात्माच्या गोदावरी मध्ये स्नान केल्याचा आनंद देवुन गेला. सद्गुरू श्री ज्ञानराज माणिकप्रभु महाराज यांनी आपल्या रसाळ वाणीने श्रीमद् भगवद्-गीते मधील गुह्य अगदी सहजपणे भक्तांपुढे मांडले व त्यांच्या अंतर्मनात उतरवले. आम्ही नाशिककर खरच भाग्यवान आहोत त्याचे कारणही तसेच आहे.
” भाग्यवान ते भक्त केवढे
स्वयेच जाती प्रभु त्याकडे “.

शनिवार, रविवार तसेच सोमवार ची पदे आनंदराज प्रभु, चैतन्यराज प्रभु , आणि त्यांचे सहकारी भजनी मंडळ यांनी ज्या चालीमध्ये सभागृहात गायली व त्याचे निरुपम महारांजांनी ज्या पध्दतीने केले तश्या स्वरुपात नाशिककरांनी कधीच अनुभवली नव्हती.
महारांचे प्रवचन ज्या पद्धतीने पुढे पुढे जात होते तो तो श्रोते अधिकाधिक उत्सुक होत होते, एकही श्रोता आपल्या आसनापासुन हलला नाही. काय ती रसाळ वाणी, अवघड विषय सहजसोपा करुन श्रोत्यांच्या मनात उतरविणे आणि तो आपल्या दैनंदिन आयुष्यात अनुभव घेत आहोत अशा दृष्टांताद्वारे पटवुन देणे हे महाराजांच्या अलौकिक योगसामर्थ्याचीच प्रचिती देते.
हा तीन दिवसीय कार्यक्रमाचा कालावधी थोडा जास्त हवा अश्या प्रतिक्रिया भरपुर भक्तांनी आमच्या पर्यंत पोहचवल्या. पुढे तसा प्रयत्न नक्कीच करु कारण बरेच नाशिककर महाराजांच्या अमृत वाणी पासुन वंचित राहीले. पाद्यपूजेचे अनुभव आमच्या पर्यंत भाविकांनी पोहोचवले की साक्षात दत्तप्रभुंचेच दर्शन झाले आहे.
भजन आणि प्रवचन झाल्यानंतर महाप्रसादाची सेवा लिलया पार पाडण्यासाठी श्री भुषण दादां काळे आणि त्यांचे सर्व सहकारी दत्तभक्त यांचे विशेष आभार.
श्री माणिक ज्ञानयज्ञ सोहळा, सर्वांगाने यशस्वी करण्यासाठी बर्याच जणांचे मोलाचे योगदान मिळाले. त्या सर्व ज्ञात व अज्ञात भक्तांचे आम्ही मनापासून ऋणी आहोत.
सगळ्यात महत्त्वाचे नाव ज्यांच्या अथक परिश्रमाने, निरंतर ध्यासाने, आणि जिथे शब्दही कमी पडतील अशा नियोजन बध्द मार्गाने कार्यक्रम पुढे पुढे गेला ते म्हणजे आमचे मोठे बंधू श्री गोपाळ गंगाधर कुलकर्णी.

मायबाप कल्पतरू

उन्हाळ्याच्या तप्त दिवसांत माध्यान्ह होईस्तोवर फिर फिर फिरावं आणि थकून भागून गेल्यावर रस्त्याच्या एका वळणावर फुलांनी गच्च भरलेलं बकुळीचं झाड मिळावं आणि त्या शीतल छायेत बसून जीव शांत करावा!

किंवा विजांच्या लखलखाट होत असताना पावसाचा धुमाकूळ असताना हरवलेल्या वाटेवर एक ऐसपैस पडवी असलेलं कौलारू घर सापडावं आणि त्यात जीव शांत होईपर्यंत विसावता यावं!

किंवा कडाक्याच्या थंडीत उबदार कपडे ल्यायलेले असतानाही जीव घाबरगुंडी होऊन गेलेला असताना त्या धुक्यात एक शेकोटी सापडावी आणि शेकोटी करणाऱ्याने आपल्याला क्षणभर तिथेच बसायचा आग्रह करावा.

मनाची घालमेल होत असताना, सगळं असूनही काही नसल्याचा अनुभव होत असताना, पूर्ण हताशा आलेली असताना अशी कृपादृष्टी पडावी की हृदयाच्या एका कोपऱ्यातून हंबरडा फुटावा आणि त्याचवेळी गहन शांतता अनुभवता यावी…

अशा अनेकानेक भावनांच्या, विचारांच्या आंदोलनातून जाऊन एक असा विसावा समोर यावा की माहेरी आल्याची भावना यावी. बस्स झालं आता. ‘ह्याच साठी केला अट्टाहास’ असं वाटून जावं. असा अनुभव नासिक मुक्कामी आलेल्या मातृ-पितृतुल्य श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराज उपाख्य श्रीजी यांच्या दर्शन आणि सत्संगामुळे आला. श्री सद्गुरू माणिक प्रभू पादुकांचे विविध ठिकाणी पूजन झाले. तसेच श्रीजींचा तीन दिवसीय सत्संग कार्यक्रम सुद्धा झाला. त्यानिमित्ताने श्रीजी अनेक भक्त आणि संत व्यक्तींच्या सोबत राहिले. श्रीजी नुसते बघतात तेव्हा सुद्धा अद्भुत शांतता मिळते. मोठ्या आपुलकीने ते जेव्हा चौकशी करतात तेव्हा त्यांच्यातले गुरू तसेच पितृभाव आपल्या जीवाला गहन दिलासा देतो. श्रीजी सद्गुरू आणि पिता समान तर आहेतच पण त्यांच्यातली मातृवृत्ती अधिक संवेदनशील आहे. त्यांच्या पावलांवर वाहिलेली फुले सुद्धा इतकी भाग्यवान की ती सुद्धा तुडवली न जाता अलगद बाजूला जातात. व्यवस्थापन क्षेत्रात आजवर मी अनेक लोकं पाहिलेली आहेत. मॅनेजमेंट टायकुन्स म्हणा ना! त्यांना सगळ्यांचं व्यवस्थापन जमत असेल पण मानवी मूल्यांचं व्यवस्थापन जमेलच असं काही सांगता येत नाही. जिथे माणसाला संसाधन किंवा रिसोर्स म्हणून केवळ वापरलं जातं तिथे कसलं आलंय मानवी भावभावना आणि मूल्यांचं व्यवस्थापन? सद्गुरू माणिक प्रभू महाराज हे सकलमत आचार विचारांचे अध्वर्यू! हे सकलमत नावाप्रमाणेच सकल किंवा समस्ततेचा स्वीकार करणारे आहे. संपूर्ण स्वीकार! माणसाचा आधी माणूस म्हणून स्वीकार आणि मग एक एक सोपान वर चढत मुक्तीचाही सहज स्वीकार आहे. जीवनाला इतक्या उत्कट आणि गहनतेने फार कमी ठिकाणी स्वीकारले जाते. त्यासाठी आईचे मन आणि पित्याचे हृदय असलेला सद्गुरू असावा लागतो. असे सद्गुरू ज्ञानराज माणिक प्रभू आहेत आणि त्यांना याचि देही याचि डोळा अनुभवता आलं ही दत्त महाराजांची असीम कृपा होय. श्रीजी मानवी मूल्यांचे संगोपन आणि वर्धन करणारे सद्गुरू आहेत.

श्रीजींचे दर्शन घेणाऱ्यांत मी आधी म्हटलं त्याप्रमाणे अनेक संत सज्जन ही होतें. त्यापैकी एक म्हणजे श्री दत्तधाम येथील श्री दत्तदास महाराज! त्यांच्या सोबतचे श्री जींचे फोटो बघताना मला प्रकर्षाने माऊलींची आठवण आली. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

संत भेटती आजि मज ।
तेणें जाला चतुर्भुज ।
दोन्ही भुजा स्थुळीं सहज ।
दोन्ही सूक्ष्मीं वाढल्या ॥१॥
आलिंगनीं सुख वाटे ।
प्रेम चिदानंदीं घोटे ।
हर्षे ब्रह्मांड उतटे ।
समुळ उठे मीपण ॥२॥
या संतासी भेटतां ।
हरे संसाराची व्यथा ।
पुढता पुढती माथां ।
अखंडित ठेवीन ॥३॥
या संतांचे देणें ।
कल्पतरुहूनि दुणें ।
परिसा परीस अगाध देणें ।
चिंतामणि ठेंगणा ॥४॥
या संतापरीस उदार ।
त्रिभुवनीं नाहीं थोर ।
मायबाप सहोदर ।
इष्टमित्र सोईरे ॥५॥
कृपाकटाक्षें न्याहाळिलें ।
आपुल्यापदीं बैसविलें ।
बापरखमादेविवरे विठ्ठलें ।
भक्तां दिधलें वरदान ॥६॥

माऊली हे माऊली आहेत. प्रत्येक शब्द न शब्द गहन अर्थाने वापरला आहे. पण त्यातल्या त्यात चतुर्भुज हा शब्द मोठा विचारप्रवर्तक आहे. संतांची भेट झाल्यावर चतुर्भुज होणे म्हणजे काय? ते म्हणतात, चार भुजा म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ आहेत. त्या पैकी अर्थ व काम हे दोन पुरूषार्थ म्हणजे या दोन भुजा स्थूल आहेत. धर्म आणि मोक्ष या दोन भुजा सूक्ष्म आहेत. त्यात बारकावा आहे. त्या वाढल्या म्हणजे काय झालं? तर संतांच्या भेटीमुळे या दोन क्षेत्रात वर्धिष्णूता आली. अशा ह्या चार ही भुजा संतांच्या भेटीमुळे मला लाभल्या. याच अंगाने सगळ्या कडव्यांचा विचार केला तर सद्गुरू भेटीमुळे काय सार्थकता होते ते समजेल. श्री जी जवळ बसवतात तेव्हा ज्ञानदेव आणि ज्ञानराज माणिक प्रभू महाराज यांच्यातील द्वैत आपोआप अंतर्धान पावतं बघा! तिथे माऊली दिसू लागते. त्यांच्या हाती सोपवलेली भक्तीची अनंत पुष्पे मग त्यांच्याच हातून पादुकांवर वाहिली जातात. सार्थकता अजून काय असते? नाही का? श्रीजींची त्रिंबक भेट, वणी भेट, दत्तधाम भेट, काळाराम मंदिर भेट आणि भक्तांच्या घरी दिलेल्या भेटी ह्या शिव-शक्ती-भक्ती त्रिवेणी संगमाचा अपूर्व योग आहे. गंगा गोदावरीची आरती करताना श्रीजी बघत राहावेत असे आहेत. एक गोदावरी गंगा आणि एक सकलमताची मोक्ष गंगा! या दोन्हीत आपण विलीन होऊन जावं. हे जमलं की काय पाहिजे अजून? नाही का? माऊली कल्पतरू ज्या विचारांनी म्हणतात असे श्रीजी आपल्यात इतक्या साध्या पद्धतीने विद्यमान असणे ही महादेव आणि दत्त कृपा आहे.

सकलमत ही गंगा आहे. कर्म, भक्ती, योग व ज्ञान या चार ज्ञानतोया जिथे एकत्रित होऊन अध्यात्म संगम पावतात ती सकलमत भागीरथी गंगा होय. या गंगेत स्नान करायला मिळणे म्हणजे सर्व प्रकारच्या भेदांपासून मुक्ती! पंथ-संप्रदाय, जातपात, भेदाभेद, मंगल-अमंगळ, श्रेष्ठ-कनिष्ठ, भाषा अशा सर्व गोष्टी गौण आहेत हे सिद्ध करीत प्रभूंनी प्रमुख व प्रचलित धर्मातील जे जे उत्तम व उदात्त आहे त्यांचा स्वीकार करून त्यायोगे सकलमत आनंदभुवनाची निर्मिती केली आहे. ज्या भूमीत हे कार्य घडलं आहे ती मराठी, कानडी आणि तेलुगू भाषांची समन्वय भूमी आहे. त्यात अन्य भाषा देखील दुधात साखर होऊन गेल्या आहेत. अशा या आनंदभुवनाचे राजयोगी श्रीनृप श्रीजी सकलमत गंगेला आपल्यासाठी मोक्षगंगेत परिवर्तित करत आहेत हे आपलं सद्भाग्य! महाराष्ट्राला अशा नेमस्त, तात्विक आणि साधनारत अनुशासित अध्यात्मिक नेतृत्वाची नितांत आवश्यकता आहे.
‘श्रुतीधर्म रक्षुनी सकल मतांते वंदा।
सर्वांतरी आत्मा नको कुणाची निंदा।’ यासाठी श्री जी हवे आहेत. त्यांची विद्यमानता प्रत्येक व्यक्तीमधील आमूलाग्र बदलाची नांदी ठरत आहे. सत्य नेहमी साधेसुधे असते. ते सांगता येणे किंवा विशद करणे हे सोपे काम नोहे. श्रीजींनी गेले तीन दिवस भजन व प्रवचनातून हेच देवकार्य केले आहे. त्या अर्थाने समस्त नासिककर भाग्यवंत म्हणायला हवेत. गंगा गोदावरी तीरावर ही अध्यात्म गंगा श्रीजींच्या रूपाने अवतरली आणि अपूर्व अशी कृपा पर्वणी नासिककरांना साधता आली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जे वदावे तेच अंमलात आणावे याचा आदर्श वस्तुपाठ श्रीजींनी घालून दिलाय. फार काय लिहावे?  सर्वांवर आशीर्वाद असू द्यावा, हीच विनंती!

 

वेदांत सप्ताह उत्साहात साजरा

चतुर्थ दत्तावतारी श्री माणिकप्रभु महाराजांनी आपल्या कारकिर्दीत निर्गुण निराकार अशा चैतन्यतत्वाला अग्रस्थानी ठेवणाऱ्या, सर्व जातीधर्मांना ज्ञान आणि भक्तीच्या एकाच समान सुत्रात घट्ट बांधणाऱ्या सकलमत संप्रदायाची स्थापना केली. ह्याच निर्गुण निराकार तत्वाची ओळख सर्वसामान्यांना व्हावी ह्या उदात्त हेतूने, श्री माणिकप्रभुंनंतर श्री सकलमत संप्रदायाचे तृतीय पीठाचार्य श्री मार्तंड माणिकप्रभु ह्यांनी १९०० साली माणिकनगरला प्रथम वेदांतसप्ताह आयोजित केला होता. त्यानंतरचे पीठाचार्य श्री शंकर माणिकप्रभु ह्यांनी त्यात शिस्तबद्धता आणली. त्यानंतरचे पीठाचार्य श्री सिद्धराज माणिकप्रभु व सध्याचे पीठाचार्य श्री ज्ञानराज माणिकप्रभु ह्यांनी त्यात कालानुरूप बदल घडवल्याने वेदांत सप्ताहाचा दैदिप्यमान सोहळा आपण सांप्रतकाळी अनुभवू शकतो. सन १९०० साली पहिला वेदांत सप्ताह पार पडला होता. यावर्षी वेदांत सप्ताहाचे १२३ वे वर्ष होते.

ह्यावर्षी वेदांत सप्ताहाची सुरूवात दि. ०९ मार्च २०२३ रोजी श्री शंकर माणिकप्रभुंच्या पुण्यतिथीच्या दिवशी झाली. वेदांत सप्ताहकाळात वेदशास्त्रसंपन्न ब्रह्मवृंदाद्वारे श्री भागवताचे पारायण, जे ह्या सप्ताहाचे मुलभूत अंग आहे, तसेच श्रीगुरुचरित्र आणि श्री माणिकप्रभु चरितामृताचे सामुहिक पारायण सुमारे १८० सद्भक्तांच्या सहभागात अगदी उत्साहाने पार पडले. संगीताचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणिकनगरात वेदांत सप्ताहाच्या पहिल्या दिवशी विविध वाद्यांची विधीवत पूजनही होते. संपूर्ण वेदांत सप्ताहात वीणेवर अखंड नामसंकीर्तन चालू असते. दररोज दुपारी विद्यमान पीठाचार्य श्री ज्ञानराज माणिक प्रभु यांचे वेदांतपर शिक्षा शिबीर सर्व सर्व भक्तांच्या सहभागात पार पडले. ह्यावर्षी भगवद्गीतेतील कर्मयोगाचा तिसरा अध्याय श्रीजींनी सर्वांना समजेल व आचरणात आणण्यात सुलभ होईल ह्या प्रकारे समजून सांगितला. सायंकाळी माणिक नगर गावातील महिलांचे भजन, त्यानंतर संध्याकाळी बालगोपाल रास क्रीडा (कोल), नंतर ग्रामवासी यांचे भजन, तदनंतर श्रीजींचे रात्री कालीन प्रवचन तसेच त्यानंतर सप्ताहातील सात दिवशी सात वारांचे भजन अनेक दिग्गज शास्त्रीय संगीतकार आणि कलाकारांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडले. यानंतरही माणिकनगरच्या आसपासच्या गावातील भजनी मंडळांनी संपूर्ण रात्रभर रात्रीभजनाची सेवा प्रभुचरणी अर्पण केली. वेदांत सप्ताह काळात रात्रीसुद्धा प्रभुमंदिर उघडे असते. सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी श्री मार्तंड माणिकप्रभु पुण्यतिथीनिमित्त आराधना संपन्न झाली.

वेदांत सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी श्री माणिकप्रभु चरित्र व संप्रदायाच्या साहित्यावर आधारित माणिक क्विझ आयोजित करण्यात आले होते. भागवतात सांगितल्याप्रमाणे सप्ताह पारायण नंतर रात्री जागरण करुन‌ हरीनाम संकीर्तन करावयाचे असते. त्यालाच अनुसरून अतिशय भव्य आणि दैदिप्यमान अशी दिंडी वेदांत सप्ताहात आयोजित करण्यात येते. सकलमत संप्रदायातील अनेक पदे वाद्यांच्या कल्लोळात, लयबद्धपणे म्हणताना संपूर्ण माणिकनगरची नगरप्रदक्षिणा पूर्ण केली जाते. दि. १६ मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास निघालेल्या दिंडीची सांगता दुसऱ्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास पुन्हा श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर येऊन झाली. ह्या वेळेस अनेक राज्यांतून आलेल्या शेकडो आबालवृद्ध भाविकांनी उस्फूर्तपणे दिंडीचा आनंद लुटला. संपूर्ण वेदांत सप्ताह काळात सहभागी सद्भक्तांची व्यवस्था श्री माणिकप्रभु संस्थानातर्फे अतिशय नियोजनबद्ध रीतीने करण्यात आली होती. आपल्या रोजच्या प्रपंचातून एक आठवडा, भगवंताच्या ज्ञान आणि भक्तीयुक्त सहवासात समग्रपणे व्यतीत करून, त्यातून उमटलेल्या आत्मानंदाचे प्रतिबिंब सहभागी प्रत्येक सद्भक्ताच्या चेहऱ्यावर झळकत होते.

नटली माणिकनगरीtest

नटली माणिकनगरी वेदांत सप्ताह महोत्सवास्तव||
लोटले असंख्य प्रभुभक्त स्वस्वरुप जाणण्यास्तव||१||

संगम ज्ञानमय उपासना व प्रेमयुक्त भक्तीचा||
फाल्गुन वद्य पक्षांत सोहळा ज्ञानोत्सवाचा||२||

अतिउत्साह व जल्लोषात साजरे होतसे हे ज्ञानपर्व||
सर्वसमावेशक सकलमत सांप्रदायिक सण हा अपूर्व||३||

श्री मार्तंडमाणिकप्रभुंसह श्री शंकरमाणिकप्रभुंचे आराधना-स्मरण||
सप्ताही अंतर्भूत करून कृतज्ञ-नतमस्तक होती श्रीप्रभुंचे भक्तगण||४||

अखंड वीणा कीर्तनासह अविरत व्याख्यान सत्संग||
पारायण पुजन अर्चन भजनांत श्रद्धावान दंग||५||

नेत्रदीपक दिंडीचा दिमाखदार अद्भुत नजारा||
तालवाद्ये सुरेल भजनांनी भरतो आसमंत सारा||६||

श्री प्रभुंच्या भंडारखान्यात कृपावंत अन्नपूर्णा सदैव तत्पर||
अविट चवीचा प्रसाद चाखण्या सुरवरही राहती हजर||७||

सच्चित्सुखाची दिव्य अनुभूती अद्वैत सिद्धांत मिळवून देई||
अखंड श्रीमाणिक नाम भजता हरी-हर दिसेल सर्वांठाई||८||

प्रभुदरबाराची वारी भाग्यकारक अति आगळी||
स्वानंद अनुभवती निशीदिनी भक्तांची मांदियाळी||

महावस्त्र

प्रभुबंधन

लहानपणी मुलांच्या डोकीचे पागोटे किंवा धोतर यांनी प्रभु आपणांस झाडाशी बांधून घेत. खूप आवळून बांधल्यानंतर बघता बघता प्रभू त्यातून निसटून जात. केव्हा केव्हा धोतर प्रभुंच्या कमरेभोवती बांधून, दोन्ही टोकांकडे उभे राहून मुले खूप खेचून ताणून‌ धरत. धोतरास बळकट गाठ मारली जायची पण, प्रभु मात्र जसेच्या तसे मोकळेच असायचे !!!

मामा

एक दिवस दुपारच्या वेळेस प्रभु मामाच्या पलंगावर चादर पांघरून स्वस्थ झोपी गेले होते. मामा बाहेरून घरी आल्यावर मामांनी प्रभुंना उठवून प्रभुंच्या स्वच्छंदी वागण्यावरून त्यांनी प्रभुंना बरेच बोल लावले व तू आत्ताच्या आता माझ्या समोरून चालता हो, असे निर्वाणीचे सांगितले. प्रभुनांही प्रपंचामध्ये फारसा रस नव्हता आणि त्यांना ह्यातून बाहेर पडावयाचेच होते. मामांनी असे बोल लावल्यावर, हीच वेळ योग्य समजून, अत्यंत शांत आणि उल्हासित वृत्तीने प्रभुंनी आपले नेसलेले धोतर तेथेच फाडून, त्याची लंगोटी घातली आणि मामांना नमस्कार करून बाहेरचा रस्ता धरला.‌

व्यंकम्मा

प्रभुंनी व्यंकम्माचे निस्सीम आणि शुद्ध प्रेम जाणले होते. एकदा प्रभुंनी व्यंकम्माची परीक्षा पाहण्याचे ठरवले. एके समयी स्त्री स्वभावाला अनुसरून व्यंकमा नग्न होऊन स्नान करीत होती. अशावेळी प्रभुंकडून निरोप आला की, “असशील तशी निघून ये!” हा निरोप कानावर पडताच, ती देहभान विसरून तशा स्थितीतच प्रभुंकडे यावयास निघाली. प्रभुंच्या मातोश्रींस हे वर्तमान कळल्याबरोबर त्याही मागोमाग निघाल्या. त्यांनी तिला मध्येच थोपवून धरले. स्त्रियांचे खरे भूषण लज्जा हे होय. हेच एकदा नाहीसे झाले तर स्त्रीत्व कसे राहणार? पण तशाही स्थितीमध्ये व्यंकम्मा प्रभुआज्ञा प्रमाण मानून प्रभुपुढे येऊन उभे राहावयास तयार झाली हे पाहून, ती जवळ येण्याची वाट देखील न पाहता प्रभुंनी आपल्या अंगावरील शुभ्र वस्त्र काढून व्यंकम्माच्या अंगावर घालण्याकरता मातोश्रींकडे पाठवले. त्यावेळी व्यंकम्माचा खरोखर उद्धार झाला.

तुकाराम धनगर

तुकाराम धनगरला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार व्हावा, अशी इच्छा होती. प्रभुंनी त्याला आत्मरूप प्रतीति हा ग्रंथ वाचावयास देवून त्याची पारायणे करावयास सांगितली. कित्येक महिने उलटले, अनेक पारायणे होऊनसुद्धा आत्मरूप प्रतीति येईना म्हणून, एके दिवशी प्रभुसंन्निध येऊन ग्रंथ परत करून तो म्हणाला, “मला यातून काहीही अर्थबोध झाला नाही किंवा स्वस्वरुपाचे ज्ञान झाले नाही.” तेव्हा प्रभुंनी तुकारामाची समजूत काढून भंडारखान्यात जाऊन झोळीचा प्रसाद भक्षण करून येण्यास सांगितले. त्यावेळी त्याने आपल्या अंगावरील घोंगडे त्याने प्रभुंजवळच ठेवले होते. तो निघून गेल्यावर, प्रभुंनी ते घोंगडे आपल्या अंगावर घेतले आणि काही वेळ स्वस्थ बसले. प्रसाद घेऊन परत आल्यावर त्याचे घोंगडे त्याला परत दिले. तुकाराम घोंगडे अंगावर घेऊन बसताच त्याच्या चित्तवृत्तीचा लय लागून त्याला समाधी लागली. आत्मस्वरूप साक्षात्कार म्हणजे काय असतो, याचा प्रत्यक्ष अनुभव त्याला मिळाला. घोंगडे पांघरूण तो आनंदभरात रंगून जाऊन डोलत राहिला.

अत्यंत रसाळ अशा श्रीप्रभु चरित्रातील प्रभुंच्या लीला वाचताना मन आनंदाने वारंवार उचंबळून येते. वरील वर्णिलेल्या चारही कथांतून आपल्याला वस्त्र ही सामायिक वस्तू दिसून येते. वरवर जरी ह्या सहज घडलेल्या प्रभुलीला दिसल्या तरी त्यात जीवनाचे सहज सुंदर सार दडलेले आहे. ही वस्त्रे म्हणजे जणू मायेचे पडदेच. या मा सा माया अर्थात् जी नाही ती माया. एकदा का ह्या मायेचे पडदे हटले की, आपल्याला आपल्या खऱ्या, मूळ स्वरूपाची जाणीव होते.

लहानपणीचे प्रभुंचे खेळ पाहिले, तर प्रभुंचे सवंगडी त्यांना धोतरामध्ये बांधण्याचा आटोकाट प्रयत्न करायचे. पण साक्षात् दत्तावतारी असणाऱ्या ह्या परब्रह्म अवधूताला, ती माया कशी काय बांधू शकणार? मायेच्या पलीकडे असलेले प्रभु, धोतराच्या गाठीत न अडकता, कायम मोकळेच राहिले.

आपल्या मामाकडे असताना प्रभुंना विश्वाच्या कल्याणासाठी कुटुंबाच्या मायेतून बाहेर पडायचे होते. त्यासाठी मामांच्या गादीवर झोपल्यानंतर, मामांनी खरडपट्टी काढण्याचे निमित्त साधून, त्यांनी तत्क्षणी आपले धोतर फाडून त्याची लंगोटीमात्र चिंधी कमरेस गुंडाळली. येथेही कौटुंबिक नात्यांच्या मायेतले धोतररुपी पाश प्रभुंनी तिथल्या तिथे फाडून टाकून दिले.

व्यंकम्माच्या परीक्षेच्यावेळी वस्त्रे बाजूला ठेवून, नग्न होऊन आंघोळ करताना, न्हाणीघरातून असशील तशी निघून ये, ही प्रभुआज्ञा प्रमाण म्हणून धावत तशीच धावत निघाली. त्यावेळेसही जणू आपली अविद्यारूपी वस्त्रे काढून तिने न्हाणीघरातच ठेवली होती. प्रभुंनी धारण केलेले वस्त्र जेव्हा प्रभुंनी व्यंकम्माला लज्जा रक्षणासाठी दिले, त्या वस्त्राच्या केवळ स्पर्शाने व्यंकम्मा निःसंग झाली. तिचे मीपण तत्क्षणी विरले. त्यावेळेस व्यंकम्माचा जणू पुनर्जन्मच झाला. अविद्यारुपी मायेचे पडदे गळून जाऊन, दुरीत पार जळून जाऊन व्यंकम्मा धुतल्या तांदळाप्रमाणे सोज्वळ झाली.

तुकाराम धनगराच्या कथेतही आत्मरूप प्रतीतिची अनेक पारायणे करूनही तुकारामास स्वस्वरुपाचा काही बोध झाला नाही. पण आपले अविद्यारूपी मायेचे घोंगडे प्रभुंकडे देताच प्रभुंच्या केवळ स्पर्शाने पवित्र झालेल्या त्या घोंगडीला परत धारण करताच, तुकारामाची तत्क्षण समाधी लागली. प्रभुंचा केवळ दिव्यस्पर्श झालेल्या वस्त्रांमध्येही किती अद्भुत सामर्थ्य असते, हे या आणि देवी भगवती श्री व्यंकम्माच्या कथेतून दिसून येते. श्रीप्रभु आपल्या मनबुद्धीवर असलेल्या विविध मायारुपी वस्त्रांना फेडून (अज्ञान दूर करून), अवधूत बनवून, आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देण्याची निरंतर संधी आपल्याला उपलब्ध करून देत असतात.

आपल्या संजीवन समाधीच्या वेळीसही प्रभुंनी आपला उत्तराधिकारी निवडताना, आपला पुतण्या अर्थातच श्री मनोहर माणिक प्रभुंना थोड्यावेळ आपल्या मांडीवर बसवले. त्यांच्याकडून पूजा आरती करून घेतली. अवघ्या सात वर्षाच्या बाल मनोहरावर प्रभुंनी आपल्या अंगावरील दुशाला पांघरविला. वयाच्या सातव्या वर्षापासून संजीवन समाधी घेण्याच्या, वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षापर्यंत, श्री मनोहर प्रभुंनी संस्थानाचा कारभार, भव्य अशा श्रीप्रभु मंदिराचे निर्माण करण्यापासून, श्रीप्रभु समाधीची पूजा पद्धती तयार करून, श्री प्रभुंनी स्थापन केलेल्या सकलमत संप्रदायाला मूर्त स्वरूप आणण्यापर्यंत अतिशय कुशलतेने सांभाळला. येथेही आपल्याला प्रभु स्पर्शाच्या वस्त्राच्या दिव्यतेची प्रचितीच दिसून येते.

आजच्या घडीला श्रीप्रभु जरी संजीवन समाधीत निजानंदमग्न असले तरी त्यांचे नामस्मरण, त्यांनी रचलेली पदे, श्रीप्रभुनंतरच्या पीठाचार्यांचे समग्र वाङ्मय, प्रवचने ही आपल्याला त्यांच्या स्पर्शरुपी ज्ञानवस्त्रांतच उपलब्ध आहेत.‌ ह्या दिव्य वस्त्रांचा स्पर्श आपणासही होऊन, आपली आध्यात्मिक उन्नती उत्तरोत्तर होत राहो, आपल्याला स्वस्वरुपाचे ज्ञान होवो, ह्या श्रीप्रभु चरणीच्या आणखी एका नम्र विनंतीसह श्री गुरु माणिक जय गुरु माणिक.

मनस्वी अभिनंदन

माणिक नगरच्या श्री माणिक प्रभु हिंदी विद्यालयातील दहावीतील, कु. श्यामला गंगाधर बोलचटवार, ह्या माणिक नगरातील विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय आंतरशालेय श्रीमद्भगवद्गीता पठण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला, त्याबद्दल कुमारी श्यामलाचे मनस्वी अभिनंदन, कौतुक आणि शुभेच्छा… माणिक शिक्षेच्या फेसबुक पेजवर ही बातमी पाहिली आणि मनामध्ये सहजच श्री चैतन्यराज प्रभुंच्या द ग्लोरी ऑफ माणिक नगर (The Glory of Maniknagar…) कवितेतील ओळी नजरेसमोर तरळून गेल्या…. है प्रभू कृपा की छाव मे इस नगर का प्रत्येक घर…

तसे पाहिले तर भगवद्गीता पठण स्पर्धेत अनेक जण प्रथम क्रमांक पटकावतात मग कु. श्यामलाच्या या यशात विशेष असे काय बरे दडले आहे? कु. श्यामलाचा फोटो व्हाट्सअप वर येताच त्याला का बरे इतके लाईक्स मिळाले? ह्याचे उत्तर श्री सकलमत संप्रदायाच्या वाङ्मयात आणि  श्री माणिक प्रभु संस्थानाच्या गादीवर बसलेल्या सर्वच विद्वत्ताप्रचूर पिठाचार्यांनी जनमानसांवर आजवर केलेल्या संस्कारांमध्ये आहे. श्री माणिक प्रभु आणि त्याच्यानंतर गादीवर बसलेल्या सर्वच पिठाचार्यांनी वेदांताचा प्रचार आणि प्रसार अगदी हिरीरीने केला. श्री शंकर माणिक प्रभुंनी प्रथम हिंदी विद्यालयाची स्थापना माणिक नगरात केली. श्री शंकर माणिक प्रभुंचे ज्ञानशांकरी म्हणून वेदांतावर भाष्य असलेले लेखांच्या संग्रहाचे पुस्तक संस्थानाने प्रकाशित केले आहे. आज त्याच शाळेच्या कु. श्यामलाने भगवद्गीता पठण स्पर्धेमध्ये दैदिप्यमान असे यश मिळवले आहे. वेदांत सप्ताहामध्ये किंवा पौर्णिमेच्या प्रवचनांमध्ये आजवरच्या पीठाचार्यांकडून समस्त भक्तजनांना वेदांत विषयक ज्ञानामृत पिढ्यानपिढ्या पाजले जात आहे. सध्याचे विद्यमान पीठाधीश श्री ज्ञानराज माणिक प्रभु हे स्वतः श्रीमद्भगवद्गीतेचा प्रसार करण्यात अग्रणी आहेत. आजपावेतो त्यांची गीतेवर हजारांच्यावर प्रवचने झाली आहेत. ते आपल्या प्रवचनामध्ये नेहमी म्हणतात की, हे सगळं वेदांतपर ज्ञान मी म्हणून तुम्हाला देतो आणि तेही फुकट… आज कु. श्यामलाचा श्री ज्ञानराज माणिक प्रभू बरोबर भेटीचा फोटो पाहिला आणि एक गोष्ट येथे आग्रहाने सांगावीशी वाटते की, श्रीजी, तुम्ही वेदांतपर ज्ञान जरी फुकट देत असलात तरी ते अजीबातच फुकट जात नाहीयेय…

ह्या वेळीच्या श्रीदत्त जयंतीमध्ये पाहिलं तर माणिक नगरामधले वयोवृद्ध, महिला आणि पुरुष, तरुण मंडळी यांच्याबरोबरच लहान लहान मुलं ही श्रीजींचा प्रवचन ऐकण्यासाठी उपस्थित होती. काही नवजात अर्भकेही स्तनपान करता करता श्रीजींचे प्रवचन ऐकत होती. खरोखरच धन्य ती माणिक नगरची जनता, ज्यांना अध्यात्माचे हे बाळकडू अगदी लहान वयापासूनच मिळते. लहान वयातच असे बालमनावर सुसंस्कार झाल्यावर, त्यांच्यात अध्यात्माची आवड निर्माण झाल्यावर, आणि घरातही तसे वातावरण असल्यावर,  स्पर्धेमधील असे दैदिप्यमान यश समग्र असते. ते केवळ पाठांतर करून मिळवलेले नसते. कु. श्यामलाच्या ह्या नेत्रदीपक यशाने सर्वाधिक आनंद श्रीजींना झाला असेल ह्यात तीळमात्रही शंका नाही आणि तो आनंद आपल्याला श्रीजींच्या भावमुद्रेतून सहज टिपता येतो. श्रीजी समाजामध्ये पेरत असलेल्या बीजाचे सकारात्मक अंकुरण होऊन एक सशक्त समाज आणि देश घडवणारी भावी पिढी वृद्धिंगत होत आहे, हे खूपच आश्वासक आहे.

श्री प्रभु संस्थानामध्ये संगीत विभागात काही वर्षांपूर्वी सेवक असलेल्या कै. गंगाधरपंतांची कन्या कु. श्यामला आता राज्यस्तरावर बिदर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल. येथेही श्रीप्रभुकृपेचा आशीर्वाद तिच्यावर अखंड राहो. स्पर्धेतील पुढील वाटचालीसाठी कु. श्यामलाला अनेकोत्तम शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा.