चतुर्थ दत्तावतारी श्री माणिकप्रभु महाराजांनी आपल्या कारकिर्दीत निर्गुण निराकार अशा चैतन्यतत्वाला अग्रस्थानी ठेवणाऱ्या, सर्व जातीधर्मांना ज्ञान आणि भक्तीच्या एकाच समान सुत्रात घट्ट बांधणाऱ्या सकलमत संप्रदायाची स्थापना केली. ह्याच निर्गुण निराकार तत्वाची ओळख सर्वसामान्यांना व्हावी ह्या उदात्त हेतूने, श्री माणिकप्रभुंनंतर श्री सकलमत संप्रदायाचे तृतीय पीठाचार्य श्री मार्तंड माणिकप्रभु ह्यांनी १९०० साली माणिकनगरला प्रथम वेदांतसप्ताह आयोजित केला होता. त्यानंतरचे पीठाचार्य श्री शंकर माणिकप्रभु ह्यांनी त्यात शिस्तबद्धता आणली. त्यानंतरचे पीठाचार्य श्री सिद्धराज माणिकप्रभु व सध्याचे पीठाचार्य श्री ज्ञानराज माणिकप्रभु ह्यांनी त्यात कालानुरूप बदल घडवल्याने वेदांत सप्ताहाचा दैदिप्यमान सोहळा आपण सांप्रतकाळी अनुभवू शकतो. सन १९०० साली पहिला वेदांत सप्ताह पार पडला होता. यावर्षी वेदांत सप्ताहाचे १२३ वे वर्ष होते.

ह्यावर्षी वेदांत सप्ताहाची सुरूवात दि. ०९ मार्च २०२३ रोजी श्री शंकर माणिकप्रभुंच्या पुण्यतिथीच्या दिवशी झाली. वेदांत सप्ताहकाळात वेदशास्त्रसंपन्न ब्रह्मवृंदाद्वारे श्री भागवताचे पारायण, जे ह्या सप्ताहाचे मुलभूत अंग आहे, तसेच श्रीगुरुचरित्र आणि श्री माणिकप्रभु चरितामृताचे सामुहिक पारायण सुमारे १८० सद्भक्तांच्या सहभागात अगदी उत्साहाने पार पडले. संगीताचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणिकनगरात वेदांत सप्ताहाच्या पहिल्या दिवशी विविध वाद्यांची विधीवत पूजनही होते. संपूर्ण वेदांत सप्ताहात वीणेवर अखंड नामसंकीर्तन चालू असते. दररोज दुपारी विद्यमान पीठाचार्य श्री ज्ञानराज माणिक प्रभु यांचे वेदांतपर शिक्षा शिबीर सर्व सर्व भक्तांच्या सहभागात पार पडले. ह्यावर्षी भगवद्गीतेतील कर्मयोगाचा तिसरा अध्याय श्रीजींनी सर्वांना समजेल व आचरणात आणण्यात सुलभ होईल ह्या प्रकारे समजून सांगितला. सायंकाळी माणिक नगर गावातील महिलांचे भजन, त्यानंतर संध्याकाळी बालगोपाल रास क्रीडा (कोल), नंतर ग्रामवासी यांचे भजन, तदनंतर श्रीजींचे रात्री कालीन प्रवचन तसेच त्यानंतर सप्ताहातील सात दिवशी सात वारांचे भजन अनेक दिग्गज शास्त्रीय संगीतकार आणि कलाकारांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडले. यानंतरही माणिकनगरच्या आसपासच्या गावातील भजनी मंडळांनी संपूर्ण रात्रभर रात्रीभजनाची सेवा प्रभुचरणी अर्पण केली. वेदांत सप्ताह काळात रात्रीसुद्धा प्रभुमंदिर उघडे असते. सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी श्री मार्तंड माणिकप्रभु पुण्यतिथीनिमित्त आराधना संपन्न झाली.

वेदांत सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी श्री माणिकप्रभु चरित्र व संप्रदायाच्या साहित्यावर आधारित माणिक क्विझ आयोजित करण्यात आले होते. भागवतात सांगितल्याप्रमाणे सप्ताह पारायण नंतर रात्री जागरण करुन‌ हरीनाम संकीर्तन करावयाचे असते. त्यालाच अनुसरून अतिशय भव्य आणि दैदिप्यमान अशी दिंडी वेदांत सप्ताहात आयोजित करण्यात येते. सकलमत संप्रदायातील अनेक पदे वाद्यांच्या कल्लोळात, लयबद्धपणे म्हणताना संपूर्ण माणिकनगरची नगरप्रदक्षिणा पूर्ण केली जाते. दि. १६ मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास निघालेल्या दिंडीची सांगता दुसऱ्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास पुन्हा श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर येऊन झाली. ह्या वेळेस अनेक राज्यांतून आलेल्या शेकडो आबालवृद्ध भाविकांनी उस्फूर्तपणे दिंडीचा आनंद लुटला. संपूर्ण वेदांत सप्ताह काळात सहभागी सद्भक्तांची व्यवस्था श्री माणिकप्रभु संस्थानातर्फे अतिशय नियोजनबद्ध रीतीने करण्यात आली होती. आपल्या रोजच्या प्रपंचातून एक आठवडा, भगवंताच्या ज्ञान आणि भक्तीयुक्त सहवासात समग्रपणे व्यतीत करून, त्यातून उमटलेल्या आत्मानंदाचे प्रतिबिंब सहभागी प्रत्येक सद्भक्ताच्या चेहऱ्यावर झळकत होते.

[social_warfare]