नाशिक म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर प्रथम रामायणातील श्रीरामांचा चौदा वर्षे वनवासातील नाशिक येथे व्यतीत केलेला काही काळ आठवतो.‌ गोदावरी नदीच्या काठी वसलेले नाशिक श्री रामायण काळातील अनेक दिव्य घटनांचे साक्षीदार आहे. शूर्पणखेचे नाक श्रीलक्ष्मणाने येथेच कापले, सीतामाईचे रावणाने हरण येथेच केले. पुराणांत ज्या दंडकारण्याचा उल्लेख आहे, नाशिक हे त्याच दंडकारण्याचा भाग आहे. इथे चराचरामध्ये आपण राम अनुभवू शकतो.‌ कुंभमेळा पर्वातही नाशिक क्षेत्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भोवताली असलेला ब्रह्मगिरी पर्वत, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर, देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक वणीची श्री सप्तशृंगी माता अशा अनेक सिद्धपीठांमुळे नाशिक क्षेत्राचे आध्यात्मिक महत्त्व आपसुकच अधोरेखित होते.

अनेक अवतारीक आणि संतपुरुषांच्या पवित्र वासाने पुनित झालेल्या नाशिक ह्या पुण्यक्षेत्री, चतुर्थ दत्तावतारी श्री माणिकप्रभुंनी स्थापन केलेल्या सकलमत संप्रदायाच्या गादीचे सहावे आणि विद्यामान पीठाधिश, श्री ज्ञानराज माणिकप्रभुंचा दौरा अलीकडेच दिमाखात पार पडला. श्री माणिकप्रभुंचे मातापिता श्री. मनोहर नाईक आणि बयाम्मा माता हे प्रखर रामभक्त होते. रामनवमीच्याच दिवशी उभयतांना श्री दत्तप्रभुंनी दृष्टांत देऊन, मी तुमच्या पोटी जन्म घेईन असे सांगितले. रामनवमीच्या ह्याच दृष्टांतानंतर पुढे त्याचवर्षी दत्तजयंतीला श्री माणिकप्रभुंचा जन्म झाला.‌ श्री माणिक प्रभुंनी रामावर अनेक पदे लिहिली आहेत. त्यामुळे श्रीजींच्या ह्या नाशिक दौऱ्याला विशेष महत्त्व होते. समस्त नाशिककरांसाठी दिनांक ८ ते १० एप्रिल दरम्यान श्री माणिक ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीजींचा हा पहिलाच नाशिक दौरा. दिनांक ७ एप्रिलला सायंकाळी श्रीजींचे नाशिक येथे आगमन झाले. जणूकाही आईसाठी व्याकुळ झालेल्या आपल्या बछड्यांना आकंठ ज्ञानामृत पाजण्यासाठीच, गोरज मुहूर्तावर श्रीजीरुपी माय नाशकात अवतरली होती. नाशिककरांनीही श्रीजींच्या स्वागतात कोणत्याही कसूर ठेवली नव्हती.

श्रीजींच्या आगमनाबरोबर त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.‌ फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. अनेकांनी श्रीजींच्या गळ्यात हार घातले. सुवासिनींनी श्रीजींना ओवाळले. वेदांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला. श्रीरामांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या नाशिक नगरीत श्रीजींच्या पदस्पर्शाने धरणीमातेसही आज अतीव आनंद झाला होता. त्यानंतर श्रीजींची अश्वरथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल, ताशे गर्जत होते, तुताऱ्या ललकारत होत्या, वाद्यांचा कल्लोळ आसमंतात गुंजत होता. अब्दागीरी, हवेत उंचच उंच डौलाने फडकणारे भगवे झेंडे मिरवणूकीची शोभा वाढवत होते. श्रीजींच्या रथापुढे मुली, महिला फुगड्या घालत होत्या. काहीजणी अत्यानंदाने झरझर रांगोळ्या काढत होत्या. मार्गात भुईनळे उडत होते. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहानातील लोकही गाडीची काच खाली करून कुतुहलापोटी श्रीजींना न्याहाळत होते, नतमस्तक होत होते. रथात बसलेले भक्तकार्यकल्पद्रुम गुरुसार्वभौम श्रीजीही समस्त जनांचे आदरातिथ्य, नमस्कार स्विकारतानाच आपल्या अभयकराने सर्वांना मंगल आशिर्वाद देत‌ होते.‌ श्रीजी आपल्या नगरात आल्याचा आनंद प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता आणि तो सहज टिपता येत होता. तासाभराच्या ह्या चैतन्यमय सोहळ्यानंतर श्रीजींचा ताफा, तपोवन येथील संतसेवेत अखंड रममाण असलेल्या श्री. हरीशभाई मकवाना ह्यांच्या बंगल्यावर पोहोचला. येथेही श्रीजींचे औक्षण करण्यात आले. संपूर्ण नाशिक दौऱ्यादरम्यान श्रीजींचा मुक्काम येथेच होता. श्रीजींच्या संपूर्ण कुटुंबासाठी श्री. हरीशभाईंनी आपला बंगला पूर्ण वेळ उपलब्ध करून दिला आणि ते अतिथी देवो भव ह्या उक्तीला अक्षरश: जागले. त्यांच्या ह्या परम सेवाभावीवृत्तीला मानाचा मुजरा!!!

दौऱ्यादरम्यानही श्रीजींच्या रोजच्या दिनचर्येमध्ये यात्किंचितही फरक पडला नाही. सकाळी लवकर उठून श्री. हरीशभाईंच्या घरी श्रीजींनी आपली नित्यपूजा आटोपली.‌ आता वेळ होती सद्भक्तांच्या घरी पाद्यपूजेसाठी जाण्याची.‌ ज्या सदभक्तांनी पाद्यपूजेसाठी नाव नोंदणी केली होती, त्या सर्वांच्या घरी श्रीजी सहकुटुंब भेट देतात. सद्गुरु आपल्या घरी येणार, ह्या आनंदामध्ये घरोघरी जणू उत्सवाचेच स्वरूप आले होते. नाशिकमध्येही माणिकनगर नावाची वसाहत आहे, हे मला तेथे गेल्यावर कळले. श्रीजींच्या नाशिक दौऱ्याची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यांवर समर्थपणे पेलली, अशा श्री. गोपाळराव कुलकर्णी यांच्या घरी श्रीजींच्या पाद्यपूजेसाठी उपस्थित राहण्याची संधी मिळाली. श्री. गोपाळराव कुलकर्णी यांच्या घराचे नावच श्री माणिक प्रभु असे आहे. सकलमत प्रभु नांदे जिकडे तिकडे ह्या उक्तीची प्रचिती जागोजागी येत होती. श्रीजींच्या स्वागतासाठी घरासमोर भली मोठी रांगोळी घातली होती. घरासमोरील भव्य शोभिवंत मंडपही जणू प्रभुभक्तांप्रमाणेच, श्रीजींच्या स्वागतासाठी आतुर झाला होता.‌ मंद आवाजात कानावर पडणारी बोध मार्तंडातील पदे मनास चैतन्य प्रदान करीत होती. दारासमोर मोरपिसाची सुंदर रांगोळी मन वेधून घेत होती. श्रीजींच्या आगमनाबरोबरच सर्वांनी श्रीजींवर पुष्पवृष्टी केली, कुणी हार घातले. फटाक्यांचे धडाडधूम बार उडाले. अंगणात सुवासिनींनी श्रीजींना औक्षण केले. श्री. गोपाळरावांबरोबरच त्यांचे थोरले बंधू श्री. गोविंदराव कुलकर्णी आणि कनिष्ठ बंधू श्री. मनोहरपंत कुलकर्णी सहकुटुंब श्रीजींना सामोरे गेले. घरामध्ये प्रथम श्री. गोविंदरावांनी सपत्नीक श्रीजींची पाद्यपूजा केली. त्यानंतर गोपाळराव व तदनंतर मनोहर पंतांनी सपत्नीक श्रीजींच्या पाद्यपूजा केल्या. याप्रसंगी सुमंत कुलकर्णी ह्या बालकलाकाराने बासरी वादन केले व त्याला चैतन्य कुलकर्णींनी तबल्याची उत्तम साथ दिली. कुलकर्णी कुटुंबाच्या घरातील वातावरण एकदम प्रभुमय होऊन गेलं होतं. हे सर्व चालू असताना बाहेर प्रभु भक्तांची उत्तम बडदास्त ठेवली जात होती. येथे श्री माणिक नगरचे श्री गुरुनाथ गुरुजी, नरसिंह गुरुजी, राजेश गिरीमामा, माणिकराव इत्यादि सेवेकऱ्यांना भेटून आनंद झाला. आमचे सर्वांचे दुपारचे भोजन येथेच झाले.

दुपारच्या भोजनानंतर तपोवन येथील श्री लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्टच्या नव्याने बांधलेल्या सुसज्ज धर्मशाळेमध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नांदेड, हैद्राबाद वैगरे बाहेरगावावरून आलेल्या प्रभुभक्तांच्या उतरण्याची सोय केली होती. तपोवनसारख्या पुण्यभूमीत, गोदावरी नदीच्या काठी असलेला आमचा निवास मनाच्या सात्विकतेत अधिकच भर घालत होता. थोडावेळाने आवराआवर करून आम्ही गंगापूर नाक्याजवळील शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी सभागृहामध्ये श्रीजींच्या प्रवचनासाठी जमलो. दौऱ्यादरम्यान श्रीजींचा ज्ञानयज्ञ ही उपस्थितांसाठी मोठी पर्वणीच असते. पाचकशे लोकांहून अधिक लोकांच्या बसण्याची क्षमता असलेले सभागृह खचाखच भरले होते. काही जण उभेही होते. श्रीजींच्या आगमनाबरोबरच चैतन्याची एक लहर सभागृहात उमटली. भक्तकार्य कल्पद्रुमचा जयघोष झाला. श्रीजींना पाहून नाशिककरांच्या यांच्या चेहऱ्यावर आनंदाबरोबरच उमटलेले औत्सुक्याचे भावही टिपता येत होते. श्रीजींना बसण्यासाठीचा मंच सुंदर फुलांनी सुशोभित केला होता. श्रीजींच्या आसनालाही ताज्या फुलांची मनोहर आरास केली होती. श्रीजींच्या बैठकीच्या उजव्या बाजूला श्री माणिक प्रभुंची सुहास्य वदन तस्वीर चित्त वेधून घेत होती.

सौ. ज्योत्स्ना कुलकर्णीताईंनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यानंतर श्री. रवींद्र पैठणे गुरुजींच्या वेदपाठ शाळेतील विद्यार्थ्यांनी वेदपठण केले. या माणिक ज्ञानयज्ञाच्या प्रसंगी नाशिकमधील अनेक मान्यवर तीनही दिवस उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने रंगावधूत आश्रमाचे अध्यक्ष श्री. भट्टडकाका, भागवत सेवा समितीचे श्री. प्रसन्न बेळे, दत्त सेवा समितीचे श्री. बी. जी. जोशी, गुप्ते महाराज समाधीचे अध्यक्ष श्री. अनिलकाका पाठक, काकासाहेब ढेकणे यांच्या गादीचे उत्तराधिकारी व लोकनाथ तीर्थाचे अध्यक्ष श्री. प्रकाश महाराज प्रभुणेकाका यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. तसेच, औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष श्री. भूषण काळे आपल्या अनेक सहकाऱ्यांसह उपस्थित होते, ज्यांनी श्रीजींच्या प्रवचनानंतर भोजनाची उत्तम आणि नेटकी व्यवस्था तिनही दिवस यशस्वीपणे सांभाळली.

सुरुवातीच्या वेदपठणानंतर सकलमत संप्रदायाच्या सप्ताह भजनातील शनिवारची श्री माणिक प्रभूंनी रचलेली अनेक पदे श्री. आनंदराज प्रभुंनी आपल्या सुस्वर कंठातून‌ उपस्थितांसमोर सादर केली. त्यांना संवादिनीवर श्री, अजय सुगावकर, तबल्यावर श्री. केदार तसेच ढोलकीवर श्री. संदेश ह्यांनी सुरेख साथ दिली. श्री चैतन्य राज प्रभु, श्री. चारुदत्त प्रभु आणि श्री. चंद्रहास प्रभु यांनी झांजाच्या वैविध्यपूर्ण तालाने तोलामोलाची साथ दिली. चि. प्रज्ञानराज ह्या श्रीजींच्या नातवाने संबळ अतिशय तालबद्ध पद्धतीने वाजवला. श्री माणिकप्रभुंनी रचलेल्या ह्या अविट गोडीच्या पदांनी श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन गेले होते. प्रत्येक पदानंतर श्रीजी त्या त्या पदांचा भावार्थ आणि लक्ष्यार्थ उलगडून दाखवत होते. त्याला पौराणिक कथांचा संदर्भ होता. श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या पुण्यभूमीत श्रीजींच्या मुखमालातून रामलीलांचे सेवन करताना कोण्या सुकृत दैव हे फळले असेच काहीसे भाव उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते. आम्ही रामायण कथा अनेकदा अनेकांकडून ऐकल्या पण त्या कथांमध्ये लक्ष्यार्थ आणि भावार्थ अशा प्रकारे आजपर्यंत कोणीही विषद केला नव्हता, अशा प्रतिक्रिया प्रवचनानंतर अनेक नाशिककरांनी व्यक्त केल्या.

भजनानंतर माणिक ज्ञानयज्ञातील श्रीजींचे मुख्य प्रवचन सुरू झाले.‌ यावेळेस श्रीजींनी श्रीमद्भगवद्गीतेतील कर्मयोगाच्या तिसऱ्या अध्यायातील ३६ ते ४३ या श्लोकांचे निरूपण तीन दिवस केले. कुरुक्षेत्रावर अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णाला प्रश्न केला की इच्छा नसतानाही माणूस जबरदस्तीने पाप कर्मे करण्यास का बरे प्रेरित होतो? ह्या प्रश्नांचे उत्तर देताना श्रीकृष्णाने जो बोध अर्जुनाला केला तोच बोध सामान्य जणांना समजेल, रुचेल, पटेल, पचेल अशा पद्धतीने श्रीजींनी दैनंदिन जीवनातील तसेच, अनेक पुराणातील नानाविध कथांच्या सहाय्याने उपस्थितांसमोर उलगडून दाखविला. रजोगुणाच्या संपर्कातून उद्भवलेले काम आणि क्रोध हेच आपले शत्रू आहेत तसेच काम, क्रोध आणि लोभ यांचा परस्पर संबंध श्रीजींनी उपस्थितांना समजवून सांगितला. प्रत्येक दाखल्यागणिक उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट व हास्याचा गडगडाट उमटत होता.‌ श्रीजींच्या ह्या प्रवचनाने निसर्गालाही सर्वस्वी आनंद झाला होता आणि त्याने आपला आनंद पावसाच्या रिमझिम बरसणाऱ्या सरीतून व्यक्त केला. श्रीजींच्या प्रवचनानंतर श्री माणिक प्रभुंची आरती झाली, उपस्थितांना प्रभुंचा प्रसाद दिला गेला. ज्ञानामृत प्राशनानंतर प्रभुंच्या महाप्रसादाने तृप्त झालेल्या प्रत्येकाने आपापल्या घराची वाट धरली.

दुसऱ्या दिवशीही श्रींची अनेक सद्भक्तांना घरी पाद्यपूजा आयोजित करण्यात आली होती. सकाळच्या या वेळेत आम्हाला पंचवटी परिसर, काळारामाचे मंदिर, कपालेश्वर महादेव आणि गोदावरी घाटाचे दर्शन घेता आले. संध्याकाळी पुन्हा शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृहात श्रीजींच्या प्रवचनासाठी नाशिककर जमले होते. कालच्यापेक्षा आज उपस्थिती अधिक होती. आज रविवारी सप्ताह भजनातील खंडोबाचे भजन झाले. त्यानंतर श्री मार्तंड माणिक प्रभुंची अनेक वेदांतपर पदे सादर केली गेली. प्रत्येक पदाचा अर्थ समग्रपणे समजून देताना श्रीजींनी विवेचनाची पराकाष्ठा केली आणि उपस्थितांची मने जिंकून घेतली. आपल्या दुसऱ्या दिवशीच्या श्री माणिक ज्ञानयज्ञातील आपल्या प्रवचनामध्ये इंद्रिये, मन आणि बुद्धी ही कामाची निवासस्थाने आहेत आणि काम त्यांच्या द्वारा आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाला कसा आच्छादित करतो, हे श्रीजींनी पुन्हा एकदा आपल्या खुमासदार शैलीमध्ये श्रोत्यांच्या मनावर बिंबवले. धडाडणाऱ्या श्री माणिक ज्ञानयज्ञामध्ये श्रीजींच्या विद्वत्ताप्रचुर, शास्त्रसंमत विवेचनाच्या आहुतीवर आहुती पडत होत्या आणि ह्या धडाडणाऱ्या ज्ञानयज्ञाचे तेज उपस्थित सर्वांवर फाकत होते, त्याची ऊब सर्वांनाच जाणवत होती. दुसऱ्या दिवशीच्या प्रवचनानंतरही श्री माणिक प्रभुंची आरती झाली व प्रभुंचा प्रसाद सर्वांना वाटला गेला. त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद आयोजित केला गेला होता.

तिसऱ्या दिवशीसुद्धा अनेक प्रभुभक्तांच्या घरी श्रीजींच्या पाद्यपूजा आयोजित केल्या गेल्या होत्या. आज सकाळी आम्हाला लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक जिथे कापले गेले, त्या तपोवनातील जागेचे दर्शन करायला मिळाले. कपिला आणि गोदावरी नदीचा संगम, लक्ष्मणाची तपोभूमी पाहायला मिळाली. शहरीकरणाच्या धामधुमीतही नाशिकने आपले ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व अजूनही आत्मीयतेने जपले आहे.

संध्याकाळी पुन्हा शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृहात भक्तांची दाटी झाली होती. पहिल्या दोन दिवसांपेक्षा आज उपस्थिती अजूनच जास्त होती. हे श्री माणिक प्रभु आणि श्रीजींबद्दल फुलत जाणारी भक्ती, त्यांच्याप्रती दुणावत चाललेला आदर, वृद्धिंगत होणारा प्रेमभाव आणि दिवसागणिक घट्ट होणारी नाळ ह्याचेच द्योतक होते. उपस्थित सद्भक्तांच्या ह्या उत्स्फूर्त सहभागामुळे मंचावर असलेल्या श्री प्रभुंच्या तसविरीतील स्मित जणू आता हास्यात बदलले भासत होते. आज श्री माणिक ज्ञानयज्ञाच्या शेवटच्या दिवशी सुरुवातीला पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य श्री. अनिल कुटे सर व त्यांच्या विद्यार्थ्यांनी देश तालावर मंत्रमुग्ध करून टाकणारे बासरी वादन केले. लहान लहान मुलांनी छेडलेले बासरीचे सूर ऐकून सभागृहामध्ये जणू गोकुळच अवतरल्यासारखे वाटत होते. आज सोमवारच्या दिवशी सप्ताह भजनातील शिव शंकराची भजने सादर केली गेली. त्याच्या जोडीला आजही श्री मार्तंड माणिकप्रभुंची वेदांतावरील सादर केलेली पदे उपस्थितांचे मन मोहवून गेली. अर्थात् ह्यामध्ये श्री आनंदराज प्रभुंच्या दैवी सुरसाजांचा मोलाचा वाटा होता, हे वेगळे सांगणे नकोच. भजनसंध्येनंतर श्री माणिक ज्ञानयज्ञाच्या पूर्णाहूतीच्या प्रवचनामध्ये, श्रीजी अभ्यासपूर्ण विवेचनाच्या आहुती सोडत होते. इंद्रिय, मन, बुद्धी यांच्यापेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे आणि माणसाने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे मनाला स्थिर केले पाहिजे तसेच या अध्यात्मिक शक्ती द्वारे कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे, हे भगवद्गीतेचे तिसऱ्या अध्यायाचे सार, सदभक्तांच्या मनावर आणि बुद्धीवर आपल्या मोहून टाकणाऱ्या, मंत्रमुग्ध करणाऱ्या विवेचनातून ठासवले. कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी नऊ पर्यंतची होती परंतु, वेळ उलटून गेल्यानंतरही विषयाच्या संपूर्ण आकलनासाठी श्रीजींनी अधिकचा वेळ मागितला असता, संपूर्ण सभागृहातून अविलंब होकार मिळाला. कुणीही आपली जागा सोडायला तयार नव्हते. आकंठ प्राशन केलेल्या या ज्ञानामृताने उपस्थितांच्या चेहऱ्यावर पूर्ण समाधान झळकत होते. श्री ज्ञानराज माणिकप्रभु गाईने सोडलेला ज्ञानरूपी पान्हा सेवून आज पाडसे तृप्त झाली होती. श्रीजींच्या प्रवचनानंतर श्री आनंदराजप्रभुंनी आपल्या आभार प्रदर्शनावेळी श्री माणिक प्रभु संस्थानासंबंधी थोडक्यात माहिती उपस्थितांना दिली व आपल्या सवडीनुसार श्री माणिकनगरला यायचे अगत्याचे, सस्नेह निमंत्रण दिले. तसेच नाशिककरांच्या आयोजनाबद्दल आणि आदरातीथ्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्यानंतर श्री माणिकप्रभुंची आरती होऊन सर्व भक्तांना प्रभुंचा प्रसाद वाटला गेला. त्यानंतर महाप्रसादाने माणिक ज्ञानयज्ञाची यशस्वी सांगता झाली.

नाशिक दौऱ्यातील चौथ्या दिवशी श्रीजींनी सहकुटुंब व सद्भक्तांसह नाशिक येथे प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. श्रीजींना गाभाऱ्यात स्वहस्ते अभिषेक करण्याचा मान मिळाला. त्र्यंबकेश्वर नंतर श्रीजी कुशावर्त तीर्थी आले. तेथून पुढे रंगवधूत आश्रमात दर्शनासाठी आले. तेथे त्यांनी काही काळ व्यतीत करून दुपारी दत्तधामाला भेट दिली. सुमारे पाच ते सहा तास दत्तधामामध्ये घालवल्यानंतर श्रीजी संध्याकाळी गोदावरी काठी गंगा आरतीसाठी त्याच उत्साहात हजर होते.‌ बुधवारी सकाळी श्रीजींनी वणी येथे गडावर श्री सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले, मातेची आरती केली. तेथे श्रीजींचा श्रीसंस्थानातर्फे सत्कार करण्यात आला. वणीहून दुपारी येऊन श्रीजींनी काळाराम मंदिरात सहकुटुंब दर्शन घेतले. तेथेही श्रीजींना आरतीचा मान मिळाला. श्री काळाराम मंदिराचे अध्यक्ष ॲड. अजय निकम यांच्या हस्ते श्रीजींचा सत्कार करण्यात आला. गुरुवारी सकाळी धुळे येथे श्री सर्जाबाई दत्त मंदिरात श्रीजींची पाद्य पूजा करण्यात आली आणि तेथून औरंगाबादमार्गे श्रीजींनी माणिकनगरसाठी प्रस्थान ठेवले.

सन १९८८ ला श्री ज्ञानराज माणिक प्रभुंचे पिताश्री श्री सिद्धराज माणिक प्रभु गुजरातला जात असताना नाशिक येथे आले होते. त्यानंतर इतक्या प्रदीर्घ कालखंडानंतर श्री माणिकप्रभु संस्थानाच्या पिठाचार्यांचे आगमन नाशिक क्षेत्र झाले. पहिल्यांदाच श्रीजी नाशिकला येणार असल्यामुळे नाशिककर अत्यंत आनंदात आणि उत्साहात होते. विविध धार्मिक संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून श्री. गोपाळराव कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची रुपरेषा अतिशय दक्षतेने आखली आणि त्याला अत्यंत नियोजित पद्धतीने आणि तितक्यात समर्थपणे कृतीत देखील आणले. श्री. गोपाळरावांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या तसेच या दौऱ्याच्या यशस्वी आयोजनात तन-मन-धनाने सर्वतोपरी सहाय्य करणाऱ्या ज्ञात अज्ञात कार्यकर्ते यांच्याप्रती कृतज्ञता. त्यांच्या यशस्वी नियोजनबद्दल, व्यवस्थेबद्दल अभिनंदन, कौतुक आणि भविष्यातील अशाच यशस्वी आयोजनासाठी मनस्वी शुभेच्छा…

श्रीजींनीही वेळात वेळ काढून सदभक्तांवर कृपेसाठी नाशिक दौऱ्याचे निमंत्रण स्वीकारले. त्यासाठी श्रीजींचे माणिक प्रभुं संस्थानचे आभार मानावे तितके कमीच आहेत. शहराचे नाव जरी ना शिक असले तरी श्रीजींच्या श्री माणिक ज्ञान यज्ञातून प्रत्येकासाठी काही न काही शिकवण जरूर मिळाली असणार ह्यात तीळमात्रही शंका नाही. सामान्य जीवाला स्वस्वरूपाची ओळख करून देण्याची तीव्र तळमळ असणाऱ्या व त्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या श्रीजींच्या परममंगल चरणी अनंत कोटी नमन आणि वारंवार कृतज्ञता व्यक्त करतो‌.

 

[social_warfare]