उन्हाळ्याच्या तप्त दिवसांत माध्यान्ह होईस्तोवर फिर फिर फिरावं आणि थकून भागून गेल्यावर रस्त्याच्या एका वळणावर फुलांनी गच्च भरलेलं बकुळीचं झाड मिळावं आणि त्या शीतल छायेत बसून जीव शांत करावा!

किंवा विजांच्या लखलखाट होत असताना पावसाचा धुमाकूळ असताना हरवलेल्या वाटेवर एक ऐसपैस पडवी असलेलं कौलारू घर सापडावं आणि त्यात जीव शांत होईपर्यंत विसावता यावं!

किंवा कडाक्याच्या थंडीत उबदार कपडे ल्यायलेले असतानाही जीव घाबरगुंडी होऊन गेलेला असताना त्या धुक्यात एक शेकोटी सापडावी आणि शेकोटी करणाऱ्याने आपल्याला क्षणभर तिथेच बसायचा आग्रह करावा.

मनाची घालमेल होत असताना, सगळं असूनही काही नसल्याचा अनुभव होत असताना, पूर्ण हताशा आलेली असताना अशी कृपादृष्टी पडावी की हृदयाच्या एका कोपऱ्यातून हंबरडा फुटावा आणि त्याचवेळी गहन शांतता अनुभवता यावी…

अशा अनेकानेक भावनांच्या, विचारांच्या आंदोलनातून जाऊन एक असा विसावा समोर यावा की माहेरी आल्याची भावना यावी. बस्स झालं आता. ‘ह्याच साठी केला अट्टाहास’ असं वाटून जावं. असा अनुभव नासिक मुक्कामी आलेल्या मातृ-पितृतुल्य श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराज उपाख्य श्रीजी यांच्या दर्शन आणि सत्संगामुळे आला. श्री सद्गुरू माणिक प्रभू पादुकांचे विविध ठिकाणी पूजन झाले. तसेच श्रीजींचा तीन दिवसीय सत्संग कार्यक्रम सुद्धा झाला. त्यानिमित्ताने श्रीजी अनेक भक्त आणि संत व्यक्तींच्या सोबत राहिले. श्रीजी नुसते बघतात तेव्हा सुद्धा अद्भुत शांतता मिळते. मोठ्या आपुलकीने ते जेव्हा चौकशी करतात तेव्हा त्यांच्यातले गुरू तसेच पितृभाव आपल्या जीवाला गहन दिलासा देतो. श्रीजी सद्गुरू आणि पिता समान तर आहेतच पण त्यांच्यातली मातृवृत्ती अधिक संवेदनशील आहे. त्यांच्या पावलांवर वाहिलेली फुले सुद्धा इतकी भाग्यवान की ती सुद्धा तुडवली न जाता अलगद बाजूला जातात. व्यवस्थापन क्षेत्रात आजवर मी अनेक लोकं पाहिलेली आहेत. मॅनेजमेंट टायकुन्स म्हणा ना! त्यांना सगळ्यांचं व्यवस्थापन जमत असेल पण मानवी मूल्यांचं व्यवस्थापन जमेलच असं काही सांगता येत नाही. जिथे माणसाला संसाधन किंवा रिसोर्स म्हणून केवळ वापरलं जातं तिथे कसलं आलंय मानवी भावभावना आणि मूल्यांचं व्यवस्थापन? सद्गुरू माणिक प्रभू महाराज हे सकलमत आचार विचारांचे अध्वर्यू! हे सकलमत नावाप्रमाणेच सकल किंवा समस्ततेचा स्वीकार करणारे आहे. संपूर्ण स्वीकार! माणसाचा आधी माणूस म्हणून स्वीकार आणि मग एक एक सोपान वर चढत मुक्तीचाही सहज स्वीकार आहे. जीवनाला इतक्या उत्कट आणि गहनतेने फार कमी ठिकाणी स्वीकारले जाते. त्यासाठी आईचे मन आणि पित्याचे हृदय असलेला सद्गुरू असावा लागतो. असे सद्गुरू ज्ञानराज माणिक प्रभू आहेत आणि त्यांना याचि देही याचि डोळा अनुभवता आलं ही दत्त महाराजांची असीम कृपा होय. श्रीजी मानवी मूल्यांचे संगोपन आणि वर्धन करणारे सद्गुरू आहेत.

श्रीजींचे दर्शन घेणाऱ्यांत मी आधी म्हटलं त्याप्रमाणे अनेक संत सज्जन ही होतें. त्यापैकी एक म्हणजे श्री दत्तधाम येथील श्री दत्तदास महाराज! त्यांच्या सोबतचे श्री जींचे फोटो बघताना मला प्रकर्षाने माऊलींची आठवण आली. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

संत भेटती आजि मज ।
तेणें जाला चतुर्भुज ।
दोन्ही भुजा स्थुळीं सहज ।
दोन्ही सूक्ष्मीं वाढल्या ॥१॥
आलिंगनीं सुख वाटे ।
प्रेम चिदानंदीं घोटे ।
हर्षे ब्रह्मांड उतटे ।
समुळ उठे मीपण ॥२॥
या संतासी भेटतां ।
हरे संसाराची व्यथा ।
पुढता पुढती माथां ।
अखंडित ठेवीन ॥३॥
या संतांचे देणें ।
कल्पतरुहूनि दुणें ।
परिसा परीस अगाध देणें ।
चिंतामणि ठेंगणा ॥४॥
या संतापरीस उदार ।
त्रिभुवनीं नाहीं थोर ।
मायबाप सहोदर ।
इष्टमित्र सोईरे ॥५॥
कृपाकटाक्षें न्याहाळिलें ।
आपुल्यापदीं बैसविलें ।
बापरखमादेविवरे विठ्ठलें ।
भक्तां दिधलें वरदान ॥६॥

माऊली हे माऊली आहेत. प्रत्येक शब्द न शब्द गहन अर्थाने वापरला आहे. पण त्यातल्या त्यात चतुर्भुज हा शब्द मोठा विचारप्रवर्तक आहे. संतांची भेट झाल्यावर चतुर्भुज होणे म्हणजे काय? ते म्हणतात, चार भुजा म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ आहेत. त्या पैकी अर्थ व काम हे दोन पुरूषार्थ म्हणजे या दोन भुजा स्थूल आहेत. धर्म आणि मोक्ष या दोन भुजा सूक्ष्म आहेत. त्यात बारकावा आहे. त्या वाढल्या म्हणजे काय झालं? तर संतांच्या भेटीमुळे या दोन क्षेत्रात वर्धिष्णूता आली. अशा ह्या चार ही भुजा संतांच्या भेटीमुळे मला लाभल्या. याच अंगाने सगळ्या कडव्यांचा विचार केला तर सद्गुरू भेटीमुळे काय सार्थकता होते ते समजेल. श्री जी जवळ बसवतात तेव्हा ज्ञानदेव आणि ज्ञानराज माणिक प्रभू महाराज यांच्यातील द्वैत आपोआप अंतर्धान पावतं बघा! तिथे माऊली दिसू लागते. त्यांच्या हाती सोपवलेली भक्तीची अनंत पुष्पे मग त्यांच्याच हातून पादुकांवर वाहिली जातात. सार्थकता अजून काय असते? नाही का? श्रीजींची त्रिंबक भेट, वणी भेट, दत्तधाम भेट, काळाराम मंदिर भेट आणि भक्तांच्या घरी दिलेल्या भेटी ह्या शिव-शक्ती-भक्ती त्रिवेणी संगमाचा अपूर्व योग आहे. गंगा गोदावरीची आरती करताना श्रीजी बघत राहावेत असे आहेत. एक गोदावरी गंगा आणि एक सकलमताची मोक्ष गंगा! या दोन्हीत आपण विलीन होऊन जावं. हे जमलं की काय पाहिजे अजून? नाही का? माऊली कल्पतरू ज्या विचारांनी म्हणतात असे श्रीजी आपल्यात इतक्या साध्या पद्धतीने विद्यमान असणे ही महादेव आणि दत्त कृपा आहे.

सकलमत ही गंगा आहे. कर्म, भक्ती, योग व ज्ञान या चार ज्ञानतोया जिथे एकत्रित होऊन अध्यात्म संगम पावतात ती सकलमत भागीरथी गंगा होय. या गंगेत स्नान करायला मिळणे म्हणजे सर्व प्रकारच्या भेदांपासून मुक्ती! पंथ-संप्रदाय, जातपात, भेदाभेद, मंगल-अमंगळ, श्रेष्ठ-कनिष्ठ, भाषा अशा सर्व गोष्टी गौण आहेत हे सिद्ध करीत प्रभूंनी प्रमुख व प्रचलित धर्मातील जे जे उत्तम व उदात्त आहे त्यांचा स्वीकार करून त्यायोगे सकलमत आनंदभुवनाची निर्मिती केली आहे. ज्या भूमीत हे कार्य घडलं आहे ती मराठी, कानडी आणि तेलुगू भाषांची समन्वय भूमी आहे. त्यात अन्य भाषा देखील दुधात साखर होऊन गेल्या आहेत. अशा या आनंदभुवनाचे राजयोगी श्रीनृप श्रीजी सकलमत गंगेला आपल्यासाठी मोक्षगंगेत परिवर्तित करत आहेत हे आपलं सद्भाग्य! महाराष्ट्राला अशा नेमस्त, तात्विक आणि साधनारत अनुशासित अध्यात्मिक नेतृत्वाची नितांत आवश्यकता आहे.
‘श्रुतीधर्म रक्षुनी सकल मतांते वंदा।
सर्वांतरी आत्मा नको कुणाची निंदा।’ यासाठी श्री जी हवे आहेत. त्यांची विद्यमानता प्रत्येक व्यक्तीमधील आमूलाग्र बदलाची नांदी ठरत आहे. सत्य नेहमी साधेसुधे असते. ते सांगता येणे किंवा विशद करणे हे सोपे काम नोहे. श्रीजींनी गेले तीन दिवस भजन व प्रवचनातून हेच देवकार्य केले आहे. त्या अर्थाने समस्त नासिककर भाग्यवंत म्हणायला हवेत. गंगा गोदावरी तीरावर ही अध्यात्म गंगा श्रीजींच्या रूपाने अवतरली आणि अपूर्व अशी कृपा पर्वणी नासिककरांना साधता आली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जे वदावे तेच अंमलात आणावे याचा आदर्श वस्तुपाठ श्रीजींनी घालून दिलाय. फार काय लिहावे?  सर्वांवर आशीर्वाद असू द्यावा, हीच विनंती!

 

[social_warfare]