दि.१८-जुलै-२०२३ सायंकाळ पासून ते २१ च्या दुपार पर्यंत (अधिक श्रावण शुद्ध ०१,शके १९४५ ते अधिक श्रावण शुद्ध ०३) परमपूज्य श्री डॉ.ज्ञानराज माणिकप्रभू महाराजांचा सगरोळी दौरा संपन्न झाला.

त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या बहूप्रतिक्षित असलेल्या वरून राजानेहि सर्व शक्तीनिशी आपल्या आगमनाने सर्व शेती-तळे,मळ्यात पाणीच पाणी भरून टाकले. आणि श्रीजींच्या आगमनात उल्हसित झालेल्या सर्व भक्तांचे तोंडचे पाणी पळाले पण श्री प्रभु कृपेची  अशी किमया कि,”नेमकी भव्य शोभा यात्रा म्हणा-घरोघरीच्या दिवस भरातील पाद्यपूजा म्हणा-त्यावेळी नेमके पावसाने अशक्य वाटणारी उसंत घेतली.गूगल वरचे सारे अंदाज तेवढ्या वेळा पुर्ते फोल ठरविले.” जणू काही श्रीकृष्णाने सहज लीलल्या गोवर्धन पर्वत उचलून धरून कोसळणाऱ्या पावसापासून भक्तांचे रक्षण केले.या पुराण कथेचा पुनःप्रत्यय-प्रचीती आली ही प्रभूचीच कृपा म्हणावी.

दुसरे वैशिट्य म्हणजे-श्री.गंगाधर सावकार शक्करवार ह्यांनी प्रवचनोत्तर महाप्रसादाची व्यवस्था श्री माणिक प्रभु मंदिरा शेजारीच केली होती.अपेक्षे पेक्षा ज्यादा लोक प्रवचनाला जमले होते.शेवटी शेवटी शिजविलेले अन्न कमी पडेल कि काय अशी दाट-साधार काळजी वाटू लागली.भक्तांची रांग तर खूप मोठी होती,आता काय करावे हि चिंता संबंधित कार्यकर्त्यांना भेडसावू लागली.भाताचे मोठे पातेले रिकामे होत आले. नव्याने ज्यादा शिजवायला वेळही नव्हता.वेळ रात्री साडेआठ-नवूची होती.वरून पावसाची रिमझिम चालू झालेली.आता आहे तेवढे तरी वाढून टाकू असा विचार करत असताना इकडे लोक रांगेने येतच होते, तस तसे ते रिकामे होवू दिसणारे पातेले व त्यातील तळ गाठणारे अन्न-परातीत भरून नेवू देतच होते.शेवटी अश्यक्य वाटत असताना सर्वांनी मनसोक्त प्रसाद घेतला. हे कथन सर्व कार्यकर्त्यांनी जसेच्या तसे कथन केले.या वेळी अक्षरशः पांडवांच्या वनवासातील द्रौपतीच्या सत्व परीक्षेच्या वेळचे किंवा अलीकडच्या काळातील श्रीगुरु चरित्रातील श्री नरसिंह स्वामिंच्या कृपेने एका दरिद्री आयाचित वृतीच्या ब्राम्हणाच्या समाराधना प्रसंगाची किंवा श्री माणिक  चरितामृतातील- भालकी वनातील  माधूकरी मागून आणलेल्या अन्नाचे चार सहस्त्र लोकांना अन्न दानाच्या प्रसंगाची,किंवा दत्त जयंती उत्सवात अचानक वाढलेल्या भक्तांना वाढण्यासाठी तयार केलेल्या पुरणपोळ्या- पुरण-पुराणाच्या-कथेची आठवण होते. ही प्रभु कृपेची प्रचीती देते नाही तर काय?

त्या नंतर ठरलेल्या पाद्य पूजा हि व्यवस्थित झाल्या. श्रीजींची तबियत मध्येचे बिघडली.घरी बोलावून श्रीजींना पाद्य पूजा करणाऱ्यांची संख्या  व हाती असेलेला मर्यादित वेळ व वरून पावसाचा लपंडाव यांचे व्यस्त प्रमाण होते.त्यातच बाहेर गावाहून ऐन वेळी आलेली दर्शनार्थ भक्त मंडळी- अधिकमासाचे वाण देणारे-ऐनवेळी अति उत्साही पाद्यपूजा करतो म्हणणारे हया सर्वांची विनंती व कोणाची नाराजी नको म्हणून सर्वाना सामवून घेणे याचे गणित सोडवणे अशक्य वाटत असताना अगदी लोण्यातून अलगदपणे केस काढावा-तसे सर्व सुरळीत,वेळेत,व व्यवस्थित झाले.श्री सद्गुरू साईबाबांनी म्हटल्या प्रमाणे “श्रद्धा व सबुरी “ याचा  प्रत्यक्ष प्रत्यय आला ही देखील प्रभूचीच कृपा म्हणावी.

शेवटी दि.२१ ला सकाळी संस्थेत सर्व कार्यकर्त्यांना संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष या नात्याने मार्गदर्शन पर दिलेले आशीर्वचन म्हणजे सर्वांवर कळसच होता.संस्थेचे नाव-“संस्कृती संवर्धन मंडळ”-संस्थेचे मध्यवर्ती कार्यालयाचे नाव कर्मयोग –त्याचा खरा मतितार्थ,कार्यकर्त्यांनकडून होणारी त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी,श्री प्रभु कृपेचा अर्थ या सर्वांचा रोजच्या जीवनातील चालती बोलती उदाहरणे देत,श्रीजीनी आम्हाला पटवून दिले व आम्हाला ते पटलेही.अर्थात प्रत्यक्ष उदाहरण,शंका निरसनात टाळ्यांच्या कडकडाटासह श्रोत्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद हेच दर्शविते कि-श्री प्रभु कृपा म्हणजे काय चीज आहे. श्री प्रभूंच्या कृपेनेच ,या कामी ,सर्व गावकऱ्यांनी चांगले सहकार्य केले,तसेच संस्थेच्या विकास कामात वेग आला. संस्थेचे सर्व कार्यकर्तेही आपले घरचे काम समजूनच संस्थेत काम करतात ,ही खूप मोठी जमेची बाब आहे.

शेवटी शंका निरसनात श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलेली समर्पक-समयोचित-तत्काल (हजर जबाबी )व बिनतोड उत्तरे म्हणजे-CID हया जुन्या हिंदी सिनेमातील बडाही CID है.वो नीली छत्रीवाला | हर तालेकी चाबी रखे-हर चाबी का ताला !! हया गाण्याची आठवण झाल्या शिवाय राहत नाही.

दर वेळी गीता-वेदोपनिषदातील त्यांनी केलेली विधाने,उधृत केलेले श्लोक हे त्यांच्या विद्वतेची प्रचीती देतातच पण त्याच बरोबर वेदोपनिषदे-गीता ह्यातील श्लोक  व श्री प्रभूंची शिकवण यातील साम्य व महत्व सहज सांगून जातात.जणू प्रभूंची तत्वे व गीता वेदोपनिषद हे एकच आहेत ज्या प्रमाणे वस्त्र व धागे दोरे वेगळे समजू शकत नाही किंवा बर्फातील पाणी व बर्फ वेगळे करता येत नाही किंवा सूर्य व प्रकाश वेगळा करता येत नाही.हे सूर्य प्रकाशा इतकेच स्वच्छ आहे.म्हणूनच म्हणतात गुरु साक्षात परब्रम्ह .

कर्मयोग संबंधात त्यांचे आशीर्वचन ऐकून मला बाबांची आठवण झाली.बाबा (आमचे वडील )एकदा असेच मला म्हणाले होते कि भरपूर शेत जमीन व भला मोठा वाडा परमेश्वराने आपणाला दिला आहे.तो चैनीत,आरामात बसून खाण्यासाठी नसून ज्या गावात,ज्या समाजात आपण राहतो त्याचे काही आपण देणे लागतो म्हणून त्यांची सदैव सेवा करत रहावी.

आणि  अश्याच एका संकट प्रसंगी म्हणाले होते कि अंबामाय व श्री माणिकप्रभु ह्यांच्या शिवाय आपणाला कोण आहे.आमच्या कुटुंबावर अनेक सामाजिक,राजकीय ,कौटुंबिक संकटे आली, तरी पण श्री प्रभु कृपेनेच आम्ही तरलो,उभारलो आहोत,ह्याचीही प्रचीती वारंवार येते.पण काही वेळी आमचे मन भरकटत जाते.या सर्वांची जाणीव श्रीजींनी आम्हाला आपल्या आशीर्वचनातून करून दिली.त्यांची ती कृपा आमचे वर अशीच राहो,ती वृद्धींगत होवो हि श्री प्रभु चरणी प्रार्थना .

असा आहे श्री प्रभूंच्या कृपेचा पुनःप्रत्ययाचा आनंद….!!!

[social_warfare]