दिनांक 20 ते 26 मार्च 2022 पर्यंतच्या वेदांत सप्ताहातील ‘वेदांत शिक्षा वर्गात’ श्रीमद्भगवद्गीतेच्या 17 व्या अध्यायातील ‘श्रद्धात्रय विभाग योग’ या विषयाचे श्रीजींनी सविस्तर रित्या व अत्यंत तळमळीने विश्लेषण करीत – त्याला आपल्या ज्ञानाच्या छन्नी हातोड्याने विशेष पैलू पाडले. गंगेकाठ्च्या श्रीशंकर व माता पार्वतीच्या नाटकीय संवादातून व एका श्रद्धावान भक्तांच्या प्रवेशाचा दृष्टांत देत सात्विक अढळ श्रद्धा ही काय चीज असते हे दाखवून दिले. अर्थात आमच्या सारख्या जडत्वाच्या गाळात फसलेल्यांना तो विषय कितपत समजला हा प्रश्न अलाहिदा! श्रीजींच्या ज्ञान प्रबोधनातून आम्हाला जे काही आकलन झाले ते असे  – मानवी जन्मातील दु:खाने होरपळलेले आपण म्हणतो की ‘‘नरहरीसी निजपद दे नको जन्म दूसरा’’ पण असेही काही लोकांना वाटते की – पंडित लोक म्हणतात त्याप्रमाणे – ‘प्रारब्धच बलवान असते, माणसाचा स्वभाव बदलत नाही,वगैरे वगैरे.’ ते जर खरे तर मग या जन्मातच जे काही नाना खटपटी लटपटी- भानगडी – खोटेनाटे करून आपण सुख मिळविण्याचा प्रयत्न करतो. तेच सत्य मानून अशाच पुढच्या जन्मीहि – हे तथाकथित सुंदर जग का नाही उपभोगू? किंवा पुढचा जन्म असो वा नसो किंवा कोणता का व कसा का असेना या जन्मी तरी मिळेल त्या मार्गाने पूर्ण सुख का नाही भोगू? उगाच पुढचा जन्म नको रे बाबा का म्हणू? किंवा या जन्मातच नाना वैकल्ये, नाना उपासना करून घेवून का ताप करू घेऊ? चार्वाक माताप्रमाणे ‘ऋणंकृत्वा घृतं पिबेत्‌’ व्हायचे ते होऊन जावू द्या असा विचार आमच्या सारखे लोक करतात.

यावर श्रीजी म्हणाले, प्रारब्ध बलवत्तर असल्याने याजन्मात नुसता भोग भोगून पुढील जन्म कोणता, कसा याची काय शाश्वती, असे वाटते ना? अशा वेळी पूर्ण श्रद्धेने व तेही सात्विक श्रद्धेने व सर्व कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने – उपासना केली तरच आत्मज्ञान होते. याजन्मी पुण्य कर्माचे – प्रारब्धाचे भोग भोगून एक नाही दोन नाही तीन नाही तर केंव्हा तरी कुठल्या तरी जन्मात प्रारब्धाचे देणे फिटल्यावर तरी आत्ताच्या जन्मातील सात्विक श्रद्धेने व ईश्वर अर्पण बुद्धीने पाच प्रकारच्या केलेल्या यज्ञ कर्माने – सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखालील आचरणाने पुढे केंव्हा तरी प्रारब्धाची साखळी तुटून जेंव्हा केवळ पुण्यच  ‘बॅलेंसशीट’ मध्ये जमेच्या बाजूस शिल्लक राहते तेंव्हा तरी पुढची पुनरावृत्ती टळते व आपणास मोक्ष प्राप्त होतो – आपण ब्रम्हस्वरुपास प्राप्त होतो. व तसे होणे केवळ या दुर्लभ अशा मनुष्यजन्मातच शक्य आहे. महत्प्रयासाने व पुण्यकर्मानेच मनुष्य जन्म प्राप्त होतो. इतर प्राणी – वनस्पती  व जीवजंतू यांच्या जन्मात पुण्यकर्म वा सात्विक कर्म करणे शक्य नाही. करण त्यांना सदसदविवेकबुद्धी नसते. फक्त मानवालाच ती आहे. म्हणून सात्विक – राजस – तामस यापैकी केवळ सात्विक श्रद्धेचा अंगीकार करीत केवळ सात्विक तप, ज्ञान, आहार व देव, मनुष्य, पित्र, आदि पाच प्रकारच्या यज्ञाच्या व्यवहाराने आपण सद्गुरूंच्या संगतीत दक्षतेने व चातुर्याने विचार करीत शास्त्रविधीनुसार आचरण ठेवले तर व मुख्यतः श्री माणिकप्रभू मानस पूजेत चौथ्या श्लोकाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे ‘‘यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं आराधनं ते प्रभो’’ आपण जे काही करू ते ईश्वरार्पण बुद्धीने केले तर नक्कीच पुढील पुनरावृत्ती टळून आपण मोक्षपदास प्राप्त होवू शकू.

श्रीमद्भगवद्गीतेतल्या बाराव्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकात श्रीकृष्णाने म्हटले आहेच की  ‘‘मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते। श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः।।’’ जे आपले मन भगवंताच्या दृश्य सगुण रूपावर स्थिर करून श्रीपदी अढळ व सात्विक श्रद्धा ठेवतात ते निश्चितच श्री भगवंताच्या स्वरूपास प्राप्त होतात.

[social_warfare]