इजा – बीज तिजा, काशी – रामेश्वर पुरी झाल्या,
आता द्वारका झाली की चौकोन पूर्ण होणार !

सारे कांही सुनियोजित, व त्याची पुर्तता ही तीन्ही वेळा पूर्व नियोजना प्रमाणे यथासंग व व्यवस्थित झाली. आठ – नऊशे भक्तांच्या व्यवस्थेचे एव्हढे टेंशन असतांनाही समुद्रस्नान – श्राद्धविधी – आराधना –भजन – पूजनादि सर्व धार्मिक विधी यथासंग संपन्न करणे,  हे श्रद्धा आणि संयमाचा परिपूर्ण संगम असणारे श्री ज्ञानराज प्रभूच करू जाणे. त्यांचा हा गूण थोडा जरी आम्हीं अंमलात आणला तरी जीवनात आम्ही खूप कांही मिळविले , असे होईल.

श्री सिद्धराज प्रभूंची पुण्यतिथी – आराधना – प्रवास व खानपान वगैरेंची व्यवस्था दरवेळी चढत्या क्रमाने उत्तमोत्तम झाली. पुरीला तर जणू कांही केवळ खवैये म्हणून उदर भरणम यासाठीच आम्ही गेलो होतो की काय अशी शंका येते.कुठे कांही गोंधळ – चोऱ्या – भांडण – गैर व्यवस्था – चिडचिड वगैरे कांही कांहीही नाही. यात आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती ही की “आम्ही श्रीजी बरोबर समुद्र स्नानाला गेले वेळी , श्रीजी तिथे येणे अगोदर थोडावेळ समुद्रात  डुबक्या घेत होतो , तेंव्हा समुद्राच्या लाटा फारशा मोठ्या नव्हत्या , म्हणजे सुसह्य होत्या , पण जेंव्हा प्रत्यक्षात श्रीजी – श्री प्रभूंच्या पादुका हाती घेऊन,  स्वतः स्नान करून ,पादुकांना समुद्र जलाने अभिषेक करीत होते-पादुकांसह समुद्रात डुबकी घेत होते तेंव्हा समुद्राच्या खूपच खूप मोठ्या लाटा उचंबळून येऊन श्रीजी व श्री पादुकाना आनंदतीशयाने जलाभिषेक करीत होत्या.

ओहोटीचे (पोर्णिमे नंतरचे ) दिवस असूनही जणूकाही समुद्रालाही प्रभू दर्शनाची ओढ लागून भरती आली होती. मित्रहो ! यात अतिशयोक्ती मुळीच नाही ,  श्रीजी पासून काही अंतरावर आधी निर्वेध पणे डुंबणारे आमच्या सारखे यावेळी 2-3 वेळा सरळ मागे ढकलल्या गेलो किंवा काहीजण चक्क आडवे पडलो ही वस्तुस्थिती आहे. जसें घुसळलेल्या ताकातून लोण्याचा गोळा अलगद काढावा तसे आरामात गेलो आणि सरळ परत आलो.

माणिक नगरला परत आल्यावर वेशीत असंख्य सुवासिनींनी “श्रीजीना” ओवाळले. स्थानिक नागरिकांकडून वेशीवरील नागरखान्यातून श्रीजी व त्यांचे सोबत सर्व भक्तांवर पुष्पवृष्टी होत होती , तर मीच का मागे राहू म्हणून “वरूणराजयानेही पावसाचा हलकासा शिडकावा केला”. हा कांही नुसताच योगा योग म्हणता येणार नाही तर “ही श्री प्रभूंच्या समाधानाची रोख पावतीच म्हणावी लागेल.”

आमचे वैयक्तिक खाजगी बाबतीत म्हणावे तर धूसर शक्यता असलेली 1-2 कामं  त्याचवेळी पूर्णत्वास गेल्याची सुवार्ता  तेंव्हाच कळाली. ही श्री प्रभूंचीच कृपा म्हणावी.

इतर सामाजिक -राष्ट्रीय विचारांच्या दृष्टीने विचार केला तर म्हणावे लागेल की ,स्वछता,नियमांचे पालन,निस्वार्थीपणा, धर्मा बाबत व्यापक दृष्टी याबाबत दक्षिण भारता पेक्षा उत्तर – पश्चिम व पूर्व भारत खूपच मागे आहे, असे दिसून येते. असो.

[social_warfare]