संत श्रेष्ठ सद्गुरू श्री माणिक प्रभू महाराजांच्या जन्माचे यंदा हे २०६ वे वर्ष होय. श्री प्रभूंनी मत-पंथ- विविध धर्मियांच्या गल्बल्यातून ताक घुसळून घुसळून जसे लोणी काढतात तसे “सकलमत संप्रदायाची“ स्थापना केली. ‘द्वैत बुद्धी ही दूर करा,सकल मताचा पंथ धरा’ असा प्रचार करीत सर्व मतधर्म तत्वांचा आदर करीत त्याचा सुवर्ण मध्य साधत सकलमत पंथाची मुहूर्त मेढ रोवली.श्री गुरु नानकदेवजिंनी अशाच विचारांनी शीख धर्माची स्थापना केली आज तो सर्व मान्य झाला आहे.

‘एकं सद्विप्रा बहुधा वदंती’ असा संदेश देत सृष्टीमध्ये चालकत्वाची भूमिका पार पाढणारी एकच शक्ती आहे. वरपांगी तिची अनेक रूपे दिसतात पण ती शक्ती सर्वत्र एकच आहे. ज्या प्रमाणे अनेक अंधळ्यानी हत्तीच्या निरनिराळ्या अंगाना स्पर्श करून हत्तीचे रूप वर्णन अनेक प्रकारे केले. व आमुक एक प्रकार म्हणजेच हत्ती असे प्रतिपादिले. पण डोळस पणे नीट पाहून ज्ञान मिळविले कि त्याचे स्वरूप कळते ती शक्ती म्हणजे एकच आहे ह्याचे ज्ञान होते हे सद्गुरुनी पटवून दिले. ज्ञान व भक्तीच्या संगमानेच ती स्थिती प्राप्त होवू शकते व अंती मोक्षाप्रत जाता येते असे प्रतिपादिले.

त्या साठी गुरूपदेश व तोही अधिकारी व्यक्तीच्या-गुरूच्या मुखातून मिळविलेले ज्ञानच उपयोगाचे आहे. ऐऱ्या-गैर्यांचा उपदेश काही उपयोगाचा नाही. विशेषत्वाने जिवंत गुरूच्या मुखातून मिळालेले ज्ञान जास्त उपयोगाचे असते. कारण त्या अधिकारी गुरूचे आचरण व ज्ञान हे आपण प्रत्यक्ष बघू शकतो त्याचा सरळ-थेट परिणाम आपल्यात मुरतो. वर्तमान पिठाधिपती श्री ज्ञानराज प्रभूंनी साधू व राज्याची गोष्ट सांगत हे पटवून दिले कि ‘राजा बोले दल हाले-मिया बोले दाढीही न हाले’ म्हणून गुरु करावा व तोही असा अधिकारी असावा जसा सकलमताचार्य श्री प्रभू.

त्यांच्या काळापासून सर्व गुरु पिठाधिपतींची परंपरा त्यांचे वागणे-चालणे-बोलणे हे आपल्या मन पटलावर कोरले जात आहे.त्यांची योग्यता व अधिकार तसाच परिपूर्ण आहे. त्यांचा उपदेश व त्यांचे प्रत्यक्ष वर्तन ह्यात एक वाक्यता दिसते. त्या सर्वांमध्ये दृढ निश्चय, निःसंगता, परोपकार, विश्वबंधुता, सर्वांचा आदर, न्याय प्रीयता, आद्य प्रभूंवरील अढळ श्रद्धा-भक्ती, सततचा व्यासंग, सततची कार्य प्रवणता, बंधू प्रेम व असे अनेक सद्गुण आजवर परंपरेने सर्व पिठाधिपतीत प्रत्ययास  येतात. सर्वांच्या साहित्य लेखनातही सामजिक उद्धाराची व मानवी कल्याणाची तळमळ दिसून येते.

वर्तमान पिठाधिपती श्री  ज्ञानराज प्रभूंचे तर वर्णन करावे तेवढे थोडेच आहे सततचा व्यासंग – धडपड-कार्यप्रवणता – नवनवोन्मेश शालिनी प्रमाणे नित्य नवा ध्यास व त्याची निर्मिती ही त्यांची ठळक वैशिष्ठ्य दिसून येतात. त्यांच्या कामातून प्रतीत होणारी भव्यता व दिव्यता सतत जाणवते. कोणतेही कार्य असो-निरनिराळ्या पिठाधिपतींची प्रती वार्षिक आराधना असो वा मोठे बांधकाम (अगदी झपाटल्या प्रमाणे कामाचा उरक ) असो किंवा एखादा राष्ट्रीय वा सामाजिक कार्यक्रम असो किंवा भक्तांसह यात्रा असो सारेच भव्य आणि दिव्य! कुठेच न्यूनता नाही. सर्वात मिळून मिसळून राहणे-कोण गुरु आणि कोण भक्त ओळखूच येणार नाही.जसे बर्फात गोठलेले पाणी वा बर्फाचे झालेले पाणी!

आमच्या सारख्या सामान्य जनात देव-धर्म-गुरु-ह्यांचे विषयी साशंकता व चंचलता सतत प्रतीत होते. काही लोकांचा प्रश्न असाही असतो कि देव श्रेष्ठ का गुरु श्रेष्ठ? पण दत्त संप्रदाय म्हणतो गुरु श्रेष्ठ, कारण देव देतो व नष्टही करतो, व दुष्ट-सुष्टांचा न्याय करतो, त्यांचे-त्यांचे वर्तनाप्रमाणे दान व दंडही करतो पण गुरु तर दान करतोच आणि दंड करणे ऐवजी दुष्टांना त्याची वृत्ती सुधारून त्याला सुष्ट बनवून सनमार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. कारण तो समोर असतो आपण त्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाहिलेले असते. देव केवळ कथा पुराणातूनच दिसतो. म्हणून गुरु श्रेष्ठ. व तोही सकलमताचार्य श्री सद्गुरू माणिक प्रभूंसारखाच सर्वश्रेष्ठ!

आमच्या सारख्या संसारिकांचे  प्रत्यक्ष प्रमाणावरच लक्ष्य असते किंवा असे म्हणा हवे तर चमत्कार शिवाय नमस्कार नाही. काही नास्तिक, प्रारब्ध वैगैरे काहीच नसून प्रत्यक्ष नैसर्गिकरित्या बरे वाईट घडत असते असे म्हणतात व जरासे बरे वाईट झाले कि कसला देव नी कसला गुरु! अर्थात मनस्तापामुळे असेवाटणे साहजिक आहे, पण सततचे  गुरु स्मरण, चिंतन, मनन, व चरित्र पठन या मुळे मुख्य प्रवाहात आपण पुन्हा परत येतो.

अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाले तर मंगळवार दि.२६/१२/२०२३ ला श्री माणिक प्रभू जयंती दिनी सायंकाळी ७.३० वा सगरोळीहून माणिक नगर साठी निघालो गाडीच्या ड्रायवर ने २ वेळा जिवावरचे अपघात केले होते. मनातून धाकधूक होतीच. आम्ही भालकी ते हुमानाबाद्च्या रस्त्यावर असताना अंदाजे रात्री १०.३० च्या सुमारास हाइवे वर एक वळण होते व त्या वळणावरच ट्रक उभा असलेला ड्रायवरला नीट दिसला नाही आणि गाडी ९० ते १०० च्या वेगात, अगदी जवळ येताच त्याच्या लक्षात आले. आणि त्याने प्रसंगावधान राखून झटकन गाडी उजवीकडे वळवून परत डावीकडे वळणावर घेतली. केवळ एका क्षणाच्या १०० व्या भागाच्या वेळेतच हे घडून गेले. गाडी पुन्हा डावीकडे सरळ करताना त्या वेगात सावरले गेले, नाही तर उजवीकडे-डावीकडे वळविण्याच्या प्रयत्नात गाडीने पलटी खाल्ली असती. श्री प्रभू कृपा म्हणूनच आम्ही बचावलो,नाहीतर आमचे काही खरे नव्हते.

असाच एक प्रकार नाशिकचे श्री.गोपाळराव कुलकर्णी यांचे बाबत वाचण्यात आला. नेमके ह्याच दिवशी जयंती करून २७ च्या पहाटे ते माणिकनगरहून नाशिकला परत जाण्यास निघाले बीडच्या थोडे पुढे जातास दुपारी ४.३० च्या सुमारास ह्यांच्या गाडी पुढील, म्हशी वाहतूक करणाऱ्या  ट्रक-ड्रायवरने अचानक ब्रेक दाबल्यामुळे अचानक थांबला व ह्यांची गाडी त्या ट्रकवर जावून जोरात आदळली. त्या गाडीचे हेडलाईट व बॉनेट पासून स्टेरिंग समोरील काचे पर्यंत पूर्ण चकणाचूर झाली.पण काचेच्या आतून स्टेरिंग पुढे त्यांना माणिकनगरात प्रसादात मिळालेला मुख्य देवळातील एक लांबलचक होता. तो त्यांनी स्टेरिंग पुढील काचेच्या आतून मोकळ्या जागेत लांब असा मांडून ठेवला होता.त्या काचे पर्यंतच गाडीचा चुराडा झाला पण काचे पासून-हारापासून आत काहीच नुकसान झाले नाही किंवा साधे खरचटले देखील नाही.

‘तो हार म्हणजे श्री प्रभूंनी आखलेली लक्ष्मण रेषाच होती’.असे श्री गोपाळराव कुलकर्णी म्हणतात.श्री प्रभू जवळी असतां।मग चिंता मज कां।।  ह्या पदाची प्रचिती येते.

[social_warfare]