१०-१०-२२ ते १४-१०-२२ पुरी यात्रा आणि ती सुद्धा साक्षात श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराजांबरोबर ही यात्रा करायला मिळणार म्हणजे हा तर दुग्ध शर्करा योग आम्हा भक्त मंडळींसाठी. म्हणून आमची ६ महिने आधी पासून तयारी सुरू झाली.
म्हणता म्हणता १० ऑक्टोबर आली आणि आम्ही एअपोर्टवर प्रस्थान केले, प्रचंड ट्रॅफिक मधून ठरवल्या प्रमाणे १०.३० वाजता पोहोचलो. दुपार १२.०५ चे फ्लाईट वेळेवर सुटले.
भुवनेश्वर विमानतळावर संस्थाननी आम्हाला नेण्यासाठी एसी बस ची छान सोय केली होती त्यात आम्ही ३१ जण होतो.
जाताना रस्त्यात लींगराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
७.३० वाजता आम्ही पुरुषोत्तम भक्त निवास ह्या मुक्कामी पोहोचलो.
११-१०-२२ रोजी संध्याकाळपासून महाराजांचे प्रवचन, भजन कार्यक्रम सुरू होणार होते. आम्ही सकाळी ८.३० वाजता निलाद्री भक्त निवास येथे इडली मेदू वडा न्याहरी करून ऐतिहासिक कोणार्क/सूर्य मंदीर बघण्यास निघालो. जाताना आधी बेलेश्वर मंदिरात शंकराचे व पार्वतीचे दर्शन घेतले . तिथे बेलाचे मोठे वृक्ष आहेत.
तेथून चंद्र भागा बिच वर थांबून खेळणी, शोपीसेस घेत व नारळ पाणी याचा आस्वाद घेऊन पुढे निघालो.
सूर्य मंदीर हा बराच मोठा परिसर असून बरीच माहिती गाईड ने पुरवली. २४ रथचक्र, त्यातील एक चक्र आपल्या 10/- व 20/- रुपयाच्या नोटे वर छापलेले आहे.
सूर्य देवाची मूर्ती पूर्वेला आहे त्याच्यावर सूर्योदयाला सूर्याची कोवळी किरणे प्रथम पडतात.
पश्चिम दिशेला सूर्यदेवाची घोड्यावर स्वार झालेली मूर्ती प्रस्थापित केली आहे त्यावर सूर्यास्ताची किरणे उठून दिसतात.
संध्याकाळी ६ वाजता निलाद्री भक्त निवास येथे हॉल मध्ये आनंदराज महाराजांचं भजन फारच आनंद देत होते. त्या नंतर महाराजांचे मंत्रमुग्ध करणारे प्रवचन ऐकून तृप्त झालो.
९.३० वाजता आम्ही येथेच महाप्रसादाचा आस्वाद घेऊन जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी गेलो. तेथे कार्तिक महिन्याचा पहिला दिवस व सोमवार असल्याने प्रचंड गर्दी होती. दर्शन होऊ शकले नाही. रात्री ११.३० वाजता पुरुषोत्तम भक्त निवास येथे परत आलो.
१२-१०-२२ रोजी सकाळी ७.०० वाजता स्वर्गदार समुद्रावर समुद्र स्नानासाठी निघालो. ८-०० वाजता श्री.ज्ञानराज महाराज आले. त्यांच्या सोबत सर्व जण समुद्रात स्नानासाठी गेलो. समुद्राचे पाणी स्वच्छ व सुंदर होते. तेथे प्रचंड लाटा उसळत होत्या. सगळे एकमेकांना धरत सांभाळत होते. समुद्रात पडून परत उठत होतो. thriling experience होता. केवळ महाराज बरोबर असल्यानं एवढे धाडस करत होतो. तेथून १०.१५ वाजता परत पुरुषोत्तम भक्त निवास येथे पोहचलो.
दुपारी १२ वाजता निलाद्री भक्त निवास येथे सदगुरु श्री.सिद्धराज माणिक प्रभू महाराजांचा पुण्यतिथी सोहळा पाहण्यासाठी. भजन प्रवचन झाल्यावर रात्री प्रसाद घेऊन पुन्हा जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी गेलो. तेथे गेल्यावर शेजारती होती व लगेच मंदीर बंद झाले. त्यामुळे पुन्हा दर्शन होऊ शकले नाही. दार बंद होऊन छोट्या दरवाजातून बाहेर पडताना हा अनुभव अविस्मरणीय होता.
आम्ही रात्री १२.३० वाजता पुरुषोत्तम भक्त निवास येथे परत आलो.
१३-१०-२२-सकाळी ९ वाजता निलाद्री भक्त निवास येथे न्याहरी करून बाजूलाच असलेल्या ओडिसा हॅंडलूम हाऊस येथे ओडिसा सिल्क साडी बघण्यास गेलो तेथून प्रत्येकाने साडी, ड्रेस हमखास खरेदी केले. आम्ही असतानाच मुंबई च्या सगळ्या जमावाने त्याचे दुकान व्यापून टाकले.
सकाळी ११.३० पासून निलाद्री भक्त निवास येथे सदगुरु श्री. सिद्धराज माणिक प्रभू महाराजांची आराधना सुरू झाली.
श्री.ज्ञानराज महाराजांच्या हस्ते रुद्राभिषेक व पूजा झाली. सर्व भजने फारच आनंददायी होती. प्रत्यक्ष श्री. सिद्धराज माणिक प्रभू गात आहेत असे काही वेळा वाटत होते.
संध्याकाळी ६.० वाजता आम्ही पुन्हा एकदा जगन्नाथ मंदिरात जाण्यास निघालो. ह्या वेळी प्रत्यक्ष भगवान एका माणसाच्या रूपाने आम्हाला भेटला व त्याने त्याच्या मार्गदर्शना खाली सर्वांना ६ ते ८ फुटांवरून दर्शन घडवले. आम्ही धन्य झालो व जगन्नाथ पुरी चे भगवंताचे दर्शनाने पावन झालो.
तेथून आनंदाने आम्ही परत निलाद्री भक्त निवास येथे ७.१५ वाजता आलो.
रात्री आराधना कार्यक्रम संपन्न झाल्यावर प्रसाद घेऊन ११.०० वाजता प्रसन्न चित्ते पुरुषोत्तम भक्त निवास येथे परत आलो.
१४-१०-२२
निरोपाचा दिवस उजाडला. सकाळी ७ वाजेपासून सर्व भक्त मंडळी तयार होऊन हॉटेलच्या कॉरिडॉर मध्ये जमा झाली. श्री.ज्ञानराज महाराज सुधा भक्त मंडळी बरोबर होते. ४ बसेस निघणार होत्या आम्ही महाराजांचा आशिर्वाद घेऊन आमची शेवटची बस भुवनेश्वर एअपोर्टवर निघाली. आम्ही सगळे सुखरूप तेथून निघाल्यावर महाराज निघाले.
आम्ही निघताना महाराजांनी श्री अतुलला सांगितले मुंबईला पोहचल्यावर मेसेज कर.
एअरपोर्टवर आम्ही ११ वाजता पोहचलो आणि नंतर जोरात पाऊस सुरु झाला. आमचे विमान दुपारी ३.१० चे होते त्यामुळे आम्हाला भरपूर वेळ होता. झाले पुन्हा सर्व पुरुषमंडळी साठी खरेदी (ओडिसा कुर्ता वगैरे) सुरू झाली.
विमान बरोबर ३.०५ वाजता सुटले. पोहचण्याचे टाईम ५.२५ होते. सर्व मजेत चालेले होते.४.५५ वाजता मुंबई येथे लँडिंग साठी खाली आले आणि झपकन पायलट ने विमान वर वर नेले. अनाऊस्मेंट झाली खराब हवामानामुळे अर्धा ते १ तास उशिरा उतरेल. सर्वजण एन्जॉय करत होतो.५.४० वाजता कॅप्टनने अनाऊस्मेंट केले अजून हवामान खराब असल्याने उतरण्यास परवानगी नाही. सर्व विमाने अहमदाबाद व हैदराबादला डायवर्ट केली आहेत. आपल्या कडे इंधन अर्धा तास पुरेल एवढेच आहे. माहितीनुसार वरील दोन्ही विमानतळ १ तासा पेक्ष्या जास्त अंतरा वर आहेत.
झाले सन्नाटा झाला सर्व भक्त प्रभूंचा धावा करू लागले.
आणि चमत्कार झाला ५.५५ वाजता मुंबई विमानतळावर उतरले. तेव्हा सर्वांना कळले असणार की महाराजांनी श्री. अतुलला म्हणूनच मुंबईला उतरल्यावर कळव असे का सांगितले ते.
ಕದಾಚಿತ್ಕಾಲಿಂದೀ ತಟವಿಪಿನಸಂಗೀತಕರವೋ
ಮುದಾ ಗೋಪೀನಾರೀವದನಕಮಲಾಸ್ವಾದಮಧುಪಃ
ರಮಾಶಂಭುಬ್ರಹ್ಮಾಽಮರಪತಿಗಣೇಶಾಽರ್ಚಿತಪದೋ
ಜಗನ್ನಾಥಸ್ವಾಮೀ ನಯನಪಥಗಾಮೀ ಭವತು ಮೇ || ೧ ||
ಭುಜೇ ಸವ್ಯೇ ವೇಣುಂ ಶಿರಸಿ ಶಿಖಿಪಿಚ್ಛಂ ಕಟಿತಟೇ
ದುಕೂಲಂ ನೇತ್ರಾಂತೇ ಸಹಚರಕಟಾಕ್ಷಂ ವಿದಧತೇ
ಸದಾ ಶ್ರೀಮದ್ಬೃಂದಾವನವಸತಿಲೀಲಾಪರಿಚಯೋ
ಜಗನ್ನಾಥಸ್ವಾಮೀ ನಯನಪಥಗಾಮೀ ಭವತು ಮೇ || ೨ ||
ಮಹಾಂಭೋಧೇಸ್ತೀರೇ ಕನಕರುಚಿರೇ ನೀಲಶಿಖರೇ
ವಸನ್ಪ್ರಾಸಾದಾಂತಃ ಸಹಜಬಲಭದ್ರೇಣ ಬಲಿನಾ
ಸುಭದ್ರಾಮಧ್ಯಸ್ಥಃ ಸಕಲಸುರಸೇವಾವಸರದೋ
ಜಗನ್ನಾಥಸ್ವಾಮೀ ನಯನಪಥಗಾಮೀ ಭವತು ಮೇ || ೩ ||
ಕೃಪಾಪಾರಾವಾರಃ ಸಜಲಜಲದಶ್ರೇಣಿರುಚಿರೋ
ರಮಾವಾಣೀಸೌಮಸ್ಸುರದಮಲಪದ್ಮೋದ್ಭವಮುಖೈಃ
ಸುರೇಂದ್ರೈರಾರಾಧ್ಯಃ ಶ್ರುತಿಗಣಶಿಖಾಗೀತಚರಿತೋ
ಜಗನ್ನಾಥಸ್ವಾಮೀ ನಯನಪಥಗಾಮೀ ಭವತು ಮೇ || ೪ ||
ರಥಾರೂಢೋ ಗಚ್ಛನ್ಪಥಿ ಮಿಲಿತಭೂದೇವಪಟಲೈಃ
ಸ್ತುತಿಪ್ರಾದುರ್ಭಾವಂ ಪ್ರತಿಪದಮುಪಾಕರ್ಣ್ಯ ಸದಯಃ
ದಯಾಸಿಂಧುರ್ಬಂಧುಃ ಸಕಲಜಗತಾಂ ಸಿಂಧುಸುತಯಾ
ಜಗನ್ನಾಥಸ್ವಾಮೀ ನಯನಪಥಗಾಮೀ ಭವತು ಮೇ || ೫ ||
ಪರಬ್ರಹ್ಮಾಪೀಡಃ ಕುವಲಯದಲೋತ್ಫುಲ್ಲನಯನೋ
ನಿವಾಸೀ ನೀಲಾದ್ರೌ ನಿಹಿತಚರಣೋಽನಂತಶಿರಸಿ
ರಸಾನಂದೋ ರಾಧಾಸರಸವಪುರಾಲಿಂಗನಸಖೋ
ಜಗನ್ನಾಥಸ್ವಾಮೀ ನಯನಪಥಗಾಮೀ ಭವತು ಮೇ || ೬ ||
ನ ವೈ ಪ್ರಾರ್ಥ್ಯಂ ರಾಜ್ಯಂ ನ ಚ ಕನಕತಾಂ ಭೋಗವಿಭವಂ
ನ ಯಾಚೇಽಹಂ ರಮ್ಯಾಂ ನಿಖಿಲಜನಕಾಮ್ಯಾಂ ವರವಧೂಮ್
ಸದಾ ಕಾಲೇ ಕಾಲೇ ಪ್ರಮಥಪತಿನಾ ಗೀತಚರಿತೋ
ಜಗನ್ನಾಥಸ್ವಾಮೀ ನಯನಪಥಗಾಮೀ ಭವತು ಮೇ || ೭ ||
ಹರ ತ್ವಂ ಸಂಸಾರಂ ದ್ರುತತರಮಸಾರಂ ಸುರಪತೇ
ಹರ ತ್ವಂ ಪಾಪಾನಾಂ ವಿತತಿಮಪರಾಂ ಯಾದವಪತೇ
ಅಹೋ ದೀನಾನಾಥಂ ನಿಹಿತಮಚಲಂ ನಿಶ್ಚಿತಪದಂ
ಜಗನ್ನಾಥಸ್ವಾಮೀ ನಯನಪಥಗಾಮೀ ಭವತು ಮೇ || ೮ ||
ಇತಿ ಶ್ರೀ ಜಗನ್ನಾಥಾಷ್ಟಕಂ ||
आज माणिकनगरी आलो आणि श्रीप्रभुमंदिर परीसरात डोळे दिपवून टाकणारा अद्भुत नजारा पहायला मिळाला. प्रभु महाराजांच्या दिव्य लीलांनी झळाळणारा समग्र जीवनपटच श्रीप्रभुमंदिराच्या आवारातील भिंतींवर साकारलेला पहायला मिळाला. श्रीजींची ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी आधी सुयोग्य चित्रकार (श्री. पराग घळसासी) यांना शोधलं गेलं व श्रीप्रभु लीलांचे समर्पक वर्णन लिहून परागजींना पाठवले. परागजींनी साकारलेल्या कलाकृतींमध्ये योग्य ते बदल करवून, त्या त्या चित्रांमध्ये अपेक्षित भाव पुरेपूर उतरल्याची खातरजमा करुन घेतली. त्यामुळेच की काय, चैतन्यरुप श्रीप्रभुच्या जीवनपटाची प्रत्येक कलाकृती आपल्याला अत्यंत सजीव वाटते. चित्रकार श्री परागजींवरही श्रीप्रभुची असलेली असीम कृपा, त्यांनी रेखाटलेल्या चित्रांवरुन सहज अनुभवता येते. अलीकडेच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ह्या चित्रदालनाचे श्रीजींच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. सटक्याच्या कक्षाच्या उजव्या बाजूपासून, रामभक्त असणाऱ्या श्री माणिकप्रभुंच्या आईवडिलांना श्रीरामनवमीच्या दिवशी श्री दत्तप्रभुंचा झालेल्या दृष्टांतापासून ह्या अद्भुत, मन मोहून टाकणाऱ्या चित्रयात्रेला सुरुवात होते. श्रीप्रभुंच्या बाललीला, श्री प्रभुंनी मामाचे घर सोडणे, अंबिलकुंड परीसरातील एकांतातील साधना, श्रीदत्त महाराजांचा श्रीप्रभुंवरील अनुग्रह, श्रीप्रभुच्या लीला, त्यांचे भ्रमण, माणिकनगरची स्थापना, श्री स्वामी समर्थांची, साईबाबांची, श्री गोंदवलेकर महाराजांची भेट, श्री मनोहरप्रभुंवर केलेला अनुग्रह ह्या व अशा अनेक दिव्य लीलांची ही चाळीस चित्रांची विस्मयकारी चित्रयात्रा श्रीमाणिक प्रभुंच्या संजीवन समाधीच्या चित्रापाशी येऊन विसावते. ही श्रीमाणिक प्रभुंचा संपूर्ण जीवनपट उलगडवणारी, अभूतपूर्व अशी चित्रसफर, श्री माणिकप्रभुंच्या संजीवन समाधीला उजव्या बाजूला ठेवत, प्रदक्षिणा घालून पूर्ण होते. आणि म्हणूनच ह्या संपूर्ण चित्रयात्रेला श्रीमाणिकप्रभु चरित्राची सचित्र परिक्रमा म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. आजकाल इंस्टंटचा, T20चा जमाना आहे. त्यामुळे ह्या सचित्र परिक्रमेमुळे अनायसेच श्रीप्रभुचरित्राचे झटपट पारायण केल्याची जाणीवही आपल्या मनाला सुखावून जाते. ह्या सचित्र परिक्रमेतील प्रत्येक चित्रात तो तो प्रसंग आपल्या मनात तंतोतंत उभा करण्याची प्रचंड ताकद आहे.
श्री. परागजींच्या उत्कटतेने प्रत्येक चित्र आपल्याला श्रीप्रभुच्या चैतन्याची अनुभूती करवून देणारे, अतिशय सजीव वाटणारे असे झाले आहे. ह्या चित्रांना केलेली चौकटही अतिशय भव्य आणि चित्ताकर्षक आहे. प्रभु जात्याच सुंदर आणि प्रभुची प्रत्येक कलाकृतीही सुंदर… ही उक्ती येथेही लागू होते. श्री प्रभुसंस्थानाने श्रीप्रभुंच्या समग्र जीवनपटाचा हा अमुल्य, चिरंतन ठेवा समस्त प्रभुभक्तांसाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल श्री प्रभुसंस्थानाचे अभिनंदन, कौतुक आणि आभार… ज्यांच्या संकल्पनेतून ही सचित्र परिक्रमा साकारली, त्या श्रीजींप्रती कृतज्ञता आणि त्यांच्या परममंगल चरणी कोटी कोटी वंदन… आणि श्रीजींच्या मनातील ही संकल्पना ज्यांनी प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ज्यांनी श्रम केले, त्या सर्वांना अभिनंदन. ज्यांनी श्री माणिकचरितामृताचे वाचन केले आहे, त्यांना ह्या सचित्र परिक्रमेत विशेष आनंदाची अनुभूती येईल. ह्या सचित्र परिक्रमेत मला आत्यंतिक सुखाची अनुभूती आली आणि माणिकनगरच्या पुढील भेटीत ती अनुभूती आपल्याही येवो, ह्या श्रीप्रभुचरणीच्या नम्र विनंतीसह श्री गुरु माणिक, जय गुरु माणिक…
वरील एका वाक्यातच माणिकनगरचे संपूर्ण वैभव आणि सौंदर्य अनुभवता येते. श्री चैतन्यराजप्रभुंच्या सिद्ध लेखणीतून स्फुरलेले अवीट गोडीचे, अतीशय सुमधुर असे हे गीत, आपण शरीराने कुठेही असले तरी मनाने आपल्याला निश्चितच माणिकनगरात घेऊन जाते. खाली दिलेल्या लिंकवर आपण युट्यूबवर आपण ह्या गीताचा आनंद घेऊ शकतो…
गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून माणिकनगरला माझे जाणे सुरू झाले. माणिकनगरच्या सुरुवातीलाच असलेली भव्य कमान व त्यावरील मंगल कलशाची प्रतिकृती माणिकनगरच्या मांगल्याची चुणूक दाखवून देते. माणिकनगरमध्ये प्रवेश करताच रस्त्याच्या दुतर्फा झाडांची दाटी दिसून येते. आजूबाजूच्या शेतांतून मोरांचा केकारव ऐकू येतो. मुक्तपणे इथून तिथून उड्या मारणारी माकडे आपल्याला माणिकनगरात सहज नजरेस पडतात. पशुपक्ष्यांसाठी हिरवगार माणिकनगर म्हणजे जणू आपलं हक्काचचं घर… श्री माणिकप्रभु स्थापित ह्या पुण्यभूमीमध्ये तेही स्वच्छंदपणे, मुक्तपणे आपले जीवन जगत असतात…
चतुर्थ दत्तावतारी श्री माणिकप्रभुंनी आपल्या अवतारकाळात सन १८४५च्या सुमारास माणिक नगरची स्थापना केली. श्री माणिकप्रभु स्वतः शिवस्वरूप होते, हे श्री माणिक चरित्रामृतातील अनेक कथांतून आपल्याला अनुभवता येते. या गीताच्या धृपदातही ह्या पृथ्वीवर कैलास पर्वताची जर कोणती प्रतिकृती असेल, तर ती म्हणजे माणिकनगर… येथे श्री माणिकप्रभू चराचरांमध्ये व्यापून उरले आहेत आणि ते कसे ह्याची एक समग्र यात्राच ह्या गीतातून आपल्याला अनुभवता येते. ह्या गीतामध्ये सुरुवातीला दिसणारा प्रभू मंदिराचा कळस हा आपल्याला कैलास पर्वताच्या उत्तुंगतेची आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या श्री माणिकप्रभुंची सुकोमल, सुहास्यवदन छबी त्या भोळ्या कर्पुरगौर सांब सदाशिवाचीच आठवण करून देते.
कलबुर्गी (आधीचे गुलबर्गा), बिदर आणि कल्याण ह्या तीन इतिहास प्रसिद्ध शहरांमधील त्रिकोणी क्षेत्रातील डोंगराळ प्रदेशास दरीपट्टी म्हणतात. वरील तिन्ही ठिकाणांच्या मधोमध माणिकनगर वसलेले आहे. त्यामुळेच माणिकनगराच्या सीमा त्रिविध आहेत. तसेच या प्रदेशात मराठी, कानडी आणि तेलगू ह्या भाषा बोलल्या जातात आणि ह्या अनुषंगाने लोक आपापली संस्कृती येथे जपतात. त्यामुळेच त्रिविध सीमा, भाषा आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगमच आपल्याला माणिकनगरात पाहायला मिळतो. तसेच ह्या प्रदेशात वातावरण अत्यंत निरोगी असून येथे पाण्याची विपुलता आहे. माणिकनगरात चाफा, बकुळ, मधुमालती, सुंदर सुंदर कमळे अशी आणि अनेक प्रकारची फुले सदैव बहरत असतात. श्रावण महिन्यात श्री माणिकप्रभुंच्या संजीवन समाधीवर केलेल्या फुलांच्या अलंकारांवरून आपण त्याचा मनमुराद आनंद लुटला आहेच. जरी येथील प्रदेशांत, लोकांत, संस्कृतीत, भाषेत विविधता असली तरी, केवळ जय गुरु माणिक हे तीन शब्द सर्वांनाच सकलमत संप्रदायाच्या एकच तत्वात गुंफतात. वर वर्णिल्याप्रमाणे येथे विविध फुले जरी उमलली तरी ती प्रभुच्या एकाच समाधीवर अर्पण केली जातात.
दरीपट्टीचा डोंगराळ भाग लाल रंगाचा आहे. येथील माती लाल रंगाची आहे. श्री माणिकप्रभुंच्या वास्तव्याने पवित्र झालेली ही दिव्य लाल रंगाची भूमी इतकी मंगलमय आहे की, अनेक योगी ह्या मातीचाच टिळा लावतात. प्रेमाचा रंगही लालच असतो, म्हणून तो सौभाग्यकारक समजला गेला आहे. अशी ह्या माणिकनगरच्या मातीत सौभाग्याचं लेणं असलेल्या, कुंकूमाने भरलेल्या मळवटाचीही झलक आपल्याला दिसून येते. घनदाट वृक्षवल्लींनी व्यापलेल्या ह्या प्रदेशातील वातावरण कोणतेही ऋतूत अत्यंत आल्हाददायी तसेच आरोग्यकारक असते.
उत्तुंग आणि सुंदर अशा श्रीप्रभु मंदिरावर सोन्याचा झळाळता कळस आहे. ह्या कळसाच्या केवळ दर्शनानेच, त्याला केलेल्या नमस्कारानेच सर्व यश आणि सिद्धी प्राप्त होतात. माणिक नगरचे हे अपूर्व वैभव पाहून स्वर्गातील देव आणि गंधर्वसुद्धा विस्मय करत राहतात.
सकलमत संप्रदायात कोणताही जातीभेद नाही. इथे सर्वांचाच प्रभुस्वरूप म्हणून समान आदर केला जातो. आजही माणिक नगरात विविध धर्माचे उत्सव एकोप्याने साजरे केले जातात. एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ हे वाक्य इथे अक्षरशः जगले जाते. ह्या संकल्पनेचे वर्णन करताना चैतन्यराज म्हणतात की, इथे कोणची हार होऊ नये आणि ह्यातच सकलमत संप्रदायाची जीत आहे. ह्यावरून सकल्पात संप्रदायाच्या विश्वबंधुत्वाची भावना अधोरेखित होते. माणिक नगर मध्ये आपण कुठल्याही दर्गा, मंदिर, मठ, शिवालयाला भेट दिली तर तेथे श्री प्रभुंचं अस्तित्व, त्यांच्या खुणा जाणवतात.
माणिकनगरला संगीताचे माहेरघर म्हटले जाते. भारतातील संगीतातील अनेक प्रसिद्ध विभूतींनी श्रीप्रभुंच्या गादीसमोर आपली कला सादर केली आहे. त्यांची अशी मान्यता आहे की श्रीप्रभुंच्या गादीस समोर संगीत सेवा समर्पित केल्याशिवाय त्यांची संगीत साधना पूर्णच होत नाही. माणिकनगरमध्ये संगीत शिकवण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. अनेक लोक येथे संगीताची आराधना करतात. लता मंगेशकर, पंडित जसराज, पंडित भीमसेन जोशी सारख्या अनेक विभूतींनी आपली सेवा श्रीप्रभुंच्या गादीसमोर सादर केली आहे.
माणिक नगरमध्ये अखंड अन्नदान केले जाते. अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेल्या भंडारखान्यामध्ये आलेल्या सर्व भक्त जणांना श्रीप्रभुचा पोटभर प्रसाद मिळतो. अनेक भुकेलेले जन हा प्रसाद घेऊन संतुष्ट होतात. सोहळ्याचे वर्णन करताना कवी म्हणतात की, ह्या सुग्रास प्रसादासाठी देवतासुद्धा माध्यान्हकाळी तिष्ठत असतात. खरोखरच प्रभुंच्या माधुकरीचा प्रसाद ज्यात मिसळला आहे, त्या महाप्रसादाची गोडी कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमधील जेवणापेक्षा अवीट आहे. ज्यांनी ह्या प्रसादाची चव चाखली आहे, त्यांनी हे अनुभवले असेलच.
माणिकनगरी वेद पाठशाळा आहे. येथे मुलांना वेदांताचे शास्त्रोक्त शिक्षण दिले जाते. श्रीप्रभु कृपेने येथे गुरु आणि शिष्य, दोघेही वेदांच्या अध्ययनात सफलता प्राप्त करतात आणि त्यांनी उच्चारलेले मंत्र जणू श्रीप्रभु स्वतः सिद्ध करून त्यांची अज्ञानता दूर करतो. श्री माणिकनगर संस्थानाचा रथ ज्ञान आणि भक्ती या दोन चाकांवर दौडत आहे आणि त्यामुळेच ज्ञानाची ही सरिता माणिक नगर मध्ये नित्य खळखळून वाहत असते, ज्ञानाचे हे नगारे येथे अष्टौप्रहर वाजत राहतात.
श्री माणिकनगर संस्थानाने नेहमीच सामाजातील दुर्बल आणि दुर्लक्षित घटकांना यथायोग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विकलांग जनांसाठीसुद्धा श्रीप्रभु त्यांचा मायबाप बनून सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. माणिकनगरमध्ये असलेल्या विकलांग शाळेमध्ये असलेले विद्यार्थी नेहमी श्रीप्रभुंची भजन म्हणतात. माणिकनगरातील प्रेमळ नगरवासी सुद्धा त्यांना वात्सल्य आणि प्रेम अगदी भरभरून देतात. आणि त्यांच्याच रूपात जणू श्रीप्रभु त्यांच्या हाताला धरून त्यांना जीवनामध्ये चालायला, स्वयंपूर्ण बनवायला मदत करतो.
श्री माणिकप्रभुंच्या काळापासून आतापर्यंतच्या सर्व पिठाचार्यांनी स्वतः कल्पतरू म्हणून आपल्या भक्तांना जे जे हवे आहे ते ते आनंदाने दिले. त्यांच्या सर्व कामना पूर्ण केल्या आणि आजही अव्यहातपणे हे सर्व चालू आहे. ज्याने जे जे मागितले त्याला ते श्रीप्रभुने समर्थपणे दिले. म्हणूनच कवी पुढे म्हणतात की, आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी श्रीप्रभु येथे स्वतः हाती दंड धरून सदैव बसला आहे.
श्रीप्रभुंच्या वास्तव्याने पुनित झालेल्या ह्या दिव्यभूमीमध्ये भजनाचा घोष अखंड चालू असतो आणि त्यामुळेच काय की माणिकनगर हे कदाचित वैकुंठापेक्षाही श्रेष्ठतम असे स्थान आहे असे कवी ठामपणे म्हणतोय. माणिकनगरला आनंदवन, मंगलभुवन अशा कितीतरी नावांनी शब्दबद्ध केलाय. माणिकनगरचे हे सर्वदूर पसरलेले वैभव, इथे आपल्याला येणारी त्याची दिव्य अनुभूती हे शब्दांत वर्णन करणे केवळ अशक्यप्राय आहे. ज्यांच्या नशिबात श्रीप्रभुचे हे आनंदभुवन आहे, असे सौभाग्यशाली लोक येथे श्रीप्रभु दर्शनासाठी पोहोचतात. माणिकनगरातील प्रत्येक घर हे श्रीप्रभु कृपेच्या छत्रछायेखाली आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
श्री माणिकप्रभुंनंतर बालयोगी श्री मनोहर माणिकप्रभुंनी आपल्या अलौकिक शक्तीने सकलमत संप्रदायाचा आणि श्रीप्रभु संस्थानाचा नावलौकिक वाढवला. त्यानंतरचे आचार्य श्री मार्तंड माणिकप्रभु यांनी तर श्रीप्रभु संस्थानची कीर्ती आसेतु हिमाचल वाढवली. श्री मार्तंड माणिकप्रभुंनंतर श्री शंकर माणिकप्रभुंनी आपल्या कारकीर्दीत अतुलनीय प्रभुभक्तीचा आदर्श घालून दिला व माणिक नगरात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या निर्वाणानंतर अगदी बालवयातच गादीवर बसलेल्या सिद्धराज माणिकप्रभूंनी संस्थानाचा संपूर्ण कायापालट केला. आपल्या मितभाषी पण मृदू वाढीने आणि सौहार्दपूर्ण वागणुकीने आजही श्री सिद्धराज प्रभू माणिक नगरातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयात विराजमान आहेत. सध्याचे पिठाचार्य श्री ज्ञानराज माणिकप्रभु आधीच्या पिठाचार्यांचे दिव्य कार्य समर्थपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहेत. श्रीसंस्थानाच्या आधुनिकरणाचा ध्यास श्री ज्ञानराज माणिकप्रभुंनी घेतला आहे. तसेच भगवद्गीतेच्या माध्यमातून वेदांतातील गूढ सिद्धांत जनसामान्यांना समजतील अशा सहज आणि सरळ, हसत खेळत प्रवचनांच्या माध्यमातून आज ते घराघरात पोहोचवत आहेत.
निसर्ग सौंदर्याने नटलेले, वृक्ष लता वेलींनी फुललेले, पशुपक्ष्यांचे हक्काचे माहेरघर असलेले, शांत प्रशांत असे माणिक नगर जणू काही श्रीप्रभु परमात्म्याचे ही आनंदमय निवासस्थानच आहे. येथील कणाकणांमध्ये चैतन्याची अनुभूती देणाऱ्या आणि प्रभुवास्तव्याने अतिशय पवित्र झालेल्या अशा पुण्यभूमीला कवी कोटी कोटी वंदन करत आहे. अशा ह्या असीम अनंत श्रीप्रभु परमात्म्याच्या दर्शनासाठी केवळ देवच नाही तर असुर सुद्धा दोन्ही हात जोडून उभे आहेत…
संपूर्ण गीतातून माणिक नगरचे हे दिव्य दर्शन आपल्याला साक्षात् माणिक नगराला घेऊन जाते. तेथे अनुभवलेले, हृदयाच्या कोपऱ्यात साठवलेले क्षण पुन्हा ताजेतवाने होतात. आणि शेवटी जेव्हा माणिक नगर माणिक नगर माणिक नगर माणिक नगर असा गजर होतो तेव्हा डोळ्यांच्या कडा प्रभुच्या आठवणीने हलकेच ओलावतात…
आपल्या आसपास कितीतरी तीर्थस्थळे असतील पण त्या त्या अवताराच्या काळापासून त्या दिव्य आठवणी, त्या त्या परंपरा, ती शिकवण अतिशय आत्मीयतेने जपणारे कदाचित माणिक नगर हे एकमेव स्थान असावे…
एखाद्या स्थानाचे वैभव हे केवळ तेथील भव्य वास्तू किंवा सोन्या चांदीच्या दागिन्यांऐवजी किती वेगळे असू शकते, हे आपण या गीताच्या माध्यमातून अनुभवू शकतो. प्रभू परमात्मा हा केवळ मूर्तींमध्ये नसून तो चराचरामध्ये चैतन्य रूपात प्रकट होत असतो आणि माणिकनगरामध्ये श्रीप्रभुचे हे चैतन्य आपण प्रत्येक गोष्टीत, होय, अक्षरशः प्रत्येक गोष्टीत अनुभव शकतो. अतिशय दैवी शब्दांमध्ये गुंफलेले व सुमधुर चाल असलेले हे गीत म्हणजे कवी चैतन्यराज प्रभू यांच्यावर बरसलेली ही दिव्य प्रभुकृपाच आहे. त्याला स्वतः श्री. चैतन्यराज प्रभु आणि श्री. कौस्तुभजी जागीरदार यांनी सुंदर स्वरसाज चढवलेला आहे. श्री आनंदराजप्रभुंच्या मार्गदर्शनाखाली वाद्यवृंदानेही अतिशय तोलामोलाची साथ त्यास दिलेली आहे आणि त्यामुळेच सर्वांप्रती मनस्वी कृतज्ञता.
आपण कधी माणिक नगरी गेला असाल, तर ह्या गीताच्या माध्यमातून आपल्या गतस्मृती निश्चितच जाग्या होतील, आपण यापूर्वी जर कधी माणिकनगरला गेले नसाल तर आपल्याला माणिक नगर ला जायची जायची प्रेरणा या गीतातून नक्कीच होईल आणि ती होवो, ह्या प्रभुचरणीच्या आणखी एका नम्र विनंती सह श्री गुरु माणिक जय गुरु माणिक…
ईश्वराबद्दल भीती (देवाचा कोप, Fear of God) – सामान्यजनांच्या मनातील अनेक प्रस्थापित धारणा तोडून, ईश्वराप्रती प्रेमाची, एकरुपतेची भावना वृद्धिंगत करणारे श्रीजींचे आजचे प्रवचन…
मानवी जीवनाला मानसिकदृष्ट्या अधिकाधिक बलवान बनवणे, मीच परमात्मास्वरूप आहे, ही धारणा अधिकाधिक व्यापक करणे, ही श्रीजींच्या प्रवचनांची काही ठळक वैशिष्ट्ये. आजच्या भाद्रपद पौर्णिमेच्या प्रवचन पर्वांतर्गत ईश्वराबद्दलची भीती किंवा देवाचा कोप (Fear of God) ह्या विषयावर अत्यंत उद्बोधक आणि समाजाला जागृत करणारं, त्याला यथायोग्य दिशा देणार असं प्रवचन श्रीजींच्या मुखकमलातून स्फुरले.
ईश्वर आपल्यावर नाराज होऊ शकतो का? त्याला आपल्या उपासनेची, प्रार्थनेची, भक्तीची आवश्यकता आहे का? आणि आपल्याला देवाची भीती वाटते का? अशा विविध प्रश्नांचा मार्मिक ऊहापोह वेदांतातील अनेक संदर्भासह श्रीजींनी आपल्या आजच्या प्रवचनात केलाआहे. मुळातच हिंदू धर्मात ईश्वराच्या भीतीची संकल्पनाच नाही हे अधोरेखित करताना, अशा प्रकारच्या भीतीची संकल्पना आपल्या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या मुघलांकडून आणि इंग्रजांकडून आली हे श्रीजी नमूद करतात. आपला देश स्वतंत्र होऊन आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि अशा वेळेस आपल्या मनाच्या स्वातंत्र्यासाठी, त्या अनिष्ट संस्काराच्या जोखाड्यातून मुक्त होण्यासाठी श्रीजींचे आजचे हे प्रवचन सर्वांना नक्कीच उद्बोधक व्हावे.
भयाची व्याख्या करताना श्रीजी म्हणतात, परतो अनिष्ट संभावना इती भय: म्हणजेच दुसऱ्यांकडून संकटाची किंवा अनिष्टाची संभावना म्हणजेच भय… किंवा भविष्यात प्राप्त होणाऱ्या दुःखाच्या अनुसंधानजन्य उत्पन्न होणाऱ्या मनाचा उद्रेक म्हणजेच भय… हे सांगताना श्रीजी श्रुतीमध्ये वर्णन केलेल्या मनाची व्याख्येचा संदर्भ देतात. भय हा मनाचा धर्म आहे. मन आणि परमात्मा यातील भेद स्पष्ट करताना श्रीजी म्हणतात, की मन जड, अनात्मा आहे तर परमात्मा हा चेतन आहे आणि म्हणूनच भीतीचा ईश्वराशी काहीही संबंध नाही.
कोणताही मनुष्य सहेतुक उपासना करतो. भय, लाभ, कर्तव्य आणि प्रेम हे ईश्वराचे चार उपासनेचे मुख्य हेतू आहेत. कोणी भयापोटी, तर कोणी काहीतरी लाभ व्हावा म्हणून, कोणी कर्तव्य भावना म्हणून तर कोणी भगवंताप्रती असलेल्या प्रेमापोटी ईश्वराची उपासना करतो. ह्या चारही हेतूंपैकी प्रेम भावनेने केलेली उपासना ही श्रेष्ठतम आहे कारण जेथे प्रेम आहे तेथे कोणतीही भीती नाही.
देवांच्या भीतीसंबंधीत पुराणातील काही संदर्भ देताना श्रीजी तैतरीय उपनिषदाचा आधार घेतात. जो माणूस स्वतःला परमात्म्यापासून यत्किंचितही वेगळा समजतो, त्याला भय असते किंवा अज्ञानी माणसाला भय असते. ही संकल्पना स्पष्ट करतानाच श्रीजी म्हणतात की, भीती असण्यासाठी समोर भयावह काहीतरी गोष्ट असावी लागते. परंतु सर्वत्र परमात्माच भरलेला आहे आणि तो सर्व रूपात प्रकटतो अशी का एकदा मनाची धारणा झाली, की मग भीतीचे काही कारणच उरत नाही. श्री माणिकप्रभुंनी स्थापन केलेला सकलमत संप्रदाय आणि श्री प्रभुगादीच्या आचार्यांनी रचलेली अनेक पदे, सर्वरूपे श्रीप्रभु हा जाण ही धारणा आपल्या मनावर खोलवर रुजवतात आणि दृढ करतात.
परमात्म्याचा अनेकांशी असलेल्या संबंधांबाबत खुलासा करताना श्रीजी कृष्णाचे उदाहरण देतात. आकाशवाणी झाल्यामुळे कंसाला कृष्णाप्रती भीती होती, शिशुपालादि कृष्णाचा द्वेष करायचे, यादवांचे कृष्णाशी रक्ताचे नाते होते, पांडवांशी कृष्णाचे मित्रत्वाचे संबंध होते आणि आपले? आपले कृष्णाची भक्तीचे नाते आहे, त्यामुळे आपल्याला भीतीचे काहीही कारण नाही. जर आपल्याला परमेश्वराबद्दल भीती वाटायला हवी असेल तर आपल्याला कंस किंवा रावण बनायला लागेल, हे सांगतानाच श्रीजी आपल्याला परमात्म्याबरोबर असलेल्या प्रेम संबंधाची जाणीव करून देतात.
अमुक अमुक आचार केले नाहीत तर देव आपल्यावर रागावेल का? ह्या सहज मानवी स्वभावाच्या जाणीवेबद्दल विश्लेषण करताना श्रीजी म्हणतात की, परमात्मा का अलिप्त आहे, त्याच्यामध्ये विकार होऊ शकत नाहीत. आपल्या सुखदुःखाशी परमात्म्याला काहीही घेणे देणे नाही. पण मग, जर तो सुखदुःखाचा दाता नाही तर मग आपल्या जीवनात सुखदुःख का बरे येतात? ह्याचे कारण स्पष्ट करताना श्रीजी म्हणतात की, हे सर्व आपल्या कर्माचे फळ असते. आपल्या कर्माच्या फळांमध्ये ईश्वर कधीच ढवळाढवळ करत नाही. कर्माच्या सिद्धांताची एक विशिष्ट अशी व्यवस्था आहे ज्यात परमात्मा अजिबात ढवळाढवळ करत नाही. हे समजवताना श्रीजी, न्याय व्यवस्था आणि राष्ट्रपतीचे उदाहरण देतात. जसे राष्ट्रपती हे सर्व शक्तिमान असले तरी एखाद्याला त्याच्या गुन्ह्याच्या, अपराधाच्या संबंधित सजा देताना न्यायव्यवस्थेच्या निर्णयात ते ढवळाढवळ करत नाही. त्याचबरोबर श्रीजी असेही सांगतात की परमात्मा जरी अलिप्त असला तरी तो सर्व भूतांमध्ये समप्रमाणात व्यापून आहे. त्याला कोणी प्रिय नाही आणि कोणी अप्रियही नाही, परंतु जे सुजन त्याचं भक्तिपूर्वक भजन करतात, त्यांच्यात परमात्मा वास करतो आणि ते परमात्म्यात वास करतात. येथे श्रीजी मानवाची आणि परमात्म्याची एकरूपता अधोरेखित करतात.
प्रवचनाच्या शेवटच्या टप्प्यावर श्रीजींनी आपल्या प्रार्थनेची परमात्म्याला गरज आहे का? ह्या प्रश्नाची उकल सहजपणे करतात. बऱ्याचदा आपण देवाला नैवेद्य दिला नाही तर तो उपाशी राहील का बरे? आपण जर त्याला अभिषेक स्नान घातले नाही तर तो विनास्नान बसेल का? असे द्वंद्व उपस्थित करणारे अनेक प्रश्न सामान्य जनांच्या मनात उपस्थित होत असतात. ह्याची यथायोग्य सांगड घालताना श्रीजी म्हणतात की, परमेश्वराला आपल्या आराधनेची, सेवेची गरज नाहीये पण आपल्याला आहे. कारण ईश्वर हा निष्काम आहे, तो नित्यतृप्त आहे, तो परीपूर्ण आहे. जर आपल्या सेवेची त्याला गरज लागली तर तो अपूर्ण आहे, असे समजले जाईल. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला त्याच्या आराधनेची गरज काय हे सांगताना श्रीजी म्हणतात की, आपलं त्याच्यावर निरतिशय प्रेम असतं. प्रेमाचा स्थायीभाव सांगताना श्रीजी म्हणतात की, प्रेम हे व्यक्त झाल्यावाचून राहत नाही. आपलं भगवंताप्रती असलेलं प्रेम हे आपण आपल्या उपासनेतून, प्रार्थनेतून, सेवेतून व्यक्त करत असतो.
काही धर्मांमध्ये जर तुम्ही ईश्वराची सेवा केली नाही तर तो तुम्हाला सजा देईल, असे मनावर बिंबवले जाते, पण श्रीजी म्हणतात की, शिक्षा करणारा हा भगवंत असूच शकत नाही. त्यामुळे तो मला शिक्षा करेल अशी भीती मनात बाळगण्याचे अजिबात कारण नाही. जो भगवंताला शरण जातो, मी तुझा आहे या भावनेने प्रार्थना करतो आणि जो भगवंतापासून स्वतःला कधीही अंतरत नाही, वेगळा समजत नाही, जेथे प्रेम भावनेला प्राधान्य आहे, तेथे निश्चितच भीती नाही. पण जेथे ही भावना नाही तेथे मात्र निश्चितच भीती आहे. आपल्या हिंदू धर्मामधले हे वेगळेपण श्रीजी परिणामकपणे आपल्यासमोर आणतात.
त्याचवेळी, जर मानवाला भीती नसली तर आचरणात स्वच्छंदता किंवा उच्छृंखलता येऊ शकते असाही अपवाद येतो. ह्याचे समाधान करताना श्रीजी म्हणतात की, ह्या स्वच्छंदतेला, ह्या उच्छृंखलतेला काबूत ठेवून, मनाला नित्य साधनेच्या मार्गात आणून परमात्म्याप्रती एकदा का प्रेम झाले की मग भीतीचा लवलेशही उरत नाही. जसे एखाद्या लहान मुल आपल्या आईस घाबरत नाही कारण तेथे निर्व्याज्य प्रेम असते…
जिथे प्रेम आहे, तिथे भीती नाही,
आणि जिथे भीती आहे, तिथे प्रेम नाही…
जर आपल्यावर देवाचा कोप होईल, अशी भीती असेल, याचा अर्थ आपले भगवंतावर प्रेम नाही आणि जर आपले परमात्म्यावर प्रेम असेल तर त्याच्याबद्दलच्या भीतीचा, त्याच्या कोपाचा प्रश्नच उद्भवत नाही. मानवाला भगवंताप्रती केवळ प्रेम आणि प्रेमच होऊ शकतं. ईश्वराप्रती असलेल्या भीतीच्या भावनेचा नाश होऊन, ते प्रेम प्रत्येक मानवात उत्पन्न होवो, असा मंगल आशीर्वाद देऊन श्रीजींच्या आजच्या प्रवचनाची सांगता झाली.
आपल्या मनातील अनेक प्रस्थापित धारणा तोडून ईश्वराप्रती असलेले भीतीची भावना दूर होऊन, त्याच्याबद्दल प्रेमाची, एकरुपतेची भावना वृद्धिंगत करणारे श्रीजींचे आजचे प्रवचन निश्चितच परिणामकारक होईल, असा विश्वास आजचे हे प्रवचन ऐकल्यावर मला वाटतो…
Recent Comments