नुकताच श्री माणिकप्रभु संस्थानातर्फे आयोजित श्री जगन्नाथ पुरी यात्रा, रविवार दिनांक ९ ऑक्टोबर ते शनिवार दिनांक १५ ऑक्टोबर दरम्यान माणिकनगर-जगन्नाथ पुरी-माणिकनगर, अशी सफळ संपूर्ण झाली. अलौकिक, अद्भुत, अद्वितीय, अविस्मरणीय अशा या यात्रेचे वर्णन करण्यास कदाचित शब्दही अपुरे पडतील. ह्या यात्रेदरम्यान श्री माणिकप्रभु गादीचे विद्यमान पीठाधिश, श्री ज्ञानराज माणिकप्रभु (श्रीजी) ह्यांना जवळून पाहता आले आणि ते मला ज्या प्रकारे दिसले, भावले‌ ते शब्दबद्ध करण्याचा हा अल्प प्रयत्न आपण गोड मानून घ्याल, अशी आशा व्यक्त करतो.

गेल्या वर्षभरात श्रीजींची वेदांतातील गूढ सिद्धांत सामान्यजनांना व्यवहारातील सहज सोपी उदाहरणे देऊन, अत्यंत आत्मीयतेने, तळमळीने समजावून सांगणारा एक उत्तम वक्ता, जनसामान्यांच्या अनेक समस्या सोडवणारा, आपल्या संस्कृती आणि परंपरेबद्दल पराकोटीची श्रद्धा आणि जाज्वल्य अभिमान असणारा अलौकिक सिद्धपुरुष, संगीत आणि साहित्याचा व्यासंगी, अनेक भाषांवर प्रभुत्व असणारा, इतर धर्म आणि संस्कृतीचीही व्यापक जाणीव असणारा श्री सकलमत संप्रदायाचा एक अधिकारी पुरुष म्हणून श्रीजींबद्दल माझ्या मनात असलेला आदर दर दिवसागणिक दुणावत होता. ह्याच वर्षीच्या वेदांत सप्ताहामध्ये झालेल्या माणिक क्विझ स्पर्धेदरम्यान श्री संस्थानातर्फे आयोजित मागील श्री काशी आणि श्री रामेश्वरयात्रेमधील संदर्भ देऊन काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्याच वेळी  मनात योजले होते की, भविष्यात जेव्हा कधी श्री प्रभुसंस्थानातर्फे अशा यात्रेचे आयोजन टमकेले जाईल, तेव्हा आपण सहभागी होण्याचा प्रयत्न करुया.‌ भक्तवत्सल, सार्वभौम श्रीप्रभुच्या असीम कृपेने हा योग लगेचच जुळून यायचा होता म्हणूनच की काय, एप्रिल महिन्यातच श्री जगन्नाथ पुरी यात्रेची घोषणा झाली. क्षणाचाही विलंब न लावता, मी माझे नाव या यात्रेसाठी नोंदवले. श्री क्षेत्र माणिकनगर-पुरी-माणिक नगर अशा प्रवासासाठी मी नाव नोंदणी केली. जायचे यायचे तिकीट, पुरी येथील निवासाची व्यवस्था आणि पुरी येथील कार्यक्रमाचे सविस्तर स्वरूप  याची अगदी पद्धतशीर माहिती देणारे पत्रक दोन महिने आधीच श्री प्रभुसंस्थानातर्फे हातामध्ये पडले.

नियोजित यात्रेसाठी दिनांक ०७ ऑक्टोबर, शुक्रवारी रात्री ठाण्याहून माणिकनगरला निघालो. माझ्या बरोबर पितृतुल्य श्री. व सौ. चंद्रकांत देशपांडे काका, व फोटोग्राफर श्री. अभिजीत देव होते. सकाळी यथावकाश माणिकनगरला पोहोचलो.‌  माणिक नगरात रविवारी सुरु होणाऱ्या जगन्नाथ पुरी यात्रेसाठी एकच लगबग उडाली होती. एकेक प्रभुभक्त श्रीप्रभु मंदिरात दाखल होत होता. सर्वांना आयकार्ड, टोपी व खाण्यापिण्याचे किट श्री प्रभु संस्थानातर्फे वितरित करण्यात येत होते. अत्यंत नियोजन पद्धतीने होत असलेल्या या सर्व प्रक्रियेमध्ये श्रीजी मात्र आपल्या नित्य पूजेमध्ये व्यस्त होते. आज संध्याकाळी श्रीजींचे पौर्णिमेचे प्रवचन होते. दसऱ्याच्या दिवशी श्रीजींच्या संकल्पनेतून साकारलेल्या व त्यांच्याच शुभ हस्ते प्रभुभक्तांसाठी खुल्या केलेल्या सचित्र माणिक प्रभु चरित्रामृत परिक्रमेची अद्भुत यात्रा करून भारावलो होतो. श्रीजींच्या ठाई असलेली सौंदर्यदृष्टी आपल्याला कायापालट झालेल्या श्रीप्रभु मंदिर परिसरात जागोजागी दिसून येते.

पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला झालेल्या पौर्णिमा प्रवचनासाठी श्रीजींनी देवाला नवस बोलावा की बोलू नये, यावर समस्त प्रभुभक्तांचे सुंदर प्रबोधन केले. आम्ही जरी शारीरिकदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या पुरीयात्रेसाठी तयार झालेलो असलो, तरी जगन्नाथ यात्रेला जाताना श्रीजगन्नाथासमोर नेमके काय मागावे व काय मागू नये, ह्याची मानसिक तयारीही श्रीजींनी ह्या प्रवचनाच्या निमित्ताने आमच्याकडून करवून घेतली. यातून श्रीजींची भक्तांच्या आध्यात्मिक उन्नतीची तळमळच आपल्याला दिसून येते. तसेच नवसाच्या रुपात जे मागणं असते, त्याचे स्वरूप स्पष्ट करून जगन्नाथाकडे काय मागावं? याचा निर्णय सर्व प्रभुभक्तांवर सोडतानाच जगन्नाथाकडे योग्य ते मागण्याची सद्बुद्धी श्रीप्रभु आपल्याला देवो आणि सर्वांचे कल्याण होवो, असा शुभाशीर्वाद दिला.‌ गुरु हा केवळ आपल्या भक्तांना मार्ग दाखवण्याचे काम करतो आणि भक्तासाठी काय योग्य, काय अयोग्य याचा निर्णय तो केवळ आणि केवळ भक्तांवर सोपवतो. ह्यातून आपल्याला श्रीजींमधील एका आदर्श गुरुचेच दर्शन होते.

दुसऱ्या दिवशी रविवारी, सकाळी सात सव्वा सातच्या सुमारास जगन्नाथ पुरी यात्रेसाठी जमलेल्या प्रभुभक्तांनी श्रीप्रभु मंदिराचे पटांगण फुलून गेले होते.‌ सर्वांना चहा नाश्ता देण्यात येत होता. सकाळी आठच्या सुमारास नौबत झडली आणि भक्तकार्यकल्पद्रुमच्या जयघोषात, वाद्यांच्या तुंबळ निनादात श्रीजींची स्वारी भक्तांसहित श्री माणिकप्रभुंच्या संजीवन समाधीसमोर आली. श्रीजींनी श्रीप्रभुला यात्रेच्या यशस्वीतेसाठी निवेदन दिले. चैतन्याचं सगुण स्वरूप समाधीतल्या निर्गुण स्वरूपाला आवाहन करत होतं. एक क्षण श्रीजींची श्रीप्रभु समाधीशी नजरानजर झाली आणि श्रीजींच्या मुखकमलावर आश्वासक स्मितहास्य उमटले. जणू संपूर्ण यात्रेचा भार ह्याच चैतन्यानेच पेलायचा होता. हा एक क्षण अंगावर रोमांच उभे करून गेला.‌ श्री माणिकप्रभुंच्या ब्रीदावलीतील निरालंब हा शब्द डोळ्यांसमोर तरळला. आता श्रीजी आमचे आधार झाले होते. यानंतर श्रीमाणिकप्रभुंची आरती झाली. सर्वांनी श्रीप्रभुसमाधीचे दर्शन घेऊन लगेचच बाहेर उभे असलेल्या बसमध्ये चढण्यास सुरुवात केली.‌

 

जगन्नाथ पुरीला जाण्यासाठी माणिक नगरहून सुमारे साडेचारशे जण होते. एकंदर दोन रेल्वेगाड्यांमध्ये सर्व प्रभुभक्तांची जाणयेण्याची सोय केली होती. त्यानुसार पहिल्या गाडीच्या प्रवाशांसाठी तीन बसेसची व्यवस्था होती. श्री प्रभुमंदिरातील आरती नंतर श्रीजी लगेच बस लावलेल्या ठिकाणी हजर होते. त्यांना बसायला खुर्ची ठेवली होती पण एकही क्षण खुर्चीत न बसता लवकरात लवकर बस भक्तांनी भरून मार्गस्थ कशी होईल याची जातीने दखल श्रीजी घेत होते. त्यांच्या केवळ उपस्थितीमुळेच समस्त प्रभुभक्तांमध्ये स्फुरण चढले होते. श्रीजींनी नारळ वाढवल्यावर पहिली बस जेव्हा रवाना झाली, तेव्हा श्री माणिक प्रभुंचा जयघोष झाला. त्यानंतर पुढच्या दहा-पंधरा मिनिटात पहिल्या गाडीच्या तिन्ही बसेस रवाना झाल्या. सकाळी नऊ वाजताच्या सुमारासही ऊन मी म्हणत होते.‌ अशाही परिस्थितीत अंगावरील घाम पुसत श्रीजी दुसऱ्या रेल्वेगाडीच्या दहा बसेसची व्यवस्था लावण्यात गुंतले‌ होते. सकाळी दहाच्या सुमारास सर्व बस माणिकनगरहून सिकंदराबादला रवाना झाल्या होत्या. सर्व प्रभुक्तांप्रमाणेच श्रीजींचा सर्व परिवारसुद्धा कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधूनच सिकंदराबादसाठी रवाना झाला होता. ह्या आणि अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींतून श्रीजींचं साधेपण ठळकपणे जाणवते.

सिकंदराबादला जाताना वाटेत सदाशिव पेठजवळ सर्व प्रभुभक्तांच्या जेवणाची व्यवस्था श्री माणिक पब्लिक स्कूलतर्फे करण्यात आली होती. पुरीयात्रेसाठी सर्व कार्यकर्त्यांचा एक व्हाट्सॲप समूह बनवण्यात आला होता. मलाही त्या समूहात समाविष्ट करण्यात आले. सिकंदराबादला जाणारी पहिली बस आणि शेवटची बस ह्यात जरी दीड दोन तासाचे अंतर असले तरी श्रीजी व्हाट्सॲप च्या माध्यमातून सर्वांचं जेवण झालं की नाही, सर्वजण स्टेशनवर पोहोचले की नाही, कुठली बस कुठे आहे, याची अगदी जातीने चौकशी करत होते. घार जरी आकाशी उडत असली तरी, तिचे चित्त मात्र पिलांपाशीच असते.‌ दोन अडीचच्या सुमारास सर्व बसेस सिकंदराबाद स्टेशनवर पोहोचल्या. आधी फलकनुमा एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक आठ वरून चारच्या सुमारास रवाना झाली.‌ तेथेही श्रीजींनी स्वतः जाऊन सर्व प्रभुभक्त गाडीत व्यवस्थित चढले की नाही याची व्यक्तीश: खात्री करून घेत होते. गाडी सुरू झाल्यावर श्रीजींनी सगळ्यांना हात हलवून जणू काही निश्चित जा, मी तुमच्या पाठीशी आहे, अशाप्रकारे आश्वस्त केले. त्यानंतर लगेचच प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येऊन सर्व प्रभू भक्तांना एक-एक करून भेटू लागले. प्रभुभक्तांना देण्यात येणाऱ्या यात्रा किटचा आढावा, हैदराबादहून येणाऱ्या प्रभुभक्तांची यादी पाहून कोण आले, कोण नाही, याची चौकशी अविरतपणे करत होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास आम्ही सर्व विशाखा एक्सप्रेसने जगन्नाथ पुरीसाठी रवाना झालो.‌

योगायोगाने श्रीजी बाजूच्या डब्यात, आणि श्रीजींचा परिवार माझ्या बाजूच्या कंपार्टमेंटमध्ये होता. प्रत्येक डब्यासाठी एक लीडर नेमून दिला होता.‌ अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक जण आपल्या डब्याची स्थिती सांगत होता. श्रीजी ही सर्व प्रभुभक्तांप्रमाणे आमच्याबरोबर रेल्वेने प्रवास करत होते. यातही त्यांचा साधेपणा व सर्वांना समान लेखण्याचा अंगीभूत गुण दिसून येतो. रात्रीच्या जेवणाची, सकाळच्या नाश्त्याची व दुपारच्या जेवणाची व त्याचबरोबर पाण्याची सोय त्या त्या भागातील प्रभुभक्तांनी अगदी आत्मीयतेने व नियोजनबद्ध पद्धतीने केली. भरपेट भोजन होईल इतकं किंबहुना त्याहीपेक्षा थोडसं जास्तच अन्न जेवण आणि नाश्त्याचे वेळीस पुरवलं गेलं.‌ येथेही श्रीजींची भक्तांशी जुळलेली नाळच अधोरेखित होत होती. सिकंदराबादच्या थोड्याशा पुढे पाऊस सुरू झाला आणि जवळजवळ तो शेवटचे स्टेशन, खुर्दा येथपर्यंत होता. प्रवासादरम्यान पुढचे तीन दिवस पुरीला पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण श्रीप्रभुकृपेने जगन्नाथ पुरी येथील वास्तव्यात एकही दिवस पावसाने हजेरी लावली नाही. पुरीहून निघण्याच्या दिवशी मात्र सकाळी अगदी पाचच मिनिटं हलकीशी सर येऊन गेली. जणू काही निसर्गाचे डोळेही प्रभुभक्तांच्या विरहामुळे पाणावले होते. श्रीजींनी केवळ आपल्या संकल्पाचा जोरावर पावसाचा त्रास कुठल्याही प्रभुभक्ताला होऊ दिला नाही. अशावेळीस श्रीजींमध्ये मला गोवर्धन पर्वत स्वतःच्या करंगळीवर उचलून घेऊन गोपालांचे पावसापासून रक्षण करणारा श्रीकृष्णच जाणवला. सिकंदराबाद ते खुर्दापर्यंतच्या प्रवासादरम्यान श्रीजींनी एसीचा पहिला डबा ते स्लीपर कोचचा अकरावा डबा असे सुमारे 21 डब्यांचे अंतर दोनदा पार केले. रात्री जेवण झाल्यावर सर्व प्रभुभक्तांना भेटण्यासाठी व सकाळी नाश्ता झाल्यावर पुन्हा एकदा सर्व प्रभुभक्तांना भेटण्यासाठी श्रीजी गाडीतून फिरत होते. त्या त्या डब्यातील प्रभुभक्तांजवळ जाऊन व्यवस्था कशी आहे, जेवण झाले की नाही, अन्न पुरेसं होतं की नाही, काही हवं नको याची आणि एकंदर जिव्हाळ्याची विचारपूस जवळपास प्रत्येक प्रभुभक्ताकडे करत होते. सकाळी आठच्या सुमारास श्रीप्रभु मंदिरात आरतीला हजर असणारे श्रीजी, रात्रीच्या दहा वाजताही तितक्याच उत्साहात वावरत होते. श्रीप्रभुच्या चैतन्याचा सुंदर अविष्कार श्रीजींच्या देहबोलीतून अनुभवता येत होता.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साधारणत: चारच्या सुमारास आम्ही खुर्द्याला पोहोचलो. तेथेही सर्व प्रभुभक्तांना नियोजित भक्तनिवासाच्या बसेसमध्ये बसवून देण्यात श्रीजी आघाडीवर होते. प्रभुभक्तांची आणि त्यांच्या सामानाच्या वाहतुकीची सुंदर व्यवस्था श्री प्रभुसंस्थान तर्फे करण्यात आली होती. संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही सर्व जगन्नाथपुरी येथील भक्तनिवासात पोहोचलो. रात्री साडेआठच्या सुमारास भोजनाच्यावेळीह रेल्वेशिवाय विमानमार्गानेही येणाऱ्या सर्व प्रभुभक्तांची मांदियाळी आता जगन्नाथ पुरीत जमली होती. हा आकडा एकंदर हजारच्या जवळपास होता. अशावेळी आमचे कुटुंबप्रमुख श्रीजी, सुहास्य वदनाने सर्व प्रभुभक्तांना सामोरे जात होते. रात्री अकराच्या सुमारास पुरुषोत्तम भक्तनिवासावर मुंबईचे काही भक्त खाली बसले होते. श्रीजी येताच, श्रीजींनी कसे चाललाय म्हणून सर्वांना विचारणा केली, त्यावेळी आम्ही तुमचीच वाट पाहत होतो, असे काही भक्त म्हणाले. श्रीजींनी अविलंब तेथेच बसून‌ सर्वांचा नमस्कार स्वीकार केला. गुरु हा भक्तांमध्येच नित्य रमतो, हे आज पुन्हा अनुभवले.

पुरी यात्रेतील दुसरा दिवस प्रभुभक्तांना ऐच्छिक पर्यटनासाठी राखीव ठेवला होता.‌ आम्ही काहीजण रामचंडी पीठ आणि कोणार्कचे सूर्य मंदिर पाहायला गेलो. सूर्य मंदिर परिसरात श्रीजीही परिवारासह पर्यटनाचा आनंद घेत होते.‌ तेथे त्यांची कुटुंबवत्सलता पाहायला मिळाली.‌ संध्याकाळी निलाद्री भक्तनिवासावर भजनाचा आणि श्रीजींच्या प्रवचनाचा कार्यक्रम होता.  दिवसभराच्या पर्यटनानंतरही श्रीजी ज्ञानदानाच्या कार्यासाठी अगदी उत्साहात हजर होते. श्रीप्रभु भजनानंतर प्रवचनाच्या सुरुवातीलाच श्रीजींनी श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या “अरे जा श्रीप्रभु रिझवा…” ह्या पदाचा आधार घेऊन श्रीप्रभुला जर भजायचे असेल तर ते माणिकनगरातही होऊ शकलं असतं. मग इतक्या लांब जगन्नाथ पुरीला यायची काय गरज? ही संकल्पना स्पष्ट करतानाच, श्रीजी म्हणतात की, श्रीप्रभुला सर्वत्र पाहण्याचा जो भाव आहे, त्या धारणेला पुष्टी देण्यासाठीच आपण येथे आलो आहोत. वैशिष्ट्य म्हणजे सभागृहामध्ये जगन्नाथ पुरी यात्रेचा जो फलक लावला होता त्यावर श्री माणिकप्रभुंच्या चित्र ऐवजी बलराम सुभद्रेसहित श्रीकृष्णाचा फोटो होता. ही सूक्ष्म एकरूपता भक्तांनीही आपल्या हृदयी ठासवावी, ही सुंदर संकल्पना श्रीजींची होती. परमात्मा वस्तू ही अत्यंत सूक्ष्म आहे आणि त्याला जाण्यासाठी काही साधनांची आवश्यकता आहे. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये ही वीस साधने तेराव्या अध्यायाच्या आठ ते बारा ह्या पाच श्लोकांमध्ये वर्णन केली आहेत. आणि ह्याच वीस गुणांचा सविस्तर ऊहापोह व्यवहारातील अनेक उदाहरणे सांगून, पुराणातील अनेक कथांचा दाखला देऊन, श्रुतीतील अनेक वाक्यांचा आधार घेऊन श्रीजींनी आपल्या पुढील तीन दिवसातील प्रवचनांमध्ये केला. गेल्या वर्षीच्या अधिक मासामध्ये हाच विषय श्रीजींनी घेतला होता. पण पुन्हा त्याची उजळणी जनसामान्यास व्हावी, त्यांची धारणा बळकट व्हावी आणि आत्मस्वरूपाचे ज्ञान प्रत्येक जीवात्म्यास व्हावे, हा उदार हेतू श्रीजींच्या प्रवचनातून जाणवला. उजळणी केल्यामुळे संकल्पना स्पष्ट होऊन, त्या अंतरात खोलवर रुजून बळकट होतात ही एका हाडाच्या शिक्षकाची कार्यपद्धती श्रीजींच्या प्रवचनादरम्यान जाणवली. तसेच ह्या वीस साधनांच्या मूळ विषयाला हात घालण्याआधी श्रीजींनी जवळपास सतरा अठरा मिनिटे सर्व प्रभुभक्तांना मानसिकदृष्ट्या तयार केले.‌ श्रीजींच्या प्रत्येक प्रवचन हे सुरुवातीला उपक्रम (start), सामंजस्य (connection) आणि शेवटी उपसंहार (conclusion) ह्याचा एक सर्वांगसुंदर नमुना असतं, जसं गीतेच्या प्रत्येक अध्यायामध्ये आपल्याला हे सूत्र आढळून येतं. जनसामान्यांना गीता समजवतानाच, श्रीजी भगवद्गीता  आपल्या जीवनात, प्रत्येक कृतीत अक्षरशः जगत असतात. साधारणत: दीड तासाच्या प्रवचनानंतर श्रीजी पुन्हा भक्तांना भेटण्यासाठी प्रांगणात हजर होते. मला अजूनही आठवते रात्री अकराच्या सुमारास ते भक्तनिवासाकडे रवाना झाले होते.

यात्रेच्या तिसऱ्या दिवशी श्री सिद्धराज माणिकप्रभुंची पुण्यतिथी होती.‌ सकाळी साडेसात वाजता स्वर्ग बीचवर माणिक प्रभुंच्या पादुकांना समुद्र स्नानाची पर्वणी होती.‌ वेदशास्त्र संपन्न ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत, वेदोक्त मंत्रांच्या जयघोषात श्रीजींनी प्रभु पादुकांना मनोभावे स्नान घातले. माणिक नगरी जशी षोडशोपचार पूजा व श्राद्धविधी होतात, अगदी तसेच विधी, त्याच थाटात जगन्नाथ पुरीतही झाले.‌ देव्हाऱ्यासह नित्य पूजेतील देवांनाही जगन्नाथ पुरीची यात्रा घडली होती. सकाळी साडेअकरा वाजता नीलाद्री भक्त निवासाच्या ठिकाणी श्री माणिक प्रभू पादुकांची महापूजा संपन्न झाली त्यानंतर दुपारी दोन वाजता श्री सिद्धराज माणिक प्रभूंच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न झाला. त्यानंतर अल्पोपहार होऊन पुन्हा भजन आणि प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला. समुद्र स्नानापासून, पुण्यतिथीचे श्राद्ध कर्म व त्यानंतरचे भजन, प्रवचन यामध्ये श्रीजींचा उत्साह तरुणालाही लाजवणारा होता. प्रवचनादरम्यान श्रीजींची विषयावरील पकड, वेदांतासारखा गूढ विषय जनसामान्यांना समजेल, पचेल, रुचेल अशा पद्धतीने सादर करण्यातील हातोटी हे गुण केवळ एकमेवाद्वितीयच‌ आहेत. आजही सुमारे दोन तासाच्या प्रवचनानंतर श्रीजी पुन्हा सर्व प्रभू भक्तांना भेटण्यासाठी सुहास्य वदनाने खाली प्रांगणात येऊन बसले होते.

पुढच्या दिवशी सकाळी अकरा वाजता पुन्हा श्रीप्रभुंच्या पादुकांची महापूजा झाली. त्यानंतर दीड वाजल्यापासून साधारणतः सहा वाजेपर्यंत श्री सिद्धराज माणिक प्रभुंच्या महासमाराधनेचा सोहळा अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. त्यानंतर भजन आणि श्रीजींचे प्रवचन सुरू झाले. आज चिन्मय मिशनमधून अधिकारी सत्पुरुष, तसेच श्री कृपालू महाराजांच्या आश्रमातील मुख्य श्रीजींच्या प्रवचनासाठी उपस्थित होते. जगन्नाथ पुरी मधील काही यशस्वी उद्योजकांनीही श्रीजींच्या प्रवचनाला आज उपस्थिती लावली होती. यातून श्रीजींचा अध्यात्मिक क्षेत्रातील अधिकार लक्षात येतो. सर्वचनानंतर श्रीजींनी सर्वांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला आणि “अतिथी देवो भव” ह्या उक्तीला अधोरेखित केले.‌ प्रवचनांच्या ह्या गडबडीतही त्यांचे लक्ष तीनही दिवस खाली चाललेल्या भोजन व्यवस्थेकडे अगदी जातीने होते.‌ एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की ती गोष्ट पूर्ण क्षमतेने तडीस नेण्याची दुर्दम्य इच्छाशक्तीही श्रीजींच्या चौफैर असलेल्या नजरेतून दिसून येते.

यात्रेच्या शेवटच्या दिवशी श्रीजी उपम्याची डिश हातात घेऊन सकाळी सर्व भक्तांसमवेत भक्तनिवसाच्या  प्रांगणात नाश्ता करत होते. त्यानंतर त्यांनी तासभर खुर्चीत बसून सर्व प्रभू भक्तांना आपल्या सोबत फोटो काढून दिले. ह्यातून त्यांची भक्तांमध्ये रमण्याची वृत्तीच दिसून येते.  परतीच्या प्रवासामध्ये ही येताना सारखीच बारीक विचारपूस सुरूच राहिली. परतीच्या प्रवासात शेवटी गुलबर्गा उतरल्यावर त्यांचे ढोल ताशांच्या गजरात, हारतुरे घालून ग्रामवासीयनतर्फे जंगी स्वागत रेल्वे स्टेशनवरच झाले. गुलबर्ग्यापासून हुमनाबादपर्यंतचा प्रवास श्रीजींनी शटल ट्रेनने सेकंड क्लासमधूनच केला. पाहिजे असते तर त्यांनी गुलबर्ग्याहून त्यांच्या खाजगी गाडीने प्रवास करून केला असता पण त्यांनी ते कटाक्षाने टाळले. माणिक नगरला पोहोचल्यावर माणिक नगरवासीयांनी पुन्हा थाटामाटात स्वागत करून श्रीजींच्या संकल्प सिद्धीला मानाचा मुजरा केला. ह्या आणि अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी, त्यांची प्रभुभक्तांशी जुळलेल्या नात्यांची वीण घट्ट करतात. श्री माणिकप्रभु संस्थानाशी जोडल्या गेलेल्या भक्तांच्या अनेक पिढ्या त्याच आत्मियतेने, त्याच विश्वासाने आजही का टिकून आहेत, याचे उत्तर सांगायला कुण्या पंडिताची आवश्यकता नाही.

उच्च विद्याविभूषित, अनेक पुरस्कारांनी सन्मानित, प्रख्यात साहित्यिक, संस्कृतसहित अनेक भाषांवर प्रभुत्व, वेदांत विषयावर विशेष प्राविण्य, श्री माणिक प्रभु गादीचे सहावे आणि विद्यमान पीठाधीश असलेले श्री ज्ञानराज माणिक प्रभु उपाख्य श्रीजी हे तितक्याच सहजतेने जनसामान्यात मिसळतात, सर्वांना सहजतेने उपलब्ध असतात. साधी राहणी, कुठल्याही बडेजावाचा अभाव, सर्वांवर आईची माया व वडिलांचे छत्र धरण्याचा स्वभाव, सर्वांना आपलेसे करण्याची वृत्ती ह्यामुळे श्रीजी सर्वांनाच मनापासून आपले वाटतात, आधार वाटतात. श्रीजींबद्दल इतर भक्तांकडून ऐकलेले प्रत्यक्षात अनुभवताना अत्यंत धन्यता वाटली, अनेकदा डोळ्यांच्या कडा ओलावल्या. श्रीप्रभुच्या प्रेरणेने योजलेली ही जगन्नाथपुरी यात्रेची धुरा श्रीजींनी आपल्या खांद्यांवर समर्थपणे पेलली व यशस्वी करून दाखवली. ह्या संपूर्ण यात्रेदरम्यान कुणालाही, कसलाही त्रास झाल्याचे आजपर्यंत तरी ऐकले नाही, हा केवळ योगायोग नव्हता तर ही प्रभुचैतन्याची प्रचिती होती. या यात्रेच्या यशस्वी संयोजनामध्ये श्रीजींप्रमाणेच श्रीजींचे बंधू श्री आनंदराज प्रभुजी, चिरंजीव श्री चैतन्यराज प्रभुजी, श्री प्रभु संस्थान आणि असंख्य कार्यकर्ते ह्यांच्या अथक परिश्रमाचाही सहयोग होता, त्याबद्दल सर्वांप्रती कृतज्ञता…

ह्या जीवाचे अहोभाग्य की ह्या यात्रेदरम्यान श्रीजींना जवळून पाहता आले, त्यांचा हृदय सहवास ह्या यात्रेदरम्यान आम्हा सर्वांनाच लाभला. संपूर्ण यात्रेदरम्यान सतत पूर्ण गुरुकृपेची नजर आणि मायेची पाखर सर्वच प्रभुभक्तांवर धरणाऱ्या श्रीजीरुपी ह्या आधारवडाप्रती कृतज्ञता म्हणून ही शब्दसुमने अनुग्रहभावे श्रीजींच्या परममंगल चरणी मनोभावे अर्पण..

[social_warfare]