सारखं का माणिकनगरला जाता?

दर पौर्णिमेला माणिकनगरला जायचं म्हटल की ,काही जन म्हणतात काय वेड लागलंय का काय तुला दर महिन्याला पौर्णिमा आली की माणिक नगरला पळतोस! तर आमच्या भाषेत वेडच आहे ते आणि आम्ही प्रभूचेच वेडे आहोत. नाहीतर तुम्ही तिथं जालच कशाला? बरोबर ना? वेळ आल्यावर्ती वेडेच कामाला येतात बरं आणि शहाणे दुरूनच पळून जातात. वरून अस विचारतात की काय मिळतं तिथं सारखं सारखं जाऊन?

कामधंदे सोडून पळताय अस काय आहे माणिक नगरला ? तर मग आइका. अहो कामधंदे सोडून आम्ही जात नाही तर आम्ही आमच्या प्रभूंसाठी वेळात वेळ काढून जातो, त्यांच्या दर्शनासाठी जातो. मंदिराच्या नऊ पायऱ्या चढत असताना प्रत्येक पायरी चढल्या वरती चांगली आणि वाईट केलेली सर्व कर्म आठवतात आणि डोळे भरून येतात – ते आहे माणिकनगर! आयुष्यातील सगळी दुःख विसरून, घरची, बाहेरची कटकट विसरून दोन दिवस जे सुखाने जगतो ना, जिथं खऱ्या सुख आणि समाधानाचा आभास होतो तेच आहे – माणिकनगर! दर पौर्णिमेला श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराजांची आमृतवाणी त्यांच्या आगदी समोर बसून आईकण्याचे भाग्य मिळते, भक्तिमय वातावरणात राहून जो आनंद मिळतो ते ठिकाण म्हणजे – माणिकनगर! सर्व जाती धर्माची माणस, श्रीमंत असो वा गरीब जिथं एकत्र येतात, भंडारखाण्यात एकत्र महाप्रसाद घेतात ते पुण्य  ठिकाण आहे – माणिकनगर! जिथं सर्व सुख दुःखाची, पाप आणि पुण्यांची बेरीज वजाबाकी करून सुद्धा  शिल्लक काही राहत नसेल आणि तरी सुद्धा काहीतरी मिळणारच ते स्थान म्हणजे – माणिकनगर! मुलांचे शिक्षण, मुला, मुलींची लग्न, नोकरीत बढती, आरोग्याच्या तक्रारी, व्यवसायात वाढ हे सर्व मनासारखं जिथं होत ते ठिकाण म्हणजे – माणिकनगर! जिथे मोठ मोठे योगीपुरुष, नतमस्तक होतात, मोठ मोठी संतपुरुष वेगवेगळ्या रूपाने येऊन जातात. अहंकार जिथं गळून पडतो आणि मग अक्कल ठिकाण्यावरती येते, आपराध केल्याची जिथं जाणीव होते ते स्थान म्हणजे – माणिकनगर!

असं आहे बघा आमच्या श्री माणिक प्रभूंचे माणिकनगर! आणि तुम्ही म्हणता काय मिळत सारखं माणिकनगरला जाऊन? आहो हे सर्व तुम्हाला नाही समजणार कारण तुम्ही तर या संसाराच्या मोह माया पासून सुटूच शकत नाही, मग जो पर्यंत  प्रभूंच्या जवळ जाण्याची बुद्धीचं होणार नाही तो पर्यंत समजणार नाही की काय आहे हे – माणिक नगर!

ज्ञानसूर्य श्री मार्तंड माणिक प्रभु

आज श्री मार्तंड माणिकप्रभु जयंती. महाराष्ट्रात जन्माला येऊन श्री समर्थ रामदासांना शरण न जाणे जसे दुर्भाग्याचे लक्षण तसे कर्नाटकात पाऊल ठेवूनही माणिकनगर विषयी अनभिज्ञ राहण्यासारखे दुसरे दुःख नाही. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स जशी वैशिष्ट्यपूर्ण फुलांनी डवरलेली असते तशीच माणिकनगरी श्रीजींच्या नित्य चैतन्याने भारलेली असते.

श्री शंकर महाराज आणि श्री मार्तंड माणिक प्रभू या द्वय विभूतींची संमिलीत एक कथा पूर्वीच वाचनात आली आणि तेव्हा पासून श्री मार्तंड माणिकप्रभूंविषयी, त्यांच्या अधिकाराविषयी अत्यंत आदर आणि जिव्हाळा वाटू लागला. त्यांच्या अनेक लीला ऐकून, वाचून मन थक्कच होते असे नाही तर नतमस्तक होते.

अशी वदंता आहे की श्रीक्षेत्र काशीत चुकून कोणालाही धक्का लागावा आणि तो ph.d असावा, तात्पर्य – तेथे अनेक विद्वान आहेत.आमच्या माणिक नगरीत तर या उलट आहे. Ph.d. प्राप्त करायला माणसाला काही वर्षे घालवावी लागतात. माणिकनगरात तर, ” गाव का बच्चा बच्चा वेदांती” असतो. श्री माणिक प्रभूंपासून आजच्या श्रीजीं पर्यंत सर्वांनी आपल्या प्रवचनातून जनमानसावर असे संस्कार केले आहेत. बाळ जन्मतः च वेदांत श्रवण करतं. आनंदाचं बाळकडू घेऊनच मोठं होतं.

समाधान ही येथील इस्टेट आहे. ती तेथून कितीही न्या , मूळ साठा रिकामाच होत नाही. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते…. सारखे भरून शिल्लक राहिले आहे आणि याची साक्ष खुद्द श्रीजीं, श्री मार्तंड माणिक प्रभूच देतात.ज्या समाधीवर गुलाबाची चार फुले चार अक्षर रुपी आशीर्वादाची असतात* त्या भूमीच्या प्रत्येक रजकणात आशीर्वाद नसेलच कसा?

अंतत: एवढेच म्हणेन, श्री प्रभूंपासून आजच्या प्रेमळ, विद्वान, updated श्रीजीं पर्यंत सर्वांबद्द्ल आम्हा भक्तांच्या हृदयात अत्यंत प्रेम आहे. ते शब्दबद्ध करण्यासाठी माझी लेखणी असमर्थ असली तरी मती मात्र त्यांचे चरणी लीन आहे हे नक्की.

प्रभु दर्शन

माणिकनगर – श्रीप्रभु महाराजांच्या पदस्पर्शाने पावन, रमणीय, शांत अशी पुण्यभूमी.
आम्ही जेव्हा जेव्हा श्री दत्त महाराजांचे अवतार कार्य वाचायचो तेव्हा तेव्हा कुतूहल असायचं ते म्हणजे माणिकनगर कधी बघायला मिळेल याचंच !

श्री चैतन्यराज प्रभु रचित एक भजन आम्हाला ऐकायला मिळालं ते असं.

“इस भूमी पर कैलास का प्रतिरूप कोई है अगर
सर्वत्र माणिक है भरा वह धाम है माणिकनगर ”

आणि खरं सांगायचं तर तेव्हापासून वेधच लागले माणिकनगर ला जाण्याचे.

झालं असं कि you tube वरील “माणिक प्रभु” हे channel अचानक पणे आमच्या समोर आलं आणि तेही कोरोना काळात जेव्हा कडक लॉकडाऊन होतं तेव्हा.
सर्वात प्रथम you tube suggestions मध्ये आलं ते श्रीजी महाराजांचं “चमत्कार” या विषयावरील प्रवचन.
ते प्रवचन अश्या प्रकारे अचानक समोर येणं हाच एक “मोठा चमत्कार” होता.

त्यानंतर पहिलं भजन ऐकलं.

“देई मला इतुके रघुराया”

आणि त्यानंतर वेडच लागलं भजन ऐकायचं.
आमची सकाळ व्हायची या भजनाने आणि रात्र व्हायची “रामाचिया दुता, अंजनीच्या सुता” या भजनाने.

हळूहळू आमची जवळपास सगळी भजन ऐकून ऐकून पाठ झाली. तसेच सर्व वारांच्या आरत्या म्हणणं आम्हाला आवडायला लागलं. Channel पाहता पाहता पुढे समोर आलं श्रीजी महाराजांचं भगवदगीते वरचं प्रवचन.
लॉकडाऊनमूळे घरा बाहेर पडता येत नव्हतं आणि ती भयाण शांतता जेव्हा जेव्हा नको वाटायची तेव्हा तेव्हा स्वतः श्री माणिकप्रभु महाराज श्रीजींच्या रूपात आमच्या सोबत आहेत असं आम्हाला वाटायचं. हसत खेळत वेदांत शिकवण्याची श्रीजीं ची पद्धत आम्हाला खुप भावली आणि आम्ही दिवसदिवसभर भजनं , मग प्रवचनं त्यानंतर आरती असं ऐकायला लागलो.

“सर्वत्र माणिक है भरा वह धाम है माणिकनगर”

हि ओळ तर कानात सतत ऐकू येत राहायची आणि मग लगेच आठवायच्या त्या पुढच्या या दोन ओळी.

“वैकुंठ से भी श्रेष्ठ यह आनंदमय मंगल भुवन ,
केवल पहुचते है यहाँ सौभाग्यशाली भक्तजन ”

आणि मग मनात यायचं कि प्रभु महाराज आमच्या मनात काय सुरु आहे ते खरंच ऐकत असतील का? इतक्या लाखो करोडो भक्तांमध्ये त्यांना आम्ही मारलेली हाक ऐकू येत असेल का? तिथे पोहोचणाऱ्या सौभाग्याशाली भक्तजनांपैकी आपणहि एक असू का?

आणि या प्रश्नांची उत्तरं स्वतः श्रीप्रभु महाराजांनी आम्हाला दिली ३ डिसेंबर २०२२ रोजी त्यांच्या पुण्यतिथी च्या पवित्र दिवशी.
तो दिवस म्हणजे श्रीप्रभु महाराजांची पुण्यतिथी, गीता जयंती, आणि श्रीजी महाराजांचा जन्मदिवस. दुग्धशर्करा योग किंवा पर्वणी या शब्दाचा खरा अर्थ तेव्हा कळाला. अत्यंत अनपेक्षितपणे कोणत्याच प्रकारची पूर्व तयारी नसताना अगदीच अचानक प्रभु महाराजांच्या दरबारी येण्याचा योग स्वतः प्रभू महाराजांनीच घडवून आणला. त्यांच्या लीला तेच जाणतात हेच खरं. दोन, तीन वर्षांपासून असणारी प्रखर इच्छा पूर्ण झाली. माणिकनगरला कसं पोहचायचं हे सांगण्यासाठी आम्हाला मदत झाली ती “माणिक दर्शन ” App ची. या App वर अत्यंत सुंदर माहिती मिळते.

सकाळीं हुमणाबाद ला उतरल्या बरोबर मागून हॉर्न वाजवत पुढ्यात एक रिक्षावाले दादा हजर . ते पाहताच आपण प्रभु नगरीत प्रवेश केला असल्याची जाणीव झाली.जणू श्रीप्रभु महाराजांनी आम्हाला आणायलाच पाठवून दिलं होतं त्या रिक्षावाल्या दादांना.

“माणिकनगर” च्या पवित्र भूमीचा स्पर्श आणि तिथल्या कणाकणात जाणवत असणारं प्रभू महाराजांचं अस्तित्व हे केवळ अवर्णनीय आहे.
“माणिक विहार” जिथे भक्तांच्या राहण्याची सोय केली जाते तिथे प्रवेश करताच तिथली स्वच्छ्ता व टापटीपपणा पाहून मन अत्यंत प्रसन्न झालं. सुखद आणि चैतन्यमय असा परिसर. तिथली व्यवस्था, तिथल्या रूम्स आणि एकंदरीत व्यवस्थापन किती बारीक लक्ष देऊन सांभाळलं जातं याची कल्पना आली.तिथून पाच ते सात मिनिटांवर प्रभु महाराज समाधी मंदिर आहे.

प्रभु महाराजांच्या दर्शनाची ओढ लागल्यामुळे आम्ही धावत समाधी मंदिरात आलो आणि दिव्य समाधीचे दर्शन घेऊन डोळ्यांचं पारणं फिटलं. अष्टभाव जागृत होणं म्हणजे काय ते दरबारात उभे राहिल्यावर जाणवलं. आम्ही दोन – तीन वेळा समाधी दर्शन घेतलं पण मन काही भरत नव्हतं.
स्वतः श्रीप्रभु महाराज समोर बसून अतिशय गोड हसत आहेत असंच भासत होतं. गीता जयंतीच्या दिवशी साक्षात श्री कृष्ण भेटल्याचा आनंद आम्हाला झाला होता. डोळे दिपवणारी पूजा , अतिशय गोड आवाजात , सुरेल म्हणली जाणारी आरती आणि भजनं ऐकून कान तृप्त झाले.
श्रीजी महाराजांच्या प्रवचनात ते नेहमी सर्व श्रोत्यांना हसवण्यासाठी गंमत म्हणून ज्या भंडारखान्याचा उल्लेख करतात तिथे मिळणारा “भोजन प्रसाद” तर खाऊन पोट भरेल पण मन काही भरणार नाही असा होता. त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे. शेवटी ते साक्षात भगवंताच्या घरचं जेवण. त्या जेवणाची चव वर्णन करायला शब्द कुठून आणावेत.

श्रीजी महाराजांची भेट होणं हा तर आमच्यासाठी खूप मोठा आशिर्वाद आहे. Charismatic & Magnetic Personality हे शब्द dictionary मध्ये वाचले होते पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे श्रीजी महाराज.
मला तर वाटतं कि किती नशिबवान आहेत माणिकनगर व तिथल्या जवळपास च्या गावांमध्ये राहणारे गावकरी, तिथल्या शाळेत आणि वेद पाठशाळेत शिकणारे विद्यार्थी आणि नेहमी त्यांच्या सहवासात असणाऱ्या सर्व व्यक्ती. कारण श्रीजी म्हणजे “ज्ञानसागर”. त्यांच्याकडून किती प्रकारचं ज्ञान घेऊ असं वाटतं आणि त्यासाठी हा एक जन्म तरी पुरेसा पडणार नाही हे नक्की. सकाळी पूजा व इतर सर्व धार्मिक विधी सुरू असताना सलग ४ , ५ तास उभे राहून देखील येणाऱ्या सर्व भक्तांना भेटून, त्यांची विचारपूस करून, क्षणभरही विश्रांती न घेता पुन्हा प्रफुल्लित होऊन संध्याकाळी पुन्हा तोच उत्साह आणि पुढच्या कार्यक्रमातील त्यांचा वावर बघून थक्क व्हायला झालं. त्यांना बघितलं कि मला त्यांच्याच कवितेच्या ओळी आठवतात.

“देख न सकती आँखें जिसको, मैने उसको देखा है “…

आता परतीचा प्रवास करायचा होता पण त्या आधी आम्ही श्री सर्वेश्वर देवालय , श्री दत्त मंदिर , प्राचीन औदुंबर , हनुमान मंदिर इथे दर्शन घेतलं.

श्री मनोहर माणिक प्रभु महाराज,
श्री मार्तंड माणिक प्रभु महाराज,
श्री शंकर माणिक प्रभु महाराज,
श्री सिध्दराज माणिक प्रभु महाराज
या दिव्य विभूतींच्या समाधींचे हि दर्शन आम्ही घेतले.
मंदिर आवाराताच असणारे paintings बघून प्रभुमहाराजांचे चरित्र आपोआप डोळ्यांसमोरून पुढे पुढे सरकत जातं आणि आपण स्वतःला विसरून जातो. खुप छान वाटतं.

श्री आनंदराज प्रभु महाराज, श्री चैतन्यराज प्रभु महाराज आणि संपूर्ण टीम चा उत्साह आणि उत्सवाचे व्यवस्थापन बघून आम्ही भारावून गेलो. आपल्या घरी एखादा छोटासा जरी कार्यक्रम असेल तरी आपली तारांबळ उडते पण इथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळी व्यवस्था कशी बरं सांभाळत असतील हे सर्वजण? हे एक कोडंच आहे.त्यातून येणाऱ्या सर्व भक्तांचं आदरातिथ्य आणि सहकार्य हेही न चुकता करतात.आम्ही त्यासाठी खरंच सर्वांचे
अत्यंत आभार मानतो अगदी मनापासून.
माणिकनगर येथील केवळ काहीं तासांच्या वास्तव्यात देखील आम्ही खुप काहीं शिकलो.
एकीकडे श्री प्रभुमहाराजांचे दर्शन झाल्याचा अतीव आनंद तर दुसरीकडे लगेच परतावं लागणार याचं दुःख. खूपच द्विधा मन:स्थिती झाली होती.
पण आम्हाला खात्री आहे कि लवकरच परत श्री प्रभुमहाराज आम्हाला बोलवतील त्यांच्या वास्तव्याने परम पावन झालेल्या प्रभु नागरी मध्ये कारण ते त्या प्रत्येक भक्ताची हाक ऐकतात जे भक्त त्यांची मनापासून , आर्ततेने आठवण काढतात.

स्वर्णमृग पर लुब्ध होकर

परमपूज्य सद्गुरु श्री ज्ञानराज माणिक प्रभु महाराजांनी परमार्थ मार्गातील साधकांसाठी त्याच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांपैकी एका मोठ्या अडथळ्याचे, रामायणातल्या सुवर्णमृगाच्या प्रसंगाचे उदाहरण देऊन, त्याचे स्वरूपही सांगितले आहे आणि त्याला पार करून जाण्याचा बोधही फार मार्मिकपणे केला आहे.

स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई ।
मुग्ध होकर बुद्धि की सुविचार क्षमता खो गयी ।।धृ।।

है असंभव हेममृग यह राम भी थे जानते ।
जानकर भी हाथ में ले चाप-शर वे भागते ।
भंग तृष्णासंग से आनंदघनता हो गई ।
स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई ।।१।।

है प्रलोभन दे रहा मारीच आत्माराम को ।
ताकि रावण हर सके सुख शांति औ’ विश्राम को ।
स्वर्णमृग के मोह में मति की सुसमता खो गई ।
स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई ।।२।।

है विषय सब स्वर्णमृग सम सर्वदा यह जान तू ।
बुद्धि-सीता हो न मोहित, ध्यान रख यह ‘ज्ञान’ तू ।
ध्यान इतना रख समझ ले पार सरिता हो गई ।
स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई ।।३।।

श्रीरामांची अर्धांगिनी, सीता, ही अत्यंत पवित्र, शुद्ध चरित्राची पतीव्रता, अशी स्त्री जिचा उल्लेख ‘पंचकन्यां स्मरे नित्यमं’ मध्ये प्रथम क्रमांकाने येतो, ती सीतासुद्धा सुवर्णमृगाच्या वैषयिक दर्शनाने, त्याच्या प्राप्तीसाठी कशी वेडीपीशी होते, हा प्रसंग आहे.

‘स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई’ वनांत इतस्ततः मजेत विहार करणाऱ्या सुवर्णमृगाला पाहून सीता हरखून गेली. श्रीजींनी ‘लुब्ध’ हा शब्द बरोब्बर परिस्थितीला साजेसा घातलेला आहे. लुब्ध शब्दात हावरेपण आहे (Greedyness). ‘मला ते पाहिजे म्हणजे पाहिजेच’ हा भाव आहे. त्याचाच परिणाम असा झाला की ‘मुग्ध होकर बुद्धी की सुविचार क्षमता खो गई।’ सीता वेडीपिशी झाली. चांगलं काय, धोक्याचं काय, यामध्ये निर्णय घेण्याची बुद्धीची क्षमता त्यामुळे पांगळी झाली.

सद्गुरु श्री ज्ञानराज महाराजांनी अत्यंत दयाळू होऊन साधकांना अप्रत्यक्षपणे इशारा केला आहे की, जगातले बाह्य विषय संख्येने जरी पाचच (शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध) असले, तरी त्यांची आकर्षणशक्ती सीतेसारख्या भल्याभल्यांनाही मोहित करते. त्यांचीही मती भ्रष्ट करू शकते. यासाठी श्री समर्थ ही उपदेशितात,

‘मना कल्पना ते नको विषयांची ।
विकारे घडे हो जनी सर्वचीची ।’

म्हणून या प्रथम टप्प्यावरच साधकाने जागृत राहून मनाच्या संकल्पामागे न जातां, बुद्धीची निर्णय क्षमता जपली पाहिजे.
‘आली उर्मी साहे, तुका म्हणे थोडे आहे।’

याचे कारणही महाराजांनी पुढच्या ओळीत दिले आहे. ‘है असंभव हेममृग ये रामभी थे जानते।’ श्रीराम परमात्मा आहेत, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ असे आहेत. त्यामुळे सुवर्णमृग असंभव आहे किंबहुना हे मायाजाल आहे, हे श्रीरामांना माहीत होतेच. तरीही ‘जानकर भी हाथमे ले चाप शर वे भागते।’ अत्यंत विचक्षण बुद्धीने महाराजांनी त्या आत्मचैतन्याच्या स्वभावाकडे निर्देश केला आहे.

मूळ आत्मचैतन्य जरी रंगहीन असले, तरी त्या स्फुरणाला मनातील वासनेचा रंग चढला, की त्या विषयाची वृत्ती होते. मन इंद्रियांना जोडलेले असल्यामुळे, वासना जर उत्कट असेल तर त्या वृत्तीची उर्मी होऊन इंद्रियांकडे धाव घेते आणि इंद्रिय ते कर्म करतात. हा सर्व प्रकार घडण्यासाठी मूळ अधिष्ठान हे आत्मचैतन्याचेच असते. ते जर नसले, तर वरील प्रक्रियाच होत नाही.

म्हणूनच महाराज म्हणतात, सुवर्णमृग असंभव आहे हे जाणूनही श्रीराम धनुष्यबाण घेऊन धावले. भगवान श्रीराम हे एकबाणी, एकवचनी आहेत, हे माहीत असल्याने, माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी ते स्वतः गेलेत म्हटल्यावर, आता इच्छापूर्ती नक्की होणार या कल्पनेनेच ‘भंग तृष्णासंग से आनंदघनता हो गई।’. सुवर्णमृग मला हवा ही उत्कट आशातृष्णा आता श्रीराम भागविणार, या जाणिवेने सीता अतिहर्षित झाली.

खरे तर विवेकाने हिताचीच गोष्ट मनात ठसते पण मन जर विकारांच्या हातचे खेळणे बनले तर मात्र ‘प्रमाणांतरे बुद्धि सांडोनि जाते.’ सीतेचे नेमके तेच झाले. ‘अव्यवस्थित चित्तानां प्रसादोऽपी भयंकरः।’ (अर्थ – ज्यांच्या मनाचे वागणे अव्यवस्थित म्हणजे जसे असायला हवे तसे नसते, ते प्रसन्न झाले तरी त्याचा परिणाम भयंकर होऊ शकतो.)

‘है प्रलोभन दे रहा मारीच आत्माराम को।’ सुवर्ण मृगाचे रूप घेतलेला मारीच मामा, तो आपल्या मागे येत असलेल्या श्रीरामाला, थोडं माना वळवून, थोडं पुढे पुढे पळून, सीतेपासून दूर दूर नेऊ पाहतो. त्याचप्रमाणे मात्रास्पर्शाने वैषयिक बनलेली बुद्धिवृत्ती आपल्या मूळ विवेकी स्वरूपापासून दूर जाते. असं झालं तर त्याचा परिणाम काय होतो, हे श्री महाराज पुढच्या ओळीत सांगत आहेत. ‘ताकि रावण हर सके सुख शांती औ’ विश्राम को।’ मनाला वाटणारी आवड निवड प्रामाणिक नसते. इंद्रिय बाह्यांगाला भूलतात. त्यामुळे विषयाचा स्विकार किंवा धिक्कार हिताच्या दृष्टीने, नेमकेपणाने करता येत नाही. अशाप्रसंगी ग्राह्य-त्याज्य सार-असार अशा द्वंद्वांमध्ये नेमका हिताचा निर्णय घेण्याची विवेकशक्ती जर बावचळली तर भवसागराच्या महाभयंकर लाटा आपल्याला कधी गिळंकृत करतील, याचा नेम नसतो. म्हणून समर्थ म्हणतात, ‘मना कल्पना ते नको विषयांची।’ पुढे समर्थ म्हणतात, ‘महाघोर संसार शत्रू जीणावा.’ श्री महाराजांनी रावणाचा जो उल्लेख केला आहे, तो या संसार शत्रूलाच उद्देशून केला आहे, असे मला वाटते. वरकरणी सुखाचा मुखवटा घातलेला संसार, हेच दुःखाचे मूळ आहे, असे अनेक संतांनी सांगितलेले आहे. संत सद्गुरु दासगणू महाराज म्हणतात, ‘भूलू नको मना संसारा ।
ना येथ सुखाचा वारा ।।
दुःखाचे मूळ संसार ।
बा करिल बहुत बेजार ।।
लोभाचे करुनि मांजर ।
तुज फिरवील दारोदार ।।

श्री महाराजांनी या संसार शत्रूला रावणाचे रूप दिले आहे, जो सुख शांती आणि विश्राम हरण करतो. याचे कारणही श्री महाराजांनी पुढील पंक्तीत कथन केले आहे, ‘स्वर्णमृग के मोह में मति की सुसमता खो गई।’

लोभ, मोह या गोष्टी मनबुद्धीला क्षोभ देण्यास कारणीभूत होतात, त्यामुळे त्यांचे स्थैर्य ढळते, समत्व बुद्धीने विचार करण्याची क्षमता उणावते. गीतेमध्येही या समत्व बुद्धीचा संदर्भ साधकाला योग साधण्याच्या दृष्टीने अनेक ठिकाणी आला आहे. जसे ‘सर्वत्र समबुद्धय:’, ‘समबुद्धिर्विशिष्यते’, ‘समं पश्यन्हि सर्वत्र’ इत्यादि.

मोहामुळे बुद्धीचा हा जो महत्त्वाचा आणि सर्वात उच्च प्रतीचा गुण आहे, तो नष्ट होतो आणि साधकाला साधनेमध्ये आडकाठी होऊ शकते. म्हणूनच श्री महाराजांनी रामायणातील सुवर्णमृगाच्या प्रसंगाच्या आधारे साधकांना सावध राहण्याचा बोध केला आहे. ‘है विषय सब स्वर्णमृग सम सर्वदा यह जान तू।’ जगातील बाह्य विषय हे त्या सुवर्णमृगाप्रमाणे भ्रांती निर्माण करतात. विवेकी बुद्धी भ्रष्ट होते. म्हणूनच समर्थ म्हणतात, ‘अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, अती विषयी सर्वदा दैन्यवाणा।’ असे होऊ नये म्हणून, श्रीमहाराज बोध करताहेत, ‘बुद्धी सीता हो न मोहित, ध्यान रख यह ‘ज्ञान’ तू।’ या काव्यात बुद्धीला सीतेचे रूपक दिले आहे, तिला झालेल्या मोहाचा परिणाम किती भयंकर झाला, हे जाणून श्री महाराज अत्यंत कृपाळूपणे साधकाला आश्वासन देत आहेत की, अशी बुद्धी जर बाह्य विषयांना मोहित होऊ दिली नाहीस म्हणजेच, तुझे हवे-नको उणावले, तर मग ही भवनदी तू पार केलीसच असे समज.

साधकाचे हवे-नको उणावले की मनाची चंचलता उणावते. बुद्धीची विवेकशक्ती सबळ होते. वृत्ती बाहेर न धावता अंतर्मुख होऊ शकतात आणि अशा अंतर्मुख वृत्तीलाच परमात्म्याच्या दर्शनाची योग्यता प्राप्त होते. परमपूज्य सद्गुरु दासगणू महाराज म्हणतात, ‘अंतर्मुख वृत्ती करी । जरी बघणे असेल हरी।’

परमपूज्य श्री सद्गुरु ज्ञानराज महाराजांच्या चरणी शरण राहून वरील विवरण केले आहे. काही चुका झाल्या असल्यास मला क्षमा करून मार्गदर्शन करावे, ही प्रार्थना चरणी करते.

चिदानंदरूप: शिवोहम शिवोहम

आज श्रीगुरु आराधना होती. सूर्य मावळतीला झुकत होता. आरक्त वर्णाच्या त्या बिंबातून बाहेर पडणारी सौम्य किरणे भोवतालच्या आसमंताला सोन्याच्या जेजुरीसारखी पिवळीधम्मक करत होती. गायकाच्या परावाणीतून सुरांचे कारंजे थुईथुई नाचत होते. हंस: सोऽहम् सोऽहम् हंस:, अजपाजप सद्ब्रह्म प्रकासा हे भजन अगदी टीपेला पोहोचले होते. वाद्यवृंदाच्या तालसुरांची मोहिनी, एव्हाना भक्तांवर गारुड करायला लागली होती. आराधनेच्या वेळी श्रीगुरु आपल्या शिरावर मंगल कलश घेऊन भजनाच्या तालावर लयबद्ध डूलत होते. शिवासुद्धा ह्या आनंद सोहळ्यामध्ये न्हाऊन निघत होता. श्रीगुरुंवरून त्याची नजर काही केल्या हटत नव्हती. देहभान हरपून तो अनिमिष नेत्रांनी श्रीगुरुंना आपल्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होता. त्याची नजर काहीतरी शोधत होती.

अस्त समय शिव नाचत प्यारा,
शांभवगण शिव हर ललकारा

हे वाक्य ऐकायला आणि श्रीगुरुंमध्ये त्याला साक्षात् शिवशंकर दिसायला एकच वेळ साधली गेली. अवघे दहा क्षण ही नसतील पण शिवाचा शोध आता संपला होता. समोर जे काही दिसलं तो भास नक्कीच नव्हता. डोळ्यातील आनंदाश्रूंनी त्याने मनोमन उभ्याउभ्याच श्रीगुरुंना अभिषेक घातला. ज्याच्या दर्शनाची आस आजवर लागली होती, तो क्षणात साक्षात् समोर येऊन, श्रीगुरुरुपात विलीनसुद्धा होऊन गेला होता.

दुसऱ्या दिवशी शिवाने श्रीगुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करुन, त्यांना काल संध्याकाळी घडलेला प्रकार सांगितला. त्यावर खळखळून हास्य करीत श्रीगुरु म्हणाले, अरे मीच काय, तू ही शिवस्वरूप आहेस, अनुभव घे… शिवा थोडा गोंधळला.‌ श्रीगुरुंचे ते शब्द त्याच्या कानामध्ये रुंजी घालत होते. दुपारी शिवा बाजूच्याच एका शिवमंदिरात गेला. दुपारच्या वेळी ऊन मी म्हणत होते. अगदी पुरातन असलेल्या ह्या मंदिर परिसराला गुप्तकाशीही म्हटले जायचे. मंदिराचा परिसर मोठा प्रशस्त होता. अनेक शिवलिंगे या परिसरात स्थापिली होती. पण मुख्य मंदिर काहीसे वेगळे होते. येथे शाळुंकेवर शिवलिंगाच्या ऐवजी शाळीग्राम होता, जणू तो हरिहराचे ऐक्यच दाखवीत होता. मंदिराच्या कळसावरही रामाच्या धनुष्यबाणाचे चिन्ह होते. मुख्य मंदिरात मनोभावे दर्शन घेतल्यावर, शिवा बाहेर आला आणि अचानक आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी जमली. जोराचा वारा वाहून गडगडाट व्हायला लागला. शिवा जगन्मातेचे दर्शन घेऊन तिच्या मंदिराच्या आवारात दोन मिनिटं बसला होता आणि त्याच वेळेस विजांच्या कडकडाटासहीत धुंवाधार पाऊस सुरू झाला. शिवाला परतीची घाई होती. कोसळणाऱ्या पावसातच त्याने मंदिराबाहेर एक पाय ठेवला आणि त्याचे अंग मोहरून गेले. पावसाच्या पाण्याचा स्पर्श त्याला शीतलता प्रदान करत होता. तो थंडगार स्पर्श त्याला हवाहवासा वाटू लागला. मंदिरातून परतीच्या मार्गात शिवा पुन्हा मुख्य मंदिराच्या समोर होता. एव्हाना शिवा अचानक आलेल्या पावसामुळे, नखशिखांत भिजला होता.‌ मंदिराच्या पायऱ्या उतरताना, पाच दहा मिनिटाच्या झालेल्या पावसाच्या पाण्याने मंदिर परिसरात पाण्याचं चक्क तळ साचलं होतं. गुडघाभर साचलेल्या त्या पाण्यातून वाट काढताना, शिवा मंदिराच्या महाद्वारापाशी आला. परतीचा नमस्कार करताना त्याला श्रीगुरूंचे शब्द आठवले, अरे मीच काय, तू ही शिवस्वरूप आहेस, अनुभव घे…

श्रीगुरुंनी त्याला आज त्याच्या शिवस्वरूपाची जाणीव करून दिली होती. पुरातन शिवमंदिरात जेथे लखलखीत ऊन पडले होते, तेथे क्षणात पाऊस येतो काय आणि आपल्या देहाला भिजवून जातो काय ह्याचे गूढ शिवाला उलगडले होते. शिवशंकराला जल अत्यंत प्रिय आहे आणि शिवाच्या देहरूपी पिंडीवर अस्तित्वाने आज पावसाची संततधार धरली होती. गुप्तकाशी स्थानामध्येही साठलेल्या पाण्यामुळे शिवाला जणू गंगास्नानच घडले होते. कृतज्ञ आणि कृतार्थ भावनेने ओघळलेले डोळ्यातील आनंदाश्रू पावसाच्या साचलेल्या पाण्यात मिळाले होते.‌ जीवाला शिवाची ओळख झाली होती, शिवाला अंत:स्थ शिवाची ओळख झाली होती. श्रीगुरुंनी शिवाला त्याच्या स्वस्वरूपाची ओळख करून दिली होती. आनंदाच्या त्या भरात शिवा झरझर परतीच्या मार्गाला लागला होता आणि त्याचवेळी त्याच्या कानाला कुठेतरी दूरवरून भजनाचे सूर ऐकू होते,

हा शैव नव्हें मनुजाधम मूढ तो ऐका,
मी सांब नव्हें कोण मी धरी जो शंका…

हेचि अमुचे माहेर माहेर

 

हेचि अमुचे आहे माहेर माहेर
श्रीप्रभुचे धाम हे श्रीमाणिकनगर।। धृ।।

ज्ञानराज प्रभु माय माऊली माऊली
विसावतो त्यां प्रेमळ कृपेच्या साऊली।। 1।।

ज्ञानराज प्रभु आम्हांसि तात तात
साम-दामाने करती सहजी निभ्रांत।। 2।।

ज्ञानराज प्रभु वडिल बंधु बंधु
रक्षिती तरताना हा भवजलसिंधु।। 3।।

ज्ञानराज प्रभु सद्भाग्ये सद्गुरु सद्गुरु
तेची लोपवितील अज्ञान अंधारु।। 4।।

ज्ञानराज प्रभु-वचनाची गोडी गोडी
लावी मानसी प्रभुनगरीची बहू ओढी।। 5।।

ज्ञानराज प्रभुसी करिता नमन नमन
क्षणभर मर्कट मन होतसे “न मन”।। 6।।

ज्ञानराज प्रभु ठेवा शिरी हस्त हस्त
द्वैतासि करुनी टाका आता प्रभु नास्त।। 7।।

ज्ञानराज प्रभु ही एक विनती विनती
जन्म-मरणाची चुकवा अमुची फिरती।। 8।।