माणिक नगरच्या श्री माणिक प्रभु हिंदी विद्यालयातील दहावीतील, कु. श्यामला गंगाधर बोलचटवार, ह्या माणिक नगरातील विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय आंतरशालेय श्रीमद्भगवद्गीता पठण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला, त्याबद्दल कुमारी श्यामलाचे मनस्वी अभिनंदन, कौतुक आणि शुभेच्छा… माणिक शिक्षेच्या फेसबुक पेजवर ही बातमी पाहिली आणि मनामध्ये सहजच श्री चैतन्यराज प्रभुंच्या द ग्लोरी ऑफ माणिक नगर (The Glory of Maniknagar…) कवितेतील ओळी नजरेसमोर तरळून गेल्या…. है प्रभू कृपा की छाव मे इस नगर का प्रत्येक घर…

तसे पाहिले तर भगवद्गीता पठण स्पर्धेत अनेक जण प्रथम क्रमांक पटकावतात मग कु. श्यामलाच्या या यशात विशेष असे काय बरे दडले आहे? कु. श्यामलाचा फोटो व्हाट्सअप वर येताच त्याला का बरे इतके लाईक्स मिळाले? ह्याचे उत्तर श्री सकलमत संप्रदायाच्या वाङ्मयात आणि  श्री माणिक प्रभु संस्थानाच्या गादीवर बसलेल्या सर्वच विद्वत्ताप्रचूर पिठाचार्यांनी जनमानसांवर आजवर केलेल्या संस्कारांमध्ये आहे. श्री माणिक प्रभु आणि त्याच्यानंतर गादीवर बसलेल्या सर्वच पिठाचार्यांनी वेदांताचा प्रचार आणि प्रसार अगदी हिरीरीने केला. श्री शंकर माणिक प्रभुंनी प्रथम हिंदी विद्यालयाची स्थापना माणिक नगरात केली. श्री शंकर माणिक प्रभुंचे ज्ञानशांकरी म्हणून वेदांतावर भाष्य असलेले लेखांच्या संग्रहाचे पुस्तक संस्थानाने प्रकाशित केले आहे. आज त्याच शाळेच्या कु. श्यामलाने भगवद्गीता पठण स्पर्धेमध्ये दैदिप्यमान असे यश मिळवले आहे. वेदांत सप्ताहामध्ये किंवा पौर्णिमेच्या प्रवचनांमध्ये आजवरच्या पीठाचार्यांकडून समस्त भक्तजनांना वेदांत विषयक ज्ञानामृत पिढ्यानपिढ्या पाजले जात आहे. सध्याचे विद्यमान पीठाधीश श्री ज्ञानराज माणिक प्रभु हे स्वतः श्रीमद्भगवद्गीतेचा प्रसार करण्यात अग्रणी आहेत. आजपावेतो त्यांची गीतेवर हजारांच्यावर प्रवचने झाली आहेत. ते आपल्या प्रवचनामध्ये नेहमी म्हणतात की, हे सगळं वेदांतपर ज्ञान मी म्हणून तुम्हाला देतो आणि तेही फुकट… आज कु. श्यामलाचा श्री ज्ञानराज माणिक प्रभू बरोबर भेटीचा फोटो पाहिला आणि एक गोष्ट येथे आग्रहाने सांगावीशी वाटते की, श्रीजी, तुम्ही वेदांतपर ज्ञान जरी फुकट देत असलात तरी ते अजीबातच फुकट जात नाहीयेय…

ह्या वेळीच्या श्रीदत्त जयंतीमध्ये पाहिलं तर माणिक नगरामधले वयोवृद्ध, महिला आणि पुरुष, तरुण मंडळी यांच्याबरोबरच लहान लहान मुलं ही श्रीजींचा प्रवचन ऐकण्यासाठी उपस्थित होती. काही नवजात अर्भकेही स्तनपान करता करता श्रीजींचे प्रवचन ऐकत होती. खरोखरच धन्य ती माणिक नगरची जनता, ज्यांना अध्यात्माचे हे बाळकडू अगदी लहान वयापासूनच मिळते. लहान वयातच असे बालमनावर सुसंस्कार झाल्यावर, त्यांच्यात अध्यात्माची आवड निर्माण झाल्यावर, आणि घरातही तसे वातावरण असल्यावर,  स्पर्धेमधील असे दैदिप्यमान यश समग्र असते. ते केवळ पाठांतर करून मिळवलेले नसते. कु. श्यामलाच्या ह्या नेत्रदीपक यशाने सर्वाधिक आनंद श्रीजींना झाला असेल ह्यात तीळमात्रही शंका नाही आणि तो आनंद आपल्याला श्रीजींच्या भावमुद्रेतून सहज टिपता येतो. श्रीजी समाजामध्ये पेरत असलेल्या बीजाचे सकारात्मक अंकुरण होऊन एक सशक्त समाज आणि देश घडवणारी भावी पिढी वृद्धिंगत होत आहे, हे खूपच आश्वासक आहे.

श्री प्रभु संस्थानामध्ये संगीत विभागात काही वर्षांपूर्वी सेवक असलेल्या कै. गंगाधरपंतांची कन्या कु. श्यामला आता राज्यस्तरावर बिदर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल. येथेही श्रीप्रभुकृपेचा आशीर्वाद तिच्यावर अखंड राहो. स्पर्धेतील पुढील वाटचालीसाठी कु. श्यामलाला अनेकोत्तम शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा.

[social_warfare]