प्रभु कृपा म्हणजे काय?

भौतिक वस्तू प्राप्त होणे म्हणजे प्रभु कृपा नव्हे. भौतिक सुख-समृद्धी जवळ नसतानाही समाधानी आसणे, म्हणजे प्रभु कृपा.

श्री सदगुरू ज्ञानराज माणिक प्रभु महाराजांनी “प्रभु ने मेरा सब कूछ छिना” या पदातून सांगितलय की ज्यां भक्तांवर प्रभूंना कृपा करावयाची असते त्यांना प्रभु काही देत नाहीत तर त्यांच्याकडूनच सर्व काही काढून घेतात. प्रभु सर्वांसोबत असं करत नाहीत. ज्याला जे हवंय ते सर्वकाही किंबहुना त्याहून ही आधिकच देतात आणि त्यांना पूर्ण संतुष्ट करतात. परंतु कधी कधी जेव्हां एखाद्या भक्तावरती अत्यंत कृपा करावयाची असते तेव्हां प्रभु काही देत नाहीत, उलट त्या भक्ता कडून सर्वकाही काढून घेतात. सर्व काही काढून घेतल्यानंतर त्या भक्ता कडे काहीच उरत नाही. सुख आणि दुःख यांना काहीच महत्त्व राहत नाही. तेव्हां त्याच्या कडे करण्या साठी काही ही राहत नाही आणि आयुष्यात कसलीही इच्छा शिल्लक राहत नाही. फक्त एकच गोष्ट शिल्लक राहते ती म्हणजे ‘‘माणिक, माणिक जय गुरु माणिक‘‘ हे नाव घेत आयुष्य जगणे.

जीवनात जगत असताना असंख्य संकटे, विविध आडचणी सर्वांनाच येत असतात. अनेक दुःखद प्रसंगांना सामोरे जावं लागतं. त्या अडचणीच्या डोंगराला सामोरे जाण्याची, त्याच्याशी झुंजण्याची जी शक्ती आपल्याला मिळते, ती शक्ती म्हणजेच प्रभु कृपा. आयुष्यात येणारे अनेक संकटे आपल्याला नकळत टळून जातात हीच प्रभु कृपा. एकवेळचे जेवणाचे वांदे असताना ही दोन वेळचे जेवण मिळणे ही ही प्रभूचीच कृपा. ‘आता सर्व संपलं’ अस वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजेच प्रभू कृपा.

प्रभु चरित्रातील 23वा अध्याय जर आपण पहिला तर त्यात कोमटी जातीतील एक बालिका, लहान वयातच विधवा होते, आई, वडील भाऊ बहिण सर्व नातेवाईक, सखे सोयींरीचा साथ सुटून जातो. आधारासाठी तिला कोणीच राहत नाही,आशा आर्थहीन जीवनात जेव्हां प्रभूंची भेट होते आणि प्रभु कृपा होते तेव्हां त्याच स्त्रीला देवत्व प्राप्त होते. आज आपण त्यांना व्यकंमा देवी या नावाने पुजतो, हीच आहे प्रभु कृपा.

माणसाच्या जीवनात आनेक लहान मोठ्या घटना घडत असतात कुठल्या ना कुठल्या रूपात प्रभूंची कृपा अखंडित रूपी होतच असते, परंतु त्या माणसाला प्रभूंची झालेली कृपा कळण्या साठीही भाग्यच लागते आणि ते समजण्या साठी योग्य सदगुरू मिळण्याची गरज असते. त्याशिवाय प्रभूंची झालेली कृपा ही समजत नाही.

आपल्याला परमेश्वर आणि गुरु एकाच देहात भेटणे म्हणजे भाग्यच की हो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि पूर्वजन्मीच्या पुण्याईंचे फळ असतील की मला श्री सद्गुरू ज्ञानराज माणिक प्रभु महाराजांकडून आनुग्रह प्राप्त झाला. आणि मी जेव्हांही माझ्या सदगुरूंचे दर्शन घेतो तेव्हां हे जाणवते की माझे प्रभु आणि माझे गुरु दोघेही एकच देहात वास करत आहेत.

आशीच प्रभु कृपा सर्वांना मिळो हीच प्रभुचरणी प्रार्थना करतो.

सारखं का माणिकनगरला जाता?

दर पौर्णिमेला माणिकनगरला जायचं म्हटल की ,काही जन म्हणतात काय वेड लागलंय का काय तुला दर महिन्याला पौर्णिमा आली की माणिक नगरला पळतोस! तर आमच्या भाषेत वेडच आहे ते आणि आम्ही प्रभूचेच वेडे आहोत. नाहीतर तुम्ही तिथं जालच कशाला? बरोबर ना? वेळ आल्यावर्ती वेडेच कामाला येतात बरं आणि शहाणे दुरूनच पळून जातात. वरून अस विचारतात की काय मिळतं तिथं सारखं सारखं जाऊन?

कामधंदे सोडून पळताय अस काय आहे माणिक नगरला ? तर मग आइका. अहो कामधंदे सोडून आम्ही जात नाही तर आम्ही आमच्या प्रभूंसाठी वेळात वेळ काढून जातो, त्यांच्या दर्शनासाठी जातो. मंदिराच्या नऊ पायऱ्या चढत असताना प्रत्येक पायरी चढल्या वरती चांगली आणि वाईट केलेली सर्व कर्म आठवतात आणि डोळे भरून येतात – ते आहे माणिकनगर! आयुष्यातील सगळी दुःख विसरून, घरची, बाहेरची कटकट विसरून दोन दिवस जे सुखाने जगतो ना, जिथं खऱ्या सुख आणि समाधानाचा आभास होतो तेच आहे – माणिकनगर! दर पौर्णिमेला श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराजांची आमृतवाणी त्यांच्या आगदी समोर बसून आईकण्याचे भाग्य मिळते, भक्तिमय वातावरणात राहून जो आनंद मिळतो ते ठिकाण म्हणजे – माणिकनगर! सर्व जाती धर्माची माणस, श्रीमंत असो वा गरीब जिथं एकत्र येतात, भंडारखाण्यात एकत्र महाप्रसाद घेतात ते पुण्य  ठिकाण आहे – माणिकनगर! जिथं सर्व सुख दुःखाची, पाप आणि पुण्यांची बेरीज वजाबाकी करून सुद्धा  शिल्लक काही राहत नसेल आणि तरी सुद्धा काहीतरी मिळणारच ते स्थान म्हणजे – माणिकनगर! मुलांचे शिक्षण, मुला, मुलींची लग्न, नोकरीत बढती, आरोग्याच्या तक्रारी, व्यवसायात वाढ हे सर्व मनासारखं जिथं होत ते ठिकाण म्हणजे – माणिकनगर! जिथे मोठ मोठे योगीपुरुष, नतमस्तक होतात, मोठ मोठी संतपुरुष वेगवेगळ्या रूपाने येऊन जातात. अहंकार जिथं गळून पडतो आणि मग अक्कल ठिकाण्यावरती येते, आपराध केल्याची जिथं जाणीव होते ते स्थान म्हणजे – माणिकनगर!

असं आहे बघा आमच्या श्री माणिक प्रभूंचे माणिकनगर! आणि तुम्ही म्हणता काय मिळत सारखं माणिकनगरला जाऊन? आहो हे सर्व तुम्हाला नाही समजणार कारण तुम्ही तर या संसाराच्या मोह माया पासून सुटूच शकत नाही, मग जो पर्यंत  प्रभूंच्या जवळ जाण्याची बुद्धीचं होणार नाही तो पर्यंत समजणार नाही की काय आहे हे – माणिक नगर!