प्रभुबंधन
लहानपणी मुलांच्या डोकीचे पागोटे किंवा धोतर यांनी प्रभु आपणांस झाडाशी बांधून घेत. खूप आवळून बांधल्यानंतर बघता बघता प्रभू त्यातून निसटून जात. केव्हा केव्हा धोतर प्रभुंच्या कमरेभोवती बांधून, दोन्ही टोकांकडे उभे राहून मुले खूप खेचून ताणून धरत. धोतरास बळकट गाठ मारली जायची पण, प्रभु मात्र जसेच्या तसे मोकळेच असायचे !!!
मामा
एक दिवस दुपारच्या वेळेस प्रभु मामाच्या पलंगावर चादर पांघरून स्वस्थ झोपी गेले होते. मामा बाहेरून घरी आल्यावर मामांनी प्रभुंना उठवून प्रभुंच्या स्वच्छंदी वागण्यावरून त्यांनी प्रभुंना बरेच बोल लावले व तू आत्ताच्या आता माझ्या समोरून चालता हो, असे निर्वाणीचे सांगितले. प्रभुनांही प्रपंचामध्ये फारसा रस नव्हता आणि त्यांना ह्यातून बाहेर पडावयाचेच होते. मामांनी असे बोल लावल्यावर, हीच वेळ योग्य समजून, अत्यंत शांत आणि उल्हासित वृत्तीने प्रभुंनी आपले नेसलेले धोतर तेथेच फाडून, त्याची लंगोटी घातली आणि मामांना नमस्कार करून बाहेरचा रस्ता धरला.
व्यंकम्मा
प्रभुंनी व्यंकम्माचे निस्सीम आणि शुद्ध प्रेम जाणले होते. एकदा प्रभुंनी व्यंकम्माची परीक्षा पाहण्याचे ठरवले. एके समयी स्त्री स्वभावाला अनुसरून व्यंकमा नग्न होऊन स्नान करीत होती. अशावेळी प्रभुंकडून निरोप आला की, “असशील तशी निघून ये!” हा निरोप कानावर पडताच, ती देहभान विसरून तशा स्थितीतच प्रभुंकडे यावयास निघाली. प्रभुंच्या मातोश्रींस हे वर्तमान कळल्याबरोबर त्याही मागोमाग निघाल्या. त्यांनी तिला मध्येच थोपवून धरले. स्त्रियांचे खरे भूषण लज्जा हे होय. हेच एकदा नाहीसे झाले तर स्त्रीत्व कसे राहणार? पण तशाही स्थितीमध्ये व्यंकम्मा प्रभुआज्ञा प्रमाण मानून प्रभुपुढे येऊन उभे राहावयास तयार झाली हे पाहून, ती जवळ येण्याची वाट देखील न पाहता प्रभुंनी आपल्या अंगावरील शुभ्र वस्त्र काढून व्यंकम्माच्या अंगावर घालण्याकरता मातोश्रींकडे पाठवले. त्यावेळी व्यंकम्माचा खरोखर उद्धार झाला.
तुकाराम धनगर
तुकाराम धनगरला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार व्हावा, अशी इच्छा होती. प्रभुंनी त्याला आत्मरूप प्रतीति हा ग्रंथ वाचावयास देवून त्याची पारायणे करावयास सांगितली. कित्येक महिने उलटले, अनेक पारायणे होऊनसुद्धा आत्मरूप प्रतीति येईना म्हणून, एके दिवशी प्रभुसंन्निध येऊन ग्रंथ परत करून तो म्हणाला, “मला यातून काहीही अर्थबोध झाला नाही किंवा स्वस्वरुपाचे ज्ञान झाले नाही.” तेव्हा प्रभुंनी तुकारामाची समजूत काढून भंडारखान्यात जाऊन झोळीचा प्रसाद भक्षण करून येण्यास सांगितले. त्यावेळी त्याने आपल्या अंगावरील घोंगडे त्याने प्रभुंजवळच ठेवले होते. तो निघून गेल्यावर, प्रभुंनी ते घोंगडे आपल्या अंगावर घेतले आणि काही वेळ स्वस्थ बसले. प्रसाद घेऊन परत आल्यावर त्याचे घोंगडे त्याला परत दिले. तुकाराम घोंगडे अंगावर घेऊन बसताच त्याच्या चित्तवृत्तीचा लय लागून त्याला समाधी लागली. आत्मस्वरूप साक्षात्कार म्हणजे काय असतो, याचा प्रत्यक्ष अनुभव त्याला मिळाला. घोंगडे पांघरूण तो आनंदभरात रंगून जाऊन डोलत राहिला.
अत्यंत रसाळ अशा श्रीप्रभु चरित्रातील प्रभुंच्या लीला वाचताना मन आनंदाने वारंवार उचंबळून येते. वरील वर्णिलेल्या चारही कथांतून आपल्याला वस्त्र ही सामायिक वस्तू दिसून येते. वरवर जरी ह्या सहज घडलेल्या प्रभुलीला दिसल्या तरी त्यात जीवनाचे सहज सुंदर सार दडलेले आहे. ही वस्त्रे म्हणजे जणू मायेचे पडदेच. या मा सा माया अर्थात् जी नाही ती माया. एकदा का ह्या मायेचे पडदे हटले की, आपल्याला आपल्या खऱ्या, मूळ स्वरूपाची जाणीव होते.
लहानपणीचे प्रभुंचे खेळ पाहिले, तर प्रभुंचे सवंगडी त्यांना धोतरामध्ये बांधण्याचा आटोकाट प्रयत्न करायचे. पण साक्षात् दत्तावतारी असणाऱ्या ह्या परब्रह्म अवधूताला, ती माया कशी काय बांधू शकणार? मायेच्या पलीकडे असलेले प्रभु, धोतराच्या गाठीत न अडकता, कायम मोकळेच राहिले.
आपल्या मामाकडे असताना प्रभुंना विश्वाच्या कल्याणासाठी कुटुंबाच्या मायेतून बाहेर पडायचे होते. त्यासाठी मामांच्या गादीवर झोपल्यानंतर, मामांनी खरडपट्टी काढण्याचे निमित्त साधून, त्यांनी तत्क्षणी आपले धोतर फाडून त्याची लंगोटीमात्र चिंधी कमरेस गुंडाळली. येथेही कौटुंबिक नात्यांच्या मायेतले धोतररुपी पाश प्रभुंनी तिथल्या तिथे फाडून टाकून दिले.
व्यंकम्माच्या परीक्षेच्यावेळी वस्त्रे बाजूला ठेवून, नग्न होऊन आंघोळ करताना, न्हाणीघरातून असशील तशी निघून ये, ही प्रभुआज्ञा प्रमाण म्हणून धावत तशीच धावत निघाली. त्यावेळेसही जणू आपली अविद्यारूपी वस्त्रे काढून तिने न्हाणीघरातच ठेवली होती. प्रभुंनी धारण केलेले वस्त्र जेव्हा प्रभुंनी व्यंकम्माला लज्जा रक्षणासाठी दिले, त्या वस्त्राच्या केवळ स्पर्शाने व्यंकम्मा निःसंग झाली. तिचे मीपण तत्क्षणी विरले. त्यावेळेस व्यंकम्माचा जणू पुनर्जन्मच झाला. अविद्यारुपी मायेचे पडदे गळून जाऊन, दुरीत पार जळून जाऊन व्यंकम्मा धुतल्या तांदळाप्रमाणे सोज्वळ झाली.
तुकाराम धनगराच्या कथेतही आत्मरूप प्रतीतिची अनेक पारायणे करूनही तुकारामास स्वस्वरुपाचा काही बोध झाला नाही. पण आपले अविद्यारूपी मायेचे घोंगडे प्रभुंकडे देताच प्रभुंच्या केवळ स्पर्शाने पवित्र झालेल्या त्या घोंगडीला परत धारण करताच, तुकारामाची तत्क्षण समाधी लागली. प्रभुंचा केवळ दिव्यस्पर्श झालेल्या वस्त्रांमध्येही किती अद्भुत सामर्थ्य असते, हे या आणि देवी भगवती श्री व्यंकम्माच्या कथेतून दिसून येते. श्रीप्रभु आपल्या मनबुद्धीवर असलेल्या विविध मायारुपी वस्त्रांना फेडून (अज्ञान दूर करून), अवधूत बनवून, आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देण्याची निरंतर संधी आपल्याला उपलब्ध करून देत असतात.
आपल्या संजीवन समाधीच्या वेळीसही प्रभुंनी आपला उत्तराधिकारी निवडताना, आपला पुतण्या अर्थातच श्री मनोहर माणिक प्रभुंना थोड्यावेळ आपल्या मांडीवर बसवले. त्यांच्याकडून पूजा आरती करून घेतली. अवघ्या सात वर्षाच्या बाल मनोहरावर प्रभुंनी आपल्या अंगावरील दुशाला पांघरविला. वयाच्या सातव्या वर्षापासून संजीवन समाधी घेण्याच्या, वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षापर्यंत, श्री मनोहर प्रभुंनी संस्थानाचा कारभार, भव्य अशा श्रीप्रभु मंदिराचे निर्माण करण्यापासून, श्रीप्रभु समाधीची पूजा पद्धती तयार करून, श्री प्रभुंनी स्थापन केलेल्या सकलमत संप्रदायाला मूर्त स्वरूप आणण्यापर्यंत अतिशय कुशलतेने सांभाळला. येथेही आपल्याला प्रभु स्पर्शाच्या वस्त्राच्या दिव्यतेची प्रचितीच दिसून येते.
आजच्या घडीला श्रीप्रभु जरी संजीवन समाधीत निजानंदमग्न असले तरी त्यांचे नामस्मरण, त्यांनी रचलेली पदे, श्रीप्रभुनंतरच्या पीठाचार्यांचे समग्र वाङ्मय, प्रवचने ही आपल्याला त्यांच्या स्पर्शरुपी ज्ञानवस्त्रांतच उपलब्ध आहेत. ह्या दिव्य वस्त्रांचा स्पर्श आपणासही होऊन, आपली आध्यात्मिक उन्नती उत्तरोत्तर होत राहो, आपल्याला स्वस्वरुपाचे ज्ञान होवो, ह्या श्रीप्रभु चरणीच्या आणखी एका नम्र विनंतीसह श्री गुरु माणिक जय गुरु माणिक.
[social_warfare]
Jai Guru Manik
jai guru Manik🙏🙏
Jai Manikprabhu
jai guru Manikz
Jai guru manik 🙏
🙏🙏🙏
jai guru manik
jai guru Manik