“मासानां मार्गशीर्षोऽम्” ही भगवदुक्ति प्रसिद्धच आहे. त्यातही श्रीदत्त जन्मोत्सवाचा सोहळा सदेह माणिकनगरी आणि त्यावर श्री ज्ञानराज माणिकप्रभुंचे पौर्णिमेचे प्रवचन हा त्रिवेणी संगम श्री प्रभुइच्छेने व श्रीप्रभुच्या असीम कृपेनेच ह्यावर्षी घडून आला. तीर्थस्थान, योगदंड पूजन, सकलदेवता निमंत्रण, संगमस्नान, श्री माणिकप्रभु संजीवन समाधी दिवस, गुरुद्वादशी, दक्षिणा दरबार, श्री गुरुपूजन अशा एकापेक्षा एक दैदिप्यमान सोहळ्यांची सफर, ज्ञान आणि भक्ती ही दोन चाके असलेल्या सकलमत संप्रदायाच्या, श्री ज्ञानराज माणिकप्रभु सारथ्य करीत असलेल्या रथावर आरूढ होऊन अनुभवताना, संपूर्ण समाधानाची सुखद अनुभूती होत होती.

श्रीप्रभु जयंतीच्या पूर्वसंध्येला श्री ज्ञानराज माणिकप्रभुंचे पौर्णिमा प्रवचन होते. सायंकाळी पश्चिम क्षितिजावर जरी सूर्य मावळला होता तरी, माणिकनगरात श्री ज्ञानराज प्रभुरुपी सूर्य उगवला होता. आकाशातील चंद्राच्या शितल किरणांबरोबरच, श्री प्रभुगादीवरील विराजित सूर्याच्या ज्ञानरुपी तेजस्वी किरणांनी उपस्थितांची अंत:करणे प्रमुदित होत होती. श्री प्रभुला व गुरुपरंपरेला वंदन करून श्रीजींनी आपल्या प्रवचनास सुरुवात केली. आजचा विषय होता जीव आणि ब्रह्माचे ऐक्य (The Oneness of Jeeva and Brahma). विषयाची यथायोग्य बांधणी हे श्री ज्ञानराज प्रभुंच्या आजवरच्या सर्वच प्रवचनांचे परमविशेष आहे. जसे आपल्याला राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करण्यापूर्वी, आधी आपल्या घरापासून कच्च्या रस्त्यावरून यावे लागते व मग आपण मुख्य महामार्गाला लागतो तद्वतच, एखाद्या समजावयास अत्यंत कठीण असलेल्या विषयाला हात घालताना, श्रीजी त्याची पूर्वपिठीका जनसामान्यांना त्यांना समजेल, रुचेल अशा व्यवहारिक भाषेत सांगतात, जेणेकरून सामान्यांची त्या विषयाप्रती जिज्ञासा जागृत होऊन आणि मूळ विषयाला समग्रपणे ग्रहण करण्यासाठी सामान्यजनांची मानसिकता तयार होते.

ह्याच अनुषंगाने, श्रीजींनी आपल्या प्रवचनाची सुरुवात संसार दुःखमय आहे, ह्या वाक्याने केली. आपल्या प्रत्येकाची अपेक्षा असते की, आपल्याला सतत सुख प्राप्त व्हावे व कधीही दुःख होऊ नये. पण मग प्रश्न असा येतो की, दुःख का होते ? प्रत्यक्ष भगवंताने संसाराला अशाश्वत दुःखालय म्हटलं आहे.‌ तसे पाहता रोजच्या जीवनात आपला ज्याच्याशी (व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, घटना) संबंध येतो, ते सर्व दुःखमय आहे. आपल्या इंद्रियांचा जेव्हा विषयांशी संबंध येतो, तेथे भोग उत्पन्न होतो आणि ह्या भोगांचे निराकरण केवळ भक्तीरुपी वंगणानेच होऊ शकते. आपल्याला कधी दुःख नको असतं आणि अशावेळी आत्यंतिक सुखासाठी शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे, ज्ञान हा एकमेव उपाय आहे. पण मग आपल्याला, हे ज्ञान नेमकं कोणतं? हा प्रश्न पडणं सहाजिकच आहे आणि नेमका हाच धागा पकडून, ते ज्ञान म्हणजेच, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान ह्या पौर्णिमा प्रवचनाच्या विषयाची वीण श्रीजी अत्यंत सहजपणे आणि तितक्याच तरलतेने विणतात. आपला जीव हेच ब्रह्म आहे आणि ह्या ज्ञानामुळेच दुःखाची निवृत्ती होते.‌

आपण स्वतःला जीवात्मा समजतो आणि श्रीप्रभुला परमात्मा समजतो. मग जीवात्मा आणि परमात्मा एक होऊ शकतो का? असा प्रश्न सामान्यांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. त्यावर श्रीजी म्हणतात, आत्मा एक आहे. आत्मा एकची सर्वांतरी हो… श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या या पदातही अगदी हेच वर्णिले आहे. श्रीमद्भगवद्गीतेत आणि श्रुतीतही आत्म्याचे ऐकत्वच प्रतिपादित केले आहे. ही संकल्पना जनसामान्यांत सहजतेने पण खोलवर रुजवतानाच श्रीजी, आत्म्याला मोबाईलच्या नेटवर्कची उपमा देतात. आपण मोबाईलचे नेटवर्क पाहू शकत नाही, त्याचा रंग, रुप, आकार आपल्याला माहित नाही. पण केवळ नेटवर्क दिसत नाही म्हणून ते अस्तित्वात नाही, असे आपण म्हणू शकत नाही. तसेच नेटवर्क हा जरी मोबाईलचा प्रत्यक्ष भाग (पार्ट) नसला तरी, तो मोबाईलला सर्व बाजूंनी व्यापून आहे. प्रत्येकाचे मोबाईल जरी वेगवेगळे असले तरी, असंख्य मोबाईलमध्ये एकच नेटवर्क व्यापून आहे. आपला मोबाईल जरी खराब झाला तरी, नेटवर्कचे काहीही नुकसान होत नाही. त्याचप्रमाणे आत्मा हा मोबाईल नेटवर्कसारखा सर्वव्याप्त आहे. आत्मा जरी उत्पन्न होत नाही, मरत नाही, त्याला रूप, रंग, आकार नाही पण, त्याच्याच सत्तेने सर्व काही चालतं. श्रुतीमध्येही हीच संकल्पना वायू आणि अग्नीचे उदाहरण देऊन समजावली आहे. श्रीजी पुढे म्हणतात, आत्मा जेव्हा व्यष्टीच्या (व्यक्तिगत) स्तरावर प्रकटतो, तेव्हा त्यास जीवात्मा म्हणतात. पण, तोच आत्मा जेव्हा समष्टीच्या (सर्वव्यापी) स्तरावर असतो, तेव्हा त्यास परमात्मा म्हणतात. मूळ आत्म्याच्या जीवात्मा किंवा परमात्मा ह्या उपाधीला जर हटवले, तर उरतो तो केवळ शुद्ध, चैतन्यस्वरूप आत्माच, आणि हेच जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान आहे.

पुन्हा, आता हे ज्ञान मग कुठे मिळते? असा आणखी एक प्रश्न सामान्यांना नक्कीच पडणार हे गृहीत धरूनच श्रीजी म्हणतात की, असे ज्ञान श्रोत्रीय आणि ब्रह्मनिष्ठ गुरुकडेच मिळते. पण हे ज्ञान प्राप्त करून घेण्याचे नेमके साधन कोणते? हे समजवताना श्रीजी म्हणतात की, ज्ञानी गुरूकडे जाऊन श्रवण, मनन आणि निदिध्यासन केल्यामुळे, हे आत्मज्ञान प्राप्त होते.

श्रवण म्हणजे केवळ ऐकणे नव्हे. विटांचे घर केवळ विटा अंगणात येऊन पडल्यामुळे जसे बांधले जात नाही, घर बांधण्यासाठी एका गवंड्याची आवश्यकता असते, तसेच केवळ ऐकण्याला श्रवण म्हणता येत नाही. एखाद्या क्षोत्रिय व ब्रह्मनिष्ठ श्रीगुरुला शरण जाऊन, दीर्घकाळ त्यांच्या सेवेत राहून, शास्त्रांचे सम्यक ज्ञान प्राप्त करणे म्हणजेच श्रवण होय.श्रवण करताना मनामध्ये अनेक प्रश्न उठणे स्वाभाविक आहे. अशा प्रश्नांची यादी करणे अनिवार्य आहे. शास्त्रांमध्येही ज्ञान एकदम दिले जात नाही. जसे एक एक पायरी चढून आपण शेवटी गुरुशिखरावर पोहोचतो,  तद्वतच शास्त्रांच्या विविध पैलूंचा यथावकाश अभ्यास करणे म्हणजेच श्रवण होय.

श्रवणानंतर पडलेल्या प्रश्नांचे बुद्धी, तर्क, शास्त्र व गुरुपदेशाद्वारा सम्यक निराकरण करणे म्हणजेच मनन होय. मननाने आता बुद्धी नि:संशय झाली. बुद्धीला, मीच ब्रह्म आहे, हे आता पटले. पण जोपर्यंत आपले मन, मी ब्रह्म आहे, असे मानत नाही, तोपर्यंत सारे व्यर्थ आहे. आपल्या बुद्धीला पटलेले, मनानेही सर्वार्थाने स्वीकारणे यालाच निदिध्यासन म्हणतात आणि हे  केवळ नित्य सरावानेच शक्य आहे. श्रवण आणि मननामध्ये श्री गुरु साहाय्य करतो पण निदिध्यासन मात्र आपल्याला एकट्यानेच करावे लागते. हे सांगताना श्रीजी सायकल चालवण्याचे उदाहरण देतात. सायकल चालवायला शिकवताना जसे आपले काका किंवा मामा सुरुवातीला हात देतात पण, नंतर मात्र ते आपल्याला एकट्याला सोडून देतात. हळूहळू आपण एकट्याने सायकल चालवायला शिकतो.

प्रवचनाच्या पुढच्या टप्प्यावर श्रीजी जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचे लाभ कोणते? हेही सांगतात. ते लाभ म्हणजेच जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती.

जीवन मुक्ती म्हणजेच जिवंत असतानाच ह्या शरीरात मुक्तीचा किंवा मोक्षाचा आनंद अनुभवणे. केवळ अद्वैत सिद्धांतच आपल्याला जीवन मुक्तीचा अनुभव करून देतो. श्रीजी पुढे जीवनमुक्ताची लक्षणेही फोड करून सांगतात. स्वतंत्रता (मी, माझ्या सुखासाठी इतर कोणावरही अवलंबून नाही), पूर्णता (कोणत्याही घटनेचा, वस्तूचा, व्यक्तीचा अथवा परिस्थितीचा अभाव असूनही तो जाणवत नाही, कारण जीव आणि ब्रह्म ऐक्याचे ज्ञान त्याला झालेले असते. परमात्मा पूर्ण आहे आणि त्याच्याशी जर ऐक्य झाले तर मग अपूर्णत्व कुठून राहणार?) आणि समत्व (सर्व परिस्थितीत सम राहणे. बुद्धी, मन, प्राण, इंद्रिय, देह, श्वास, परिस्थिती, मानपमान, जय पराजय आणि नफातोटा समत्वपणे पाहणे) ही जीवन मुक्ताची तीन लक्षणे आहेत. सामान्यजनांत असलेली अस्वतंत्रता, अपूर्णता आणि असमत्व हेच त्यांच्या दुःखाचे कारण असते.

त्याच्याही पुढे जाऊन मृत्यूनंतर जीवनमुक्तांचे काय होते? याचा उहापोहसुद्धा श्रीजी आपल्या प्रवचनात करतात. श्रीजी म्हणतात, असा जीवनमुक्त विदेहमुक्तीस प्राप्त होतो. म्हणजेच, मृत्यूनंतर त्याचा पुनर्जन्म होत नाही. तो श्रीप्रभुस्वरूपात लीन होतो. कारण त्याची सर्व कर्मे नष्ट होतात. खरे तर, आपण आपल्या कर्मांमुळेच जन्म होतो. मग ज्ञानी जीवांचे कर्म नष्ट कसे होतात? तर ज्ञानी भोगाद्वारे आपले प्रारब्ध कर्म नष्ट करतो. आपल्या उपासनेने, आपल्या भक्तीने, भविष्यातील कर्मे नष्ट करतो, तसेच ज्ञानाने संचित कर्मे नष्ट करतो. जसे भाजलेले बी अंकुरित होत नाही त्याचप्रमाणे, जीवनमुक्त पुनर्जन्म घेत नाही. ह्यालाच विदेह मुक्ती म्हणतात.

श्री माणिकप्रभुंचे अथवा सकलमत संप्रदायाचे समग्र वाङ्मय, पदे ह्या जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाच्या प्रसारासाठीच आहेत. आपण स्वतःला श्री प्रभुपेक्षा यत्किंचितही वेगळे मानले तर तेच दुःखाचे अथवा भयाचे कारण होते. आणि म्हणूनच श्रीजी ठामपणे सांगतात की, द्वैतामध्ये दुःख आहे अद्वैतात आनंद आहे. ऐक्यत्वात आनंद आहे. श्रीदत्त जयंतीच्या ह्या परममंगल पर्वामध्ये श्रीजी म्हणतात की, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच श्री माणिकप्रभुंचा अवतार आहे आणि हा बोध ग्रहण करण्यासाठीच श्रीदत्त जयंतीचा महोत्सव आहे. या श्रीदत्त जयंती सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचा लाभ काय? तर श्रीजी म्हणतात की, ज्ञानामृतं भोजनम्. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा हा प्रसाद अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा प्रसाद आपल्याला श्रीप्रभुकृपेने पोटभर लाभो, तसेच सर्वांमध्ये जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानासंबंधी आवड आणि श्रद्धा उत्पन्न होऊन, त्यासाठी श्रवण, मनन आणि निदिध्यासनरुपी प्रयत्न करून त्याचे कृपाफळ म्हणून आपणांस जीवनमुक्ती आणि अंती विदेहमुक्ती प्राप्त होवो, अशी श्रीप्रभुचरणी विनम्र प्रार्थना करून आणि तसाच आशीर्वाद श्रीजींनी सर्वांना दिला.‌

श्रीजींच्या प्रवचनानंतर लगेचच, माणिकनगरच्याच नृत्यालयातील बालकलाकारांनी भरतनाट्यमचा नितांत सुंदर नृत्याविष्कार सादर केला. श्रीजींनी आपल्या प्रवचनात जीवनमुक्तांची स्वतंत्रता, पूर्णता आणि समत्व ही तीन लक्षणे सांगितली होती, ज्याच्या फलस्वरूप जीवनमुक्तांना नित्य आनंदाची प्राप्ती होत असते. भरतनाट्यममध्ये सादर केलेल्या नृत्याविष्कारामध्ये सहभागी कलाकारांना त्यांच्या शिक्षिकेने नृत्य करण्यास पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. नियमित सरावामुळे त्यांचे नृत्य पूर्णत्वास गेले होते. प्रज्वलित केलेले दिवे हातांच्या तळव्यावर, डोक्यावर ठेवून तसेच, आपल्या संपूर्ण शरीराचा भार खाली असलेल्या ताटलीच्या (परातीच्या) कडेवर ठेवून त्या कलाकारांनी संपूर्ण नृत्यामध्ये आपल्या शरीराचा समतोलही उत्तमप्रकारे साधला होता. अत्यंत सुहास्य वदनाने आणि सफाईदारपणे त्यांनी आपले नृत्य सादर केले. श्रीजींनी आपल्या प्रवचनात सांगितलेली जीवनमुक्तांची तिन्ही लक्षणे त्याचवेळी आम्हाला त्या नृत्याविष्कारातही दिसली आणि त्याचे फलस्वरूप उपस्थित सर्वांना अतिशय आनंद झाला. प्रवचनात सांगितलेल्या ज्ञानाचे प्रतिबिंब नृत्याविष्कारात लगेचच उमटल्यामुळे, ते तत्वज्ञान परिणामकपणे मनात खोलवर रुजण्यास, आपोआपच मदत झाली. हा बोध ग्रहण करण्याची ही सर्व त्या श्रीप्रभुचीच योजना आहे असे समजून श्रीप्रभुकडे कृतज्ञता व्यक्त केली आणि भंडारखान्यात असलेल्या श्री प्रभुच्या प्रसादाचे, आमच्या शरीरातील अन्नमय कोषाशी ऐक्य साधून, आनंदाची ती अनुभूती घेण्यासाठी आमची पावले आपोआपच भंडारखान्याकडे वळाली…

[social_warfare]