भेट माझ्या माणिकाची

भाग पहिला

एप्रिल २०२० ला लॉकडाऊन झाल्यानंतर व्हाटस्ॲपवर ‘गिरनारीके ध्वजाधारी। दीनानाथ पत राखो हमारी।।’ हा गजर आला. मनास भावला म्हणून तो माझे सोलापुरचे परममित्र श्री प्रेमदादा ह्यांना पाठवला, त्यांनी हा आवाज श्रीआनंदराज माणिकप्रभूंचा असल्याचे सांगीतले. फेसबुकवर, YouTube वर Manik Prabhu टाकल्यावर श्रीआनंदराज प्रभुमहाराजांच्या अवीट गोडीच्या आरत्या, पदे, स्तोत्रांचा अमूल्य ठेवा गवसला. विद्यमान पीठाधीश श्रीज्ञानराज माणिकप्रभूंचे गीता विवेचन व पौर्णिमा पर्वांचे व्हिडीयो ऐकले. श्रीचैतन्यराजप्रभूंच्या धीरगंभीर, खड्या आवाजातील स्तोत्रे, अष्टके ऐकली. श्रीमाणिकप्रभूंची ही अद्वितीय अशी पदे अभ्यासताना श्रीप्रभूंबद्दल एक अनामिक गोडी लागली. यथावकाश संस्थानाशी संबंधित श्रीप्रभुभक्तांचा परिचय झाला व त्यातून पुढे श्रीज्ञानराजप्रभूंच्या परिवाराशी स्नेह जुळला. श्रीप्रभुचरित्र गद्य व ओवीबद्ध मिळवून झरझर वाचून काढले. अंतरात प्रभूंबद्दलची ओढ, प्रेम दिवसेंदिवस दृढ होत होती. श्रीप्रभूंच्या बाललीला श्रीप्रभूंनीच माझ्यासारख्या अज्ञानी बालकाकडून ओवीबद्ध करून घेतल्या. श्रीमनोहर प्रभूंचे पूर्ण जीवनचरित्रही ओवीबद्ध करवून घेतले पण, प्रत्यक्ष श्रीमाणिकनगरी जाण्याचा योग काही येत नव्हता. प्रभुभेटीसाठी मन आक्रंदत होते. २०२१ च्या मार्चमध्ये माणिकनगरी जाण्याचे ठरविले पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ते रहीत करावे लागले, जून मध्ये मी स्वतःच पॉझीटिव्ह झालो. हो ना करता व्हॅक्सिनचा दुसरा डोस झाल्यावर २०. १०.२०२१ ला बुधवारी कोईम्बतूर गाडीचे आरक्षण केले. जायचे यायचे आरक्षण झाले होते. पण निघायच्या दोन दिवस आधी रेल्वेकडून संदेश आला की, कोईम्बतूर गाडी कोंकणरेल्वे मार्गावरून वळवली आहे. तसदीबद्ल क्षमस्व. दुसऱ्या गाडींच्या आरक्षणाबाबत तपासले असता इतर कोणत्याही गाड्यांमध्ये आरक्षण नव्हते. शेवटी चेन्नई एक्सप्रेसचे तीन वेटिंग असलेले आरक्षण केले. संध्याकाळपर्यंत तीनवरून दोनवर नंबर आला. पण त्यानंतर, प्रवासाच्या दिवसापर्यंत दोनच वेटिंग राहिले. संध्याकाळी सातची गाडी होती. आरक्षण न झाल्याने खट्टू झालो. काहीच तयारी नव्हती. दुपारी तीन वाजता महाराजांपुढे बसलो, त्यांना निवेदन दिलं की दोन वर्षांपासून तुम्हाला भेटायचे ठरवतोय, तुम्हाला मला भेट द्यावीशी वाटत नाही का? मला यायची जबरदस्त इच्छा आहे, बाकी काय ते आपण पाहावे. त्यावेळी श्रीसकलमत संप्रदायाच्या उपदेशरत्नमालेतील एक ओळ उच्चारली, हे प्रभु, जी भक्तप्रतिज्ञा असते तीच श्रीगुरूंची आज्ञा असते. मला आपल्या द्वारी यायचे आहे. बाकी आपण काय ते जाणोत… सव्वातीनला रेल्वेकडून आरक्षण निश्चितीचा संदेश आला. पुढच्या अर्ध्या तासात, पावणेचारला सामान बांधून मी तयार सुद्धा झालो. प्रभुभेटीची तळमळ इतकी दृढ होती की केवळ तीन चपात्या आणि गुळाचा खडा घेऊन प्रफुल्लित अवस्थेत साडेपाचला ठाणे स्थानकाकडे धूम ठोकली.

सव्वासातला गाडीत बसलो. श्रीप्रभुदर्शनास उतावीळ मन श्रीप्रभूंच्या आठवणीने, लीला अनुभवत, सतत उचंबळून येत होते. रात्रभर डोळा लागला नाही. पहाटे चार वाजता कुलबुर्गीला उतरलो. रिक्षाने बस स्टॅन्ड गाठला. मोडक्यातोडक्या कन्नड भाषेत हुमणाबाद बसची चौकशी केली. हुमणाबादमार्गे हैद्राबादला जाणारी बस तयारच होती. खिडकीत बसून पहाटेचा गारवा अनुभवत होतो. प्रवासात शरीर जरी बसमध्ये होता तरी, मन मात्र कधीच माणिकनगरात पोहोचले होते. साधारणतः साडेसहाला हुमणाबादला पोहोचलो. रिक्षा पकडून अगदी पाच-दहा मिनीटांतच माणिक विहार गाठले. योगायोगाने मुंबईचे प्रभुभक्त श्री प्रकाश मामा पाठारे समोरच उभे होते. त्यांनीच सकाळच्या गुलाबी थंडीत गरमागरम चहा पाजला. मी येथे येण्याचे अगोदरच कळविल्याने, श्री चिद्घन प्रभुजी ह्यांनी श्रीमार्तंडविलास ह्या भक्तनिवासमध्ये उतरण्याची सोय केली होती. अगदी वीस मिनिटांतच स्नानादी कर्मे आटोपून पाचशे मीटर अंतरावरील श्रीप्रभुमंदिराकडे धाव घेतली.

श्रीप्रभुमंदिर ते राहण्याची जागा हे अवघे पाच मिनिटांचे अंतर. सुर्यदेवता आपल्या कोवळ्या किरणांचा आशीर्वाद सृष्टीस मुक्तहस्ते देत होते. वातावरण आल्हाददायक होते. मधूनच मोरांचा केकारव ऐकू येत होता. वानरराज झाडांवर उड्या मारत होते. गुरुगंगा विरजा नदीवरील पुलावरून जाताना पाण्यात दोन डौलदार बदके मुक्तपणे विहार करीत होती. मंद पण गार वारा मनास प्रसन्न करीत होता. श्रीमाणिकप्रभूंच्या पादस्पर्शाने पुनीत झालेल्या श्रीमाणिकनगरीतले चैतन्य पदोपदी अनुभवीत होतो. श्रीप्रभूंचे गुणगान करीत श्रीप्रभुमंदिराच्या महाद्वारी पोहोचलो. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या कालाग्निरुद्र हनुमानाला नमस्कार केला. दयाघन प्रभुही जणू आतुरतेने माझी वाट पाहत होता. महाद्वारातून आत येताच श्रीप्रभुमंदिराचे विशाल प्रांगण नजरेस पडले, दोन्ही बाजूस बकुळ फुलांचे हिरवेगार, डेरेदार वृक्ष मन वेधून घेत होते.

मुख्य मंदिरात जाण्याआधी दरवाज्यावरील जय जय हो, सकलमता विजय हो ही पाटी लक्ष वेधून घेत होती. दरवाजा ओलांडल्यावर आत येताच दत्ताची गादी व त्यापुढील श्रीमाणिकप्रभूंची संजीवन समाधीचे दर्शन घडले. काळ्या दगडांचा भव्य मंडप व त्यात असलेले भव्य झुंबर मन वेधून घेत होते. पुढे कमानीवर असलेले श्रीमाणिकप्रभू, श्रीमनोहर माणिकप्रभू, श्रीमार्तंड माणिकप्रभू, श्रीशंकर माणिक प्रभू व श्रीसिद्धराज माणिकप्रभू ह्यांचे फोटो मनाचा ठाव घेत होते. कमान ओलांडताच असलेल्या कासवाचे दर्शन घेऊन मुख्य गाभाऱ्याच्या दरवाज्यातून श्रीप्रभुसमाधीचे दर्शन घेतले. येथे मनाचा बांध फुटला अन् डोळ्यावाटे अश्रुधारा वाहू लागल्या. श्रीमाणिकप्रभु चरित्र वाचताना श्रीप्रभु किती दयाळू, मृदू, कनवाळू, भक्तवत्सल होते ते आठवून अश्रूंच्या धारा वाहतच राहिल्या, कितीतरी वेळ. ज्या स्थानाच्या भेटीची इतके दिवस वाट पाहिली, त्या चैतन्यासमोर मी उभा होतो. डोळे तृप्त होईस्तोवर श्रीप्रभुसमाधीचे दर्शन घेतले. ब्रह्मवृंद श्रीप्रभुसमाधीस मंगल स्नान घालत होते. सुवासिनी हातात आरतीचे तबक घेऊन उभ्या होत्या, सेवेकरी साफसफाईत गुंतले होते. घरून नेलेल्या तुळशी, श्रीफळ, दुर्वा, बिल्वपत्रे श्रीप्रभूस मनोभावे अर्पण केली. पुढे जाऊन मंदिर परीसरातील श्रीसर्वेश्वर महादेवाचे, औंदुंबर वृक्ष व त्याखालील अखंडेश्वराचे, दत्तमूर्ती, श्री माणिकप्रभूंचा लाडका कुत्रा भरोसाचे स्मारक, श्रीमनोहर माणिकप्रभूंची समाधी, योगदंडाचे कक्ष, मुख्य प्राण मारुतीचे दर्शन घेतले. श्रीप्रभुमंदिराचा सोन्याचा कळस सकाळच्या कोवळ्या उन्हात अधिकच झळाळत होता. जणू श्रीमाणिकप्रभु संस्थानाच्या, सकलमत संप्रदायाच्या झळाळत्या इतिहासाची साक्ष देत होता. क्रमशः …

श्रीमाणिक नाम महिमा

गारगोटीस घासता गारगोसी ।

अग्नी प्रज्वलीत घर्षणेसी ।

मन घासता नामासी ।

आत्मज्योत तैसेचि ॥१॥

 

दगडासी घासीता पात ।

धारदार तेजपुंज होत ।

मन नामावर घासत ।

विकेकजागृती तेसेचि ॥२॥

 

सहाणेवर चंदन उगाळिता ।

सुगंधित करी आसमंता ।

नामसहाणेवर मन रगडिता ।

व्यक्तिमत्व तैसेचि ॥३॥

 

सेविता साखरमिश्रित क्षीर ।

लागे जिव्हेस अतिमधूर ।

प्रभुनाम घेता निरंतर ।

वाणीही तैसेचि ॥४॥

 

असता नित्य गुरूसान्निध्यात ।

ज्ञान जगण्याचे मिळत ।

होता एकांती नामरत ।

आत्मज्ञान तैसेचि ॥५॥

 

लवण भोजनाचे सार ।

प्रभुवर विश्वाचा भार ।

मानवी जीवनास आधार ।

नाम तैसेचि ॥६॥

श्री मनोहर माणिकप्रभु

दत्तावतारी श्रीमाणिकप्रभुंच्या दैदीप्यमान कारकर्दीनंतर, सकलमतसंप्रदायाचा उत्तराधिकारी कोण? असा जेव्हा प्रश्न होता तेव्हा तो अधिकार  श्रीमाणिकप्रभुंचे कनिष्ठ बंधू, श्रीनृसिंहतात्यांचे जेष्ठ पुत्र मनोहर ह्यांस मिळाला. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी पीठारोहण झालेल्या श्री मनोहरमाणिक प्रभुंची योग्यता श्रीमाणिकप्रभु ओळखून होते. त्यामुळेच की काय, श्रीप्रभुंनी आपल्या संजीवन समाधीआधी बालमनोहरास आपल्या अंगावरील दुशाला पांघरविला व प्रसादाची माळ गळ्यात घालून मंत्रोपदेश देऊन, महाप्रसाद दिला. सात वर्षाच्या कोमल वयाच्या बालकावर संस्थानाची व सकलमत संप्रदायाची  प्रचंड जबाबदारी टाकून श्रीमाणिकप्रभु दृष्टीआड झाले हेच ह्यातील मर्म आहे हे जाणकारांनी ओळखावे. श्रीमनोहर माणिक प्रभुंना लोक अप्पासाहेबही म्हणत.

उपनयनानंतर थोड्याच अवधीत ते वेद, शास्त्र आणि संस्कृत भाषेत पारंगत झाले. आजचे जे भव्य असे प्रभुमंदिर डौलाने उभे आहे ते श्रीमनोहरप्रभुंनीच आपल्या कार्यकाळात संतरामदादा गवंड्याच्या मार्फत पूर्णत्वास नेले. श्रीप्रभुंच्या पूजा पद्धतीचे विधान, अनेक श्लोक, स्तोत्रे, पदे अप्पासाहेबांनी रचली. त्यांच्या पदांतून प्रभुभक्ती व प्रभुविरह प्रकर्षाने जाणवतो. आपल्या लहान भावाचे लग्न लाऊन त्यांना आपला उत्तराधिकारी नेमले. अप्पासाहेबांनी अनेकांचा उद्धार केला. सतत प्रभुनामात दंग असलेल्या श्रीमनोहर माणिकप्रभुंनी वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली.

आपल्या कारकिर्दीत ब्रह्मचर्यव्रताचे पालन करणा-या, सकलमताचा झेंडा अत्यंत सन्मानाने, डौलाने फडकवत ठेवणा-या, ह्या तेजस्वी, मनोहर बालकाकडे मन आकर्षित होणार नाही असे होऊच शकत नाही. माझ्यासह अगणित भक्तांचे मनाचे हरण करणा-या अशा ह्या सुंदर, मनोहर,लडिवाळ आणि तेजपुंज महायोग्यास साष्टांग दंडवत… श्री मनोहर माणिकप्रभुंच्या अवतारकार्याचा आढावा आपण श्रीप्रभुमनोहराख्यानातून घेणार आहोत. श्रीसकलमत संप्रदायमाळेतील ह्या दुस-या रत्नाची गोडी आपणांसही लागो व ती वृद्धींगत होवो ह्या श्रीप्रभुचरणीच्या लडीवाळ विनंतीसह जय गुरू माणिक, श्रीगुरू माणिक

 

॥श्रीमाणिकप्रभुचरणार्पणमस्तु॥

श्रीप्रभुमनोहराख्यान…१

श्रीमाणिकप्रभुंचा लहान भ्राता ।

नृसिंहतात्या नामे विख्याता ।

विठाबाई पत्नी पतीव्रता ।

तात्या महाराजांची ॥१॥

नाईक घराण्याची वंशवेल ।

नृसिंहतात्याच आता फुलवेल ।

दत्तप्रसाद लवकरच भेटेल ।

आशिर्वचन श्रीमाणिकाचे ॥२॥

होते कालयुक्ति नाम सवंत्सर ।

श्रावण अमावास्या दिवस थोर ।

पुलकित झाले माणिक नगर ।

नांदी कार्यकारणाची ॥३॥

श्रावणमास उत्सवाचा अंतिम दिवस ।

कृष्णमेघांनी व्यापिले सकल आकाश ।

सूर्यदेवही व्याकुळ दर्शन घेण्यास ।

महायोगी बालकाचे ॥४॥

नऊमास पूर्ण झाले गर्भधारणास ।

परी न दिसे प्रसूतीचे काही चिन्हास ।

काळजी अत्यंत लागली विठाम्मास ।

प्रभुधावा करितसे ॥५॥

सकळजन चिंता करिती ।

श्रीमाणिकसी येऊनि विनविती ।

होऊदे विठाम्माची प्रसुती ।

निर्विघ्नपणे प्रभुराया ॥६॥

कनवाळू श्रीमाणिक कृपाघन ।

आला विठाम्मापाशी धावून ।

विठाम्मा विव्हळे कळवळून ।

कृपादृष्टी अवलोकी ॥७॥

गर्भस्थ शिशूस संबोधून ।

श्रीमाणिक बोले प्रेमवचन ।

मातेसी ऐसे छळण ।

योग्य नव्हे ॥८॥

जन्म घेणे आपणांसी क्रमप्राप्त ।

रहाल सदैव संसार बंधमुक्त ।

माणिक वचनी होऊनी आश्वस्त ।

प्रकटावे  शीघ्रातीशीघ्र ॥९॥

ऐकोनी श्रीमाणिकप्रभुची विनंती ।

पुढील अवतारकार्याची निश्चिती ।

माणिकवचने मिटली भ्रांती ।

नवजात अर्भकाची ॥१०॥

विठाम्माउदरी अत्रि अंश आला ।

मनोहर नामे श्रीगुरू अवतरला ।

वाढवील जो ब्रह्मचर्य व्रताला ।

आधारभूत होऊनिया ॥११॥

मुखमंडलाची प्रभा ऐसी ।

फाकली दहाही दिशी ।

बैलपोळ्याचा सणही त्यादिवशी ।

हर्षोल्हास चोहीकडे ॥१२॥

बैल आपापले सजवून ।

येती माणिकदर्शना घेऊन ।

सवाद्ये होतसे बैलपूजन ।

अवघा आनंदसोहळा ॥१३॥

पंचक्रोशीतील आले समस्त जन ।

प्रभुसहित घेती बालकाचे दर्शन ।

टाकीले मन सर्वांचे मोहून ।

मनोहर नाम यथार्थ ॥१४॥

नाम ठेविले मनोहर ।

जाणा तोचि विधीहरीहर ।

जग तारावया भूमिवर ।

मनोहररूपे अवतरला ॥१५॥

श्रीमाणिकप्रभुचरणार्पणमस्तु…

 

श्रीप्रभुमनोहराख्यान…२

ऐसा अवतार मनोहर ।

सकलमताचा पुढील धरोहर ।

माणिकप्रभु जाणती खरोखर ।

आपुल्या अंतरात ॥१॥

हा जरी अल्पायुषी होईल ।

सवाई माणिकप्रभु म्हणवून घेईल ।

सर्वश्रुत माणिक प्रभुंचे बोल ।

सहज जे निघाले ॥२॥

एकदा काय नवल घडले ।

प्रभु गादीवरी अप्पासाहेब बैसले ।

पाच वर्षाचे बालक सानुले ।

प्रभु दरबारामाजी ॥३॥

करती प्रभु बैठकीचे अनुकरण ।

तैसेच गंभीर स्वरूप धारण ।

समस्त करिती मनोहराचे अवलोकन ।

प्रभु पातले तत्क्षणी ॥४॥

बाळ मनोहरासी पाहुनी ।

बैसला गादीसी बळकावूनी ।

बोलती तयासी हांसूनि ।

कृपानिधी प्रभुमहाराज ॥५॥

माझी गादी तुला हवी का रे ।

आता मी काय सांगतो ऐक रे ।

गादीवर बैसता दागिने सारे ।

दान करणे दुस-यासी ॥६॥

अप्पासाहेब प्रभुसी वदती सत्वर ।

सांगेन त्यासी देण्यास तयार ।

दागिने सगळे काढून भरभर ।

ठेविले प्रभुपुढे ॥७॥

पाहुनि वैराग्याची मूर्तीमंत मूर्ती ।

माणिक प्रभु मनोमन संतोषती ।

लहानशी गादी मांडून बैसविती ।

शेजारी बालमनोहरास ॥८॥

वैराग्याची महाकठीण स्थिती ।

कृतीतून सहज दाखविती ।

दातृत्वाची तीच माणिकवृत्ती ।

मनोहराठायी उपजली ॥९॥

श्रीमाणिकप्रभुचरणार्पणमस्तु…

 

श्रीप्रभुमनोहराख्यान…३

प्रभुसमाधी समय जवळ येता ।

भक्तांस लागली उत्तराधिका-याची  चिंता ।

कोण संभाळील प्रभुगादीस आता ।

खलबते नानाविध ॥१॥

जरी तात्यासाहेबांचे पुत्र दोन ।

परी होते लहान आणी अज्ञान ।

एकाचे वय सात एकाचे तीन ।

सर्वार्थे अयोग्य म्हणती ॥२॥

भालकीस होता एक युवक ।

मच्छिंद्रराव नामे प्रभुंचा सेवक ।

प्रभुगादी चालविण्यांस तोच लायक ।

धारणा अनेकांची ॥३॥

बालपणापासून होता लाडका प्रभुंचा ।

प्रभुंचाही व्यवहार अत्यंत प्रेमाचा ।

करतील विचार प्रभु मच्छिंद्ररावाचा ।

गादीवर बैसविण्यास ॥४॥

उतावीळ होती भक्तजन ।

मच्छिंद्ररावास मेण्यात बैसवून ।

घेऊन येती भालकीहून ।

सवाद्ये मिरवणूक ॥५॥

भक्तांनी आणली एक गादी ।

प्रभुंच्या उत्तराधिकाराची जी नांदी ।

गादीवर बैसविले प्रभु संन्निधी ।

मच्छिंद्ररावास ॥६॥

त्याच रात्रीस लीला घडली ।

मच्छिंद्ररावाची गादी खाक झाली ।

ज्या प्रभुगादीची स्वप्न पाहिली ।

नव्हती नशीबात ॥७॥

काहीच झाले नाही समजून ।

भक्त करिती प्रयत्न परतून ।

प्रभु मच्छिंद्ररावास मांडीवर बैसवून ।

कधी घेतील ॥८॥

ऐसी उत्कंठा शिगेस पोहोचत ।

वदंता उठली प्रभु दरबारात ।

चाळीस हजाराचे कर्ज असत ।

प्रभुमहाराजांवरी ॥९॥

जो कोणी उत्तराधिकारी होईल ।

तोच ह्या कर्जासी चुकविल ।

फकिरी संस्थान, कैसे होईल ।

मच्छिंद्रराव विवंचनेत ॥१०॥

मानाची जरी गादी घ्यावी ।

कर्जाची धोंड गळी पडावी ।

पेक्षा आपली भालकी गाठावी ।

हेच बरे ॥११॥

एकादशीस जेव्हा समाधीत बैसती ।

मच्छिंद्ररावास प्रभु सांगावा धाडती ।

भालकीस पळून गेल्याचे सांगती ।

शिष्य प्रभुमहाराजांस ॥१२॥

प्रभुगादी चालविणे सोपे नाही ।

योग्य अधिकाराविणा शक्य नाही ।

ये-यागबाळ्यास हे झेपणे नाही ।

म्हणे प्रभुमाणिक ॥१३॥

श्रीमाणिकप्रभुचरणार्पणमस्तु…

 

श्रीप्रभुमनोहराख्यान…४

मार्गशीर्ष एकादशीचा पुण्य दिवस ।

निश्चित केला संजीवन समाधीस ।

नृसिंह तात्यांच्या उभय पुत्रांस ।

बोलाविणे धाडिले ॥१॥

येता उभयतां मांडीवर बैसविले ।

क्षण दोन त्यांसवे  घालविले ।

आरती पुजापाठ विधीवत करविले ।

सप्रेमे माणिकप्रभुने ॥२॥

मनोहरास पांघरविला अंगावरील दुशाला ।

प्रसादरूपी घातली गळ्यात माळा ।

मंत्रोपदेश देऊनि प्रसाद दिधला ।

लहानग्या मनोहरास ॥३॥

असला वयाने लहान जरी ।

बालमनोहर हाच माझा उत्तराधिकारी ।

दत्तगादीची सेवा करील परोपरी ।

प्रभु वदे अंतिमक्षणी ॥४॥

अवघ्या सातव्या वयात पीठारोहण ।

मनोहराच्या सामर्थ्याची प्रभुंस जाण ।

आपल्या पाठीमागे संस्थानाचे मोठेपण ।

वाढविल निश्चित ॥५॥

चालविल सकलमत संप्रदाय परंपरा ।

म्हणतील सवाई माणिकप्रभु दुसरा ।

मनोहरावर ठेऊनि भार सारा ।

प्रभु जाहले समाधिस्त ॥६॥

श्रीमाणिकप्रभुचरणार्पणमस्तु…

 

श्रीप्रभुमनोहराख्यान…५

बालमनोहरावर ठेऊनि सारी भीस्त ।

श्रीप्रभु झाले संजीवन समाधिस्त ।

कैसी लागेल प्रभुदरबारास शिस्त ।

चिंता समस्तांसी ॥१॥

प्रभुसमाधीनंतर पहिलाच दरबार ।

लोटला भक्तजनांचा सागर ।

प्रभुसिंहासनावर बालमूर्ती मनोहर ।

सुहास्य वदनी ॥२॥

दृष्टी समस्तांची मनोहर मुखमंडलावर ।

म्हणती श्रीमाणिक बालमूर्ती खरोखर  ।

जो तो आपापल्या वृत्तीनुसार ।

प्रभुसी पाहे मनोहरात ॥३॥

गादीवर बैसता कर्जाची हकीकत ।

कर्तव्यदक्ष मनोहरप्रभु जेव्हा जाणत ।

यादी बनविण्याचे फर्मान काढत ।

कोणाचे किती देणे ॥४॥

अप्पासाहेब सांगती बाप्पाचार्यांस ।

निरोप धाडणे देणेक-यांस ।

पत्रे पाठवूनी येण्यास ।

सत्वर सांगितले ॥५॥

एकेक करोनि जमले सावकार ।

प्रमुख त्यात गोसावी किसनगीर ।

देणे त्याचे दहा हजार ।

श्रीप्रभुंचे होते ॥६॥

हिशोब कर्जाचा किसनगीरासी विचारता ।

सविनय बोले तो तत्वता ।

प्रभुंना कर्ज देण्याची योग्यता ।

सर्वार्थे नाही माझी ॥७॥

प्रभुकृपेनेच लक्षावधी नफा जाहला ।

परी दानधर्म नाही काही घडला ।

दहा हजार देता श्रीप्रभुला ।

दानधर्म अनायसे ॥८॥

ते नव्हतेच कधी ऋण ।

परतफेडीचा नाही काही प्रश्न ।

मनीचे सारे द्वंद्व काढून ।

निश्चिंत व्हावे ॥९॥

ऐकोनि किसनगीरचे मृदुवचन ।

अप्पासाहेब संतोषले मनोमन ।

किसनगीरास देऊनि पुढारीपण ।

तडजोड करावया इतरांसी ॥१०॥

किसनगीर अत्यंत हजरजबाब ।

देयराशी निश्चिती ताबडतोब ।

मांडूनि यथायोग्य हिशोब ।

अप्पासाहेबांपुढे ठेविती ॥११॥

पाहुनि एवढ्या मोठ्या रकमेस ।

जनांची उत्सुकता पोहोचली शिगेस ।

अप्पासाहेब शांत त्या ही समयास ।

बैसले दरबारात ॥१२॥

एवढ्यात पहा नवल घडले ।

दरबारात सुखद वृत्त धडकले ।

प्रभुसेवार्थ काही दान धाडले ।

विठ्ठलराव तालुकदाराने ॥१३॥

थोडे थोडके नव्हे गाडीभर ।

उतरला कर्जाचा सर्व भार ।

निमित्तमात्र विठ्ठल तालुकदार ।

कर्ताकरविता श्रीमाणिक ॥१४॥

सावकारांचे कर्ज फेडून ।

आशीर्वचन प्रसाद देऊन ।

समस्तांचे आभार मानून ।

आनंद वर्तला ॥१५॥

बाप्पाचार्य मुख्य कारभारी ।

अप्पासाहेबांची पाहून कर्तबगारी ।

वंदिती चरण वारंवारी ।

बालमनोहराचे ॥१६॥

श्रीमाणिकप्रभुचरणार्पणमस्तु…

 

श्रीप्रभुमनोहराख्यान…६

माणिकप्रभु जयंतीची पौर्णिमेची रात्र ।

मनोहरप्रभु करिती महापूजा प्रभुमंदिरात ।

अतोनात गर्दी प्रभुमंदिर परीसरात ।

घ्यावया प्रभुदर्शन ॥१॥

झाली महानैवेद्याची वेळ ।

सदाशिवराव नेसून सोवळ ।

भंडारखान्यातून नैवेद्याची थाळ ।

घेऊनि येति ॥२॥

नैवेद्य घेऊन येता प्रभुमंदिरात ।

म्हातारा एक बैसला वाटेत ।

लपेटून घेतले स्वतःस घोंगडीत ।

अस्ताव्यस्त ध्यान ॥३॥

स्पर्श झाला म्हाता-यास चुकून ।

विटाळ प्रसादास झाला म्हणून ।

म्हाता-यास अद्वातद्वा बोलून ।

गेले परतोनी ॥४॥

अभ्यंग स्नान करून ।

स्वयंपाक पुन्हा करून ।

सोवळ्यात महानैवेद्य घेऊन ।

सदाशिवराव पातले ॥५॥

पूजा संपल्यावर स्वस्थ झोपले ।

स्वप्नी श्री माणिकप्रभुच आले ।

सदाशिवरावास प्रभु बोलले ।

ऐका एकचित्ते ॥६॥

आलो जत्रेची मजा पहावया ।

घेऊनि येसी माझिया नैवेद्या ।

माझाच स्पर्श होता तया ।

विटाळ कैसा ॥७॥

सदाशिवराव अत्यंत शरमिंदे झाले ।

माफी मागण्या मनोहरप्रभुंकडे आले ।

पाय धरण्या पुढे सरसावले ।

मनोहर प्रभुरायाचे ॥८॥

पाय धरावया जैसे वाकले ।

मनोहर प्रभु मागे झाले ।

नको सदाशिवराव, पुरे झाले ।

विटाळ उगाच होईल ॥९॥

मनोहरप्रभुंच्या अंतर्ज्ञानित्वाची जाण ।

सदाशिवरावास झाली मनोमन ।

मनोहरप्रभुस जाऊन शरण ।

करूणा भाकतसे  ॥१०॥

भक्तवत्सल प्रभु मनोहर ।

सदाशिवरावास वदति साचार ।

जयंती उत्सवात येती खरोखर ।

विविधरूपे प्रभुमहाराज ॥११॥

सर्व रूपे हा श्रीप्रभु जाण ।

चित्तात ठेवावी हीच खूण ।

भेदभाव सदा सर्वदा सारून ।

सेवावे प्रभुचरण ॥१२॥

श्रीमाणिकप्रभुचरणार्पणमस्तु…

 

श्रीप्रभुमनोहराख्यान…७

मनोहर प्रभु परम मातृभक्त ।

भावा बहिणीवरही प्रेम अत्यंत ।

परी होते वैराग्य मूर्तिमंत ।

त्यांच्या ठायी ॥१॥

जडला एकदा काही आजार ।

मनोहरप्रभु होती त्याने बेजार ।

लोकाबापू वैद्य दर्शनार्थ हजर ।

होते त्यावेळी ॥२॥

लोकाबापू करती विशेष यत्न ।

श्रीप्रभुंस आला तात्काळ गुण ।

उंचीवस्त्रे, द्रव्य, प्रसाद देऊन ।

यथोचित गौरविले ॥३॥

मनोहरप्रभुंच्या गळ्यात एकमुखी रूद्राक्ष ।

श्रीमाणिकप्रभुंनी दिधला प्रसाद प्रत्यक्ष ।

लोकाबापूंचे पडता त्यावरी लक्ष ।

इच्छा होय प्राप्तीची ॥४॥

मनी रूद्राक्षाचा लोभ वर्तत ।

परी मुखे काही न बोलवत ।

मनकवडे मनोहरप्रभु सर्व जाणत ।

लोकाबापूच्या मनीचे ॥५॥

जरी लोकाबापू मनीचा हेतू पुरवावा ।

परी सर्वांसमोर रूद्राक्ष कैसा द्यावा ।

परतती लोकाबापू जेव्हा आपुल्या गावा ।

प्रभु येती सोडण्या ॥६॥

आले चालत संगमापर्यंत ।

लोकाबापूंस बोलावून एकांतात ।

रूद्राक्ष घातला गळ्यात ।

अविलंब प्रभुने ॥७॥

मनोवांछित जे प्राप्त झाले ।

प्रभुने आपले अंतरंग जाणीले ।

लोकाबापू वैद्य चरणी लागले ।

अर्तंयामी मनोहरप्रभुंच्या ॥८॥

श्रीमाणिकप्रभुचरणार्पणमस्तु…

 

श्रीप्रभुमनोहराख्यान…८

विठाम्माची प्रबळ इच्छा अंतरात ।

मनोहराने अडकावे विवाह बंधनात ।

इतरांसही पडे विचार पसंत ।

अनुमोदन सर्वांचे ॥१॥

श्रीप्रभु पाळती नैष्ठिक ब्रह्मचर्य ।

त्यांस विचारण्याचे होईना धैर्य ।

कैसे होईल विवाह कार्य ।

चिंता समस्तांसी ॥२॥

प्रभुंची वडील भगिनी मुक्ताबाई ।

तिच्या विवाहाची अपूर्व नवलाई ।

उपाध्यायाचा मुलगा केला जावई ।

सालंकृत कन्यादान ॥३॥

मनोहरप्रभु पंधरा वर्षाचे झाले ।

माणिक नगराचे रूप पालटले ।

शोभिवंत अनेक मांडव उभारले ।

जय्यत तयारी विवाहाची ॥४॥

परी विवाह कुणाचा कळेना ।

नवरा नवरीचा उलगडा होईना ।

प्रभुमहाराज अडकतील विवाह बंधना ।

अटकळ काहीजणांची ॥५॥

समग्र तयारी झाली तरी कळेना ।

नवरा नवरी यांचे मूस फुटेना ।

विठम्मा पुसतसे शेवटी प्रभुंना ।

विवाहसोहळ्या संबंधी ॥६॥

मनोहरप्रभु वदती विठाम्मास ।

पाळितो आम्ही ब्रह्मचर्यास ।

नवरी पाहिली खंडेरायास ।

विवाहसोहळा खंडीचा ॥७॥

आठवले माणिकप्रभुंचे विधान ।

जन्मसमयी जे केले कथन ।

ब्रह्मचर्य व्रतास आधार प्रदान ।

करील मनोहर ॥८॥

मातोश्रीस अती आश्चर्य सखेद ।

परी मिटवूनी अंतरीचा भेद ।

शहाणपणे सोडून दिला नाद ।

मनोहराच्या विवाहाचा ॥९॥

बाप्पाचार्यांची मुलगी असे पसंत ।

तिजसवे विवाह केला निश्चित ।

मातोश्रीही त्यास होकार देत ।

लग्नसोहळा थाटात ॥१०॥

खंडेरायाचा पार पडला विवाहसोहळा ।

वंशविस्ताराचा मार्ग झाला मोकळा ।

पुत्रविवाह देखिला आपुल्या डोळा ।

समाधान विठाम्माचे ॥११॥

श्रीमाणिकप्रभुचरणार्पणमस्तु…

 

श्रीप्रभुमनोहराख्यान…९

मनोहरप्रभु परम योगी थोर ।

नित्य योगाभ्यास करती अपार ।

माणिकप्रभु समाधीपाठी तळघर ।

करवून घेतले ॥१॥

आखून दिलेल्या नमुन्यानुसार ।

परीपूर्ण जाहले तळघर ।

पाहण्या आले प्रभुमनोहर ।

कारभारी मंडळींसह ॥२॥

तळघरात होत्या तीन कमानी ।

बांधकाम पडले प्रभुंच्या पचनी ।

मधल्या कमानीत आसन घालोनी ।

प्रभुमहाराज बैसले ॥३॥

नुरला पारावार त्यांच्या आनंदास ।

निघती उद्गार त्या समयास ।

एखाद्या योगी समाधीस्त होण्यास ।

अत्युत्तम स्थान हे ॥४॥

वरील घटनेस लोटले षण्मास ।

अश्विन कृष्ण सप्तमी तिथीस ।

अचानक बदल झाले प्रकृतीस ।

श्रीमनोहर प्रभुंच्या ॥५॥

खंडेराव जाणती विद्याशास्त्र सकळ ।

संस्थान गादी सांभाळण्या सबळ ।

अवतार समाप्तीची हीच वेळ ।

ठरविले मनोमन ॥६॥

जरी प्रभुमहाराज गंभीर अत्यंत ।

धीर देऊनि करिती सकलांस शांत ।

विधीवत चतुर्थाश्रम घेतला क्षणांत ।

वंदिती मातोश्रीस ॥७॥

आपला कनिष्ठ बंधू खंडेरावास ।

उपदेश देऊन दिधले प्रसादास ।

प्रसाद देऊनि भक्त मंडळीस ।

तोषविले सर्वांस ॥८॥

सिद्ध करूनि आसन ।

देह केला विसर्जन ।

चैतन्यात मिसळले चैतन्य ।

अवतार मनोहर ॥९॥

शोक जाहला अनावर ।

दुःखात बुडाले माणिकनगर ।

कैसा घालावा आवर ।

भावनेस आता ॥१०॥

पुढील विधी यथाशास्त्र केला ।

आणेनी बैसविले संजीवन देहाला ।

मधल्या कमानीत बैसाकार केला ।

होता तेथेची ॥११॥

वयमान अवघे एकोणिस ।

घेतले संजीवन समाधीस ।

नैष्ठिक ब्रह्मचार्याचा कळस ।

मनोहर अवतार प्रभुंचा ॥१२॥

श्रीमाणिकप्रभुचरणार्पणमस्तु…

 

श्रीप्रभुमनोहराख्यान…१०

रूप जयाचे अतीव मनोहर ।

वाणीही तैसीच गोड मधुर ।

अत्यंत लाघवी मोहक सुकुमार ।

श्रीप्रभु मनोहर ॥१॥

अवघ्या सातव्या वयात पीठारोहण ।

एकोणीसाव्या वर्षी अवतारकार्य पूर्ण ।

बारा वर्षात माणिकनगर संस्थान ।

वाढविले मनोहरप्रभुंनी ॥२॥

गवंडी संतरामदादा प्रख्यात ।

घेऊन त्यांसी विश्वासात ।

प्रभुमंदिर निर्मिले अद्भूत ।

शान माणिकनगराची ॥३॥

अत्यंत भव्य आणि सुंदर ।

मंदिर बांधले माणिकप्रभु समाधीवर ।

स्थापत्यकलेचा ऐसा नमुना आजवर ।

झाला नाही ॥४॥

अचाट प्रभुत्व संस्कृत भाषेवर ।

तैसा योगाभ्यासही करती धुरंधर ।

स्तोत्र, मंत्र निर्मिले अपार ।

संस्थान उत्सवासाठी ॥५॥

ठेवूनि परंपरेचा मान ।

राखूनि संप्रदाय अभिमान ।

आखून दिले नित्यपूजाविधान ।

आजतागायत चालतसे ॥६॥

काव्य प्रतिभाही तैसिच अलौकिक ।

स्तोत्र, श्लोक आणि अनेक अष्टक ।

विविध भाषेत पदे अनेक ।

कविश्रेष्ठ मनोहर ॥७॥

प्रभुभक्ती आणि प्रभुवियोग उत्कट ।

प्रामुख्याने दिसतसे मनोहर काव्यांत ।

इतक्या लहान वयांतही वेदांत ।

मनोहरपदांतूनी झळकत ॥८॥

स्वामीसमर्थ वदति भक्तांस ।

अक्कलकोटाहून माणिक नगरास ।

बडे भाईस जा भेटण्यास ।

बडा भाई मनोहरप्रभु ॥९॥

व्यवहार करावा नियमित ।

तैसाच करावा वेळेत ।

कारभारात चोख अत्यंत ।

होते प्रभु महाराज ॥१०॥

होता सात्विक आहार ।

विद्वज्जनांवर प्रेम अपार ।

संतोषोनि देती उपहार ।

दानशूर प्रभुमनोहर ॥११॥

प्रभुमंदिरावर कळस जरी सोन्याचा ।

आधी मान मनोहरप्रभुंच्या समाधीचा ।

पाया असे विराट प्रभुमंदिराचा ।

आधारभूत जो ॥१२॥

ऐसा अवतार प्रभुमनोहर ।

ब्रह्मचारी विद्वान सुकुमार ।

सवाई माणिक खरोखर ।

हाच गा ॥१३॥

श्रीमाणिकप्रभुचरणार्पणमस्तु..

ताज पे साज

परम आदरणीय श्री ज्ञानराज महाराज लिखित येई चेतन सांबा हे पुस्तक प्राप्त झाले. या पुस्तकात महाराजांनी श्री मार्तंड माणिकप्रभूंनी रचलेल्या येई चेतन सांबा या पदाची सारगर्भित व्याख्या केली आहे. उपाशीपोटी जसे अधाशीपणाने अन्न सेवन केले जाते तद्वत लगबगीने पण काळजीपूर्वक या पुस्काची 15 पाने वाचली. मार्तंड माणिक प्रभूंनी लिहिलेल्या या पदाच्या अर्थाबद्दल नितांत उत्सुकता होती. गहन अर्थ ही सहजगत्या वाचकांच्या वा श्रोत्यांच्या गळी उतरवण्यात श्री ज्ञानराज महाराजांचा हातखंडा आहे. त्याचा लाभ घेऊन या पुस्तकाचे वाचन चालू होते. गुलाबजाम मध्ये पाक मुरतो तद्वत अंतरंगात अर्थ मुरवण्याचा माझा खटाटोप सुरू होता.

पान no. 11 वर महाराजश्री शिव शंकरालाच मन नियंत्रित करण्यास बोलावतात कारण  मन हे नियंत्रणासाठी अतिशय दुष्कर आहे असे लिहिले आहे. श्री ज्ञानराज महाराजांच्याही एका पदात प्रभू तुम्हारे पद कमल पर मन सदा एकाग्र हो मध्ये ते माणिक प्रभूंना प्रार्थना करतात की माझे मन एकाग्र होऊ दे. माणिकप्रभु उत्तरादाखल अप्रतिम मौक्तिक देतात. म्हणतात, मन स्थिर झाले तर ते मन कुठले? ते तर आत्मरुप झाले.

माझ्यासारख्या अति सामान्य स्त्री ची चटकन टाळी वाजली. म्हटले, ही तर पत्राची post script झाली. मार्तंड माणिक प्रभूंच्या येई चेतन सांबा या पदरुपी पत्राला अनुसरूनच अत्यंत विशेष असलेला ताज कलम म्हणजे श्री ज्ञानराज माणिक प्रभूंचे ‘प्रभू तुम्हारे पदकमल पर।’ मार्तंड माणिक प्रभूंचे लेखन ताज असेल तर ज्ञानराज महाराजांचे लेखन त्या मुगुटातील मध्यभागी शोभणारा दिव्य हिरा आहे. ज्यांनी हा ग्रंथ अजून पर्यंत वाचलेला नाही त्यांना सर्वांना मी हा ग्रंथ वाचण्याची विनंती करते. वेशेषेकरून वेदांतात आवड असणार्यांनी हा पुस्तक जर वाचला तर त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीला नक्कीच एक नवीन दृष्टिकोण लाभेल अशी माझी खात्री आहे.

येई चेतन सांबा – या पदाचा अर्थ इतका गहन आणि गूढ अहे, की महाराजांसारख्या सद्गुरूंकडून हा अर्थ समजून घेतल्या शिवाय आपल्या सारख्या सामान्य लोकांना काहीही समजाणार नाही. या पुस्तकाच्या रूपात महाराजांनी आम्हा सर्वांवर जी महत्कृपा केली आहे त्या साठी आम्ही त्यांचे ॠणी आहोत आणि महाराजांनी असेच आम्हाला आपल्या ॠणात ठेवावे अशी प्रार्थना.

प्रसाद

१५ ऑगस्ट २०२१ – ७५ वा भारतीय स्वातंत्र्य दिवस. सकाळी ध्वजारोहण केले व माणिकनगरला जाण्यासाठी निघालो – मी, राधा, सांन्वी. आम्ही सर्व गुरु चरणी नतमस्तक होण्याची संधी मिळणार ह्या विचाराने प्रसन्न होतो. वाटेत आम्ही प्राची, इशान व शान्वी यांना ठाणे येथून आमच्या बरोबर प्रवासात घेतले. सर्व आनंदी होतो. भजन, गाणी व गप्पा करता-करता माणिकनगरला कधी पोहोचलो  कळलेच नाही.

१६ ऑगस्ट २०२१.. श्रावण सोमवार.. दुर्गाष्टमी.. मार्तंड माणिक प्रभू मंदिरात श्री मार्तंड प्रभु गादीअष्टमी सोहळा व सोमवारच्या भजनाचा लाभ मिळाला. व त्यानंतर महाप्रसाद घेऊन तृप्त झालो. अविस्मरणीय अनुभव होता.. अलौकीक क्षण, आठवणीत गुंफून ठेवावे असे क्षण….

सायंकाळी चैतन्यलिंगाच्या पवित्र स्फटिक शिवलिंगावर रूद्री, श्री यंत्रावर श्रीसुक्त व अखंड जलाभिषेक श्री ज्ञानराज माणिक प्रभूंच्या हस्ते नियमबद्ध पार पडले. ह्या नंतर महाराजांनी दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास करणाऱ्यांना प्रसाद दिला.

१७ ऑगस्ट २०२१.. सकाळी ७:३० ला प्रभू मंदिरात दर्शनासाठी गेलो व लवकरच पुन्हा माणिकनगरी येण्याचा योग येऊ द्या, अशी प्रभूंच्या चरणीं प्रार्थना केली. मंदिराच्या आवारात गाडी उभी होती, मुंबईचा प्रवास तीर्थ घेऊन सुरू केला. वाटेत भजन, गाणी, गप्पा चालू होत्या.

आम्ही शिवाजी हॉस्पिटल, कळवा येथ पर्यंत पोहचलो होतो. वेळ रात्री ८:२० असावी. रहदारीची वेळ होती. गप्पांचा विषय होता “दत्त महाराज यांनी दिलेल्या प्रचीत्या…. लोकांना आलेले अनुभव”!! ट्रॅफिक असल्याने गाडीची वाटचाल हळू होती. वाट काढीत कळवा ब्रिजवर पोहोचलो.

अनुभव ऐकून अंगावर शहारे, डोळ्यात पाणी तरळत होते. आपल्या सारख्या सामान्य लोकांना सुद्धा दैनंदिन जीवनात प्रभु कृपेचे छोटे मोठे अनुभव येत असतात, असा संवाद चालू होता..

आणि.. ब्रिजच्या चढणी वर अचानक गाडी बंद पडली, वेळ रा ८:३०..

५०० कि.मी. हुन अधिक अंतर गाडी चालली होती. प्राथमिक अंदाजानुसार बॅटरी व सेल्फ सुरूवात होत नसल्याचे कारण पहायचे होते. मी गाडीतून खाली उतरलो. मागे खोळंबलेल्या गाड्यांना बाजूने जाण्यास खुणेनेच सांगितले. तेवढ्यात एक दुचाकी समोर येऊन थांबली. त्यावर दोन गृहस्थ होते. त्यांनी विचारपूस केली, व त्यांच्यापैकी एक गाडी मागे गेला. मागे खोळंबलेल्या गाड्यांना बाजूने जाण्यास सांगू लागला. तर दुस-या व्यक्तीने मला गाडीचे बॉनेट उघडण्यास सांगितले व गाडी तपासली. बॅटरी कनेक्टर सैल झाले होते ते तात्पुरते ठीक करून दिले. व आम्हाला सांगितले की तात्पुरते काम केले आहे, मात्र खूप लांबचा प्रवास करू नका, मेकॅनिकला दाखवा. वेळ रा ८:३५/४०.

त्यांच्या कुशलते मुळे अवघ्या पाच ते दहा मिनिटात गाडी सुरु झाली होती. त्यांची विचारपूस करून त्यांचे आभार मानणार इतक्यात वाहतूक पोलिस आले व मागे वाहतूक खोळंबली असल्यामुळे आम्हाला तेथून लवकर निघण्यास घाई करू लागले.  तसे ते दोघे सज्जन त्यांच्या दूचाकी वर बसून पटकन निघुन गेले.

गाडीत बसल्यावर घडल्या प्रकाराविषयी आम्ही चर्चा करीत होतो, आणि अगदी योग्य वेळी गाडी विषयी जाणकार व्यक्ती आपल्या मदतीस आली ही निव्वळ प्रभु कृपा असे मानून प्रभु चे आभार मानीत होतो.

मात्र आमची गाडी सुरु व्हायच्या आधीच ते दोघे गृहस्थ आपल्या दुचाकी वर बसून निघून गेले व त्यांची चौकशी करणे, त्यांना धन्यवाद देणे राहुन गेले, म्हणून थोडी खंत ही व्यक्त करीत होतो. इतक्यात अचानक ती दुचाकी पुन्हा कधी आमच्या गाडी शेजारी आली, ते आम्हाला कळलेच नाही. आमचे लक्ष गेले तेव्हा ते मागे बसलेले गृहस्थ (ज्यांनी बॅटरी कनेक्टर दुरुस्त केले होते) आम्हाला खुणवून गाडी थांबवायला सांगत होते. मी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. छत्री अडकल्यामुळे गाडीची डिक्की उघडी राहिली होती, ती बंद करण्यासाठी त्यांनी गाडी पुन्हा थांबवली होती. ह्या वेळी मात्र आम्ही त्यांना थांबवून त्यांचे मनापासून आभार मानले. व त्यांचे निदान नाव तरी कळावे म्हणून मी त्यांच्याशी संवाद करीत होतो. नाव सांगण्यास ते थोडी टाळाटाळ करू लागले, व स्मित हास्य करून नाव जाणून घेण्याची आवश्यकता नाही असे काहीतरी म्हणाले. मी मात्र त्यांना नाव सांगण्यास आग्रह करीत राहिलो. तेव्हा त्यांनी  काही क्षण विचार केला, आणि मिश्किलपणे मंद हास्य करीत म्हणाले “प्रसाद”!!! व मी अजून काही बोलायच्या आधी ते तेथून निघून गेले.

आम्ही सर्वांनी एकमेकांकडे पाहिले. आपल्या गप्पांचा विषय दत्त महाराज व लोकांना आलेले अनुभव… परतीचा प्रवास निर्विघ्न व सुखरूप होण्यासाठी महाराजांकडून प्रसाद घेऊनच माणिकनगरातून निघण्याची संप्रदायाची परापूर्वी पासून चालत आलेली प्रथा… त्याच प्रथेच्या महत्वाची, प्रभुकृपेची व श्रीजींच्या प्रसादाची प्रचीती आम्हाला आली हे निश्चित!!!

तिथून आम्ही थेट मेकॅनिक कडे गेलो. गाडीचे काम त्याने केले. व आम्ही आमच्या घरी सुखरूप पोहोचलो.

तू चुकु नको आत्मा रामा

नौबतखान्यात मध्यरात्रीची नौबत व शहनाई वाजत होती. श्री मार्तंड प्रभूंनी शहनाई वाजविणान्यास बोलावून घेतले व विचारले ‘‘तू कुठलं गाणं वाजवीत होतास ?’’ शहनाईवाला घाबरून गेला व म्हणाला – ‘‘महाराज, कालच तुळजापूरचे काही गोंधळी आले होते, त्यांच्या तोंडून मी ही धून ऐकली, मला आवडली, म्हणून मी वाजवली.’’ महाराज म्हणाले – ‘‘असतील तेथून त्या गोंधळ्यांस बोलावून घेऊन ये.’’

दुसऱ्या दिवशी रात्री तो गोंधळी महाराजांपुढे हजर करण्यात आला. महाराजांनी गोंधळ्यांस तेच पद म्हणण्याची आज्ञा केली ज्याची धुन शहनाईवाल्यांनी वाजवली होती, गोंधळी आनंदाने गाऊ लागला

आम्ही चुकलो जरि तरि काही । तू चुकू नकोस अंबाबाई ॥

पुन्हा पुन्हा हेच पद महाराजांनी गोंधळ्याकडून म्हणवून घेतलं व स्वतः कलमदान घेऊन काहीतरी लिहू लागले. शेवटी महाराज तृप्त झाले व गोंधळ्याला व शहनाईवाल्यास इनाम देऊन त्यांची रवानगी केली.

गोंधळी जाताच महाराजांनी संस्थानच्या भजनी मंडळातील प्रमुखांना बोलावलं व त्यांना नवीन स्वरचित पद शिकवलं. त्या पदाचे बोल होते

आम्ही चुकलो निजहित काम ।
तू चुकू नकोस आत्मारामा ।।

महाराजांची ज्ञानलालसा व स्वरलालसा इतकी तीव्र होती की मामुली समजले जाणारे गोंधळी वाजंत्रीवाले इत्यादी वर्गातील लोकांतही जे काही गुण प्रशंसनीय होते, त्यांचे त्यांनी सदैव कौतुक केले. व त्या लोकांच्या चालींवर सुद्धा गहन गंभीर वेदांतपर पदांची रचना केली.