तू स्पंदन है मेरे उर का,
तू श्वासों का अनुगुंजन है ।
आलंबन है तू जीवन का,
मै सीता तू रघुनंदन है ।।

जड काया को निज माया से,
तू कर देता चलता फिरता ।
फिर बैठ स्वयं इस तन में तू,
देता उसको निज चेतनता ।
भवबंधन में तू ही तो है,
तू अपना ही भवभंजन है ।
तू स्पंदन है मेरे उर का,
तू श्वासों का अनुगुंजन है ।।

इन प्राणों को प्राणित करने की,
केवल है तुझमें क्षमता ।
तू स्वयं अहंता है मेरी,
तू बन जाता मेरी ममता ।
मै चंदन हूॅं, तू गंध प्रभो,
आपना यह चिर गठबंधन है ।
तू स्पंदन है मेरे उर का,
तू श्वासों का अनुगुंजन है ।।

निर्बुद्ध बुद्धी भी पाती है,
तुझसे ही अपनी चिन्मयता ।
चंचलता मन की तुझसे है,
तुझसे ही मन की तन्मयता ।
मैं कंकण हूॅं, कुंडल हूॅं,
औ’ तूं शुद्ध अमिश्रीत कंचन है ।
तू स्पंदन है मेरे उर का,
तू श्वासों का अनुगुंजन है ।।

यह दृष्टि जिधर भी जाती है,
आती सम्मुख प्रभु की प्रभुता ।
है ‘ज्ञान’ सृष्टी के कण कण में,
प्रभु की सत्ता औ’ व्यापकता ।
मैं चुंबन हूॅं श्रीचरणों का,
तू दृढतर दृढ आलिंगन है ।
तू स्पंदन है मेरे उर का,
तू श्वासों का अनुगुंजन है ।।

— श्री ज्ञानराज माणिकप्रभु महाराज

वरील अर्थपूर्ण आणि भावपूर्ण काव्यामध्ये, जीव, जगत् आणि जगदीश्वर, हे एकमेकांशी कसे जोडलेले आहेत, किंबहुना त्यांचे स्वरूप काय आहे, याचे वर्णन परमपूज्य श्री ज्ञानराज महाराजांनी विचक्षण बुद्धिकौशल्याने, त्या परमतत्त्वाचा आधार न सोडता, केलेले आहे. खरं तर, ‘नेह नानास्ति किंचन’, दुसरे असे काही नाहीच, एकच ब्रह्म सर्वत्र व्यापून उरलेले आहे. ब्रह्मापासून जीव, केवळ मायेच्या अविद्येमुळे वेगळा भासतो. सत्य हेच आहे की, ‘जीवो ब्रम्हैव नापर: ।’

भक्ताला ईश्वराचे अस्तित्व जाणवते, ते त्याच्या जीवनाचा सर्वाधार, त्याचे सर्वस्व म्हणूनच. जसे त्याच्या हृदयाचे स्पंदन असो, किंवा श्वासाचे येणे जाणे असो. हृदय जड आहे, पण त्याचे स्पंदन हे ईश्वरी चैतन्याचे प्रदर्शन आहे. श्वास जड आहे, पण त्याच्या येण्या जाण्याचा जो नाद आहे, ते जणू त्या इशचैतन्याचे ‘सोऽहं हंऽसः’ असे अनुगुंजन आहे. परमपूज्य श्रीजींच्या ‘अनुगुंजन’ या शब्दप्रयोगाने, भक्ताचे ईश्वराप्रतीच्या प्रेमभावाचे मार्दव प्रकट झाले आहे. जसे पतिव्रतेचे सर्वस्व जसा तिचा पती असतो, तसेच भाव भक्ताचे असल्याने, परम पूज्य श्रीजी म्हणतात, ‘मै सीता तू, रघुनंदन है ।’

उपनिषदांनी प्रतिपादित केलेले परमात्मतत्व परमपूज्य श्रीजी समजावून देत आहेत. ‘जड कायाको निज मायासे, तू कर देता चलता फिरता ।’ शरीर जड आहे, परंतु ईशचैतन्याच्या उपाधीशी झालेल्या संयोगामुळे, जीव (म्हणजेच चिदाभास) अस्तित्वात आला. तो आभास जरी असला, तरी त्यामधील ‘चिद्’ अंशाने शरीराला चलन वलन प्राप्त झाले. जसे विद्युत प्रवाहने पंखा फिरतो, दूरदर्शन संच चालतो, दिवा जळतो, इत्यादि.

हे चैतन्य तरी आले कुठून ? तर ईश स्वतःच शरीराच्या आनंदमय कोषात ‘कूटस्थ’ म्हणून वास करीत असतो. सूर्याची किरणे जशी सृष्टीला प्रकाशित करतात, तसाच हा कूटस्थ अंतःकरणाला प्रकाशित करतो, त्याची चेतनता देतो आणि जीवाचे कार्य सुरू होते. ही सर्व प्रक्रिया केवळ ईश चैतन्याचाच आविष्कार असला, तरी अज्ञानामुळे, अविद्येमुळे जीव ‘मी’ व ‘माझे’ या भावबंधनात अडकतो. बंधनात त्रासलेला जीव मुक्तीसाठी उपासनेचा, साधनेचा अवलंब करतो. तेव्हा तेथेही इशचैतन्यच आधारभूत असते. त्यामुळे साध्य प्राप्तीनंतर त्याचा परिणाम, ‘पाही आपणासी आपण’ असाच होतो. म्हणून पूज्य श्रीजी म्हणतात, भवबंधनात सांपडणारा ही तोच आणि भवभंजन करणाराही तोच !

प्राणही जड आहेत. पण त्यांना संचलित करणारे पुन्हा आत्मचैतन्यच आहे. शुद्ध ‘मी’ची जाणीव, हे आत्म्याचे स्वरूप आहे. पण अज्ञानाने, आसक्तीने ‘मी’चे ‘माझे’ झाले की त्याला ममत्वाचे रंग चढतात, जे बंधनकारक असतात. परंतु, तिथेही ‘असणे’चे ‘होणे’ होण्यास आत्मचैतन्यच कारणीभूत होते.

जीवाचे कुठलेही व्यवहार आत्मचैतन्याशिवाय होऊच शकत नाहीत. म्हणूनच पूज्य श्रीजी म्हणतात, या शरीराशी आत्म्याचे हे कायम स्वरूपाचे गठबंधन आहे, जसे ‘मै चंदन हूॅं, तूं गंध प्रभो ।’

ज्यामुळे सर्व प्राणीमात्रांमध्ये मनुष्यप्राणी श्रेष्ठ ठरतो, ती बुद्धीही, खरंतर जडच आहे. तिची विवेकशक्ती, निर्णय घेण्याची क्षमता, ही केवळ आत्मचैतन्याची देन आहे. त्याचप्रमाणे मनाची चंचलता जशी आत्मचैतन्यामुळे प्रतीत होते, तशीच मनाची एकाग्रताही याचमुळे होते. यासाठी पूज्य श्रीजी उदाहरण देतात की, व्यवहारामध्ये कुडे, बांगड्या जरी दिसल्या, तरी त्या ज्यापासून झाली आहेत, ते मुळात शुद्ध अमिश्रित सोनेच आहे. जीवाचा (भक्ताचा) आणि शिवाचा (ईशाचा) संबंधही असाच आहे. सद्गुरु दासगणू महाराज म्हणतात,
‘आत्मा जडाशी करि संगतीला ।
तेव्हांच तो कळतो जनाला ।।’

आत्मबोध झालेल्या भक्ताला आता सर्वत्र ईश्वराचे अस्तित्व जाणवू लागते. जिथे त्याची दृष्टी जाईल, तिथे केवळ प्रभुचे प्रभुत्व त्याच्या प्रत्ययाला येतं. सृष्टीच्या कणाकणामध्ये ईश्वराचीच सत्ता असल्याने, त्याच्या व्यापकतेची जाणीव प्रकर्षाने झाल्यामुळे, भक्ताच्या हृदयातील उत्कट प्रेमभावना उचंबळून येते. जसं पूज्य श्रीजी म्हणतात,
मैं चुंबन हूॅं श्रीचरणों का,
तू दृढतर दृढ आलिंगन है ।

उत्कट प्रेमाचा सुंदर आणि कोमल आविष्कार, पूज्य श्रीजींनी इथे वर्णिलेला आहे. असीम प्रेमाबरोबर ही संपूर्ण शरणागती आहे. अशा भक्ताला आलिंगन नेण्यासाठी तो दोनावर दोन भुजा घेऊन येतो, असं ज्ञानेश्वरी सांगते. आणि भक्ताला दिलेलं आलिंगनही किती दृढतर दृढ असतं, हे श्रीराधाकृष्णाच्या प्रेमभक्तीमध्ये पाहायला मिळतं.
‘श्रीहरिची जी चिन्मन छाया ।
मिठी देत तिथ दृढ यदुराया ।
शुभ मीलन नच भेद कळावा ।
कवण राधिका कवण हरी वा ।।’
(— पूज्य वरदानंद भारती)

परमपूज्य श्रीजींच्या अशा अद्भुत आणि अलौकिक अपरोक्षानुभूतीतूनच हे सुंदर काव्य साकारलं आहे. त्यांच्या पावन मंगल चरणी कोटि कोटि प्रणाम !

[social_warfare]