धांव गे बाई

धांव गे बाई धरिला कान्हा चोर ।।धृ।।
मारावे तरी खोडी सोडीना ।
जैसा वराडी भोर ।।१।।
किती सांगावे कांहीं ऐकेना ।
निशिदिन याचा घोर ।।२।।
माणिक म्हणे प्रभु दीन दिसे परी ।
जो सर्वांहूनि थोर ।।३।।

परमपूज्य सद्गुरु श्री माणिकप्रभु महाराजांनी वरील काव्यामधून ‘परम प्रेमरुपा’ अशा मधुराभक्तीचा गोडवा प्रदर्शित केला आहे. त्यांच्या कृपेची आकांक्षा मनी धरून, वरील काव्याचे विवरण करण्याचा प्रयत्न करते आहे.

‘धांव गे बाई धरिला कान्हा चोर’, सद्गुरु श्री माणिकप्रभु ह्यांच्या या काव्यातून त्यांनी, श्रीकृष्णावर आत्यंतिक प्रेम करणाऱ्या वत्सल गोपी आणि खट्याळ, हट्टी अशा बाळकृष्णाच्या जवळिकेचा सुंदर प्रसंग, ज्यात त्या गोपींच्या प्रेम भावनेच्या अनेक छटा रंगविल्या आहेत.

वाच्यार्थ – गोपींच्या खोड्या काढून, पळून जाणाऱ्या बाळकृष्णाला त्या गोपीने अतिखटपटी करुन पकडले आहे. पण कान्हा इतका चपळ आणि हुलकावे देणारा आहे हे माहित असल्याने, ती गोपी आपल्या इतर गोपींना मदतीसाठी धावत यायला सांगत आहे की ‘धांव गे बाई धरिला कान्हा चोर’. चोर एवढ्यासाठी म्हटले आहे की, हा गोपींच्या नकळत कधी घरात शिरुन दह्यादुधाची मडकी फोडायचा, फस्त करायचा आणि पळूनही जायचा. घरातल्या दुधाण्यांची गोष्ट सोडा पण त्यांची मनही चोरून‌ न्यायचा. ‘कर्षति इति कृष्णः’. गोपींची मनही कधी आकर्षून घ्यायचा हे त्यांचे त्यांनाच कळायचे नाही. म्हणूनच हवीहवीशी वाटणारी चोरी का होईना, पण चोरीच ना ती !

मग लटके का असेना, त्याच्यावर रागवायचं, चापटी मारायची, या त्यांच्या कृती त्यांचं कृष्णावरचं प्रेम, ममत्व, वात्सल्य हेच भाव दर्शवितात. पण एवढं करून कृष्णाच्या खोड्या काही संपतच नाहीत. जसा एखादा हेकट वराडी असावा, तो त्याला पाहिजे तेच करतो, तुमच्या सांगण्याला भीक घालत नाही, तसाच हा कान्हा करतो आहे. त्यामुळे रात्रंदिवस तो जीवाला घोर लावतो आणि दुसरा विषयच सुचू देत नाही.

आता मात्र गोपींनी त्याला धरले, पकडले. सद्गुरु श्री माणिक प्रभु म्हणतात, ‘आता गोपींना त्याचा कळवळा येतोय’. खट्याळ लेकराला बंदिस्त केल्यावर, गोपींच्या प्रेमळ नजरेला तो दीन दिसतो आहे, तरी ‘जो सर्वांहूनि थोर’ असा हा कान्हा! नारद भक्तिसूत्रात सांगितल्याप्रमाणे ‘तत्रापि न महात्मज्ञान विस्मृत्यपवाद:।’ म्हणजेच, कृष्ण हा बालवयात जरी असला, तरी त्याचे मोठेपण त्या कधी विसरल्या नाहीत.

असे हे, कृष्ण आणि गोपी यांच्या जवळिकेचा गोडवा अत्यंत रसाळ आणि भावपूर्ण शब्दांत वर्णन केलेलं मधुर काव्य आहे.

लक्ष्यार्थ – परमार्थमार्गीचा जो साधक आहे, विशेषतः भक्तिमार्गातला, त्याला ईश्वरभेटीची तळमळ तर असतेच. त्याच्या वृत्तींना अंतर्मुख करून, ध्यानमार्गाने त्याचे दर्शन घेण्यासाठी तो अपार कष्ट घेतो. वरील काव्यातील ही गोपी ही त्या अंतर्मुखवृत्तीचे रूपक आहे, असे मला वाटते. संत दासगणू महाराज म्हणतात, ‘अंतर्मुख वृत्ती करी, जरी बघणे असेल हरी।’ एखाद्या वेळी त्या वृत्तीला सच्चिदानंदाचा अनुभव येतो ही, पण ती वृत्ती तो आनंद कायमच धरुन ठेवीलच अशी खात्री नसते. शिवाय इतर विषयांच्या वृत्ती तर सतत येतच असतात. म्हणून ही ‘गोपी’वृत्ती त्या बाहेर जाणाऱ्या वृत्तींनाही अंतर्मुख होण्यासाठी हाक देत आहे आणि हळूहळू नाही तर धावत या, नाही तर हा केव्हा सुटून जाईल, सांगता यायचं नाही. लडिवाळपणे त्या कृष्णाला (आत्मारामाला) ती ‘चोर’ म्हणतेय. शेवटी सर्व वृत्ती या आत्म्याच्या स्फुरणामुळेच आलेल्या असतात. त्यामुळे अत्यंतिक जवळिकेच्या संबंधामुळे वृत्तींना या आत्मारामाची सहज ओढ असतेच. केवळ अविद्येमुळे त्या बाहेरील विषयांकडे ओढल्या जातात. तेव्हा कधीतरी त्याची अनुभूती आली तर ती पुन्हा सुटू जाऊ नये, म्हणून ती ‘गोपी’वृत्ती इतर सर्व वृत्तींना अंतर्मुख होऊन ‘एकवृत्ती’ होण्यासाठी साद घालते आहे. कारण एकवृत्तीचे बळ अधिक असते.

‘मारावे तरी खोडी सोडीना, जैसा वराडी भोर।’ लहान मुलाला आई मारते, ती दुष्टावा म्हणून मारते का? आईने सांगितलेले त्याने ऐकावे म्हणूनच ना! आणि लेकराला मारल्याचं वाईट पुन्हा तिलाच वाटतं. तसंच त्या सच्चिदानंदाचा ‘सदा संग’ राहावा म्हणून साधक जीवाच्या आटापिटीने प्रयत्न करीत असतो. रात्रंदिवस त्या आत्मारामाचा ध्यास त्याला लागून राहिलेला असतो. म्हणूनच ‘निशिदिनी याचा घोर’. संत तुकोबा म्हणतात,

‘हरि तू निष्ठूर निर्गुण, नाही माया बहु कठिण ।
नव्हे ते करिसी आन, कवणे नाही केले ते ।’

प्रभुजींनी ‘घोर’ हा शब्द फार मार्मिकपणे घातला आहे. कृष्णसंग ‘सदा’चा हवा, हा साधकाच्या तळमळीचा उच्चांक आहे. दुसरा विषय त्याच्या वृत्तींना नाही.

आता कृष्ण तर हाती सापडलाय. त्या सच्चिदानंदाचा कोण आनंद आहे. त्यामुळे आतापर्यंत जे आरोप त्याच्यावर केले होते, तो आता आपल्या भावाच्या बंधनात पडल्याने, त्याच्यावरच्या उत्कट प्रेमाने तो दीन झाल्यासारखं वाटू लागलाय. पण असं होऊनसुद्धा कृष्णाची थोरवी त्या कधीच विसरत नाहीत. ‘जो सर्वांहुनी थोर।’

अशा ‘जाणोनि नेणता’ झालेल्या भक्ताच्या वृत्तींचं वर्णन प्रभुजींनी ‘कामक्रोधाधिकं सर्वं तस्मिन्नेव करणियं’ (नारद भक्तिसुत्र) म्हणजे जे जे भाव असतील, मग काम असो, क्रोध असो, ते सर्व ‘त्याच्याच’साठी असतील, हे या श्रीकृष्ण आणि गोपीच्या भावपूर्ण प्रसंगातून अतिशय मार्मिकपणे सांगितले आहेत. प्रभुजींच्या या संपूर्ण काव्यातून भक्तीचा गोडवा मनाला प्रसन्नता देऊन जातो.

 

स्वर्णमृग पर लुब्ध होकर

परमपूज्य सद्गुरु श्री ज्ञानराज माणिक प्रभु महाराजांनी परमार्थ मार्गातील साधकांसाठी त्याच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांपैकी एका मोठ्या अडथळ्याचे, रामायणातल्या सुवर्णमृगाच्या प्रसंगाचे उदाहरण देऊन, त्याचे स्वरूपही सांगितले आहे आणि त्याला पार करून जाण्याचा बोधही फार मार्मिकपणे केला आहे.

स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई ।
मुग्ध होकर बुद्धि की सुविचार क्षमता खो गयी ।।धृ।।

है असंभव हेममृग यह राम भी थे जानते ।
जानकर भी हाथ में ले चाप-शर वे भागते ।
भंग तृष्णासंग से आनंदघनता हो गई ।
स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई ।।१।।

है प्रलोभन दे रहा मारीच आत्माराम को ।
ताकि रावण हर सके सुख शांति औ’ विश्राम को ।
स्वर्णमृग के मोह में मति की सुसमता खो गई ।
स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई ।।२।।

है विषय सब स्वर्णमृग सम सर्वदा यह जान तू ।
बुद्धि-सीता हो न मोहित, ध्यान रख यह ‘ज्ञान’ तू ।
ध्यान इतना रख समझ ले पार सरिता हो गई ।
स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई ।।३।।

श्रीरामांची अर्धांगिनी, सीता, ही अत्यंत पवित्र, शुद्ध चरित्राची पतीव्रता, अशी स्त्री जिचा उल्लेख ‘पंचकन्यां स्मरे नित्यमं’ मध्ये प्रथम क्रमांकाने येतो, ती सीतासुद्धा सुवर्णमृगाच्या वैषयिक दर्शनाने, त्याच्या प्राप्तीसाठी कशी वेडीपीशी होते, हा प्रसंग आहे.

‘स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई’ वनांत इतस्ततः मजेत विहार करणाऱ्या सुवर्णमृगाला पाहून सीता हरखून गेली. श्रीजींनी ‘लुब्ध’ हा शब्द बरोब्बर परिस्थितीला साजेसा घातलेला आहे. लुब्ध शब्दात हावरेपण आहे (Greedyness). ‘मला ते पाहिजे म्हणजे पाहिजेच’ हा भाव आहे. त्याचाच परिणाम असा झाला की ‘मुग्ध होकर बुद्धी की सुविचार क्षमता खो गई।’ सीता वेडीपिशी झाली. चांगलं काय, धोक्याचं काय, यामध्ये निर्णय घेण्याची बुद्धीची क्षमता त्यामुळे पांगळी झाली.

सद्गुरु श्री ज्ञानराज महाराजांनी अत्यंत दयाळू होऊन साधकांना अप्रत्यक्षपणे इशारा केला आहे की, जगातले बाह्य विषय संख्येने जरी पाचच (शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध) असले, तरी त्यांची आकर्षणशक्ती सीतेसारख्या भल्याभल्यांनाही मोहित करते. त्यांचीही मती भ्रष्ट करू शकते. यासाठी श्री समर्थ ही उपदेशितात,

‘मना कल्पना ते नको विषयांची ।
विकारे घडे हो जनी सर्वचीची ।’

म्हणून या प्रथम टप्प्यावरच साधकाने जागृत राहून मनाच्या संकल्पामागे न जातां, बुद्धीची निर्णय क्षमता जपली पाहिजे.
‘आली उर्मी साहे, तुका म्हणे थोडे आहे।’

याचे कारणही महाराजांनी पुढच्या ओळीत दिले आहे. ‘है असंभव हेममृग ये रामभी थे जानते।’ श्रीराम परमात्मा आहेत, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ असे आहेत. त्यामुळे सुवर्णमृग असंभव आहे किंबहुना हे मायाजाल आहे, हे श्रीरामांना माहीत होतेच. तरीही ‘जानकर भी हाथमे ले चाप शर वे भागते।’ अत्यंत विचक्षण बुद्धीने महाराजांनी त्या आत्मचैतन्याच्या स्वभावाकडे निर्देश केला आहे.

मूळ आत्मचैतन्य जरी रंगहीन असले, तरी त्या स्फुरणाला मनातील वासनेचा रंग चढला, की त्या विषयाची वृत्ती होते. मन इंद्रियांना जोडलेले असल्यामुळे, वासना जर उत्कट असेल तर त्या वृत्तीची उर्मी होऊन इंद्रियांकडे धाव घेते आणि इंद्रिय ते कर्म करतात. हा सर्व प्रकार घडण्यासाठी मूळ अधिष्ठान हे आत्मचैतन्याचेच असते. ते जर नसले, तर वरील प्रक्रियाच होत नाही.

म्हणूनच महाराज म्हणतात, सुवर्णमृग असंभव आहे हे जाणूनही श्रीराम धनुष्यबाण घेऊन धावले. भगवान श्रीराम हे एकबाणी, एकवचनी आहेत, हे माहीत असल्याने, माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी ते स्वतः गेलेत म्हटल्यावर, आता इच्छापूर्ती नक्की होणार या कल्पनेनेच ‘भंग तृष्णासंग से आनंदघनता हो गई।’. सुवर्णमृग मला हवा ही उत्कट आशातृष्णा आता श्रीराम भागविणार, या जाणिवेने सीता अतिहर्षित झाली.

खरे तर विवेकाने हिताचीच गोष्ट मनात ठसते पण मन जर विकारांच्या हातचे खेळणे बनले तर मात्र ‘प्रमाणांतरे बुद्धि सांडोनि जाते.’ सीतेचे नेमके तेच झाले. ‘अव्यवस्थित चित्तानां प्रसादोऽपी भयंकरः।’ (अर्थ – ज्यांच्या मनाचे वागणे अव्यवस्थित म्हणजे जसे असायला हवे तसे नसते, ते प्रसन्न झाले तरी त्याचा परिणाम भयंकर होऊ शकतो.)

‘है प्रलोभन दे रहा मारीच आत्माराम को।’ सुवर्ण मृगाचे रूप घेतलेला मारीच मामा, तो आपल्या मागे येत असलेल्या श्रीरामाला, थोडं माना वळवून, थोडं पुढे पुढे पळून, सीतेपासून दूर दूर नेऊ पाहतो. त्याचप्रमाणे मात्रास्पर्शाने वैषयिक बनलेली बुद्धिवृत्ती आपल्या मूळ विवेकी स्वरूपापासून दूर जाते. असं झालं तर त्याचा परिणाम काय होतो, हे श्री महाराज पुढच्या ओळीत सांगत आहेत. ‘ताकि रावण हर सके सुख शांती औ’ विश्राम को।’ मनाला वाटणारी आवड निवड प्रामाणिक नसते. इंद्रिय बाह्यांगाला भूलतात. त्यामुळे विषयाचा स्विकार किंवा धिक्कार हिताच्या दृष्टीने, नेमकेपणाने करता येत नाही. अशाप्रसंगी ग्राह्य-त्याज्य सार-असार अशा द्वंद्वांमध्ये नेमका हिताचा निर्णय घेण्याची विवेकशक्ती जर बावचळली तर भवसागराच्या महाभयंकर लाटा आपल्याला कधी गिळंकृत करतील, याचा नेम नसतो. म्हणून समर्थ म्हणतात, ‘मना कल्पना ते नको विषयांची।’ पुढे समर्थ म्हणतात, ‘महाघोर संसार शत्रू जीणावा.’ श्री महाराजांनी रावणाचा जो उल्लेख केला आहे, तो या संसार शत्रूलाच उद्देशून केला आहे, असे मला वाटते. वरकरणी सुखाचा मुखवटा घातलेला संसार, हेच दुःखाचे मूळ आहे, असे अनेक संतांनी सांगितलेले आहे. संत सद्गुरु दासगणू महाराज म्हणतात, ‘भूलू नको मना संसारा ।
ना येथ सुखाचा वारा ।।
दुःखाचे मूळ संसार ।
बा करिल बहुत बेजार ।।
लोभाचे करुनि मांजर ।
तुज फिरवील दारोदार ।।

श्री महाराजांनी या संसार शत्रूला रावणाचे रूप दिले आहे, जो सुख शांती आणि विश्राम हरण करतो. याचे कारणही श्री महाराजांनी पुढील पंक्तीत कथन केले आहे, ‘स्वर्णमृग के मोह में मति की सुसमता खो गई।’

लोभ, मोह या गोष्टी मनबुद्धीला क्षोभ देण्यास कारणीभूत होतात, त्यामुळे त्यांचे स्थैर्य ढळते, समत्व बुद्धीने विचार करण्याची क्षमता उणावते. गीतेमध्येही या समत्व बुद्धीचा संदर्भ साधकाला योग साधण्याच्या दृष्टीने अनेक ठिकाणी आला आहे. जसे ‘सर्वत्र समबुद्धय:’, ‘समबुद्धिर्विशिष्यते’, ‘समं पश्यन्हि सर्वत्र’ इत्यादि.

मोहामुळे बुद्धीचा हा जो महत्त्वाचा आणि सर्वात उच्च प्रतीचा गुण आहे, तो नष्ट होतो आणि साधकाला साधनेमध्ये आडकाठी होऊ शकते. म्हणूनच श्री महाराजांनी रामायणातील सुवर्णमृगाच्या प्रसंगाच्या आधारे साधकांना सावध राहण्याचा बोध केला आहे. ‘है विषय सब स्वर्णमृग सम सर्वदा यह जान तू।’ जगातील बाह्य विषय हे त्या सुवर्णमृगाप्रमाणे भ्रांती निर्माण करतात. विवेकी बुद्धी भ्रष्ट होते. म्हणूनच समर्थ म्हणतात, ‘अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, अती विषयी सर्वदा दैन्यवाणा।’ असे होऊ नये म्हणून, श्रीमहाराज बोध करताहेत, ‘बुद्धी सीता हो न मोहित, ध्यान रख यह ‘ज्ञान’ तू।’ या काव्यात बुद्धीला सीतेचे रूपक दिले आहे, तिला झालेल्या मोहाचा परिणाम किती भयंकर झाला, हे जाणून श्री महाराज अत्यंत कृपाळूपणे साधकाला आश्वासन देत आहेत की, अशी बुद्धी जर बाह्य विषयांना मोहित होऊ दिली नाहीस म्हणजेच, तुझे हवे-नको उणावले, तर मग ही भवनदी तू पार केलीसच असे समज.

साधकाचे हवे-नको उणावले की मनाची चंचलता उणावते. बुद्धीची विवेकशक्ती सबळ होते. वृत्ती बाहेर न धावता अंतर्मुख होऊ शकतात आणि अशा अंतर्मुख वृत्तीलाच परमात्म्याच्या दर्शनाची योग्यता प्राप्त होते. परमपूज्य सद्गुरु दासगणू महाराज म्हणतात, ‘अंतर्मुख वृत्ती करी । जरी बघणे असेल हरी।’

परमपूज्य श्री सद्गुरु ज्ञानराज महाराजांच्या चरणी शरण राहून वरील विवरण केले आहे. काही चुका झाल्या असल्यास मला क्षमा करून मार्गदर्शन करावे, ही प्रार्थना चरणी करते.

पहा यशोदे

परमपूज्य सद्गुरु श्री माणिक प्रभु महाराजांनी श्री बाळकृष्णाच्या लीलांवर अनेक सुंदर सुंदर भावप्रधान काव्ये केलेली आहेत. ती वाचताना खूप आनंद मिळतो. गोपगोपींचं श्रीकृष्णावरचं प्रेम वाचताना आपण तन्मय होऊन जातो. काव्यातून वर्णिलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहतात आणि त्या भावभावनांमध्ये आपण तल्लीन होऊन जातो.

पण या काव्यांची एक खासियत आहे. आपण या काव्यांचा जसा अभ्यासपूर्वक विचार करू तसतसे ते शब्द आपल्याला आत्मचिंतन करावयास भाग पाडतात. वेदांतिक वचने आपल्याला मार्गदर्शक होतात. स्वरूपसाध्याच्या मार्गावर ते ईश्वरी चैतन्यच साधकाला कसं आधारभूत होतं, अशा प्रकारचा सुंदर पण गूढ गर्भितार्थ या काव्यांमध्ये दडला आहे.

पुढील काव्य अशाच प्रकारचे सुंदर गूढगर्भ आहे. परमपूज्य सद्गुरु श्री माणिकप्रभु यांच्या मंगल पावन चरणी शरण राहून त्याचे विवरण करण्याचा प्रयत्न मी करते आहे.

काव्य:

पहा यशोदे तुझा लेक खोडी
जाऊनी दही दूध मडकी फोडी ।।धृ।।

येतसे नित्य गृहाप्रति माझ्या
लहानसे वासरू वनाप्रति सोडी ।।१।।

जात असतां यमुनेच्या पाण्या
मागुनी येऊनी वस्त्रचि फेडी ।।२।।

माणिक म्हणे वर्णितां याचे गुण
शेषहि शिणला माझी मति थोडी ।।३।।

 

ही एक गोपी यशोदेकडे कृष्णाचे गाऱ्हाणे घेऊन आलेली आहे आणि सांगतेय की तुझा लेक अत्यंत खोड्याळ आहे. ‘तुझा लेखक खोडीयातला खोडी म्हणजे खट्याळ किंवा खोड्याळ हा शब्द बहुदा लहान मुलांच्या ज्या वात्रट लीला असतात त्यासाठीच वापरतात. लहान मुलांच्या खोड्यांनी मोठ्यांना त्रास होतो पण संताप येत नाही किंवा याला काही मोठी शिक्षा करावी असेही वाटत नाही. किंबहुनाकिती लबाड हो हा, कसं त्याचं डोकं चालतंम्हणून आत लपवून ठेवलेलं कौतुकही बाहेर येतं. असाच काहीसा भाव, यशोदेकडे, कृष्णाचं गाऱ्हाण सांगताना या गोपीचा आहे.

ही गोपी यशोदे कडे तक्रार करतेय की, ‘येतसे नित्य गृहाप्रति माझ्या, लहानसे वासरू वनाप्रति सोडी।।‘. ती म्हणते हा कान्हा माझ्याकडे नित्याचा येतच असतो, पण गप्प बसत नाही. ते लहानसे पाडस वनाच्या दिशेने सोडतो. आता त्या बिचार्‍या वासराला काय कळतंय? कुठेतरी उंडारलं नी वाट चुकलं, रानात श्वापदं समोर आली, तर काय करील ते?’

परमपूज्य सद्गुरु श्री प्रभुजींनी वेदांतिक तत्वज्ञान मोठ्या खुबीने या गोड तक्रारीमध्ये गुंफलेले आहे. आत्मारामाची स्फुरणे नित्याची येतच असतात. मनाच्या दरवाजातून बाहेर पडणारी वृत्ती तशी कोवळीच असते. पण बाहेरच्या जगात, विषयांच्या निबिड अरण्यात शिरली की तिच्यावर काय आणि कोणते परिणाम होतील सांगता येत नाही. मग ती अध:पतनाला कारणही होऊ शकते. म्हणून तर त्या वासराला एकटं सोडता त्याच्याबरोबर बुद्धिविवेकाचा गुराखी हवाच.

आतां गोपीची अवस्था अशी झाली की आतां तक्रार तर केलीच आहे ना, मग सर्वच खोड्या सांगून टाकाव्या! यशोदेला ती सांगते, ‘जात असतां यमुनेच्या पाण्या, मागुनी येऊनी वस्त्रचि फेडी ।।यमुनेच्या पाण्याला जाणे, म्हणजे तिथे स्नान करून, वस्त्र स्वच्छ धुवून, पुन्हा घागरीत पाणी भरून घरी आणणे आणि हा रोजच्या रोज नित्याचा उपक्रम होता.

परमार्थिकदृष्ट्या या ओळींच्या लक्ष्यार्थाचे चिंतन केल्यास असं ध्यानात येतं की, यमुनेचा प्रवाह हा साधनेच्या प्रवाहासारखा आहे. प्रामाणिक साधक नित्याने या साधनयमुनेच्या पाण्यात स्नान संध्या करीत असतो. ते त्याच्या अंत:करण शुद्धीसाठीच! जीवाचे आत्मचैतन्य हे पंचकोशांच्या आवरणांमध्ये अवगुंठित असते. हे पंचकोशच त्याची वस्त्रे असतात. साधक जेव्हा ह्या आत्मस्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्नात असतो तेव्हा त्याला या, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय कोशांना ओलांडूनच आनंदमयात प्रवेश करावा लागतो. तेथेच जीवाशिवाचे मिलन होते, अद्वैत होते. या सर्व प्रयत्नांना आत्मचैतन्याचेच अधिष्ठान असते. त्याच्याशिवाय या क्रिया होऊच शकत नाहीत. म्हणून सद्गुरु प्रभुजींनीमागुनी येऊनी वस्त्रचि फेडीही काव्यपंक्ती त्यांच्या अलौकिक विचक्षण प्रज्ञेने लिहिलेली आहे. आता पंचकोशांची ही वस्त्रे फेडली तर, ‘तुका झालासे पांडुरंगही अवस्था येणारच. ‘अवघा देवचि झाला पाही भरोनिया अंतर्बाही ।।

परमपूज्य सद्गुरु प्रभुजींनी या काव्याच्या पहिल्या दोन कडव्यांत साधकाच्या बाह्य साधनेत ईश्वर कसा परिणाम करतो आणि तिसऱ्या कडव्यात त्याच्या अंतरंग साधनेत कसा परिणाम करतो हे गोपीच्या तक्रारीच्या रूपाने निर्देशित केले आहे.

म्हणूनच सद्गुरु श्री प्रभुजी म्हणतात, ‘माणिक म्हणे वर्णितां याचे गुण, शेषहि शिणला माझी मति थोडी ।।३।।खरं तर जो मुळात निर्गुणच आहे त्याचे गुण कसे काय वर्णन करणार? पण सत्य हेच आहे की कर्ता करविता तर तोच आहे. म्हणून संत तुकोबाही म्हणताततुझं वर्णी ऐसा तुजविण नाही दुजा कोणी तिन्ही भुवनी।। सहस्त्रमुखे शेष शिणला बापुडा। चिरलिया धडा जिव्हा त्याच्या ।।त्याचे गुण वर्णिताना शेषाच्या सहस्त्र जिभाही चिरल्या गेल्या असे म्हणातात. तेव्हा श्री प्रभुजी म्हणतात, ‘त्याच्यापुढे माझी मती थोडी।।

इतका खोल गर्भितार्थ असलेले तत्त्वज्ञान प्रभुजींनी गोपीच्या भावभावनांच्या इतक्या सुंदर शब्दात उद्धृत केलेले आहे. त्यांच्या अचाट, अजन प्रज्ञेची झेप माझ्यासारख्या अज्ञानी साधकाने कशी वर्णावी? पण ज्ञानोबा माऊलींचे शब्द आठवले, ‘वस्तुत: जरी मी मूर्खू हातून घडे अविवेकु तरी पुढे मार्गदर्शकु संत कृपेचा दिपु आहे ।।आणि या काव्याचे विवरण माझ्या तोकड्या शक्तिबुद्धीप्रमाणे केले आहे. सद्गुरूंनी यामध्ये झालेल्या चुकांची क्षमा करून मार्गदर्शन करावे, ही त्यांच्या पावन मंगल चरणी प्रार्थना करते.

सद्गुरु चरणी अनन्यभावे प्रणाम!

कृष्णा मजकडे पाहू नको…

कृष्णा मजकडे पाहू नको रे माझी घागर गेली फुटून॥धृ॥
डोईवर घागर हातामधे झारी माझी वेणीच गेली सुटून॥1॥
शाम हा सुंदर अति मनोहर बहर हा घ्यावा लुटून॥२॥
माणिकप्रभु म्हणे प्रीतिची राधा हरी चरणी चाले जपून॥३॥

श्री सद्गुरु श्री माणिक प्रभु महाराज यांचे पावन चरणी शरण राहून त्यांच्या या काव्याचा आध्यात्मिक अर्थ जाणून घेण्याचा मी प्रयत्न करते आहे.

नाथांच्या जशा गौळणी किंवा भारुडं आहेत की ज्यात विषय अगदी साधा, रोजच्या जीवनातला किंवा श्रीकृष्ण अणि गौळणींच्या जवळिकेचा असतो पण त्यात गूढ अर्थ भरलेला असतो जो साधकाला चिंतनाने – आत्मतत्त्वापर्यंत पोंचवितो.

वरील काव्यात असाच अर्थ भरलेला आहे असे मला वाटते. काव्यातील गौळण ‘राधा’ आहे जी मधुर भक्तीची मुकुटमणि आहे. ‘विषय तो त्यांचा झाला नारायण’ अशी तिची सर्व विषयासक्ति केवळ श्रीकृष्ण आहे. डोक्यावर भरलेली घागर घेऊन ती चाललेली आहे, ज्यामधे सर्व संचित भरलेलं आहे. हातात झारी आहे, ज्यात प्रारब्ध कर्म घेऊन ती चाललीय पण आता घागर तर फुटलीय आणि संचित सांडून संपून गेलयं. प्रारब्ध कर्माची झारी तेवडी शिल्लक राहिली आहे.

श्री प्रभूंनी वेणीचं रुपक संसारासाठी घेतलं असावं असं वाटतं. एकदा श्रीकृष्णाची ओढ लागली की मग त्या संसाराला काय महत्व? जो नीटनेटका होता तो (माझी वेणीच गेली सुटून) विस्कळीत झाला संत तुकोबा म्हणतात त्याप्रमाणें ‘सांडिला लौकिक, लाज भय चिंता। रातले अनंता चित्त माझे’ अशी अवस्था झाली. म्हणूनच राधा, ‘कृष्णा माझ्याकडे पाहू नका रे बाबा, माझ्या संसाराची ही दैना तुझ्यामुळे झालीय’ असं त्याला सांगतेय.

बाहेर अवस्था अशी झालीय पण अंतरंगाची स्थिती काय? ‘शाम सुंदर अति मनोहर, बहरहा घ्यावा लुटून’ हा श्रीकृष्ण सुंदर तर आहेच पण माझ्या मनाचंही हरण करतोय. माझं मन माझ्या ताब्यात राहत नाहीं. बहर आला की सर्व झाड कसं फुलांनी डवरून जातं राधेच्या अंत:करणाची अवस्था तशीच झालीय. न देखे, न बोले, नाइके आणिक। बैसला हा एक हरि चित्ती॥ (तुकाराम महाराज) आणि श्री प्रभूंनी ‘लुटून’ हा शब्द अगदी मर्मिकपणे वापरला आहे. लुटून नेण्यामधे हांवरेपणा आहे, किती घेतला तरी पुरेसाहोत नाही, हा भाव आहे.

राधा भक्त आहे. श्री नारदांनी भक्तीची व्याख्याच मुळी ‘सा तु अस्मिन् परम प्रेमरूपा’ अशीच केलीय. म्हणूनच श्री प्रभूंनी राधेला ‘प्रीतीची राधा’ म्हणून संबोधिले आहे. ‘कृष्ण कृष्ण कृष्ण’ ही तिची एक वृत्ती झाली आहे. तेव्हां अशामधे राधा कृष्णच बनली तर? विभक्त नव्हे तो भक्त बनली तर? माऊलीने एके ठिकाणी सांगितले आहे की त्या कोशातल्या किड्याला बाहेरून भुंगा टोचा मारीत असतो, त्याच्या भीतीने त्या किड्याला सारखा त्याचाच ध्यास लागलेला असतो. त्यामुळे एक दिवस तो किडाही त्या भूंग्यासारखाच होऊन बाहेर पडतो हीच भीती राधेला आहे जणू । म्हणूनच ती अति सावधतेने हरिचरणाजवळ जातेय न जाणो त्याच्या ध्यासानें मी कृष्णच झाले तर। मग त्या द्वैताचा आनंद भोगायचा कुणी? जसं संत तुकोबा म्हणतात, ‘जळो माझी ऐशी बुद्धी। जी घाली मज तुजमधी॥ ऐसे करी विठुबाई।, तुझे पाय, माझे डोई॥ बस्‌, यांतच आनंद आहे.

सगुणाचा हा द्वैतानंद गमावू नये म्हणून राधा ‘जपून’ चालते आहे. सावधगिरीने ‘जाणिवपूर्वक’ चालते आहे. अद्वैतापेक्षा सगुण भक्तीचा आनंद तिला जास्त गमतो आहे. खरे तर राधेचे ‘जाणोनि नेणते करी माझे मन’ असेच आहे. राधा ज्ञानी भक्त आहे, तरीही सगुण भक्तीच्या रसास्वादाचा आनंद अलौकीक आहे, तो तिला सोडायचा नाही.

महाराजांचे हे काव्य सगुण भक्ताला मधुरा भक्तीचा आनंद देणारं आहे आणि पारमार्थिक साधकाला ज्ञानी भक्तांच्या अवस्थेची जाणीव करून देणार आहे.

माझ्या अल्पबुद्धीने जेवढं चिंतन होईल तो प्रयत्न मी केला आहे. श्री प्रभूंच्या चरणी मी शरण आहे. माझ्या चिंतनामधे काहीं चुका असल्यास क्षमा करावी व मार्गदर्शन करावे ही श्री प्रभूंच्या चरणी प्रार्थना आहे.