जब तलक मैं था, उसे मैं हर तरफ था खोजता ।
आज जब मैं हूं नहीं, तब वह मुझे है ढूंढता ।।धृ।।

दौड अपनी छोडकर मैं जब, अचानक रुक गया ।
भूलकर अपनी अकड जब, थक गया औ’ झुक गया ।
आ गया बांहें पसारे प्रभू स्वयं ही भागता ।।१।।

बिंदु गिरकर सिंधु में, अब सिंधु ही है हो गया ।
सिंधु बनकर बिंदु का, अस्तित्व ही है खो गया ।
सिंधु की जो है वही है, बिंदु की भी अस्मिता ।।२।।

वृत्ती की धारा पलट दी, वृत्ती राधा बन गई ।
मिट गया है ‘ज्ञान’ केवल मूर्ति प्रभु की रह गयी ।
कौन अब किस से कहे यह, धन्यता, यह पूर्णता ।।३।।

मनुष्यामध्ये कार्यामागचे कारण शोधून काढायची एक स्वाभाविक इच्छा असते. ईश्वरानेच त्याला सर्व भूतमात्रांपेक्षा वेगळी, श्रेष्ठ अशी ब्रम्हावलोकधिषण बुद्धी (ब्रम्हाला अवलोकन करण्याची बुद्धी ) दिलेली आहे, त्यामुळे सात्विक आणि कुशाग्र बुद्धीचे साधक, आपल्या जीवाचे मूळ स्वरूप, ते ईश्वरी तत्व, जाणण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.

अर्थात् ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न द्वैतातला असतो आणि त्याचे अधिष्ठान ‘मी’ असते. त्या ‘मी’चे समाधान होईपर्यंत, त्याचे अथक प्रयत्न चालूच असतात. मग ईश्वर दर्शनार्थ तीर्थयात्रेपासून, श्रवण, मनन, उपासनेपासून, थेट ध्यानधारणेपर्यंत अनेक प्रकारचे यत्न चालू राहतात. सद्गुरुंचं मार्गदर्शन घेतात, संत वचनांचा आधार घेतात, पण ध्येय दूरच राहतं. म्हणून श्री ज्ञानराज महाराज म्हणतात,

जब तलक मैं था, उसे मैं हर तरफ था खोजता ।

एक वेळ अशी येते की, साधकाची शक्ती संपून जाते, बुद्धीचे सामर्थ्य तोटके ठरते. तळमळ मात्र वाढत जाते. साधक अगतिक होतो. त्याचा अहंकार गळून पडतो. साधकाचा ‘मी’ पूर्णपणे शरणागत होतो. मनाची विलक्षण गतीही इथे अवरुद्ध होते. बुद्धीवृत्तीही शांत होतात. श्रीजींनी याचे सुंदर वर्णन काव्यबद्ध केले आहे.

दौड अपनी छोडकर मैं जब, अचानक रुक गया ।
भूलकर अपनी अकड जब, थक गया औ’ झुक गया ।

जेव्हा “मी’ पूर्ण शरणागत होतो, तेव्हाच आत्मारामाच्या तेजाने बुद्धी प्रकाशते आणि त्या आत्मबोधाने साधकाचे अंतःकरण आनंद, पवित्रता, निर्मलता, प्रसन्नता यांनी भरून जातं.

त्या शरणागतीची व्याख्या ज्ञानोबा माऊलींनी फार सुंदर शब्दांत केलेली आहे. माऊली म्हणतात,

आपुलेनि भेदेविण । जे जाणिजे एकपण ।
तया नाव शरण । मज येणे गा ।।

श्रीजी भक्तिमार्गातील अग्रणी असल्याने, त्यांनी ही प्रक्रिया अतिशय भावपूर्ण, उत्कट शब्दात वर्णिली आहे.

भूलकर अपनी अकड जब, थक गया औ’ झुक गया ।
आ गया बाहे पसारे प्रभू स्वयं ही भागता ।।

‘मी’ पूर्णपणे शरण गेला की त्याचे कर्तेपण पूर्णपणे विरून जाते. तेव्हा त्याला व्यापणारा आत्मप्रकाश इतका अचानक, तात्काळ आणि व्यापक स्वरूपाचा असल्याने, श्रीजी त्याचे वर्णन उत्कट भावाने करतात,

आ गया बांहें पसारे, प्रभु स्वयं ही भागता ।।

साधकदशेत उपासनेसाठी द्वैताचा स्वीकार करावाच लागतो पण, सिद्धावस्थेत अद्वैताचाच अनुभव यावा लागतो. जस ज्ञानेश्वर माऊली म्हणते,

द्वैत दशेचे आंगण । अद्वैत वोळगे आपण ।
भेदू तंव तंव दूण । अभेदासी ।।

या अद्वैत दशेचा दृष्टांत श्रीजींनी बिंदु आणि सिंधुच्या स्वरूपात दिला आहे.

बिंदु गिरकर सिंधु में, अब सिंधु ही है हो गया ।
सिंधु बनकर बिंदु का, अस्तित्व ही है खो गया ।

जलबिंदुचे आकारमान सागराच्या मानाने ते किती! पण बिंदु सागरात पडतो, तेव्हा सागरच होऊन जातो. त्याचं अस्तित्व वेगळेपणाने दाखवता येत नाही. म्हणून श्रीजी पुढे म्हणतात,

सिंधु की जो है वही है, बिंदु की भी अस्मिता ।।

भेदच नाही. जसं संत तुकोबा म्हणतात,

देव पाहायासी गेलो । देव होवोनिया ठेलो ।।

तसेच,

गोडपणी जैसा गुळ । तैसा देह झाला सकळ ।
आता भजू कोणेपरी, देव सबाह्य अंतरी ।।

श्रीजींनी समजावल्याप्रमाणे, आपली इंद्रिये बहिर्मुख असल्यामुळे, आपल्या वृत्तीला बाहेर विषयांकडे धावण्याची ओढ स्वभावतःच असते.

पराञ्चि खानि व्यतृणत् स्वयम्भूः,
तस्मात् पराङ् पश्यति नान्तरात्मन् । (कठोपनिषद)

त्यामुळे ते अंतरात्म्याला पाहू शकत नाही. बाहेरील विषय हे विषमय असल्याने, मग दुःखाची अनुभूती होते. सुखरूप आत्म्याच्या भेटीची उत्कट असेल तर,

अंतर्मुख वृत्ति करी, जरी बघणे असेल हरी ।

ईश्वर दर्शनाच्या ओढीने बाहेर धावणाऱ्या वृत्तींची धारा जर उलट दिशेने अंतर्मुख केली तर, त्याच वृत्ती राधा बनतात. ते ईश्वर प्रेमही मग ‘यथा वज्रगोपिकानाम्’ असे परम उत्कट बनते, जे ईश्वराला अतिप्रिय आहे. श्रीजी म्हणतात,

वृत्ती की धारा पलट दी, वृत्ती राधा बन गई ।
मिट गया है ‘ज्ञान’ केवल मूर्ति प्रभु की रह गयी ।

मग त्या जीव शिवाच्या मिलनामध्ये जीव, जो मूळतः ब्रह्मरुपच असतो, त्याचे जीवपण पार विरघळून जाते आणि एकटा एक सत् चित् घन आनंदरुप असा परमात्माच राहतो.

स्वामी वरदानंद भारती यांनी या राधाकृष्णाच्या मिलनाचे सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात,

श्रीहरिची जी चिन्मय छाया ।
मिठी देत तिज दृढ यदुराया ।
शुभ मीलन नच भेद कळावा ।
कवन राधिका कवण हरी वा ।।

हा तत्वज्ञानाबरोबर आलेला भक्तीचा गोडवा आहे. याप्रमाणे द्वैताला अधिष्ठान असलेला ‘मी’, अहंकार जर विसर्जित झाला तर, त्या भक्ताला आता ज्ञान मिळवायचे नसते. तो ज्ञानरुपच होतो, सुख मिळवायचे नसते तो सुखरुपच होतो. श्रीजींनी या स्थितीचे सुंदर वर्णन केले आहे.

मिट गया है ‘ज्ञान’ केवल मूर्ति प्रभु की रह गयी ।

या ज्ञानी भक्ताची स्थिती समजावण्यासाठी श्रीजींनी ईशावास्य उपनिषदातील श्रुति सांगितली आहे,

यस्मिन् सर्व भूतानि आत्मैवाभूत विजानतः ।
तत्र को मोहः कः शोकः एकत्वमनुपश्यतः ।।

आता सर्व भूतमात्रा आत्मवत् दिसू लागल्यावर त्या विद्वानाला मोह किंवा शोक कसा होणार ? ‘सर्वं खाल्विदं ब्रह्म’ ही पूर्णमद: पूर्णमिदं’ अशी पूर्णत्वाची स्थिती असताना, श्रीजी म्हणतात,

कौन अब किस से कहे यह, धन्यता, यह पूर्णता ।।

अपरोक्षानुभूतीचे हे प्रसादिक काव्य श्री ज्ञानराज प्रभुमहाराजांनी अत्यंत दयाळू होऊन, साधकांसाठी प्रकट केले आहे. त्यामुळे साधकांना योग्य मार्गाचा आराखडा मिळाला, हे खरेच.

या पंथावर पाऊले पुढे पडण्यासाठी भक्ती, निष्ठा, धृती, बल यांचा आशीर्वाद श्रीजींनी द्यावा, अशी विनम्र प्रार्थना त्यांच्या पवित्र चरणी करते.

[social_warfare]