सगरोळी, नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील तेलंगण, कर्नाटक व महाराष्ट्र यांच्या सीमेवर ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले एक प्राचीन गाव आहे. सगरोळीचे एकेकाळचे नाव सावरवल्ली असे होते. या परिसरात अनेक शिलालेख आहेत. श्री गुरुचरित्रामध्ये उल्लेख असलेले श्रीक्षेत्र बासर आणि तेथील सरस्वतीचे शक्तिपीठ (श्री नृसिंहसरस्वती महाराजांशी सायंदेवाची प्रथम भेट इथेच झाली.) आजच्या घडीला द्रष्टे कर्मयोगी कै. बाबासाहेब देशमुख यांनी स्थापन केलेली संस्कृती संवर्धन मंडळ ही स्वयंसेवी संस्था आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून विस्तारित झालेल्या अनेक उपसंस्था हीच सगरोळी गावाची मुख्य ओळख बनून राहिली आहे. येथील कृषी विकास केंद्र संपूर्ण भारतामध्ये आपली छाप पाडून, आपली वेगळी ओळख जपून आहे. सध्याच्या काळात नांदेड जिल्ह्यामध्ये आधुनिकदृष्ट्या सर्वांग सुधारणेचे आदर्श गाव अशी सगरोळीची ख्याती आहे.
सगरोळी गाव मांजरा नदीकाठी आहे. येथे मांजरा आणि मन्याड नद्यांचा संगम आहे. गावाच्या खाली कुंदकुर्ती येथे मांजरा आणि गोदावरी नदीचा संगम आहे या भागाला गोदा पंचक्रोशी असेही म्हणतात. उत्खननात सापडलेल्या अनेक ऐतिहासिक वस्तूंच्या आधारे हे गाव सातवाहनांच्या काळात वसलेले असावे, असे मानायला अनेक आधार आहेत. सगरोळीचा भाग कधीकाळी सातवाहन, चालुक्य, काकतीय इत्यादी राज्यांत होता. पुढे तो बहामनी, कुतुबशाही व निजामाच्या अंमलाखाली राहिला. पेशव्यांच्या काळात देशमुख-देशपांडे चौथ वसुलीसाठी सर्वत्र पसरले. ते गढी उभारून मुलकी व्यवस्था पाहत. तहसील वसूल करून ठराविक भाग सरकारात जमा करीत. सगरोळी येथे आजही देशमुख (देसाई) कुटुंबाची पाच बुरुजांची गढी आहे. पेशव्यांनी ह्या देशमुखांना सनदा देऊन करीमनगरपर्यंतच्या भागाची जबाबदारी सोपविली होती. सगरोळी गावामध्ये श्रीप्रभु मंदिराच्या बाजूला चालुक्यकालीन गणपतीचे मंदिर आहे. या मंदिरात शेंदूरचर्चित गणपतीची भव्य मूर्ती मन वेधून घेते.
सगरोळी गावाचा आणि माणिकनगरचा हृदय संबंध आहे. जवळपास सर्व गावच प्रभुसेवेत आहे. माणिकनगरच्या उत्सवांमध्ये सगरोळी गावच्या अनेक अभिमानी प्रभुभक्तांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या पाहायला मिळतात. सगरोळीचा श्री माणिकप्रभु संस्थानाशी कसा संबंध आला ह्याचा मागवा घेण्याचा थोडासा प्रयत्न केला असता, श्रेष्ठ, संत-महात्मे ह्या भागात (श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या मुधोळ वगैरे दौऱ्यावेळी) येत आहेत, तेव्हा आपणही त्यांना आपल्या गावी निमंत्रित करावे, असा विचार येऊन जहागिरीचे प्रमुख या नात्याने कै. अमृतराव देशमुख (बापूसाहेब) (श्री. देवीदास दादांचे पणजोबा) ह्यांनी त्यांना निमंत्रित केले असावे, अशी माहिती श्री. देवीदास दादांनी दिली. हा काळ साधारणतः १९०१-१९०३च्या दरम्यान असावा. म्हणजे साधारणतः सव्वाशे वर्षापासून सगरोळीच्या ग्रामस्थांची श्री माणिक प्रभु संस्थानाशी नाळ जोडली गेली आहे.
बापूसाहेबांचे नारायणराव आणि गोविंदराव असे दोन पुत्र. उभयतांचा तुळजापुरात जाण्याचा वार्षिक नेम होता. पुढे तुळजापूरच्या भवानीने सांगितले की, तू आता थकला आहेस, याकरिता तू येऊ नकोस, मीच तुझ्याबरोबर तुझ्याकडे येते. मात्र, तू मागे पाहू नकोस! जर मागे पाहिले तर मी त्याच ठिकाणी राहीन! देशमुख मागे न पाहता निघाले, सगरोळीच्या सीमेपर्यंत आल्यावर खरोखरच श्री भवानी आली की नाही म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले आणि देवी तिथेच थांबली, अशी दंतकथा आहे. सगरोळीच्या सीमेवर जिथे देवी गुप्त झाली, त्या स्थळी देशमुखांनी देवीचे देऊळ उभारले आहे. प्रथम देवीचे मानपान होऊन, नंतर नवरात्र उत्सव आरंभ होतो. याच देवीच्या आज्ञेवरून देशमुख श्री प्रभुंच्या दर्शनास गेले आणि महाराजश्रींच्या हस्ते प्रसाद घेऊन आले. गावात श्री प्रभुगादीची स्थापना केली. श्रीदेवी नवरात्राप्रमाणेच, श्रीप्रभु गादीचा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. संप्रदायदृष्ट्या शिष्यवृंद नात्याने सगरोळी आणि माणिकनगर एकजीव बनले आहेत.
आपल्या पहिल्या सगरोळी दौऱ्याच्या वेळी श्री मार्तंड माणिकप्रभु, सध्याचे जे शारदानगर आहे, तेथे राहत. पूर्वी हा भागावर मोहाच्या झाडांचे जंगल होते. बालाघाटाच्या डोंगररांगाच्या कुशीत असलेल्या या निसर्गरम्य स्थानी महाराजश्रींचा मुक्काम असे. बाबासाहेब लहान असतानाच त्यांचे मातृ-पितृछत्र हरपले. आजीने आणि चुलत्यांनी त्यांचा सांभाळ केला. बाबासाहेब लहानपणी अत्यंत शामळू स्वभावाचे होते. त्यांच्या आज्जीला त्यांची चिंता लागून राहायची. एक दिवस धीर धरून त्यांनी श्री मार्तंड माणिक प्रभुंना आपल्या नातवाबद्दल विचारले. तेव्हा महाराजश्री म्हणाले, याची अजिबात चिंता करू नका, हा एक दिवस खूप मोठा माणूस होईल. पुढे आजींचे वय झाल्यामुळे त्यांना गढीच्या बाहेर असलेल्या प्रभु मंदिरातही जाता येईना, तेव्हा श्री मार्तंड माणिकप्रभुंनी आजींना त्यांच्या घरीच प्रभुगादीची स्थापना करून दिली. घरातील श्री देवीच्या देव्हाऱ्याशेजारच्या खोलीत एक प्रसादाची डबी भरून जमिनीत ठेवली व त्यावर एक छोटासा कट्टा उभारला. रोज त्या कट्ट्याची पूजा करण्याची आज्ञा देशमुख यांना देवून ही खोली कोणी वापरू नये, अशी ताकीद दिली. दौऱ्यादरम्यान येथे नित्य श्री नित्य मंगल होत होते. महाराजश्रींचा दौरा संपल्यानंतर कोणी एक विद्वान सत्पुरुष संचार करीत सगरोळीस आले. त्यांची पाद्यपूजा, दर्शन वगैरे कार्यक्रम संपल्यावर श्रीदेवीचे दर्शन घेऊन झाल्यावर त्या सत्पुरुषांचे लक्ष देवीच्या शेजारील खोलीकडे गेले. एकांतात अशी सोईस्कर ही खोली झोपावयास बरी आहे असे पाहून, त्यांनी देशमुखांच्या नोकरास आपली झोपण्याची व्यवस्था त्या खोलीत करायची आज्ञा केली. पुढे ते सत्पुरुष त्या खोलीत झोपले असता, त्यांना सटक्याचा मार बसून, “येथून चालता हो” असे शब्द होऊन, खोली बाहेर फेकले गेले. देशमुखांना हे वर्तमान समजताच त्यांनी त्या सत्पुरुषांना नम्रतेने सांगितले की, ह्या खोलीत जो लहानसा कट्टा आहे, त्यात श्री प्रभुंचा प्रसाद ठेवला आहे. दररोज त्या कट्ट्याची पूजा झाल्यावर नंतर ती खोली कुणालाही वापरास देत नाहीत आणि तिकडे कुणीही जात नाही. त्यानंतर त्या सत्पुरुषांनी श्रीदेवीच्या दर्शनानंतर बाजूच्या खोलीतील कट्ट्यांवर फुले वाहून नमस्कार करण्याचा नित्यक्रम ठेवला होता. आजींना दिलेली प्रसादाची ती डबी आजही आपल्याला देशमुखांच्या पूजेमध्ये पाहता येते. श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या वास्तव्याने, त्यांच्या पादस्पर्शाने पुनित झालेल्या ह्या पुण्यभूमीतच कै. बाबासाहेबानी संस्कृती संवर्धन मंडळाचे बीज रोवले. श्री प्रभुच्या असीम कृपेने आणि कै. बाबासाहेबांच्या अविश्रांत परिश्रमाने आजच्या घडीला आपल्याला संस्थेचा हा डेरेदार वटवृक्ष बहरलेला दिसतो.
मंगळवारी सकाळीच श्री व्यंकम्मादेवी मंदिरात ओटी भरून कुंकुमार्चन केले. थोडा वेळ माणिक प्रभु अंध विद्यालयात मुलांसोबत रमलो. दुपारी भंडारखान्यातील महाप्रसादानंतर तयारीनिशी श्रीजींच्या निवासस्थानी आलो. दुपारी दोनच्या सुमारास भक्तकार्य कल्पद्रुमच्या जयघोषात श्रीजी श्री प्रभुमंदिरात दर्शनासाठी निघाले. श्री माणिकप्रभु संजीवन समाधीचे मनोभावे दर्शन घेऊन, त्यांची प्रार्थना करून, आरती केली, आशीर्वाद घेतले आणि पुढे श्री मनोहर प्रभुंच्या समाधीपुढे नतमस्तक झाले. त्यानंतर श्रीजी, श्री मार्तंड माणिक प्रभुसमाधीसमोर आले. वर वर्णन केल्याप्रमाणे श्रीजींचा श्री मार्तंड माणिकप्रभु समाधीशी जणू काही संवाद झाला. श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधी समोरच, श्रीजी, श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या चांदीच्या पादुका आणि खारकांचा प्रसाद स्वीकारतात. संपूर्ण दौऱ्यादरम्यान ह्याच पादुकांचे भक्तांच्या घरोघरी पूजन होते. श्री मार्तंड माणिकप्रभु समाधीची आरती करून, त्यांना निमंत्रण देऊन पुढे श्री शंकर माणिकप्रभु आणि श्री सिद्धराज माणिकप्रभु यांच्याही समाधीसमोर नतमस्तक झाले. श्रीप्रभु दर्शनानंतर श्रीजी पुन्हा निवासस्थानी आले. दौऱ्यामध्ये श्रीजींबरोबर असणाऱ्या सर्व सेवेकऱ्यांनी श्रीजींचे आशीर्वाद घेतले. श्रीजींचा आशीर्वाद मिळाल्यामुळे आपला दौरा निर्विघ्नपणे पार पडणार, अशी सर्वांचीच मनोमन खात्री झाली. दौऱ्यामध्ये श्री. गुरुनाथ गुरुजी (मुख्य अर्चक), श्री. नरसिंह गुरुजी, श्री. तिरुमल गुरुजी होते आणि सेवेकऱ्यांमध्ये श्री. राजेश गिरी, श्री. माणिकलाल, श्री. इसामभाई, श्री. वीरप्पा आणि निर्मलाकाकूही सहभागी झाल्या होत्या. दुपारी साधारण साडेतीनच्या सुमारास भक्तकार्याच्या जयघोषात माणिकनगरहून आम्ही सगरोळीसाठी प्रस्थान केले.
वातावरण ढगाळ होते. अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या बारीक सरी, मनास प्रफुल्लित करत होत्या. संध्याकाळी सुमारे सहाच्या दरम्यान आम्ही देगलूरला श्री. राजेश्वर देशपांडे यांच्या घरी पाद्यपूजेसाठी पोहोचलो. श्रीजींच्या आगमनाने देशपांडे कुटुंबात लगबग चालू झाली. श्रीजींची पाद्यपूजा झाल्यावर दारामध्ये पांढरी शुभ्र गाय येऊन उभी राहिली. सौ. रमा देशपांडेकाकूंनी सर्वांसाठी मुगडाळीची भजी केली होती. त्या गरमागरम नाश्त्याची चव जिभेवर रेंगाळत असतानाच, आम्ही श्री. पुरुषोत्तम देशपांडे यांच्या निवासस्थानी पोहोचलो. तेथेही श्रीजींची पाद्यपूजा झाली. श्री. मार्तंड माणिक प्रभु आपल्या कार्यकाळात सगरोळी दौऱ्याहून माणिकनगरला येताना श्री. पुरुषोत्तमकाकांच्या घरी तीन दिवस राहिले होते. त्या जुन्या आठवणींना येथे उजाळा मिळाला. त्यानंतर आणखीन एक प्रभुभक्त श्री. अरुण शेळकीकर ह्यांच्याकडे श्रीजींची पाद्यपूजा झाली. अधिक श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच श्रीजींचे आगमन आपल्या घरी झाल्यामुळे, देगलूरच्या प्रभुभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सात सव्वा सातच्या सुमारास आम्ही देगलूर सगरोळीसाठी निघालो आणि संध्याकाळी आठ वाजता सगरोळीच्या प्रभुमंदिरात पोहोचलो.
पावसाची रिपरिप चालू होती, परिसरातील लाईट गेलेली, पण सगरोळीकरांच्या उत्साहामध्ये तसूभरही कमी नव्हती. अनेक प्रभुभक्तांची श्रीजींच्या स्वागतासाठी श्रीप्रभुमंदिर परिसरात दाटी झाली होती. श्रीप्रभु मंदिरास लावलेले, मांगल्याचे प्रतिक असलेले नारळाचे झाप, प्रभुमंदिरासमोर काढलेल्या आकर्षक रांगोळ्या मन वेधून घेत होत्या. फटाक्यांच्या आतिषबाजीने श्रीजींचे स्वागत केले गेले. सुवासिनींनी श्रीजींना ओवाळले. भक्तकार्यच्या जयघोषात श्रीजी श्रीप्रभु मंदिरापाशी पोहोचले. गाभाऱ्यात श्रीदत्त, श्री गणपतीबरोबरच श्री माणिक प्रभुंची अत्यंत सुबक, संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. बाजूलाच एका आरामखुर्चीमध्ये श्री मार्तंड माणिक प्रभुंचा फोटो ठेवला आहे. आपल्या सगरोळी भेटीत महाराजश्री ह्या खुर्चीत बसत. गावकऱ्यांनी आजही ती खुर्ची अत्यंत आत्मीयतेने जपली आहे. तसेच श्रीजींनी दिलेले तीन सटके, त्यांची काठी, त्रिशुळ ह्याही वस्तू गाभाऱ्यामध्ये नेटकेपणे जपून ठेवलेल्या आहेत. श्रीप्रभु मंदिरामध्ये आरती करून आम्ही संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेचे प्रमुख आणि दौऱ्याची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे सांभाळली असे बंधूत्रय, श्री. देविदासदादा, श्री. प्रमोद दादा आणि श्री. सुनील दादा यांच्या शारदानगर येथील निवासस्थानी सव्वा आठच्या सुमारास पोहोचलो. घरच्या सुवासिनींच्या औक्षणानंतर सायंकाळचे भक्तकार्य येथेच झाले. देशमुखांच्या घरी रात्रीचे गरमागरम भोजन करून आम्ही संस्थेच्या विश्रामगृहात स्थिरस्थावर झालो. येथेही भरपूर पाऊस होता. उत्तम नियोजन, उतरण्यासाठी स्वच्छ आणि निसर्गरम्य जागा, चोख व्यवस्था आणि दिमतीला अत्यंत तत्पर मदतनीस, ह्यामुळे पहिल्याच भेटीत सगरोळीकरांनी मन जिंकून घेतले.
श्री प्रभुचरित्रातील श्री माणिकप्रभुंचे श्री मार्तंड माणिकप्रभु संदर्भातील एक वाक्य माझ्या मनःपटलावर कायमचे कोरले गेले आहे ते म्हणजे,
श्री प्रभुचरित्रातील श्री माणिकप्रभुंचे श्री मार्तंड माणिकप्रभु संदर्भातील एक वाक्य माझ्या मनःपटलावर कायमचे कोरले गेले आहे ते म्हणजे,
“माणिकनगरसारखी छप्पन संस्थाने निर्माण करण्याचे सामर्थ्य त्याच्यात (श्री मार्तंड माणिकप्रभुंमध्ये)आहे.”
श्री सद्गुरु माणिकप्रभु यांनी सकलमत संप्रदायाची स्थापना करून, अवघ्या जगाला सर्वधर्म समभावाचा संदेश दिला आणि तत्कालीन विविध जातीधर्मांमध्ये सौहाद्रतेची मुहूर्तमेढ रोवली. श्री माणिक प्रभुंना अभिप्रेत असलेले सकलमत संप्रदायाचे हेच तत्त्वज्ञान व्यापकपणे जनमानसात पसरवण्याचे कार्य, श्री सद्गुरु माणिकप्रभुंचे पुतणे श्री सद्गुरु मार्तंड माणिकप्रभु यांनी केले. त्यांनी त्यावेळेसचे निजाम संस्थान, मुंबई आणि मद्रास प्रांतामध्ये लोककल्याणार्थ धर्मयात्रा काढून सकलमत संप्रदायाचा, त्याच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसारही केला. श्री माणिकप्रभु संस्थानाच्या पीठाचार्यांचा “दौरा” ही संकल्पना श्री मार्तंड माणिकप्रभु यांच्या झळाळत्या कारकिर्दीतच सुरू झाली.
धर्मचक्रप्रवर्तनार्थ महाराजश्रींनी अनेक दौरे केले. ज्याप्रमाणे गरीबांना धर्म भाकरीच्या तुकड्यांतून शिकवावा लागतो, त्याचप्रमाणे दुःखी, पीडित, आर्तजनांना तो त्यांच्या दुःख विमोचनातून पटवून द्यावा लागतो. महाराजश्रींसारख्या समर्थ, कनवाळू, संत शिरोमणींना याची पूर्ण जाणीव होती. त्यासाठी श्रीजींनी अनेक अलौकिक चमत्कार केले आणि त्यायोगे असंख्य दुःखितांचे अश्रू पुसले. कुणाला ऋणमुक्त केले, कुणाला असाध्य रोगापासून सोडविले, कुणाचा वांझपणा दूर केला, तर कुणाला मरणाच्या दारातून परत फिरवले. अनेकांची अडलेली कामे मार्गस्थ केली, अनेकांच्या आपत्ती दूर केल्या, अनेक भक्तांचे संकट निवारण केले आणि गोरगरिबांना यथायोग्य मदतीचा हात देऊन, त्यांच्या जीवनामध्ये आशेची नवी पहाट उगवून दिली. श्रीजींच्या ह्या दैवी सामर्थ्याने सर्व प्रकारच्या लोकसमुदायांची श्रीजींवर नितांत श्रद्धा बसली. दुःख निवारण आणि उपदेश या दोन माध्यमांद्वारे श्रीजींनी सामान्य जनतेची धर्मभावना जागवली आणि त्यांच्यामध्ये सत्प्रवृत्ती निर्माण करून, त्यांना भक्तिमार्गावर प्रशस्त केले. सामान्यजनांना त्यांच्या घरी जाऊन, त्यांना भेटून, त्यांच्यावरील संकट दूर करून, सकलमत संप्रदायाचे तत्त्वज्ञान त्यांच्यात रुजवून, त्यांना भक्तीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य श्रीजींनी आपल्या कारकीर्दीत केलेल्या अनेक अनेक ठिकाणी केलेल्या दौऱ्यांच्या माध्यमातून केले. अशा ह्या दौऱ्याची सुरुवात इसवी सन १९०० साली झाली. ह्याच वर्षी माणिकनगरमध्ये पहिला वेदांत सप्ताह पार पडला. महाराजश्रींचा पहिला दौरा गुलबर्गा, रायचूर, नारायण पेठ असा झाला. त्याकाळी श्रीजींचे दौरे महिनोंमहिने चालत. दौऱ्याची ही परंपरा त्यानंतरच्या सर्वच पीठाचार्यांनी आजतागायत सुरू ठेवली आहे. आजही दौऱ्याची सुरुवात श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन, त्यांना साक्षी ठेवूनच केली जाते. दौऱ्यादरम्यान सद्गुरुंचा निरंतर सहवास आपल्याला लाभतो आणि त्यांना जवळून पाहण्याची, अनुभवण्याची, त्यांचे गुणग्रहण करण्याची संधी लाभते. सद्गुरूंसोबतच्या छोट्या छोट्या प्रसंगातून, कृतीतून, त्यांचे चराचरांतील सर्व शक्तींवर असलेल्या नियंत्रणाचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार होतो आणि गुरुतत्व प्रसंगी किती सुक्ष्मपणे आणि प्रसंगी किती व्यापकपणेही निरंतर कार्यरत होत असते, याची आपल्याला जाणीव होते. ही जाणीवच मग आपल्या जीवनात उतरून, आपले जीवन हळूहळू कृतार्थतेचा अनुभव करू लागते.
एप्रिल २३ मधील नाशिक दौऱ्यामध्ये सद्गुरूंच्या सहवासाचे महत्व कळले होते. मे महिन्यात श्रीजींचा सगरोळी दौरा ठरत असतानाच सगरोळीचे अनन्य प्रभुभक्त श्री. देविदास देशमुख (देसाई) दादांनी प्रणिलभाऊ, तुम्ही श्रीजींच्या दौऱ्यादरम्यान सगरोळीला यावे, असे आग्रहाचे निमंत्रण दिले. एक वेळ पंचपक्वान्नाचे भोजन नाकारता येईल, पण प्रभुभक्तांच्या विनंतीला नाही म्हणणे, फार अवघड काम असते, हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. श्रीजी आपल्या प्रवचनातून नेहमी म्हणतात की, आपण ज्या वस्तूचे सतत चिंतन करतो, एक ना एक दिवस आपण त्याचेच स्वरूप होऊन जातो. भक्तकार्य कल्पद्रुम ब्रीदावली आपल्या कंठामध्ये अखंड मिरवीत असलेले अनेक अनेक प्रभुभक्त जणू प्रभुस्वरूपच झालेले असतात आणि अशा अभिमानी भक्तांकरवी श्रीप्रभुच जणू काही आपल्याला पालवत असतो. “ही सर्व केवळ त्या प्रभुचीच इच्छा”, असे समजून दादांना त्वरित होकार कळवला. मंगळवार दिनांक १८ जुलै ते शुक्रवार दिनांक २१ जुलै दरम्यान श्रीजींचा सगरोळी-करडखेड दौरा आयोजित करण्यात आला होता. दौऱ्यासाठी १५ जुलै, शनिवारीच माणिकनगरमध्ये दाखल झालो. सोमवारी सोमवती अमावस्येला शंकराचाच अवतार असलेल्या श्री माणिकप्रभुंच्या संजीवनी समाधीचे दर्शन आणि सेवेची संधी मिळाली. श्रीजींची मनोभावे पाद्यपूजा केली. श्रीगुरु आज जणू मेघ बनूनच बरसत होता. गुरुकृपेच्या ह्या वर्षावात असे चिंब भिजणे अत्यंत आनंददायी असते. पावसामुळे बाहेर थंडावा होता आणि समोर मनसोक्त घडत असलेले श्रीप्रभुदर्शन अंतरास शितलता प्रदान करत होत होतं. श्री प्रभुमंदिरातील रात्रीच्या भजनानंतर सगरोळीच्या दौऱ्याची तयारी करुन समाधानाने निद्रादेवीच्या कुशीत विसावलो.
सगुण ध्यान
सगुणातून निर्गुणात अलगदपणे नेणारा ध्वनीध्यानाचा नितांत सुंदर आविष्कार
जय माणिक दत्त दिगंबर महाविरागी
निश्चल मौनप्रिय सकलपंथ अनुरागी
रुद्राक्षभस्मप्रिय दंडकमंडलधारी
श्री दर्शनसे प्रमुदित है सब नर नारी
निजभक्तहृदयमंदिरके नित्य विहारी
हे दुःखभंजन सुखदायक मंगलकारी
मस्तकपर चंदन तिलक जचे कस्तुरी
नयनोंके बिचोबीच छटा सिंदूरी
अधरों पर छाई मृदू मुस्कान अधुरी
मुखमंडल की आभा निखरी है पुरी
उपर है शितल औदुंबर की छाया
चरणों में बैठी हुई मधुमती माया
भवरें मंडराते अमृतमय चरणोंपर
चंपा गुलाब लज्जितसे बिखरे भू पर
कज्जलरंजित दृग दिव्यकांतीमय काया
कांधोंपर छायी जटाजूट की छाया
श्यामल सुंदर दैदीप्यमान मुखमंडल
कानों में सोहे पद्मरागके कुंडल
वक्षस्थलपर सुंदर तुलसी की माला
तनपर ओढे जरतारी लाल दुशाला
सिद्धासनमें चिन्मुद्रासहित विराजे
सम्मुख चंदन के दिव्य खडाऊं साजे
उस निर्विकल्प माणिक की इस आकृती को
नित धरो नयनमें, धो डालो विकृती को
इस सगुण ध्यानसे तुम निर्गुणको जानो
जो अनिर्वाच्य अपना स्वरुप पहचानो
प्रभु बरसायेंगे पूर्ण कृपा की धारा
होगा प्रभात छट जायेगा अंधियारा
फिर आयेगी वह निजानंद की वेला
दिन रैन मनाओ सहजमुक्ती का मेला
-श्री चैतन्यराज प्रभु
माझ्या अत्यंत आवडत्या कवींपैकी एक, श्री चैतन्यराज. श्री चैतन्यराज प्रभुंच्या आजवर मोजक्याच काव्यरचना आहेत, पण त्या सर्व रचनांमध्ये असे काही खास आहे की, जे थेट हृदयाशी जाऊन भिडते. अलीकडेच त्यांनी सगुण ध्यान ही श्री माणिकप्रभुंच्या सगुणरूपाचं वर्णन करणारी अप्रतिम अशी काव्यरचना केली आहे. ती ऐकल्यापासून मन सतत प्रभुपाशीच रुंजी घालतेय. गेले काही दिवस ह्या गाण्याला मी ध्वनी ध्यान या स्वरूपात ऐकतोय आणि या गाण्यातून प्रभुला पाहताना, ऐकताना, गाण्याच्या शेवटी आपणही, अगदी अलगदपणे, स्वतः प्रभुस्वरूप असल्याचा अनुभव घेतो, ही ह्या गाण्याची ताकद आहे, ही ती दिव्य प्रभुकृपा आहे आणि हीच ती प्रभुमयता आहे.
अलीकडेच प्रभुमंदिर परिसरात, श्री ज्ञानराज माणिक प्रभुंच्या संकल्पनेतून सत्यात उरलेली आणि श्री चैतन्यराज प्रभुंनी स्वतःच्या देखरेखीखाली, प्रभुंचा संपूर्ण जीवनपट उलगडवून दाखवणारी प्रभुलीलांची सचित्र परिक्रमा प्रदर्शित केली गेली आहे. ही सचित्र परिक्रमा करतानाच आपण त्या त्या चित्राशेजारी श्रीप्रभुच्या लीलांमध्ये हरवून जातो. पण त्याच चित्रांमध्ये श्रीप्रभुला ज्याप्रकारे अतीतर भावाने श्री पराग घळसासी ह्यांनी रेखाटले आहे, त्याकडे एकटक कितीतरी वेळ पाहिल्यावर, त्या चित्रांचे निरंतर ध्यान केल्यावर कदाचित असे दिव्य काव्यस्फुरण कवीला झाले असावे. अर्थात् श्री प्रभुप्रती पराकोटीचा प्रेमभाव व प्रभुचरणी दृढ श्रद्धा असल्यावरच अशी अत्यंत तरल शब्दसुमनांजली शब्दरूपाने साकारते.
परमात्म्याचे आपल्याला आवडणारे सगुण ध्यान ही साधकाच्या जीवनातील अत्यंत गरजेची आणि महत्वाची पहिली पायरी आहे. परमात्म्याच्या सगुण रूपाचे ध्यान का आवश्यक आहे, हे उद्धृत करणारी श्री माणिक प्रभुंची, सगुण रूप नयनीं आधी दावा मग तुम्ही वेदांत गावा ही काव्यपंक्ती प्रसिद्धच आहे आणि नेमका हाच धागा पकडून श्री चैतन्यराज आपल्याला प्रभुच्या सगुण स्वरूपाची सफर घडवतात. परमात्माच्या निर्गुण रूपाची अनुभूती घेण्यासाठी, ती योग्यता आपल्या ठायी बाणवण्यासाठी प्रभुची सगुण उपासना अत्यंत आवश्यक आहे.
ध्यानाला बसण्यापूर्वी आपण जशी शुद्धी क्रिया करतो, त्याचप्रमाणे सहजासनात बसल्यावर, सुरुवातीचा धीरगंभीर आलाप, आपल्याला ह्या गीताच्या ध्वनीध्यानासाठी सिद्ध करतो. श्री प्रभुचा अवतार अत्यंत कनवाळू होता. ज्यांनी श्री प्रभुचरित्र वाचले आहे किंवा माणिकनगरला भेट दिली आहे, त्यांच्या मनामध्ये भक्तकार्यकल्पद्रुम श्रीप्रभुची एक विशिष्ट, आत्मीयतेने जपलेली, आदरयुक्त छबी आहे. सुरुवातीच्या सहा ओळींमध्ये प्रभुंचे जे अत्यंत तरल वर्णन केले आहे, ते तुम्हाला ध्यानामध्ये प्रभुच्या अगदी जवळ घेऊन जाते, शब्दांगणिक बदलणाऱ्या प्रभुच्या छबीनुसार, तुम्ही मनानं एका अज्ञाताच्या प्रवासाला निघता. या गीताची चाल अतिशय संथ आहे आणि दोन ओळींमध्ये अनुभवायला येणारी धीरगंभीर शांतता आपल्याला समाधी अवस्थेकडे नेते. हे गीत अनेक अनेक वेळा ऐकल्याने त्या त्या शब्दांबरोबर असलेली प्रभुंची रेखाचित्रे डोळे बंद केल्यावरही जशीच्या तशी नजरेसमोर साकारतात आणि आपण प्रभुच्या सन्मुख बसल्याचा अनुभव येऊ लागतो.
जय माणिक दत्त दिगंबर महाविरागी
निश्चल मौनप्रिय सकलपंथ अनुरागी
रुद्राक्षभस्मप्रिय दंडकमंडलधारी
श्री दर्शनसे प्रमुदित है सब नर नारी
निजभक्तहृदयमंदिरके नित्य विहारी
हे दुःखभंजन सुखदायक मंगलकारी
श्री दत्त महाप्रभु आणि माणिक प्रभु ह्यांच्यात अजिबातच भेद नाहीयेय, दोन्ही एकच आहेत, आणि येथे कवी महाविरागी ह्या शब्दांनी भगवान दत्तात्रेयांच्या वैराग्याचा जयजयकार करत आहेत, कारण वैराग्याशिवाय साधना प्रारंभ केली जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच कवितेच्या सुरुवातीलाच वैराग्याचा उल्लेख ठळकपणे केला आहे. त्यानंतर श्री प्रभुंच्या दिव्य विशेषणांचे वर्णन करताना प्रभुचा मौनभाव अधोरेखित केला आहे आणि हा मौनभाव साधकालाही प्राप्त व्हावा, अशी उदात्त भावना कवी शब्दांमध्ये गुंफत आहे. जो सर्वच धर्मांमध्ये, पंथांमध्ये प्रिय आहे आणि ज्याला सर्वच धर्म आणि पंथ प्रिय आहेत, अशा प्रभुचे सकलपंथ अनुरागी हे विशेषण प्रभुची अस्ति भाति प्रियताच दाखवते. लहानपणीच मामाच्या घरातून निघाल्यावर किशोर वयातील, अमृतकुंडाच्या परीसरातील, अरण्याच्या एकांतवासातील, साधक अवस्थेचे वर्णन रुद्राक्षभस्मप्रिय, दंडकमंडलधारी ह्या शब्दांमध्ये मोठ्या खुबीने प्रकट झाले आहे. प्रभुंच्या ह्या तेजपुंज ध्यानाने भोवतालचे सर्व स्त्री पुरुष अत्यंत उल्हसित, प्रमुदित होत असत. आत्यंतिक भावनेने करुणा भाकणाऱ्या भक्तांच्या मन मंदिरात प्रभु नित्य येऊन विसावतो आणि त्यांचे दुःख नाहीसे करून, त्यांना सुख प्रदान करून, त्यांचे सदा सर्वदा मंगल करतो. प्रभु कसा आहे, हे सगुण वर्णन ऐकताना, त्यावेळेस अंतरंगात पाझरणाऱ्या भक्तिरसातून आपल्याला प्रभुबद्दल प्रेम उत्पन्न होऊ लागतं. आणि तो भक्तीरस पाझरवण्याचं काम ह्या काव्यपंक्ती परिणामकपणे करतात.
मस्तकपर चंदन तिलक जचे कस्तुरी
नयनोंके बिचोबीच छटा सिंदूरी
अधरों पर छाई मृदू मुस्कान अधुरी
मुखमंडल की आभा निखरी है पुरी
आपण प्रभुला प्रत्यक्षात पाहिले नाही, पण प्रभुंच्या संजीवन समाधी प्रसंगाचं प्रभुमंदिरात असलेलं चित्र, ह्या ओळींच्या वेळी प्रभुंचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला देत. प्रभु साक्षात कसा असेल, ही कल्पना प्रत्यक्षात उतरू लागते. दोन डोळ्यांच्यामध्ये असलेल्या भ्रुकटीमध्यामध्ये शेंदरी रंगाची छटेची कल्पना करतानाच आपल्याला तो शेंदरी रंग ध्यानामध्ये दिसू लागतो.
प्रभुंच्या दिव्यतेची अनुभूती यायला लागते, आपल्याला सुखाची जाणिव होऊ लागते. आणि ह्या सुखद भावस्थितीमध्ये प्रभुच्या ओठावरील मृदू हास्य अनिमिषपणे पाहताना, आपल्याही ओठावर नकळत स्मित हास्य झळकते. ह्यावेळेस आपल्या श्वासांच्या गतीत होणारे बदल अनुभवणं, हे नितांत सुखदायक आहे.
उपर है शितल औदुंबर की छाया
चरणों में बैठी हुई मधुमती माया
भवरें मंडराते अमृतमय चरणोंपर
चंपा गुलाब लज्जितसे बिखरे भू पर
ह्या ओळींबरोबर येणारे चित्र आपल्याला आणखी एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाते. माणिकनगरी असलेल्या औदुंबराच्या छायेत कट्ट्यावर श्रीप्रभु बसले आहेत आणि खाली बाजूलाच दत्तात्रयांची मधुमती शक्ती मधुमती श्यामलांबा अर्थात् प्रभुंची परमशिष्या योगिनी श्री देवी व्यंकम्मा जपध्यानामध्ये मग्न आहे. प्रभुंच्या चरणांचे वर्णन अद्वितीयपणे येथे केले आहे. अनेक भूंगे (भ्रमर) प्रभुंच्या अमृतमय चरणांवर रुंजी घालत आहेत आणि ते पाहून, अत्यंत लज्जित होऊन चाफा आणि गुलाब जमिनीवर पसरले आहेत. वास्तविक पाहता चाफा आणि गुलाबाच्या सुगंधाने भुंगे त्या फुलांवर आकर्षित व्हायला हवेत, पण प्रभुंचे चरण इतके अमृतमय आहेत की, चाफा आणि गुलाबाच्या मधुरसाची उपेक्षा करून भुंगे प्रभुचरणांवरच रुंजी घालत आहेत. येथे कवीमनाच्या कोमलतेचा, प्रभुमयतेचा अनुभव आपल्याला येतो. अत्यंत बारकाव्यांसहित केलेल्या या वर्णनाबरोबरच आपल्याला अंतरंगात चैतन्याची अनुभूती यायला सुरुवात होते. ह्या भूंग्यांसारखेच आपण चंपा, गुलाबारुपी विषयांपासून परावृत्त होऊन प्रभु चरणांकडे अधिकाधिक आकर्षित होतो.
कज्जलरंजित दृग दिव्यकांतीमय काया
कांधोंपर छायी जटाजूट की छाया
श्यामल सुंदर दैदीप्यमान मुखमंडल
कानों में सोहे पद्मरागके कुंडल
वक्षस्थलपर सुंदर तुलसी की माला
तनपर ओढे जरतारी लाल दुशाला
सिद्धासनमें चिन्मुद्रासहित विराजे
सम्मुख चंदन के दिव्य खडाऊं साजे
मनास प्रफुल्लित करणाऱ्या ह्या चैतन्यमय प्रवासानंतर आता कवी आपल्याला अद्वैताच्या यात्रेसाठी सिद्ध करतो. आपल्याला रोजच्या धकाधकीच्या जीवनातून, ध्यानात बसल्यावर ह्या गीतामधून एका चैतन्यमय ठिकाणी नेऊन, प्रभुसमोर बसवून, एकांतात अनुसंधान घडवतो. प्रभुच्या वरील वर्णनातून पुन्हा आपल्याला प्रभुच्या सगुण रूपाची तंतोतंत झलक अनुभवायला मिळते. या शब्दांबरोबरच आपण प्रत्यक्ष प्रभु दरबारात, प्रभुसमोर असून प्रभुचे हे दिव्य स्वरूप अनुभवतो आहे, असा भाव प्रत्यक्षात उतरायला लागतो. आणि हे ऐकतानाच डोळे बंद केलेल्या भाव अवस्थेत पुढच्या ओळी आपल्याला अंतरीच्या जगताची, आत्मस्वरूपाची सफर करूवून देतात.
उस निर्विकल्प माणिक की इस आकृती को
नित धरो नयनमें, धो डालो विकृती को
कवी म्हणतोय की, निर्विकल्प प्रभुच्या ह्या सगुण ध्यानाला आपण आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवा. जेणेकरून आपल्याला सर्वत्र प्रभुच दिसेल आणि मनामध्ये किंवा नजरेमध्ये कोणतीही विकृती शिल्लकच राहणार नाही. ही प्रभुमयता आपल्याला ह्या ओळी बरोबर परिणामकपणे जाणवते. पण खरी जादू पुढच्या ओळींमध्ये होते,
इस सगुण ध्यानसे तुम निर्गुणको जानो
जो अनिर्वाच्य अपना स्वरुप पहचानो
प्रभु बरसायेंगे पूर्ण कृपा की धारा
होगा प्रभात छट जायेगा अंधियारा
आपण जर श्री ज्ञानराज माणिक प्रभुंची वेदांतपर प्रवचन ऐकत असाल, तर श्रीजींनी आपल्यावर केलेले अद्वैताचे संस्कार येथे आपल्या अंतर्मनाशी चाळ करू लागतात. मी कोण आहे, याची असीम, विराट आणि व्यापक जाणीव आपल्याला होते. येथे कवीने आपल्याला केलेला निर्देश फार महत्त्वाचा आहे. सगुणातून निर्गुणाला ओळखण्याची गुरुकिल्ली जणू कवी आपल्या हाती सोपवत आहे. आणि एकदा का आपल्याला ह्यातील मेख कळली की पुढचं सर्व काही प्रभु पाहून घेईल, हे आश्वासनही आपल्याला प्रभु बरसायेंगे… ह्या काव्यपंक्ती करून देतात. प्रभुंचा कृपेने अज्ञानरूपी अंधकाराचा नाश होऊन, सर्वत्र ज्ञानाची प्रभा फाकेल हा विश्वासही अंतरात दृढ होतो.
मन अश्या आनंदाच्या लाटांवर स्वार झाले असतानाच, शेवटच्या पूर्णाहूतीच्या खालील दोन ओळी कानावर पडतात आणि आपण धन्यतेचा, पूर्णतेचा अनुभव करू लागतो. पूर्णानंदाच्या डोहामध्ये अथांग डुंबत राहतो. ही निजानंदाची वेळ मनास सच्चिदानंदाची प्राप्ती करून देते.
फिर आयेगी वह निजानंद की वेला
दिन रैन मनाओ सहजमुक्ती का मेला
दिन रैन मनाओ सहजमुक्ती का मेला
अशाप्रकारे सगुणाचे निरंतर ध्यान केल्यावर, आपल्याला प्रभुप्रती प्रेम उत्पन्न होऊन, आपण प्रभुच्या भक्तीमध्ये खोलवर उतरु लागतो. प्रभुशी आपली नाळ अधिकाधिक घट्ट होत जाते. वेदांत शास्त्राचे जे सार आहे, त्या प्रभुच्या निर्गुण रूपाला जाण्याच्या योग्यतेचे आपण होतो. सततच्या अभ्यासाने, निर्व्याज्य प्रभुभक्तीने, प्रभुच्या सगुण ध्यानातून, प्रभुच्या निर्गुण स्वरूपाच्या अनुभूतीची ती वेळ, एक ना एक दिवस अवश्य येईल, जेथे आपण सहज मुक्तीचा सदैव अनुभव घेऊ शकतो. असा सार्थ आणि दुर्दम्य आशावादही कवी शेवटच्या ओळींमध्ये व्यक्त करतो. त्या अंतिम साध्यापर्यंत सर्वांना एकत्र घेऊन, आपण सर्व त्या आनंद यात्रेचे सहप्रवासी आहोत, आणि त्या दृष्टीने आपली वाटचाल निरंतर सुरू राहो, हा सुंदर भाव आश्वासकपणे शब्दबद्ध झाला आहे. श्रवण, ध्यान, मनन, चिंतन, आत्मनिवेदन अशा नवविधा भक्तीतील अनेक प्रकारांतून, श्वासांच्या लयबद्धतेतून, आपल्या जीवाच्या श्वासांचा भ्रमर, विषयांपासून परावृत्त होऊन, सहस्त्र दलांनी उन्मिलीत प्रभुस्वरूपी सुगंधी कमळावर अलगद जाऊन बसतो आणि प्रभुच्या सगुणरूपाचे मधुपान करत असतानाच त्यात गुंग होऊन प्रभुस्वरूपात एकरुप होऊन जातो. हा पाच-सहा मिनिटांचा ध्वनीध्यानाचा खेळ अत्यंत आनंददायी, चित्तवृत्ती शांत करून, शरीरास व मनास प्रफुल्लीत करणारा आहे. पूर्ण प्रभू कृपेच्या आशीर्वादाने साकारलेली ही अद्वितीय काव्यरचना आमच्या समोर सादर करून आम्हाला ती दिव्य अनुभूती दिल्याबद्दल श्री चैतन्यराज प्रभुंचे मनस्वी आभार आणि वारंवार वंदन. श्री प्रभुच्या सगुण स्वरूपाची भक्तीमय आणि प्रेमळ ओळख ह्या गीतातून आपल्याला अनुभवता येते, तशी अनुभूती आपणांसही येवो, निर्गुण स्वरूपाची ओळख करून घेण्यासाठीची योग्यता ह्या सगुण ध्यानातून आपल्यातही वृद्धिंगत होतो, आत्मस्वरूपाची ओळख करून देणारी ही यात्रा आपणासही घडो, ह्या श्री प्रभु चरणीच्या नम्र विनंती.
Recent Comments