श्री प्रभुचरित्रातील श्री माणिकप्रभुंचे श्री मार्तंड माणिकप्रभु संदर्भातील एक वाक्य माझ्या मनःपटलावर कायमचे कोरले गेले आहे ते म्हणजे,

श्री प्रभुचरित्रातील श्री माणिकप्रभुंचे श्री मार्तंड माणिकप्रभु संदर्भातील एक वाक्य माझ्या मनःपटलावर कायमचे कोरले गेले आहे ते म्हणजे,

“माणिकनगरसारखी छप्पन संस्थाने निर्माण करण्याचे सामर्थ्य त्याच्यात (श्री मार्तंड माणिकप्रभुंमध्ये)आहे.”

श्री सद्गुरु माणिकप्रभु यांनी सकलमत संप्रदायाची स्थापना करून, अवघ्या जगाला सर्वधर्म समभावाचा संदेश दिला आणि तत्कालीन विविध जातीधर्मांमध्ये सौहाद्रतेची मुहूर्तमेढ रोवली. श्री माणिक प्रभुंना अभिप्रेत असलेले सकलमत संप्रदायाचे हेच तत्त्वज्ञान व्यापकपणे जनमानसात पसरवण्याचे कार्य, श्री सद्गुरु माणिकप्रभुंचे पुतणे श्री सद्गुरु मार्तंड माणिकप्रभु यांनी केले. त्यांनी त्यावेळेसचे निजाम संस्थान, मुंबई आणि मद्रास प्रांतामध्ये लोककल्याणार्थ धर्मयात्रा काढून सकलमत संप्रदायाचा, त्याच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसारही केला. श्री माणिकप्रभु संस्थानाच्या पीठाचार्यांचा “दौरा” ही संकल्पना श्री मार्तंड माणिकप्रभु यांच्या झळाळत्या कारकिर्दीतच सुरू झाली.

धर्मचक्रप्रवर्तनार्थ महाराजश्रींनी अनेक दौरे केले. ज्याप्रमाणे गरीबांना धर्म भाकरीच्या तुकड्यांतून शिकवावा लागतो, त्याचप्रमाणे दुः‌खी, पीडित, आर्तजनांना तो त्यांच्या दुःख विमोचनातून पटवून द्यावा लागतो. महाराजश्रींसारख्या समर्थ, कनवाळू, संत शिरोमणींना याची पूर्ण जाणीव होती. त्यासाठी श्रीजींनी अनेक अलौकिक चमत्कार केले आणि त्यायोगे असंख्य दुःखितांचे अश्रू पुसले. कुणाला ऋणमुक्त केले, कुणाला असाध्य रोगापासून सोडविले, कुणाचा वांझपणा दूर केला, तर कुणाला मरणाच्या दारातून परत फिरवले. अनेकांची अडलेली कामे मार्गस्थ केली, अनेकांच्या आपत्ती दूर केल्या, अनेक भक्तांचे संकट निवारण केले आणि गोरगरिबांना यथायोग्य मदतीचा हात देऊन, त्यांच्या जीवनामध्ये आशेची नवी पहाट उगवून दिली. श्रीजींच्या ह्या दैवी सामर्थ्याने सर्व प्रकारच्या लोकसमुदायांची श्रीजींवर नितांत श्रद्धा बसली. दुःख निवारण आणि उपदेश या दोन माध्यमांद्वारे श्रीजींनी सामान्य जनतेची धर्मभावना जागवली आणि त्यांच्यामध्ये सत्प्रवृत्ती निर्माण करून, त्यांना भक्तिमार्गावर प्रशस्त केले. सामान्यजनांना त्यांच्या घरी जाऊन, त्यांना भेटून, त्यांच्यावरील संकट दूर करून, सकलमत संप्रदायाचे तत्त्वज्ञान त्यांच्यात रुजवून‌, त्यांना भक्तीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य श्रीजींनी आपल्या कारकीर्दीत केलेल्या अनेक अनेक ठिकाणी केलेल्या दौऱ्यांच्या माध्यमातून केले. अशा ह्या दौऱ्याची सुरुवात इसवी सन १९०० साली झाली. ह्याच वर्षी माणिकनगरमध्ये पहिला वेदांत सप्ताह पार पडला. महाराजश्रींचा पहिला दौरा गुलबर्गा, रायचूर, नारायण पेठ असा झाला. त्याकाळी श्रीजींचे दौरे महिनोंमहिने चालत. दौऱ्याची ही परंपरा त्यानंतरच्या सर्वच पीठाचार्यांनी आजतागायत सुरू ठेवली आहे. आजही दौऱ्याची सुरुवात श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन, त्यांना साक्षी ठेवूनच केली जाते. दौऱ्यादरम्यान सद्गुरुंचा निरंतर सहवास आपल्याला लाभतो आणि त्यांना जवळून पाहण्याची, अनुभवण्याची, त्यांचे गुणग्रहण करण्याची संधी लाभते. सद्गुरूंसोबतच्या छोट्या छोट्या प्रसंगातून, कृतीतून, त्यांचे चराचरांतील सर्व शक्तींवर असलेल्या नियंत्रणाचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार होतो आणि गुरुतत्व प्रसंगी किती सुक्ष्मपणे आणि प्रसंगी किती व्यापकपणेही निरंतर कार्यरत होत असते, याची आपल्याला जाणीव होते. ही जाणीवच मग आपल्या जीवनात उतरून, आपले जीवन हळूहळू कृतार्थतेचा अनुभव करू लागते.

एप्रिल २३ मधील नाशिक दौऱ्यामध्ये सद्गुरूंच्या सहवासाचे महत्व कळले होते. मे महिन्यात श्रीजींचा सगरोळी दौरा ठरत असतानाच सगरोळीचे अनन्य प्रभुभक्त श्री. देविदास देशमुख (देसाई) दादांनी प्रणिलभाऊ, तुम्ही श्रीजींच्या दौऱ्यादरम्यान सगरोळीला यावे, असे आग्रहाचे निमंत्रण दिले. एक वेळ पंचपक्वान्नाचे भोजन नाकारता येईल, पण प्रभुभक्तांच्या विनंतीला नाही म्हणणे, फार अवघड काम असते, हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. श्रीजी आपल्या प्रवचनातून नेहमी म्हणतात की, आपण ज्या वस्तूचे सतत चिंतन करतो, एक ना एक दिवस आपण त्याचेच स्वरूप होऊन जातो. भक्तकार्य कल्पद्रुम ब्रीदावली आपल्या कंठामध्ये अखंड मिरवीत असलेले अनेक अनेक प्रभुभक्त जणू प्रभुस्वरूपच झालेले असतात आणि अशा अभिमानी भक्तांकरवी श्रीप्रभुच जणू काही आपल्याला पालवत असतो. “ही सर्व केवळ त्या प्रभुचीच इच्छा”, असे समजून दादांना त्वरित होकार कळवला. मंगळवार दिनांक १८ जुलै ते शुक्रवार दिनांक २१ जुलै दरम्यान श्रीजींचा सगरोळी-करडखेड दौरा आयोजित करण्यात आला होता. दौऱ्यासाठी १५ जुलै, शनिवारीच माणिकनगरमध्ये दाखल झालो.‌ सोमवारी सोमवती अमावस्येला शंकराचाच अवतार असलेल्या श्री माणिकप्रभुंच्या संजीवनी समाधीचे दर्शन आणि सेवेची संधी मिळाली. श्रीजींची मनोभावे पाद्यपूजा केली. श्रीगुरु आज जणू मेघ बनूनच बरसत होता. गुरुकृपेच्या ह्या वर्षावात असे चिंब भिजणे अत्यंत आनंददायी असते. पावसामुळे बाहेर थंडावा होता आणि समोर मनसोक्त घडत असलेले श्रीप्रभुदर्शन अंतरास शितलता प्रदान करत होत होतं. श्री प्रभुमंदिरातील रात्रीच्या भजनानंतर सगरोळीच्या दौऱ्याची तयारी करुन समाधानाने निद्रादेवीच्या कुशीत विसावलो.

क्रमशः

[social_warfare]