मंगळवारी सकाळीच श्री व्यंकम्मादेवी मंदिरात ओटी भरून कुंकुमार्चन केले. थोडा वेळ माणिक प्रभु अंध विद्यालयात मुलांसोबत रमलो. दुपारी भंडारखान्यातील महाप्रसादानंतर तयारीनिशी श्रीजींच्या निवासस्थानी आलो. दुपारी दोनच्या सुमारास भक्तकार्य कल्पद्रुमच्या जयघोषात श्रीजी श्री प्रभुमंदिरात दर्शनासाठी निघाले. श्री माणिकप्रभु संजीवन समाधीचे मनोभावे दर्शन घेऊन, त्यांची प्रार्थना करून, आरती केली, आशीर्वाद घेतले आणि पुढे श्री मनोहर प्रभुंच्या समाधीपुढे नतमस्तक झाले. त्यानंतर श्रीजी, श्री मार्तंड माणिक प्रभुसमाधीसमोर आले. वर वर्णन केल्याप्रमाणे श्रीजींचा श्री मार्तंड माणिकप्रभु समाधीशी जणू काही संवाद झाला. श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधी समोरच, श्रीजी, श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या चांदीच्या पादुका आणि खारकांचा प्रसाद स्वीकारतात. संपूर्ण दौऱ्यादरम्यान ह्याच पादुकांचे भक्तांच्या घरोघरी पूजन होते. श्री मार्तंड माणिकप्रभु समाधीची आरती करून, त्यांना निमंत्रण देऊन पुढे श्री शंकर माणिकप्रभु आणि श्री सिद्धराज माणिकप्रभु यांच्याही समाधीसमोर नतमस्तक झाले. श्रीप्रभु दर्शनानंतर श्रीजी पुन्हा निवासस्थानी आले. दौऱ्यामध्ये श्रीजींबरोबर असणाऱ्या सर्व सेवेकऱ्यांनी श्रीजींचे आशीर्वाद घेतले. श्रीजींचा आशीर्वाद मिळाल्यामुळे आपला दौरा निर्विघ्नपणे पार पडणार, अशी सर्वांचीच मनोमन खात्री झाली. दौऱ्यामध्ये श्री. गुरुनाथ गुरुजी (मुख्य अर्चक), श्री. नरसिंह गुरुजी, श्री. तिरुमल गुरुजी होते आणि सेवेकऱ्यांमध्ये श्री. राजेश गिरी, श्री. माणिकलाल, श्री. इसामभाई, श्री. वीरप्पा आणि निर्मलाकाकूही सहभागी झाल्या होत्या. दुपारी साधारण साडेतीनच्या सुमारास भक्तकार्याच्या जयघोषात माणिकनगरहून आम्ही सगरोळीसाठी प्रस्थान केले.

वातावरण ढगाळ होते. अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या बारीक सरी, मनास प्रफुल्लित करत होत्या. संध्याकाळी सुमारे सहाच्या दरम्यान आम्ही देगलूरला श्री. राजेश्वर देशपांडे यांच्या घरी पाद्यपूजेसाठी पोहोचलो. श्रीजींच्या आगमनाने देशपांडे कुटुंबात लगबग चालू झाली. श्रीजींची पाद्यपूजा झाल्यावर दारामध्ये पांढरी शुभ्र गाय येऊन उभी राहिली. सौ. रमा देशपांडेकाकूंनी सर्वांसाठी मुगडाळीची भजी केली होती.‌ त्या गरमागरम नाश्त्याची चव जिभेवर रेंगाळत असतानाच, आम्ही श्री. पुरुषोत्तम देशपांडे यांच्या निवासस्थानी पोहोचलो. तेथेही श्रीजींची पाद्यपूजा झाली. श्री. मार्तंड माणिक प्रभु आपल्या कार्यकाळात सगरोळी दौऱ्याहून माणिकनगरला येताना श्री. पुरुषोत्तमकाकांच्या घरी तीन दिवस राहिले होते. त्या जुन्या आठवणींना येथे उजाळा मिळाला. त्यानंतर आणखीन एक प्रभुभक्त श्री. अरुण शेळकीकर ह्यांच्याकडे श्रीजींची पाद्यपूजा झाली. अधिक श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच श्रीजींचे आगमन आपल्या घरी झाल्यामुळे, देगलूरच्या प्रभुभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सात सव्वा सातच्या सुमारास आम्ही देगलूर सगरोळीसाठी निघालो आणि संध्याकाळी आठ वाजता सगरोळीच्या प्रभुमंदिरात पोहोचलो.

पावसाची रिपरिप चालू होती, परिसरातील लाईट गेलेली, पण सगरोळीकरांच्या उत्साहामध्ये तसूभरही कमी नव्हती. अनेक प्रभुभक्तांची श्रीजींच्या स्वागतासाठी श्रीप्रभुमंदिर परिसरात दाटी झाली होती. श्रीप्रभु मंदिरास लावलेले, मांगल्याचे प्रतिक असलेले नारळाचे झाप, प्रभुमंदिरासमोर काढलेल्या आकर्षक रांगोळ्या मन वेधून घेत होत्या. फटाक्यांच्या आतिषबाजीने श्रीजींचे स्वागत केले गेले. सुवासिनींनी श्रीजींना ओवाळले. भक्तकार्यच्या जयघोषात श्रीजी श्रीप्रभु मंदिरापाशी पोहोचले. गाभाऱ्यात श्रीदत्त, श्री गणपतीबरोबरच श्री माणिक प्रभुंची अत्यंत सुबक, संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. बाजूलाच एका आरामखुर्चीमध्ये श्री मार्तंड माणिक प्रभुंचा फोटो ठेवला आहे. आपल्या सगरोळी भेटीत महाराजश्री ह्या खुर्चीत बसत. गावकऱ्यांनी आजही ती खुर्ची अत्यंत आत्मीयतेने जपली आहे. तसेच श्रीजींनी दिलेले तीन सटके, त्यांची काठी, त्रिशुळ ह्याही वस्तू गाभाऱ्यामध्ये नेटकेपणे जपून ठेवलेल्या आहेत. श्रीप्रभु मंदिरामध्ये आरती करून आम्ही संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेचे प्रमुख आणि दौऱ्याची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे सांभाळली असे बंधूत्रय, श्री. देविदासदादा, श्री. प्रमोद दादा आणि श्री. सुनील दादा यांच्या शारदानगर येथील निवासस्थानी सव्वा आठच्या सुमारास पोहोचलो. घरच्या सुवासिनींच्या औक्षणानंतर सायंकाळचे भक्तकार्य येथेच झाले. देशमुखांच्या घरी रात्रीचे गरमागरम भोजन करून आम्ही संस्थेच्या विश्रामगृहात स्थिरस्थावर झालो. येथेही भरपूर पाऊस होता. उत्तम नियोजन, उतरण्यासाठी स्वच्छ आणि निसर्गरम्य जागा, चोख व्यवस्था आणि दिमतीला अत्यंत तत्पर मदतनीस, ह्यामुळे पहिल्याच भेटीत सगरोळीकरांनी मन जिंकून घेतले.

क्रमशः….

[social_warfare]