साधक साधना

मानव सुखालोलुप अंध ।
मनासी नाही निर्बंध ।
शतावधी आशांनी बद्ध ।
जखडला अगतिक ।।

मोह काम क्रोध ।
लोभ मत्सर मद ।
शिपाई हे हत्यारबंद ।
नजर रोखून ।।

करता थोडी हालचाल ।
म्हणती पळून जाईल ।
कोण मज सोडविल ।
ह्या संमोहनातून ।।

संमोहनाचे ऐसे आवरण ।
जीवासी टाकी आच्छादून ।
परमसत्य गेले झाकून ।
वेदनामय आयुष्य ।।

अंधार दाटला घनदाट ।
अवघड सुटकेचा घाट ।
कोण दाखविल वाट ।
चिंतित निर्वाणी ।।

म्हणून प्रभुनामाची कळ ।
भावे दाबावी नित्यकाळ ।
साधावे क्षेमकुशल सकळ ।
कामक्रोध नासोनि ।।

नित्य अनित्य विवेक ।
वैराग्य पत्करावे सम्यक ।
बाणवावे शमदमादि षटक ।
आणिक मुमुक्षुत्व ।।

सहज साधण्यास मुक्ती ।
वरील चतु:साधनांची युक्ती ।
होता सम्यकज्ञान आणि भक्ती ।
परमवस्तु भेटेल ।।

सगुण ध्यान

सगुण ध्यान
सगुणातून निर्गुणात अलगदपणे नेणारा ध्वनीध्यानाचा नितांत सुंदर आविष्कार

जय माणिक दत्त दिगंबर महाविरागी
निश्चल मौनप्रिय सकलपंथ अनुरागी

रुद्राक्षभस्मप्रिय दंडकमंडलधारी
श्री दर्शनसे प्रमुदित है सब नर नारी
निजभक्तहृदयमंदिरके नित्य विहारी
हे दुःखभंजन सुखदायक मंगलकारी

मस्तकपर चंदन तिलक जचे कस्तुरी
नयनोंके बिचोबीच छटा सिंदूरी
अधरों पर छाई मृदू मुस्कान अधुरी
मुखमंडल की आभा निखरी है पुरी

उपर है शितल औदुंबर की छाया
चरणों में बैठी हुई मधुमती माया
भवरें मंडराते अमृतमय चरणोंपर
चंपा गुलाब लज्जितसे बिखरे भू पर

कज्जलरंजित दृग दिव्यकांतीमय काया
कांधोंपर छायी जटाजूट की छाया
श्यामल सुंदर दैदीप्यमान मुखमंडल
कानों में सोहे पद्मरागके कुंडल

वक्षस्थलपर सुंदर तुलसी की माला
तनपर ओढे जरतारी लाल दुशाला
सिद्धासनमें चिन्मुद्रासहित विराजे
सम्मुख चंदन के दिव्य खडाऊं साजे

उस निर्विकल्प माणिक की इस आकृती को
नित धरो नयनमें, धो डालो विकृती को
इस सगुण ध्यानसे तुम निर्गुणको जानो
जो अनिर्वाच्य अपना स्वरुप पहचानो

प्रभु बरसायेंगे पूर्ण कृपा की धारा
होगा प्रभात छट जायेगा अंधियारा
फिर आयेगी वह निजानंद की वेला
दिन रैन मनाओ सहजमुक्ती का मेला

-श्री चैतन्यराज प्रभु

माझ्या अत्यंत आवडत्या कवींपैकी एक, श्री चैतन्यराज. श्री चैतन्यराज प्रभुंच्या आजवर मोजक्याच काव्यरचना आहेत, पण त्या सर्व रचनांमध्ये असे काही खास आहे की, जे थेट हृदयाशी जाऊन भिडते. अलीकडेच त्यांनी सगुण ध्यान ही श्री माणिकप्रभुंच्या सगुणरूपाचं वर्णन करणारी अप्रतिम अशी काव्यरचना केली आहे. ती ऐकल्यापासून मन सतत प्रभुपाशीच रुंजी घालतेय. गेले काही दिवस ह्या गाण्याला मी ध्वनी ध्यान या स्वरूपात ऐकतोय आणि या गाण्यातून प्रभुला पाहताना, ऐकताना, गाण्याच्या शेवटी आपणही, अगदी अलगदपणे, स्वतः प्रभुस्वरूप असल्याचा अनुभव घेतो, ही ह्या गाण्याची ताकद आहे, ही ती दिव्य प्रभुकृपा आहे आणि हीच ती प्रभुमयता आहे.

अलीकडेच प्रभुमंदिर परिसरात, श्री ज्ञानराज माणिक प्रभुंच्या संकल्पनेतून सत्यात उरलेली आणि श्री चैतन्यराज प्रभुंनी स्वतःच्या देखरेखीखाली, प्रभुंचा संपूर्ण जीवनपट उलगडवून दाखवणारी प्रभुलीलांची सचित्र परिक्रमा प्रदर्शित केली गेली आहे. ही सचित्र परिक्रमा करतानाच आपण त्या त्या चित्राशेजारी श्रीप्रभुच्या लीलांमध्ये हरवून जातो. पण त्याच चित्रांमध्ये श्रीप्रभुला ज्याप्रकारे अतीतर भावाने श्री पराग घळसासी ह्यांनी रेखाटले आहे, त्याकडे एकटक कितीतरी वेळ पाहिल्यावर, त्या चित्रांचे निरंतर ध्यान केल्यावर कदाचित असे दिव्य काव्यस्फुरण कवीला झाले असावे. अर्थात् श्री प्रभुप्रती पराकोटीचा प्रेमभाव व प्रभुचरणी दृढ श्रद्धा असल्यावरच अशी अत्यंत तरल शब्दसुमनांजली शब्दरूपाने साकारते.

परमात्म्याचे आपल्याला आवडणारे सगुण ध्यान ही साधकाच्या जीवनातील अत्यंत गरजेची आणि महत्वाची पहिली पायरी आहे. परमात्म्याच्या सगुण रूपाचे ध्यान का आवश्यक आहे, हे उद्धृत करणारी श्री माणिक प्रभुंची, सगुण रूप नयनीं आधी दावा मग तुम्ही वेदांत गावा ही काव्यपंक्ती प्रसिद्धच आहे आणि नेमका हाच धागा पकडून श्री चैतन्यराज आपल्याला प्रभुच्या सगुण स्वरूपाची सफर घडवतात. परमात्माच्या निर्गुण रूपाची अनुभूती घेण्यासाठी, ती योग्यता आपल्या ठायी बाणवण्यासाठी प्रभुची सगुण उपासना अत्यंत आवश्यक आहे.

ध्यानाला बसण्यापूर्वी आपण जशी शुद्धी क्रिया करतो, त्याचप्रमाणे सहजासनात बसल्यावर, सुरुवातीचा धीरगंभीर आलाप, आपल्याला ह्या गीताच्या ध्वनीध्यानासाठी सिद्ध करतो. श्री प्रभुचा अवतार अत्यंत कनवाळू होता. ज्यांनी श्री प्रभुचरित्र वाचले आहे किंवा माणिकनगरला भेट दिली आहे, त्यांच्या मनामध्ये भक्तकार्यकल्पद्रुम श्रीप्रभुची एक विशिष्ट, आत्मीयतेने जपलेली, आदरयुक्त छबी आहे. सुरुवातीच्या सहा ओळींमध्ये प्रभुंचे जे अत्यंत तरल वर्णन केले आहे, ते तुम्हाला ध्यानामध्ये प्रभुच्या अगदी जवळ घेऊन जाते, शब्दांगणिक बदलणाऱ्या प्रभुच्या छबीनुसार, तुम्ही मनानं एका अज्ञाताच्या प्रवासाला निघता. या गीताची चाल अतिशय संथ आहे आणि दोन ओळींमध्ये अनुभवायला येणारी धीरगंभीर शांतता‌ आपल्याला समाधी अवस्थेकडे नेते. हे गीत अनेक अनेक वेळा ऐकल्याने त्या त्या शब्दांबरोबर असलेली प्रभुंची रेखाचित्रे डोळे बंद केल्यावरही जशीच्या तशी नजरेसमोर साकारतात आणि आपण प्रभुच्या सन्मुख बसल्याचा अनुभव येऊ लागतो.

जय माणिक दत्त दिगंबर महाविरागी
निश्चल मौनप्रिय सकलपंथ अनुरागी

रुद्राक्षभस्मप्रिय दंडकमंडलधारी
श्री दर्शनसे प्रमुदित है सब नर नारी
निजभक्तहृदयमंदिरके नित्य विहारी
हे दुःखभंजन सुखदायक मंगलकारी

श्री दत्त महाप्रभु आणि माणिक प्रभु ह्यांच्यात अजिबातच भेद नाहीयेय, दोन्ही एकच आहेत, आणि येथे कवी महाविरागी ह्या शब्दांनी भगवान दत्तात्रेयांच्या वैराग्याचा जयजयकार करत आहेत, कारण वैराग्याशिवाय साधना प्रारंभ केली जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच कवितेच्या सुरुवातीलाच वैराग्याचा उल्लेख ठळकपणे केला आहे. त्यानंतर श्री प्रभुंच्या दिव्य विशेषणांचे वर्णन करताना प्रभुचा मौनभाव अधोरेखित केला आहे आणि हा मौनभाव साधकालाही प्राप्त व्हावा, अशी उदात्त भावना कवी शब्दांमध्ये गुंफत आहे. जो सर्वच धर्मांमध्ये, पंथांमध्ये प्रिय आहे आणि ज्याला सर्वच धर्म आणि पंथ प्रिय आहेत, अशा प्रभुचे सकलपंथ अनुरागी हे विशेषण प्रभुची अस्ति भाति प्रियताच दाखवते. लहानपणीच मामाच्या घरातून निघाल्यावर किशोर वयातील, अमृतकुंडाच्या परीसरातील, अरण्याच्या एकांतवासातील, साधक अवस्थेचे वर्णन रुद्राक्षभस्मप्रिय, दंडकमंडलधारी ह्या शब्दांमध्ये मोठ्या खुबीने प्रकट झाले आहे. प्रभुंच्या ह्या तेजपुंज ध्यानाने भोवतालचे सर्व स्त्री पुरुष अत्यंत उल्हसित, प्रमुदित होत असत. आत्यंतिक भावनेने करुणा भाकणाऱ्या भक्तांच्या मन मंदिरात प्रभु नित्य येऊन विसावतो आणि त्यांचे दुःख नाहीसे करून, त्यांना सुख प्रदान करून, त्यांचे सदा सर्वदा मंगल करतो. प्रभु कसा आहे, हे सगुण वर्णन ऐकताना, त्यावेळेस अंतरंगात पाझरणाऱ्या भक्तिरसातून आपल्याला प्रभुबद्दल प्रेम उत्पन्न होऊ लागतं. आणि तो भक्तीरस पाझरवण्याचं काम ह्या काव्यपंक्ती परिणामकपणे करतात.

मस्तकपर चंदन तिलक जचे कस्तुरी
नयनोंके बिचोबीच छटा सिंदूरी
अधरों पर छाई मृदू मुस्कान अधुरी
मुखमंडल की आभा निखरी है पुरी

आपण प्रभुला प्रत्यक्षात पाहिले नाही, पण प्रभुंच्या संजीवन समाधी प्रसंगाचं प्रभुमंदिरात असलेलं चित्र, ह्या ओळींच्या वेळी प्रभुंचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला देत. प्रभु साक्षात कसा असेल, ही कल्पना प्रत्यक्षात उतरू लागते. दोन डोळ्यांच्यामध्ये असलेल्या भ्रुकटीमध्यामध्ये शेंदरी रंगाची छटेची कल्पना करतानाच आपल्याला तो शेंदरी रंग ध्यानामध्ये दिसू लागतो.
प्रभुंच्या दिव्यतेची अनुभूती यायला लागते, आपल्याला सुखाची जाणिव होऊ लागते. आणि ह्या सुखद भावस्थितीमध्ये प्रभुच्या ओठावरील मृदू हास्य अनिमिषपणे पाहताना, आपल्याही ओठावर नकळत स्मित हास्य झळकते. ह्यावेळेस आपल्या श्वासांच्या गतीत होणारे बदल अनुभवणं, हे नितांत सुखदायक आहे.

उपर है शितल औदुंबर की छाया
चरणों में बैठी हुई मधुमती माया
भवरें मंडराते अमृतमय चरणोंपर
चंपा गुलाब लज्जितसे बिखरे भू पर

ह्या ओळींबरोबर येणारे चित्र आपल्याला आणखी एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाते.‌ माणिकनगरी असलेल्या औदुंबराच्या छायेत कट्ट्यावर श्रीप्रभु बसले आहेत आणि खाली बाजूलाच दत्तात्रयांची मधुमती शक्ती मधुमती श्यामलांबा अर्थात् प्रभुंची परमशिष्या योगिनी श्री देवी व्यंकम्मा जपध्यानामध्ये मग्न आहे. प्रभुंच्या चरणांचे वर्णन अद्वितीयपणे येथे केले आहे. अनेक भूंगे (भ्रमर) प्रभुंच्या अमृतमय चरणांवर रुंजी घालत आहेत आणि ते पाहून, अत्यंत लज्जित होऊन चाफा आणि गुलाब जमिनीवर पसरले आहेत. वास्तविक पाहता चाफा आणि गुलाबाच्या सुगंधाने भुंगे त्या फुलांवर आकर्षित व्हायला हवेत, पण प्रभुंचे चरण इतके अमृतमय आहेत की, चाफा आणि गुलाबाच्या मधुरसाची उपेक्षा करून भुंगे प्रभुचरणांवरच रुंजी घालत आहेत. येथे कवीमनाच्या कोमलतेचा, प्रभुमयतेचा अनुभव आपल्याला येतो. अत्यंत बारकाव्यांसहित केलेल्या या वर्णनाबरोबरच आपल्याला अंतरंगात चैतन्याची अनुभूती यायला सुरुवात होते. ह्या भूंग्यांसारखेच आपण चंपा, गुलाबारुपी विषयांपासून परावृत्त होऊन प्रभु चरणांकडे अधिकाधिक आकर्षित होतो.

कज्जलरंजित दृग दिव्यकांतीमय काया
कांधोंपर छायी जटाजूट की छाया
श्यामल सुंदर दैदीप्यमान मुखमंडल
कानों में सोहे पद्मरागके कुंडल

वक्षस्थलपर सुंदर तुलसी की माला
तनपर ओढे जरतारी लाल दुशाला
सिद्धासनमें चिन्मुद्रासहित विराजे
सम्मुख चंदन के दिव्य खडाऊं साजे

मनास प्रफुल्लित करणाऱ्या ह्या चैतन्यमय प्रवासानंतर आता कवी आपल्याला अद्वैताच्या यात्रेसाठी सिद्ध करतो. आपल्याला रोजच्या धकाधकीच्या जीवनातून, ध्यानात बसल्यावर ह्या गीतामधून एका चैतन्यमय ठिकाणी नेऊन, प्रभुसमोर बसवून, एकांतात अनुसंधान घडवतो. प्रभुच्या वरील वर्णनातून पुन्हा आपल्याला प्रभुच्या सगुण रूपाची तंतोतंत झलक अनुभवायला मिळते. या शब्दांबरोबरच आपण प्रत्यक्ष प्रभु दरबारात, प्रभुसमोर असून प्रभुचे हे दिव्य स्वरूप अनुभवतो आहे, असा भाव प्रत्यक्षात उतरायला लागतो. आणि हे ऐकतानाच डोळे बंद केलेल्या भाव अवस्थेत पुढच्या ओळी आपल्याला अंतरीच्या जगताची, आत्मस्वरूपाची सफर करूवून देतात.

उस निर्विकल्प माणिक की इस आकृती को
नित धरो नयनमें, धो डालो विकृती को

कवी म्हणतोय की, निर्विकल्प प्रभुच्या ह्या सगुण ध्यानाला आपण आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवा. जेणेकरून आपल्याला सर्वत्र प्रभुच दिसेल आणि मनामध्ये किंवा नजरेमध्ये कोणतीही विकृती शिल्लकच राहणार नाही. ही प्रभुमयता आपल्याला ह्या ओळी बरोबर परिणामकपणे जाणवते. पण खरी जादू पुढच्या ओळींमध्ये होते,

इस सगुण ध्यानसे तुम निर्गुणको जानो
जो अनिर्वाच्य अपना स्वरुप पहचानो
प्रभु बरसायेंगे पूर्ण कृपा की धारा
होगा प्रभात छट जायेगा अंधियारा

आपण जर श्री ज्ञानराज माणिक प्रभुंची वेदांतपर प्रवचन ऐकत असाल, तर श्रीजींनी आपल्यावर केलेले अद्वैताचे संस्कार येथे आपल्या अंतर्मनाशी चाळ करू लागतात. मी कोण आहे, याची असीम, विराट आणि व्यापक जाणीव आपल्याला होते. येथे कवीने आपल्याला केलेला निर्देश फार महत्त्वाचा आहे. सगुणातून निर्गुणाला ओळखण्याची गुरुकिल्ली जणू कवी आपल्या हाती सोपवत आहे. आणि एकदा का आपल्याला ह्यातील मेख कळली की पुढचं सर्व काही प्रभु पाहून घेईल, हे आश्वासनही आपल्याला प्रभु बरसायेंगे… ह्या काव्यपंक्ती करून देतात. प्रभुंचा कृपेने अज्ञानरूपी अंधकाराचा नाश होऊन, सर्वत्र ज्ञानाची प्रभा फाकेल हा विश्वासही अंतरात दृढ होतो.

मन अश्या आनंदाच्या लाटांवर स्वार झाले असतानाच, शेवटच्या पूर्णाहूतीच्या खालील दोन ओळी कानावर पडतात आणि आपण धन्यतेचा, पूर्णतेचा अनुभव करू लागतो. पूर्णानंदाच्या डोहामध्ये अथांग डुंबत राहतो. ही निजानंदाची वेळ मनास सच्चिदानंदाची प्राप्ती करून देते.

फिर आयेगी वह निजानंद की वेला
दिन रैन मनाओ सहजमुक्ती का मेला
दिन रैन मनाओ सहजमुक्ती का मेला

अशाप्रकारे सगुणाचे निरंतर ध्यान केल्यावर, आपल्याला प्रभुप्रती प्रेम उत्पन्न होऊन, आपण प्रभुच्या भक्तीमध्ये खोलवर उतरु लागतो. प्रभुशी आपली नाळ अधिकाधिक घट्ट होत जाते. वेदांत शास्त्राचे जे सार आहे, त्या प्रभुच्या निर्गुण रूपाला जाण्याच्या योग्यतेचे आपण होतो. सततच्या अभ्यासाने, निर्व्याज्य प्रभुभक्तीने, प्रभुच्या सगुण ध्यानातून, प्रभुच्या निर्गुण स्वरूपाच्या अनुभूतीची ती वेळ, एक ना एक दिवस अवश्य येईल, जेथे आपण सहज मुक्तीचा सदैव अनुभव घेऊ शकतो. असा सार्थ आणि दुर्दम्य आशावादही कवी शेवटच्या ओळींमध्ये व्यक्त करतो. त्या अंतिम साध्यापर्यंत सर्वांना एकत्र घेऊन, आपण सर्व त्या आनंद यात्रेचे सहप्रवासी आहोत, आणि त्या दृष्टीने आपली वाटचाल निरंतर सुरू राहो, हा सुंदर भाव आश्वासकपणे शब्दबद्ध झाला आहे. श्रवण, ध्यान, मनन, चिंतन, आत्मनिवेदन अशा नवविधा भक्तीतील अनेक प्रकारांतून, श्वासांच्या लयबद्धतेतून, आपल्या जीवाच्या श्वासांचा भ्रमर, विषयांपासून परावृत्त होऊन, सहस्त्र दलांनी उन्मिलीत प्रभुस्वरूपी सुगंधी कमळावर अलगद जाऊन बसतो आणि प्रभुच्या सगुणरूपाचे मधुपान करत असतानाच त्यात गुंग होऊन प्रभुस्वरूपात एकरुप होऊन जातो. हा पाच-सहा मिनिटांचा ध्वनीध्यानाचा खेळ अत्यंत आनंददायी, चित्तवृत्ती शांत करून, शरीरास व मनास प्रफुल्लीत करणारा आहे. पूर्ण प्रभू कृपेच्या आशीर्वादाने साकारलेली ही अद्वितीय काव्यरचना आमच्या समोर सादर करून आम्हाला ती दिव्य अनुभूती दिल्याबद्दल श्री चैतन्यराज प्रभुंचे मनस्वी आभार आणि वारंवार वंदन. श्री प्रभुच्या सगुण स्वरूपाची भक्तीमय आणि प्रेमळ ओळख ह्या गीतातून आपल्याला अनुभवता येते, तशी अनुभूती आपणांसही येवो, निर्गुण स्वरूपाची ओळख करून घेण्यासाठीची योग्यता ह्या सगुण ध्यानातून आपल्यातही वृद्धिंगत होतो, आत्मस्वरूपाची ओळख करून देणारी ही यात्रा आपणासही घडो, ह्या श्री प्रभु चरणीच्या नम्र विनंती.

श्रीजींचा नाशिक दौरा

नाशिक म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर प्रथम रामायणातील श्रीरामांचा चौदा वर्षे वनवासातील नाशिक येथे व्यतीत केलेला काही काळ आठवतो.‌ गोदावरी नदीच्या काठी वसलेले नाशिक श्री रामायण काळातील अनेक दिव्य घटनांचे साक्षीदार आहे. शूर्पणखेचे नाक श्रीलक्ष्मणाने येथेच कापले, सीतामाईचे रावणाने हरण येथेच केले. पुराणांत ज्या दंडकारण्याचा उल्लेख आहे, नाशिक हे त्याच दंडकारण्याचा भाग आहे. इथे चराचरामध्ये आपण राम अनुभवू शकतो.‌ कुंभमेळा पर्वातही नाशिक क्षेत्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भोवताली असलेला ब्रह्मगिरी पर्वत, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर, देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक वणीची श्री सप्तशृंगी माता अशा अनेक सिद्धपीठांमुळे नाशिक क्षेत्राचे आध्यात्मिक महत्त्व आपसुकच अधोरेखित होते.

अनेक अवतारीक आणि संतपुरुषांच्या पवित्र वासाने पुनित झालेल्या नाशिक ह्या पुण्यक्षेत्री, चतुर्थ दत्तावतारी श्री माणिकप्रभुंनी स्थापन केलेल्या सकलमत संप्रदायाच्या गादीचे सहावे आणि विद्यामान पीठाधिश, श्री ज्ञानराज माणिकप्रभुंचा दौरा अलीकडेच दिमाखात पार पडला. श्री माणिकप्रभुंचे मातापिता श्री. मनोहर नाईक आणि बयाम्मा माता हे प्रखर रामभक्त होते. रामनवमीच्याच दिवशी उभयतांना श्री दत्तप्रभुंनी दृष्टांत देऊन, मी तुमच्या पोटी जन्म घेईन असे सांगितले. रामनवमीच्या ह्याच दृष्टांतानंतर पुढे त्याचवर्षी दत्तजयंतीला श्री माणिकप्रभुंचा जन्म झाला.‌ श्री माणिक प्रभुंनी रामावर अनेक पदे लिहिली आहेत. त्यामुळे श्रीजींच्या ह्या नाशिक दौऱ्याला विशेष महत्त्व होते. समस्त नाशिककरांसाठी दिनांक ८ ते १० एप्रिल दरम्यान श्री माणिक ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीजींचा हा पहिलाच नाशिक दौरा. दिनांक ७ एप्रिलला सायंकाळी श्रीजींचे नाशिक येथे आगमन झाले. जणूकाही आईसाठी व्याकुळ झालेल्या आपल्या बछड्यांना आकंठ ज्ञानामृत पाजण्यासाठीच, गोरज मुहूर्तावर श्रीजीरुपी माय नाशकात अवतरली होती. नाशिककरांनीही श्रीजींच्या स्वागतात कोणत्याही कसूर ठेवली नव्हती.

श्रीजींच्या आगमनाबरोबर त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.‌ फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. अनेकांनी श्रीजींच्या गळ्यात हार घातले. सुवासिनींनी श्रीजींना ओवाळले. वेदांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला. श्रीरामांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या नाशिक नगरीत श्रीजींच्या पदस्पर्शाने धरणीमातेसही आज अतीव आनंद झाला होता. त्यानंतर श्रीजींची अश्वरथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल, ताशे गर्जत होते, तुताऱ्या ललकारत होत्या, वाद्यांचा कल्लोळ आसमंतात गुंजत होता. अब्दागीरी, हवेत उंचच उंच डौलाने फडकणारे भगवे झेंडे मिरवणूकीची शोभा वाढवत होते. श्रीजींच्या रथापुढे मुली, महिला फुगड्या घालत होत्या. काहीजणी अत्यानंदाने झरझर रांगोळ्या काढत होत्या. मार्गात भुईनळे उडत होते. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहानातील लोकही गाडीची काच खाली करून कुतुहलापोटी श्रीजींना न्याहाळत होते, नतमस्तक होत होते. रथात बसलेले भक्तकार्यकल्पद्रुम गुरुसार्वभौम श्रीजीही समस्त जनांचे आदरातिथ्य, नमस्कार स्विकारतानाच आपल्या अभयकराने सर्वांना मंगल आशिर्वाद देत‌ होते.‌ श्रीजी आपल्या नगरात आल्याचा आनंद प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता आणि तो सहज टिपता येत होता. तासाभराच्या ह्या चैतन्यमय सोहळ्यानंतर श्रीजींचा ताफा, तपोवन येथील संतसेवेत अखंड रममाण असलेल्या श्री. हरीशभाई मकवाना ह्यांच्या बंगल्यावर पोहोचला. येथेही श्रीजींचे औक्षण करण्यात आले. संपूर्ण नाशिक दौऱ्यादरम्यान श्रीजींचा मुक्काम येथेच होता. श्रीजींच्या संपूर्ण कुटुंबासाठी श्री. हरीशभाईंनी आपला बंगला पूर्ण वेळ उपलब्ध करून दिला आणि ते अतिथी देवो भव ह्या उक्तीला अक्षरश: जागले. त्यांच्या ह्या परम सेवाभावीवृत्तीला मानाचा मुजरा!!!

दौऱ्यादरम्यानही श्रीजींच्या रोजच्या दिनचर्येमध्ये यात्किंचितही फरक पडला नाही. सकाळी लवकर उठून श्री. हरीशभाईंच्या घरी श्रीजींनी आपली नित्यपूजा आटोपली.‌ आता वेळ होती सद्भक्तांच्या घरी पाद्यपूजेसाठी जाण्याची.‌ ज्या सदभक्तांनी पाद्यपूजेसाठी नाव नोंदणी केली होती, त्या सर्वांच्या घरी श्रीजी सहकुटुंब भेट देतात. सद्गुरु आपल्या घरी येणार, ह्या आनंदामध्ये घरोघरी जणू उत्सवाचेच स्वरूप आले होते. नाशिकमध्येही माणिकनगर नावाची वसाहत आहे, हे मला तेथे गेल्यावर कळले. श्रीजींच्या नाशिक दौऱ्याची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यांवर समर्थपणे पेलली, अशा श्री. गोपाळराव कुलकर्णी यांच्या घरी श्रीजींच्या पाद्यपूजेसाठी उपस्थित राहण्याची संधी मिळाली. श्री. गोपाळराव कुलकर्णी यांच्या घराचे नावच श्री माणिक प्रभु असे आहे. सकलमत प्रभु नांदे जिकडे तिकडे ह्या उक्तीची प्रचिती जागोजागी येत होती. श्रीजींच्या स्वागतासाठी घरासमोर भली मोठी रांगोळी घातली होती. घरासमोरील भव्य शोभिवंत मंडपही जणू प्रभुभक्तांप्रमाणेच, श्रीजींच्या स्वागतासाठी आतुर झाला होता.‌ मंद आवाजात कानावर पडणारी बोध मार्तंडातील पदे मनास चैतन्य प्रदान करीत होती. दारासमोर मोरपिसाची सुंदर रांगोळी मन वेधून घेत होती. श्रीजींच्या आगमनाबरोबरच सर्वांनी श्रीजींवर पुष्पवृष्टी केली, कुणी हार घातले. फटाक्यांचे धडाडधूम बार उडाले. अंगणात सुवासिनींनी श्रीजींना औक्षण केले. श्री. गोपाळरावांबरोबरच त्यांचे थोरले बंधू श्री. गोविंदराव कुलकर्णी आणि कनिष्ठ बंधू श्री. मनोहरपंत कुलकर्णी सहकुटुंब श्रीजींना सामोरे गेले. घरामध्ये प्रथम श्री. गोविंदरावांनी सपत्नीक श्रीजींची पाद्यपूजा केली. त्यानंतर गोपाळराव व तदनंतर मनोहर पंतांनी सपत्नीक श्रीजींच्या पाद्यपूजा केल्या. याप्रसंगी सुमंत कुलकर्णी ह्या बालकलाकाराने बासरी वादन केले व त्याला चैतन्य कुलकर्णींनी तबल्याची उत्तम साथ दिली. कुलकर्णी कुटुंबाच्या घरातील वातावरण एकदम प्रभुमय होऊन गेलं होतं. हे सर्व चालू असताना बाहेर प्रभु भक्तांची उत्तम बडदास्त ठेवली जात होती. येथे श्री माणिक नगरचे श्री गुरुनाथ गुरुजी, नरसिंह गुरुजी, राजेश गिरीमामा, माणिकराव इत्यादि सेवेकऱ्यांना भेटून आनंद झाला. आमचे सर्वांचे दुपारचे भोजन येथेच झाले.

दुपारच्या भोजनानंतर तपोवन येथील श्री लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्टच्या नव्याने बांधलेल्या सुसज्ज धर्मशाळेमध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नांदेड, हैद्राबाद वैगरे बाहेरगावावरून आलेल्या प्रभुभक्तांच्या उतरण्याची सोय केली होती. तपोवनसारख्या पुण्यभूमीत, गोदावरी नदीच्या काठी असलेला आमचा निवास मनाच्या सात्विकतेत अधिकच भर घालत होता. थोडावेळाने आवराआवर करून आम्ही गंगापूर नाक्याजवळील शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी सभागृहामध्ये श्रीजींच्या प्रवचनासाठी जमलो. दौऱ्यादरम्यान श्रीजींचा ज्ञानयज्ञ ही उपस्थितांसाठी मोठी पर्वणीच असते. पाचकशे लोकांहून अधिक लोकांच्या बसण्याची क्षमता असलेले सभागृह खचाखच भरले होते. काही जण उभेही होते. श्रीजींच्या आगमनाबरोबरच चैतन्याची एक लहर सभागृहात उमटली. भक्तकार्य कल्पद्रुमचा जयघोष झाला. श्रीजींना पाहून नाशिककरांच्या यांच्या चेहऱ्यावर आनंदाबरोबरच उमटलेले औत्सुक्याचे भावही टिपता येत होते. श्रीजींना बसण्यासाठीचा मंच सुंदर फुलांनी सुशोभित केला होता. श्रीजींच्या आसनालाही ताज्या फुलांची मनोहर आरास केली होती. श्रीजींच्या बैठकीच्या उजव्या बाजूला श्री माणिक प्रभुंची सुहास्य वदन तस्वीर चित्त वेधून घेत होती.

सौ. ज्योत्स्ना कुलकर्णीताईंनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यानंतर श्री. रवींद्र पैठणे गुरुजींच्या वेदपाठ शाळेतील विद्यार्थ्यांनी वेदपठण केले. या माणिक ज्ञानयज्ञाच्या प्रसंगी नाशिकमधील अनेक मान्यवर तीनही दिवस उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने रंगावधूत आश्रमाचे अध्यक्ष श्री. भट्टडकाका, भागवत सेवा समितीचे श्री. प्रसन्न बेळे, दत्त सेवा समितीचे श्री. बी. जी. जोशी, गुप्ते महाराज समाधीचे अध्यक्ष श्री. अनिलकाका पाठक, काकासाहेब ढेकणे यांच्या गादीचे उत्तराधिकारी व लोकनाथ तीर्थाचे अध्यक्ष श्री. प्रकाश महाराज प्रभुणेकाका यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. तसेच, औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष श्री. भूषण काळे आपल्या अनेक सहकाऱ्यांसह उपस्थित होते, ज्यांनी श्रीजींच्या प्रवचनानंतर भोजनाची उत्तम आणि नेटकी व्यवस्था तिनही दिवस यशस्वीपणे सांभाळली.

सुरुवातीच्या वेदपठणानंतर सकलमत संप्रदायाच्या सप्ताह भजनातील शनिवारची श्री माणिक प्रभूंनी रचलेली अनेक पदे श्री. आनंदराज प्रभुंनी आपल्या सुस्वर कंठातून‌ उपस्थितांसमोर सादर केली. त्यांना संवादिनीवर श्री, अजय सुगावकर, तबल्यावर श्री. केदार तसेच ढोलकीवर श्री. संदेश ह्यांनी सुरेख साथ दिली. श्री चैतन्य राज प्रभु, श्री. चारुदत्त प्रभु आणि श्री. चंद्रहास प्रभु यांनी झांजाच्या वैविध्यपूर्ण तालाने तोलामोलाची साथ दिली. चि. प्रज्ञानराज ह्या श्रीजींच्या नातवाने संबळ अतिशय तालबद्ध पद्धतीने वाजवला. श्री माणिकप्रभुंनी रचलेल्या ह्या अविट गोडीच्या पदांनी श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन गेले होते. प्रत्येक पदानंतर श्रीजी त्या त्या पदांचा भावार्थ आणि लक्ष्यार्थ उलगडून दाखवत होते. त्याला पौराणिक कथांचा संदर्भ होता. श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या पुण्यभूमीत श्रीजींच्या मुखमालातून रामलीलांचे सेवन करताना कोण्या सुकृत दैव हे फळले असेच काहीसे भाव उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते. आम्ही रामायण कथा अनेकदा अनेकांकडून ऐकल्या पण त्या कथांमध्ये लक्ष्यार्थ आणि भावार्थ अशा प्रकारे आजपर्यंत कोणीही विषद केला नव्हता, अशा प्रतिक्रिया प्रवचनानंतर अनेक नाशिककरांनी व्यक्त केल्या.

भजनानंतर माणिक ज्ञानयज्ञातील श्रीजींचे मुख्य प्रवचन सुरू झाले.‌ यावेळेस श्रीजींनी श्रीमद्भगवद्गीतेतील कर्मयोगाच्या तिसऱ्या अध्यायातील ३६ ते ४३ या श्लोकांचे निरूपण तीन दिवस केले. कुरुक्षेत्रावर अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णाला प्रश्न केला की इच्छा नसतानाही माणूस जबरदस्तीने पाप कर्मे करण्यास का बरे प्रेरित होतो? ह्या प्रश्नांचे उत्तर देताना श्रीकृष्णाने जो बोध अर्जुनाला केला तोच बोध सामान्य जणांना समजेल, रुचेल, पटेल, पचेल अशा पद्धतीने श्रीजींनी दैनंदिन जीवनातील तसेच, अनेक पुराणातील नानाविध कथांच्या सहाय्याने उपस्थितांसमोर उलगडून दाखविला. रजोगुणाच्या संपर्कातून उद्भवलेले काम आणि क्रोध हेच आपले शत्रू आहेत तसेच काम, क्रोध आणि लोभ यांचा परस्पर संबंध श्रीजींनी उपस्थितांना समजवून सांगितला. प्रत्येक दाखल्यागणिक उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट व हास्याचा गडगडाट उमटत होता.‌ श्रीजींच्या ह्या प्रवचनाने निसर्गालाही सर्वस्वी आनंद झाला होता आणि त्याने आपला आनंद पावसाच्या रिमझिम बरसणाऱ्या सरीतून व्यक्त केला. श्रीजींच्या प्रवचनानंतर श्री माणिक प्रभुंची आरती झाली, उपस्थितांना प्रभुंचा प्रसाद दिला गेला. ज्ञानामृत प्राशनानंतर प्रभुंच्या महाप्रसादाने तृप्त झालेल्या प्रत्येकाने आपापल्या घराची वाट धरली.

दुसऱ्या दिवशीही श्रींची अनेक सद्भक्तांना घरी पाद्यपूजा आयोजित करण्यात आली होती. सकाळच्या या वेळेत आम्हाला पंचवटी परिसर, काळारामाचे मंदिर, कपालेश्वर महादेव आणि गोदावरी घाटाचे दर्शन घेता आले. संध्याकाळी पुन्हा शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृहात श्रीजींच्या प्रवचनासाठी नाशिककर जमले होते. कालच्यापेक्षा आज उपस्थिती अधिक होती. आज रविवारी सप्ताह भजनातील खंडोबाचे भजन झाले. त्यानंतर श्री मार्तंड माणिक प्रभुंची अनेक वेदांतपर पदे सादर केली गेली. प्रत्येक पदाचा अर्थ समग्रपणे समजून देताना श्रीजींनी विवेचनाची पराकाष्ठा केली आणि उपस्थितांची मने जिंकून घेतली. आपल्या दुसऱ्या दिवशीच्या श्री माणिक ज्ञानयज्ञातील आपल्या प्रवचनामध्ये इंद्रिये, मन आणि बुद्धी ही कामाची निवासस्थाने आहेत आणि काम त्यांच्या द्वारा आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाला कसा आच्छादित करतो, हे श्रीजींनी पुन्हा एकदा आपल्या खुमासदार शैलीमध्ये श्रोत्यांच्या मनावर बिंबवले. धडाडणाऱ्या श्री माणिक ज्ञानयज्ञामध्ये श्रीजींच्या विद्वत्ताप्रचुर, शास्त्रसंमत विवेचनाच्या आहुतीवर आहुती पडत होत्या आणि ह्या धडाडणाऱ्या ज्ञानयज्ञाचे तेज उपस्थित सर्वांवर फाकत होते, त्याची ऊब सर्वांनाच जाणवत होती. दुसऱ्या दिवशीच्या प्रवचनानंतरही श्री माणिक प्रभुंची आरती झाली व प्रभुंचा प्रसाद सर्वांना वाटला गेला. त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद आयोजित केला गेला होता.

तिसऱ्या दिवशीसुद्धा अनेक प्रभुभक्तांच्या घरी श्रीजींच्या पाद्यपूजा आयोजित केल्या गेल्या होत्या. आज सकाळी आम्हाला लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक जिथे कापले गेले, त्या तपोवनातील जागेचे दर्शन करायला मिळाले. कपिला आणि गोदावरी नदीचा संगम, लक्ष्मणाची तपोभूमी पाहायला मिळाली. शहरीकरणाच्या धामधुमीतही नाशिकने आपले ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व अजूनही आत्मीयतेने जपले आहे.

संध्याकाळी पुन्हा शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृहात भक्तांची दाटी झाली होती. पहिल्या दोन दिवसांपेक्षा आज उपस्थिती अजूनच जास्त होती. हे श्री माणिक प्रभु आणि श्रीजींबद्दल फुलत जाणारी भक्ती, त्यांच्याप्रती दुणावत चाललेला आदर, वृद्धिंगत होणारा प्रेमभाव आणि दिवसागणिक घट्ट होणारी नाळ ह्याचेच द्योतक होते. उपस्थित सद्भक्तांच्या ह्या उत्स्फूर्त सहभागामुळे मंचावर असलेल्या श्री प्रभुंच्या तसविरीतील स्मित जणू आता हास्यात बदलले भासत होते. आज श्री माणिक ज्ञानयज्ञाच्या शेवटच्या दिवशी सुरुवातीला पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य श्री. अनिल कुटे सर व त्यांच्या विद्यार्थ्यांनी देश तालावर मंत्रमुग्ध करून टाकणारे बासरी वादन केले. लहान लहान मुलांनी छेडलेले बासरीचे सूर ऐकून सभागृहामध्ये जणू गोकुळच अवतरल्यासारखे वाटत होते. आज सोमवारच्या दिवशी सप्ताह भजनातील शिव शंकराची भजने सादर केली गेली. त्याच्या जोडीला आजही श्री मार्तंड माणिकप्रभुंची वेदांतावरील सादर केलेली पदे उपस्थितांचे मन मोहवून गेली. अर्थात् ह्यामध्ये श्री आनंदराज प्रभुंच्या दैवी सुरसाजांचा मोलाचा वाटा होता, हे वेगळे सांगणे नकोच. भजनसंध्येनंतर श्री माणिक ज्ञानयज्ञाच्या पूर्णाहूतीच्या प्रवचनामध्ये, श्रीजी अभ्यासपूर्ण विवेचनाच्या आहुती सोडत होते. इंद्रिय, मन, बुद्धी यांच्यापेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे आणि माणसाने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे मनाला स्थिर केले पाहिजे तसेच या अध्यात्मिक शक्ती द्वारे कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे, हे भगवद्गीतेचे तिसऱ्या अध्यायाचे सार, सदभक्तांच्या मनावर आणि बुद्धीवर आपल्या मोहून टाकणाऱ्या, मंत्रमुग्ध करणाऱ्या विवेचनातून ठासवले. कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी नऊ पर्यंतची होती परंतु, वेळ उलटून गेल्यानंतरही विषयाच्या संपूर्ण आकलनासाठी श्रीजींनी अधिकचा वेळ मागितला असता, संपूर्ण सभागृहातून अविलंब होकार मिळाला. कुणीही आपली जागा सोडायला तयार नव्हते. आकंठ प्राशन केलेल्या या ज्ञानामृताने उपस्थितांच्या चेहऱ्यावर पूर्ण समाधान झळकत होते. श्री ज्ञानराज माणिकप्रभु गाईने सोडलेला ज्ञानरूपी पान्हा सेवून आज पाडसे तृप्त झाली होती. श्रीजींच्या प्रवचनानंतर श्री आनंदराजप्रभुंनी आपल्या आभार प्रदर्शनावेळी श्री माणिक प्रभु संस्थानासंबंधी थोडक्यात माहिती उपस्थितांना दिली व आपल्या सवडीनुसार श्री माणिकनगरला यायचे अगत्याचे, सस्नेह निमंत्रण दिले. तसेच नाशिककरांच्या आयोजनाबद्दल आणि आदरातीथ्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्यानंतर श्री माणिकप्रभुंची आरती होऊन सर्व भक्तांना प्रभुंचा प्रसाद वाटला गेला. त्यानंतर महाप्रसादाने माणिक ज्ञानयज्ञाची यशस्वी सांगता झाली.

नाशिक दौऱ्यातील चौथ्या दिवशी श्रीजींनी सहकुटुंब व सद्भक्तांसह नाशिक येथे प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. श्रीजींना गाभाऱ्यात स्वहस्ते अभिषेक करण्याचा मान मिळाला. त्र्यंबकेश्वर नंतर श्रीजी कुशावर्त तीर्थी आले. तेथून पुढे रंगवधूत आश्रमात दर्शनासाठी आले. तेथे त्यांनी काही काळ व्यतीत करून दुपारी दत्तधामाला भेट दिली. सुमारे पाच ते सहा तास दत्तधामामध्ये घालवल्यानंतर श्रीजी संध्याकाळी गोदावरी काठी गंगा आरतीसाठी त्याच उत्साहात हजर होते.‌ बुधवारी सकाळी श्रीजींनी वणी येथे गडावर श्री सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले, मातेची आरती केली. तेथे श्रीजींचा श्रीसंस्थानातर्फे सत्कार करण्यात आला. वणीहून दुपारी येऊन श्रीजींनी काळाराम मंदिरात सहकुटुंब दर्शन घेतले. तेथेही श्रीजींना आरतीचा मान मिळाला. श्री काळाराम मंदिराचे अध्यक्ष ॲड. अजय निकम यांच्या हस्ते श्रीजींचा सत्कार करण्यात आला. गुरुवारी सकाळी धुळे येथे श्री सर्जाबाई दत्त मंदिरात श्रीजींची पाद्य पूजा करण्यात आली आणि तेथून औरंगाबादमार्गे श्रीजींनी माणिकनगरसाठी प्रस्थान ठेवले.

सन १९८८ ला श्री ज्ञानराज माणिक प्रभुंचे पिताश्री श्री सिद्धराज माणिक प्रभु गुजरातला जात असताना नाशिक येथे आले होते. त्यानंतर इतक्या प्रदीर्घ कालखंडानंतर श्री माणिकप्रभु संस्थानाच्या पिठाचार्यांचे आगमन नाशिक क्षेत्र झाले. पहिल्यांदाच श्रीजी नाशिकला येणार असल्यामुळे नाशिककर अत्यंत आनंदात आणि उत्साहात होते. विविध धार्मिक संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून श्री. गोपाळराव कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची रुपरेषा अतिशय दक्षतेने आखली आणि त्याला अत्यंत नियोजित पद्धतीने आणि तितक्यात समर्थपणे कृतीत देखील आणले. श्री. गोपाळरावांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या तसेच या दौऱ्याच्या यशस्वी आयोजनात तन-मन-धनाने सर्वतोपरी सहाय्य करणाऱ्या ज्ञात अज्ञात कार्यकर्ते यांच्याप्रती कृतज्ञता. त्यांच्या यशस्वी नियोजनबद्दल, व्यवस्थेबद्दल अभिनंदन, कौतुक आणि भविष्यातील अशाच यशस्वी आयोजनासाठी मनस्वी शुभेच्छा…

श्रीजींनीही वेळात वेळ काढून सदभक्तांवर कृपेसाठी नाशिक दौऱ्याचे निमंत्रण स्वीकारले. त्यासाठी श्रीजींचे माणिक प्रभुं संस्थानचे आभार मानावे तितके कमीच आहेत. शहराचे नाव जरी ना शिक असले तरी श्रीजींच्या श्री माणिक ज्ञान यज्ञातून प्रत्येकासाठी काही न काही शिकवण जरूर मिळाली असणार ह्यात तीळमात्रही शंका नाही. सामान्य जीवाला स्वस्वरूपाची ओळख करून देण्याची तीव्र तळमळ असणाऱ्या व त्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या श्रीजींच्या परममंगल चरणी अनंत कोटी नमन आणि वारंवार कृतज्ञता व्यक्त करतो‌.

 

वेदांत सप्ताह उत्साहात साजरा

चतुर्थ दत्तावतारी श्री माणिकप्रभु महाराजांनी आपल्या कारकिर्दीत निर्गुण निराकार अशा चैतन्यतत्वाला अग्रस्थानी ठेवणाऱ्या, सर्व जातीधर्मांना ज्ञान आणि भक्तीच्या एकाच समान सुत्रात घट्ट बांधणाऱ्या सकलमत संप्रदायाची स्थापना केली. ह्याच निर्गुण निराकार तत्वाची ओळख सर्वसामान्यांना व्हावी ह्या उदात्त हेतूने, श्री माणिकप्रभुंनंतर श्री सकलमत संप्रदायाचे तृतीय पीठाचार्य श्री मार्तंड माणिकप्रभु ह्यांनी १९०० साली माणिकनगरला प्रथम वेदांतसप्ताह आयोजित केला होता. त्यानंतरचे पीठाचार्य श्री शंकर माणिकप्रभु ह्यांनी त्यात शिस्तबद्धता आणली. त्यानंतरचे पीठाचार्य श्री सिद्धराज माणिकप्रभु व सध्याचे पीठाचार्य श्री ज्ञानराज माणिकप्रभु ह्यांनी त्यात कालानुरूप बदल घडवल्याने वेदांत सप्ताहाचा दैदिप्यमान सोहळा आपण सांप्रतकाळी अनुभवू शकतो. सन १९०० साली पहिला वेदांत सप्ताह पार पडला होता. यावर्षी वेदांत सप्ताहाचे १२३ वे वर्ष होते.

ह्यावर्षी वेदांत सप्ताहाची सुरूवात दि. ०९ मार्च २०२३ रोजी श्री शंकर माणिकप्रभुंच्या पुण्यतिथीच्या दिवशी झाली. वेदांत सप्ताहकाळात वेदशास्त्रसंपन्न ब्रह्मवृंदाद्वारे श्री भागवताचे पारायण, जे ह्या सप्ताहाचे मुलभूत अंग आहे, तसेच श्रीगुरुचरित्र आणि श्री माणिकप्रभु चरितामृताचे सामुहिक पारायण सुमारे १८० सद्भक्तांच्या सहभागात अगदी उत्साहाने पार पडले. संगीताचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणिकनगरात वेदांत सप्ताहाच्या पहिल्या दिवशी विविध वाद्यांची विधीवत पूजनही होते. संपूर्ण वेदांत सप्ताहात वीणेवर अखंड नामसंकीर्तन चालू असते. दररोज दुपारी विद्यमान पीठाचार्य श्री ज्ञानराज माणिक प्रभु यांचे वेदांतपर शिक्षा शिबीर सर्व सर्व भक्तांच्या सहभागात पार पडले. ह्यावर्षी भगवद्गीतेतील कर्मयोगाचा तिसरा अध्याय श्रीजींनी सर्वांना समजेल व आचरणात आणण्यात सुलभ होईल ह्या प्रकारे समजून सांगितला. सायंकाळी माणिक नगर गावातील महिलांचे भजन, त्यानंतर संध्याकाळी बालगोपाल रास क्रीडा (कोल), नंतर ग्रामवासी यांचे भजन, तदनंतर श्रीजींचे रात्री कालीन प्रवचन तसेच त्यानंतर सप्ताहातील सात दिवशी सात वारांचे भजन अनेक दिग्गज शास्त्रीय संगीतकार आणि कलाकारांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडले. यानंतरही माणिकनगरच्या आसपासच्या गावातील भजनी मंडळांनी संपूर्ण रात्रभर रात्रीभजनाची सेवा प्रभुचरणी अर्पण केली. वेदांत सप्ताह काळात रात्रीसुद्धा प्रभुमंदिर उघडे असते. सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी श्री मार्तंड माणिकप्रभु पुण्यतिथीनिमित्त आराधना संपन्न झाली.

वेदांत सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी श्री माणिकप्रभु चरित्र व संप्रदायाच्या साहित्यावर आधारित माणिक क्विझ आयोजित करण्यात आले होते. भागवतात सांगितल्याप्रमाणे सप्ताह पारायण नंतर रात्री जागरण करुन‌ हरीनाम संकीर्तन करावयाचे असते. त्यालाच अनुसरून अतिशय भव्य आणि दैदिप्यमान अशी दिंडी वेदांत सप्ताहात आयोजित करण्यात येते. सकलमत संप्रदायातील अनेक पदे वाद्यांच्या कल्लोळात, लयबद्धपणे म्हणताना संपूर्ण माणिकनगरची नगरप्रदक्षिणा पूर्ण केली जाते. दि. १६ मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास निघालेल्या दिंडीची सांगता दुसऱ्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास पुन्हा श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर येऊन झाली. ह्या वेळेस अनेक राज्यांतून आलेल्या शेकडो आबालवृद्ध भाविकांनी उस्फूर्तपणे दिंडीचा आनंद लुटला. संपूर्ण वेदांत सप्ताह काळात सहभागी सद्भक्तांची व्यवस्था श्री माणिकप्रभु संस्थानातर्फे अतिशय नियोजनबद्ध रीतीने करण्यात आली होती. आपल्या रोजच्या प्रपंचातून एक आठवडा, भगवंताच्या ज्ञान आणि भक्तीयुक्त सहवासात समग्रपणे व्यतीत करून, त्यातून उमटलेल्या आत्मानंदाचे प्रतिबिंब सहभागी प्रत्येक सद्भक्ताच्या चेहऱ्यावर झळकत होते.

महावस्त्र

प्रभुबंधन

लहानपणी मुलांच्या डोकीचे पागोटे किंवा धोतर यांनी प्रभु आपणांस झाडाशी बांधून घेत. खूप आवळून बांधल्यानंतर बघता बघता प्रभू त्यातून निसटून जात. केव्हा केव्हा धोतर प्रभुंच्या कमरेभोवती बांधून, दोन्ही टोकांकडे उभे राहून मुले खूप खेचून ताणून‌ धरत. धोतरास बळकट गाठ मारली जायची पण, प्रभु मात्र जसेच्या तसे मोकळेच असायचे !!!

मामा

एक दिवस दुपारच्या वेळेस प्रभु मामाच्या पलंगावर चादर पांघरून स्वस्थ झोपी गेले होते. मामा बाहेरून घरी आल्यावर मामांनी प्रभुंना उठवून प्रभुंच्या स्वच्छंदी वागण्यावरून त्यांनी प्रभुंना बरेच बोल लावले व तू आत्ताच्या आता माझ्या समोरून चालता हो, असे निर्वाणीचे सांगितले. प्रभुनांही प्रपंचामध्ये फारसा रस नव्हता आणि त्यांना ह्यातून बाहेर पडावयाचेच होते. मामांनी असे बोल लावल्यावर, हीच वेळ योग्य समजून, अत्यंत शांत आणि उल्हासित वृत्तीने प्रभुंनी आपले नेसलेले धोतर तेथेच फाडून, त्याची लंगोटी घातली आणि मामांना नमस्कार करून बाहेरचा रस्ता धरला.‌

व्यंकम्मा

प्रभुंनी व्यंकम्माचे निस्सीम आणि शुद्ध प्रेम जाणले होते. एकदा प्रभुंनी व्यंकम्माची परीक्षा पाहण्याचे ठरवले. एके समयी स्त्री स्वभावाला अनुसरून व्यंकमा नग्न होऊन स्नान करीत होती. अशावेळी प्रभुंकडून निरोप आला की, “असशील तशी निघून ये!” हा निरोप कानावर पडताच, ती देहभान विसरून तशा स्थितीतच प्रभुंकडे यावयास निघाली. प्रभुंच्या मातोश्रींस हे वर्तमान कळल्याबरोबर त्याही मागोमाग निघाल्या. त्यांनी तिला मध्येच थोपवून धरले. स्त्रियांचे खरे भूषण लज्जा हे होय. हेच एकदा नाहीसे झाले तर स्त्रीत्व कसे राहणार? पण तशाही स्थितीमध्ये व्यंकम्मा प्रभुआज्ञा प्रमाण मानून प्रभुपुढे येऊन उभे राहावयास तयार झाली हे पाहून, ती जवळ येण्याची वाट देखील न पाहता प्रभुंनी आपल्या अंगावरील शुभ्र वस्त्र काढून व्यंकम्माच्या अंगावर घालण्याकरता मातोश्रींकडे पाठवले. त्यावेळी व्यंकम्माचा खरोखर उद्धार झाला.

तुकाराम धनगर

तुकाराम धनगरला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार व्हावा, अशी इच्छा होती. प्रभुंनी त्याला आत्मरूप प्रतीति हा ग्रंथ वाचावयास देवून त्याची पारायणे करावयास सांगितली. कित्येक महिने उलटले, अनेक पारायणे होऊनसुद्धा आत्मरूप प्रतीति येईना म्हणून, एके दिवशी प्रभुसंन्निध येऊन ग्रंथ परत करून तो म्हणाला, “मला यातून काहीही अर्थबोध झाला नाही किंवा स्वस्वरुपाचे ज्ञान झाले नाही.” तेव्हा प्रभुंनी तुकारामाची समजूत काढून भंडारखान्यात जाऊन झोळीचा प्रसाद भक्षण करून येण्यास सांगितले. त्यावेळी त्याने आपल्या अंगावरील घोंगडे त्याने प्रभुंजवळच ठेवले होते. तो निघून गेल्यावर, प्रभुंनी ते घोंगडे आपल्या अंगावर घेतले आणि काही वेळ स्वस्थ बसले. प्रसाद घेऊन परत आल्यावर त्याचे घोंगडे त्याला परत दिले. तुकाराम घोंगडे अंगावर घेऊन बसताच त्याच्या चित्तवृत्तीचा लय लागून त्याला समाधी लागली. आत्मस्वरूप साक्षात्कार म्हणजे काय असतो, याचा प्रत्यक्ष अनुभव त्याला मिळाला. घोंगडे पांघरूण तो आनंदभरात रंगून जाऊन डोलत राहिला.

अत्यंत रसाळ अशा श्रीप्रभु चरित्रातील प्रभुंच्या लीला वाचताना मन आनंदाने वारंवार उचंबळून येते. वरील वर्णिलेल्या चारही कथांतून आपल्याला वस्त्र ही सामायिक वस्तू दिसून येते. वरवर जरी ह्या सहज घडलेल्या प्रभुलीला दिसल्या तरी त्यात जीवनाचे सहज सुंदर सार दडलेले आहे. ही वस्त्रे म्हणजे जणू मायेचे पडदेच. या मा सा माया अर्थात् जी नाही ती माया. एकदा का ह्या मायेचे पडदे हटले की, आपल्याला आपल्या खऱ्या, मूळ स्वरूपाची जाणीव होते.

लहानपणीचे प्रभुंचे खेळ पाहिले, तर प्रभुंचे सवंगडी त्यांना धोतरामध्ये बांधण्याचा आटोकाट प्रयत्न करायचे. पण साक्षात् दत्तावतारी असणाऱ्या ह्या परब्रह्म अवधूताला, ती माया कशी काय बांधू शकणार? मायेच्या पलीकडे असलेले प्रभु, धोतराच्या गाठीत न अडकता, कायम मोकळेच राहिले.

आपल्या मामाकडे असताना प्रभुंना विश्वाच्या कल्याणासाठी कुटुंबाच्या मायेतून बाहेर पडायचे होते. त्यासाठी मामांच्या गादीवर झोपल्यानंतर, मामांनी खरडपट्टी काढण्याचे निमित्त साधून, त्यांनी तत्क्षणी आपले धोतर फाडून त्याची लंगोटीमात्र चिंधी कमरेस गुंडाळली. येथेही कौटुंबिक नात्यांच्या मायेतले धोतररुपी पाश प्रभुंनी तिथल्या तिथे फाडून टाकून दिले.

व्यंकम्माच्या परीक्षेच्यावेळी वस्त्रे बाजूला ठेवून, नग्न होऊन आंघोळ करताना, न्हाणीघरातून असशील तशी निघून ये, ही प्रभुआज्ञा प्रमाण म्हणून धावत तशीच धावत निघाली. त्यावेळेसही जणू आपली अविद्यारूपी वस्त्रे काढून तिने न्हाणीघरातच ठेवली होती. प्रभुंनी धारण केलेले वस्त्र जेव्हा प्रभुंनी व्यंकम्माला लज्जा रक्षणासाठी दिले, त्या वस्त्राच्या केवळ स्पर्शाने व्यंकम्मा निःसंग झाली. तिचे मीपण तत्क्षणी विरले. त्यावेळेस व्यंकम्माचा जणू पुनर्जन्मच झाला. अविद्यारुपी मायेचे पडदे गळून जाऊन, दुरीत पार जळून जाऊन व्यंकम्मा धुतल्या तांदळाप्रमाणे सोज्वळ झाली.

तुकाराम धनगराच्या कथेतही आत्मरूप प्रतीतिची अनेक पारायणे करूनही तुकारामास स्वस्वरुपाचा काही बोध झाला नाही. पण आपले अविद्यारूपी मायेचे घोंगडे प्रभुंकडे देताच प्रभुंच्या केवळ स्पर्शाने पवित्र झालेल्या त्या घोंगडीला परत धारण करताच, तुकारामाची तत्क्षण समाधी लागली. प्रभुंचा केवळ दिव्यस्पर्श झालेल्या वस्त्रांमध्येही किती अद्भुत सामर्थ्य असते, हे या आणि देवी भगवती श्री व्यंकम्माच्या कथेतून दिसून येते. श्रीप्रभु आपल्या मनबुद्धीवर असलेल्या विविध मायारुपी वस्त्रांना फेडून (अज्ञान दूर करून), अवधूत बनवून, आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देण्याची निरंतर संधी आपल्याला उपलब्ध करून देत असतात.

आपल्या संजीवन समाधीच्या वेळीसही प्रभुंनी आपला उत्तराधिकारी निवडताना, आपला पुतण्या अर्थातच श्री मनोहर माणिक प्रभुंना थोड्यावेळ आपल्या मांडीवर बसवले. त्यांच्याकडून पूजा आरती करून घेतली. अवघ्या सात वर्षाच्या बाल मनोहरावर प्रभुंनी आपल्या अंगावरील दुशाला पांघरविला. वयाच्या सातव्या वर्षापासून संजीवन समाधी घेण्याच्या, वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षापर्यंत, श्री मनोहर प्रभुंनी संस्थानाचा कारभार, भव्य अशा श्रीप्रभु मंदिराचे निर्माण करण्यापासून, श्रीप्रभु समाधीची पूजा पद्धती तयार करून, श्री प्रभुंनी स्थापन केलेल्या सकलमत संप्रदायाला मूर्त स्वरूप आणण्यापर्यंत अतिशय कुशलतेने सांभाळला. येथेही आपल्याला प्रभु स्पर्शाच्या वस्त्राच्या दिव्यतेची प्रचितीच दिसून येते.

आजच्या घडीला श्रीप्रभु जरी संजीवन समाधीत निजानंदमग्न असले तरी त्यांचे नामस्मरण, त्यांनी रचलेली पदे, श्रीप्रभुनंतरच्या पीठाचार्यांचे समग्र वाङ्मय, प्रवचने ही आपल्याला त्यांच्या स्पर्शरुपी ज्ञानवस्त्रांतच उपलब्ध आहेत.‌ ह्या दिव्य वस्त्रांचा स्पर्श आपणासही होऊन, आपली आध्यात्मिक उन्नती उत्तरोत्तर होत राहो, आपल्याला स्वस्वरुपाचे ज्ञान होवो, ह्या श्रीप्रभु चरणीच्या आणखी एका नम्र विनंतीसह श्री गुरु माणिक जय गुरु माणिक.