झोळीपूजा आणि अन्नपूजा – माणिकनगर येथील एक सुंदर, वैशिष्ट्यपूर्ण परंपरा

माणिकनगर येथील वास्तव्यामध्ये झोळीपूजा आणि अन्नपूजा या दोन विशेष पूजांनी माझे मन अनेकदा वेधून घेतले. इतर दत्तक्षेत्रांमध्ये ही परंपरा सहसा आढळून येत नाही. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या ह्या नितांतसुंदर अशा परंपरेचा मागोवा घेतला असता, अनेक भक्तमंडळी झोळीपूजा आणि अन्नपूजा करतात असे कळाले. श्रीप्रभुप्रती कृतज्ञता म्हणून मुख्यत्वे होत असलेल्या ह्या दोन पूजेंची माहिती इतरांसही मिळावी, आणि त्यांनीही प्रभुची कृपा संपादन करण्याची संधी मिळावी, म्हणून हा अल्पसा लेखन प्रपंच.

श्रीप्रभुंनी लहानपणी मामाचे घर सोडल्यावर, मंठाळच्या अरण्यात अमृतकुंडावर एकांतात साधना केली आणि प्रत्यक्ष श्रीदत्तात्रयांनी तेथे प्रभुंना झोळी आणि सटक्याचा प्रसाद दिला, हे सर्वश्रुतच आहे. त्यानंतरही ह्या झोळीचा आणि पर्यायाने श्री अन्नपूर्णा मातेचाच अखंड वरदहस्त श्री प्रभुसंस्थानावर आहे, ज्याच्या प्रसादस्वरूप श्री संस्थानामध्ये आजतागायत अन्नधान्याची आणि प्रसादाची कधीही कमतरता जाणवली नाही. श्रीमाणिक प्रभुंनीही आपल्या अवतार काळामध्ये, सदैव भिक्षान्न स्वीकारले. पंचपक्वान्नाचे जेवण असले तरी प्रभु झोळीमधील भिक्षा किंवा माधुकरीच घेत. श्री माणिक चरितामृतामध्येही चोवीसाव्या अध्यायात भिक्षेचे महत्त्व विस्ताराने वर्णिले आहे. त्यामुळे सकलमत संप्रदायांमध्ये आणि समस्त प्रभुभक्तांमध्ये भिक्षेच्या झोळीचे विशेष महत्त्व आहे. झोळीची ही परंपरा श्री माणिकप्रभुंच्या काळापासून आहे.

श्री माणिकप्रभुंच्या संजीवन समाधीनंतर श्री मनोहर माणिकप्रभुंच्या काळात झोळीपूजेची परंपरा सुरू केली ती आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे. देह रूपाने श्रीप्रभु जरी समाधीस्थ झाले, तरी चैतन्य स्वरूपाने ते आपल्यातच आहेत, आणि त्यांच्या नैवैद्याकरिता अखंड सुरू असलेले नित्यभिक्षेचे विधान, हे श्रीमाणिक प्रभु संस्थानाच्या आस्था आणि विश्वासाचे परमविशेष आहे. भिक्षेसाठी आजही झोळी माणिकनगरमध्ये पाच घरी फिरते आणि प्रभुंच्या नैवेद्यासाठी भिक्षा आणली जाते.‌ जे भक्त माणिकनगरात राहत नाहीत, पण त्यांना झोळी घालण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही झोळीपूजेची व्यवस्था साक्षात् प्रभुंनीच जणू अत्यंत कृपाळूपणे केली आहे.

झोळीपूजेमध्ये झोळीमध्ये प्रभुंचा छोटा सटका असतो, त्याची मुख्यत्वे पूजा होते. त्याला स्नान घालून, गंध लावून सटक्याची पूजा केली जाते. त्यानंतर पूजेच्या वेळी नैवेद्याचे जे मंत्र म्हटले जातात, ते मंत्र म्हणून त्यावेळी झोळीमध्ये यथाशक्ती नैवेद्य, शिधा ठेवला जातो. त्यानंतर झोळी बंद करून, पुन्हा झोळीची गंध वैगरे लावून पंचोपचार पूजा होते, नैवेद्य दाखवून, आरती केली जाते. आजही जुन्या प्रभुंभक्तांमध्ये (श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या काळापासूनच्या) आजही काही मंगलकार्य, जसे लग्न किंवा मुंज वगैरे पार पडली की, त्यानंतर ते भक्त माणिकनगरला प्रभुमंदिरात येऊन झोळीपूजा करतात. विद्यमान प्रभुपरिवारामध्येही ही परंपरा आवर्जून पाळली जाते. ह्या वेळेस झोळी घेणाऱ्या ब्रह्मचाऱ्याचीही हार घालून, आरती करून पूजा केली जाते. एकंदरीतच झोळी पूजा ही प्रभुंच्या ब्रह्मचारी स्वरूपाची किंवा अवधूत दिगंबर किंवा माधुकरी वृत्तीचीच पूजा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

अन्नपूजा ह्या पूजा विधीमध्ये श्रीप्रभुसमाधीस दहीभाताचे लिंपण केले जाते आणि नंतर हा दहीभात भक्तांना प्रसाद म्हणून वाटला जातो. अन्नपूजेचा संबंध महादेवाच्या पूजेशी आहे. रुद्र अनुष्ठानाची सांगता अन्नपूजेने होते. साधारणतः शंकराच्या पिंडीला अशा प्रकारचे दहीभाताचे लिंपण केले जाते. काही ठिकाणी देवीलाही दहीभाताचे लिंपण करून अन्नपूजेचा विधी पार पडला जातो. हलाहल प्राशन केल्यामुळे शरीराला झालेला दाह कमी व्हावा, या भावनेने श्रीशंकरास दहीभाताच लिंपण आणि असुरांशी युद्ध केल्यावर, देवीला आराम मिळावा म्हणून दहीभाताचं लिंपण करण्याची परंपरा पूर्वापारपासून अनेक ठिकाणी चालत आली आहे. माणिकनगरातही प्रभुसमाधीस अन्नपूजेची परंपरा गेले अनेक वर्षे अखंड सुरू आहे.

प्रभु समाधीच्या अन्नपूजेच्या ह्या प्रथेचा मागोवा घेतला असता, श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या काळापासून अन्नपूजेची प्रथा सुरू झाल्याचे कळते. श्री माणिक प्रभुंचे शिष्य असलेले दुबळगुंडीचे रामण्णापंत यांना, श्रीप्रभु जयंतीच्या दरबाराची सांगता अन्नपूजेने करा, अशी आज्ञा श्री मार्तंड माणिक प्रभुंनी केली आणि तेथूनच ह्या अन्नपूजेची परंपरा सुरू झाली. त्यानंतरच्या श्रावणमासाच्या अनुष्ठानाची सांगता, श्रावण मासाच्या शेवटच्या दिवशी पुजारी वर्गाने अन्नपूजेने करावी, अशी ही आज्ञा श्री मार्तंड माणिक प्रभुंनी केली. श्रावण मासाच्या अनुष्ठान समाप्तीच्या अन्नपूजेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच, भाद्रपद प्रतिपदेला श्रीप्रभु गादीच्या पीठाधीशांच्या परिवाराकडून श्रीप्रभु समाधीची अन्नपूजा केली जाते. आजही प्रभुंचे नवरात्र दुबळगुंडीच्या रामण्णापंतांच्या कुटुंबाकडे आहे व ते माणिक नगरी येऊन ही प्रभू सेवा करतात. त्यांची अन्नपूजा पाहून इतरांनाही या अन्नपूजेची प्रेरणा झाली. आपले काही काम अडले असल्यास, मी प्रभुची अन्नपूजा करेन, असा नवस अनेक प्रभुभक्त करतात किंवा प्रभुगादीच्या पीठाचार्यांनीही आपल्या भक्तांना, तुमचे काम होईल, काम झाल्यावर प्रभुसमाधीची अन्नपूजा करा, असे अनेकदा सांगितल्याचे कळते. थोडक्यात, प्रभुप्रती कृतज्ञता किंवा नवस पूर्ततेचा विधी म्हणून अन्नपूजेकडे आपल्याला पाहता येईल.

ह्या अन्नपूजेचेही मोठे वैशिष्ट्यपूर्ण विधान आपल्याला माणिकनगरी पहायला मिळते. चांदीच्या घंगाळवजा पातेल्यात (ह्याला कन्नड भाषेत कोप्परगी असं म्हणतात) पाच एक किलो दहीभात असतो आणि चांदीच्या पात्रामध्ये अकरा वडे असतात. अन्नपूजेच्या वेळेस हे दहीभात प्रभुमंदिरात ठेवले जाते. श्रीप्रभु समाधीची महान्यासपूर्वक रुद्राभिषेक महापूजा होते. त्यानंतर प्रभूंना वस्त्रसाज केल्यावर, जेव्हा नैवेद्याचे मंत्र येतात त्यावेळी, श्रीप्रभु समाधीस पडदा केला जातो आणि श्रीप्रभु समाधीवर छाटी ठेवली जाते. त्यावर हा दहीभात पसरवला जातो. ह्यावेळी भृगुवल्लीतील अन्नपूजेचे मंत्र म्हटले जातात. श्रीप्रभु समाधीवर पसरवलेल्या दहिभातावर वडे ठेवले जातात. आणि श्रीप्रभु समाधीला हळदीकुंकू वाहिले जाते. त्यानंतर पसरवलेल्या दहीभातावर पुन्हा एक छाटी टाकली जाते आणि त्यावर गिलाफ (प्रभू समाधीस चारी बाजूंनी घालण्यात येणारे वस्त्र) घातला जातो. गिलाफ घातल्यावर शाल आणि अलंकार घातले जातात. त्याचबरोबर श्रीप्रभु समाधीसमोर आणखी एका ताटात दहिभात ठेवतात आणि ह्या दहीभाताचा नैवेद्य दाखविला जातो, श्रीप्रभु समाधीची आरती केली जाते. त्याचबरोबर यजमानाच्या नवसाच्या पूर्णतेच्या / समाप्तीचा संकल्प सोडला जातो. दोन नारळ फोडले जातात आणि समाधीवर अक्षता टाकून गिलाफ काढला जातो. त्यानंतर श्रीप्रभु समाधीवर असलेलया अन्नपूजेच्या दहीभाताचा प्रसाद गोळा केला जातो. त्यावेळीही पुन्हा उपनिषदातील मंत्र म्हटले जातात. दहीभात पूर्ण टिपून घेतल्यावर, श्रीप्रभु समाधीस स्नान घालून, पुन्हा पंचोपचार पूजा होते आणि वस्त्रालंकार घालून प्रभुंची आरती करून पुष्पांची नेहमीप्रमाणे सजावट करतात. श्रीप्रभु समाधीची ही पूजा पूर्ण झाल्यावर, यजमानांना वडे आणि दहीभात प्रसाद म्हणून दिला जातो आणि उरलेला दहिभात प्रभू मंदिरात असणाऱ्या सर्व भक्तांना प्रसाद म्हणून वाटला जातो.

एकादशी, महाशिवरात्री, श्रावण मास आणि दत्त जयंतीच्या उत्सवाचे पाच दिवस अन्नपूजा केली जात नाही.

थोडक्यात आपल्या घरातील मंगल कार्य पार पडल्यावर झोळीपूजा करण्याचा आणि नवस फेडण्यासाठी म्हणून किंवा संकल्प पूर्तीसाठी अन्नपूजा करण्याची परंपरा, अनेक प्रभुभक्तांकडून आजही सुरू असल्याचे आपल्याला पाहता येते. आपल्या घरातील मंगल कार्यात श्रीप्रभु आपल्याला काहीही कमी न पडू देता आपली झोळी सदैव भरलेली ठेवतो आणि अशा ह्या भक्तकार्यकल्पद्रुम प्रभुप्रती प्रेम अथवा कृतज्ञता म्हणून झोळीपूजेचे आणि अन्नपूजेचे विधान प्रभुभक्तांमध्ये प्रचलित आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या किंवा नविन भक्तांना जर अशी पूजा करायची इच्छा असल्यास आणि आगाऊ सूचना दिल्यास श्री संस्थानाकडून तशी व्यवस्था अत्यंत अल्प दरात केली जाते. झोळीपूजा आणि अन्नपूजा ह्या वैशिष्ट्यपूर्ण विधींची माहिती दिल्याबद्दल श्री माणिक प्रभु संस्थानाचे मुख्य अर्चक श्री. गुरुनाथ गुरुजी ह्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. अन्नपूजा किंवा झोळीपूजेच्या निमित्ताने आपणासही प्रभुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी शीघ्रातीशीघ्र प्राप्त होवो, आणि त्याच्या फलस्वरूप आपली ही झोळी श्रीप्रभु कृपेने निरंतर भरलेली राहो, ह्या श्रीप्रभु चरणीच्या आणखीन एका लडिवाळ विनंतीसह श्री गुरु माणिक जय गुरु माणिक

[social_warfare]