माझ्या मनीची तृष्णा शमविशील का रे कृष्णा
श्वासही घेतला उसना तुझ्याकडूनच ।।

तुझ्याकडूनच सर्व येते अंती तुझ्यातच सामावते
परी येते मीपणाचे भरते अहंकारामुळे ।।

अहंकारामुळे कंस गेला शिशुपालही तैसाच वधिला
काम क्रोधे कोण वाचिला, त्रिभुवनांत ।।

त्रिभुवनांत तुझा संचार प्रेमाची उधळण अपार,
गोवर्धनाचाही सारा भार उचलूनि धरीं ।।

उचलूनी धरीं सर्वकाळी तव भक्तांची तळी,
तयांच्या हृदयकमळी वर्ततो सदा ।।

वर्ततो सदा धर्माच्या बाजूने दुष्ट निर्दालन करी चक्राने
रणांगणावरही गीता सांगणे साक्षीभावाने ।।

साक्षीभावाने तूज पाहणे‌ दे मज ऐसी लोचने
नाही तुजकडे अन्य मागणे कृष्णा दयाघना ।।

[social_warfare]