खोडकर मुलगा
प्रभुंच्या लहानपणी एक लहान मुलगा एका गाभण म्हशीला फारच त्रास देत होता. मुक्या जनावरांनाही त्रास होतो, म्हणून त्या म्हशीला त्रास न देण्यासंबंधी प्रभुंनी त्या खोडकर मुलास वारंवार समजावले. शेवटी “आता म्हशीच्या अंगास हात लावून तर पहा… म्हणजे…” असे प्रभु बोलले. प्रभुंच्या बोलण्यातील मेख न कळल्याने, “काय होते पाहू…” असे म्हणून त्या मुलाने दोन्ही हात म्हशीच्या पाठीवर ठेवले. प्रभु हसतच म्हणाले, अरे, ती म्हैस फार वाईट आहे, तुझे हात धरून बसेल! पहा रे बुवा आपला विचार!” प्रभुंच्या तोंडूने हे शब्द निघताच, त्या मुलाचे दोन्ही हात म्हशीच्या पाठीला चिकटून बसले. त्याला ते मोकळे करता येईनात. म्हैस उधळली, मुलगा म्हशीला लोंबकळू लागला. सर्व मुलांना मोठी गंमत झाली. म्हैस पळते आहे, मुलगा लोंबकळत चालला आहे. मुलगा रडू लागला. “मेलो, मेलो, पुन्हा कधी असे करणार नाही”, असे म्हणू लागला. प्रभुंना त्याची ती केविलवाणी अवस्था पाहावेना. प्रभुंनी ताडकन उठून, पळत जाऊन त्या म्हशीला थांबविले. तिच्या पाठीवर हात फिरवून, “बाई, तो तुला पुन्हा त्रास देणार नाही. एकवार त्याला क्षमा कर. सोड त्याला”, असे म्हणताच, मुलाचे हात सुटले. सर्व मुलांना मौजच मौज झाली पण, त्या मुलाला मात्र खाशी अद्दल घडली.

अमृतकुंडावरील घटना
चितापूरच्या विठ्ठलराव पेशकरांचे वडील हे प्रभुंचे बालमित्र. मामांनी रागे भरल्यावर, प्रभुंनी कल्याणमधील मामांचे घर सोडले आणि श्रीप्रभु पेशकर व त्यांच्या आणखीन एका समवयस्काबरोबर मंठाळच्या अरण्यात शिरले. त्यावेळी त्या दोघांनी प्रभुंना तसे न करण्याबद्दल परोपरीने सांगितले. अरण्याची दोघांना भीती वाटत आहे असे पाहून, प्रभुंनी, “भिऊ नका, माझ्या मागोमाग या, तुमचे भाग्य उदयाला येईल”, असे सांगितल्यावर, ते दोघेही प्रभुंच्या मागे गुहेत शिरले. थोड्यावेळाने त्यांना एक शिळा दिसली व तिघांनी ती बाजूला करताच सर्वजण आतील गुहेत शिरले. त्या गुहेतील जागा अत्यंत स्वच्छ असून त्यात एक आगटी दिसली. जवळ एक चिमटा पडला होता आणि आगटीतील राख रसरशीत होती. थोडेसे पुढे जाताच, पहिल्यापेक्षा मोठी अशी आणखी एक काळी शिळा दृष्टीला पडली. ती दूर करण्याचा प्रयत्न त्या दोघांनी करून पाहिला. शेवटी प्रभु हसून म्हणाले, “आता पुरे करा, फक्त माझ्या धोतराचा पदर घट्ट धरून उभे रहा, भिऊ नका”, असे म्हणून प्रभुंनी एक जोराचा हिसडा देताच ती प्रचंड शिळा उलथून पडली. पण आतील गुहेतून एक भयंकर गर्जना ऐकू आली. ती एखाद्या प्रचंड वाघाची असावी, असा त्या दोघांचा भास होऊन ते घाबरून गेले व प्रभुंच्या धोतराचा धरलेला पदर सोडून, मागच्या पावली पळत सुटले. पळता पळता काहीतरी धाडकन पडल्याचा आवाज त्यांना ऐकू आला व त्याबरोबर वाघाची गर्जनाही झाली. त्यांनी असे अनुमान केले की, प्रभुंवर त्या वाघाने झडप घालून त्यांना खाऊन टाकले असावे. भीतीने गर्भगळीत होऊन ते धावत सुटले व थोड्याच अवधीत त्यांनी कल्याण गाठले. ह्या प्रकाराबद्दल कोणाजवळ ब्र काढण्याचीसुद्धा त्यांची हिम्मत झाली नाही. त्यानंतर दोन एक महिन्यांनी कल्याणची बरीच मंडळी अमृतकुंडावर निघालेली पाहून, ते दोघेही बरोबर दशम्या घेऊन निघाले. डोंगर चढून अमृतकुंडाजवळ येत असताना, त्यांना प्रभुंचे स्मरण होऊन, पूर्वी घडलेल्या प्रकाराबद्दल ते एकमेकांबरोबर बोलत होते, इतक्यात प्रभुंची स्वारी त्यांच्यासमोर दृष्टीस पडली. वाघाच्या गुहेतून प्रभु जीवंत बाहेर आल्याचे पाहून त्यांना नवल वाटले आणि प्रभुंचा चेहरा पूर्वीपेक्षाही अधिक तेजस्वी व प्रफुल्लित असलेला पाहून ते आश्चर्यचकित झाले. “हे असे कसे झाले?” असा प्रश्न त्यांनी प्रभुंना केला. त्यावर प्रभु म्हणाले, “तुम्ही न घाबरता माझ्यामागे आला असता तर, त्याचे मर्म समजले असते. आता काय उपयोग?”

प्रसादाची हकीकत
अक्कलकोटच्या राजास पुत्रप्राप्तीची इच्छा होती. शिवाय संस्थानाच्या बाबतीत काही भानगडीही होत्या. त्याचे निवारण व्हावे म्हणून कारभारी, कारकून वगैरे माणसे नेहमी प्रभुदरबारी येत. त्याप्रमाणे काही विश्वासू लोक एकदा प्रभुंकडे प्रार्थना करण्याकरिता आले होते. त्यांना, “मी बोलवीन तेव्हा या, म्हणजे प्रसाद देतो”, असे प्रभुंनी कळविले होते. त्याप्रमाणे प्रभुंकडून, “प्रसाद घेण्यास या”, असा निरोप आला. त्यावेळी हे गृहस्थ भोजनास बसले होते. बोलवण्यास येणाऱ्या इसमाने ते जेवावयास बसले आहेत, भोजन संपवून येतील, असा परत निरोप प्रभुंना कळवला. त्यावेळी प्रभु फक्त, “अरेरे, प्रसादाची वेळ त्याने गमावली”, असे बोलून स्वस्थ बसले. पुढे त्या गृहस्थाने प्रसाद मिळवण्याबद्दल पुष्कळ खटपट केली, पण प्रसाद मिळाला नाही. स्वतःच्या उल्हासाने प्रभुंनी हातांत घेतलेला प्रसाद मिळणे, हे भाग्याचे चिन्ह होते. पण तो योग त्या लोकांना लाभला नाही.

व्यंकम्मावर कृपा
मैलारास असताना प्रभुंनी व्यंकम्माला पुराच्या पाण्यातून जीवदान दिले होते. त्यानंतर तिला प्रभुंचा प्रसाद मिळाला आणि तिने प्रभुंकडेच राहण्याचा हट्ट धरला. आपले सर्व दागदागिने तिने प्रभुंना देऊन टाकले. प्रभुंनी व्यंकम्माचे अंतःकरण जाणले होते. निस्सिम आणि शुद्ध प्रेमाने ती ओथंबून गेली होती. ती जरी तरुण होती तरी, वैषयिक स्वार्थी प्रेमाचा तिच्याठायी पूर्ण अभाव होता, हे प्रभुंनी पक्के ओळखले होते. प्रभुंनी प्रसन्न अंतःकरणाने तिच्याकडे दृष्टीक्षेप करून, आपल्या मातोश्री बयाम्मामातेजवळ तिला घेऊन जाण्यास एका शिष्यास सांगितले. तिचे प्रभुंवरील उत्कट प्रेम व भक्ती पाहून प्रभुंच्या मातेसही आनंद झाला व मातोश्रींनी तिला आपल्या कन्येप्रमाणे जवळ बाळगिले. प्रभुंनी व्यंकम्माची नाना प्रकारे परीक्षा पाहिली. तिला कित्येक दिवस नुसत्या खारकेवर ठेवले, तरी ती डगमगली नाही. तिचा धिप्पाड देह खारकेप्रमाणे वाळून गेला हे पाहून, सर्वांना तिची करूणा आली. पण प्रभुआज्ञा उल्लंघण्याचे व्यंकम्माने कधी मनातदेखील आणले नाही. एके समयी, स्त्री स्वभावला अनुसरून विवस्त्र होऊन, व्यंकमा स्नान करीत होती, अशा प्रसंगी प्रभूंकडून निरोप आला, “असशील तशी निघून ये” हा निरोप कानावर पडताच, देहभान विसरून जाऊन, तशाच स्थितीत व्यंकमा प्रभुंकडे यावयास निघाली. सर्व लोक विस्मित झाले. मातोश्रींना हे वर्तमान कळल्याबरोबर, त्याही मागोमाग निघाल्या आणि त्यांनी तिला मध्येच थोपवून धरले. प्रभुने अशी भलतीच आज्ञा कशी केली, म्हणून त्यांना विचारण्याचा बयाम्मामातेचा हेतू होता. स्त्रियांचे खरे भूषण लज्जा हे होय. ते एकदा नाहीसे झाल्यावर, स्त्रीत्व कसे राहणार? असो, तशाच स्थितीतही व्यंकम्मा प्रभुआज्ञा प्रमाण मानून, प्रभुपुढे येऊन उभी राहावयास तयार झाली हे समजल्यावर, तिची ती अनुपम भक्ती पाहून, तो प्रेमाचा निधी उचंबळू लागला. अनिवार प्रसन्न अंतःकरणाने डोलू लागला. व्यंकम्मा जवळ येण्याची वाट देखील न पाहता, प्रभुंनी चटकन आपल्या अंगावरील शुभ्र वस्त्र काढून, तिच्या अंगावर घालण्याकरता मातोश्रीकडे पाठविले. त्यावेळी खरोखर व्यंकम्माचा उद्धार झाला. ही तरुण स्त्री म्हणजेच भगवती व्यंकम्मा होय. जीवनभर प्रभुआज्ञेत, प्रभुसाधनेत राहून ती शेवटी श्री देवीपदास पोहोचली.

वरील चारही कथा पाहिल्या तर आपल्याला “श्रीगुरु आज्ञा” हा समान धागा आढळतो. खोडकर मुलगा, पेशकर, किंवा अक्कलकोटच्या राजाचा कारभारी यांनी प्रभुआज्ञा पाळली नाही आणि पर्यायाने त्यांनी त्याचे परिणाम भोगले किंवा आपल्या भाग्योदयाची चालून आलेली संधी दडवली. ह्या उलट, व्यंकम्माने प्रभुंच्या मुखकमलातून निघालेला शब्द खाली पडू न देता, तो प्रमाण मानला आणि आपला पारमार्थिक उत्कर्ष साधून घेतला. वरील कथांच्या माध्यमातून श्री गुरुआज्ञेचे महत्त्व आपल्या सहज ध्यानात येते. कारण, आपले नेमके हित कशात आहे, याची पूर्ण जाणिव आपल्या गुरूला असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गुरुआज्ञेत राहणे, हे सदासर्वथा हितकर असते. भक्तकार्यकल्पद्रुम गुरुसार्वभौम श्री सद्गुरू माणिक प्रभु महाराजांचा जयजयकार असो.

[social_warfare]