करडखेड… नांदेड जिल्ह्यातील देगलूरपासून थोड्या अंतरावर वसलेले करडखेड हे अगदी नावाप्रमाणेच चार-पाच हजार लोकसंख्या असलेले छोटेसे खेडे. पण येथील सद्गुरु माणिक प्रभु मंदिर आपले मन आकर्षून घेते. श्री ज्ञानराज माणिक प्रभु यांच्या सगरोळी-करडखेड दौऱ्यादरम्यान, परतीच्या वेळेस करडखेडला भेट देण्याचा योग जुळून आला. येथील श्री प्रभु मंदिराची पुढील बाजू माणिकनगरच्या प्रभुमंदिराची आठवण करून देते. श्रीप्रभु मंदिरामध्ये श्री मार्तंड माणिकप्रभुंनी स्वहस्ते स्थापन केलेली काळ्या पाषाणाची मनोहर प्रभुगादी आहे. त्या संदर्भात मंदिराचे सर्वेसर्वा श्री. माणिकराव कुलकर्णी ह्यांच्याकडून ह्या प्रभुगादीचे महात्म्य ऐकण्याचा मोह आवरता आला नाही. माझ्या विनंतीला मान देऊन श्री. माणिकरावांनीही अत्यंत प्रेमपूर्वक गादीचा इतिहास उलगडला.

करडखेड येथे रंगूबाई नावाची एक बाल विधवा होती. त्या काळातील प्रथेप्रमाणे वयाच्या आठव्या नवव्या वर्षीच तीचे लग्न झाले होते आणि रंगूबाईच्या वयाच्या बाराव्या वर्षी तिच्या पतीचे निधन झाले. तेव्हा तिच्या आई-वडिलांना चिंता लागून राहिली की, हिचे पुढे कसे होणार? ज्यावेळी रंगूबाईंचे वय २०-२२ वर्षांचे होते, त्यावेळी तिच्या आई-वडिलांना माहिती मिळाली की, माणिकनगरचे श्री मार्तंड माणिकप्रभु हे सगरोळीच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी महाराजश्रींना करडखेडला येण्यासाठी आमंत्रण दिले होते. करडखेडला महादेवाचं प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. तेथे महाराजश्रींचा तीन दिवस मुक्काम होता. त्या मुक्कामावेळी रंगूबाईच्या आई-वडिलांनी महाराजश्रींना रंगूबाईची कहाणी सांगितली. तिची एवढी मोठी जमीन आहे, संपत्ती आहे, त्याचे काय करावे? त्या संदर्भात महाराजांना विचारणा केली, तेव्हा श्री मार्तंड माणिकप्रभु म्हणाले की तुमच्या गावातील तुम्हाला जी आवडतील, ती तीन-चार मुले घेऊन या. त्यातील एकाला आम्ही रंगूबाईला दत्तक देऊ. तेव्हा तेथील तीन-चार मुलांपैकी श्री. माणिकराव कुलकर्णी यांचे आजोबा, म्हणजेच श्री. मल्हारी यांना महाराजश्रींनी रंगूंबाईस दत्तक दिले. त्याचवेळी करडखेडला श्री प्रभुगादी स्थापनेची इच्छा रंगूबाईने श्रीजींसमोर प्रकट केली. श्रीजींनीही त्याला आनंदाने संमती देऊन, स्वहस्ते करडखेडची ही, काळ्या दगडातील, गादी स्थापन केली. ही घटना साधारणतः १९०३ ते १९०४ च्या दरम्यानची आहे. त्यावेळी रंगूबाईंचे वय २०-२२ वर्षांचे होते आणि मल्हारी नावाचा जो दत्तक घेतलेला मुलगा होता, त्याचे वय सुमारे आठ वर्षाचे होते. ज्यावेळेस मल्हारीस दत्तक घेतले गेले, त्यावेळी श्रीजींनी रंगुबाईस असा आशीर्वाद दिला की, ह्या गादीची व्यवस्था लागेल, तुझा वंशही वाढेल आणि तुझं नावही येथे राहील. असे अभयवचनच महाराजश्रींनी दिले. त्या प्रसंगी महाराजश्रींनी रंगूबाईस प्रसाद दिला. आजही प्रसादाची ही डबी आपल्याला करडखेडच्या श्री प्रभु मंदिरात पाहता येते. श्री मल्हारीरावांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र श्री विजयराव उर्फ गुरुदास यांनी श्री सिद्धराज प्रभुंना विचारले की, ह्या प्रसादाच्या डबीचे आता काय करू? तेव्हा श्री सिद्धराज प्रभु म्हणाले, श्री मार्तंड माणिक प्रभुंचा प्रसाद कोणाला मिळतो? आणि तो तुमच्याकडे आहे, त्यामुळे तो तसाच ठेवा आणि त्यास पूजेमध्ये देव म्हणूनच पूजा. त्याचे कधीही विसर्जन करू नका. अशा प्रकारे श्री सिद्धराज प्रभुंच्या आज्ञेनुसार आजही प्रसादाची ती डबी कुलकर्णी कुटुंबाने प्राणपणाने जपली आहे. आज त्यांच्या चौथ्या पिढीतही गादी स्थापनेपासूनची श्री प्रभुगादीची सेवा अखंडित आहे. अपवाद फक्त वार्षिक दत्त जयंती उत्सवाचा. श्री दत्त जयंतीच्या दिवशी सर्वजण माणिकनगरला जातात, पण एक जण करडखेडला राहून, गादीची महापूजा करून माणिकनगराला येतो. आणि प्रभु दरबाराचा प्रसाद घेऊन दुसऱ्या दिवशी करडखेडला परततो आणि संध्याकाळी श्री प्रभुगादीची पूजा होते. असा परिपाठ येथे जवळपास सव्वाशे वर्षापासून चालत आला आहे. श्री प्रभुगादीस रोज पुरुषसूक्त, श्रीसूक्त आणि रुद्राभिषेक होतो. विशेष उत्सवांच्या दिवशी राजोपचार पूजेच्या धर्तीवर यथाशक्ती महापूजा होते. श्री माणिक कुलकर्णी यांच्याबरोबरच त्यांचे बंधू श्री. श्रीपाद आणि श्री. योगेश कुलकर्णी हे सध्या श्रीप्रभुगादीची पूजा वगैरेची व्यवस्था एकत्रितपणे पाहतात. अलीकडेच ह्या श्रीप्रभु मंदिराच्या झालेल्या जीर्णोद्धारात समस्त करडखेड आणि पंचक्रोशीतील प्रभुभक्तांबरोबरच श्री. श्रीपाद कुलकर्णी यांचा सिंहाचा वाटा आहे.

श्री. माणिकराव कुलकर्ण्यांच्या वडिलांनी म्हणजेच गुरुदासांनी, श्री सिद्धराज प्रभुंचा उपदेश १९६५ साली घेतला होता आणि त्यांनी गादीची मनोभावे सेवा चालू ठेवली होती. पण सन २००० साली ते फार उद्विग्न झाले. त्यांच्या मनात सारखे यायचे की, मार्तंड माणिकप्रभु येऊन गेल्यानंतर श्री शंकर माणिकप्रभु येथे आले नाहीत किंवा श्री सिद्धराज माणिकप्रभु येथे आले नाहीत. ते का बरे आले नाहीत? अशातच श्री सिद्धराज प्रभुंचा सन २००१ मध्ये सगरोळी दौरा होता. त्यावेळेस श्री गुरुदासांनीनी सगरोळी येथे जाऊन श्री सिद्धराज प्रभुंना विनंती केली की, महाराज, आपण प्रभुगादी दर्शनासाठी करडखेडला अवश्य यावे. त्यावेळी श्री सिद्धराज प्रभु गुरुदासांना म्हणाले, का नाही? येतो ना मी, न यायला का झालं? अवश्य येतो. त्यावेळेस श्री गुरुदास म्हणाले, महाराज, थोडी आर्थिक अडचण आहे. तेव्हा श्री सिद्धराज प्रभु म्हणाले, काही काळजी करू नको. मी येतो. श्री सिद्धराज प्रभु करडखेडला आले तो दिवस, वैशाख शुद्ध चतुर्थीचा होता. सन २००१ मध्ये श्री प्रभुगादीची पूजा झाली. श्री सिद्धराज प्रभुंची पाद्यपूजा झाली. श्री सिद्धराज प्रभु महाराज अत्यंत संतुष्ट झाले. गुरुदासांनी महाराजांना सुकामेवा खावयास दिला. तेव्हा महाराज म्हणाले, मला हे काही नको. मला दही आणि पोहे दे! तेव्हा गुरुदासांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. मी सुदाम्यासारखा आहे म्हणूनच माझ्या गुरूंनी माझ्याकडे दही पोहे मागितले, असा धन्यतेचा भाव त्यांच्या मनाला झाला आणि त्यांना आपल्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले. आजच्या करडखेड दौऱ्यामध्ये जेथे श्री ज्ञानराज प्रभुंचे आसन होते, जेथे श्रीजींची पाद्यपूजा झाली, त्याच ठिकाणी श्री सिद्धराज प्रभु बसले होते. तेथेच त्यांची पाद्यपूजा झाली होती. आणि श्री सिद्धराज प्रभु माणिकनगरला परतल्यानंतर, जवळजवळ सहा महिने श्री सिद्धराज प्रभुंच्या पाद्यपूजेच्या जागेवर श्री गुरुदासकाका अक्षरशः रोज रात्री लोळण घालायचे. ही माझ्या गुरूंचे चरण धूतलेली जागा आहे. आता मला मरण आले तरी चालेल. माझे जीवन धन्य झाले. आणि त्या धन्यतेतच श्री गुरुदासांनी अश्विन शुद्ध षष्ठीला सर्वांना मी येतो म्हणून मोठ्याने जय गुरु माणिक, जय शंकर म्हणून अगदी सहज प्राण सोडला.

त्याआधी १९६६ साली गुरुदासकाका माणिकनगरला असताना श्री सिद्धराज प्रभुंनी त्यांना विचारले, तुम्हाला किती मुलं मुली? तेव्हा गुरुदास म्हणाले, महाराज, दोन मुली आहेत मला. तेव्हा सिद्धराज प्रभु म्हणाले, मुलगा नाही? गुरुदास काकांनी, नाही म्हणून विनम्रपणे सांगितले. त्यावेळी श्री सिद्धराज प्रभुंनी एका सेवेकऱ्याला म्हटले की, प्रभु मंदिरात आलेला प्रसाद घेऊन ये रे! त्यामध्ये केळ होतं, थोडं जास्त पिकलेलं आणि एक खारका. तो प्रसाद गुरुदासांना देऊन म्हटले, जा आता! दोन दिवसांनी दत्तजयंती होती. श्री गुरुदासांनी तो प्रसाद तसाच ठेवून दिला होता. करडखेडला परत घरी येईस्तोवर ते केळ पूर्णपणे खराब होऊन जवळजवळ नासले होते. एक पण गुरुदासांच्या पत्नी, सौ. मनोरमाबाईंनी त्या केळ्याचा प्रसाद सालीसकट तसाच खाल्ला आणि खारका बी सकट खाऊन टाकली. श्री प्रभकृपेने गुरुदासांना दीड वर्षानंतर पुत्र प्राप्ती झाली त्या मुलाचे नाव त्यांनी माणिक ठेवले. धन्य तो भक्त, धन्य ती गुरुभक्ती आणि धन्य ती  भक्ताची गुरुवरील अचंचल श्रद्धा.

श्री प्रभुगादीसमोर नतमस्तक होताना रंगुबाईची, गुरुदास यांची अनन्य भक्ती आठवली. श्री प्रभुगादीभोवती गाभाऱ्यामध्ये आपल्याला प्रचंड स्पंदन जाणवतात. देगलूर परिसरात आपण कधी गेलात तर ह्या प्रभुगादीला अवश्य भेट देऊन श्री प्रभुच्या चैतन्याचा जरूर अनुभव घ्यावा.

करडखेडला गावाच्या वेशीपासून श्रीप्रभु मंदिरापर्यंत श्री सकलमताचार्यांची जंगी मिरवणूक निघाली. पावसामुळे येथेही दोन-तीन दिवसांपासून लाईट नव्हती. त्यामुळे रात्रीच्या समयी दिवट्या, मोबाईलचे लाईट आणि बॅटरीवर चालणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात, श्रीप्रभुनामाच्या जयघोषात श्रीप्रभु मंदिराच्या दिशेने सरकणारी श्रीजींसहित भक्तांची मांदियाळी मोठी विलोभनीय दिसत होती. थोड्याच वेळात आम्ही मंदिरात येऊन पोहोचलो. जवळपास संपूर्ण करडखेड गाव आज श्रीप्रभु मंदिरात एकवटला होता. श्रीजींची एक छबी आपल्या डोळ्यांमध्ये आणि हृदयामध्ये साठवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होते. अलीकडे जीर्णोद्धार झालेले श्रीप्रभु मंदिर आतून अत्यंत स्वच्छ आणि नेटकेपणाने ठेवले आहे.‌ मुख्य गाभाऱ्यात वर वर्णिल्याप्रमाणे श्री मार्तंड माणिकप्रभुंनी स्थापन केलेली गादी आहे.‌ श्रीप्रभुगादीला आज फुलांची आकर्षक सजावट केली होती. समईच्या, दिव्यांच्या सोनेरी प्रकाशात काळ्या दगडाची श्रीप्रभुगादी अत्यंत मनोहर दिसत होती. गाभाऱ्याच्या बाहेर डाव्या बाजूला श्रीजींना बसण्यासाठी आसन सुशोभित करून ठेवले होते. याच जागेवर श्री सिद्धराज प्रभुंची पाद्यपूजा झाली होती.

मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ येताच भक्तकार्य कल्पद्रुमचा, आसमंत दुमदुमून टाकणारा, जयघोष झाला. श्री कुलकर्णी कुटुंबाने श्रींजींचे चरण प्राक्षाळले. सुवासिनींनी त्यांना ओवाळले. श्रीप्रभु मंदिरात प्रवेश करताच, श्रीजींनी सर्वप्रथम गादीचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर श्रीजींना अत्यंत आदरपूर्वक आसनावर बसविले गेले. श्रीजींनी अभयकरांनी आशीर्वाद देऊन, सर्वांना खारकांचा प्रसाद दिला. त्यानंतर उपस्थित गावकऱ्यांनी श्रीजींचे दर्शन घेतले. श्रीजींचा आशीर्वाद व प्रसाद मिळाल्यामुळे प्रत्येक जण उत्साहात होता. सर्वांचे आशीर्वचन झाल्यावर, श्रीप्रभुंची आरती करण्यात आली.  सर्व गावकऱ्यांसाठी श्रीप्रभु मंदिराच्या प्रांगणात महाप्रसादाचे आयोजन केले होते.

श्री. कुलकर्णी कुटुंबाने मंदिराशेजारीच असलेल्या आपल्या घरी श्रीजींना प्रसादासाठी निमंत्रित केले होते. पावसामुळे परिसरात लाईट तर नव्हतीच, पण जनरेटरलाही मध्येमध्ये दम लागत होता. कुलकर्णी कुटुंबाने पंगतीसाठी सर्वत्र मेणबत्त्या लावल्या. मेणबत्त्यांच्या त्या प्रकाशात सर्वांची भोजने पार पडली. यानिमित्ताने श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या काळात कदाचित असेच वातावरण असेल, अशी कल्पना माझ्या मनाने केली. कुलकर्णी कुटुंबाने अगदी पंचपक्वान्नाचा बेत प्रसादासाठी केला होता. गेले तीन दिवस लाईट नसताना, मोटरपंप बंद असतानाही, दूरवरून हातपंपाचे पाणी आणून प्रभुभक्तांची पाण्याची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची परोपरीची काळजी घेतली होती. आपुलकीच्या, प्रेमळ आग्रहाने वाढलेल्या अत्यंत सुग्रास महाप्रसादाचा आस्वाद घेऊन तृप्त होत असतानाच, शेवटी श्रीजींच्या उच्छिष्टांचा प्रसाद सर्वांना मिळाला. श्रीजींच्या सहवासात चैतन्याची अनुभूती होत असतानाच, उच्छिष्टांच्या प्रसादाने देह आणि मनबुद्धीचीही शुद्धी होत होती.‌ प्रसादानंतर श्री. कुलकर्णी कुटुंब आणि समस्त करडखेड ग्रामवासियांना मंगलमय आशीर्वाद देत श्रीजी आणि आम्ही सर्व रात्री दहाच्या सुमारास माणिकनगरसाठी परतीच्या प्रवासाला निघालो.

रात्रीची वेळ, अनोळखी रस्ता (रस्त्यांमधील खड्डे चुकवायचे की खड्ड्यांमध्ये रस्ता शोधायचा हा मोठा संभ्रम महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत कायम राहिला), त्याचवेळी सुरू झालेला पाऊस हे सर्व कसोटी पाहणारे होते. पण “आपल्याला राखणारा प्रभु समर्थ आहे”, हा दृढ भाव मनी होता, श्री प्रभुंच्या पादुकाही गाडीत सोबतीला होत्या. त्यामुळे कोणत्याही अडचणींशिवाय आम्ही मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास श्रीमाणिकनगरी विनासायास पोहोचलो. श्री. गुरुनाथ भटजी, श्री. नरसिंह भटजी आणि श्री. तिरुमल भटजी यांच्या सहवासात प्रभुलीलांचे गुणगान करत, मध्येच प्रभुंची प्रासादिक पदे म्हणत, तिघांपैकी प्रत्येक जण प्रभुसेवेमध्ये माणिकनगरात कसा आला, हे ऐकणे फारच आनंददायी आणि रोमांचकारी होते. खरेच, प्रभुभक्तांच्या सहवासात प्रभुंच्या लीला, त्यांचे अनुभव, त्यांची अनुभूती ऐकताना वेळ कसा निघून जातो, हे अजिबात कळतच नाही. ह्या प्रवासादरम्यान श्री, गुरुनाथ भटजींचा गळा किती गोड आहे, तसेच प्रभुपदे म्हणताना त्यांचे रंगून जाणे, अनुभवता आले. तिघांच्याही कथांतून त्यांचा श्री प्रभुप्रती अत्यंत कृतज्ञ भावच दिसून आला.

शनिवारी सकाळी दयाघन‌ श्रीप्रभुचे मनोभावे दर्शन घेऊन, श्रीजींच्या हस्ते खारकांचा प्रसाद घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. मंगळवारपासून सुरू झालेला, जीवन समृद्ध करणारा, विविध प्रसंगातून मनावर खोल परीणाम करणारा, श्रीजींचा सगरोळी दौरा आणि त्यातले प्रत्येक क्षण डोळ्यांसमोर एकापाठोपाठ एक तरळत होते. ठाण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये कारमध्ये सुरू असलेल्या प्रभुपदांबरोबरच ते प्रसंगच माझे सोबती होते. श्रीजींचे सहजपणे जनमानसांत मिसळणे, सर्वांत राहूनही आलिप्त असणे, त्यांचे सर्वच विषयांवरील आणि पंचमहाभूतांवरील असलेले प्रभुत्व, भक्तांच्या शंकांचे आणि संकटांचे निरसन करणे, वृत्तीची स्थितप्रज्ञता, सर्वांना समदृष्टीने पाहणे, भक्तांचे अंतरंग ओळखणे, प्रसंगी स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता,  भक्तांना सामोरे जाणे, सर्वांचे सुहास्य वदनाने अभिष्टचिंतन करणे, सर्वांना ज्ञान देऊन भक्तीमार्गात प्रशस्त करणे, प्रसंगी मौन धारण करणे, चौफेर निरीक्षण, हे आणि असे अनेक ग्राह्य गुण आठवताना, त्याचे मनन, चिंतन करत‌ असतानाच प्रशस्त असा मुंबई पुणे महामार्ग (एक्स्प्रेस वे) लागला. तोही जणू काही श्रीजींच्या व्यक्तिमत्त्वातील ग्राह्य गुणांचे, सकलमत संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचे सतत मनन, चिंतन आणि निधीध्यासन केल्यास, आपल्या जीवनरुपी गाडीला ज्ञान आणि भक्तीची चाके लावल्यास, आपल्याही जीवनाची गाडी श्रीप्रभुच्या ह्या राजमार्गावर, अंतिम साध्याच्या दिशेने आश्वासकपणे मार्गस्थ होईल, हेच सांगत होता.

समाप्त.

[social_warfare]