श्रीमाणिकप्रभुंचा लहान भ्राता ।
नृसिंहतात्या नामे विख्याता ।
विठाबाई पत्नी पतीव्रता ।
तात्या महाराजांची ॥१॥
नाईक घराण्याची वंशवेल ।
नृसिंहतात्याच आता फुलवेल ।
दत्तप्रसाद लवकरच भेटेल ।
आशीर्वचन श्रीमाणिकप्रभुंचे ॥२॥
होते कालयुक्ति नाम सवंत्सर ।
श्रावण अमावास्या दिवस थोर ।
पुलकित झाले माणिक नगर ।
नांदी मनोहर अवताराची ॥३॥
श्रावणमास उत्सवाचा अंतिम दिवस ।
कृष्णमेघांनी व्यापिले सकल आकाश ।
सूर्यदेवही व्याकुळ दर्शन घेण्यास ।
महायोगी बालकाचे ॥४॥
नऊमास पूर्ण झाले गर्भधारणास ।
परी न दिसे प्रसूतीचे काही चिन्हास ।
काळजी अत्यंत लागली विठाम्मास ।
धावा प्रभुचा करितसे ॥५॥
सकळजन चिंता करिती ।
श्रीमाणिकसी येऊनि विनविती ।
होऊदे विठाम्माची प्रसुती ।
निर्विघ्नपणे प्रभुराया ॥६॥
कनवाळू श्रीमाणिक कृपाघन ।
आला विठाम्मापाशी धावून ।
विठाम्मा विव्हळे कळवळून ।
कृपादृष्टी अवलोकी ॥७॥
गर्भस्थ शिशूस संबोधून ।
श्रीमाणिक बोले प्रेमवचन ।
मातेसी ऐसे छळण ।
योग्य नव्हे ॥८॥
जन्म घेणे आपणांसी क्रमप्राप्त ।
रहाल सदैव संसार बंधमुक्त ।
माणिक वचनी होऊनी आश्वस्त ।
प्रकटावे शीघ्रातीशीघ्र ॥९॥
ऐकोनी श्रीमाणिकप्रभुची विनंती ।
पुढील अवतारकार्याची निश्चिती ।
माणिकवचने मिटली भ्रांती ।
नवजात अर्भकाची ॥१०॥
विठाम्माउदरी अत्रि अंश आला ।
मनोहर नामे श्रीगुरू अवतरला ।
वाढवील जो ब्रह्मचर्य व्रताला ।
आधारभूत होऊनिया ॥११॥
मुखमंडलाची प्रभा ऐसी ।
फाकली दहाही दिशी ।
बैलपोळ्याचा सणही त्यादिवशी ।
हर्षोल्हास चोहीकडे ॥१२॥
बैल आपापले सजवून ।
येती माणिकदर्शना घेऊन ।
सवाद्ये होतसे बैलपूजन ।
अवघा आनंदसोहळा ॥१३॥
पंचक्रोशीतील आले समस्त जन ।
प्रभुसहित घेती बालकाचे दर्शन ।
टाकीले मन सर्वांचे मोहून ।
मनोहर नाम यथार्थ ॥१४॥
नाम ठेविले मनोहर ।
जाणा तोचि विधीहरीहर ।
जग तारावया भूमिवर ।
मनोहररूपे अवतरला ॥१५॥
ऐसा अवतार मनोहर ।
सकलमताचा पुढील धरोहर ।
माणिकप्रभु जाणती खरोखर ।
आपुल्या अंतरात ॥१६॥
हा जरी अल्पायुषी होईल ।
सवाई माणिकप्रभु म्हणवून घेईल ।
सर्वश्रुत माणिक प्रभुंचे बोल ।
सहजी जे निघाले ॥१७॥
एकदा काय नवल घडले ।
प्रभु गादीवरी अप्पासाहेब बैसले ।
पाच वर्षाचे बालक सानुले ।
प्रभु दरबारामाजी ॥१८॥
करती प्रभु बैठकीचे अनुकरण ।
तैसेच गंभीर स्वरूप धारण ।
समस्त करिती मनोहराचे अवलोकन ।
प्रभु पातले तत्क्षणी ॥१९॥
बाळ मनोहरासी पाहुनी ।
बैसला गादीसी बळकावूनी ।
बोलती तयासी हांसूनि ।
कृपानिधी प्रभुमहाराज ॥२०॥
माझी गादी तुला हवी का रे ।
आता मी काय सांगतो ऐक रे ।
गादीवर बैसता दागिने सारे ।
दान करणे दुस-यासी ॥२१॥
अप्पासाहेब प्रभुसी वदती सत्वर ।
सांगेन त्यासी देण्यास तयार ।
दागिने सगळे काढून भरभर ।
ठेविले प्रभुपुढे ॥२२॥
पाहुनि वैराग्याची मूर्तीमंत मूर्ती ।
माणिक प्रभु मनोमन संतोषती ।
लहानशी गादी मांडून बैसविती ।
शेजारी बालमनोहरास ॥२३॥
वैराग्याची महाकठीण स्थिती ।
कृतीतून सहज दाखविती ।
दातृत्वाची तीच माणिकवृत्ती ।
मनोहराठायी उपजली ॥२४॥
प्रभुसमाधी समय जवळ येता ।
भक्तांस लागली उत्तराधिका-याची चिंता ।
कोण संभाळील प्रभुगादीस आता ।
खलबते नानाविध ॥२५॥
जरी तात्यासाहेबांचे पुत्र दोन ।
परी होते लहान आणी अज्ञान ।
एकाचे वय सात, एकाचे तीन ।
सर्वार्थे अयोग्य म्हणती ॥२६॥
भालकीस होता एक युवक ।
मच्छिंद्रराव नामे प्रभुंचा सेवक ।
प्रभुगादी चालविण्यांस तोच लायक ।
धारणा अनेकांची ॥२७॥
बालपणापासून होता लाडका प्रभुंचा ।
प्रभुंचाही व्यवहार अत्यंत प्रेमाचा ।
करतील विचार प्रभु मच्छिंद्ररावाचा ।
गादीवर बैसविण्यास ॥२८॥
उतावीळ होती भक्तजन ।
मच्छिंद्ररावास मेण्यात बैसवून ।
घेऊन येती भालकीहून ।
सवाद्ये मिरवणूक ॥२९॥
भक्तांनी आणली एक गादी ।
प्रभुंच्या उत्तराधिकाराची जी नांदी ।
गादीवर बैसविले प्रभु संन्निधी ।
मच्छिंद्ररावास ॥३०॥
त्याच रात्रीस लीला घडली ।
मच्छिंद्ररावाची गादी खाक झाली ।
ज्या प्रभुगादीची स्वप्न पाहिली ।
नव्हती ती नशीबांत ॥३१॥
काहीच झाले नाही समजून ।
भक्त करिती प्रयत्न परतून ।
प्रभु मच्छिंद्ररावास मांडीवर बैसवून ।
कधी घेतील ॥३२॥
ऐसी उत्कंठा शिगेस पोहोचत ।
वदंता उठली प्रभु दरबारात ।
चाळीस हजाराचे कर्ज असत ।
प्रभुमहाराजांवरी ॥३३॥
जो कोणी उत्तराधिकारी होईल ।
तोच ह्या कर्जासी चुकविल ।
फकिरी संस्थान, कैसे होईल ।
मच्छिंद्रराव विवंचनेत ॥३४॥
मानाची जरी गादी घ्यावी ।
कर्जाची धोंड गळी पडावी ।
पेक्षा आपली भालकी गाठावी ।
हेच बरे ॥३५॥
एकादशीस जेव्हा समाधीत बैसती ।
मच्छिंद्ररावास प्रभु सांगावा धाडती ।
भालकीस पळून गेल्याचे सांगती ।
शिष्य प्रभुमहाराजांस ॥३६॥
प्रभुगादी चालविणे सोपे नाही ।
योग्य अधिकाराविणा शक्य नाही ।
ये-यागबाळ्यास हे झेपणे नाही ।
म्हणे प्रभु माणिक ॥३७॥
मार्गशीर्ष एकादशीचा पुण्य दिवस ।
निश्चित केला संजीवन समाधीस ।
नृसिंह तात्यांच्या उभय पुत्रांस ।
बोलाविणे धाडिले ॥३८॥
येता उभयतां मांडीवर बैसविले ।
क्षण दोन त्यांसवे घालविले ।
आरती पुजापाठ विधीवत करविले ।
सप्रेमे माणिकप्रभुने ॥३९॥
मनोहरास पांघरविला अंगावरील दुशाला ।
प्रसादरूपी घातली गळ्यात माळा ।
मंत्रोपदेश देऊनि प्रसाद दिधला ।
लहानग्या मनोहरास ॥४०॥
असला वयाने लहान जरी ।
बालमनोहर हाच माझा उत्तराधिकारी ।
दत्तगादीची सेवा करील परोपरी ।
प्रभु वदे अंतिमक्षणी ॥४१॥
अवघ्या सातव्या वयात पीठारोहण ।
मनोहराच्या सामर्थ्याची प्रभुंस जाण ।
आपल्या पाठीमागे संस्थानाचे मोठेपण ।
वाढविल निश्चित ॥४२॥
चालविल सकलमत संप्रदाय परंपरा ।
म्हणतील सवाई माणिकप्रभु दुसरा ।
मनोहरावर ठेऊनि भार सारा ।
प्रभु जाहले समाधिस्त ॥४३।।
बालमनोहरावर ठेऊनि सारी भीस्त ।
श्रीप्रभु झाले संजीवन समाधिस्त ।
कैसी लागेल प्रभुदरबारास शिस्त ।
चिंता समस्तांसी ॥४४॥
प्रभुसमाधीनंतर पहिलाच दरबार ।
लोटला भक्तजनांचा सागर ।
प्रभुसिंहासनावर बालमूर्ती मनोहर ।
सुहास्य वदनी ॥४५॥
दृष्टी समस्तांची मनोहर मुखमंडलावर ।
म्हणती श्रीमाणिक बालमूर्ती खरोखर ।
जो तो आपापल्या वृत्तीनुसार ।
प्रभुसी पाहे मनोहरात ॥४६॥
गादीवर बैसता कर्जाची हकीकत ।
कर्तव्यदक्ष मनोहरप्रभु जेव्हा जाणत ।
यादी बनविण्याचे फर्मान काढत ।
कोणाचे किती देणे ॥४७॥
अप्पासाहेब सांगती बाप्पाचार्यांस ।
निरोप धाडणे देणेक-यांस ।
पत्रे पाठवूनी येण्यास ।
सत्वर सांगितले ॥४८॥
एकेक करोनि जमले सावकार ।
प्रमुख त्यात गोसावी किसनगीर ।
देणे त्याचे दहा हजार ।
श्रीप्रभुंचे होते ॥४९॥
हिशोब कर्जाचा किसनगीरासी विचारता ।
सविनय बोले तो तत्वता ।
प्रभुंना कर्ज देण्याची योग्यता ।
सर्वार्थे नाही माझी ॥५०॥
प्रभुकृपेनेच लक्षावधी नफा जाहला ।
परी दानधर्म नाही काही घडला ।
दहा हजार देता श्रीप्रभुला ।
दानधर्म अनायसे ॥५१॥
ते नव्हतेच कधी ऋण ।
परतफेडीचा नाही काही प्रश्न ।
मनीचे सारे द्वंद्व काढून ।
निश्चिंत व्हावे ॥५२॥
ऐकोनि किसनगीराचे मृदुवचन ।
अप्पासाहेब संतोषले मनोमन ।
किसनगीरास देऊनि पुढारीपण ।
तडजोड करावया इतरांसी ॥५३॥
किसनगीर अत्यंत हजरजबाब ।
देयराशी निश्चिती ताबडतोब ।
मांडूनि यथायोग्य हिशोब ।
अप्पासाहेबांपुढे ठेविती ॥५४॥
पाहुनि एवढ्या मोठ्या रकमेस ।
जनांची उत्सुकता पोहोचली शिगेस ।
अप्पासाहेब शांत त्याही समयास ।
बैसले दरबारात ॥५५॥
एवढ्यात पहा नवल घडले ।
दरबारात सुखद वृत्त धडकले ।
प्रभुसेवार्थ काही दान धाडले ।
विठ्ठलराव तालुकदाराने ॥५७॥
थोडे थोडके नव्हे गाडीभर ।
उतरला कर्जाचा सर्व भार ।
निमित्तमात्र विठ्ठल तालुकदार ।
कर्ताकरविता श्रीमाणिक ॥५७॥
सावकारांचे कर्ज फेडून ।
आशीर्वचन प्रसाद देऊन ।
समस्तांचे आभार मानून ।
आनंद वर्तला ॥५८॥
बाप्पाचार्य मुख्य कारभारी ।
अप्पासाहेबांची पाहून कर्तबगारी ।
वंदिती चरण वारंवारी ।
बालमनोहराचे ॥५९॥
माणिकप्रभु जयंतीची पौर्णिमेची रात्र ।
मनोहरप्रभु करिती महापूजा प्रभुमंदिरात ।
अतोनात गर्दी प्रभुमंदिर परीसरात ।
घ्यावया प्रभुदर्शन ॥६०॥
झाली महानैवेद्याची वेळ ।
सदाशिवराव नेसून सोवळ ।
भंडारखान्यातून नैवेद्याची थाळ ।
घेऊनि येती ॥६१॥
नैवेद्य घेऊन येता प्रभुमंदिरात ।
म्हातारा एक बैसला वाटेत ।
लपेटून घेतले स्वतःस घोंगडीत ।
अस्ताव्यस्त ध्यान ॥६२॥
स्पर्श झाला म्हाता-यास चुकून ।
विटाळ प्रसादास झाला म्हणून ।
म्हाता-यास अद्वातद्वा बोलून ।
गेले परतोनी ॥६३॥
अभ्यंग स्नान करून ।
स्वयंपाक पुन्हा करून ।
सोवळ्यात महानैवेद्य घेऊन ।
सदाशिवराव पातले ॥६४॥
पूजा संपल्यावर स्वस्थ झोपले ।
स्वप्नी श्री माणिकप्रभुच आले ।
सदाशिवरावास प्रभु बोलले ।
ऐका एकचित्ते ॥६५॥
आलो जत्रेची मजा पहावया ।
घेऊनि येसी माझिया नैवेद्या ।
माझाच स्पर्श होता तया ।
विटाळ कैसा ॥६६॥
सदाशिवराव अत्यंत शरमिंदे झाले ।
माफी मागण्या मनोहरप्रभुंकडे आले ।
पाय धरण्या पुढे सरसावले ।
मनोहर प्रभुरायाचे ॥६७॥
पाय धरावया जैसे वाकले ।
मनोहर प्रभु मागे झाले ।
नको सदाशिवराव, पुरे झाले ।
विटाळ उगाच होईल ॥६८॥
मनोहरप्रभुंच्या अंतर्ज्ञानित्वाची जाण ।
सदाशिवरावास झाली मनोमन ।
मनोहरप्रभुस जाऊन शरण ।
करूणा भाकतसे ॥६९॥
भक्तवत्सल प्रभु मनोहर ।
सदाशिवरावास वदति साचार ।
जयंती उत्सवात येती खरोखर ।
विविधरूपे प्रभुमहाराज ॥७०॥
सर्व रूपे हा श्रीप्रभु जाण ।
चित्तात ठेवावी हीच खूण ।
भेदभाव सदा सर्वदा सारून ।
सेवावे प्रभुचरण ॥७१॥
मनोहर प्रभु परम मातृभक्त ।
भावा बहिणीवरही प्रेम अत्यंत ।
परी होते वैराग्य मूर्तिमंत ।
त्यांच्या ठायी ॥७२॥
जडला एकदा काही आजार ।
मनोहरप्रभु होती त्याने बेजार ।
लोकाबापू वैद्य दर्शनार्थ हजर ।
होते त्यावेळी ॥७३॥
लोकाबापू करती विशेष यत्न ।
श्रीप्रभुंस आला तात्काळ गुण ।
उंचीवस्त्रे, द्रव्य, प्रसाद देऊन ।
यथोचित गौरविले ॥७४॥
मनोहरप्रभुंच्या गळ्यात एकमुखी रूद्राक्ष ।
श्रीमाणिकप्रभुंनी दिधला प्रसाद प्रत्यक्ष ।
लोकाबापूंचे पडता त्यावरी लक्ष ।
इच्छा होय प्राप्तीची ॥७५॥
मनी रूद्राक्षाचा लोभ वर्तत ।
परी मुखे काही न बोलवत ।
मनकवडे मनोहरप्रभु सर्व जाणत ।
लोकाबापूच्या मनींचे ॥७६॥
जरी लोकाबापू मनीचा हेतू पुरवावा ।
परी सर्वांसमोर रूद्राक्ष कैसा द्यावा ।
परतती लोकाबापू जेव्हा आपुल्या गावा ।
प्रभु येती सोडण्या ॥७७॥
आले चालत संगमापर्यंत ।
लोकाबापूंस बोलावून एकांतात ।
रूद्राक्ष घातला गळ्यात ।
अविलंब प्रभुने ॥७८॥
मनोवांछित जे प्राप्त झाले ।
प्रभुने आपले अंतरंग जाणीले ।
लोकाबापू वैद्य चरणी लागले ।
अंतर्यामी मनोहरप्रभुंच्या ॥७९॥
विठाम्माची प्रबळ इच्छा अंतरात ।
मनोहराने अडकावे विवाह बंधनात ।
इतरांसही पडे विचार पसंत ।
अनुमोदन सर्वांचे ॥८०॥
श्रीप्रभु पाळती नैष्ठिक ब्रह्मचर्य ।
त्यांस विचारण्याचे होईना धैर्य ।
कैसे होईल विवाह कार्य ।
चिंता समस्तांसी ॥८२॥
प्रभुंची वडील भगिनी मुक्ताबाई ।
तिच्या विवाहाची अपूर्व नवलाई ।
उपाध्यायाचा मुलगा केला जावई ।
सालंकृत कन्यादान ॥८२॥
मनोहरप्रभु पंधरा वर्षाचे झाले ।
माणिक नगराचे रूप पालटले ।
शोभिवंत अनेक मांडव उभारले ।
जय्यत तयारी विवाहाची ॥८३॥
परी विवाह कुणाचा कळेना ।
नवरा नवरीचा उलगडा होईना ।
प्रभुमहाराज अडकतील विवाह बंधना ।
अटकळ काहीजणांची ॥८४॥
समग्र तयारी झाली तरी कळेना ।
नवरा नवरी यांचे गूढ उकलेना ।
विठम्मा पुसतसे शेवटी प्रभुंना ।
विवाहसोहळ्या संबंधी ॥८५॥
मनोहरप्रभु वदती विठाम्मास ।
पाळितो आम्ही ब्रह्मचर्यास ।
नवरी पाहिली खंडेरायास ।
विवाहसोहळा खंडीचा ॥८६॥
आठवले माणिकप्रभुंचे विधान ।
जन्मसमयी जे केले कथन ।
ब्रह्मचर्य व्रतास आधार प्रदान ।
करील मनोहर ॥८७॥
मातोश्रीस अती आश्चर्य सखेद ।
परी मिटवूनी अंतरीचा भेद ।
शहाणपणे सोडून दिला नाद ।
मनोहराच्या विवाहाचा ॥८८॥
बाप्पाचार्यांची मुलगी असे पसंत ।
तिजसवे विवाह केला निश्चित ।
मातोश्रीही त्यास होकार देत ।
लग्नसोहळा थाटात ॥८९॥
खंडेरायाचा पार पडला विवाहसोहळा ।
वंशविस्ताराचा मार्ग झाला मोकळा ।
पुत्रविवाह देखिला आपुल्या डोळा ।
समाधान विठाम्माचे ॥९०॥
मनोहरप्रभु परम योगी थोर ।
नित्य योगाभ्यास करती अपार ।
माणिकप्रभु समाधीपाठी तळघर ।
करवून घेतले ॥९१॥
आखून दिलेल्या नमुन्यानुसार ।
परीपूर्ण जाहले तळघर ।
पाहण्या आले प्रभुमनोहर ।
कारभारी मंडळींसह ॥९२॥
तळघरात होत्या तीन कमानी ।
बांधकाम पडले प्रभुंच्या पचनी ।
मधल्या कमानीत आसन घालोनी ।
प्रभुमहाराज बैसले ॥९३॥
नुरला पारावार त्यांच्या आनंदास ।
निघती उद्गार त्या समयास ।
एखाद्या योगी समाधीस्त होण्यास ।
अत्युत्तम स्थान हे ॥९४॥
वरील घटनेस लोटले षण्मास ।
अश्विन कृष्ण सप्तमी तिथीस ।
अचानक बदल झाले प्रकृतीस ।
श्रीमनोहर प्रभुंच्या ॥९५॥
खंडेराव जाणती विद्याशास्त्र सकळ ।
संस्थान गादी सांभाळण्या सबळ ।
अवतार समाप्तीची हीच वेळ ।
ठरविले मनोमन ॥९६॥
जरी प्रभुमहाराज गंभीर अत्यंत ।
धीर देऊनि करिती सकलांस शांत ।
विधीवत चतुर्थाश्रम घेतला क्षणांत ।
वंदिती मातोश्रीस ॥९७॥
आपला कनिष्ठ बंधू खंडेरावास ।
उपदेश देऊन दिधले प्रसादास ।
प्रसाद देऊनि भक्त मंडळीस ।
तोषविले सर्वांस ॥९८॥
सिद्ध करूनि आसन ।
देह केला विसर्जन ।
चैतन्यात मिसळले चैतन्य ।
अवतार मनोहर ॥९९॥
शोक जाहला अनावर ।
दुःखात बुडाले माणिकनगर ।
कैसा घालावा आवर ।
भावनेस आता ॥१००॥
पुढील विधी यथाशास्त्र केला ।
आणेनी बैसविले संजीवन देहाला ।
मधल्या कमानीत बैसाकार केला ।
होता तेथेची ॥१०१॥
वयमान अवघे एकोणिस ।
घेतले संजीवन समाधीस ।
नैष्ठिक ब्रह्मचार्याचा कळस ।
मनोहर अवतार प्रभुंचा ॥१०२॥
रूप जयाचे अतीव मनोहर ।
वाणीही तैसीच गोड मधुर ।
अत्यंत लाघवी मोहक सुकुमार ।
श्रीप्रभु मनोहर ॥१०३॥
अवघ्या सातव्या वयात पीठारोहण ।
एकोणीसाव्या वर्षी अवतारकार्य पूर्ण ।
बारा वर्षात माणिकनगर संस्थान ।
वाढविले मनोहरप्रभुंनी ॥१०४॥
गवंडी संतरामदादा प्रख्यात ।
घेऊन त्यांसी विश्वासात ।
प्रभुमंदिर निर्मिले अद्भूत ।
शान माणिकनगराची ॥१०५॥
अत्यंत भव्य आणि सुंदर ।
मंदिर बांधले माणिकप्रभु समाधीवर ।
स्थापत्यकलेचा ऐसा नमुना आजवर ।
झाला नाही ॥१०६॥
अचाट प्रभुत्व संस्कृत भाषेवर ।
तैसा योगाभ्यासही करती धुरंधर ।
स्तोत्र, मंत्र निर्मिले अपार ।
संस्थान उत्सवासाठी ॥१०७॥
ठेवूनि परंपरेचा मान ।
राखूनि संप्रदाय अभिमान ।
आखून दिले नित्यपूजाविधान ।
आजतागायत चालतसे ॥१०८॥
काव्य प्रतिभाही तैसिच अलौकिक ।
स्तोत्र, श्लोक आणि अनेक अष्टक ।
विविध भाषेत पदे अनेक ।
कविश्रेष्ठ मनोहर ॥१०९॥
प्रभुभक्ती आणि प्रभुवियोग उत्कट ।
प्रामुख्याने दिसतसे मनोहर काव्यांत ।
इतक्या लहान वयांतही वेदांत ।
मनोहरपदांतूनी झळकत ॥११०॥
स्वामीसमर्थ वदति भक्तांस ।
अक्कलकोटाहून माणिक नगरास ।
बडे भाईस जा भेटण्यास ।
बडा भाई मनोहरप्रभु ॥१११॥
व्यवहार करावा नियमित ।
तैसाच करावा वेळेत ।
कारभारात चोख अत्यंत ।
होते प्रभु महाराज ॥११२॥
होता सात्विक आहार ।
विद्वज्जनांवर प्रेम अपार ।
संतोषोनि देती उपहार ।
दानशूर प्रभुमनोहर ॥११३॥
प्रभुमंदिरावर कळस जरी सोन्याचा ।
आधी मान मनोहरप्रभुंच्या समाधीचा ।
पाया असे विराट प्रभुमंदिराचा ।
आधारभूत जो ॥११४॥
ऐसा अवतार प्रभुमनोहर ।
ब्रह्मचारी विद्वान सुकुमार ।
सवाई माणिक खरोखर ।
हाच गा ॥११५॥
Jai Guru Manik