काल रात्री उशीरापर्यंत जागून श्रीजींचे प्रवचन ओवीबद्ध केले. डोळा लागला तेव्हा घड्याळाचा काटा दीडकडे झुकला होता. प्रसादस्वरूप मिळालेला निशिगंधाचा हार उशाशी ठेवून, गोड आणि मंद सुगंधी लहरींसंगे निद्रादेवीच्या अधीन झालो. सकाळी चहाच्या गलक्याने जाग आली. हवेत सुखद गारवा होता आणि त्या गारव्यात गरम चहाचे घुटके हवेहवेसे वाटत होते. आज दोन कप चहा घेतला. एव्हाना इतर भक्तांचा पारायण झाल्यावर, बिदरच्या झरणी नरसिंहला जाण्याचा बेत चालला होता. आपल्या अवतार काळात श्रीमाणिक प्रभुंनी येथे आपले विश्वरूप प्रकट केले होते. श्रीगुरुचरित्रातील पापविनाशी तीर्थही येथेच आहे. दहाएक वर्षांपूर्वी मीही या स्थानी जाऊन आलो आहे. आठवणीच्या पुस्तकातील पाने चाळवली गेली. चहा घेऊन छानपैकी नामस्मरणाला बसलो. यथावकाश स्नान करून, नाश्ता आटपून रोजच्या शिरस्त्याप्रमाणे श्रीप्रभु मंदिरात पारायणासाठी येऊन बसलो. पावणे नऊच्या सुमारास वाचनाला सुरुवात केली. आज पारायण यादरम्यान भरपूर माकडे औदुंबरवर उड्या मारत होती. औदुंबराखाली आमचे पारायण चालू आहे, ह्याचा त्यांना काहीच फरक पडत नव्हता. अगदी मुक्तपणे ती माकडे मंडपावर, मंडपावरून औदुंबरावर औदुंबरावरून भिंतीवर उड्या मारत आपल्याच मस्तीत दंग होती. पण त्या मुक्या जीवांनी कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही. अर्ध्या तासाच्या मुक्त क्रीडेनंतर ते आल्या वाटेने निघून गेले. आजच्या पाचव्या दिवसाच्या पारायणाचे अध्याय मोठे रसाळ होते. माणिक नगरची स्थापना, चोर खड्ड्यात पडल्याची कथा, माझ्या अत्यंत जवळची तुकाराम धनगराची कथा, टर्रा हुसैन खानाचे गर्वहरण, नाना नाच्याची कथा, श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचा श्री माणिकप्रभुंशी असलेला हृदयसंबंध पारायणादरम्यान अनुभवताना, अंतरात एकापाठोपाठ आनंदलहरी उचंबळून येत होत्या. त्या त्या दिवसाचे पारायण झाल्यावर मन अगदी कृतार्थतेचा अनुभव करत असतं आणि ती अनुभूती अनुभवणे अत्यंत सुखावह असते.

पारायणानंतर श्रीप्रभुचे मन भरुन दर्शन आणि नंतर प्रदक्षिणा हा आता रोजचाच शिरस्ता झाला होता. आज गुरुवार होता. भक्तकार्यकल्पद्रुम श्रीगुरू आज अत्यंत  लोभस दिसत होता. श्रीप्रभुची नित्य सजावट करणाऱ्या समस्त ब्रह्मवृंदाचे खरोखर कौतुक करावयास हवे. श्रीप्रभुसमाधीवरील महावस्त्र आणि रेशमी शाल ह्याचा सुंदर मिलाफ आणि त्यावर विविधरंगी फुलांची सजावट आपणांस नित्य अनुभवायला मिळते. आज हिरव्या रंगाच्या वस्त्रसाजावर, अबोलीचा शेंदरी आणि कागड्याचा शुभ्र साज अत्यंत चित्ताकर्षक होता. दोन्ही बाजूंनी निशिगंध झारी घेऊन सुगंध शिंपडत होता. तुळशी माळ, बोरमाळ, रुद्राक्ष माळ अशा अनेक माळा गळाभर रुळत होत्या. मोत्यांची सहा पदरी माळ श्रीप्रभुच्या सौंदर्याला अधिकच खुलवत होती. माणिकरत्नाने मढवलेली सुवर्णपुष्प आणि वर लावलेला रत्नजडित नक्षीदार शिरपेच श्रीप्रभुच्या वैभवाची साक्ष देत होते. श्रीप्रभु समाधीवरील चांदीच्या छत्रावरुन सोडलेल्या झेंडूच्या माळा वातावरणातील मंगलतेत अधिकच भर घालत होत्या. असा हा लडिवाळ श्रीप्रभु गाभाऱ्यात सुखासनी विराजमान होता. श्रीप्रभु दर्शनात व्यत्यय नको म्हणून डोळ्यांच्या पापण्यांनाही मिटू नका असे बजावले. खरेच, अवतार काळी श्रीप्रभु किती लाघवी दिसत असेल? कुणाची नजर लागू नये म्हणून माझीच बोटे कानाजवळ नेऊन मोडली.

आज पुन्हा श्रीजींच्या घरी नित्यपूजेचा आनंद घेतला.‌ माध्यान्हपूजेचे तीर्थ मिळणे हा ही आपल्या भाग्याचा क्षण. श्रीप्रभु कृपेने हे क्षण माणिकनगरातील वास्तव्यात अनेकदा येतात. कधीकधी आपल्यालाच आपल्या भाग्याचा हेवा वाटतो. पूजेनंतर श्रीजींनी दहा मिनीटांत प्रवचनाला येतो म्हणून सांगितले.

ताक पिऊन श्रीनृसिंह निलयमध्ये स्थानापन्न झालो. पुढील पाचच मिनिटांत श्रीभक्तकार्याचा गजर झाला आणि श्रीजींची स्वारी व्यासपीठावर स्थानापन्न झाली. गुरुपरंपरेस वंदून, श्री भगवद्गीतेस नमून आतापर्यंतच्या सर्व दिवसांचा झटपट आढावा श्रीजींनी घेतला. एक उत्तम वक्ता म्हणून श्रीजींची ही गोष्ट मला अत्यंत भावते. समस्त उपस्थितांना मागील दिवसांत ग्रहण केलेल्या ज्ञानाची उजळणी करून, आजच्या दिवसाच्या विवेचनासाठी ते आपणांस सर्वार्थाने तयार करतात. श्रीजींनी आज १५ ते १९ असे पाच श्लोकांवर भाष्य केले. गीतेतील प्रत्येक अध्यायास योग म्हटले गेलाय आणि जी क्रिया परमात्म्याशी संबंधित असते त्यास योग म्हणतात. परमात्म्याने मानवास दिलेली सर्वात महत्त्वाची शक्ती म्हणजे वाणी… स्नान, अलंकार, साजशृंगारापेक्षा केवळ वाणी हाच मानवाचा श्रेष्ठ अलंकार होय. एखाद्याबद्दलची धारणाही वाणीनेच होते. वाणीनेच रामायण, महाभारत घडले. आपल्या वाणीने कोणालाही दुखवू नये. वाणीत आणि बुद्धीत सामंजस्य का आणि कसे असावे, वाणी तपासायच्या चार चाचण्या अशा समुपदेशनपर त्या त्या श्लोकाच्या शाखा श्रीजींच्या रसाळ वाणीतून विस्तारत होत्या. पुढे मानसिक तप, कायिक तप आणि मानसिक तप म्हणजे काय, हे समजावताना मनास माकडाची उपमा देली. त्यातून मनाची चंचलता कशी माकडासारखी असते, मौन म्हणजे काय आणि ते का गरजेचे आहे? तप म्हणजे काय? तप हे साध्य आहे, साधन नव्हे… गीता यज्ञ धडधडत होता. पुढे अध्यायाच्या अनुषंगाने सात्विक, राजसिक आणि तामसिक तपाचे स्पष्टीकरण देताना महाभारतातील धृष्टद्युम्नामाची कथा सांगितली.गीतेचा भावार्थ उपस्थितांना समजवून देताना श्रीजी शर्थीचे प्रयत्न करतात. विषय सुलभ करताना अनेकविध उदाहरणे देतात.‌ पुराणातील, व्यवहारातील अनेक दाखले देताना, तो तो विषय प्रत्येकाला आकलनीय कसा होईल, हेही श्रीजी अत्यंत आत्मियतेने पाहतात. अलीकडच्या काळात असे उत्तम शिक्षक आणि शिकवण्याची कला हळूहळू कमी होत चालली आहे. एखाद्या विषयाचा उहापोह करताना श्रीजी अनेक उदाहरणे देतात पण विषयाचा मूळ गाभा कधी सुटत नाही. वृक्ष जरी बहरला, त्याच्या अनेक शाखांचा विस्तार जरी झाला तरी मूळ मात्र जमीनीला घट्ट पकडून असते, श्रीजींच्या प्रवचनाची पद्धत अशीच काहीशी आहे.‌ श्रीजींच्या विवेचनातून होणाऱ्या एखाद्या विषयाच्या आकलनाबरोबरच त्यांच्या प्रवचन पद्धतीतून, त्यांच्या देहबोलीतून खूप काही शिकण्यासारखे आहे. प्रत्येकाने आपल्या आवडी, निवडी आणि सवडीनुसार घ्यावे. भक्तकार्य ब्रीदावलीचा जयजयकार होऊन आजच्या गीतायज्ञातील आहुत्या पूर्ण झाल्या.

श्रीप्रभुचा महाप्रसाद घेऊन यात्री निवासावर आलो. आजच्या प्रवचनाच्या ओव्या लिहून‌ काढल्या. श्रीमाणिकनगरात आपण सतत श्रीप्रभुच्या अनुसंधानात राहतो, हे ही ह्या स्थानाचे एक वैशिष्ट्य आहे. आज पुन्हा सायंकाळी श्रीप्रभुमंदिरात आलो.  श्रीप्रभुमंदिराच्या कळसाच्या पाठी पश्चिमेला रंगाची मुक्त उधळण होत होती. चैतन्याची अनुभूती श्रीप्रभु वेगवेगळ्या प्रकारे आपणांस नित्य देत राहतो. आपण केवळ साक्षीभावाने अनुभवत राहावं. औदुंबराखाली बसून‌ सायंकाळी पश्चिमेला होत असलेला चैतन्याचा हा अद्भुत खेळ हृदय पटलावर कायमचा कोरला गेलाय. भक्तकार्य झाल्यावर आज कोल पाहायला आलो. आज बाळगोपाळ क्रीडा विशेष रंगली. सुर, ताल आणि पदलालित्याचा हा खेळ आपणांस एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो. हा खेळ पाहताना मनास होणाऱ्या आनंदाच्या भरात मन हळूच, हा खेळ सुरू करणाऱ्या श्रीमार्तंड माणिकप्रभुंच्या चरणी कृतार्थतेने लीन होत होते. कोलनंतर महाप्रसाद घेवून श्री प्रभु मंदिरात भजन आणि प्रवचनासाठी लवकर येऊन बसलो. आज गुरुवारचा हिरवा रंग होता. श्रीप्रभुसमाधीसमोर आनंदमंटपात श्रीजींची हिरव्या रंगाची गादी अत्यंत शोभिवंत दिसत होती. श्रीजींनीही आज हिरव्या रंगाचा पोषाख धारण केला होता. आज प्रवचन-भजनाआधी आरती झाली, गुरुवारचे अष्टक झाले. गुरूवार आणि शनीवारी  गुरुवारी भजनाच्या आधी आरती असते. सर्व आरत्या व गुरुवार-शनिवार चे अष्टक झाल्यावर मग प्रवचन-भजन इ. ला सुरुवात होते. वर्षभरात गुरुवारची व शनिवारची आरती दुपारी ४ ला होते. मात्र वेदांत सप्ताहात रात्री भजनाला लागून, भजनाच्या आधी होते. आजच्या प्रवचनासाठी गुरुवारचे धरीयेले गे माय श्रीगुरुचे पाय… हे श्रीमाणिक प्रभुंचे गुरूभक्तिपर पद होते. गुरूवारच्या दिवशी, श्रीगुरूच्या संजीवन समाधीसमोर, गुरूच्या तोंडून, गुरुभक्तीचे पद ऐकणे हा विशेष योग होता. संपूर्णपणे शरणागत झाल्यावर, श्रीगुरु आपल्यावर नित्य बरसत राहतो आणि त्यात असे नखशिखांत भिजणे अत्यंत सुखावह असते. आजही सुर-तालांची मैफिल भजनादरम्यान सुरेख रंगली. आधीच श्रीप्रभु पदे इतकी गोड आणि रसाळ आहेत आणि त्यात मिसळलेला हा शास्त्रीय सुरतालांचा गोडवा चित्तवृत्तीला समाधानाच्या परमोच्च शिखरावर नेऊन ठेवत होता. शेजेची पदे म्हटली गेली त्यावेळेस कुरमुरे-खोबऱ्याचा प्रसाद वाटला गेला. रात्री भजनवाल्यांना श्रीजींनी प्रेमपूर्वक आशीर्वाद दिला. भजनाची सांगता होताना कमलवदनी हे अमृता भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा… ह्या पदाच्या लाटा श्रीप्रभुमंदिर परिसरात एकावर एक आदळत होत्या. आजही भजनानंतर चिवडा, मैसूर पाक, आईस्क्रीम असा महाप्रसाद वाटला गेला. यात्री निवासाकडे पावले वळताना मध्यरात्री बाराच्या सुमारास वातावरणातील गारवा आईस्क्रीमची लज्जत अधिकच वाढवित होता…

क्रमशः…

[social_warfare]