आज (२१.०३.२०२२) पहाटे पाचलाच जाग आली. मोरांचा दूरवरून येणारा केकारव गाढ झोपेतून जागा करायला पुरेसा असतो. श्रीमाणिकनगरच्या वातावरणात एक प्रकारची प्रसन्नता आहे. कालच्या दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमानंतर रात्रीच्या केवळ पाच तासाच्या झोपेनंतर ही मन चैतन्याची अनुभूती करत होतं. झटकन उठून बसलो आणि श्रीजींचं कालचं वेदांतावरचं प्रवचन ओवीबद्ध करावसं वाटलं. श्रीसंस्थानाने दिलेल्या वही पेनाचा चांगला उपयोग झाला. वहीतल्या नोंदी आणि श्रीजींचे हृदयात कोरलेले शब्द त्याची सांगड घालून संपूर्ण प्रवचन ओवीबद्ध करायला सुरुवात केली. सहाच्या ठोक्याला चहा आला. दोनच दिवसात सकाळचा आणि दुपारचा चहा घेताना भक्तांचा छान कट्टा जमू लागला. एव्हाना बहुतेक सर्वांची ओळख झाली होती आणि त्यातून निरनिराळ्या विषयांवर चर्चा होत होत्या. श्रीमाणिकप्रभुंनी स्थापन केलेल्या, सकलमत संप्रदायात सर्व मतांचा, सर्व धर्मांचा आदर होतो. येथे कोणाची निंदा नसते. एरवी तावातावाने आपला मुद्दा रेटायचा ही खुमखुमी येथे आपोआप शांत झाली होती. समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकत राहिलं, त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही की मन आपोआप शांत होतं. सर्वांतरी श्रीमाणिक ही भावना अंतरात रुजू लागली की इतरांबद्दलचा आदर मनात दुणावू लागतो. श्रीमाणिकनगरातील वास्तव्यात माझ्या अंतरातील हा बदल मला प्रकर्षाने जाणवतो. तोच धागा पकडून सकलमताची ही सुंदर विचारधारा जीवनात अंगीकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न निरंतर सुरू आहे. चहानंतर आज शेजारच्या खोलीत डोकावले. ज्येष्ठांचा योगा चालू होता आणि त्याबरोबर हास्यांचे फवारे उडत होते. शाब्दिक कोट्यांचा इतका परिणामकारक वापर योगाच्या दरम्यान मी प्रथमच अनुभवत होतो. एकंदरीतच आज हास्ययोगा ही अभिनव संकल्पना पहायला मिळाली. वयोमानानुसार शरीराच्या मर्यादित हालचालींचा बाऊ न करता, त्याला खेळीमेळीने घेणे हा ही, जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन ज्येष्ठांकडून शिकता आला. स्नानादी कर्मे उरकून राहिलेल्या ओव्या पूर्ण केल्या. नाश्ता करून दुसऱ्या दिवसाच्या पारायणासाठी औदुंबर वृक्षाखाली आलो. आज प्रत्येक जण आपापल्या सवडीनुसार वाचनास येऊन बसला होता. सहजच लक्षात आले की जो काल ज्या जागेवर बसला होता, आजही तो त्याच जागेवर पारायणास बसला होता. कुठेही गडबड गोंधळ नाही, धक्काबुक्की नाही, हमरीतुमरी नाही. मनोभावे आपापलं वाचन करावं आणि श्रीप्रभुला ते सप्रेमे अर्पण करावं. श्रीप्रभुचरितामृत पारायण सप्ताहात रोज ९ अध्याय वाचायला येतात. काळंभटास विश्वंभर दर्शन, भाव्या आणि माणक्याच्या रूपात श्रीमाणिकप्रभुंचे प्रकटणे ह्या कथा वाचताना श्रीप्रभुचे अस्तित्व आपल्याभोवती जाणवते.

आज श्रीमार्तंड माणिकप्रभुंची पुण्यतिथी होती. त्यानिमित्त श्रीजींची नित्यपूजा आज मुक्तीमंटपातील श्रीमार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीवरच रूद्राभिषेकयुक्त महापूजेने संपन्न झाली. श्रीमार्तंड प्रभुंचा अवतार हा शिवाच्या मल्हारी म्हाळसाकांतरुपाचा अवतार मानला जातो. सोनेरी काठाच्या गर्द जांभळ्या रेशमी शालीमध्ये, दागिन्यांच्या मोहक समाजात, श्रीमार्तंड माणिकप्रभुंचे रुप मनोहर भासत होते. आपला नश्वर देह जरी लौकिक रुपाने विसर्जीत केला तरी, आपल्या वेदांतील अद्वितीय, अविस्मरणीय पदांनी समस्त जनांच्या हृदयात अजरामर झालेल्या ह्या महात्म्याप्रती कृतज्ञता व्यक्त करुन, त्यांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन प्रवचनाच्या आतुरतेने निघालो. ताक पिऊन श्रीनृसिंहनिलयमध्ये प्रवचनासाठी जाऊन बसलो.

सव्वाबाराच्या सुमारास श्रीभक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात श्रीजींचे दिमाखात आगमन झाले. गुरुपरंपरेस वंदन करून, श्री भगवद्गीतेचे स्मरण करून श्रीजींनी कालच्या दिवसाच्या निरुपणाचे सिंहावलोकन केले. श्रीजींची ही एक आगळी वेगळी शैली आहे. काल ऐकलेले पण मानवाच्या सहज स्वभावानुसार कदाचित विस्मृतीत गेलेले ज्ञान ह्या सिंहावलोकानाने श्रोत्यांना पुन्हा आठवते आणि पुढच्या विवेचनात एकसंधता येते. मागच्या सर्व वेदांत प्रवचनाचे जर व्हिडिओ पाहिले तर ही गोष्ट आपल्याला सहज लक्षात येते. YouTube वर Manik Prabhu या संकेत स्थळावर आपल्याला गीतेच्या निरुपणाचे आधीचे व्हिडिओ पाहता येतात. श्रीजींनी आज तीन ते सहा अशा चार श्लोकांवर विस्तृत भाष्य केले. आपल्या विचारांचा आपल्या भविष्यातील व्यक्तिमत्वावर, नियतीवर कसा परिणाम होतो हे लाओ त्झुच्या Watch your thoughts, they become your words… ह्या सुविचाराने छानपणे समजावले. विश्वास आणि श्रद्धा यातील भेद, श्रद्धेचे मानवी जीवनात डोकावणारे प्रतिबिंब, आपल्या श्रद्धेला घरात असलेले वातावरण, अनुवंशिकता, पूर्वजन्मातले संस्करण हे कसे कारणीभूत होतात, हे समजावताना श्रीजींनी अनेक विविध उदाहरणे दिली. देवांचे, यक्षांचे पूजन अथवा भूत प्रेतांचे आवाहन व त्यावरून एखाद्याच्या श्रद्धेची करता येणारी पडताळणी, सात्विक राजसिक आणि तामसिक देवतेच्या उपासनेचे फळ, दंभ आणि अहंकार ह्यातील भेद समजावताना श्रीजींची वेदांत विषय समजावून सांगण्याची तळमळच अधोरेखित होते. परमात्मा आपल्याच शरीरात असून, राजसिक आणि तामसिक लोक आपल्याच शरीराला पीडा पोहोचवून, आतील परमात्म्यासच कशी पीडा पोहोचवतात, ह्या टप्प्यावर आजच्या दुसऱ्या दिवसाच्या निरूपणाची सांगता झाली. महाप्रसाद घेऊन पुन्हा तीनच्या सुमारास यात्री निवासात आलो. आज दुपारीच आजचे प्रवचन ओवीबद्ध करून पूर्ण केले.

मुक्तीमंटपात श्री मार्तंड माणिकप्रभू पुण्यतिथीनिमित्त आज आराधना होती. सायंकाळी पाचच्या सुमारास श्रीमार्तंड माणिकप्रभूंच्या आराधनेस उपस्थित राहीलो. आजही श्रीजींचा संपूर्ण परिवार आराधनेला उपस्थित होता. कालच्या सारखेच ब्राह्मण भोजन, दक्षिणा, भजन पार पडल्यावर भाविकांना तीर्थ प्रसादाचे वाटप झाले. एव्हाना सात वाजले होते. श्रीप्रभु मंदिराच्या प्रांगणात आजही कोल खेळला गेला. दिवसागणिक बालगोपाळांची गर्दी वाढत होती. मध्यभागी गायक आणि वाद्यवृंद होता आणि त्यांच्या सभोवती बाळगोपाळांचा रासक्रीडेचा खेळ छान रंगला. सुरुवातीस संथ गतीने खेळला जाणारा कोल शेवटच्या टप्प्याला अगदी जलद गतीने, लयबद्ध रीतीने खेळला जातो. मला जरी कोल खेळता येत नसला तरी त्या तालावर मन आणि पाय दोन्ही थिरकत होते.

रात्रीच्या महाप्रसादानंतर श्रीप्रभु मंदिरात आलो. आज, सोमवारी, कर्पूरगौर श्रीप्रभु नागकेसरांच्या फुलांच्या सजावटीत मोहक दिसत होता. श्रीजींच्या प्रवचनाला अजून थोडा वेळ होता. आजही गावातील तरुण मंडळी भजन सेवा प्रभू चरणी अर्पण करीत होती. साडेआठच्या सुमारास वाजत गाजत दिमाखात श्रीजींची स्वारी श्री प्रभु मंदिरात आली. आज पांढऱ्या रंगाची गादी होती. वेदांत सप्ताहात सात वारांचे सात रंग असतात. त्या त्या दिवसाचा गादीचा आणि श्रीजींच्या कपड्यांचाही रंग एक चअसतो. कालच्या मल्हारीच्या भंडारस्वरूप पिवळ्या रंगानंतर, आज, सोमवारी कैलासाधिपती कर्पुरगौर शिवाचा, पांढरा रंग होता. गादीवर बसण्याआधी श्रीजींची श्रीप्रभुशी नजरानजर झाली.‌ त्यावेळची श्रीजींची उभी असलेली मनमोहक मूर्ती आजही मनावर गारूड करून आहे. आज सोमवारी प्रवचनासाठी शंकराच्या भजनातले गुरुभक्तीपर ब्यागने गुरुविगे शरण नी होगो हे कन्नड पद होते. मला हे पद जरी पाठ असले तरी नीटसा अर्थबोध होत नव्हता. ब्यागने म्हणजे शीघ्र… तु शीघ्रातिशीघ्र गुरूला शरण जा, आपल्या हृदयकमळावर श्रीगुरुचरणांना स्थापित करून त्याचे गुणगान कर. हे माणिक, तू श्रीगुरूला शरण जाऊन स्वतःच ब्रह्म बन… अर्थात् आपल्या आत्मस्वरूपाला ओळख… श्रीमाणिक प्रभुंची काव्यप्रतिभा विलक्षण होती. आजही दोन कडव्यांच्या ह्या पदावर जवळपास तासभर विवेचन झाले. असं वाटायचं हे विवेचन कधी संपूच नये. वरवर सहज वाटणाऱ्या या पदाचा गूढार्थ जेव्हा श्रीजींनी विशद केला तेव्हा डोळ्यांच्या कडा अलगद पाणावल्‍या होत्या. सोमवारच्या शंकराच्या भजनाला रात्र जशी पुढे सरकत होती तसा अधिकच रंग चढत होता. श्रीआनंदराज प्रभुंचा दैवी स्वर, त्याला लाभलेली श्री. अजयजी सुगावकरांच्या पेटीची आणि श्री. राजू सिंग यांच्या तबल्याची साथ उपस्थितांच्या मनास सुखावत होती.‌ झांजाचा लयबद्ध आणि टिपेला पोहोचणारा कल्लोळ मनास झिंग आणत होता. शेवटच्या पदाआधी श्रीप्रभुमंदिरासमोर आरती झाली. आरतीनंतर पुन्हा शेजारतीचे पद गादीपाशी येऊन म्हटले गेले. सर्वांच्या कपाळी भस्म लावून खोबरे कुरमुऱ्याचा प्रसाद वाटला गेला. आजही रात्री भजनासाठीच्या मंडळाच्या प्रमुखाला शाल देऊन आशीर्वाद देण्यात आला. भजनानंतर कमलवदनी हे अमृत भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा पद उच्चारवात आनंदमंटपात सर्वांमुखी गुंजू लागले. ह्या पदाच्या गजरात श्रीजी आपल्या निवासस्थानी परतू लागतात. आजही घड्याळाचा काटा मध्यरात्र उलटून गेल्याचे दाखवत होता. अखंड वीणा श्रीमाणिकनाम झंकारत होती आणि भोळासांब श्रीप्रभु गाभाऱ्यातून घरी परतणाऱ्या भक्तांकडे कृपादृष्टीने पाहत होता…

क्रमशः…

[social_warfare]