दिंडी

भक्तकार्य कल्पद्रुमचा जयघोष आसमंत निनादून टाकत होता आणि त्या मंगल वातावरणात रात्री सव्वा अकराच्या सुमारास श्रीजींनी दिंडीसाठी आपल्या निवासस्थान, नागाई येथून प्रस्थान ठेवले. काठाचे पांढरे शुभ्र धोतर, अंगात पांढराशुभ्र कुर्ता, डोक्यावर असलेली श्री प्रभु गादीची टोपी, आणि हातामध्ये चांदीची सुंदर नक्षीदार काठी अशी श्रीजींची मूर्ती अत्यंत मोहक दिसत होती. श्रीजींच्या चेहऱ्यावर फाकलेले दिव्य तेज सहज टिपता येत होते.‌ पुढे दिवट्या, संबळ, ढोल ताशे, अब्दागिरी घेऊन असलेले भालदार चोपदार, नित्यसवेत असलेला ब्रह्मवृंद, पाठीमागे छत्र घेऊन श्रीजींवर धरून उभा असलेला सेवेकरी, असा श्री संस्थानाला साजेसा थाट श्रीजींच्या प्रस्थानावेळी होता. श्रीजींच्या कुटुंबासह अनेक प्रभुभक्त श्रीजींच्या पाठीमागून मुक्ती मंडपाच्या दिशेने चालत होते. श्रीजींपाठून चालताना आपणही श्री प्रभु परिवाराचाच भाग आहोत, ही जाणीव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. प्रभुभक्तांच्या सोबत चालताना माझंही मन प्रसन्नतेचा अनुभव करत होतं. अत्यंत त्वरेने भक्तांची ही मांदियाळी मुक्तीमंटपात श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर येऊन उभी ठाकली. मुक्तीमंटप आतून पूर्ण भरला होता, अनेक प्रभुभक्त मुक्तीमंटपाच्या बाहेरील मोकळ्या जागेतही उभे होते. सुदैवाने मला श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीच्या अगदी समोर उभे राहायला जागा मिळाली.

“श्री भक्तकार्यकल्पद्रुम गुरुसार्वभौम श्रीमद्राजाधिराज योगीमहाराज त्रिभुवनानंद अद्वैत अभेद‌ निरंजन निर्गुण निरालंब परिपूर्ण सदोदित सकलमतस्थापित श्री सद्गुरू माणिकप्रभु महाराज की जय…” श्री माणिक प्रभुच्या परवलीच्या गगनभेदी ब्रीदावळीने आसमंत दुमदुमून गेला. “नमः पार्वती पतये हर हर महादेव”, “अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त”, “श्री सद्गुरू माणिकप्रभु महाराज की जय”चा मंगल गजर झाला. दिंडी सुरू व्हायच्या आधी दिंडीचे सर्व साहित्य जसे बुक्का, दिंडीच्या पदांचे पुस्तक, सकलमत संप्रदायाचा झेंडा हे श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या समाधीसमोर ठेवले होते. श्री मार्तंड माणिकप्रभुंनीच आपल्या कारकीर्दीत दिंडीची सन १९०० मध्ये मुहूर्तमेढ रोवली.‌ दिंडीचा हा प्रणेता श्री मार्तड माणिकप्रभु, जो ज्ञानमार्तंड, बोधमार्तंड, चिन्मार्तंड अशा अनेक रूपांमध्ये वर्तत आहे, आज बहुरंगी फुलांचा, दागिन्यांचा साज लेऊन दिंडीचा आनंद लुटायला आलेल्या या लेकरांना आपल्या बाहुपाशात घेण्यासाठी सरसावला होता. श्री माणिकप्रभुंच्या संजीवन समाधीप्रमाणेच त्यांच्या नंतरच्या पिठाचार्यांच्या समाधीस सजवण्याची एक विशिष्ट पद्धत श्री माणिकनगरला पाहायला मिळते. समाधीस झालर असलेले उंची वस्त्र, त्यावर सुंदर नक्षीकाम असणारी रेशमी शाल.  दोहोंची रंगसंगतीही आपल्या मनाचा चटकन ठाव घेईल अशाप्रकारे अत्यंत काळजीपूर्वक निवडलेली असते. समाधीच्या पुढील बाजूस दागदागिने आणि फुलांच्या माळांची नेटकेपणे केलेली मांडणी मन मोहून टाकते. समाधीच्या वरच्या बाजूला फुलांची निमुळती होत जाणारी मुकुटाकार मांडणी, त्यावर खोचलेला शिरपेच जणू सद्गुरुचे सगुण रूपच साकार करते. मुख्यत्वेकरून गुलाब फुलांच्या आणि सुगंधित मोगऱ्याच्या साजामध्ये सकलमत संप्रदायाचा झेंडा आसेतुहिमाचल फडकवणारा हा ज्ञानसूर्य, ज्ञानमार्तंड आज मध्यरात्रीही स्वयंतेजाने झळाळत होता. समोर महानैवेद्यासाठी फळफळावळ आणि सुकामेवा ठेवला होता. धुपाचा मंद सुवास मुक्तीमंटपात भरून राहिला होता. धुराच्या त्या वलयांत हा मार्तंडप्रभु समस्त भक्तजनांना आत्मसुखाची अनुभूती द्यायला आज सज्ज झाला होता.

श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या समाधीसमोर “जय देव जय देव जय गुरु मार्तंडा” आणि “मार्तंड पराक्रमचंड कीर्ती उद्दंड शमवी पाखंडा, उंचवी प्रभो निज सकलमताचा झेंडा” ह्या दोन आरत्या म्हटल्या गेल्या. त्याच्यानंतर सर्वांना आरती देऊन झाल्यावर, श्रीजी श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर गाभार्‍या बाहेर उभे राहिले. तेथे श्री प्रभुपरिवारातील सर्व सदस्यांनी श्रीजींना पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले. श्री प्रभु परिवारातील सदस्यांनंतर इतरही प्रभुभक्त गर्दीतून वाट काढत श्रीजींपर्यंत पोहोचले आणि त्यांनी श्रीजींना पुष्पमाळा अर्पण केल्या. श्रीजींनीही आशीर्वाद स्वरूप प्रत्येकावर बुक्का उधळला. अगदी पहिल्या रांगेत असल्यामुळे माझ्याही अंगावर हा बुक्का येऊन पडला. बुक्क्याच्या त्या सुगंधी दरवळीने मन नखशिखांत मोहरून गेले. फिक्कट पिवळसर असलेला हा सुगंधित बुक्का, ज्वारीचे पीठ, भंडार आणि अनेकोत्तम सुगंधी द्रव्यांनी युक्‍त असतो. हा बुक्का श्री मार्तंड प्रभुंचा प्रसाद असतो. दिंडी दरम्यान सर्व समाधींवर अर्चन म्हणून व सकल भक्तजनांवर प्रसाद रूपाने उधळण्यासाठी हा बुक्का वापरला जातो.

ह्यानंतर सकलमत संप्रदायाची “उपदेश रत्नमाला” आणि तदनंतरची “आर्या” म्हटली गेली. श्रीजींनी पहिली ओळ म्हणावी आणि उपस्थित सर्वांनी त्यांच्या पाठून म्हणावं, प्रत्येक कडव्यानंतर “श्रीमाणिक, जयमाणिक, हरमाणिक, हरिमाणिक, चिन्माणिक, सन्माणिक, जय जय हो सकतामता विजय हो”चा गजर झांजांच्या किणकिणीत उपस्थित प्रभुभक्तांमध्ये चैतन्य फुंकत होता. श्रीजींच्यासमोर, त्यांना मार्गक्रमण करता येईल अशा रीतीने जागा सोडून दोन्ही बाजूला श्रीप्रभु परिवारा समवेत, गावकरी आणि प्रभुभक्त रांगेत उभे असतात. आपली संस्कृती आणि परंपरा जपणे हे ही श्री संस्थानाचे परम विशेष आहे. दिंडीच्या सुरुवातीलाच “आत्मा एकची सर्वांतरी हो” हे श्री मार्तंड माणिकप्रभु विरचित पद म्हटले गेले. हातामध्ये झांज, टाळ घेऊन भक्तजन आणि गावातील मंडळी दिंडीच्या भजनानंदात मधून मधून त्या विशिष्ट तालावरती उड्या मारून आपला आनंद व्यक्त करतात. ह्या उड्याही अत्यंत लयबद्ध असतात. स्वतः उपस्थित राहून हे सर्व अनुभवल्याशिवाय त्या आनंदाची अनुभूती येणे केवळ अशक्य आहे. दिंडी अनुभवायची माझी उत्सुकता पाहून श्री आनंदराज प्रभुंनी मला पुढे यायला सांगितले. त्यामुळे दिंडीच्या अगदी शेवटपर्यंत हा सुखसोहळा मला आकंठ अनुभवता आला. “एकची सर्वांतरी हो आत्मा” ह्या पदानंतर दिंडी श्रीमार्तंड माणिक प्रभुंच्या समाधीच्या मागच्या बाजूनं श्री शंकर माणिक प्रभुंच्या समाधीसमोर  आली.‌ संपूर्ण दिंडीमध्ये प्रभुभक्तांची चाल अत्यंत मंदगतीने होत असते. अखंड प्रभुनामाचा आणि वाद्यांचा गजर आपल्या मनास सतत ताजातवाना ठेवत असतो. ह्याकरिता दिंडीत देह आणि मन बुद्धीने सामील होणे अत्यंत आवश्यक आहे.

श्री शंकर माणिक प्रभुंनी त्यांच्या कारकिर्दीत दिंडीला एक विशिष्ट प्रकारची शिस्त घालून दिली. त्यांचा वेदांत विषयाचा व्यासंग प्रचंड होता. श्री शंकर माणिक प्रभु महाराजांच्या वेदांतविषयक लेखांचा संग्रह “ज्ञानशांकरी” ह्या पुस्तक रूपात उपलब्ध करून श्री संस्थानाने समस्त मानव जातीवर उपकारच केले आहेत. काहीसे अबोल पण वेदान्ताचे पूर्ण अधिकारी असलेले श्री शंकर माणिक प्रभुमहाराज अबोलीच्याच फुलांनी नटले होते. समाधीवरील मोत्यांच्या माळा आणि गुलाबांचे हार चित्त वेधून घेत होते. समाधीवरील माणिक रत्न लावलेले सुवर्णफूल अतिशय आकर्षक दिसत होते. येथेही फळांचा आणि सुक्यामेव्याचा नैवेद्य प्रभुस अर्पण केला होता.‌ आळवणी होवून  “जय देव जय देव जय शंकर गुरुवर्या” ही श्री शंकर माणिक प्रभुंची आरती म्हटली गेली.‌ नंतर श्री ज्ञानराज प्रभुंनी नवीनच रचलेली “आरती शंकरगुरुनाथा, सद्गुरू माणिक अवधूता” ही आरतीसुद्धा म्हटली गेली.  येथे “किती सुख हे, किती किती सुख हे” हे शाश्वत सुखाची तिथल्या तिथे अनुभूती देणारे प्रभुपद म्हटले गेले. भजनानंदात पदागणिक प्रभुभक्तांचे उचंबळणे सुरूच होते. श्री शंकर माणिक प्रभुंच्या समाधीनंतर दिंडी आता मुक्तीमंटपात ह्या दोन्ही पीठाचार्यांच्या समाधींच्या मधोमध असलेल्या श्री चैतन्य लिंगासमोर आली. श्रीजींनी श्री चैतन्यलींगासमोर श्री शंकराची “जयदेव जयदेव जय पार्वतिरमणा, हर पार्वतिरमणा” ही आरती केली. त्यानंतर “आता जाऊ चला आम्ही पाहू चला, गुरुराज प्रकट प्रभुराज प्रकट अवधूत आला” हे तनमन स्फुरवणारं पद अत्यंत जोशात म्हटलं गेलं. त्या-त्या पदांचा फलक काठीवर उंच धरला जात होता, त्यामुळे कुठल्याही कोपर्‍यातून भक्तांना त्या पदाचा आनंद लुटता येत होता. सूर आणि वाद्यांच्या त्या कल्लोळाने आता दिंडीची नशा शरीरामध्ये हळूहळू भिनायला लागली होती.‌ शरीर नकळत पदांच्या तालावर ठेका धरू लागलं होतं. चैतन्याची ही अनुभूती अत्यंत आनंददायी होती. श्रीजींनी उधळलेला बुक्का अधून मधून अंगावर पडत होता आणि त्याच्या मंद सुगंधाने चित्तवृत्ती उल्हसित होत होत्या.

मुक्तीमंटपातून दिंडी आता शेजारील नव्यानेच बांधून पूर्ण झालेल्या सिद्धराज मणिकप्रभुंच्या समाधीसमोर दाखल झाली. अत्यंत कनवाळू असलेले, वाचासिद्ध श्री सिद्धराज मणिकप्रभु यांची समाधीसुद्धा रंगबिरंगी अनेकविध फुलांनी छान सजवली होती. समाधीला चोहीकडून केळीचे खांब लावले होते. कागडा आणि अबोलीच्या माळा छतावरून रुळत होत्या. येथेही फळांचा आणि सुक्या मेव्याचा नैवेद्य श्री प्रभुला अर्पण केला होता. नव्याने बांधलेल्या ह्या वास्तूचे संगमरवरी बांधकाम अत्यंत रेखीव आहे. रात्रीच्या वेळी एकांतात येथे बसणे मनास अपार शांती देऊन जाते. असो. “जय देव जय देव जय सिद्धराजा, श्रीसिद्ध राजा, आरती ओवाळू तुज सद्गुरुराजा” आणि “आरती सिद्धस्वरूपाची, सनातन सद्गुरुभूपाची” ह्या दोन आरत्या म्हटल्या गेल्या. तदनंतर श्री सिद्धराज प्रभु नित्य गुणगुणत असलेले आणि मनास उभारी देणारे “प्रभु जवळी असता, असता मग चिंता मज कां?” हे पद म्हटले गेले. आपल्या कारकीर्दीत अनेक भक्त जणांचे कल्याण करणाऱ्या, सर्वांस समदृष्टीने पाहणाऱ्या ह्या कनवाळू‌ महात्म्याचे पद ऐकताना अनेक जणांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. माणसे जोडण्याची अद्भुत कला श्री माणिक प्रभुंनंतर प्रत्येक पीठाचार्यने हिरीरीने जोपासली आणि आजही जोपासत आहेत. आज दिंडीत जमलेला अफाट जनसागर हे त्याचेच द्योतक होता. श्री सिद्धराज माणिक प्रभुंच्या आळवणी नंतर दिंडी आता मुक्ती मंडपाच्या आवारात असलेल्या औदुंबराखाली आली. येथे “अवधूता शरण रिघाल्ये, देहींच ब्रह्मसुख फळलें, किती विस्मय नवल हे झाले, ब्रम्हासी ब्रह्मपण आले” हे अवीट गोडीचं पद म्हटले तेव्हा प्रत्येक जण भजनाच्या आनंदात न्हाऊन निघत होता. सकलमत संप्रदायाचा झेंडा डौलाने फडकत होता. बुक्क्याची श्रीजींच्या हातून मुक्त हस्ते उधळण होत होती. हा प्रसाद रुपी आशीर्वाद ज्याला मिळत होता तो, कृतार्थतेने अगदी धन्य धन्य होत होता. औदुंबरा खालून उत्तर दरवाजातून दिंडी आता श्री प्रभुमंदिराच्या कैलास मंटपात आली होती.

गाभाऱ्यामध्ये श्री प्रभु आपल्या लेकरांची सुहास्यवदनाने जणू वाटच पाहत होता. श्रीजींनी बुक्का श्री प्रभुसमाधीवर उधळला. तेथे “जय देव जय देव जयगुरु माणिका, सद्गुरु माणिका तव पद मोक्ष आम्हा न स्मरू आणिका”, तसेच “आरती सगुण माणिकाची, स्वरूपी जगत्प्रसुत्याची” ह्या दोन आरत्या अत्यंत उत्साहात म्हटल्या गेल्या. त्यानंतर “नित्य वंदू त्या माणिक पायां” आणि “मनोहरनंदन की जय हो”  ही दोन पदे म्हटली गेली. भक्तांचा आनंद आता अगदी टिपेला पोहोचला होता. भजनाचा आनंद लुटताना कोणाच्याही ऊर्जेमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नव्हती. कैलास मंटपातून दिंडी पुढे आनंद मंटपात आली. येथे “आम्ही चुकलो निजहित कामा, तू चुकू नको आत्मारामा” हे पद म्हटलं गेलं. येथे सर्वांना खडीसाखर आणि लवंग देण्यात आला.

दिंडी आता पुढे आनंद मंडपाच्या आग्नेय कोपऱ्यात असलेल्या आणि श्रीमाणिकनगरचे आद्यदैवत असलेल्या, श्री सर्वेश्वराच्या मंदिरापाशी जाऊन थांबली. श्रीजींनी श्रीसर्वेश्वराचे दर्शन घेतले. येथे “जय देव जय देव जय पार्वतिरमणा, हर पार्वतिरमणा” आणि श्री वीरभद्राची आरती झाली. श्री सर्वेश्वरासमोर “हा शैव नव्हे मनुजाधम मूढ तो ऐका, मी सांब नव्हे कोण मी धरी जो शंका” हे अंतरी वसलेल्या सांब सदाशिवाची जाणीव करून देणारे पद गायले गेले.‌ येथे श्रीजींनी हाती झांज घेऊन स्वतः वाजविले. उधळत जाणाऱ्या बुक्क्यासह आता प्रत्येक जण हळूहळू पूर्णपणे माणिक रंगात रंगत होता.

दिंडी आता श्री सर्वेश्वर आणि औदुंबर ह्या मधील मोकळ्या जागेत म्हणजेच दक्षिण पटांगणात आली होती. येथे श्री मनोहर माणिकप्रभु विरचित “सख्या माझ्या माणिकाला कोणि तरी दावा” हे  करुण रसाने ओतप्रोत भरलेले पद म्हटलं गेलं. दक्षिण पटांगणातून प्रभू मंदिराचा कळस अत्यंत मोहक दिसत होता.  रंगबिरंगी विद्युतझोतामुळे  रात्रीच्या अंधारात कळसाचा भाग अधिकच नयनरम्य दिसत होता. दक्षिण पटांगणातून दिंडी दोन पावले पुढे चालून औदुंबराखालील श्री अखंडेश्वरासमोर आली. तेथे “श्री जय देव जय देव दत्ता अवधूता” ही श्री दत्तगुरूंची आरती झाली आणि त्यानंतर “मायामलधूत आम्ही अवधूत” हे पद म्हटले गेले. त्यानंतर समोरील मंदिरात श्री दत्तप्रभुंचे दर्शन घेऊन दिंडी आता श्री प्रभुसमाधीच्या पाठी असलेल्या श्री मनोहर माणिक प्रभुंच्या समाधी समोर येऊन थांबली. श्री माणिक प्रभुंचा लाडका कुत्रा, “भरोसा”च्या समाधीचे दर्शन घेतले. श्रीजी आणि ब्रह्मवृंदाने तळघरामध्ये असलेल्या श्री मनोहर प्रभुंच्या समाधीचे दर्शन घेतले आणि येथे “जय देव जय देव जय जय गुरुभूपा, आरती ओवाळू तुज सच्चिद्रूपा”, “जयदेव जयदेव मनोहर गुरु स्वामीन्” आणि “आरती सद्गुरु रायाची मनोहरप्रभुच्या पायाची” ह्या तीन आरत्या म्हटल्या गेल्या. त्यानंतर श्री मनोहर प्रभूंनी रचलेले “सखया जावे निजगुरुचरणा शरणा झडकरी” हे दिव्य पद म्हटले गेले. ह्या पदाचं वैशिष्ट्य असं की मुखडा जरी मराठीत असला तरी पहिलं कडवं संस्कृतमध्ये, दुसर कडवं कन्नडमध्ये, तिसरं कडवं हिंदीमध्ये आणि चौथं कडवं मराठीत आहे. चारही कडवी आपण एकाच चालीत म्हणू शकतो. इथे पद म्हणत असताना डोक्यावर छत्र धरलेले श्रीजी मला एक क्षण साईबाबाच वाटले. तीच लकब, तशीच दाढी. योगायोगाने साईबाबा शिर्डीत प्रकटण्याआधी श्री माणिक प्रभुंच्या हयातीत, त्यांच्या दरबारात येऊन श्री प्रभुंकडून अनुग्रह घेऊन गेले होते. झटकन जाऊन श्रीजींना वंदन करून आलो, त्यावेळी बुक्क्याची मूठभर उधळण माझ्यावर झाली. ते सुगंधलेपीत शरीर घेऊन उत्तर पटांगणात श्री मुख्य प्राण मारुतीच्या समोर हजर झालो. येथे लगेचच “नरतनु व्यर्थ गमाई, नही ढूंढा अपना माणिक सांई” हे पद म्हटलं गेलं. श्रीजींचं साईबाबांसमान दिसणं आणि पुढच्या पदातही साई शब्द येणं, ह्या योगायोगा बद्दल मी स्वतःला कृतार्थ समजत होतो.

श्री प्रभु मंदिराला उजव्या बाजूने प्रदक्षिणा घालून दिंडी आता महाद्वारातून बाहेर पडत होती. महाद्वाराच्या पायऱ्यांवर “श्रुतीधर्म रक्षुनि सकलमताते वंदा” हे पद म्हटलं गेलं. श्री प्रभुमंदिराच्या पटांगणातून दिंडी आता जुन्या भंडारखान्यात असलेल्या श्री अन्नपूर्णेश्वरी देवीसमोर आली होती. येथे श्री अन्नपूर्णा देवीची आरती म्हटली गेली आणि त्यानंतर “श्रीदेवी त्रिपुरसुंदरी माय पाव” हे पद म्हटले गेले. श्री अन्नपूर्णेचा जयघोष झाला. श्री अन्नपूर्णा देवीच्या मंदिरापासून भोजन शाळेपर्यंत माझ्या अत्यंत आवडीच्या “कमलवदनी हे अमृत भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा” ह्या पदाची गुंज आसमंतात करून राहिली. भोजनशाळेच्या प्रवेशद्वारापाशी सर्वांना सरबत दिले गेले. दिंडी आता भोजनशाळेत येऊन थांबली.  येथे “कोण्या सुकृत दैव हे फळले, गुरुहस्तामृत शिरी पडले, मन माझे वळले, स्वहितगुज कळले” हे पद म्हटले गेले. इथे थोडावेळ बसायला मिळाले. पण कोल खेळणारे मात्र रासक्रीडेचा आनंद लुटत राहिले. सुर आणि वाद्यांचा कल्लोळ,  टिपऱ्या घेऊन जलद गतीमध्ये कोल खेळणारे भक्तजन… पहाटेच्या पावणेतीन वाजण्याच्या सुमारासही भोवतालचं वातावरण भारलेलं होतं. निद्रादेवीचा थोडासाही प्रकोप आज मला जाणवत नव्हता. “चैतन्यदेव” हेच मुख्य दैवत असणाऱ्या सकलमत संप्रदायाच्या पुण्यभूमीत चैतन्याची अनुभूती जागोजागी येत होती.  भोजन शाळेतील ह्या भारलेल्या वातावरणात सकलमत संप्रदायाचा झेंडा आज अधिकच डौलाने फडकत होता…

क्रमशः…

[social_warfare]