सकाळी साधारण सव्वा अकरा वाजता श्रीजी पाद्यपूजेसाठी सगरोळी गावात निघाले. आजच्या दिवसाची पहिली पाद्यपूजा श्री. अभिजीत महाजन यांच्या घरी अतिशय उत्साहात पार पडली.‌ त्यानंतर श्री. चंद्रकांत पांचाळ, श्री. गिरीश अलुरकर आणि श्री. चंद्रकांत शक्करवार ह्यांच्याकडच्याही पाद्यपूजा अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडल्या. ज्यांना श्रीजींना आपल्या घरी बोलावणे शक्य नव्हते, असेही अनेक प्रभुभक्त पाद्यपूजेसाठी श्री. अलुरकरांकडे उपस्थित होते. सर्वांना सुकामेवा घातलेले मसाला दूध श्री. अलुरकरांकडे प्रसाद म्हणून वाटले गेले.‌ काही देण्या-घेण्यापेक्षा श्रीगुरु आपल्या घरी स्वतः आले आहेत, हा आनंद, तो कृतार्थतेचा भाव सर्वच सगरोळीकरांच्या चेहऱ्यावर पाद्यपूजेदरम्यान सहज टिपता येत होता.

श्री. चंद्रकांत शक्कवारांकडून श्रीजींचा ताफा आता सावकार श्री. गंगाधर शक्करवार यांच्या गृही आला होता. येथे भक्तांची प्रचंड गर्दी होती. घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून, वरच्या माळ्यावरील श्रीजींच्या पाद्यपूजेच्या स्थळापर्यंत, संपूर्ण मार्गावर गुलाबदलांच्या पायघड्या घातल्या होत्या. श्रीजींचे आगमन होताच फटाक्यांची एकच आतिषबाजी झाली. वरच्या मजल्यावरून सुमारे दहा मिनिटं गुलाबदलांची अखंड उधळण श्रीजींवर आणि प्रभुभक्तांवर होत होती. श्रीजींच्या पाद्यपूजेनंतर सुमारे दोन-तीनशे जणांनी श्रीप्रभुपादुकांचे दर्शन आणि श्रीजींचा आशीर्वाद घेतला. आलेल्या सर्व भक्तांसाठी आजही श्री. गंगाधर सावकारांनी महाप्रसादाची सोय केली होती. श्रीगुरु आपल्या घरी प्रत्यक्ष आले आहेत, हा दिवस प्रत्येक भक्तासाठी उत्सवापेक्षा काही कमी नसतो. माझे सारे वैभव हे केवळ आणि केवळ श्रीगुरु कृपेनेच आहे आणि हा कल्पवृक्षरुपी श्रीगुरु आपल्या गृही येतो, अशावेळी त्याच्या स्वागतामध्ये कुठलेही न्यून राहता कामा नये, याची काळजी सावकारांनी पदोपदी घेतल्याचे जाणवले. श्री. गंगाधर सावकारांच्या प्रत्येक कृतीतून कृतज्ञतेचा, कृतार्थतेचा, तो आनंद अगदी ओसंडून वाहत होता. श्रीगुरूंचा आशीर्वाद आपल्याबरोबरच इतरांनाही मिळावा, ही त्यांची तळमळही वाखाणण्याजोगी होती. सर्व भक्तांना श्रीजी अत्यंत प्रसन्न मुद्रेने सामोरे जात होते, आपल्या अभयकरांनी त्यांना आशीर्वाद देत होते.‌

सावकारांकडचे अत्यंत हृदय स्वागत स्वीकारून, श्रीजी आता श्री. नागनाथ पेन्सिलवार यांच्या घरी आले होते. पावसामुळे सगरोळी गावात लाईट नव्हती पण, श्रीप्रभुगादीचा प्रत्यक्ष सूर्यच आज भक्तांच्या घरी पूर्ण तेजाने तळपत होता. आपल्या कृपादृष्टीने त्यांचे क्षेम कल्याण चिंतीत होता. श्री. नागनाथरावांची पुढील पिढी श्रीजींच्या पाद्यपूजेमध्ये दंग होती. पण श्री नागनाथराव सर्व भक्तांची जातीने चौकशी करत होते. यांच्याकडेही मसाला दुधाचा प्रसाद होता.‌ पाद्यपूजेची पुढील फेरी श्री. भरडे सावकारांकडे झाली.‌ यांचे घर देशमुखांच्या गढीच्या पाठीमागेच आहे. सावकारांकडे पाद्यपूजा होऊन श्रीजी आता श्री. श्याम जोशी यांच्या घरी आले होते. श्री. श्यामदादांचे दुमजली घर श्री गुरूंच्या स्वागतासाठी सज्ज होते. घराच्या अंगणात काढलेली जय गुरु माणिकची रांगोळी आकर्षक रंगसंगतीमुळे मन वेधून घेत होती. श्री. श्याम जोशी आणि त्यांच्या ज्येष्ठ बंधूंनी श्रीजींची मनोभावे पाद्यपूजा केली. आज दुपारचे महाप्रसाद श्री. जोशींच्या घरीच होता. श्रीजी, ब्रह्मवृंद, गावकरी, सेवेकरी एकाच पंक्तीला बसले. गावाकडील भक्तांची सेवा ही शहरी भक्तांपेक्षा खूप वेगळी असते. भोजन वाढताना मनापासून केलेला आग्रह गावाकडे अजिबातच मोडता येत नाही. मिष्टान्न भोजनाबरोबरच सर्वांनीच मग गरमागरम मिरचीभजीचा आस्वाद घेतला. महाप्रसादानंतर भक्तकार्यच्या गजरामध्ये आम्ही सर्व अतिथीगृहावर आलो.

सकाळी पाद्यपूजेला निघतेवेळी माझ्या गाडीतील पेट्रोल अगदी खालच्या पातळीवर गेले होते. पेट्रोलच्या इंडिकेटरवर दोनच काड्या दिसत होत्या. तेथून पेट्रोल पंप सुमारे वीस मिनिटांवर असल्यामुळे, जाऊन येऊन साधारण पाऊण तास लागेल आणि आपल्यामुळे पाद्यपूजेला उशीर नको, म्हणून त्यावेळेला पेट्रोल भरता येणे शक्य नव्हते. गाडी जेमतेम पन्नास-साठ किलोमीटर जाईल, असे दाखवीत होती. महामार्गावर गाडीला लांबचा पल्ला गाठते, पण शहरांमध्ये किंवा गावच्या गल्लीबोळामध्ये तसे होत नाही. त्यातच अनेक पाद्यपूजांमुळे गाडी वारंवार चालू-बंद करणे, मागेपुढे करणे ह्यामुळे संपूर्ण पाद्यपूजा फेरीमध्ये पेट्रोल संपणार नाही ना, अशी धाकधुक मनात होती. ती काळजी माझ्या चेहऱ्यावर श्रीजींनी, श्री. गंगाधर सावकार यांच्या घरी कदाचित पाहिली. श्रीजींनी नजरेनेच मला खुणावून विचारले आणि एक मंद स्मित केले. जणू ते म्हणत असावेत, कशाला काळजी करतोस? माझे सत्व राखा, म्हणून श्रीप्रभु चरणांना तिथल्या तिथेच विनंती केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सकाळी सव्वा अकरा वाजता निघालेलो आम्ही, साधारणतः साडेतीनला परत अतिथीगृहावर आलो. पेट्रोलच्या इंडिकेटर वर अजूनही दोनच काड्या होत्या, आणि गाडी अजूनही पन्नास-साठ किलोमीटर जाईल असेच दाखवत होती.

अतिथीगृहावर आल्यावर तडक पेट्रोल भरायला निघालो. बिलोलीचा पेट्रोल पंप येताच, पेट्रोलचा इंडिकेटर वाजू लागला. पेट्रोलने किमान पातळी गाठली गेली होती. अगदी वेळेमध्ये पोहोचून, पेट्रोल फुल्ल करून घेतले. येताना मात्र त्या ओढ्याच्या जागी पाण्याची पातळी चांगलीच वाढली होती. समोरून आलेल्या दुचाकी स्वारामुळे पाण्याच्या वाढलेल्या पातळीचा अंदाज येत होता. श्री व्यंकमामातेला ज्याप्रमाणे नाल्याला आलेल्या पुरातून श्रीप्रभुने जसे हात देऊन अलगद वाचवले, अगदी त्याच प्रसंगाचे स्मरण करून, भक्तकार्यच्या जयघोषात पाण्यामधून गाडी दामटवली. एक क्षण गाडी थोडीशी हलली, पण प्रभुकृपेने सुखरूप निघालो. खिशातल्या खारकांच्या प्रसादाला हात लावला. यथावकाश अतिथीगृहावर आलो. थोडावेळ पाठ टेकवून संध्याकाळच्या चहाच्या वेळेस, तेथील स्थानिक ड्रायव्हरने सांगितले की बिलोलीचा रस्ता पावसामुळे आता बंद झाला आहे. तेथे छातीएवढे पाणी झाले आहे. श्रीजींनी केलेल्या मंदस्मिताचे रहस्य मला आता उघडले होते. सद्गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी.‌.. ह्या आणि अशा अनेक छोट्या छोट्या घटनांतून श्रीगुरु आपल्या भक्तांचे सत्व कसे राखतो, हे अनुभवणे रोमांचकारी असते. ह्या आणि अशा अनेक प्रसंगातून आपली श्रीगुरुवरील श्रद्धा, अधिकाधिक बळकट होत जाते.

दुपारी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. भक्तांच्या प्रेमळ आग्रहामुळे सकाळच्या सत्रात पाद्यपूजांना थोडासा उशीर झाला होता. त्यामुळे सकाळच्या वेळेत चार पाच भक्तांकडच्या पाद्यपूजा राहून गेल्या होत्या. संध्याकाळी पाऊस असतानाही सकाळी राहिलेल्या पाद्यपूजा संध्याकाळी पूर्ण करूया, यावर श्रीजींचा कटाक्ष होता. झिमझिम पडणाऱ्या पावसामध्येसुद्धा आपल्याला भक्तांच्या घरी जायला हवे, ह्या श्रीजींच्या संकल्पाने आम्ही श्रीजींसहित सायंकाळी सात वाजता पुन्हा सगरोळी गावात निघालो.

पहिली पाद्यपूजा श्री. ठाकूर यांच्याकडे होती. त्याच्यानंतर अनुक्रमे श्री. यलमवार, श्री. बाजीराव पेन्सिलवार, श्री. भंडारे आणि शेवटी श्री. नंदू जाधव यांच्याकडे श्रीजींचे आगमन व श्रद्धायुक्त पाद्यपूजन झाले. कुणाकडे बसायला अगदीच कमी जागा, लाईट नसल्यामुळे पुरेशा प्रकाशाचा अभाव, अरुंद गल्लीबोळ, जेथे वाहन जाऊ शकत नाही, अशाही परिस्थितीत श्रीजींनी स्थितप्रज्ञतेने सर्वत्र पाद्यपूजा स्वीकारल्या. प्रसंगी चढणीवरूनही चालत श्रीजी अत्यंत उत्साहाने भक्तांच्या घरी आशीर्वाद द्यायला जात होते. गोरज मुहूर्तावर, सायंकाळच्यावेळी श्रीजी पूर्णकलेने चंद्राच्या शितल किरणांसारखी कृपादृष्टी समभावाने सर्वांवर पडत होती.

सगरोळीतल्या सर्व पाद्यपूजा आटोपल्यावर श्रीजी आता पुन्हा प्रभुमंदिरात आले होते. सगरोळील्या राहिलेल्या प्रभुभक्तांना खारकांच्या प्रसादाचे वाटप झाले. त्यानंतर श्रीजींनी प्रभुमंदिरात आरती केली. आणि आरतीनंतर आम्ही बाजूलाच राहत असलेल्या श्री. मुकुंदशास्त्रींच्या घरी गेलो. श्री. मुकुंद शास्त्रींचे घर चालुक्यकालीन गणपतीच्या बाजूलाच आहे. श्री व सौ. मुकुंद शास्त्री यांनी श्रीजींची पाद्य पूजा केली.‌ आम्ही पुन्हा अतिथीगृहावर आलो. येथेच रात्रीचे भोजन झाले. इतका वेळ दम धरून आणि वचकून असलेल्या पावसाने, धुवांधार बरसायला सुरुवात केली. वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण दौऱ्यामध्ये, आम्ही अतिथीगृहावर आलो की पाऊस जोरात पडायला सुरुवात व्हायची. पाद्यपूजेच्या वेळेस मात्र पाऊस एक तर विश्राम घ्यायचा किंवा अतिशय सौम्यपणे बरसायचा. श्रीजींच्या अस्तित्वात जणू काही त्यानेही आपल्या वृत्तीला लगाम घातला होता. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, लाईट नाही अशा परिस्थितीतील सगरोळीची ती रात्र कायमच स्मरणात राहील. संस्थेने सर्व खोल्यांना मच्छर येऊ नये म्हणून जाळ्या बसवलेल्या आहेत, त्यामुळे लाईट नसतानाही बाहेरच्या सुखद गारव्यात समाधानाने झोप लागली.

क्रमशः….

[social_warfare]